शैलेंद्रच्या निमित्ताने...
एका मुलाला ओळखता का? डोंबिवली शहराबाहेरील पाथर्ली गावात शंकराच्या देवळाजवळ एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रहायचा. खाली रस्त्याला लागून त्यांचे दुकान होते. ज्या शाळेला मैदान नाही, स्कुल बस नाही. ते कशाला शाळेला स्वतःची इमारतही नव्हती. शाळेची किल्ली नाही मिळाली म्हणून किंवा धो धो पावसात छत गळत असल्यामुळे सुट्टी देणाऱ्या शाळेत शिकला तो. ४ थी, ७ वी शिष्यवृत्ती नाही, प्रज्ञा शोध परीक्षेचा शोध त्याला लागलाच नव्हता, होमी भाभा हे शास्त्रज्ञाचे नाव एवढीच माहिती होती, त्या नावाने परीक्षा बिरीक्षाही असतात हे काही त्याला ठावं नव्हते. ( त्याला असेलही कदाचित पण मला नक्की ठावं नव्हतं.) दहावी व बारावीलाही तो बोर्डाबाहेर लै लांब उभा होता. "अशी मुलं आपल्या समाजात काय हो शिकत असतील? "असा प्रश्न सगळ्या हुश्शार मुलांना व त्यांच्या पालकांना पडतोच, होय ना? "त्याने Bsc ला ऍडमिशन घेतली असेल, होय ना?" एकदम बरोब्बर!
यथावकाश काही वर्षांनी पदवी मिळाल्यावर Msc पण झाली. बारावीनंतर ६किंवा ७ वर्षे लागली असतील हे सगळं व्हायला ( डुलक्या मारत मारत). कोणता विषय घेतला होता, असा प्रश्न पडू देऊ नका. कारण आपल्याला काहीच फरक पडत नाही. दुसरं म्हणजे मुळातच Bsc वगैरे या बाजूना स्कोप नसतोच मग कशातही करू द्या की आम्हा काय त्याचे? थोडक्यात तो स्वर्गीय IIT किंवा जमिनीवरील साधा अभियंता नव्हे. डॉक्टर, CA ( आमचा परम्प्रिय ( परमप्रिय नव्हे) मित्र जयंतसारखा) वकीलही नव्हे. तो परदेशातही राहत नाही. अभिनेता/ त्री, मॉडेलही नाही. ही निंदा नव्हे तर ओळख आहे त्या मुलाची. तुम्ही ओळखलं का कोण ते?
त्याच्यााबद्दल आपण आपल्या नातलगांशी, मुलांशी, मित्रमैत्रिणींशी चर्चा करणार का? काहीच विशेष नाहीए मग काय कप्पाळ सांगायचं अशा माणसाबद्दल. खरंच की, कारण त्याने नेमकं काय केलं, सध्या काय करतोय ते नीटपणे कळलं तर पाहिजे की राव. तुम्ही त्याला काल किंवा आज टीव्हीवर बघितलं असाल, एका मुलाखतीला उत्तर देताना. तो तोंडाला मास्कबिस्क लावून सांगत होता काहीतरी. सगळे शब्द मास्कनेच गिळल्यामुळे काही फारसं कळलं नाही. असो. त्याच्या कंपनीने detection kit शोधलंय. जे विकण्याचा परवाना त्याला परवाच मिळालाय. निव्वळ अडीच तासात रोगनिदान होऊ शकते. एका किटमध्ये अनेकशे रुग्णांची तपासणी करता येऊ शकते. सध्या एका आठवड्यात लाखभर किट बाजारात पुरवण्याची त्याच्या कंपनीची क्षमता आहे. आता तुम्ही रोग नक्की ओळखला असाल. तोच तो अवघ्या जगाचा जिव्हाळ्याचा विषय झालाय तो Covid 19. आता तरी मुलगा ओळखा की हो.
त्याच्या घरी पितळ्याची एक पानसुपारी ठेवायची एक मस्त Vintage कार होती. त्याच्या घरात कुठेही बसलं तरी ती कार लक्ष वेधून घ्यायची. त्याची आई मोठ्ठ कुंकू लावून तिचं भव्य कपाळ मिरवत आम्हाला काहीबाही खायला द्यायची. मधेच अभ्यासावर विषय आला की आम्ही तो टाळून गच्चीत पळायचो. ज्या गच्चीत मी आयुष्यात पहिल्यांदा ह्या मुलाच्या मांजरीने चिमणीला पकडून तिला फस्त करताना बघितले होते. बहिणींची खोडी काढल्यावरून ह्याच्या आईला मी कधीतरी ह्याला रागेजताना, धपकवताना पण बघितलंय. पण खरंच सांगतो , मित्राच्या आईचे त्याला ओरडणे, धपकवणे फारच मोहक असते. त्याचे बाबा संध्याकाळी खाली दुकानात असायचे. शांत, समाधानी चेहरा कुटुंबाला हात देण्यासाठी करावी लागणारी मध्यमवर्गीय धडपड लपवत राहायचा. तरीही डोळ्यांत एक जरबही होती. ह्याला ह्याचे मिस्कील डोळे बाबांकडून आणि फसफसतं मनमोकळं हसू त्याच्या आईकडून मिळालंय. हा दुकानही सांभाळायचा. "अख्ख्या दुकानातील वस्तूंच्या किंमती तुला पाठ कश्या?" हा माझा आवडता प्रश्न असायचा. मी त्याची खात्री करायचो. वेगवेगळ्या वस्तूंच्या किंमती विचारायचो . मला शाळेत गणितात उत्तम गुण मिळायचे. ह्या मुलाला त्यापेक्षा कमी मिळायचे. पण माझा पहिला किंवा दुसरा नंबर मी मनातल्या मनात ह्या मुलाला अनेकवेळा देऊन टाकला होता. त्या दुकानात बसल्या बसल्या त्याला मिळालेल्या व्यवहारज्ञानाने दुनियेची व माणसांची पारख करण्याची हातोटी मिळाली, असं तो मानतो. नुसतं दुकांन नाही तर सकाळी 4 ते 9 दुधाचा धंदाही हा पठठ्या आरामात बघायचा. गद्धे पंचविशीत बऱ्याच वेळा सकाळी ७ ते ८:३० या वेळेत जयंत, मी आणि ह्याच्या दुधाच्या दुकानात वैश्विक, अध्यात्मिक व तरुणाईने बहरलेल्या चर्चा झडलेल्या आहेत. ( जयंत हे वेगळंच प्रकरण आहे. त्याबद्दल वेगळा अध्याय लिहायला लागेल.) ओळखलंत का नाही?
हा इसम सायकलने पुणे ते लोणावळा जातो व सायकलनेच परतही येतो. डोंबिवलीतली २ वर्षांपूर्वीची सायकल स्पर्धा जिंकलेली आहे. त्याला ड्रायविंग आवडते म्हणून तो पुण्याहून त्याच्यासारख्याच काही उनाड मित्रांना घेऊन त्याची गाडी घेऊन लडाखला गेला होता व गाडी चालवत चालवत परत आला. लडाखने त्याच्या पायावर स्नेहांकन करून त्याचा आदरसत्कार करून परत पाठवलं होतं. त्याच्या मामाच्या 'राजूर' गावाजवळचे बरेचसे किल्ले त्याने पायाखालून घातलेले आहेत. त्याच्या हातात कॅमेरा देऊ नका. तो जीवघेणे फोटो काढतो ( ही १००% स्तुती आहे). तुम्ही त्याच्या कविता वाचल्यात का? कृष्ण व कर्ण, राधाकृष्ण, दुपार...? नाही? बरं निदान तुम्ही त्याचे वेगवेगळ्या मासिकांमधले लेख वाचले असाल? 'मानवाची उत्क्रांती' या विषयावर तुम्ही आठवडाभर त्याचं व्याख्यान ठेवू शकता. 'साबण' या विषयावर त्याचा लेख वाचायला साबणांनीही गर्दी केली होती म्हणे. एकेक शब्द मोजका असतो, तो वाक्यात चपखल बसतो, वाक्यरुपी फुलांचे परिच्छेदात्मक हार ओवले जातात. ज्यांच्या अर्थांचे सुवास तुमच्या आसपास दरवळत राहतील. तुमच्या जगण्याच्या जाणीवा समृद्ध करत राहतील. मी म्हणतो, वाचून तर बघा. पण आधी सांगा ओळखलं का ह्याला?
Molecular Biology, Biochemistry, DNA,Genetics, RNA, Biotechnology ही यादी लांब आहे. या विषयांवर हा मुलगा गप्पा मारू शकतो. ह्याची lab आहे. He is executive director of Mylab Solutions. ही सुरू करायचा विचार कसा व कुठे आला, याची मनोरंजक कहाणी आहे. एकदा त्यालाच विचारा. माणूस एकदम निवांत आहे. मातीत मुळं घट्ट असलेला एकदम मोकळाढाकळा आहे. बोलण्यात तुम्हाला कधी धोबीपछाड टाकून आडवा करेल याचा भरवसा नाही. तुमचं बोलणं ऐकताना किंवा वाचताना त्याचे ते रहस्यमयी डोळे चमकले तर समजून जा की तुमच्यावर उल्कापात होणार आहे. तरीही त्याचा धाकटा लेक त्याला वेळोवेळी आडवा घालण्यात यशस्वी होतोच. त्याला मिळालेल्या अनेक देणग्यांपैकी Humour ही फार मोठ्ठी देणगी आहे. आता तर तो पुण्यात राहायला आला मग काय विचारायची सोय नाही. खांद्यावर दोन शालेच्या जोडी हा नेहमीच घेऊन फिरतो. आपल्याला कोणत्या देणग्या मिळाल्यात हे सगळ्यांनाच कळत नाही. ती देणगी जरा विरळाच असते पण ह्यांच्याकडे आहे असं वाटतं. एव्हाना कमीत कमी कुतूहल तरी वाटतंय की नाही? की एवढं सगळं कसं जमवलं ह्या गडयाने? राक्षसासारखं वाचलंय, वाचतो हा माणूस. माणसं, त्यांची आयुष्यही वाचायला शिकला. जगण्याची काही विशिष्ट सूत्रे, नियम कधीच नव्हती व नसतीलही. याने स्वतःच्या अनुभवावरून सूत्रे बनवली; त्यावर काम केले; जोखीम घेणं हा पाया मानला. तरीही हा मनुक्ष योगायोगाला गुरू मानतो.
आज त्याची भारतातील एकमेव कंपनी आहे जी सर्व भारतीयांच्या आरोग्याकरता अत्यावश्यक असे काम करतेय. अशी माणसं समाजाकरता अमूल्य ठेवी असतात. हेवा नेहमी वाईट नसतो. सकारात्मकही असू शकतो की . तुम्हाला ह्याचा वाटला तर अजिबात नवल वाटून घेऊ नका. हे सगळं त्याच्या यशाबद्दल नव्हे. खूप दिवस हे मनात दडलेलं होतं. निमित्त गावत नव्हतं. आज गावलं खरं. शिक्षण चुकीचं नसतं. ते कसं, कुठं वापरावं, कसं वाढवावं हे कळायला पाहिजे. त्यापेक्षाही सतत स्वतःला जाणीवपूर्वक शिकवत रहायला पाहिजे. सगळंच काही पालक, शिक्षक देऊ शकत नाही ना? आपल्या आत खोलवर दडलेल्या स्वतःला नेहमीच स्कोप असतो. त्याला विचारून तर बघा. त्याला कोणत्यातरी एका डिगरीने झाकून टाकू नका.
यश हा शब्द फार फसवा आहे. व्यक्तिसापेक्षही आहे. तसंही हा माणूस यशाबिशात अडकून जाऊन तिथे राहुट्या ठोकून बसणारा नाही. हा आपली कर्मे करत पुढे जाईल. अशा पावलांना बोरकरांनी आधीच गौरवून ठेवलंय " देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालली ". तुम्हीच मागून त्याच्या सावलीकडे बघत बसाल. ती पण त्याच्याबरोबर मोठी होत जाईल व तुम्हाला झाकून टाकेल. प्रेरणा देऊन सोडून देईल. ह्या माणसाकडे बघितलं तर-
" नाभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने ।
विक्रमार्जितसत्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता ॥ "
हा श्लोक आठवतो. मित्रा, आम्हाला असंच प्रेरित करण्यासाठी खूप खूप पुढे जा. डोंगरबिंगर माहीत नाही रे! पण मानवजातीला अडचणीच्या काळात मदत करण्याने उत्तुंग वाटतोस. (भाई, पुढच्या वेळेला रोगराई पसरूच नये म्हणून काही शोधून ठेवा.) तुम्ही सगळेच ( आणि मी सुद्धा) सध्या कोरोनाच्या कृपेने मोकळे आहोत म्हणून जरा धारिष्ट्य दाखवलं. त्याबद्दल ऐसपैस माफी असावी. मला तरी ओळखलंत का?
शैलू, तुझ्यासारखा मित्र लाभल्याचा सार्थ अभिमान आहे.
तुझ्या सर्व कुटुंबियांचंही मन:पूर्वक अभिनंदन !
- अभिजीत श्रीहरी जोगळेकर
२४.०३.२०२०
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान परिचय
आवड्ली ओळख.
अतिशय सुंदर लेख
भारीच!
शैलेंद्रचे मनःपूर्वक अभिनंदन.
शैलेंद्र साहेब वळख ठेवा
शैलेन्द्रराव तुम्हाला एक
छान ओळख करुन दिल्ये
दंडवत तात्या
अभिनंदन..---
शैलेंद्रचे अभिनंदन कितीवेळाही
अभिनंदन
अभिनंदन!
डोंबिवली फास्ट !!!
आदरणीय शैलेन्द्र यांचे आभार
शैलेंद्र सर, त्यांचे सर्व
शैलेंद्र आपले मनःपूर्वक
ओळख आवडली आणि ती करून
शैलेंद्रजी तुमचे मन:पूर्वक
छान, शैलेंद्र यांचे अभिनंदन
अतकरेंच्या फेसबुक पोस्ट वर... लिहावेसे वाटले...
ते वाक्य फक्त स्त्री अगदि
शैलेन्द्र सर तुम्हाला खुप खुप
म्हणुनच आम्हि निर्धास्त आहोत.
पुढे काय अपडेटस ?