Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मितान on Tue, 10/05/2010 - 03:46
बर्‍याच दिवसांपासून एखाद्या बेल्जियन शेतावर जाण्याची ईच्छा होती. आमच्या एका डच मित्राच्या कानावर घालून ठेवले होते. एका दुपारी पॅट्रिकचा फोन आला की शनिवारी दुपारी ४ ते ५:३० अशी एका शेतकर्‍याची वेळ मिळाली आहे. मनात आले, शेतकर्‍याची अपॉइन्टमेन्ट म्हणजे फारच झालं! असेल बुवा इथला शेतकरी घड्याळावर चालणारा. गावाकडे शेतकर्‍याकडून तीनच वेळा ऐकलेल्या: सकाळ, दुपार, संध्याकाळ. तसा पॅट्रिकही आमचा नवा मित्र आहे. तो आम्हाला त्याच्या वाहनाने शेतावर घेऊन जाणार होता. या लोकांना भेट म्हणून काय घेऊन जावे असा प्रश्न पडला. वाईन मधले काही कळत नाही, शेतकर्‍याला फुलं काय भेट द्यायची, म्हणून उत्तम बेल्जियन चॉकलेट्सचे दोन पुडे आणि घरी केलेली नारळाची बर्फी घेतली. ठरल्या वेळी पॅट्रिक आला. त्याच्या घरून त्याच्या बायकोला, रोसिताला घेतलं आणि निघालो. पॅट्रिकने सांगितले की हा शेतकरी त्याचा मित्र वगैरे नाही. पण दरवर्षी उन्हाळ्यात ताजे अ‍ॅस्पेरगस घेण्यासाठी हे लोक त्यांच्या शेतावर जातात. लूक आणि इंगं हे ते जोडपं. त्यांना केवळ डच बोलता येतं. मला डच येतं पण शेतकरी डच बोली कळेल की नाही शंकाच होती. पॅट्रिकच्या अनुवादकौशल्यावर भिस्त होती. मनात सासर-माहेरची शेती दिसू लागली. आपले शेतमजूर शेतात काम करतानाची चित्रं येऊ लागली. दूध-दुभतं, धान्याची कोठारं, असं चित्र असणारं श्रीमंत शेतकरी आणि त्याचवेळी अत्यंतिक दारिद्र्याने पिचून गेलेले शेतकरी आटवू लागले. इकडच्या शेतकर्‍यांची स्थिती आपल्याएवढी वाईट नाही पण फार चांगलीही नाही. वर्षभर शेतमालाला चांगला भाव मिळावा म्हणून सरकारशी भांडणं चाललेली असतात असे पॅट्रिकच्या बोलण्यातून कळाले. त्याची एक झलक मागच्या वर्षी टीव्हीवर बघितली होती. दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून दूध उत्पादकांनी खूप प्रयत्न केले. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी एक मोर्चा काढला. मिडियाला बोलावले आणि आपल्या मागण्या नोंदवत सरकारचा निषेध करत लाखो लीटर दूध एका मैदानात ओतून दिले! इथे शनिवार बाजारात शेतकरी शहरवसियांपेक्षा वेगळे दिसत नाहीत. आम्ही खरेदी करतो त्या बहुतेक भाज्या व फळं हॉलंड व जर्मनीतून आलेली असतात. आजूबाजूच्या डच लोकांना विचारलं इथे काय पिकतं? बहुतेकांना फक्त मका आणि टोमॅटो एवढंच माहित असतं. पण बाजार तर विविधरंगी असतो. मग इथला शेतकरी पिकवतो तरी काय? खूप उत्सुकता होती. गाडी एका छोट्या रस्त्यावरून अजून एका छोट्या रस्त्याला लागली आणि एका मोठ्ठ्या गोडाऊनसारख्या दिसणार्‍या इमारतीपाशी उभी राहिली. खाली उतरल्याबरोबर शेणामातीच्या वासानं एकदम घरगुती वाटू लागलं. एक कुत्रा उड्या मारत आमच्याकडे आला. पाठोपाठ त्याचे मालक-मालकिण. लुक असेल पस्तिशीचा आणि इंगंही साधारण तेवढीच. कडेवर एक चार वर्षांची मुलगी रोमी. luk-inge हसतमुख आणि प्रसन्न दिसणार्‍या या कुटुंबाकडे बघून परकं वाटलं नाही. दोघांनीही पायात रबरी बूट घातलेले होते. विटक्या पँट आणि मळक्या स्वेटरवर गवताच्या काड्या चिटकलेल्या होत्या. दोघंही लाजरेबुजरेच दिसत होते. कोणीतरी परदेशी पाहुणे शेतावर येण्याची पहिलीच वेळ असल्याचे जाणवत होते. लुकने ओळख झाल्याच्या दुसर्‍या मिनिटाला गाईडच्या भूमिकेत प्रवेश केला. हवापाण्याच्या गप्पा नाहीत, की हापाप कपाचा आग्रह नाही, की डेर्‍यातले पाणी नाही! रोसिता आणि इंगं बर्‍याच दिवसांनी भेटल्याने गप्पा मारू लागल्या. 'रीतीप्रमाणे' लुक पुरुषांबरोबर पुढे गेला आणि मागे आम्ही तीन बायका रमतगमत चालू लागलो. समोर एक गोडाऊन सारखे बांधकाम दिसत होते. तो होता गोठा. गाय स्पेशल. त्याला लागून दोन छोट्या खोल्या. तिथे दूध काढण्याची जागा. मग एक मोठे पार्किंग. त्यात अवाढव्य आकाराचे दोन ट्रॅक्टर, खत फवारणी यंत्र, पेरणी यंत्र, गवत कापायचे यंत्र, नि काय अन् काय. त्याला लागून या कुटुंबाची रहाण्याची जागा. त्याच्या डावीकडे अजून दोन प्रचंड गोठे. एक वासरू स्पेशल आणि एक गाभण गाय स्पेशल. यात एका बाजूला घोडे. मागच्या बाजूला चौथा गोठा - बैल स्पेशल! एकूणच आम्ही शेतकरी + गवळी मित्राकडे आलो होतो तर! पहिल्या गोठ्यात गेलो. लुक माहिती सांगू लागला. त्याच्याकडे एकूण ८० गायी, १०० वासरं, आणि २० बैल आहेत. सर्वांच्या कानाला त्यांचा बिल्लानंबर टोचलेला. आपल्यासारखी हरणी, ढवळी, चांदी, बुधी, मंगळी, कपिला, लाल्या, पवळ्या असली नावांची भानगडच नाही. एका रांगेत नीट बांधलेल्या त्या ८० गायी - सगळ्या सारख्याच दिसत होत्या मला! पुढ्यात टाकलेले गवत चघळत निवांतपणे मनुष्यप्राण्याचे निरीक्षण चालू होते. हा गोठा हिवाळ्यात गरम करतात. गायींच्या डोक्यावर आढ्याला कसल्याच्या झाडाच्या फांद्या टांगल्या होत्या. सध्या कुठल्यातरी त्वचारोगाची साथ चालू आहे म्हणे. त्या पाल्याने ते इन्फेक्शन वाढत नाही. gotha gotha अजून एक माहिती मिळाली ती अशी - एक गाय दिवसाला ३० ते ४० लीटर दूध देते. ते एका कंटेनरमध्ये साठवतात. container दर तीन दिवसांनी ते विक्रीला पाठवतात. ३० युरो सेंट प्रतिलीटर असा सध्या भाव मिळतो. (आम्ही दूध घेताना ते ६८ ते ७० युरो सेंट प्रतिलीटर मिळते). या गायी वर्षाचे ५ महिने शेतात जाऊन चरतात. इतर महिने गोठ्यातच बांधलेल्या असतात. जनावरांसाठी लागणारा चारा शेतातच पिकवितात. साधारण २ फूट वाढणारं गवत असतं. ते कापून, बारीक करून, प्रेस करून त्याच्या पेंड्या करून ठेवतात. वर्षातून ४ वेळा ही गवतकापणी होते. वर्षातून एक पिक मक्याचं. मका तोडून उरलेली धांडं ट्रॅक्टरखाली दाबून, चुरून गवतात मिसळायचे. त्याचे पाऊस व बर्फात रक्षण करायचे. हे गुरांचं हिवाळ्याचं खाद्य. khau खूप साध्या लाजाळू लुकच्या मालकीची सव्वादोनशे एकर शेती आहे हे कळाल्यावर आ वासून बघतच राहिलो आम्ही. अगदी ५०-६० एकर शेती असणार्‍या शेतकर्‍यांचा ५-६ गडी, २०-२५ बाया, ४ बैलजोड्या, १०-१२ गायी यांच्या जोरावर चालणारी 'जमीनदारी' आपल्याकडे खूप अनुभवलेली आहे. इथे एवढं शेत आणि गुरं केवळ ही दोघं पती-पत्नी आणि लुकचे ७२ वर्षांचे वडिल सांभाळतात हे ऐकून थक्क झाले. रोसिता आणि इंगंच्या गप्पांमध्ये मीही हळूच सामील झाले. रोसिताला इंग्रजी येत नाही. मला इंगंच्या वेगळ्या उच्चारांमुळे एक एक शब्द हळू हळू समजवून घेत बोलावे लागत होते. मला तिने विचारले की, तुझ्याकडे आहेत का गायी? मी आपल्याकडच्या सिस्टीमची माहिती दिली. बैल शेतात काम करतात हे ऐकून ती म्हणाली, क? तुम्ही खात नाही? मग शाकाहारावर एक भाषण दिलं! बोलता बोलता वासरांच्या गोठ्यात आलो. २ दिवसांची २ वासरं होती. vasaroo एकूण एक महिना ते एक वर्ष वयाची ६० वसरं होती. पण कालवडी एकीकडे नि गोर्‍हे एकीकडे. इंगं म्हणाली - मला गोर्‍हे झालेले आवडत नाहीत. का ते ५ मिनिटांत कळणार होते. ६ गाभण गायी ज्या अठवडाभरात एक्स्पेक्टेड होत्या, त्या वेगळ्या बांधलेल्या होत्या. शेजारीच उत्तम जातीचे ४ घोडे तबेल्यात होते. शेतावर रपेट मारण्यासाठी हे घोडे. ghoda फॉन्सचा - लुकच्या वडिलांचा - या घोड्यांवर भारी जीव. स्वतः जातीने या घोड्यांची निगा राखतात. आम्ही ते बघत असताना ठेंगणीशी, गोड मार्गारेटआजी आली. मला डच येतं समजल्यावर तिचा बोलण्याचा धबधबा कोसळू लागला. त्यातले केवळ काही शब्दच मला कळत होते. पण एवढे कळाले की ती आपल्या नवर्‍याचे नि मुलाचे खूप कौतुक करत होती. margaret aji सूनबाई मात्र सासूबाईंसमोर गप्प झाली. होती. "जाण्यापूर्वी माझ्याघरी नक्की या हं" असे आजीने म्हटल्यावर प्रकाश पडला. इथेही मातीच्या चुली! आता आम्ही बैलांच्या गोठ्याकडे निघालो. तिथे जे दृष्य दिसले ते फारच अस्वस्थ करणारे होते. २०-२५ बैल लोखंडी जाडजूड कुंपणाच्या आत बांधलेले होते. अस्ताव्यस्त गवत पसरलेले. घोंगावणार्‍या माश्या आणि बैलांसाठी ठेवलेल्या कुठल्यातरी 'पौष्टिक' खाद्याचा नकोनकोसा वास. सव्वा ते दीड वर्षाचे गोर्‍हे इथे आणून बांधतात ते बाहेर काढतच नाहीत. त्याला वावरायला १० बाय १५ ची जागा असते. तेवढीच काय ती हालचाल. दोन वर्षांचा होईपर्यंत त्याला चरबी वाढवणारे खाद्य खाऊ घालतात. ८०० ते १००० किलोचा बैल कापण्यासाठी विकायला पाठवतात. हे बैल रग न जिरल्याने प्रचंड आक्रमक असतात. त्यामुळे गवत टाकण्यापासून गोठा साफ करण्यापर्यंतची सगळी कामं यंत्राने १० फूट अंतरावरून केली जातात. 'मला गोर्‍हे झालेले आवडत नाही' या वाक्याचा अर्थ आता लागला. bail वासरं जन्माला येण्यासाठीतरी बैल गायी एकत्र येत असतील असे वाटले. तोही भ्रम निघाला. सगळा इन्जेक्शनचा कारभार. इकडून बीज काढून तिकडे इन्जेक्ट करायचं. सगळच विचित्र! जन्मलेल्या प्रत्येक वासराची नोंद ब्रुसेल्सच्या कार्यालयात करावी लागते. मग त्या वासराचा पासपोर्ट तयार होतो. गुरांच्या खरेदी - विक्रीत हे पासपोर्ट अनिवार्य असतात. त्यात चुका झाल्यास शेतकर्‍याला दंड भरावा लागतो. गुरं बघून झाली आता शेत बघायला निघालो. समोर प्रचंड शेत पसरले होते. सगळीकडे गवत होते. shet shet मका वर्षातून एकदा तोही १०० एकरच(!) लावतात. अजून एक गव्हासारखे दिसणारे धान्य लावतात. तेही गुरांसाठी. या १०० एकरची नांगरणी व पेरणी अठवडाभरात होते. आधी शेणखत मशीनने फवारून घेतात. shenkhat मग नांगरणी आणि मग पेरणी. शेणखत अर्थातच विकत घ्यावे लागत नाही. १५०० अश्वशक्तीचे ट्रॅक्टर आणि ८ फाळे असलेला नांगर एवढे काम पटकन करून टाकतो. nangar मग कापणीच्या वेळी हर्वेस्टर मात्र लुक ४ दिवस भाड्याने आणतो. गवत कापण्याचे यंत्रपण बघितले. १० मीटर लांबीच्या या यंत्राने गवत कापले जाते आणि मागोमाग दुसर्‍या यंत्राने उचलले जाते व बारीक कापले जाते. मग त्याचे ठोकळे करून ठेवतात. युरिया पसरवण्याचे एक वेगळे यंत्र होते. हे यंत्र एकावेळी २०-२० मीटरपर्यंत युरिया फेकते. या यंत्रांचे बारकावे लुक सांगत होता. पॅट्रिक त्याचा अनुवाद करून नवर्‍याला सांगत होता. तेवढ्यात इंगं म्हणाली तिची थोरली मुलगी एका वाढदिवसाला गेली आहे, तिला घेऊन येते. ५ मिनिटांत तयार होऊन बाहेर पडलेली इंगं शेतकरीण वाटतच नव्हती. जीन्स, टी-शर्ट, नाजूक जॅकेट आणि पॉश कार! ती गेल्यावर सासूबाईंनी आमचा ताबा घेतला. आम्ही सासूच्या घरात गेलो. फॉन्सबाबा आले. पॅट्रिक आणि ज्ञानेश आले. गप्पा सुरू झाल्या. "बीयर घेणार का? कोला घेणार का?" दूध आत्ताच घेऊन झाले होते तरी म्हातारी ऐकेचना. वाईन, बीयर आणि कोला यापैकी काहीच आम्ही घेत नाही म्हटल्यावर आजीबाईंनी दुधात शिजविलेली तांदळाची खीर समोर आणली. अप्रतीम चवीची आटलेल्या दुधात शिजवलेली ती खीर मी कधीच विसरणार नाही! फॉन्स ५० वर्षांपूर्वी या वाडीवर रहायला आला. सुरुवातीला १०-१२ गायी होत्या. त्याने हे पशुधन वाढवले. दूध काढण्याची यंत्रे त्याने ३० वर्षांपूर्वी लावली. आजही तीच यंत्रं काम करताहेत. खूप अभिमानाने फॉन्सबाबा आपली कथा सांगत होते. fons आम्ही अधूनमधून त्यांच्या भाषेत आपल्याकडील शेतीची माहिती देत होतो. अडेल तिथे पॅट्रिक दुभाषा म्हणून होताच. खाणं संपवून निघालो. आजीबाईंनी हातात एकेक चॉकलेट ठेवले. बाहेर आलो तेव्हा लुक आणि इंगं आपल्या कामाला लागले होते. दूध काढण्याचे काम चालू होते. doodh यंत्रं असली तरी ८० गायींचे दूध काढायला दोघांना मिळून सकाळी अडीच तास आणि संध्याकाळी अडीच तास एवढा वेळ लागतो. बाकी चारापाणी, स्वच्छता यांना दिवस अपुरा पडतो. हं, एक राहिलंच. सरकारी फॉर्ममध्ये शेणखताची विल्हेवाट दाखवावी लागते. एकूण उत्पादन, वापर यात तफावत असेल, म्हणजे गरजेपेक्षा जास्त शेणखत निर्माण होत असेल तर शेणखत उचलून नेण्यासाठी सरकारला पैसे द्यावे लागतात. मग काही ठराविक काळाने सरकारी लोक पैसे नि खत घेऊन जातात! उत्पन्नाचे, जमिनीचे आंकडे श्रीमंती दाखवत असले तरी शेतकर्‍याचं जीवन किती कष्टाचं, जगात सगळीकडेच! निघतांना इंगंने सहज म्हणून ५-६ लीटर दूध एका डब्यात भरून दिलं. फॉन्सबाबाने एक लाकडी गॅरेज उघडून डिस्कब्रेक असलेला आपला ८ माणसांचा टांगा दाखवला. दुसर्‍या दिवशी त्याचे गुढग्याचे ऑपरेशन होणार होते. मी बरा झालो की या टांग्यातून तुम्हाला शेत फिरवून आणेन असे वचन त्याने दिले. किती साधी, लाघवी माणसं ही! पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन आम्ही त्या वाडीचा निरोप घेतला. ghar गेला अठवडाभर डोक्यातून ते शेत जात नाहीये. विस्मरणात गेलेला, प्रबोधिनीत शिकलेला एक श्लोक आता सगुणाला शिकवणार आहे - वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे | सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे | कृषिवल कृषि करण्या राबती दिवसरात्र | श्रमिक श्रम करोनि वस्तू या निर्मितात | स्मरण करुन त्यांचे अन्न सेवा खुशाल | उदरभरण आहे चित्त होण्या विशाल |
  • Log in or register to post comments
  • 33318 views
  • बोकरैकवाडी - मध्ययुगीन बेल्जियम

Book traversal links for बेल्जियन वाडीवर एक दुपार

  • बोकरैकवाडी - मध्ययुगीन बेल्जियम ›

प्रतिक्रिया

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 10/05/2010 - 04:33

Permalink

अतिशय महितीपुर्ण आणी चांगला

अतिशय महितीपुर्ण आणी चांगला लेख. ओघवती लेखन शैली.
  • Log in or register to post comments

Submitted by बेसनलाडू on Tue, 10/05/2010 - 05:36

In reply to अतिशय महितीपुर्ण आणी चांगला by इंटरनेटस्नेही

Permalink

असेच म्हणतो

(सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 10/05/2010 - 23:05

In reply to असेच म्हणतो by बेसनलाडू

Permalink

+१

आताच वाचला. उत्तम लेख !
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on गुरुवार, 07/28/2016 - 13:49

In reply to +१ by मुक्तसुनीत

Permalink

कित्त्ति मस्त लेख हा तायडे

कित्त्ति मस्त लेख हा तायडे तुझा :)
  • Log in or register to post comments

Submitted by बबलु on Tue, 10/05/2010 - 04:45

Permalink

वा !

वा ! मस्तच लेख. शेताचे आणि गोठ्याचे फोटो एकदम छान.
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Tue, 10/05/2010 - 04:52

Permalink

मितानकडून अजून एक सुंदर लेख!

मितानकडून अजून एक सुंदर लेख!
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 10/06/2010 - 20:05

In reply to मितानकडून अजून एक सुंदर लेख! by अनामिक

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Tue, 10/05/2010 - 04:59

Permalink

दुध साठवायचे कंटेनर अल्फा

दुध साठवायचे कंटेनर अल्फा लवाल चे आहे, म्हणजे आमच्या देशाचे हे सांगायचे की त्यांना! बाकी वेगळीच सफर घडवलीत. हे अ‍ॅग्रो टुरीझम होते काय? म्हणजे तिकीट वैगेरे?
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 10/05/2010 - 12:01

In reply to दुध साठवायचे कंटेनर अल्फा by पाषाणभेद

Permalink

>>दुध साठवायचे कंटेनर अल्फा

>>दुध साठवायचे कंटेनर अल्फा लवाल चे आहे, म्हणजे आमच्या देशाचे हे सांगायचे की त्यांना! आँ. :O
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Tue, 10/05/2010 - 12:20

In reply to >>दुध साठवायचे कंटेनर अल्फा by नितिन थत्ते

Permalink

+ १ आँ.

अल्फा लवाल स्वीडीश कंपनी आहे असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अस्मी on Tue, 10/05/2010 - 12:34

In reply to दुध साठवायचे कंटेनर अल्फा by पाषाणभेद

Permalink

पण अल्फा लवाल ही स्वीडीश

पण अल्फा लवाल ही स्वीडीश कंपनी आहे.. - अस्मिता
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Tue, 10/05/2010 - 13:13

In reply to दुध साठवायचे कंटेनर अल्फा by पाषाणभेद

Permalink

पाभेभाऊ, हे कृषी पर्यटन

पाभेभाऊ, हे कृषी पर्यटन नव्हते. घरगुती भेट होती. ते कंटेनर स्विडीश कंपनीचे आहे हे नवर्‍याला माहीत होते.
  • Log in or register to post comments

Submitted by Pain on Tue, 10/05/2010 - 05:19

Permalink

लेख आवडला, ती माणसे त्याहून

लेख आवडला, ती माणसे त्याहून आवडली :) त्यांची कडेवरची मुलगी किती गोड आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 10/05/2010 - 05:37

Permalink

छान

वाडीची सफर आवडली. शेतीला पाणी देण्यासाठी स्प्रिंक्लर्स बसवलेले होते काय?
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Tue, 10/05/2010 - 13:14

In reply to छान by सुनील

Permalink

सुनील, इथे बेल्जियम

सुनील, इथे बेल्जियम मध्ये वर्षभर पाऊस पडत असतो. ऋतू कोणताही असो. सरासरी आठवड्यातून एकदा तरी पाऊस पडतोच. त्यामुळे त्यांना स्प्रिंकलर्स ची गरज नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Tue, 10/05/2010 - 05:40

Permalink

मस्त लेख.

मस्त लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 10/05/2010 - 05:42

Permalink

>> अस्ताव्यस्त गवत पसरलेले.

>> अस्ताव्यस्त गवत पसरलेले. घोंगावणार्‍या माश्या आणि बैलांसाठी ठेवलेल्या कुठल्यातरी 'पौष्टिक' खाद्याचा नकोनकोसा वास. सव्वा ते दीड वर्षाचे गोर्‍हे इथे आणून बांधतात ते बाहेर काढतच नाहीत. त्याला वावरायला १० बाय १५ ची जागा असते. तेवढीच काय ती हालचाल. दोन वर्षांचा होईपर्यंत त्याला चरबी वाढवणारे खाद्य खाऊ घालतात. ८०० ते १००० किलोचा बैल कापण्यासाठी विकायला पाठवतात. हे बैल रग न जिरल्याने प्रचंड आक्रमक असतात. >> ह्म्म ते वील मीट तू पाहीलस ते - http://en.wikipedia.org/wiki/Veal लेख आवडला
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 10/05/2010 - 05:43

Permalink

नेहमीप्रमाणे छान लेख

आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 10/05/2010 - 05:49

Permalink

मितानचा अजून एक हिरवागार

मितानचा अजून एक हिरवागार लेख! छान सफर घडवलीस. बैलांची माहिती वाचून वाईट वाटले आणि मी मांसाहारी नसल्याचा आनंद झाला. इथेही एकेठिकाणी गोठा बघायला गेलो असताना तान्ह्या गोर्‍ह्यांना वेगळे ठेवलेले पाहून कसेसेच झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Tue, 10/05/2010 - 05:53

Permalink

छान

लेख आवडला. छायाचित्रं आणि वर्णनातले बारकावेही मस्तच.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Tue, 10/05/2010 - 07:25

In reply to छान by नंदन

Permalink

नंदोबाशी सहमत आहे..

नंदोबाशी सहमत आहे.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Tue, 10/05/2010 - 07:58

In reply to नंदोबाशी सहमत आहे.. by प्रभो

Permalink

वरच्या दोघांशीही सहमत

वरच्या दोघांशीही सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 10/05/2010 - 10:27

In reply to वरच्या दोघांशीही सहमत by निखिल देशपांडे

Permalink

वरच्या तिघांशीही

वरच्या तिघांशीही सहमत. अवांतरः पाषाणभेद, अल्फा लावल ही मूळची स्विडीश कंपनी आहे, पुण्यात त्यांचं फक्त एक ऑफिस, फॅक्टरी आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Tue, 10/05/2010 - 18:34

In reply to वरच्या तिघांशीही by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

वरच्या चौघांशी सहमत आहे.

वरच्या चौघांशी सहमत आहे. सुंदर लेख. :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Tue, 10/05/2010 - 07:00

Permalink

लेख आवडला.

लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Tue, 10/05/2010 - 08:36

Permalink

छान ओळख

लेख आवडला. परदेशातील शेतीविषयी उत्सुकता होतीच.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 10/05/2010 - 10:05

Permalink

लेख फोटो अन वर्णन अतिशय

लेख फोटो अन वर्णन अतिशय आवडल. हल्लि माझा भाउ पण कापणी यंत्रान उस कापतात पण फार मात्र होत म्हणुन सांगत होता. सुन्दर मितान.
  • Log in or register to post comments

Submitted by पारुबाई on Tue, 10/05/2010 - 10:14

Permalink

अप्रतिम लेख तुमचा लेख म्हणजे

अप्रतिम लेख तुमचा लेख म्हणजे काही तरी छान वाचायला मिळणार याची खात्रीच असते.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 10/05/2010 - 10:24

Permalink

वा ! एकदम मस्त. काही वेगळेच

वा ! एकदम मस्त. काही वेगळेच वाचायला मिळाले. झकास
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 10/05/2010 - 11:29

Permalink

लै भारी..!

लै भारी..! :) तात्या. -- मिथुनदा अंमळ चिंताग्रस्त वाटताहेत, पण मुनमुन मात्र सुखाने विसावली आहे त्यांच्यावर! :)
  • Log in or register to post comments

Submitted by गुंडोपंत on Tue, 10/05/2010 - 12:18

Permalink

मस्त

मस्त लेखन फार आवडला. तुमच्या लेखनाला ओघवती शली आहे. त्यात भरपूर चित्रे असल्याने बहार आली वाचायला. अगदी तुमच्या बरोबर फिरल्यासारखे वाटले. मनमुराद आणि उत्साही आहात... त्यांचे ऑपरेशन कसे झाले? बरे आहेत का ते आता? त्या बैलांची अवस्था पाहून कसेसेच झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on Tue, 10/05/2010 - 12:05

Permalink

फारच छान

फारच छान लेख. आपल्या कडल्या शेत - वाड्यांपेक्षा नेटक्या व टापटीप असल्याचे जाणवले फोटोतून. आपला
  • Log in or register to post comments

Submitted by कुसुमिता१२३ on Tue, 10/05/2010 - 12:07

Permalink

सुंदर लेख!

खुप छान आणि माहीतीपूर्ण लेख! आवडला!
  • Log in or register to post comments

Submitted by अस्मी on Tue, 10/05/2010 - 12:09

Permalink

सुंदर!!!

मस्त, माहितीपूर्ण लेखन :)
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Tue, 10/05/2010 - 12:30

Permalink

छान लेख गं. चला यातून एक

छान लेख गं. चला यातून एक माहीती नवीन कळाली ती अशी की शेतकरी सगळीकडेच शेतीमालाला भाव मिळावा म्हणून झगडत असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Tue, 10/05/2010 - 12:30

Permalink

मस्त!

मस्त! :)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 10/05/2010 - 13:10

Permalink

बेष्टंच ब्वॉ!!! मितान यांनी

बेष्टंच ब्वॉ!!! मितान यांनी जगाची सफर करावी आणि असंच प्रत्येक ठिकाणाबद्दल लिहावं अशी मी सूचना करतो. त्यांनी ते लिहिल्यावर त्यांच्या अभिनंदनाचा फ्लेक्स मी स्वखर्चाने लावीन असे आश्वासनही देतो. :D
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Tue, 10/05/2010 - 13:20

In reply to बेष्टंच ब्वॉ!!! मितान यांनी by बिपिन कार्यकर्ते

Permalink

+१

सहमत!
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 10/05/2010 - 14:23

In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या

Permalink

असेच म्हणतो.

असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Wed, 10/06/2010 - 20:24

In reply to बेष्टंच ब्वॉ!!! मितान यांनी by बिपिन कार्यकर्ते

Permalink

पण...

बि का काका ... सहलीचा खर्च आणि पुस्तक प्रकाशन यासाठी पण प्रायोजक होताय का??
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 10/05/2010 - 13:32

Permalink

छान

छान लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Tue, 10/05/2010 - 13:33

Permalink

मस्त

मस्त लेख! वेगळी सफर घडवून आणलीत!
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Tue, 10/05/2010 - 13:36

Permalink

सुन्दर

मस्त. खूप छान
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्य on Tue, 10/05/2010 - 13:37

Permalink

मस्त माहितीपुर्ण लेख. तुम्ही

मस्त माहितीपुर्ण लेख. तुम्ही किती देश फिरला आहात ? :) - सूर्य.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Tue, 10/05/2010 - 13:37

Permalink

मितान, लेख आवडला.

मितान, लेख आवडला. :)
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 10/05/2010 - 13:42

Permalink

मस्त लिहिलयस ग मितान.

मस्त लिहिलयस ग मितान. :)
  • Log in or register to post comments

Submitted by भाऊ पाटील on Tue, 10/05/2010 - 13:58

Permalink

छान लेख

मितान, लेख आवडला. येउ द्यात अजून
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Tue, 10/05/2010 - 14:41

Permalink

अतिशय सुंदर वर्णन .. वाडी -

अतिशय सुंदर वर्णन .. वाडी - लोक - प्राणी सगळेच छान एकदम ... मितान जगातल्या कोण्याकोण्यात तू फिरुन यावे आणि सर्व लिहावे असे वाटते. --
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Tue, 10/05/2010 - 18:40

Permalink

मस्त !

मस्त !
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Tue, 10/05/2010 - 18:43

Permalink

झकास भेटवर्णन

झकास भेटवर्णन .. एन.डी.टी.व्ही गुड टाईम्सची नेहा दिक्षीत आठवली.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com