Skip to main content
लेखक मनोजकुमार यांनी सोमवार, 19/10/2026 19:43 या दिवशी प्रकाशित केले.

बाबा - १

बाबा - २

बाबा - ३ 

बाबा - ४

 

मंजू विचारायला लागली. “बाबा कुठे?”

मी म्हटलं, “दत्तगुरूंकडे. महाराज होऊन येतील.”

“केव्हा?”

“लवकर.”

तिनं ते सहा महिने ऐकलं. मग विचारणं बंद केलं.

एका संध्याकाळी बघतो तर पाच वर्षांची मंजू दाराच्या फटीला डोळा लावून पडली होती. दाराखाली एक फट आहे, लाकूड तडकलेलं. मी तिला उचललं.

“काय करतेस?”

“पाय बघते.”

“कुणाचे?”

“बाबांचे.”

“कुणी शिकवलं?”

“तू. तू रोज बघतोस.”

मी तिला खाली ठेवलं आणि बाहेर जाऊन पाणी प्यायलो. परत आलो, ती तशीच होती. मी पुन्हा काही बोललो नाही.

मंजूला शाळेत घातलं तेव्हा फॉर्मवर वडिलांचं नाव लिहावं लागलं. मी बाबांच्या अक्षरासारखं लिहायचा प्रयत्न केला. जमलं नाही. गुरुजींनी विचारलं, “वडील काय करतात?”

“बाहेरगावी असतात.”

त्यांनी माझ्याकडे बघितलं. मग फॉर्म घेतला आणि पुढचं काहीच विचारलं नाही. मला त्याचं आश्चर्य वाटलं.

राखीपौर्णिमेला मंजूनं मला राखी बांधली. मी तिला पाच रुपये दिले. पैसे मुठीत घेऊन ती म्हणाली, “दादा, आता शनिवारी जिलबी तू आणणार का?”

मी म्हटलं, “बघू.”

ती हसली. शनिवारी मी जिलबी आणली. एक पाव. आई म्हणाली, “अर्धा पाव पुरला असता. उगाच पैसे घालवतोस.” पण ती जिलबी खाताना तिनं तोंड फिरवलं.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 81
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया