आठवणींचा पाऊस: रसग्रहण

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
15 Jul 2022 - 12:54 pm

आठवणींचा पाऊस: रसग्रहण

सततचा पाऊस मनावर मळभ साचवतो. मनातील आठव वर येऊ लागतात. एकटेपण असेल एक उदाससवाणी छाया भर पावसात आपल्या आजूबाजूला तयार होते. ना कसले काम करवत ना काही घडते. आपले कुणी जवळ नसल्याची खंत अधीकच जाणवते.
रात्रभर पडणारा पाऊस अशा वेळी झोप घेऊ देत नाही. सतत आठवणींचे उमाळे फुटत असतात. उत्तररात्री कधीतरी डोळ्याला डोळा लागतो.

अशा वेळी कवी म्हणतो:

रात्रभर पडणारा पाऊस
सकाळी नकोसा होतो
कितीही हलका का असेना
जेव्हा सतत बरसतो

असा हा पाऊस कवीचा रात्रीचा सोबती असतो. पावसाचा आवाज त्याचे अस्तित्व दाखवून देत असतो. पडणार्‍या प्रत्येक थेंबागणीक गतकाळातील चित्र डोळ्यासमोर येत राहते.

सकाळ होते तेव्हाही पावसाची झड चालूच असते. उन्हं नसल्याने वातावरणात काळीमा असतो. हातात काहीच उद्देश नसल्याने काय करायचे हा प्रश्न असतो. कर, घे, खा, पी म्हणणारे हक्काचे कुणी नसते. शरीरधर्म म्हणून काहीतरी खावे लागते. पुन्हा पाऊस. पुन्हा आठवणी. पुन्हा रडगाणी. हा पाऊस नकोसा होतो. अंगण, आजूबाजूचे रस्ते यात पाणी साठलेले असते. वातावरण सर्द, थंड झालेले असते. आजारीपणाची लक्षणे अंगी भिनायला लागतात. मुसळधार पावसाने आता चांगलेच अंग धरलेले असते. सूर्यदेखील दिसत नसल्याने ढगांतल्या पाण्याच्या मेघांना जास्तीचे पाणी मिळते. ते जास्तीचे आभाळ फाडून आपल्या हातचे पाणी सोडून देतात. दिवस तर निघून जातो. उदासवाणी संध्याकाळ आज लवकरच अवतरते. रात्रीपूर्वीची संध्याकाळ अगदी पाऊसवाणी होऊन जाते. पुन्हा मनावर आठवणींचे किटण चढायला सुरूवात होते. तिकडे पावसाच्या पाण्याचा पूर तर मनात आठवणींचा पूर येत राहतो.

कवी पुढे म्हणतो:

संध्याकाळी उदास वातावरणात
मुसळधार कोसळतो
तेव्हा नको त्या आठवणींचा
पूर मात्र मनात येऊन जातो

मनातल्या आठवणींच्या पूरात आपणच वाहवत जातो. जुन्या आठवणी उगाळून फार काही हातात येत नाही याची जाणीव असते तरी देखील वातावरणाची साथ त्याला लाभून दुप्पट वेगाने त्या उमाळून येतात. आपल्या हातात काहीच नसते. आताश: रात्र वातावरणावर ताबा मिळवते. काळोखाच्या नकोशा खोलीत आठवणींचे कवडसे मनाला दिसतात. एका कवडशातून दुसरा कवडसा निघतो. दुसर्‍यातून तिसरा. मन तरी किती आवर घालणार? काळोखाची खोलीतर किती प्रचंड असते! अगदी कृष्णविवराइतकीही असू शकेल. आपण त्यात ओढले जातो. चुंबकाने लोहकीस ओढावा तसे. बाहेर पुराच्या पाण्याचा डोह तर येथे आठवणींच्या गर्ता. हतबल, शक्तीहीन झालेला त्यात वाहवत जातो.

अशा वेळी आपसूक ओळी बाहेर पडतात:

रात्र उदास जाण्याची चाहूल लागते
मग रात्रभरचा पाऊस नकोसा होतो.

पहिल्यांदा कवीला रात्रभर पडून सकाळी पुन्हा पडणारा पाऊस भेटतो. दिवसभर पावसाची साथ संगत करत राहणारा पाऊस कवीला संध्याकाळी पाऊस पुन्हा भेटतो तो रात्रीचीही साथ देण्याची तयारी ठेवून व पुन्हा दुसर्‍या दिवसाच्या पावसाची खात्री करूनच.

पाभे
१५/०७/२०२२

कविताजीवनमानप्रतिक्रियासमीक्षा

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

15 Jul 2022 - 3:59 pm | कुमार१

छान केलंय

पाषाणभेद's picture

15 Jul 2022 - 9:46 pm | पाषाणभेद

प्रयत्न अन प्रयोग केला.
आपली कविता इतरांना समजावी म्हणून.
तसेच वर जे लिहीले आहे ते कितपत लिहीण्याचा आवाका होऊ शकतो हे जोखण्यासाठी लिहीले.
या ग्रे शेड लेखनावर उतारा म्हणून याच विषयावर आनंददायी कविता अन लिखाण करायचे ठरवले पण राहिले.

आपणास धन्यवाद.

Nitin Palkar's picture

16 Jul 2022 - 6:30 pm | Nitin Palkar

आवडलं.

योगी९००'s picture

16 Jul 2022 - 8:36 pm | योगी९००

आवडलं..

रात्र उदास जाण्याची चाहूल लागते
मग रात्रभरचा पाऊस नकोसा होतो.
हे जास्त भावलं.

मुक्त विहारि's picture

16 Jul 2022 - 8:36 pm | मुक्त विहारि

आवडले

एक छत्री और हम है दो

असे असेल तर, पाऊस हवा हवासा वाटतो

लई भारी's picture

17 Jul 2022 - 2:38 pm | लई भारी

वेगळा प्रकार आवडला. तो आनंददायी 'उतारा' पण येऊ द्या :-)

चौथा कोनाडा's picture

17 Jul 2022 - 3:26 pm | चौथा कोनाडा

व्वा, छान लिहिलंय!

संध्याकाळी उदास वातावरणात
मुसळधार कोसळतो
तेव्हा नको त्या आठवणींचा
पूर मात्र मनात येऊन जातो

... सुरेख !

पाऊस हा असा काय काय घेऊन येऊन येतो, आणिक काय काय घेऊन जातो !

श्वेता व्यास's picture

18 Jul 2022 - 4:15 pm | श्वेता व्यास

छान लिहिलंय!

सुजित जाधव's picture

11 Aug 2022 - 12:17 pm | सुजित जाधव

छान रसग्रहण