Skip to main content
लेखक कांदा लिंबू यांनी शुक्रवार, 16/10/2026 14:56 या दिवशी प्रकाशित केले.

सहज मात्र (त्याच्या दृष्टीतून)  

प्रेरणा: सहज मात्र

 

सहज लिहून पाठवतो मी 
जे सुचतं माझ्या मनात 
तुझ्या मौनाचा अर्थ कळत नाही 
शब्द शोधत राहतो मी मात्र...

सहज विचारतो तुला कधी 
अन् म्हणतो, "येशील का?" 
तू येशील या आशेवरती 
वाट पाहत राहतो मी मात्र...

सहज गातो गाणे 
कधी तुझ्यासाठी सूर छेडतो 
तुझ्या डोळ्यांत दडलेलं 
गाणं वाचत राहतो मी मात्र...

सहज येऊन बसतो समोर 
अन् बोलतो असंच काही 
तुझ्या नजरेत हरवून जातो 
बोलायचं राहून जातं मात्र...

अशा अनेक सहज गोष्टी 
सहजपणेच केल्या असतील 
तुझ्या मनात काय उमटलं 
जाणू शकलो नाही मात्र...

तुझ्या मौनाला मौन समजलो 
भाव तुझे वाचलेच नाही 
तुला सहज वाटणाऱ्या क्षणांनी 
माझंही जग बदललं मात्र...!!
 

- कांदा लिंबू 

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 198
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

प्रेरणा जरी माझ्या कवितेची असली तरी मी तुमची कविता वेगळी रचना म्हणूनच वाचली आणि खरंच आवडली.  मस्तच


तुझ्यासाठी लिहून पाठवतो 
आठवून साठवून माझ्या मनात 
तू मात्र मौन राहतेस  
समजून वाचलेलं सहज मात्र...

साथ हवी म्हणून विचारतो तुला 
अन् म्हणतो, "येशील का?" 
तू मात्र घुटमळत राहतेस  
समजून विचारलेलं सहज मात्र...

तू आहेस तर गाणे आहे  
तुझ्या अस्तित्वानेच ताल सूर  
तुला मात्र वाटत राहते  
गाणेही माझे सहज मात्र...

खूप बोलायचं असतं 
पण बोलून जातो वेगळंच काही 
तू हसण्यावारी नेतेस  
बोलणंही माझं सहज मात्र...

माझं सहज नाहीच काही  
पण दाखवतो सहज आहे जसं  
सहजा सहजी दोघांचंही 

जगणं बदलून गेलंय मात्र...
 


In reply to by श्वेता व्यास

खरंच उत्स्फूर्त कविता लिहिलीय, श्वेता व्यास; वेगळ्या "त्या"चा वेगळा भाव आवडला.

आज मिपाकरांची प्रतिभा खूपच बहरलीय जणू! श्वेता२४ यांची साधी, तरल, काहीशी मुग्ध अभिव्यक्ती आणि त्यावरची टिपिकल मिपा-शैलीतील एकाहून एक खुसखुशीत विडंबने!  


दोन्ही श्वेतांसहित सर्वच मिपाकरांना सुचवणी, अधूनमधून असे तरल काव्य प्रसवावे; रुक्ष राजकारणाच्या वाळवंटातील अशी मरूद्याने वाचकांना छान विसावा देतील.


- कांदा लिंबू 


In reply to by श्वेता व्यास

धन्यवाद सर्वांना 🙏

मुख्य श्वेता२४ यांना 🙂


सगळ काही सहज असतं

तर संशोधन केलं नसतं

कांदेपोहे खाऊन मात्र....

वजन वाढवलं नसतं🤣


या कवीतेच्या निमित्ताने मिसळपाव वर  सौहार्दाचे जे सहज वातावरण निर्माण झाले. ते आनंददायी आहे.

 


तुझ्या मौनाला मौन समजलो 
भाव तुझे वाचलेच नाही 
तुला सहज वाटणाऱ्या क्षणांनी 
माझंही जग बदललं मात्र...!!

 

Oh.. खोल भाव आहे.. मुळ कविते सारखा...