Skip to main content

बाबा - ६

लेखक मनोजकुमार यांनी बुधवार, 21/10/2026 21:44 या दिवशी प्रकाशित केले.

बाबा - १

बाबा - २

बाबा - ३ 

बाबा - ४

बाबा - ५ 

बाबा -  ६ 


लग्न तीन आठवड्यांनी झालं. बाबांनी भगवे कपडे ठेवले आणि आईनं कापुराच्या गोळ्यांमध्ये ठेवलेला कुर्ता-धोतर काढला. कुर्ता ढगळ झाला होता. आईनं त्याला पिना लावल्या.

“एवढं तरी चालेल.”

कन्यादानाच्या वेळी गुरुजींनी विचारलं, “कन्येचे वडील?”

“मी,” बाबा म्हणाले.

आवाज फारसा लागला नाही. त्यांचा हात थरथरत होता. मंजू त्याकडे बघत नव्हती, समोर बघत होती.

लग्न झालं. मंजू निघताना बाबांच्या पाया पडली, पटकन, जसं सगळ्या मोठ्यांच्या पडते.

“येते.” बाबा तिच्या कानात काहीतरी म्हणाले.

ती हसली नाही.

गाडी निघाली, आणि आई बघत राहिली, बाबांकडे नाही, गाडीकडे.

लग्नानंतर घर रिकामं वाटलं. बाबा सकाळी पाचला उठायचे, जुनी सवय. वैशाली त्यांना चहा द्यायची,  जेवण वाढायची. ते “नको, नको” म्हणायचे.

ती म्हणायची, “तुम्ही नको म्हटलं की मला वाईट वाटतं.” मग ते गप्प बसायचे.

आई त्यांच्याशी बोलायची ती कामाचंच.

“मीठ आणा.”

“चहा गार होतोय.”

रात्री ती आतल्या खोलीत, ते बाहेर.

एकदा आई मला एकट्याला म्हणाली, “कशाला आले आता?” आणि पुढे काही बोलली नाही.

कुणाला म्हणाली, ते मी विचारलं नाही.

जोशी काकू आल्या.

“वसंतराव, कुठे गेला होतात?”

“इकडे तिकडे.”

“भगवे कपडे कुठे?”

“ठेवलेत.”

“ट्रंकेत?”

“हो.”

“मग पुन्हा घालणार का?”

“माहीत नाही.”

बाहेर पडताना त्या मला म्हणाल्या, “हे काही बरोबर नाही, अशोक. पोरांना सोडून गेलेला, आता पोराच्या जिवावर खायला आला.”

काकू, तुम्ही हे भाजीवाल्यासमोरही बोलता का?” मी म्हटलं.

त्या गप्प झाल्या. नंतर भाजीवाल्यानं सांगितलं की त्या बोलतात.

मामाही आला.

“आता खर्च वाढला ना, अशोक. नोकरी सोडून गेलेल्याला पेन्शन मिळत नाही.”

“मी बघतो.”

“आणि माझ्या कर्जाचं?”

“तेही बघतो.”

मामा जाताना म्हणाला, “चांगलं झालं, पण हिशोब पक्का.”

एका दिवशी बाबांनी ओसरीचा नळ दुरुस्त करायला पाना घेतला. तो वीस वर्षं गळत होता.

मी म्हटलं, “राहू द्या. प्लंबर बोलावलाय.”

“मी करतो, मला येतं.”

“वीस वर्षं गळत होता. आता का?” बाबा काही बोलले नाहीत.

त्यांनी पाना खाली ठेवला. मला त्याचं लगेच वाईट वाटलं, पण मी काही बोललो नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी प्लंबरनं नळ दुरुस्त केला. बाबा बघत बसले.

एका रात्री मी त्यांचे पाय दाबत होतो.

“तू करू नको,” ते म्हणाले.

“करू द्या.”

“अशोक.”

“हं.”

“तुला राग?”

“आहे.”

“आहे?”

“आहे. पण मी करतो.” ते काही बोलले नाहीत.

मग म्हणाले, “महाशिवरात्रीला सावरगावला जाईन म्हणतो. पुजाऱ्याला शब्द दिलाय.”

आई स्वयंपाकघरातून म्हणाली, “जा. परत येणार ना?”

“येईन.”

“यावेळी खरंच?”

“हो.”

“बघू.” एवढंच.

बाबा माझ्याकडे बघत होते, मी पायांकडे.

आता बाबा घराचा हिशोब लिहितात. एका वहीत, सुंदर अक्षरात. आधी मी लिहायचो. भाजीचे दहा रुपये, दूध, तेल, दुकानाचं भाडं. बाबांनी तीन आठवड्यांत जुनं सगळं पुन्हा लिहून काढलं.

“तुझा हिशोब चुकतोय,” ते म्हणाले. मी म्हटलं, “कुठे?”

“इथे. आणि इथे. आणि इथे.” खरंच चुकत होता.

मग आईनं मला सांगितलं, “आता तू हिशोब लिहू नको.”

मी वही त्यांच्या हातात दिली आणि दुकानात गेलो. दिवसभर बसलो. काही करायचं नव्हतं. लोक आले, झेरॉक्स काढल्या, गेले.

 मी दिवसभर बसून होतो आणि मला पहिल्यांदा कळलं की रिकामं कसं बसायचं, हे मला येत नाही. 

(समाप्त्त).

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1117
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

मुळात मला या कथेचा काय शेवट अपेक्षित होता  ते मलाही माहित  नाही. 

फिल्मी, टिपिकल शेवट नको होता तो तसा झाला नाही हे बरं. बाबाच वागणं थोडं विक्षिप्त वाटलं. का घर सोडून गेला? परत आला तेही का? काही उलगडा झाला नाही. 

लेखकाने आधीच्या भागात अनेकांना विचारणा केली की काय शेवट हवा. त्यांच्या उत्तराची वाट न पहाता शेवट करून तो मोकळा झाला. अर्थात असं विचारून केलेल्या शेवटला काही अर्थ उरला नसता म्हणा. पण अर्धवट घाईघाईत गुंडाळल्यासारखं वाटलं.


In reply to by गणपा

तुमचं म्हणणं बरोबर आहे. खऱ्या घटनेचा शेवट असा नव्हता, तो बराच वेगळा होता. तोच लिहावा असं आधी वाटलं, मग विचार बदलला आणि शेवट वेगळा झाला. बाबा का गेले आणि का परत आले, याचं नेमकं उत्तर खरंच कुणालाच माहीत नाही, म्हणून मी तेही उलगडलं नाही. पण ते अर्धवट वाटलं असेल तर तुमचा मुद्दा मान्य आहे. वाचल्याबद्दल धन्यवाद.


छान!! बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. शेवट अनपेक्षीत होता हे मात्र नक्की. 

(उत्तरार्ध म्हणुन जर त्या प्रशनांची उत्तरे मिळत असतील तर पुलेशु.)


हिशेबाची वही मिळणे म्हणजे पुन्हा अधिकार मिळणे. सहजा सहजी ती हातात मिळणे हा शेवट पटला नाही.

 

असो लेखकाची मर्जी.

 


In reply to by कर्नलतपस्वी

हा विचार डोक्यात आला नव्हता.

पण असहमत. समोरचा व्यक्ती अधिकार वापरणारा नसेल तर हिशोबाची वही अंकुश नसून काम होईल. 


माझ्या  पाहण्यात असे लोक आहेत, काहीजण सांंन्यास घ्यायला सोडून गेले, कोणी बुवा च्या  नादाने, एक गृहस्थ सकाळी नाष्टा उशीिरा दिला म्हणून 3 वर्षे घर सोडून गेले होते.


सुरेख. मला शेवट न वाटणारा शेवट अपेक्षित होता. हे इतके खरे वाटणारे आणि भिडणारे लिहिले आहे की अखेरही सर्व नीट उलगडून सांगणारी असेल अशी अपेक्षा नव्हती. 


अशा सोडून गेलेल्या लोकांचा स्वीकार घरातल्यांकडून लगेच होत नाही कारण माघारी खूप सोसावं लागलेलं असतं त्यांना..

त्यामुळे कथा खूप वास्तवदर्शी आणी मनाला भिडणारी होती. खरंतर अशा गोष्टींना शेवट नसतोच..

कारण दुभंगलेली मने तशीच राहतात...त्या अर्थाने शेवट पटला.

खूप छान लिहीता तुम्ही...धन्यवाद


स्वत:ची जबाबदारी सोडून पळून गेलेल्या असल्या बाबाला एकतर घरात घ्यायचे नव्हते. आणि घेतलेच होते तर काम झाल्याबरोबर ढु वर लाथ घालून  हाकलून द्यायला हवे होते..

 


In reply to by विजुभाऊ

काम झाल्याबरोबर ढु वर लाथ घालून  हाकलून द्यायला हवे होते..\

 

बऱ्याच वेळेस दारू पिणारा आणि नालायक नवरा असेल तरी बायका त्याला सांभाळून घेतात कारण कुंकवाला का होईना नवरा आहे यासाठी.  

याचे कारण आपले संस्कार मनात घट्ट रुतून बसलेले असतात.

सहजा सहजी कोणतीही बाई नवऱ्याला घराबाहेर काढायला तयार होत नाही याचे कारण तेच आहे.    


In reply to by सुबोध खरे

तिथेच चुकते. बायका सोसत रहातात. आणि स्वत:च्या आयुष्याचे वाट्टोळे करुन घेतात.

माझ्या ओळखीत एक  चांगल्या गायीका आहेत. त्यांच्या दारुड्या नवऱ्याने त्यांचे गाण्यातील यश सहन न होऊन भर  मैफलीत त्याना मारहाण केली होती. दुर्दैव म्हणजे ही मारहाण होत असताना रेक्षक किंवा आयोजक या पैकी कोणीही त्या नवऱ्याला अडवले नाही.

त्यांचे म्हणणे असे पडले की नवराबायकोच्या भांडणात आपण कशाला पडायचे.


शेवटी बाबा परतले ! काहीसं अनपेक्षित .. 

बालकांड मध्ये ही हानूचे बाबा अचानक परत येतात , पुन्हा गायब  होतात ... परत येतात 

राग आणि लोभ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.... 

या कुटुंबाचं सर्व काही चांगलं झालं असेल अशी आशा ! 

 

खुप दिवसांनी मिपावर काही तरी विशेष  वाचल्याचा आनंद झाला. 


भावभावांचे चित्रदर्शी कथानक...

लिखाण आवडले..

कथेचा अजून एक भाग हवा होता असे वाटले...

 

लिहीत रहा.. वाचत आहे...


सगळ्यांचे मनापासून आभार. काही प्रश्नांची उत्तरं मुद्दाम दिली नाहीत, कारण त्या घरातल्यांनाही ती कधी मिळाली नाहीत. आई, मी, मंजू आणि माझी बायको, आम्हा चौघांना बाबांबद्दल वेगवेगळं वाटतं. कुणाला राग, कुणाला दया, कुणाला दोन्ही. 

खऱ्या घटनेत मुलगा बाबांना घरीच ठेवतो. ते आता शेतावर जातात आणि घरची कामंही करतात.  पण पूर्वी वडिलांना जो आदर मिळायचा तो आता राहिलेला नाही, आणि हे त्यांनाही जाणवतं. तरी ते काही बोलत नाहीत, आणि कुणी त्यांना काही विचारतही नाही. मुलाचा आणि आईचा राग अजून गेलेला नाही. काही जखमा अशाच राहतात, आणि सगळे त्यांच्यासोबतच जगतात.

तुमच्या कॉमेंट्स वाचताना मला तेच दिसलं. कुणी बाबांच्या बाजूने, कुणी घरातल्यांच्या बाजूने. शेवटी सगळं काळावर सोडावं लागतं. 

वाचल्याबद्दल आणि मनापासून लिहिल्याबद्दल धन्यवाद.


सर्व भाग एका दमात वाचून काढले. चित्रशैलीतलं लेखन आहे. कथाही चांगली होती. आवडली. 

अजून काही अनपेक्षित, धक्कादायक वगैरे, कथा काही वळण घेते का  असेही वाटले. पण, लेखकाने लिहून मोकळं व्हावं
विषय संपला. 

पुढील लेखनासाठी शुभेच्छा. 

-दिलीप बिरुटे

 


विषय नाजूक पण सुरेख पणे हाताळला आहे. कुठेही पाल्हाळ नाही.

लेखकाच्या शैलीतही एक तुटकपणा आहे. जेवढ्यास तेवढेच आणि नेमकेच लिहायचे आहे. एक विरक्ती जाणवते.

माझ्यामते ही शैली जाणुनबुजुन ठेवली आहे आणि ती आवश्यक ही वाटते कथेचा विषयच लक्षात घेता.

बर्याच दिवसांनी न कंटाळता सर्व भाग वाचले.


अनपेक्षितपणे कथा संपली असे वाटले. वडील गेले तेंव्हा पाच वर्षाची असलेली मंजू आता लग्न होऊन सासरी गेली, तिच्याबद्दल आणखी लिहायला हवे होते असे वाटले. 

पुढील लेखनाबद्दल उत्सुकता आहे. 


सर्व भाग एकदमच वाचून काढले. ज्याला सहन करावे लागते त्यालाच समजते. अशी विक्षिप्त माणसे असतात, काहींना नंतर पश्चाताप होतो, काहींना तोही होत नाही. हिंदीमध्ये 'सुबह का भूला' म्हण आहे पण सगळ्यांनाच दुसऱ्यामुळे आपल्याला भोगावं लागलेलं माफ करून टाकता येत नाही. काही गोष्टी आपल्या नशिबाचा भाग म्हणून आपल्या आयुष्यात येतात. माणूस आहे कधी कमी चुकतो कधी जास्त चुकतो. संसार असलेल्या माणसाने बायको मुलांचा विचार न करता असं स्वच्छंदी वागणं बरोबर नाही. सुरुवातीला कथेमधले बाबा अविचारी स्वभावाचे वाटत नव्हते तरी ती कोणती शक्ती असेल जी विचारी लोकांनाही चुकीचं वागण्यास भाग पाडते.


माणसे विक्षीप्त नसतात.

  जबाबदाऱ्या झेपत नाहीत  म्हणून ते पळ काढतात.

माझ्या पहाण्यात अशी काही उदाहरणे आहेत.

 


मनोजकुमार,

 

कथा आटोपशीर आणि पकड घेणारी आहे. उगीच भावनांचा पसारा मांडला नाही, हे खास आवडलं. बरचसं वाचकांवर सोडून दिलंय यांतनं लेखकानं वाचकांच्या परिपक्वतेवर विश्वास दाखवल्यासारखं वाटतं. त्याबद्दल आभार! :-)

 

बाबा हा माणूस पळपुटा वाटंत नाही. अवघ्या वीस किमीवरील गावात राहतो आहे. पळून जाणारे इतक्या नजीक राहांत नसतात ( असं मला वाटतं ). कन्यादानास मंजूला बाबाच हवे आहेत. म्हणजे घरच्यांना त्यांचा पत्ता लागलेला आहे. त्यांना केवळ मंजूच्या लग्नापुरतं घरी आणायला हवं होतं. तसंही ते स्वत:स संन्यासी म्हणवतात. मग संन्याशाने गृहस्थीत परतणं उचित नाही. याची बाबांना कल्पना असणार.

 

तरीही ते परतले कारण त्यांना तशी आज्ञा ( स्वप्नदृष्टांत वगैरे ) झालेली असू शकते. आपेगावच्या विठ्ठलरावांना गुर्वाज्ञेमुळे संसारात परतावं लागलं होतं, तसा काहीसा प्रकार असू शकतो. बाकी, बाबांना नंतर पूर्वीचा आदर मिळाला नाही. तसंही उतारवयातल्या पुरुषाचा कोणीच आदर ठेवीत नसतं. बहुधा बाबांना त्याचं सोयरसुतक नसावं. एकंदरीत शेवटी म्हणावंसं वाटतं की, आईचा सोशिक त्याग, बाबांची अध्यात्मिक साधना आणि मुलाची कष्टाळू वृत्ती पुढील पिढीचं भलं करोत.

 

असो. कथामालिकेबद्दल परत एकदा धन्यवाद.

 

आ.न.,

-गा.पै.


कुठलाही अभिनिवेश नसलेलं प्रवाही लिखाण असलेली लेखमाला आवडली!

लेखकाने त्याच्या दृष्टिकोनातून केलेलं कथन एकदम प्रामाणिक होतं. त्यामुळे एक वाचक म्हणून माझ्या अपेक्षा लेखमालेवर किंवा लेखकावर न लादता लेखमाला लेखकाच्या चष्म्यातून वाचणं हा अनुभव रोचक होता.

 

- (पुलेप्र असलेला) सोकाजी 


सगळे भाग एका दमात वाचले आणि खुप दिवसांनी मिपावर काही तरी विशेष वाचल्याचा आनंद झाला.  लिहित रहा....  

धन्यवाद!  🙏