Skip to main content
लेखक मनोजकुमार यांनी बुधवार, 21/10/2026 21:44 या दिवशी प्रकाशित केले.

बाबा - १

बाबा - २

बाबा - ३ 

बाबा - ४

बाबा - ५ 

बाबा -  ६ 


लग्न तीन आठवड्यांनी झालं. बाबांनी भगवे कपडे ठेवले आणि आईनं कापुराच्या गोळ्यांमध्ये ठेवलेला कुर्ता-धोतर काढला. कुर्ता ढगळ झाला होता. आईनं त्याला पिना लावल्या.

“एवढं तरी चालेल.”

कन्यादानाच्या वेळी गुरुजींनी विचारलं, “कन्येचे वडील?”

“मी,” बाबा म्हणाले.

आवाज फारसा लागला नाही. त्यांचा हात थरथरत होता. मंजू त्याकडे बघत नव्हती, समोर बघत होती.

लग्न झालं. मंजू निघताना बाबांच्या पाया पडली, पटकन, जसं सगळ्या मोठ्यांच्या पडते.

“येते.” बाबा तिच्या कानात काहीतरी म्हणाले.

ती हसली नाही.

गाडी निघाली, आणि आई बघत राहिली, बाबांकडे नाही, गाडीकडे.

लग्नानंतर घर रिकामं वाटलं. बाबा सकाळी पाचला उठायचे, जुनी सवय. वैशाली त्यांना चहा द्यायची,  जेवण वाढायची. ते “नको, नको” म्हणायचे.

ती म्हणायची, “तुम्ही नको म्हटलं की मला वाईट वाटतं.” मग ते गप्प बसायचे.

आई त्यांच्याशी बोलायची ती कामाचंच.

“मीठ आणा.”

“चहा गार होतोय.”

रात्री ती आतल्या खोलीत, ते बाहेर.

एकदा आई मला एकट्याला म्हणाली, “कशाला आले आता?” आणि पुढे काही बोलली नाही.

कुणाला म्हणाली, ते मी विचारलं नाही.

जोशी काकू आल्या.

“वसंतराव, कुठे गेला होतात?”

“इकडे तिकडे.”

“भगवे कपडे कुठे?”

“ठेवलेत.”

“ट्रंकेत?”

“हो.”

“मग पुन्हा घालणार का?”

“माहीत नाही.”

बाहेर पडताना त्या मला म्हणाल्या, “हे काही बरोबर नाही, अशोक. पोरांना सोडून गेलेला, आता पोराच्या जिवावर खायला आला.”

काकू, तुम्ही हे भाजीवाल्यासमोरही बोलता का?” मी म्हटलं.

त्या गप्प झाल्या. नंतर भाजीवाल्यानं सांगितलं की त्या बोलतात.

मामाही आला.

“आता खर्च वाढला ना, अशोक. नोकरी सोडून गेलेल्याला पेन्शन मिळत नाही.”

“मी बघतो.”

“आणि माझ्या कर्जाचं?”

“तेही बघतो.”

मामा जाताना म्हणाला, “चांगलं झालं, पण हिशोब पक्का.”

एका दिवशी बाबांनी ओसरीचा नळ दुरुस्त करायला पाना घेतला. तो वीस वर्षं गळत होता.

मी म्हटलं, “राहू द्या. प्लंबर बोलावलाय.”

“मी करतो, मला येतं.”

“वीस वर्षं गळत होता. आता का?” बाबा काही बोलले नाहीत.

त्यांनी पाना खाली ठेवला. मला त्याचं लगेच वाईट वाटलं, पण मी काही बोललो नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी प्लंबरनं नळ दुरुस्त केला. बाबा बघत बसले.

एका रात्री मी त्यांचे पाय दाबत होतो.

“तू करू नको,” ते म्हणाले.

“करू द्या.”

“अशोक.”

“हं.”

“तुला राग?”

“आहे.”

“आहे?”

“आहे. पण मी करतो.” ते काही बोलले नाहीत.

मग म्हणाले, “महाशिवरात्रीला सावरगावला जाईन म्हणतो. पुजाऱ्याला शब्द दिलाय.”

आई स्वयंपाकघरातून म्हणाली, “जा. परत येणार ना?”

“येईन.”

“यावेळी खरंच?”

“हो.”

“बघू.” एवढंच.

बाबा माझ्याकडे बघत होते, मी पायांकडे.

आता बाबा घराचा हिशोब लिहितात. एका वहीत, सुंदर अक्षरात. आधी मी लिहायचो. भाजीचे दहा रुपये, दूध, तेल, दुकानाचं भाडं. बाबांनी तीन आठवड्यांत जुनं सगळं पुन्हा लिहून काढलं.

“तुझा हिशोब चुकतोय,” ते म्हणाले. मी म्हटलं, “कुठे?”

“इथे. आणि इथे. आणि इथे.” खरंच चुकत होता.

मग आईनं मला सांगितलं, “आता तू हिशोब लिहू नको.”

मी वही त्यांच्या हातात दिली आणि दुकानात गेलो. दिवसभर बसलो. काही करायचं नव्हतं. लोक आले, झेरॉक्स काढल्या, गेले.

 मी दिवसभर बसून होतो आणि मला पहिल्यांदा कळलं की रिकामं कसं बसायचं, हे मला येत नाही. 

(समाप्त्त).

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 95
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

मुळात मला या कथेचा काय शेवट अपेक्षित होता  ते मलाही माहित  नाही. 

फिल्मी, टिपिकल शेवट नको होता तो तसा झाला नाही हे बरं. बाबाच वागणं थोडं विक्षिप्त वाटलं. का घर सोडून गेला? परत आला तेही का? काही उलगडा झाला नाही. 

लेखकाने आधीच्या भागात अनेकांना विचारणा केली की काय शेवट हवा. त्यांच्या उत्तराची वाट न पहाता शेवट करून तो मोकळा झाला. अर्थात असं विचारून केलेल्या शेवटला काही अर्थ उरला नसता म्हणा. पण अर्धवट घाईघाईत गुंडाळल्यासारखं वाटलं.


In reply to by गणपा

तुमचं म्हणणं बरोबर आहे. खऱ्या घटनेचा शेवट असा नव्हता, तो बराच वेगळा होता. तोच लिहावा असं आधी वाटलं, मग विचार बदलला आणि शेवट वेगळा झाला. बाबा का गेले आणि का परत आले, याचं नेमकं उत्तर खरंच कुणालाच माहीत नाही, म्हणून मी तेही उलगडलं नाही. पण ते अर्धवट वाटलं असेल तर तुमचा मुद्दा मान्य आहे. वाचल्याबद्दल धन्यवाद.


छान!! बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत. शेवट अनपेक्षीत होता हे मात्र नक्की. 

(उत्तरार्ध म्हणुन जर त्या प्रशनांची उत्तरे मिळत असतील तर पुलेशु.)