✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बेल्जियन वाडीवर एक दुपार

म
मितान यांनी
Tue, 10/05/2010 - 03:46  ·  लेख
लेख
बर्‍याच दिवसांपासून एखाद्या बेल्जियन शेतावर जाण्याची ईच्छा होती. आमच्या एका डच मित्राच्या कानावर घालून ठेवले होते. एका दुपारी पॅट्रिकचा फोन आला की शनिवारी दुपारी ४ ते ५:३० अशी एका शेतकर्‍याची वेळ मिळाली आहे. मनात आले, शेतकर्‍याची अपॉइन्टमेन्ट म्हणजे फारच झालं! असेल बुवा इथला शेतकरी घड्याळावर चालणारा. गावाकडे शेतकर्‍याकडून तीनच वेळा ऐकलेल्या: सकाळ, दुपार, संध्याकाळ. तसा पॅट्रिकही आमचा नवा मित्र आहे. तो आम्हाला त्याच्या वाहनाने शेतावर घेऊन जाणार होता. या लोकांना भेट म्हणून काय घेऊन जावे असा प्रश्न पडला. वाईन मधले काही कळत नाही, शेतकर्‍याला फुलं काय भेट द्यायची, म्हणून उत्तम बेल्जियन चॉकलेट्सचे दोन पुडे आणि घरी केलेली नारळाची बर्फी घेतली. ठरल्या वेळी पॅट्रिक आला. त्याच्या घरून त्याच्या बायकोला, रोसिताला घेतलं आणि निघालो. पॅट्रिकने सांगितले की हा शेतकरी त्याचा मित्र वगैरे नाही. पण दरवर्षी उन्हाळ्यात ताजे अ‍ॅस्पेरगस घेण्यासाठी हे लोक त्यांच्या शेतावर जातात. लूक आणि इंगं हे ते जोडपं. त्यांना केवळ डच बोलता येतं. मला डच येतं पण शेतकरी डच बोली कळेल की नाही शंकाच होती. पॅट्रिकच्या अनुवादकौशल्यावर भिस्त होती. मनात सासर-माहेरची शेती दिसू लागली. आपले शेतमजूर शेतात काम करतानाची चित्रं येऊ लागली. दूध-दुभतं, धान्याची कोठारं, असं चित्र असणारं श्रीमंत शेतकरी आणि त्याचवेळी अत्यंतिक दारिद्र्याने पिचून गेलेले शेतकरी आटवू लागले. इकडच्या शेतकर्‍यांची स्थिती आपल्याएवढी वाईट नाही पण फार चांगलीही नाही. वर्षभर शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारशी भांडणं चाललेली असतात असे पॅट्रिकच्या बोलण्यातून कळाले. त्याची एक झलक मागच्या वर्षी टीव्हीवर बघितली होती. दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून दूध उत्पादकांनी खूप प्रयत्न केले. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी एक मोर्चा काढला. मिडियाला बोलावले आणि आपल्या मागण्या नोंदवत सरकारचा निषेध करत लाखो लीटर दूध एका मैदानात ओतून दिले! इथे शनिवार बाजारात शेतकरी शहरवसियांपेक्षा वेगळे दिसत नाहीत. आम्ही खरेदी करतो त्या बहुतेक भाज्या व फळं हॉलंड व जर्मनीतून आलेली असतात. आजूबाजूच्या डच लोकांना विचारलं इथे काय पिकतं? बहुतेकांना फक्त मका आणि टोमॅटो एवढंच माहित असतं. पण बाजार तर विविधरंगी असतो. मग इथला शेतकरी पिकवतो तरी काय? खूप उत्सुकता होती. गाडी एका छोट्या रस्त्यावरून अजून एका छोट्या रस्त्याला लागली आणि एका मोठ्ठ्या गोडाऊनसारख्या दिसणार्‍या इमारतीपाशी उभी राहिली. खाली उतरल्याबरोबर शेणामातीच्या वासानं एकदम घरगुती वाटू लागलं. एक कुत्रा उड्या मारत आमच्याकडे आला. पाठोपाठ त्याचे मालक-मालकिण. लुक असेल पस्तिशीचा आणि इंगंही साधारण तेवढीच. कडेवर एक चार वर्षांची मुलगी रोमी. luk-inge हसतमुख आणि प्रसन्न दिसणार्‍या या कुटुंबाकडे बघून परकं वाटलं नाही. दोघांनीही पायात रबरी बूट घातलेले होते. विटक्या पँट आणि मळक्या स्वेटरवर गवताच्या काड्या चिटकलेल्या होत्या. दोघंही लाजरेबुजरेच दिसत होते. कोणीतरी परदेशी पाहुणे शेतावर येण्याची पहिलीच वेळ असल्याचे जाणवत होते. लुकने ओळख झाल्याच्या दुसर्‍या मिनिटाला गाईडच्या भूमिकेत प्रवेश केला. हवापाण्याच्या गप्पा नाहीत, की हापाप कपाचा आग्रह नाही, की डेर्‍यातले पाणी नाही! रोसिता आणि इंगं बर्‍याच दिवसांनी भेटल्याने गप्पा मारू लागल्या. 'रीतीप्रमाणे' लुक पुरुषांबरोबर पुढे गेला आणि मागे आम्ही तीन बायका रमतगमत चालू लागलो. समोर एक गोडाऊन सारखे बांधकाम दिसत होते. तो होता गोठा. गाय स्पेशल. त्याला लागून दोन छोट्या खोल्या. तिथे दूध काढण्याची जागा. मग एक मोठे पार्किंग. त्यात अवाढव्य आकाराचे दोन ट्रॅक्टर, खत फवारणी यंत्र, पेरणी यंत्र, गवत कापायचे यंत्र, नि काय अन् काय. त्याला लागून या कुटुंबाची रहाण्याची जागा. त्याच्या डावीकडे अजून दोन प्रचंड गोठे. एक वासरू स्पेशल आणि एक गाभण गाय स्पेशल. यात एका बाजूला घोडे. मागच्या बाजूला चौथा गोठा - बैल स्पेशल! एकूणच आम्ही शेतकरी + गवळी मित्राकडे आलो होतो तर! पहिल्या गोठ्यात गेलो. लुक माहिती सांगू लागला. त्याच्याकडे एकूण ८० गायी, १०० वासरं, आणि २० बैल आहेत. सर्वांच्या कानाला त्यांचा बिल्लानंबर टोचलेला. आपल्यासारखी हरणी, ढवळी, चांदी, बुधी, मंगळी, कपिला, लाल्या, पवळ्या असली नावांची भानगडच नाही. एका रांगेत नीट बांधलेल्या त्या ८० गायी - सगळ्या सारख्याच दिसत होत्या मला! पुढ्यात टाकलेले गवत चघळत निवांतपणे मनुष्यप्राण्याचे निरीक्षण चालू होते. हा गोठा हिवाळ्यात गरम करतात. गायींच्या डोक्यावर आढ्याला कसल्याच्या झाडाच्या फांद्या टांगल्या होत्या. सध्या कुठल्यातरी त्वचारोगाची साथ चालू आहे म्हणे. त्या पाल्याने ते इन्फेक्शन वाढत नाही. gotha gotha अजून एक माहिती मिळाली ती अशी - एक गाय दिवसाला ३० ते ४० लीटर दूध देते. ते एका कंटेनरमध्ये साठवतात. container दर तीन दिवसांनी ते विक्रीला पाठवतात. ३० युरो सेंट प्रतिलीटर असा सध्या भाव मिळतो. (आम्ही दूध घेताना ते ६८ ते ७० युरो सेंट प्रतिलीटर मिळते). या गायी वर्षाचे ५ महिने शेतात जाऊन चरतात. इतर महिने गोठ्यातच बांधलेल्या असतात. जनावरांसाठी लागणारा चारा शेतातच पिकवितात. साधारण २ फूट वाढणारं गवत असतं. ते कापून, बारीक करून, प्रेस करून त्याच्या पेंड्या करून ठेवतात. वर्षातून ४ वेळा ही गवतकापणी होते. वर्षातून एक पिक मक्याचं. मका तोडून उरलेली धांडं ट्रॅक्टरखाली दाबून, चुरून गवतात मिसळायचे. त्याचे पाऊस व बर्फात रक्षण करायचे. हे गुरांचं हिवाळ्याचं खाद्य. khau खूप साध्या लाजाळू लुकच्या मालकीची सव्वादोनशे एकर शेती आहे हे कळाल्यावर आ वासून बघतच राहिलो आम्ही. अगदी ५०-६० एकर शेती असणार्‍या शेतकर्‍यांचा ५-६ गडी, २०-२५ बाया, ४ बैलजोड्या, १०-१२ गायी यांच्या जोरावर चालणारी 'जमीनदारी' आपल्याकडे खूप अनुभवलेली आहे. इथे एवढं शेत आणि गुरं केवळ ही दोघं पती-पत्नी आणि लुकचे ७२ वर्षांचे वडिल सांभाळतात हे ऐकून थक्क झाले. रोसिता आणि इंगंच्या गप्पांमध्ये मीही हळूच सामील झाले. रोसिताला इंग्रजी येत नाही. मला इंगंच्या वेगळ्या उच्चारांमुळे एक एक शब्द हळू हळू समजवून घेत बोलावे लागत होते. मला तिने विचारले की, तुझ्याकडे आहेत का गायी? मी आपल्याकडच्या सिस्टीमची माहिती दिली. बैल शेतात काम करतात हे ऐकून ती म्हणाली, क? तुम्ही खात नाही? मग शाकाहारावर एक भाषण दिलं! बोलता बोलता वासरांच्या गोठ्यात आलो. २ दिवसांची २ वासरं होती. vasaroo एकूण एक महिना ते एक वर्ष वयाची ६० वसरं होती. पण कालवडी एकीकडे नि गोर्‍हे एकीकडे. इंगं म्हणाली - मला गोर्‍हे झालेले आवडत नाहीत. का ते ५ मिनिटांत कळणार होते. ६ गाभण गायी ज्या अठवडाभरात एक्स्पेक्टेड होत्या, त्या वेगळ्या बांधलेल्या होत्या. शेजारीच उत्तम जातीचे ४ घोडे तबेल्यात होते. शेतावर रपेट मारण्यासाठी हे घोडे. ghoda फॉन्सचा - लुकच्या वडिलांचा - या घोड्यांवर भारी जीव. स्वतः जातीने या घोड्यांची निगा राखतात. आम्ही ते बघत असताना ठेंगणीशी, गोड मार्गारेटआजी आली. मला डच येतं समजल्यावर तिचा बोलण्याचा धबधबा कोसळू लागला. त्यातले केवळ काही शब्दच मला कळत होते. पण एवढे कळाले की ती आपल्या नवर्‍याचे नि मुलाचे खूप कौतुक करत होती. margaret aji सूनबाई मात्र सासूबाईंसमोर गप्प झाली. होती. "जाण्यापूर्वी माझ्याघरी नक्की या हं" असे आजीने म्हटल्यावर प्रकाश पडला. इथेही मातीच्या चुली! आता आम्ही बैलांच्या गोठ्याकडे निघालो. तिथे जे दृष्य दिसले ते फारच अस्वस्थ करणारे होते. २०-२५ बैल लोखंडी जाडजूड कुंपणाच्या आत बांधलेले होते. अस्ताव्यस्त गवत पसरलेले. घोंगावणार्‍या माश्या आणि बैलांसाठी ठेवलेल्या कुठल्यातरी 'पौष्टिक' खाद्याचा नकोनकोसा वास. सव्वा ते दीड वर्षाचे गोर्‍हे इथे आणून बांधतात ते बाहेर काढतच नाहीत. त्याला वावरायला १० बाय १५ ची जागा असते. तेवढीच काय ती हालचाल. दोन वर्षांचा होईपर्यंत त्याला चरबी वाढवणारे खाद्य खाऊ घालतात. ८०० ते १००० किलोचा बैल कापण्यासाठी विकायला पाठवतात. हे बैल रग न जिरल्याने प्रचंड आक्रमक असतात. त्यामुळे गवत टाकण्यापासून गोठा साफ करण्यापर्यंतची सगळी कामं यंत्राने १० फूट अंतरावरून केली जातात. 'मला गोर्‍हे झालेले आवडत नाही' या वाक्याचा अर्थ आता लागला. bail वासरं जन्माला येण्यासाठीतरी बैल गायी एकत्र येत असतील असे वाटले. तोही भ्रम निघाला. सगळा इन्जेक्शनचा कारभार. इकडून बीज काढून तिकडे इन्जेक्ट करायचं. सगळच विचित्र! जन्मलेल्या प्रत्येक वासराची नोंद ब्रुसेल्सच्या कार्यालयात करावी लागते. मग त्या वासराचा पासपोर्ट तयार होतो. गुरांच्या खरेदी - विक्रीत हे पासपोर्ट अनिवार्य असतात. त्यात चुका झाल्यास शेतकर्‍याला दंड भरावा लागतो. गुरं बघून झाली आता शेत बघायला निघालो. समोर प्रचंड शेत पसरले होते. सगळीकडे गवत होते. shet shet मका वर्षातून एकदा तोही १०० एकरच(!) लावतात. अजून एक गव्हासारखे दिसणारे धान्य लावतात. तेही गुरांसाठी. या १०० एकरची नांगरणी व पेरणी अठवडाभरात होते. आधी शेणखत मशीनने फवारून घेतात. shenkhat मग नांगरणी आणि मग पेरणी. शेणखत अर्थातच विकत घ्यावे लागत नाही. १५०० अश्वशक्तीचे ट्रॅक्टर आणि ८ फाळे असलेला नांगर एवढे काम पटकन करून टाकतो. nangar मग कापणीच्या वेळी हर्वेस्टर मात्र लुक ४ दिवस भाड्याने आणतो. गवत कापण्याचे यंत्रपण बघितले. १० मीटर लांबीच्या या यंत्राने गवत कापले जाते आणि मागोमाग दुसर्‍या यंत्राने उचलले जाते व बारीक कापले जाते. मग त्याचे ठोकळे करून ठेवतात. युरिया पसरवण्याचे एक वेगळे यंत्र होते. हे यंत्र एकावेळी २०-२० मीटरपर्यंत युरिया फेकते. या यंत्रांचे बारकावे लुक सांगत होता. पॅट्रिक त्याचा अनुवाद करून नवर्‍याला सांगत होता. तेवढ्यात इंगं म्हणाली तिची थोरली मुलगी एका वाढदिवसाला गेली आहे, तिला घेऊन येते. ५ मिनिटांत तयार होऊन बाहेर पडलेली इंगं शेतकरीण वाटतच नव्हती. जीन्स, टी-शर्ट, नाजूक जॅकेट आणि पॉश कार! ती गेल्यावर सासूबाईंनी आमचा ताबा घेतला. आम्ही सासूच्या घरात गेलो. फॉन्सबाबा आले. पॅट्रिक आणि ज्ञानेश आले. गप्पा सुरू झाल्या. "बीयर घेणार का? कोला घेणार का?" दूध आत्ताच घेऊन झाले होते तरी म्हातारी ऐकेचना. वाईन, बीयर आणि कोला यापैकी काहीच आम्ही घेत नाही म्हटल्यावर आजीबाईंनी दुधात शिजविलेली तांदळाची खीर समोर आणली. अप्रतीम चवीची आटलेल्या दुधात शिजवलेली ती खीर मी कधीच विसरणार नाही! फॉन्स ५० वर्षांपूर्वी या वाडीवर रहायला आला. सुरुवातीला १०-१२ गायी होत्या. त्याने हे पशुधन वाढवले. दूध काढण्याची यंत्रे त्याने ३० वर्षांपूर्वी लावली. आजही तीच यंत्रं काम करताहेत. खूप अभिमानाने फॉन्सबाबा आपली कथा सांगत होते. fons आम्ही अधूनमधून त्यांच्या भाषेत आपल्याकडील शेतीची माहिती देत होतो. अडेल तिथे पॅट्रिक दुभाषा म्हणून होताच. खाणं संपवून निघालो. आजीबाईंनी हातात एकेक चॉकलेट ठेवले. बाहेर आलो तेव्हा लुक आणि इंगं आपल्या कामाला लागले होते. दूध काढण्याचे काम चालू होते. doodh यंत्रं असली तरी ८० गायींचे दूध काढायला दोघांना मिळून सकाळी अडीच तास आणि संध्याकाळी अडीच तास एवढा वेळ लागतो. बाकी चारापाणी, स्वच्छता यांना दिवस अपुरा पडतो. हं, एक राहिलंच. सरकारी फॉर्ममध्ये शेणखताची विल्हेवाट दाखवावी लागते. एकूण उत्पादन, वापर यात तफावत असेल, म्हणजे गरजेपेक्षा जास्त शेणखत निर्माण होत असेल तर शेणखत उचलून नेण्यासाठी सरकारला पैसे द्यावे लागतात. मग काही ठराविक काळाने सरकारी लोक पैसे नि खत घेऊन जातात! उत्पन्नाचे, जमिनीचे आंकडे श्रीमंती दाखवत असले तरी शेतकर्‍याचं जीवन किती कष्टाचं, जगात सगळीकडेच! निघतांना इंगंने सहज म्हणून ५-६ लीटर दूध एका डब्यात भरून दिलं. फॉन्सबाबाने एक लाकडी गॅरेज उघडून डिस्कब्रेक असलेला आपला ८ माणसांचा टांगा दाखवला. दुसर्‍या दिवशी त्याचे गुढग्याचे ऑपरेशन होणार होते. मी बरा झालो की या टांग्यातून तुम्हाला शेत फिरवून आणेन असे वचन त्याने दिले. किती साधी, लाघवी माणसं ही! पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन आम्ही त्या वाडीचा निरोप घेतला. ghar गेला अठवडाभर डोक्यातून ते शेत जात नाहीये. विस्मरणात गेलेला, प्रबोधिनीत शिकलेला एक श्लोक आता सगुणाला शिकवणार आहे - वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे | सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे | कृषिवल कृषि करण्या राबती दिवसरात्र | श्रमिक श्रम करोनि वस्तू या निर्मितात | स्मरण करुन त्यांचे अन्न सेवा खुशाल | उदरभरण आहे चित्त होण्या विशाल |
  • बोकरैकवाडी - मध्ययुगीन बेल्जियम

Book traversal links for बेल्जियन वाडीवर एक दुपार

  • बोकरैकवाडी - मध्ययुगीन बेल्जियम ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
33318 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

झकास......

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/05/2010 - 18:53 नवीन
'आमची माती आमची माणसं' या सदरात आपण 'बेल्जीयमची शेती आणि व्यवस्थापन' याची सुंदर ओळख करुन दिली.मनःपूर्वक आभार.....! दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

एक वेगळ्याच प्रकारची आणि नवे

परिकथेतील राजकुमार
Tue, 10/05/2010 - 19:21 नवीन
एक वेगळ्याच प्रकारची आणि नवे अनुभव देणारी मस्त सहल. लेखनशैली आणि फोटुंमुळे आम्ही सुद्धा ह्या सहलीत सहभागी असल्यासारखेच वाटले.
  • Log in or register to post comments

सर्व वाचक प्रतिसादकांचे

मितान
Tue, 10/05/2010 - 22:53 नवीन
सर्व वाचक प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार :) आता १४ व्या शतकातल्या बेल्जियन खेड्यावरही लिहीन म्हणते :))
  • Log in or register to post comments

नुसते म्हणू नकोस, लिही.

यशोधरा
Wed, 10/06/2010 - 12:15 नवीन
नुसते म्हणू नकोस, लिही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

लिहिते गं ! मुद्दाम इथे

मितान
Wed, 10/06/2010 - 12:51 नवीन
लिहिते गं ! मुद्दाम इथे लिहिलं. आता तुझ्यासारखी भुतं ( :P ) मानगुटीवर बसून लिहून घेतीलच ! नाहीतर मी माझ्या आळस नावाच्या लाडक्या मित्रासोबत निवांत बसले असते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वेगळाच आणि छान

धनंजय
Tue, 10/05/2010 - 22:54 नवीन
वेगळाच आणि छान
  • Log in or register to post comments

छान

प्रमोद्_पुणे
Wed, 10/06/2010 - 12:11 नवीन
नेहेमीप्रमाणेच छान..
  • Log in or register to post comments

खुपच मस्त

टुकुल
Wed, 10/06/2010 - 13:07 नवीन
खुपच मस्त. --टुकुल
  • Log in or register to post comments

मस्तच आहे लेख.

मेघना भुस्कुटे
Wed, 10/06/2010 - 15:59 नवीन
मस्तच आहे लेख.
  • Log in or register to post comments

नेहमीच्या प्रवासवर्णनांपेक्षा

भडकमकर मास्तर
Wed, 10/06/2010 - 16:48 नवीन
नेहमीच्या प्रवासवर्णनांपेक्षा काही वेगळं वाचायला मिळालं... मजा आली...
  • Log in or register to post comments

छान लेख ! बाकी शरद पवार

डॉ.प्रसाद दाढे
Wed, 10/06/2010 - 18:13 नवीन
छान लेख ! बाकी शरद पवार बेल्जियमचे कृषी मंत्री नसल्याने आत्महत्त्यावगैरे भानगडी नाहीत !
  • Log in or register to post comments

मस्त

प्रियाली
Wed, 10/06/2010 - 18:19 नवीन
मुद्दाम वेळ काढून वाचला. वर्णन अतिशय आवडलं.
  • Log in or register to post comments

लेख आवडला... बाकी शरद पवार

मदनबाण
Wed, 10/06/2010 - 20:02 नवीन
लेख आवडला... :) बाकी शरद पवार बेल्जियमचे कृषी मंत्री नसल्याने आत्महत्त्यावगैरे भानगडी नाहीत ! +५००० ;)
  • Log in or register to post comments

'निळाई....मिताई....'

इन्द्र्राज पवार
Wed, 10/06/2010 - 20:10 नवीन
दुसर्‍या कामात जास्त गुंतलो असल्याने मितानची माया पाहता आणि वाचता आली नाही...ती आत्ता अनुभवली. शब्दनशब्द असा समोर येतो की, जणू काय वाचक मितान आणि सगुणासोबत त्या बेल्जियन वाडीवरच आहे आणि ती वर्णन केलेली शेतीव्यवसायाची प्रक्रिया पाहात आहोत. "उत्पन्नाचे, जमिनीचे आंकडे श्रीमंती दाखवत असले तरी शेतकर्‍याचं जीवन किती कष्टाचं, जगात सगळीकडेच!...." ~~ हे निव्वळ शेतकर्‍याचंच नव्हे तर कारखानदारीत अत्यंत यशस्वी असलेल्या कित्येक उद्योजकांच्याबाबतीतदेखील लागू होतेच.....सगळीकडेच. फार सुंदर लेख उतरला आहे.....नेहमीच्या 'निळाई....मिताई....' स्टाईलमध्ये. इन्द्रा
  • Log in or register to post comments

मितान, फार छान लेख!

संजय अभ्यंकर
Wed, 10/06/2010 - 21:46 नवीन
उत्तम माहीती!
  • Log in or register to post comments

वसंत बापट

बोका
Wed, 10/06/2010 - 22:51 नवीन
वसंत बापटांची ही कविता आठवली अमेरीकन शेतकरी भाऊ     केवढं तुमी तालेवार उगवतीला मावळतीला,     पघावं ते हिरवंगार एवढा थोरला बारदाना,      चारच गडी त्याच्या पाठी औजारं बी नामी तुमची      पेरनी, कापनी, मळनीसाठी मिशीशीप्पी नदी म्हंजी      ईमानदार कामवाली पानी भरती, चक्की पिसती,      बिजलीबत्तीबी तिनंच केली म्या म्हनलं, "ह्यो राक्किस कोन?"... तर ती फवारनीची चक्की निस्तं योक बटन दाबा... फसाफसा उडवती फक्की गाया मस्त दूध देत्यात      बैलं कापून खाता म्हनं अगडबंब गोदामांतनं      खंडी खंडी भरता दानं गहू म्हनां भुईमूग म्हनां      समदं बख्खळ पिकत असंल बाजाराची कटकट न्हाई      सॅमकाकाच ईकत असंल सूटबूट ह्याट पाईप...      आयला कामं होत्यात कशी तुमची पोरं झ्याकूबाज...      शिरीमंतांची असत्यात तशी आमच्या गवनेराला नसतं      असं आंगन हिरवकंच असा बंगला अशी मोटर      अशी बायको गोरीटंच !
  • Log in or register to post comments

मस्तच झालय वर्णन, फोटोंमुळे

पुष्करिणी
Wed, 10/06/2010 - 22:59 नवीन
मस्तच झालय वर्णन, फोटोंमुळे मजा आली. इकडचे प्राणी फार बिचारे वाटतात अगदी.
  • Log in or register to post comments

मस्तच लेख. अत्यंत सुटसुटीत आणि माहितीपूर्ण.

चतुरंग
Wed, 10/06/2010 - 23:02 नवीन
दोन वर्षापूर्वी इथल्या एका फार्मला (ग्रेट ब्रुक फार्म) भेट दिली होती ते आठवले. तिथे गाभण गायींच्या विभागाला मॅटर्निटी वॉर्ड अशी पाटी होती! :) बाकी तिकडेही शेतकर्‍यांनी दूध वगैरे ओतून दिले हे वाचून सगळीकडे शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे मूलभूत स्वरुप सारखेच असते ह्यावर शिक्कामोर्तब झाले. शेतकर्‍याचे काम हे थेट आपल्या सर्वांच्या अन्नाशीच संबंधित असल्याने आणि त्याला पर्याय नसल्याने सरकारसकट आपण लोकांनी शेती आणि शेतकरी ह्याविषयाकडे गंभीरपणे बघणे जरुरीचे आहे असे पुन्हा एकदा प्रकर्षाने वाटले. आपल्या रोजच्या कामाच्या रगाड्यात आपल्याला शेतीची आठवण कितीशी येते? तेव्हा ह्या अशा सहली अधून मधून निघायला हव्यात, निदान आपण जे खातो ते कुठे उगवतं आणि कोण ते पेरतो हे तरी माहीत व्हावे! -रंगा
  • Log in or register to post comments

वा वा !

मिसळभोक्ता
गुरुवार, 10/07/2010 - 01:10 नवीन
बेल्जियन गाई खूष दिसताहेत. बहुधा, त्यांच्या दुधाचं चीज होतं, म्हणून असेल.
  • Log in or register to post comments

शेतीमालाला भाव

गुंडोपंत
गुरुवार, 10/07/2010 - 05:16 नवीन
शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी नाशिकचे एक प्राध्यापक मिलिंद मुरुगकर सातत्याने प्रयत्न करत असतात. पण सरकारला जाग आणणे अवघड असते!
  • Log in or register to post comments

सुंदर लेख!! छान अनुभव.

मराठमोळा
गुरुवार, 10/07/2010 - 10:40 नवीन
सुंदर लेख!! छान अनुभव. :)
  • Log in or register to post comments

वा! मस्त सफर.. फारच छान

रुपी
गुरुवार, 07/28/2016 - 05:13 नवीन
वा! मस्त सफर.. फारच छान लिहिलं आहे.. आणि लेख लिहून इतक्या वर्षांनंतरही सगळे फोटो दिसत आहेत म्हणून आनंद झाला :)
  • Log in or register to post comments

+१

मितभाषी
गुरुवार, 07/28/2016 - 07:40 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी

छान आणि रोचक माहिती । एकदा

अमितदादा
गुरुवार, 07/28/2016 - 13:04 नवीन
छान आणि रोचक माहिती । एकदा जाऊन स्वतः अनुभवायचं आहे । धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद ।
  • Log in or register to post comments

छान माहिती ...

वेदांत
गुरुवार, 07/28/2016 - 13:18 नवीन
छान माहिती ...
  • Log in or register to post comments

खूपच सुंदर सफर घडवलीत. खूपच

वेल्लाभट
गुरुवार, 07/28/2016 - 14:22 नवीन
खूपच सुंदर सफर घडवलीत. खूपच छान! जाम आवडलं. वाह. असं शेत आपलंही असावं वाटतं. सोबत येणारी मेहनत मंजूर आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख. आज वाचला. शेतावर

भाग्यश्री कुलकर्णी
गुरुवार, 07/28/2016 - 15:02 नवीन
सुंदर लेख. आज वाचला. शेतावर गेल्यागत वाटले.
  • Log in or register to post comments

धागा वर काढून वाचून आवर्जुन

मितान
Fri, 07/29/2016 - 17:46 नवीन
धागा वर काढून वाचून आवर्जुन प्रतिसाद देणार्यांचे आभार !!! :)
  • Log in or register to post comments

देशात कोणत्याही

संदीप डांगे
Fri, 07/29/2016 - 17:55 नवीन
देशात कोणत्याही तोट्यात कास्तकारी….. ☺
  • Log in or register to post comments

मस्त माहीती

कविता१९७८
Fri, 07/29/2016 - 19:19 नवीन
मस्त माहीती
  • Log in or register to post comments

वरच्या सर्वांशी बाडिस.

एस
Fri, 07/29/2016 - 19:57 नवीन
वरच्या सर्वांशी बाडिस.
  • Log in or register to post comments

सुरेख लेख

झेन
Fri, 07/29/2016 - 20:07 नवीन
लेखनाचा विषय आणि मांडणी सुरेख.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा