Skip to main content

बापटांचं काय करायचं? पुण्यातला गणेशोत्सव २०२६

लेखक स्वधर्म यांनी मंगळवार, 01/09/2026 22:28 या दिवशी प्रकाशित केले.

२०२६ चा गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपला आहे. मंडळांनी नेहमीप्रमाणे उत्साहात गणपती बसवण्याची तयारी केली आहे, ते तिथेच आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून नागरिकांचा मात्र या उत्सवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वी जसे वर्षभरात गणपती आल्यावर मनोरंजनाचा, प्रबोधनाचा खजिना असायचा त्याची आता गरज उरली नाही. हवे ते मनोरंजन बोटाच्या एका क्लिक वर उपलब्ध आहे. मंडळ व त्यांचे कार्यकर्ते मात्र अजूनही आपण हे करून जनतेला काहीतरी देतोय. देवाचं, पुण्याचं काम करतोय अशा समजूतीतून उत्सव अधिकाधिक भव्य, खर्चिक, अतिक्रमण करणारा व दणदणाटी करत चालले आहेत. इथे अनेकांना विरोधी भूमिका घ्यायची असते पण ते घेऊ शकत नाहीत. शिवाय विरोधक कोणी सामान्य नागरिक नसतात, तर ते असतात दादा, भाऊ अशा नगरसेवक राजकारण्यांचे कार्यकर्ते. त्यांना यांच्यातूनच भावी नेते व कट्टर कार्यकर्ते मिळत असतात. तर अशा सगळ्या वातावरणात...

पुणे महापालिका गणेशोत्सवाबाबत नागरिकांच्या सूचना मागवण्यासाठी एक सभा आयोजित करते. पुण्याचे नागरिक विद्यानंद बापट तिथे जातात आणि ध्वनिवर्धक (लाऊड स्पीकर) मुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याने व गणेशोत्सवाच्या मंडपांमुळे रहदारीस अडथळा होत असल्याने या दोन्हीवर संपूर्ण बंदी घाला असे मत मांडतात. अर्थातच त्यांना सुरक्षा रक्षकांच्या कड्यात सभागृहाबाहेर काढले जाते. हे पूर्वीही काही वेळा झाले असेल, पण यावेळी...

बापट गप्प बसणे तर सोडाच, अधिकच बोलू लागले आहेत. जवळजवळ प्रत्येक वाहिनीने त्यांची मुलाखत घेतली आहे. त्यात त्यांनी त्यांचे आक्षेप सविस्तर व करकरीत तर्काचा आधार घेऊन मांडले आहेत. त्यासाठी कायदा, लोकशाही, धर्मस्वातंत्र्य, संस्कृती, परंपरा, इतिहास याचा आधार घेऊन ते अजिबात बोटचेपी, तडजोडीची भूमिका न घेता आपले म्हणणे मांडत सुटले आहेत. भाजपाचे शहर प्रमुख बापटांना काळं कुत्रंही विचारत नाहीत असे म्हणाले. त्यावर बापटांनी संस्कृत वचन वापरून त्यांना प्रसिध्दी का नको आहे ते सांगितले आहे...

काही म्हणा बापटांचं ऐकायला मजा येते आहे. एक स्पष्ट विचार असणारा नास्तिक केवळ बुध्दीच्या व तर्कसंगत युक्तीवादाच्या जोरावर बलाढ्य झुंडीसमोर न घाबरता उभा आहे. आणि तथाकथित दांडगट गल्लीदादा त्यांचं अजून तरी काही वाकडं करू शकलेले नाहीत. बापट नास्तिक असल्याने त्यांनी द्वैत अद्वैत वादाला चक्क बौध्दिक हस्तमैथुन म्हणण्याचे धाडस दाखवले आहे. दुवा: अस्खलित बापट ‘मराठीतले शशी थरूर’! DJ विरोधात घणाघात! CM फडणवीसांची नरोवा कुंजरोवा भूमिका!

जंतरमंतरवरील निर्भय जेन झी नंतर असे एक एक निर्भय लोक समोर येत आहेत. कुठे ना कुठे अनेक नागरिक त्यांना पाठिंबा देत आहेत. 


वाचने 1325
प्रतिक्रिया 67

प्रतिक्रिया

काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उघड आणि स्पष्ट शब्दांत बापट यांना पाठिंबा दिला आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी याही बापट यांच्याशी पक्षाच्या मर्यादेबाहेर न जाता शक्य तेवढी सहमती दर्शवत आहेत. केंद्रीय पर्यावरण समितीवर अधिकाराचे पद असूनही या संदर्भात प्रत्यक्ष कृती करण्याची शक्ती असताना पक्षातील अरेरावी आणि धटिंगणशाही बटबटीतपणे समोर येत असताना या पुरुषी आणि अर्थातच पितृसत्ताक दडपशाहीसमोर पड खात, चुकीच्या कृत्याविरुद्ध कुठलीही कायदेशीर कारवाई न करता केवळ केविलवाणा निषेध करणं हे नुकत्याच पुण्यातच प्रचंड यशस्वी   झालेल्या राहुल गांधींच्या कार्यक्रमात उस्फूर्तपणे आणि तडफदारपणे व्यक्त झालेल्या तरुण मुलींच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर फारच दुर्दैवी आणि अगदी राजकीय क्षेत्रातही लौकिक यश मिळवूनही पुरुषसत्ताक व्यवस्थेतील स्त्रियांची परावलंबी वस्तुस्थिती ढळढळीतपणे पुढं आणणारं दिसतं. राजकीय पक्षही आजसुद्धा  एकप्रकारे स्त्रियांची कोंडीच कशी करत आहेत, अगदी मुख्यमंत्रीदेखील मेधाताईंइतकं स्पष्ट बोलण्याचं धाडस दाखवत नाहीत, त्यांच्या बोलण्याला नि:संदिग्ध पाठिंबा  देत नाहीत, हे यातून पुढं येतंय.


In reply to by रामचंद्र

नेमकी नस पकडलीत तुंम्ही. कॉंग्रेसचे नेते थोडा थोडा का असेना पण कणा दाखवू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे. त्यामानाने एकचालकानुवर्तित संस्कृतीतून आलेल्या नेत्यांना खूप मर्यादा असतात हे स्पष्ट आहे. शनिवार वाड्यात कुठल्यातरी दुर्लक्षित कबरीला भगवा रंग फासण्यापासून मेधाताईंची गाडी थोडी तरी पुढे सरकली म्हणायची. 


सार्वजनिक गणेशोत्सवांत भाग घेतल्यास दशके झाली असतील पण बापट ह्यांच्या बोलण्यात तथ्य आहे का ? सार्वजनिक गणेशोत्सवांत २४ किंवा १२ तास सार्वजनिक लौड्सपकर लावला जातो का ? रस्ते अडवले जातात का ? सद्य स्थिती काय आहे ? 


In reply to by साहना

काही दुर्दैवी घटनांमध्ये नागरिकांचे, जल्लोषात सामील कार्यकर्त्यांचे जीव गेले आहेत, दृष्टी गेली आहे, कित्येकांना उत्सव, उत्सवपूर्व दोन दोन महिन्यांचा वादनसरावकाळ असह्य होतो. सर्वांनाच घर सोडून जाता येत नाही. आजारी, वृद्ध, गरोदर, घरून काम करणारे यांचा आवाजामुळे  तोंड दाबून बुक्क्यांचा मार असा होणारा छळ ही वस्तुस्थिती पुरेशी स्पष्ट नाही का? अगदी मारे ऐतिहासिक किंवा पौराणिक देखाव्यांचं कौतुक सांगितलं जातं पण अशा देखाव्यांत पार्श्वगायन, त्यात कधीकधी प्राण्यांचे चित्रविचित्र आवाज घरात बसून दिवसरात्र सक्तीने मोठ्याने ऐकावे लागतात. स्पेशल इफेक्ट्सचे, नाट्यमय प्रसंग, आवेशपूर्ण संवाद, तथाकथित जोशपूर्ण निवेदन... गणपतीबाप्पाचा कितीही धावा केला तरी या त्रासातून सुटका नसते. ११२ ला फोनवर सौजन्याने बोलतात पण प्रत्यक्षात कृती होतेच असं नाही. मात्र यंदा बापट (आणि त्यांच्यासारखे अन्य) तारणहार ठरतील अशी आशा आहे. 


In reply to by रामचंद्र

 त्सवपूर्व दोन दोन महिन्यांचा वादनसरावकाळ असह्य होतो

 

२ महिने आधी वादन सराव  ? आणि ह्या लोकांना सवड मिळते तरी कशी ? लोकांना काम धंदा नाही आहे का ?

२००९ मी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवांत शेवटचा भाग घेतला होता आणि तिथे सुद्धा फक्त विसर्जन मिरवणूक पहिली होती. गर्दीचा तिटकारा असल्याने मी नेहमीच मुंबई पुणे भागांत ह्या काळांत जाणे टाळले आहे. त्यामुळे सध्या काय स्थिती आहे हे ठाऊक नव्हते.

स्थानिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या ध्वनी आणि इतर प्रदूषणाच्या विरोधांत बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. बापट ह्यांच्या व्हिडीओ मध्ये फर्नांडिस ह्यांनी संदिग्ध भूमिका घेतली आहे असा उल्लेख आहे. त्यामुळे कदाचित सर्वच राजकीय पक्षांना ह्या एकूण प्रकारांतील डोकेदुखी लक्षांत येत असावी.

 

 

 


In reply to by साहना

९९ च्या आसपास मिरवणुकांमधे मध्ये ढोल वाजवले, त्याच्या अनुभवावरुन सांगतो, सलग तासभर मिरवणुकीमधे वाजवायचे असेल तर २ महिने सराव खरच उपयोगी असतो. प्रत्यक्षात मुख्य मिरवणुक अनेक तास (४-६) सहज लांबु शकते. पुरेसा स्टॅमिना आणि सराव नसेल तर हात भरुन येतात, ताल चुकु शकतो, आणि ताल बदलताना प्रमुख ज्या खुणा वापरतात त्यांची गडबड होउ शकते.

 

 


त्यांच्याकडून होईल तितका त्या प्रयत्न करत आहेत आणि वेळोवेळी जमेल तशी त्यांनी प्रत्यक्ष कृती करून दाखवलीही आहे ही वस्तुस्थिती आहेच. मात्र कुटुंबातील एखादी कर्ती स्त्री एखादी वावगी कृती करू नका असे सांगत असेल तर बाहेर मर्दुमकी दाखवणारे पुरुषही तिच्या म्हणण्याला मान देतात, हे भाजप ज्या भारतीय कुटुंबसंस्थेचा आदर्श मानतो त्यात दिसणारे चिरपरिचित उदाहरण ज्याप्रकारे पायदळी तुडवत आहे ते संबंधितांना भूषणावह नाही.

आणि माणूस तर सोडाच पण मुक्या प्राण्यांनाही दुखवू नये, असं सांगणाऱी म्हणे आपली संस्कृती!


पैगंबरांच्या वेळी स्पीकर होते का ? नाही ना ? बंद करा भोंगे 🚫

गणपतीत डी.जे. वाजवण्याचे प्रयोजन काय ? ह्याला बाहेर काढा रे सभेतून. ✅

आता आपापले कॉन्फर्मेशनल बायसेस घेऊन जनता सहाणेवर चंदन घासावे तसे घासत बसणार. बापट कांग्रेसी, डावे, लिब्रांडू घोषित होणे तर "पाकसिद्धी अगोदर हात धुवून घ्या" इतपत बेसिक झाले आहे. 

पुढे पुढे बापट, विद्यानंद बापट हे जॉर्ज सोरोसचे आते चुलत पुतणे असल्याचे पण जावईशोध लागतील अन् मास्टरस्ट्रोक जनतेत प्रसिद्ध पण होतील. 

टीप - खूप प्रदूषण पसरते म्हणून सरकारने २ - स्ट्रोक गाड्या बॅन केल्या आहेत तसे मास्टर - स्ट्रोक जनतेला सुद्धा करायला हवे वैचारिक प्रदूषण कमी करायला (हे आपले उगाच आमचे शाब्दिक कोटीक्रम हौस पुरवून घेणे झाले, कॅन्सल कल्चर आमचे नाही मास्टरस्ट्रोक वाल्यांचेच बरे 🤣🤣)


विद्यानंद बापटांना संपुर्ण पाठिंबा.

मागील वर्षी, मटा ने नागरिकांकडून डिजे वर, प्रतिबंध लावावा अथवा कसे यावर  महिनाभर  प्रतिक्रिया मागवल्या होत्या. 

या वर्षी, पोलीस प्रमुखांनी मिटर घेऊन काहीतरी मिटींग घेतल्याची बातमी वाचली होती.

सर्व प्रशासन डीजे माफिया समोर हतबल दिसतेय. बहिरे अंधळे झाले तरी चालतील पण डीजे हवाच.

डी जे ,लेझर,ढोलताशे हे पैसा कमावण्याचे साधन झाले आहे. एक तास ढोल बडवण्याचे पस्तीस, चाळीस, पन्नास हजार  रूपये घेतात. सन २०१३ मधे सोसायटीत डी जे आणा म्हणून  माझ्यावर  दबाव आणला होता. तेंव्हा विस हजार  रूपये मोजून दिले आणी सोसायटीतील इतर सदस्यांनी मला विस लाख शिव्या दिल्या. माझ्यावर आलेल्या दबाबाला सशक्त पणे तोंड देता न आल्यामुळे सदस्यांची बिनशर्त माफी मागीतली.

 

डी जे,लेझर,ढोलताशे बैलपोळ्याला सुद्धा आणतात. 

 

आंबेडकर जयंती,शिवजयंती वर्षातून दोन वेळा,गणेशोत्सव, गुंठामंत्र्यांची घरातली हळद,लग्न,बारसे इत्यादीं साठी डी जे लावतात.

 

डी जे के धडकने से खडकती है खिडकियां 

खिडकियौंके खडकनेसे दुबकता है खडकसिं

 

 


In reply to by कर्नलतपस्वी

कुणालाच आवडत नाही तर का आणला जातो ? उपरोधाने नाही विचारत प्रामाणिक प्रश्न आहे. 


In reply to by साहना

 मुळात ह्या विषयाच्या खोलात जाणे महत्वाचे वाटते. एकंदरीत ब्रॉडर हिंदू ट्रेडिशन पाहता "वाद्य" हा एक अविभाज्य घटक आहे धार्मिक कर्मकांडांतील (ती उपयोजित/ कामाची असतीलच असे नाही) 

पुराणांत "आणि देवाचा आगमनासोबतच दैवी वाद्यांचा गजर झाला"

"शंखनाद"

इत्यादी references पहायला मिळतात 

ऐतिहासिक दृष्ट्या

शिवाजी महाराजांच्या काळात पण शिकार करून येता किंवा मोहिमेवरून परतताना 

"गावकऱ्यांनी करडी लेझीम/ताशा" लावला असे रेफरन्सेस सापडतात. 

मी आत्ता चाळीस क्रॉस केलेला माणूस, मला माझ्या लहानपणाची आठवण म्हणजे गणपतीत अगडबंब ढोल नाहीत किंवा ऑफिसात सुट्ट्या टाकून ते बडवणारी पोरे पोरी नाहीत तर प्रॉपर लेझीम, ताशा, वऱ्हाडी दिंडी (विदर्भात चालणारा एक छोट्या ढोल, टिमक्या आणि पिलमपोया नावाच्या बासरीचा वाद्यसंच) इत्यादी आहेत.

 एकेकाळी गणेश मंडळांत VCR वर सिनेमे दाखवायची competition लागत असे आता डी.जे. च्या भिंतींची आहे. 

नमनाला घडाभर तेलाचे प्रयोजन असे की उत्सवप्रियता हा भारतीय माणसाचा व्यवच्छेदक गुण + मॉब/समूहाचा सब झीरो आयक्यू एकत्र केला तर जे काही होते ते म्हणजे ही कानठळ्या बसवणारी विकृती होय. डी.जे. किंवा ढोल पथके हा प्रॉब्लेम सोडवण्याचा एक उपाय म्हणजे थोडेसे relegate करणे तरुणाईला अन् थोडेसे delegate करणे. ही पोरे लॉजिकला रिस्पॉन्स देतात हे आपण कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनात बघितले आहे त्यामुळे एखाद्या केस मधे ह्यांना

"तू मूर्ख आहेस"

असे म्हणण्यापेक्षा

"असे केल्यास तू मूर्ख म्हणवला जाऊ शकतो"  ह्या पद्धतीने हॅण्डल करून सांगितल्यास जास्त उत्तम समजू शकते असे वाटते


यात अर्थकारण आहे जे मुख्य कारण. 

डिजे,ढोलताशे पथक लेझर यांची मालकी नेते,दाद लोकांची.  फंडिग कोण करणार  हेच. मलिदा कोण खाणार  हेच.

 

विचार करा, दोन महिने ढोलताशे सराव  सरासरी तीन ते चार तास.  कोण करतात, त्यांना मानधन काय मिळते.. एवढा वेळ त्यांच्याकडे कोठून येतो...हे पारंपारिक वाद्य मग एवढ्या सरावाची गरज आसते का? भर वस्ती मधे सराव  चालतो. त्याचा जनतेला होणारा त्रास  कुणालाच समजत नाही का?

अशा अनेक सेल्फ एक्सप्लनेटरी प्रश्न प्रशासनाला माहित असूनही कारवाई करता येत नाही. 

 अशा मुद्यानां धार्मिक रंग दिला जातो. जो याला विरोध  करतो तो धर्मबुडव्या समजला जातो.

 

आमच्या लहानपणी ढोलताशे होते आणी धर्मस्थळावर  लाऊडस्पीकरही होते. 


In reply to by कर्नलतपस्वी

विचार करा, दोन महिने ढोलताशे सराव  सरासरी तीन ते चार तास.  कोण करतात, त्यांना मानधन काय मिळते.. एवढा वेळ त्यांच्याकडे कोठून येतो...हे पारंपारिक वाद्य मग एवढ्या सरावाची गरज आसते का?

 

वाजविणाऱ्यांना शून्य मानधन मिळते. पथकात येण्यासाठी प्रवेश शुल्क त्यांना द्यावे लागते. वाजविणाऱ्या पथकाच्या मालकाला मंडळाकडून भरभक्कम शुल्क मिळते. त्यातील एक दिडकी सुद्धा तो वाजविणाऱ्यांना देत नाही कारण वाजविणे हा वाजविणाऱ्यांचा छंद आहे व तो छंद पुरविण्याची संधी तो मालक त्यांना देतो. 

 

ढोल वाजविणे म्हणजे तबला, मृदंग वाजविणे नाही. ही तालवाद्ये बऱ्यापैकी वाढविण्यासाठी अनेक वर्षांचे शिक्षण व सराव करावा लागतो. या तालवाद्यांसाठी अनेक ताल शिकावे लागतात. पूर्ण मात्रा, अर्धमात्रा शिकाव्या लागतात.

 

त्या तुलनेत ढोल वाजविणे अत्यंत सोपे आहे. त्यात ताल असे फारसे नसतात. कोणीही काही दिवसांच्या सरावाने व्यवस्थित वाजवू शकतो. त्यासाठी दोन तीन महिने रोज ५-६ तास सरावाची अजिबात आवश्यकता नाही.

 

तरूण मुले मुली ढोल पथकात जातात त्यामागे एक मुख्य उद्देश म्हणजे हा डेटिंग जॉईंट असतो.‌ मुलामुलींची ओळख होऊन त्यातून संबंध वाढू शकतात. 

 

ते सोडले तर ढोलवादनाचा अतिरेक झाला असून हा गंभीर स्वरूपाचा उपद्रव आहे हे नक्की. 

 

डिजे असो वा ढोलपथक वा वाद्यवृंद वा फटाके  .   .   .  रस्त्यावर वाजणारे हे सर्वच प्रकार उपद्रव आहेत.

 

दुर्दैवाने अत्यंत बोटचेपे, कणाहीन, जनवरोधी  सरकार असल्याने नागरिकांनीच आपली सर्जनशीलता वाढवायला हवी. 


In reply to by श्रीगुरुजी

ढोल ताशा वाजवणारी मंडळी मुख्यत: हौशी कलाकार असतात आणि छंद म्हणुन वाजवतात, त्यात मानधन वगैरे नसतेच उलट खिशातुन खर्च करावा लागतो. मंडळाला काय कमाई होते माहीत नाही पण बक्कळ होत असणार.

प्रत्येक मंडळ हे भावी राजकीय नेत्यांची इन्क्युबेटर आहेत. सध्याचे नेते शक्ती प्रदर्शन म्हणुन आणि भावी नेते सराव म्हणुन ईथे असतात. जसे अभाविप किवा युवक कॉग्रेस हे त्या त्या पक्षाचे ईन्क्युबेटर आहेत.

 

मूळ मुद्दा धर्म परंपरा हा नसुन वाढती बेरोजगारी, कार्यकर्ते मिळवण्याची गरज आणि त्यातुन शक्ती प्रदर्शन, त्यातुन आपापली हद्द ठरवणे थोडक्यात बिझनेस वाढवणे हा आहे. याच्याशी संबंधित माझा लेख

 

ढोल ताशा पथके की वेठबिगारी ? | मिसळपाव


In reply to by राजेंद्र मेहेंदळे

>> मूळ मुद्दा धर्म परंपरा हा नसुन वाढती बेरोजगारी, कार्यकर्ते मिळवण्याची गरज आणि त्यातुन शक्ती प्रदर्शन, त्यातुन आपापली हद्द ठरवणे थोडक्यात बिझनेस वाढवणे हा आहे.

खरे तर पथकात जाणारे तरूण बहुधा बेकार किंवा कुठेतरी छोटे मोठे काम करणारे, थोडक्यात ज्यांचे करिअर अजून नीट मार्गी लागले नाही असे असतात. अशा परिस्थितीत आपल्याला काहीही महत्त्व नाही, माझी कुणाला गरज नाही असे वैफल्य वाटत असते. त्याला वाट करून देण्यासाठी कुठेतरी महत्त्व मिळवून देण्याचा मार्ग म्हणून ही मुले यात सामील होत असावीत. ती खरोखर धार्मिक असतात असे वाटत नाही.

तुमचा धागा आठवतो. त्यावेळी कलात्मक वादन कसे असू शकते म्हणून मी एक धागा काढला होता:
सांगलीचे कर्णमधूर लेझीम


In reply to by स्वधर्म

लेझमीत तालबद्ध  नाचाला वाव असूनही या प्रकाराला तितकासा लोकप्रतिसाद का मिळत नाही ते कळत नाही. कदाचित त्यातून पुरेसं ध्वनिप्रदूषण होत नाही हे कारण असावं! 


गणेश मंडळे आहेत.  कमीत कमी बजेट असलेले मंडळ लाऊडस्पीकर आणी मिरवणुकीत ढोलताशा हवाच असा प्रयत्न करते. 

वाद्यवृंद वादग्रस्त होतो आणी त्रासदायक वाटतो तेंव्हाच आवाज  उठतो. 


डीजे वाजवायचा तर सार्वजनिक सुटी द्या! अखिल

भरतोय ग्राहक पंचायतीचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

प्रती,
माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री, 
महाराष्ट्र राज्य, 
मंत्रालय, मुंबई 400032.

*विषय: गणेश उत्सव आणि इतर सर्व सण वार ज्यात डी जे वाजवणे साठी परवानगी दिली जाते त्या सर्व दिवसांमध्ये सर्व राज्यातील मोठ्या शहरांमध्ये पगारी सरकारी सुट्टी जाहीर करणे बाबत.*

महोदय,
आपण महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय गृहमंत्री आणि मुख्य मंत्री आहात. आपल्या आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या  चांगल्या कामामुळे पुणे आणि इतर ठिकाणी भाजपची सत्ता महानगर पालिका मधे आली आहे. सर्व नागरिकांनी आपल्या वर विश्वास ठेवून कायद्याचे राज्य असावे म्हणून आपणास निवडून दिले आहे.

परंतु दुर्दैवाने दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे महानगर पालिकेमध्ये पुण्याच्या महापौर सौ मंजुषा नागपुरे, पुणे शहर भाजप अध्यक्ष श्री धीरज घाटे, पुणेचे सह पोलिस कमिशनर आणि पुणे महानगर पालिकेचे आयुक्त श्री नवल किशोर राम हे सर्व महानगर पालिकेत उपस्थित असताना गणेश उत्सव बाबत सभेत एक पुणेकर नागरिक ज्यांनी अनिर्बंध डी जे वाजवण्याबाबत आक्षेप घेतला असता  त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.

सदर सभेत आपल्या काही लोकांनी दर्पोक्ती केली की ज्या पुणेकर नागरिकांना डी जे चा त्रास होतो त्यांनी पुण्याच्या बाहेर जाऊन राहावे. शिवाय आपल्या महापौर सौ मंजुषा नागपुरे आणि पुणे शहर भाजपचे अध्यक्ष श्री धीरज घाटे यांनी कोणत्याही बंधनाच्या शिवाय गणपती उत्सव साजरा करतील आणि त्यामुळे मंडळाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही असे जाहीर  केले आहे. तर आपले पुणे महानगर पालिकेचे आयुक्त श्री नवल किशोर राम यांनी महापौर म्हणतील तसे सर्व होईल असे जाहीर केले.

महोदय, पुणे आणि सर्वच मोठ्या शहरात विविध उत्सवांमध्ये आवाजाची पातळी खूप वाढते, डी जे मुळे खूप लोकांना त्रास होतो त्यामुळे डी जे चे आवाजावर नियंत्रण असावे अशी माफक अपेक्षा सर्व नागरिक कायम व्यक्त करत असतात.

*महोदय, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भारतीय मजदुर संघ, पुणे रिटेल व्यापारी संघ, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण फेडरेशन, स्वामी समर्थ सोसायटी आणि वरिष्ठ नागरिक यांनी श्री अमितेश कुमार, पुणे पोलिस कमिशनर यांच्या विरुद्ध मुंबई हाय कोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे कारण मागील वर्षी झालेल्या विविध उत्सवांमध्ये डी जे मुळे ध्वनी प्रदूषण हे १०० डेसिबल पेक्षा जास्त झाले होते. सरकारने २००० साली मंजूर केलेल्या कायद्यानुसार ५० डेसिबल पेक्षा जास्त म्हणजे दुप्पट ध्वनी प्रदूषण झालेले आहे आणि पोलिस प्रशासन प्रमुख म्हणून श्री अमितेश कुमार यांची सर्व पुणेकर लोकांचे संरक्षण करणेची जबदारी असताना त्यांनी हे रोखण्यासाठी कोणतेही उपाय केले नाहीत.*
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, अण्णा भाऊ साठे जयंती असो, कोणत्याही मिरवणुका असो, ईद किंवा इतर धर्माच्या सणामध्ये डी जे मुळे खूप ध्वनी प्रदूषण होत आहे आणि त्यामुळे कित्येक लोकांना न भरून येणारा त्रास सहन करावा लागत आहे.

पुणे महानगर पालिका सभागृहात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या समोर आणि भाजप अध्यक्ष श्री धीरज घाटे यांच्या समोर मंडळाच्या लोकांनी सांगितले की ज्या नागरिकांना डी जे चा त्रास होतो त्यांनी पुण्याच्या बाहेर जाऊन राहावे त्यांचा खर्च आम्ही देऊ.

महोदय आपण राज्याचे प्रमुख आहात आणि राज्यात डी जे वाजवणे सुरूच राहणार असेल तर आपण डी जे वाजवायला परवानगी देता त्या दिवशी राज्यात सरकारी सुटी जाहीर करावी. त्यात सर्व राज्यातील सर्व केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालय, सर्व अर्ध सरकारी कार्यालय, सर्व बँका, सर्व खासगी कार्यालय,  सर्व दुकाने, सर्व शाळा आणि कॉलेज यांना कलेक्टरचे आदेशा नुसार पगारी सुट्टी जाहीर करावी. तसेच शहरात राहणाऱ्या सर्व लोकांची, (वयस्कर, तरुण, शाळेतील, कॉलेज मधील )  रहायची आणि खायची प्यायची सोय शहर सोडून इतरत्र करावी. हा सर्व खर्च मंडळाकडून वसूल करावा ( नागरिक जो कर भरतात त्यातून हा खर्च भरू नये ) 
आणि खुशाल डी जे वाजवायला परवानगी द्यावी ही विनंती. 
त्यामुळे आपले कार्यकर्ते खुश होतील, सर्व वयस्कर नागरिक देखील खुश होतील, सर्वांचे राजकीय अस्तित्व अबाधित राहील.

कळावे आपले विश्वासू


विजय सागर
विलास लेले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
६३४ सदाशिव पेठ, पुणे ४११०३०

 

*डी जे बाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची भूमिका*

https://youtu.be/T30JKodA8ZA?si=7YqRxH9NLttzPi6N


पुणेकर निरंतर जागरूक असल्याने आपापल्या परीने डीजे आणि तत्सम गोष्टींना विरोध करत आलेले आहेत. बापट अचानक केंद्रस्थानी कसे आले/ आणले गेले आणि त्यामागे नेमकी काय गोम आहे हे कालांतराने समजेलच. असो. 


कोणताही धर्म हा घरातच असला पाहिजे.

लष्करात अगदी मराठा लाईट इन्फन्ट्री च्या बटालियन मधील गणेशोत्सव कसा असतो. लोक स्वतः वर्गणी काढून श्री गणेशाची स्थानिक मंदिरात प्रस्थापना करतात. तेथे रोज सकाळ संध्याकाळ आरती होते. यासाठी पेटी तबला आणि झाँजा वाजवल्या जातात. तेथे लाऊड स्पीकर नसतोच. प्रसाद वाटला जातो लोक एकमेकांना भेटतात. त्यानंतर स्थानिक लोकांचे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.

शेवटच्या दिवशी मिरवणूक निघते ज्यात श्री मूर्ती "शक्तिमान ट्रक" मध्ये सजवून ठेवलेली असते बाकी सगळे पायी पायी श्री गणेशाच्या विसर्जनासाठी जवळच्या तलावात जातात. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषणात श्री गणेशाना निरोप दिला जातो.

मंदिरात गणेशोत्सव, दुर्गापूजा, जन्माष्टमी. बैसाखी (पंजाब रेजिमेंट) ओणम किंवा पोंगल (मद्रास रेजिमेंट) सारखे उत्सव साजरे होतात पण आरतीचा आवाज ५० मीटरच्या पलीकडे जात नाही.

युनिटच्या मशिदीत रमजान ईद किंवा चर्च मध्ये ख्रिसमस साजरा केला जातो.

जन्माष्टमी किंवा ख्रिसमस रात्री बारा वाजता साजरे केले जातात परंतु याचा आवाज बाहेर जाणार नाही याची कसून काळजी घेतली जाते.

मंदिरावर किंवा मशिदीवर बोम्बल्या( लाऊडस्पीकर) नसतोच

यापैकी कोणत्याही सणात डी जे किंवा लाऊडस्पीकर मुळे लोकांना त्रास होणार नाही याची खात्री असते.

नौदलाच्या रहिवासी भागात दिवाळी साजरी केली जाते तेंव्हा नौदलाच्या मैदानात जत्रा भरवली जाते तेथे विविध युनिट खाद्यपद्यदार्थांचे स्टॉल लावतात जेथे विविध खाद्यपदार्थ मूळ किमतीला विकले जातात. मुलान्साठी खेळणी पाळणे सारखे खेळ सुद्धा असतात. त्यानंतर नौदलाच्या खर्चाने लक्ष्मीपूजनाच्या रात्री आठ ते साडे आठ फटाक्यांची मोठ्या मैदानात आतषबाजी केली जाते.बाकी मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवायला बंदी असते.   एरिया किंवा कमांड कडूनच याचे पैसे दिले जातात त्यामुळे अत्यंत सुंदर अशी आतषबाजी पाहायला मिळते.

त्यानंतर लोक दहा पर्यंत खाणे पिणे आटोपून आपापल्या घरी जातात. रात्री अपरात्री फटके वाजवायला बंदी असते.

आपल्या सणामुळे कुणालाही उपद्रव होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते.

नागरी आयुष्यात आल्यावर याबद्दल काही बोलले तर लोक लष्करी माणसे एककल्ली (एक्सेंट्रिक) किंवा तिरसट असतात असा शिक्का मारतात.

चालायचंच.


In reply to by सुबोध खरे

पहिले एक डिस्क्लेमर टाकतो - जे काही मी बोलतोय ते सिव्हिलियन पर्सपेक्टीव मधून बोलतोय. 

आणि ह्या परस्पेक्टीव मधून बोलता तुम्ही दिलेली मराठा लाईट इन्फंट्री किंवा नोफ्रा/नौसेना बाग मधली उदाहरणे इथे टोटल गैरलागू आहेत. 

मी असे का म्हणतोय ते जरा उलगडून सांगतो. 

१. धागा विषयवस्तु - विद्यानंद बापट आणि त्यांची पुणे महापौरांनी बोलावलेल्या सभेला हजेरी लावणे आणि नॉट सो पॉप्युलर मत मांडणे. मला वाटते लोकशाहीवादी परंपरांना धरून "सण कसा साजरा करावा ?" ह्या विषयावर छावणीत पण मीटिंग होत असतील, असल्या तरी त्यात सी. ओ., त्याचा स्टाफ ऑफिसर किंवा बटालियनचा ॲडज्युडेंट मेजर, एस. एम. साब किंवा सिनियर मोस्ट जेसीओ फारतर अगदीच एखाद एन.सी.ओ . बोलावला (शक्यता धूसरच) तरीही, महापालिकेच्या सभेइतका कालवा शक्य नाही. 

२. दुसरे म्हणजे खरे साहेब, शिस्तीत जगण्यासाठी बेस/ बटालियन/ रेजिमेंटल सेंटर/ छावणीतील बहुसंख्य कर्ते स्त्री पुरुष ट्रेंड असतात. अगदी नवख्या लग्न होऊन आलेल्या पोरींना पण AWWA/NWWA/AFWWA असतात शिकवायला कसे वागायचे, बोलायचे ते सगळे. त्याशिवाय बेस मध्ये कमांडिंग ऑफिसरने एकदा फर्मान काढले की विषय संपतो त्यावर हरकती मागवणे इत्यादी नसते असे वाटते.

 ह्याची तुलना नाही होऊ शकत ह्या सिव्हिलियन एक्स्प्रेशन सोबत (तमाशा म्हणणार होतो पण मोह आवरला कारण आम्हा बिचाऱ्यांच्या आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार ? हे पण आहेच) म्हणून आपली उदाहरणे गैरलागू आहेत असे म्हणले आहे.

 

 बाकी, नागरी आयुष्यात आल्यावर याबद्दल काही बोलले तर लोक लष्करी माणसे एककल्ली (एक्सेंट्रिक) किंवा तिरसट असतात असा शिक्का मारतात 

कम ऑन डॉक्टर, असे एक्सेंट्रिक किंवा तिरसट म्हणणाऱ्या एकाच्या पाठी डिफेन्स फोर्सेस आणि पर्सनेलला पूजनीय मानून पेडिस्टल वर ठेवणारे किमान १०० असतात. शिस्तीमुळे तुम्हाला कोणी एक्सेंट्रिक म्हणणार नाही पण छावणीच्या आतील अन् बाहेरील आयुष्य तुलना केली की जी चिडचिड तुमची/ तुम्हा लोकांची होत असेल ती पाहून लोकांना असे वाटत असेल. टू वन हिज ओन टू डील विथ सर.

 

(पानसिंह तोमर) खोंडे


DJ हाच देव !! अशा प्रकारे मानसिकता असणारी लोकांच्या हाती गणेश उत्सव गेला आहे.सरकारही यावर काहीच कारवाही करण्याच्या मूड मध्ये नाही.तेव्हा बापट सारख्या सुज्ञ नागरिकाचे कौतुक होणारच.

हे मुद्दे आधी मांड्ले जात नव्हते का? तर हो आधीपासुन गणेश उत्सावात डीजे,वर्गणीची अरेरावी,दारु पत्ते अड्डा ,रस्त्यांची अड्वणुक इ.गलिच्छ गोष्टींनी शिरकाव केलेलाच आहे.

बापट का चमकत आहेत कारण ते बोलतात खुप तार्किक आणि अनेक उदाहरणे देतात.समोरच्याला फक्त वाईट पद्ध्तीने बोल लावत नाही तर त्यांचेही काही अधिकार मान्य करतात.पण ती चौकट अशी कालबाह्य आहे हेही सुनावतात.

खर म्हणजे यावेळी महाऱाष्ट्रात दुष्काळ आहे.तेव्हा काही मदत होइल का याकडे सार्वजनिक मंड्ळांनी कार्य करायला हवे.दरवर्षी असेच मोठे सामाजिक काम मंडळांनी केला तरच हा गणेश उत्सव सार्वजनिक करायची परवानगी द्यावी.

एक बापट ...लाख बापट!!

बापट यांच्यामुळे मीही मराठी शब्द जागरुकपणे अजुन वापरत आहे.खुप दिवसांनी अशी धो धो सुंदर मराठी ऐकुन कान धन्य झाले हेवेसांन!!


In reply to by Bhakti

अजुन एक मुद्दा ज्याने सार्वजनिक उत्सव केवळ धांगड्धिंगा उरलाय हे समजते.यावेळचा बत्तीस शिराळा नागपंचमी उत्सवात अत्यंत बिभित्सपद्ध्तीने बायका नाचवण्याचे प्रकार झाले,ती क्षणचित्रे पाहुन खुप खेद झाला.

काय ही डीजे कीड उत्सवांना लागली आहे 😡


In reply to by Bhakti

वार्ताहर: DJ ला पर्याय काय सुचवू शकता ?

बापट: मूर्खपणाला पर्याय नसतो. कॅन्सर ला पर्याय एड्स असू शकत नाही किंवा एड्स ला इबोला असू शकत नाही. 

 

माणूस पूर्णतः dehat-pilled आहे. 


पूर्वीचे डीजे व्यवस्थित वाजायचे! आता आत नवीन नवीन इक्विपमेंट फिट करतात त्यामुळे आवाज वाढतो.


सार्वजनिक (म्हणजे रस्ते अडवून होणारी नी रस्त्यावर मिरवणुका काढली जाणारी) गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र, आंबेडकर जयंती,  अण्णाभाऊ साठे जयंती, पैगंबर जयंती, होळी आंबे जांभळं करवंद सगळं काही बंद व्हावं! ज्यांना जास्त खाज असेल त्यानी हॉल वगैरे बुक करून तिथे गोंधळ घालावा. तुमचेसण तुमच्या घरी साजरे करा, रस्त्यावर सण साजरे करायला रस्ता काही तुमच्या बापाचा नाही असे धर्मियाना ठणकावून सांगायची वेळ आली आहे!

सार्वजनिक उत्सव बंद करा! 


ह्या ध्याग्याचा प्रिंट घेऊन मिपा मालकांनी फ्रेम करून लावावा कारण DJ आणि ढोल ताशे हे उपद्रव जास्त आहेत ह्यावर सर्वांचे एकमत होत आहे असे दिसून येत आहे.
 


गणपती मुर्तीना लावलेला रंग हे शेवटी एक विषारी रसायन आहे. कधी काळी रंग हे वनस्पती जन्य असावेत. आता काही तसे राहिले नाही. विसर्जनानंतर ते सगळे जर पिण्याच्या पाण्यात मिसळत असेल तर त्यालाही विरोध केला पाहिजे. कॄत्रिम विसर्जन करा आणि ते रसायनयुक्त पाणी कोठेही पिण्याच्या पाण्यात मिसळले जाणार नाही याची कडक व्यवस्था करा. आताचे विसर्जनाचे पाणी जर कुठे ओतायचे म्हणून पुन्हा नदीतच ओतत असतील तर त्याचा काही उपयोग नाही. 


In reply to by अकिलिज

तुंम्ही मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे. म्हणायला पर्यावणस्नेही म्हणून हौद वापरायचे, तेही अविघटनक्षम फायबरग्लासचे, आणि जर त्यातले पाणी पुन्हा नदीतच सोडणार असले, तर सगळंच मुसळ केरात!

बाकी विसर्जनाबद्दल ऐकलेले:

टिळकांनी गणेशोत्सवाला लोकांचा उत्सव बनवले. त्यांनी घरातला गणपती बाहेर काढला तेंव्हा सनातनी रुढीवादी लोकांनी म्हणे विरोध केला होता. पण टिळकांना लोकांना एकत्र आणायचे होते. पण झाले असे की, कुठल्याही जातीपातीचे लोक मंडपात येऊ लागले व मूर्तीचे दर्शन वगैरे घेऊ लागले. हे मात्र रुढीवादी कर्मकांडी शिवाशिव पाळणाऱ्या लोकांना कदापि मान्य होण्यासारखे नव्हते. म्हणून मग त्या मूर्तीचे विसर्जन करावे असा 'मध्यम मार्ग' निघाला जेणेकरून घरात पुन्हा विटाळ येणार नाही. खरे खोटे तो गणपतीच जाणे.


In reply to by स्वधर्म

> म्हणून मग त्या मूर्तीचे विसर्जन करावे असा 'मध्यम मार्ग' निघाला

ऐकलेले

 

असल्या बातम्या कुठे बरे कानावर पडतात ?

समजा विसर्जन करायचे नसेल तर तर नक्की प्लॅन काय होता ? दर वर्षी नवीन गणपती आणून त्यांची सभा भरवायची ?

उगाच काहीही अफवा "ऐकलेले ते पसरवले" करायची गरज नाही. हल्ली AI आहे त्यामुळे ह्या "ऐकलेल्या" गोष्टी सहज तपासून पहिल्या जाऊ शकतात.

सार्वजनिक गणेशोत्सवाला कुणी कुणी विरोध केला.

- धर्मशास्त्री ब्राम्हण

त्यांच्या मते हे एक खाजगी कर्मकांड होते आणि ते सार्वजनिक करू नये.  सध्या बापट आणि इतर मंडळी जो मुद्दा मांडत आहेत तो हाच आहे. गणेशोत्सव हा खाजगी (सामूहिक असला तरी ) कायर्क्रम म्हणून साजरा करावा .

- सुधारक मंडळी (रानडे आगरकर इत्यादी)

ह्यामुळे हिंसा भडकेल असे त्यांचे म्हणणे होते.

- फुले  ह्यांची चळवळ

सार्वजनिक गणेशोत्सवाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या 'सत्यशोधक जलशां'ना शह देण्याचे काम केले. फुल्यांच्या चळवळीने ब्राह्मणी वर्चस्व आणि जातीय उतरंडीला आव्हान दिले असताना, ब्रिटिशांविरोधात "हिंदू एकता" प्रस्थापित करण्याचे गणेशोत्सव हे एक साधन बनले. [१]

 

- https://mumbaimirror.indiatimes.com/opinion/a-complex-origin-story/arti…


In reply to by अकिलिज

ह्यानी इंग्लंडची नदीही सोडली नाही खराब करायला.


In reply to by अकिलिज

पुण्यात विसर्जन कुठे आणि कसे केले जाते ? रंग काय असावेत ह्यावर काही नियम आहेत कि नाहीत ? 

 


डाव्या लोकांचे एक वैशिष्ट्य असतं. कामे  सगळी डावी असतात, दाखवायला ओळखी मात्र काही वेळ उजव्या असतात! 

 

१. जंतरमंतरवरील निर्भय जेन झी नंतर असे एक एक निर्भय लोक समोर येत आहेत. कुठे ना कुठे अनेक नागरिक त्यांना पाठिंबा देत आहेत. 

ऑगस्ट २०२६ पूर्वीपर्यंत भारतभरातले तरुण लोक सगळे निपचित पडले होते जणू! नंतर अचानक सगळे जागे झाले आणि कुणाला ना कुणाला पाठिंबा देऊ लागले! किती मोठा हा चमत्कार! 

 

२. म्हणून मग त्या मूर्तीचे विसर्जन करावे असा 'मध्यम मार्ग' निघाला जेणेकरून घरात पुन्हा विटाळ येणार नाही.

हिंदू धर्मात पार्थिव मूर्ती नामक काही संकल्पनाच नसते जणू! काहीही करून सनातन हिंदू धर्मीय म्हणजे अक्कलशून्य मानवताविरोधीच, नाही का? 

 


In reply to by कांदा लिंबू

बाकी, इतर सगळ्याच सार्वजनिक कार्यक्रमांप्रमाणेच, श्री गणेशोत्सवाचे उत्सव स्वरूप कमालीचे रसातळाला गेले आहे यात काही वाद नाही. पण ह्याचे निमित्त करून सर्वश्रेष्ठ हिंदू धर्मावर जर कुणी दुगाण्या झाडण्याचा प्रयत्न करत असेल तर तसल्या डावखुऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यायलाच हवी.


In reply to by कांदा लिंबू

तू पडतो भावूक त्यात रडवून जातोस तरीही शेवटी काय होते तुला लोक फोडून खातात ना भाई ! असे करू नको ! तू भावा गंगा उलटी वाहवलीस अन् मुद्दे सोडून माणसे बडवू लागलास की रे ! 

एक मैत्रीपूर्ण सल्ला, विसर्जनाचे जे काही त्यांनी लिहिलेले आहे त्याचा विदा माग पाहू, देतील ते, तुझ्याकडे विरोधात काही विदा असला तर तो मांड. दोन्हीतून जे काही ज्याला वाटेल ते ते उचलू दे, 

चर्चासत्राला स्लग फेस्ट केल्याचा आरोप बसतो नाहीतर उजव्यांच्या माथी, I hope तुला ह्या पापाचे भागीदार होण्यात रस नसेलच. 

कळावे परी बारीक होऊनी मिसळीत मेळावे

 

(अध्यक्ष, मिसळपाव डावे उजवे लवाद) 

खोंडे


In reply to by कांदा लिंबू

>> हिंदू धर्मात पार्थिव मूर्ती नामक काही संकल्पनाच नसते जणू! 

मलाही संदर्भ शोधले असता मिळाले नव्हते म्हणूनच मी 'ऐकलेले' व 'खरे खोटे गणपतीच जाणे' असे लिहिले होते. हिंदू धर्मात पार्थिव मूर्ती असते याची माहिती दिल्याबद्दल आभार. कोणत्याही पूजेची उत्तरपूजा असते व निर्माल्य नदीत सोडतात हे माहिती होते. नवीन माहिती मिळाल्यावर आपली मतेदुरूस्त करण्याचे औदार्य सर्वांनीच दाखवायला पाहिजे. खोंडे साहेब म्हणतात तसे तुंम्हाला जर अधिक काही अधिकृत संदर्भ मिळाले तर जरूर शेअर करा.


In reply to by कांदा लिंबू

विटाळ प्रकरणात तथ्य वाटण्याचे कारण असे होते की...

१८९२ ला गणेशोत्सवाची व विसर्जन मिरवणूकीने विसर्जनाची सुरूवात झाल्याच्या वेळी निश्चितपणे समाजातील दलित व अस्पृश्यांना मंदीरात प्रवेशच नव्हता तर मूर्तीचे दर्शन घेण्याचा प्रश्नच नव्हता. याचा आधार असा की 

- आंबेडकरांनी काळाराम मंदीरात प्रवेशासाठी आंदोलन केले होते.

- स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षांनी साने गुरूजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदीरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी उपोषण केले होते.

- त्या पूर्वी संत चोखामेळा यांनी गाभाऱ्याशी कैसे येऊ आंम्ही जातीहीन अस अभंग लिहिला होता. जिंतेंद्र अभिषेकींनी अतिशय सुरेल गायला आहे.

त्यामुळे मूर्तीला विटाळ होत होता यात कसलीच शंका नाही. म्हणून ऐकलेल्यात तथ्य असावे असे वाटले होते. पण मी आधीच सांगितले आहे की तुंंम्ही जर अधिक संदर्भ दिले तर ऐकीव गोष्टीवरून बनलेले मत दुरूस्त करायला काहीच अडचण नाही. 

 


In reply to by स्वधर्म

जसे सतीप्रथा नव्हतीच असे काही जण ऊर बडवत सांगत होते, तसे विटाळही नव्हताच सांगतील, धन्यवाद माहितीबद्दल! 


मुळात बापट हे स्वतः ला डावे आणि नास्तिक समजतात. परंतु त्याची विचारसरणी पाहिली तर ती बुद्धीप्रामाण्यवादी आहे, जी चार्वाक दर्शनाच्या जवळ जाणारी आहे‌. त्याउलट डिजे समर्थकांच्या कडे कोणतीही वैचारिक मांडणी नाही. हिंदू धर्म आणि परंपरेच्या आडुन त्यांना स्वतःचा उन्माद आणि दहशतवाद किंवा जमिनविक्याभाईगिरी रेटायची आहे‌. बापट ज्या तार्किक युक्तिवादाने आपलं मत मांडत आहेत ते पाहता हतबल डिजे समर्थक दाभोळकर शैलीत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असे वाटते.

 

तळटीप - आणखी एक उपद्व्यापी पुणेकर संतोष पंडित यांच्या वर चद्रकांत पाटील  आणि गोपिचंद प्रकणात  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,


In reply to by भीमराव

काल रात्री १ वाजता पंडितांना अटकही झाली आहे.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

अतिशय कर्कश्य पुणेरी बॅटमॅन अटक झाला ते बरे झाले. स्वतः पिवळ्या पट्टीबाहेर पार्क असणाऱ्या गाड्यांवर, व्हीआयपी कल्चर वर बोंबाबोंब करायची अन् हेल्मेट सारखे जीव वाचवणारे साधन वापरणार नाही म्हणून अडून बसायचे ह्यातच त्यांचा दांभिकपणा उजागर होतो.


In reply to by वृषभ खोंडे

पुण्यात हेल्मेटसक्ती नाही! आणी ही पळवाट असू शकत नाही.


लेख चांगला आहे पण थोडा खटकला, फक्त पुरोगामीच मराठीला विरोध करताहेत असे म्हटले आहे, पण मुळात मला तरी पुरोगामी नी मनुवादी दोन्हीही मराठीला विरोध करताना दिसतात, हिंदी लादणारे सध्याचे महाराष्ट्रातील सरकार तर पुरोगामीही नाही. 

  बाकी तामिळ, गुजराथी, मारवाडी, बंगाली जे इथे पैसे कमवायला आले ते सगळे मराठी शिकले. मराठी नोलणार नाही हिंदीतच बोलेन हा माज फक्त गोबरपट्यातील हिंदी भाषिक दाखवतात. वर कुणीतरी म्हटले आहे सगळ्या भाषा शिकणार का जिकडे तिकडे गेल्यावर, तुम्हाला पैसे कमवायला नवीन स्किल्स शिकता येतात मग भाषेनेच काय घोडे मारले आहे? मी स्वत थिडेफार तमिळ नि बंगाली बोलू शकतो कामचलाऊ, आम्ही ना, जल खाबे वगैरे तसेच तमिळ तेरीयाद, एपडी इर्किंगा, येन माडदे वगैरे. इतके बोलले तरी स्थानिक खुश होतात. पण मराठी म्हणजे पाकिस्तानची भाषा आहे असा ह्या गायपट्यातील हिंदी भाषकांचा आविर्भाव असतो. अर्थात आपलेच काही मूर्ख मराठी लोक चहा पेक्षा किटली गरम होऊन मराठीला विरोध करतात.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

अ.बा. हा लेख मराठी हिंदी विरोधाबाबत नव्हता. तुंम्ही चुकीच्या जागी तर प्रतिसाद टाकला नाही ना?


आम्ही मागील अनेक वर्षांपासून घराच्या प्रांगणात एका मोठ्या प्लास्टिक रांजणात श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करतो. साधारणपणे २४ तासांनंतर विलग झाली शाडूमाती व पाणी रोपांच्या मुळाशी टाकतो.

 

महापालिकेच्या हौदात विसर्जन करण्यात काहीही अर्थ नाही. तो हौद आधीच्या विसर्जित केलेल्या मूर्तींनी तुडुंब भरलेला असतो. तुमची पाठ वाळल्यानंतर तुम्ही विसर्जन केलेली मूर्ती बाहेर काढून ठेवतात व नंतर त्या मूर्तींचे काय करतात हे कोणालाच माहिती नाही. 

 

अंनिसचे काही जण श्रीगणेश विसर्जनाच्या दिवशी नदीतीरावर 

मूर्ती दान करा असे फलक घेऊन उभे असतात. ते दान दिलेल्या मूर्ती वापरात नसलेल्या खाणीत साठलेल्या पाण्यात विसर्जन करतात असे सांगतात. काही वर्षांपूर्वी अंनिसने जमा केलेल्या मूर्ती एका खोलीत कश्या ठेवल्या आहेत याचे प्रकाशचित्र प्रसिद्ध केले होते. अनेक मूर्ती भग्नावस्थेत होत्या. 

 

मला तरी मूर्ती घरच्या घरी प्लास्टिक रांजणात विसर्जित करणे हा सद्यपरिस्थितीत योग्य पर्याय वाटतो. अजून एक पर्याय म्हणजे एक कायमस्वरूपी पंचधातूची मूर्ती आणणे व दरवर्षी विसर्जित करून पुढील वर्षी पुनर्प्रतिष्ठापना करणे. 


विद्यानंद बापट यांना बेदम मारहाण
गणेश उत्सवात डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या आणि अल्पावधीतच प्रसिद्धीत आलेल्या विद्यानंद बापट यांना टिळक रोडवरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे.  काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना काही व्यक्तींनी त्यांना मारहाण केली आहे.

ही आपली लायकी.... महाराष्ट्र बदलत आहे. मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक झाली की नाही अद्याप समजले नाही.


In reply to by Bhakti

देवाभौंच्या मर्जीत येण्यासाठी एखाद्याला बेदम मारणे हा  सक्तीचा निकष आहे. 


विद्यानंद बापटांना मारहाण झाली. मारहाण करणाऱ्याला आपल्यावर कारवाई होण्याची अजिबात भीति नाही.‌

 

मदन शर्मा, अनंत करमुसे यांना मारहाण करणारे अजूनही मोकाट आहेत. बापटांना मारहाण करणारा सुद्धा मोकाट राहणार.

 

'खलरक्षणाय सदनिग्रहणाय' या घटनेतील तत्वाचे निष्ठापूर्वक पालन करणाऱ्या आपल्या कणाहीन व निष्क्रिय गृहमंत्र्याचे हा्दिक  अभिनंदन आणि गुंडांच्या पाठीशी सातत्याने  खंबीरपणे उभे राहण्यासाठी धन्यवाद!


In reply to by श्रीगुरुजी

कर्णपटले विद्ध होतील अशी ध्वनिनिर्मिती करणे, नेत्रपटलांच्या प्रकाशसंवेदना नष्ट होतील असे प्रकाश किरण प्रसारित करणे व माझ्या या उत्सवी महत्कार्याच्या विरोधात जे जे उभे राहतील त्यांना आडवे करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच.


In reply to by श्रीगुरुजी

गुरूजी मा. मुख्यमंत्री हे अगदी त्यांच्या पक्षाला हवं तस्सं काम करत आहेत. योग्य वेळी नरो वा कुंजरो करून त्यांनी ते अप्रत्यक्षपणे कोणाच्या पाठीशी उभे आहेत हे सूचित केलेले आहे. तुमच्या आवडत्या पक्षाचा अजेंडाच ते पुढे नेत आहेत. केंद्र सरकारने नाही का जंतर मंतर वर असेच मुलांना मारहाण केली? ऑलिंपिक विजेत्या कुस्तीगीर मुलींना नाही का फरपटत नेलं? मग आत्ताच विरोध का?


कृपया मारहाण झाली म्हणू नये, महाराष्ट्राची बदनामी होते. हे दिमागी नक्षला्यांनी घडवलेले कारस्थान आहे. अध्यक्ष महोदय आणि म्हणोन. लोकांनी यावर विश्वास ठेऊ नये.


In reply to by भीमराव

या प्रकाराची चौकशी करण्यासाठी लवकरच एक त्रिसदस्यीय समिती नेमली जाईल. संपला विषय. 


विद्यानंद बापटांवर हल्ला करणारा संतोष चव्हाण पोलिसांच्या ताब्यांत आला आहे : https://www.youtube.com/watch?v=t3GIukm12Og

 

बापटांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची खुद्द अमितेशकुमारांनी ग्वाही दिली आहे. 

 

-गा.पै.


मारहाण करणारे कार्यकर्ते (?) असेच वागणार. हे अपेक्षितच होते. बापट यांना याबाबत जेंव्हा विचारले तेंव्हा त्यांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला युध्दाच्या वेळी जो उपदेश केला तो संस्कृत श्लोक उधृत केला होता. त्यात श्रीकृष्ण म्हणतो युध्दात जय झाला तर पृथ्वीचे साम्राज्य भोगशील व मेलास तर स्वर्गात जाशील त्यामुळे युध्द करणे हाच मार्ग आहे. आता बापट नरमतील की नाही हे दिसेल पण गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांच्या कृतीमुळे दोन गोष्टी झाल्या:

- धर्माचा पगडा असलेल्या असल्या कार्यकर्त्यांमुळे हिंदू धर्माची विनाकारण बदनामी झाली.

- कुंपणावर बसलेले लोक अधिकच बापटांच्या बाजूला येतील.


पूर्वी टिळकांनी समाजप्रबोधनासाठी आणि एकजुटीसाठी उत्सव सुरू केला, आज तो गल्लीबोळातील दादांच्या शक्तीप्रदर्शनाचा आणि डीजेच्या दणदणाटाचा इव्हेंट झालाय. अशा वातावरणात बापटांसारखा माणूस तर्काची भाषा बोलतोय म्हणूनच अनेकांची भंबेरी उडाली आहे. "काळं कुत्रंही विचारत नाही" म्हणणाऱ्यांनाच आज प्रत्येक टीव्ही डिबेटमध्ये बापटांना उत्तरं द्यायला पळापळ करावी लागतेय, यातच बापटांचा अर्धा विजय झाला आहे!


आवाज प्रदूषण हा खरं तर पक्षीय प्रश्न नसून तो सामान्य माणसांच्या शांततेत जगण्याच्या मूलभूत अधिकाराचा आहे.

दुर्दैवाने मूलभूत अधिकारावर वाजवी नियंत्रण नक्की किती याचे निकष नाहीत. (fundamental rights and reasonable restriction).

बऱ्याच वेळेस न्यायालयांनी घालून दिलेले निर्बंध सर्रास पायदळी तुडवले जातात.

मतांसाठी राजकारण असल्यामुळे सर्वच पक्ष आणि त्यांचे अनुयायी याला पक्षीय दृष्टिकोनातूनच पाहतात.

याशिवाय यात विविध तर्हेचे आर्थिक संबंध गुंतलेले असतात यामुळे सामान्य माणसाची कुचंबणा होत राहते.

गणेशोत्सवाचा मूळ हेतू काय याचे चर्वित चर्वण सर्वत्र झालेले आहे.

जोवर सामान्य माणसे राजकीय पक्षांना स्पष्ट शब्दात सांगत नाहीत कि यावर्षी गणेशोत्सवात डी जे वाजले तर पुढची निवडणूक तुम्हाला महाग जाईल तोवर यात बदल होणार नाही.

आता श्री बापट याना पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे याना सामान्य माणसांच्या त्रासाशी काहीही घेणेदेणे नाही.

त्यांना आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.

साधी सरळ सूचना- डी जे चा आवाज ८५ डेसिबलच्या पर गेला तर १०,००० रुपये दंड,

१०० डेसीबेलच्या वर गेला तर एक लाख रुपये दंड

आणि

१२० डेसीबेलच्या वर गेला तर डी जे चालवणाऱ्यांना सहा महिने तुरुंगवास आणि त्या मन्डळाला गणेशोत्सवासाठी कायमची बंदी.

हे ड्रोनच्या साहाय्याने पोलिसांना सहज पडताळता येईल. द्रुतगती मार्गावर असलेल्या कॅमेर्यांसारखे लक्ष ठेवून पोलिसाना असे करणे सहज शक्य आहे.

पण राजकीय इच्छाशक्ती असेल तर.

सहज संदर्भासाठीआवाजाची पातळी

60 dB: Normal conversation or a standard dishwasher.

70–80 dB: A running vacuum cleaner, busy city traffic, or a noisy restaurant (safe for continuous exposure under 70 dB).

85–90 dB: A power lawn mower, blender, or heavy traffic (prolonged exposure above 85 dB can harm hearing).100–110 dB: Motorcycle, nightclub, or sporting event.

120–140 dB: Thunder, a live rock concert, or a jet plane taking off (considered the threshold of pain and immediate risk)      


डाॅ सिद्धांत गांधी,हृदयविकार तज्ञ..सोलापूर यांनी डी जे चे होणारे दुष्परिणाम अतिशय सोप्या शब्दात ए बी पी माझावर सांगीतले.

 

सोलापूर मधील डाॅ नी पुढाकार घेऊन उत्सव डि जे मुक्त  केले आहेत.

 

नागपूर  मधे पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी दोन महिन्यासाठी डि जे ,लेझर बंदी लागू केली आहे.

कोल्हापूर  आयुक्तांनी डी जे ला परवानगी मिळेल पण तुमच्या वरिष्ठांना  डि जे जवळ बसवा असे म्हणल्याचे वाचले,ख खो दे जा.

 

डाॅ खरे यांनी जे प्रतिसादले आहे तेच डाॅ गांधी यांनी सागीतले.


आजवर ध्वनिप्रदूषणाच्या अतिरेकाने काही मृत्यू झाले आहेत. ध्वनिप्रदूषण करणाऱ्याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा किंवा एक लाख रुपये दंड अशी शिक्षा आहे अशी माहिती मिळते. आजवर या गु्न्ह्यासाठी एका तरी माणसाला ही तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे का? आणि यात नेमके कोण कोण आरोपी म्हणून धरले जातात? जर जरब बसेल अशी शिक्षा होतच नसेल तर मग अस  गुन्हा करताना संबंधित कशाला कचरतील? सर्लवपक्षीय नेते संरक्षण द्यायला नेहमीच सिद्ध असतात हे तर आपण पाहतोच.


In reply to by रामचंद्र

विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर काही दिवसांनी काही मंडळांवर गुन्हा दाखल करतात आणि पुढील वर्षी गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व गुन्हे काढून टाकतात. अनेक दशके हेच सुरू आहे. 

 

गुन्हा घडत असताना पोलिस थंड असतात, तेव्हा गुन्हा थांबविण्याचा शष्प प्रयत्न करीत नाहीत आणि गुन्हा करून संपल्यानंतर काही दिवसांनी गुन्हा दाखल करण्याचे नाटक करतात. 


बापट बोलू लागल्याने ध्वनीप्रदुषण्ग्रस्त लोकांसमोर आशेचे किरण दिसू लागले आहेत. 

एक बालीश  & लोचट  यूट्यूबर बापटांना वारंवार उचकवण्याच्या प्रयत्न करतो  करतो आहे पण बापटांच्या तर्कबुद्धीपुढं त्याचा नाईलाज होऊन निरूत्तर होतोय ... 

https://www.youtube.com/watch?v=c0AavG1E2kw

 

बापट या माणसाचा प्रचंड अभ्यास आहे हे वाक्या गणिक जाणवत राहते. 

 

सलाम बापटांच्या अथक प्रयत्नांना, वक्तृत्वाला, वाचनाला, वक्तव्याला, वाचनाला,  ज्ञानाला & तर्कांना  _/\_ 


पुणे बदलत चाललय, एकेकाळी सुसंस्कृत मराठी शहर नी विचारवंतांची भूमी म्हणून पुण्याचा दबदबा होता, पुण्यातील विचारवंतांना सरकारे वचकून असायची. आता एक विचारवंताला रस्त्यावर मारहाण होते तर नागरी समस्येवर बोलणाऱ्याला रात्री उचलून नेले जाते. पुणे गुंठामंत्री नी गुंडांच्या ताब्यात जातेय, बोंबलायला ही सोय राहिलेली नाही कारण वरून खालपर्यंत पुणेकरांचे आवडतेच सरकार आहे.