Skip to main content
लेखक मनोजकुमार यांनी सोमवार, 19/10/2026 00:29 या दिवशी प्रकाशित केले.

बाबा - १

....

ती मशीनच्या चाकावर बोट फिरवत होती. त्या रात्री मला जे जाणवलं, ते शब्दात सांगता येत नाही. फक्त एवढं, की तेव्हापासून काही तसं राहिलं नाही.

दुसऱ्या दिवशी मी म्हटलं, “मी शाळा सोडतो. कुठेतरी काम बघतो.” आईचा हात माझ्या गालावर बसला. आयुष्यात पहिल्यांदा.

“शाळा सोडायची नाही,” ती म्हणाली.

“मग पैसे?”

“मी शिवते.”

“तू शिवून काय होणार आहे, आई? मंजूची फी, घरभाडं...”

“मग तू नको सांगू!” ती ओरडली. “मला काय माहीत नाही का? मला माहीत आहे! पण तू लहान आहेस. मी तुला काम करायला पाठवू का सांग?”

“मग कुणी?”

“कुणी नाही. मी करीन.”


ती करायची. पण पुरत नव्हतं. शेवटी मीही कामाला लागलो, आईला न सांगता. सकाळी पेपर टाकणं. संध्याकाळी गांधी चौकातल्या एका स्टेशनरीच्या दुकानात दोन तास, पुडे बांधणं. शेठ रोज पाच रुपये द्यायचे, पण महिन्याच्या शेवटी एकदम.

आईला पंधरा दिवसांनी कळलं. “कुणाला विचारून?” ती म्हणाली.

मी गप्प राहिलो. ती पण गप्प राहिली. दोघंही माहीत असून न बोलण्यात तरबेज झालो. 

बाबांची सायकल आईनं एका दिवशी विकली. मला न सांगता. मी शाळेतून आलो, तर कोपऱ्यात ती नव्हती.

“आई, सायकल?”

“विकली.”

“कुणाला?”

“भंगारवाल्याला. एकशे वीस रुपये मिळाले. मंजूची फी भरली.”

“तू मला का नाही विचारलंस?” “तुला काय विचारायचं?”

“ती बाबांची होती!”

मी त्या दिवशी आईशी दोन दिवस बोललो नाही. तिनं तिसऱ्या दिवशी मला आवडणारी बेसनाची भाजी केली, आणि काही न बोलता वाढली. तिनं माफी मागितली नाही, मीही नाही. पेपर टाकायला मी चालत जायला लागलो, आणि त्यानंतर तीन वर्षं मी सायकल बघितली की मला राग यायचा.

एका मुलानं मला शाळेत म्हटलं, “तुझा बाप पळाला म्हणे.” मी त्याला इतका मारलं की गुरुजींनी मला बोलावलं.

“काय झालं?”

“काही नाही.”

“त्यानं म्हटलं......”

“काय म्हटलं?” मी सांगितलं नाही. गुरुजींनी बरोबर काय झालं असेल ते ओळखलं. पोराला रागावलं, मला पण.  ते मला आजही आठवतं, चांगलं की वाईट ते माहीत नाही.

(क्रमशः)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया