घाव.....गजलेमधून
मराठीतल्या काही नवकवींच्या गजल ऐकल्या कि असं वाटतं मराठीत गजलेला दुःख सोडून विषय आहेत का नाहीत. मध्ये एक अशीच गजल ऐकली आणि साधारण विशीतल्या त्या गजलकाराचा गळा एकाच गजलेत तीन वेळा कापला गेला. म्हटलं अरे देवा!!! गळा कापणे, पाठीवर घाव करणे, गेला बाजार पारिजातकाचा उल्लेख ह्याच्या पुढे गजल आहे का नाही.
खालच्या ओळी थोड्याश्या वैतागाने लिहिल्यात. वृत्तांच्या गणितात बसत असतील तर गजल म्हणू नाहीतर कविता, तेही नसेल तर मुक्तछंद आहेच.....
भिंतीवरती उगा टांगशी घाव कशाला?
दुःखांचे मोजसी सदा तू भाव कशाला?
तूही दिले आहेस दुःख ना अजाणतेने
म्हणशी मग तू उगा स्वतःला, साव कशाला?
गजल लिहावी म्हणून का रे भोगतोस तू?
रोज कसे मज दुःख मिळाले, आव कशाला?
कसले आणि कुठून मिळती रोज तुला हे?
घाव मिळावे, म्हणून धावाधाव कशाला?
लिहायचे तर आनंदावर लिही जरा तू
गजलेसाठी दुःख मिळावे, हाव कशाला?
तुला प्यायची असेल तर मग सांग तसे तू
गजलेच्या खांद्यावरूनी हे डाव कशाला?
उणीपुरी सोळा वर्षांची नजर तुझी बा
त्यातही खोटे, क्रूर, निर्दयी गाव कशाला?
कशास कविता,चारोळी वा गजल म्हणावी?
ओळ लिहावी, ज्याला त्याला नाव कशाला?
मस्त आवडली.
उणीपुरी सोळा वर्षांची नजर
गजल लिहावी म्हणून का रे
गजल लिहावी म्हणून का रे भोगतोस तू? रोज कसे मज दुःख मिळाले, आव कशाला?ज्जे बात..! गज़ल आवडली..राईट्ट!
मस्त आवडली.कसले आणि कुठून
कसले आणि कुठून मिळती रोज तुला हे? घाव मिळावे, म्हणून धावाधाव कशाला?छानच !:):)