गेल्या महिन्यातल्या एका सुरम्य पहाटे (असे आपले म्हणायचे असते बरं का!) मी छान झोपलो होतो अन सगळे जग गदागदा हलत असावे तशी जाणीव झाली. आयला! काय भुकंप झालाय का? असा विचार अर्धवट झोपेत करेतो मोठमोठे आवाज कानात घुमायला सुरुवात झाली. काही सेकंदातच आवाजाची ओळख पटली अन तिकडे दुर्लक्ष करणे किती महागात पडु शकेल हे ही कळले. आवाज होता बायकोचा. अरे उठ! असा गजर करत ती मला गदागदा हलवत होती. डोळे उघडुन भिंतीवरच्या घड्याळात पाहिले तर फक्त साडेसहा वाजले होते. "काय आहे! जरा झोपु दे की," मी कुरकुरलो अन धडाम-धुडुम तोफखाना सुरु झाला.
"इकडे मुलाच्या शाळेत स्वाईन फ्ल्यु आलाय अन म्हणे झोपु दे. रात्री पण उशीरा आला घरी. बसला असेल कुठेतरी मित्रांबरोबर चकाट्या पिटत. पेपरात एवढी मोठी बातमी आलिये तरी रात्री बोलला का काही. तरी बरे पत्रकार आहे. पण मुलाची काही काळजी असेल तर ना?" एकदम खडबडुन जागा झालो. पहिले काम केले बायकोला सांगितले, "आज नको पाठवु त्याला शाळेत. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. मग बघु काय करायचे ते." अन मग बायको कामाला लागली. तिने मुलाच्या शाळेतल्या सगळ्या मित्र मैत्रिणींच्या आयाना लगेच फोन केले अन शाळेत स्वाईन फ्ल्यु आल्याने चिरंजिवांना शाळेत पाठवणार नसल्याचे जाहिर केले. मग सगळ्याच पालकांची धांदल उडाली. पत्रकाराची बायको मुलाला शाळेत पाठवणार नाही म्हणल्यावर आजुबाजुच्या तीस चाळीस मुलांच्या पालकांनी पण मुलांना घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला. परिणामी आठ वाजता स्कूलबस आली तेव्हा त्यात पन्नास ऐवजी फक्त तीन्च मुले शाळेत गेली. त्यातल्या काही पालकांना बस निघुन गेल्यावर हा अपडेट मिळाला मग त्यांनी आपापल्या गाड्यांवरुन बसचा पाठलाग केला अन मुलांना परत घरी आणले. काही हवालदिल पालक शाळेत गेले तर तिथे सांगितले स्वाईन फ्ल्युची एक केस हायस्कुल मधे झाल्याने केजी पासुन सर्व वर्ग आठवड्याकरता बंद करण्यात आले आहेत. मग हवालदिल पालकांच्या नव्या नव्या काळज्या सुरु झाल्या - आता अभ्यास बुडेल ना? तो कसा भरुन काढायचा? मुलांना शाळेत पाठवायचे नाही ते ठीक पण एकमेकांशी खेळु द्यायचे का? एक ना दोन. पालक या विषयांवर डोकेफोड करत असताना त्यांचा चिंताविषय असलेली मुले मात्र मस्त खेळत, बागडत, आळीभर हुंदडत होती.
मग सुरु झाले घरीच अभ्यास घेण्याचे प्रयत्न. गल्लीत केजीतली किमान दहा तरी मुले-मुली. सगळे कायम एकत्र खेळणारे. पण आता ती जिथे जातील तिथे कुणी ना कुणी त्यांचा अभ्यास करुन घेऊ लागले. कोण ए,बी,सी घोका म्हणुन मागे लागतेय तर कोण वन, टु, थ्री च्या. कोण पोएम घोकुन घ्यायला दम भरतेय तर कोण डोमेस्टीक अॅनिमल सांगा म्हणुन दरडावतेय. पोरं एकदम हवालदिल, बिचार्यांना काय करावे कळेना. आमचा गोटी मात्र छान एंजॉय करत होता - बापाची फुस होती ना. नाही म्हणायला आईने घराबाहेर खेळायला बंदी घातली होती पण तिची नजर चुकवुन बाहेर पळायचाच. शिवाय तो घरी असल्याने बायकोचा फतवा होता मला लवकर घरी यायचा. त्यामुळे रात्री लवकर आल्यावर बाबा पण त्याच्याशी मस्ती करायचाच.
असा एक आठवडा झाला अन माझी साप्ताहिक सुटी आली. त्यादिवशी विचार केला, आठवडाभर घरात बसुन गोटी कंटाळला आहे अन त्याच्यावर रखवाली करुन बायको. अनायासे, सुट्टी आहे, पाऊसही कमी झालाय तर कुठेतरी फिरवुन आणु. अन सरळ मोटारसायकल ताबडली, बायकोला अन गोटीला घेऊन ते सरळ गाठले पानशेत. दिवसभर ऐश केली. पानशेतला जेवण, वरसगावला बोटींग, रस्त्यात कुठे थांबुन नदीचे पाणी बघ, कुठे थांबुन भातशेतीचा दरवळणारा वास छातीत भरुन घे, कुठे कुरणच्या घाटात थांबुन वेगवेगळ्या पक्षांचे आवाज ऐक अन उडणार्या फुलपाखरांच्या मागे धाव, कुठे पाने फुले गोळा कर अशी. संध्याकाळी दिवेलागणीला घरी परतलो तर गोटीची वाट बघत शेजारची मुले अंगणात खेळत होती. गोटी गाडीवरुन उतरला अन तिकडे धाव घेतली.
अन त्यानंतर थोड्याच वेळात बायकोच्या लक्षात आले की गोटी नाक ओढतो आहे अन थोडाथोडा खोकतो आहे. जवळ घेतले तर अंग कोमट होते. सगळ्या मुलांना मग घरी पिटाळले अन गोटीला घरात घेतले. दहा मिनिटातच त्याचे अंग बर्यापैकी गरम झाले अन तो टीव्ही बघता बघता आडवा झाला. कसे तरी क्रोसिन काढुन त्याला एक डोस दिला तोवर तो झोपीही गेला. तेव्हा जेमतेम साडेसात वाजले होते. रोज दहा वाजता मह्त्प्रयत्नांनी झोपणारा गोटी साडेसातलाच झोपला हे आम्हाला काळजीत टाकायला पुरेसे होते.
लगेच फॅमिली डॉक्टरना फोन केला अन सगळे सांगितले. ते म्हणाले क्रोसिन दिले आहे म्हणजे आता ताप उतरावा. पण दवाखान्यात ये, अजुन काही औषधे देतो. रात्री उठलाच तर गोटीला दे. नाहीतर उद्या सकाळी माझ्याकडे घेऊन ये. तसाच दवाखान्यात गेलो अन अजुन औषधे घेऊन आलो तर गोटीचा ताप कमी व्हायच्या ऐवजी शंभरच्या पुढे गेला होता. रात्री दोनच्या सुमाराला गोटी जागा झाला. अंगात अजुन ताप होताच, मग औषधे दिली, दुध पाजले अन झोपवला तसाच. तर सकाळी चार वाजताच परत उठला अन खिडकीवर चढुन बसला. बर्याच वेळाने उतरला, परत दुध-औषधे घेतली अन झोपला. सकाळी दहा वाजता परत डॉक्टरांकडे त्याला घेऊन गेलो तर तोवर ताप उतरला होता पण डॉक्टरांनी अॅन्टीबायोटीक्स पण सुरु केली.
त्या दिवशीच संध्याकाळी परत ताप चढायला लागला अन रात्री आठ वाजेपर्यंत परत शंभरवर गेला. दहा वाजता १०१ ताप होता अन अकरा वाजता थर्मामिटर १०१.७ दाखवत होता. गोटी तापाने फणफणुन पडलाय म्हणुन बायको, मी हवालदिल. कुठेतरी डुक्करतापाची भितीपण होतीच. शेवटी सगळी रात्र त्याच्या कपाळावर कोलनवॉटरच्या पट्ट्या ठेवत अन त्याला कोल्ड बाथ देत काढली. तरी ताप काही कमी होईना. मग पहाटे निर्णय घेतला सकाळीच त्याला त्याच्या जन्मापासुन तपासणार्या बालरोगतज्ञांकडे न्यायचे.
सकाळी दहा वाजताच बालरोगतज्ञांच्या दवाखान्यात गेलो तर तिथे आधीच चाळीस पन्नास मुलांना घेऊन पालक आलेले, सगळ्यांची लक्षणे अन अवस्था सारखीच. पण गोटी मात्र सावरला होता अन दवाखान्यातल्या खेळण्यांशी खेळत होता. अंगात ताप होताच. होता होता साडेअकराच्या सुमाराला आमचा नंबर आलो आणि आम्ही डॉक्टरांसमोर गेलो त्यांनी गोटीला तपासले अन एक्स्-रे काढुन यायला सांगीतले. चिंतेचे कारण नाही ना या प्रश्नाला उत्तर, "तसे काही नाही. साथ सुरुच आहे तापाची पण एक्स्-रे काढुन या मग बघु" असे मोघम. अर्ध्या तासात एक्स्-रे घेऊन आमची वरात परत डॉक्टरांपुढे.
डॉक्टरांनी एक्स्-रे पाहिला अन त्यांचा चेहरा थोडा गंभीर झाल्याचे आम्हाला वाटले. "त्याला स्वाईन फ्ल्यु तर नाही ना? त्याच्या शाळेत आधिच एक केस झालीय," माझा धास्तावलेला प्रश्न. डॉक्टरांनी मग एक्स रे आम्हाला दाखवला, "हे बघा ही इथे लंग्ज आहेत. ही ब्रॉन्की. हे पांढरे दिसतेय ना ते इफ्नेक्शन आहे. संपुर्ण ब्रॉन्की भरलीये अन दोन्ही लंग्जवर पण थोडेसे पसरलेय. ही ब्रॉन्कोन्युमोनियाची सुरुवात आहे. मला वाटते तुम्ही त्याला इथे आज अॅडमिट करावे," डॉक्टर. पण मी एव्हढा धास्तावलो होतो की काही कळतच नव्हते. तरी बरे क्राईम रिपोर्टिंगच्या निमित्ताने बर्याच डॉक्टरांशी संबंध आलाय अन मेडीकल सायन्स, फोरेन्सिक, फार्माकॉलॉजी यातले दोन शब्द कानावरुन गेलेत.
लगेच अॅडमिट करुन टाकले. एकतर स्वाईन फ्ल्यु ची भीती अन अॅडमिट केल्यावर गोटीची प्रतिक्रिया काय असेल म्हणुन चिंता. त्यामुळे दिवसाला तीन हजार रुपये भाडे देवुन शेवटी प्रायव्हेट रुम घेतली. पण रुम मधे शिरलो अन पैसा वसुल अशी मनस्थिती झाली. तो हॉस्पिटलचा वॉर्ड कमी अन फाईव्ह स्टार हॉटेलची रुम जास्त होती. सगळे इंटीरियर चकाचक, पलंगांवरच्या गाद्या एकदम गुबगुबीत, शिवाय बसायला सेटी, खुर्च्या, एक टेबल, फोन, फुल्ल साईझ फ्लॅट स्क्रीन टीव्ही अन व्हीसीडी प्लेअर, मस्त एसी, सामान ठेवायला चार पाच कपाटे सगळे झायलिंग. तोवर बातमी कळली होती म्हणुन गोटीचे आजोबा आले अन अवाक होऊन बघतच राहिले सगळा थाटमाट. तोवर गोटी बेड इन्क्लाईन्-डिक्लाईन करायला शिकला होता अन त्याच्याशी खेळत होता. तेव्हढ्यात नर्स आली अन तिनं टीव्ही वर कार्टुनचे चॅनेल पण लावले.... गोटी खुष!
मग सुरु झाली दवाखाना, घर अन ऑफिस सांभाळण्याची कसरत. स्वाईन फ्ल्यु मुळे बातम्यांचा ताण, अन त्यात दोन बातमीदार आजारपणाच्या रजेवर. नशिब दवाखाना ऑफिसपासुन जवळच होता. मग दोन बातम्या लिहिण्यामधे एक छोटा ब्रेक घेऊन दवाखान्यात चक्कर मारायची. बायकोचा तर मुक्कामच दवाखान्यात. शिवाय कुणी ना कुणी नातेवाईक कायम दवाखान्यात बसलेले असायचे.
गोटीला अॅडमिट केले त्याच दिवशी रिदा शेख चा मृत्यु झाला. तिलाही सुरुवातीला न्युमोनियाचीच ट्रीटमेंट दिली होती त्यामुळे सगळ्या मित्रांना गोटीबाबत प्रचंड काळजी. मग सुरु झाले फोन सल्ला द्यायला. लोक फोन करायचे धीर द्यायला पण बोलायचे ते धीर खचवणारेच. सगळ्यांचा सल्ला एकच, "ताबडतोब मुलाला नायडुला ने." अरे पण का? या डॉक्टरना मी ओळखतो, खूप चांगले डॉक्टर आहेत, गोटीच्या जन्मापासुन त्याला ते बघताहेत, त्यांना गरज वाटली तर सांगतील ना टेस्ट करायला. नायडुमधे खरेच यापेक्षा चांगले उपचार मिळु शकतील? तिथले डॉक्टर एव्हढी आस्था दाखवतील? ते एव्हढे क्वालिफाईड असतील? असतील तर मग त्यांनी असेच हॉस्पीटल उघडुन खोर्याने पैसा का नाही ओढला? अन तिथे गेल्यावर नसलेला विषाणुसंपर्क होणार नाही याची काय खात्री? शिवाय स्वाईन फ्लु खरेच एव्हढा जीवघेणा आहे? मग अमेरिकेत, इंग्लंडमधे त्याबाबत लोकांना आता निर्धास्त का रहायला सांगताहेत? अन त्यावर म्हणे एकमेव औषध म्हणजे टॅमी-फ्ल्यु. हे म्हणजे वंडर ड्रग झाले..... आला एव्हीयन फ्लु की घे गोळी, आला सार्स की घे गोळी, आला स्वाईन फ्ल्यु की घे गोळी. स्वाईन फ्ल्यु जर माणसात आत्ताच आला असेल तर त्यावरचे औषध आधीपासुन बाजारात कसे? अन मग ह्या मॅजिकल रेमेडीचा उल्लेखही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर का नाही? त्याच्यावर अनेक देशात बंदी का आहे? की अनेकजण म्हणतात तसे भारत ही टेस्टींग लँब अन भारतीय गिनिपिग आहेत या फार्माकंपन्यांना... एक ना दोन अनेक प्रश्न.
पण हे ऐकुन कोण घेणार? गोटीच्या शाळेत आधीच एक केस झाल्याने आम्ही ही घाबरलेलो. मग विचार केला नायडुमधेच विचारावे म्हणुन तिथे फोनवर चौकशी केली तर त्यांनी सांगितले जर तुमचा मुलगा परदेशात जाऊन आलेला असेल किंवा त्याचा संपर्क स्वाईन फ्ल्युच्या पेशंटशी आला असेल तर लगेच स्वॅब घेतो नाही तर वाट बघा. पण पेपरमधे तर आवाहन आलेय मनपा अन सरकारचे की लगेच सरकारी दवाखान्यात जाऊन टेस्ट करुन घ्या म्हणुन. आता काय करायचे?
त्यात सगळ्या मित्रांचे, नातेवाईकांचे फोनवर फोन. सगळे घाबरलेले. काही पत्रकार मित्र तर परस्पर गोटीला नायडुत न्यायच्या तयारीत. अहो पण मी बाप आहे त्याचा.... मला नाही तशी गरज वाटत, उतरलाय आता त्याचा ताप. पण ते ऐकायला तयार नाहीत. रिदाचे काय झाले माहिती आहे ना? त्या दिवशी म्युनिसिपल कमीशनर काय म्हणाले, आमच्याकडे आणले असते तर ती मेली नसती ऐकले ना? मग चल त्याला घेऊन नायडुला. आपल्याला कळते म्हणुन इगो इश्शु करु नकोस. शेवटी मुलाच्या जिवाचा प्रश्न आहे.... एका मित्राने तर सरळ हेत्वारोपच केला. असा संताप झाला म्हणुन सांगु, "अरे मी त्याचा बाप आहे. तु नाही," असे ठणकावावे असे वाटले.
या सगळ्यात आशादायक वाटत होता तो गोटीवर उपचार करणार्या डॉक्टरांचा आत्मविश्वास. बाकी सगळे डॉक्टर पेशंटना सरस़कट नायडुला पाठवत होते पण त्या आमची समजुत काढत होत्या. "अहो तुम्ही काळजी करु नका. त्याला स्वाईन फ्ल्यु नक्कीच झालेला नाही. निदान चुकणे शक्यच नाही. त्याची प्रकृती आम्हाला माहिती आहे आणि आमचा अनुभव, टेस्ट पण तेच दाखवत आहेत. आम्ही तुमची मनस्थिती समजतो पण मुलाच्या मनस्थितीचा पण आपण विचार करु. तो छान रिकव्हर होतोय आणि आत्त्ता त्याच्यावर कोणतीही नवी टेस्ट आवश्यकता नसताना घेणे योग्य नाही. तुम्ही काळजी अजिबात करु नका," डॉक्टर सांगत होत्या. त्यांचे सगळे सहकारीपण तसेच म्हणत होते. आणि एक दिवस त्यांनी कमालच केली. गोटी जेवत नाहीये म्हणुन आम्ही सांगितले तर त्यांनी गोटीलाच विचारले तुला काय आवडते म्हणुन. "सॅन्डविच, ज्युस अन कॅडबरी," तो उत्तरला. तासाभरात डॉक्टरांकडुन चार चीज ग्रील्ड सॅन्डवीच, एक टंपासभर ज्युस आणि एक भला मोठ्ठा कॅडबरीबार आला. अन गोटीने ते सगळे मिटक्या मारत संपवले. परत दुसर्या दिवशीच्या नाश्त्यात डॉक्टरांनी सांगितले म्हणुन त्याने आक्खा वाडगाभर मॅगी खाल्लं, नंतर ग्लास भर दुध पिले, अर्ध्या तासाने परत ज्युस घेतला. अन शिवाय पोटभर जेवलाही.
असे तीन दिवस चालले. गोटीचा ताप आता पुर्णपणे उतरला होता. तो हॉस्पीटलभर खेळत होता. डॉक्टर-सिस्टरबरोबर राऊंडला जात होता. कॅफेटेरियातुन मिळणारे चमचमीत पदार्थ सगळ्या स्टाफ च्या कृपेने दिवसभर खात होता. अन मी मात्र त्याला स्वाईन फ्ल्यु आहे काय या चिंतेत होतो. तेव्हढ्यात एक डॉक्टर मित्र भेटला अन त्याने तर नवीनच बॉम्ब टाकला. तो म्हणाला, "जरी त्याला स्वाईन फ्ल्यु झाला असला तरी आता टेस्ट करुन काय फायदा? त्याला बरे वाटतेय ना? मग झाले. तु कश्याला त्या एच्१एन१ ची काळजी करतोस?" मग नवीनच भुंगा डोक्यात शिरला, "जर विषाणु अंगातच राहिला तर?"
तीन दिवसांनी गोटीला दवाखान्यातुन डिस्चार्ज मिळाला. त्याचे बिल भरत होतो तर दुसर्या एका मुलाला त्याचे आईवडील अॅडमिट करत होते. जुलाब होत होते म्हणे त्याला. त्याच्या वडिलांनी रुमचार्जेस विचारल्यावर आधी सेमी प्रायव्हेट वॉर्ड मधे ठेवा असे सांगितले पण आई एकदम उसळली, "स्वाईन फ्ल्यु आलाय शहरात माहिती आहे ना?" या वाक्याचा परिणाम झाला अन तो मुलगा लगेच प्रायव्हेट रुम मधे अॅडमिट झाला.
डिस्चार्ज मिळुन आता आठवडा होऊन गेलाय. गोटी आता घरी परत आलाय अन मजेत आहे. पण त्याची शाळा अजुन सुरु झालेली नाहीये अन अजुन त्याला थोडा खोकला असल्याने बाहेर जाऊन खेळता येत नाही. त्याचे मित्र मैत्रिणी पण घरी त्याच्याशी खेळायला येत नाहीत. रोज परगावच्या नातेवाईकांचे फोन येतात. ते बातम्या वाचुन्-पाहुन चिंतेत असतात. ते आग्रह धरतात की आम्ही पुण्याबाहेर त्यांच्याकडे रहायला जावे. इथे परिस्थिती काय आहे ते विचारतात.
मी त्यांना सांगतो, "शैक्षणिक संस्था, मॉल, मल्टीप्लेक्स बंद केल्याने इथे अॅ़क्टीव्हिटी बर्याच कमी आहेत. शिक्षण्-नोकरीकरता इथे आलेले बरेच लोक पुण्याबाहेर गेलेत अन पुणे परत पेन्शनरांचे शहर झालेय. बस स्टॅन्ड, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशनवर कुणीच तपासत नसल्याने काही लोक अंगात विषाणु घेऊन मुळगावी गेलेत अन तिथे साथीचा इमाने इतबारे प्रसार करताहेत. पण पुण्याला साथीचे बरेच फायदे झालेत. लोक शक्यतो फिरत नसल्याने सगळे रस्ते मोकळे आहेत आणि ट्रॅफिक जॅम होत्त नाहीत. लोक एकदम गुणी बाळासारखे वागतात. हॉटेलींग वगैरे लोकांनी बंद केले आहे त्यामुळे हॉटेलात वेटींग नसते. शिवाय रात्री लवकर सगळी हॉटेले, दुकाने बंद होतात अन दहा अकरा वाजेपर्यंत पुणेकर शहाण्या मुलांसारखे गुडुप झोपतात!!!" तरीही त्यांचा विश्वास बसत नाही मग मी गोटीकडे फोन देतो. तो सांगतो, "सांगु का? इकडे स्वाईन फ्ल्यु आलाय म्हणजे ताप, सर्दी - खोकला, न्युमोनिया होतो. पण तो बरा होतो. मला डॉक्टरांनी सांगितलंय. पण मज्जा खुप येते. शाळा बंद आहे अन मी खूप कार्टून बघतो. तुम्हीच इकडे या ना. आपण धमाल करु."
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
20760
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
या अनुभवातुन
In reply to छान by दशानन
जर गळफास
In reply to या अनुभवातुन by प्रसन्न केसकर
जिवंत अनुभव
लेख छान आहे, पण...
पटले
In reply to लेख छान आहे, पण... by ज्ञानेश...
चिंतेचा व्हायरस
लेक ठीक
धन्यवाद...
टाळ्या... =D>
In reply to धन्यवाद... by श्रावण मोडक
टाळ्या
In reply to टाळ्या... =D> by दशानन
प्रतिक्रियाविचार करुन
In reply to धन्यवाद... by श्रावण मोडक
काही मुद्दे:
In reply to धन्यवाद... by श्रावण मोडक
- http://www.tamiflu.com/ (मधल्या भागात वरतीच h1n1 चा उल्लेख आहे)
- या पिडीएफ मधे पृष्ठ क्रमांक १६ वर.
H1N1 हा व्हायरस नवा नाही पण त्याचा स्ट्रेन (जात) नवीन आहे ज्याबद्दल काळजी वाटत आहे. फ्लूच्या व्हायरसबद्दल पण असेच असते. त्याचा स्ट्रेन बदलत असतो/बदलू शकतो. एकतर व्हायरससाठी पूर्ण उपाय काही नसतो, अँटीव्हायरलने त्यावर थोडाफार उपाय होऊ शकतो. तेच टॅमीफ्लू करत असावी. बाकी अजून नंतर लिहीन...हुश्श..
+१
In reply to हुश्श.. by स्वाती दिनेश
असेच म्हणतो
In reply to +१ by ऋषिकेश
अभिनंदन.
सध्याच्या
एक शंका
In reply to सध्याच्या by रेवती
अमेरिकेत
In reply to एक शंका by एकलव्य
!
In reply to अमेरिकेत by रेवती
WHO, बहुद्देशीय औषधी कंपन्यांची धन वगैरे...
खरं तर...
In reply to WHO, बहुद्देशीय औषधी कंपन्यांची धन वगैरे... by प्रदीप
उत्तरे, खुलासे, आभार प्रदर्शन इ.
In reply to खरं तर... by श्रावण मोडक
शेवटचा प्रतिसाद
In reply to उत्तरे, खुलासे, आभार प्रदर्शन इ. by प्रदीप
एकच प्रश्न
In reply to शेवटचा प्रतिसाद by श्रावण मोडक
वैयक्तिक
In reply to एकच प्रश्न by प्रदीप
गोंधळ
In reply to वैयक्तिक by श्रावण मोडक
तारतम्य!
सगळा घोळ सरकारी, निमसरकारी विधानांमुळेच झाला
In reply to तारतम्य! by ज्ञानेश...
ज्ञानेश,
In reply to तारतम्य! by ज्ञानेश...
प्रसनदा , मोडकदा माहीती करिता धन्यवाद...
पुनेरी, मुलाच्या तब्बेतीबाबत तुमचे निर्णय
स्वाईन फ्ल्यु, WHO, टॅमिफ्ल्यु या सगळ्या टेक्नीकल गोष्टी
मॅसेचुसेट्स
धागा
आयबीएन
In reply to धागा by श्रावण मोडक
काही माहिती
In reply to धागा by श्रावण मोडक
धन्यु...
In reply to धागा by श्रावण मोडक
जरा...
In reply to धन्यु... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मत
In reply to धागा by श्रावण मोडक
माझे मत
In reply to मत by प्रदीप
माहिती व आरोप
In reply to माझे मत by श्रावण मोडक
तपशील
In reply to माहिती व आरोप by प्रदीप
लेख आवडला.