मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आमार कोलकाता - भाग ३

अनिंद्य · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
लेखमालेचे यापूर्वीचे दोन भाग इथे वाचता येतील : आमार कोलकाता - भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग ३  हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता. १७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून ते १८५७ च्या ‘गदर’पर्यंतच्या वर्षशंभरीने भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शासन सर्वशक्तिमान होताना बघितले. एतद्देशीय शासकांचे वेगवेगळ्या क्लुप्त्यांनी खच्चीकरण करून त्यांना मांडलिक बनवण्यात आले, काहींचे पूर्ण राज्यच खालसा करून तेथे कंपनीचा थेट अंमल सुरु झाला. १८१८ साली मराठी सत्तेचे शेवटचे आव्हान संपुष्टात आले आणि पूर्ण भारतावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची एकहाती सत्ता स्थापन झाली. भारतात लुडबुड करणाऱ्या अन्य युरोपीय वसाहतवाद्यांना त्यांनी तोवर आवर घातला होता. आता भारतातील सर्वशक्तिमान सत्ताकेंद्र म्हणून फारसे आव्हान कंपनीपुढे राहिले नाही. कंपनीची ताकद प्रचंड पटीत वाढली, कोलकाता त्यांच्या राजधानीचे शहर असल्यामुळे त्याच पटीत शहराचे महत्वही वाढले. गव्हर्नर जनरल, मोठे मुलकी आणि सैन्याधिकारी, श्रीमंत व्यापारी, स्थानिक मांडलिक राजे-जहागीरदार यांची भव्य निवासस्थाने कोलकात्यात स्थलांतरित झाली. तालेवार सावकारी आणि व्यापारी पेढ्या, नाणी पाडण्याची टाकसाळ, सरकारी कोषागार आणि लेखागार, न्यायालय, शिक्षणसंस्था, सरकारी कार्यालये यांनी शहर सजले. त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा आणि सुरक्षा पुरवणाऱ्या लोकांची वस्तीही आपसूकच वाढली. ही वर्षंशंभरी बंगाल प्रांतासाठी आणि विशेषतः कोलकाता शहरासाठी प्रचंड धामधुमीची आणि सामाजिक बदलांची ठरली. ह्या काळात कलकत्ता मदरसा (१७८१), एशियाटिक सोसायटी (१७८४) आणि फोर्ट विल्यम कॉलेज (१८००) अशा नामवंत संस्था कोलकात्यात स्थापन झाल्या आणि भरभराटीला आल्या. स्थानिकांबद्दल फार ममत्व निर्माण झाले आणि त्यामुळे त्यांना आपल्या पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी ब्रिटिश सत्ता पुढे सरसावली असा मामला नव्हता. ब्रिटिशांना आपले शासन व्यवस्थित चालवण्यासाठी स्थानिक लोकांची गरज होती. सुरवातीला काही दशकं शिक्षण व्यवस्था दुपेडी होती - ब्रिटिश अधिकाऱ्यांना शिक्षकांनी स्थानिक भाषा आणि कायदेकानू शिकवणे आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांनी स्थानिकांना शासनतंत्रासाठी योग्य असे प्रशिक्षण देणे अशी एकमेकांना पूरक व्यवस्था. त्यासाठी एतद्देशीय भाषांचा अभ्यास गरजेचा होता. संस्कृत, अरेबिक, पर्शियन, बंगाली, उर्दू, हिंदी अशा अनेक भाषांचे विद्वान शिक्षक कोलकात्याच्या शाळा-विद्यालयांमध्ये काम करू लागले. बंगाली भद्रजन इंग्रजी भाषा शिकले. याकाळात अक्षरशः शेकडो पुस्तके, ग्रंथ आणि शासकीय कागदपत्रे अन्य भाषांमधून इंग्रजी आणि बंगालीत भाषांतरित करण्यात आलीत, त्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांची मोठी जमात कोलकात्यात तयार झाली. १७९० साली एकट्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये फक्त भाषाविषयक शिक्षकांची पटलसंख्या १०३ होती ! यावरून विषयव्याप्तीचा एक अंदाज यावा. कंपनी सरकारसाठी सरकारी आणि महसुली कागदपत्रांची हाताळणी करणाऱ्या लेखनिकांची आणि कारकुनांची संख्या तर प्रचंडच वाढली. ह्या मंडळींना काम करण्यासाठी शहरात २५ एकर क्षेत्रफळाच्या ‘लाल दिघी’ तळ्याकाठी भव्य 'रायटर्स बिल्डिंग' बांधण्यात आली. ही कोलकात्यातील पहिली ३ मजली इमारत. त्यावेळच्या काही ब्रिटिश प्रवासी अधिकाऱ्यांनी इमारतीचे डिझाईन गचाळ आणि ओबडधोबड असल्याची टीका केली आहे, गुरांच्या गोठ्याशी तुलना करायलाही कमी केले नाही. पण राज्यकर्त्यांची पसंती रायटर्सला सदैव लाभली आहे. ब्रिटिश सत्तेच्या वाढत्या वैभवाला अनुकूल असे बदल वेळोवेळी घडून रायटर्स बिल्डिंग एक इमारत राहिली नसून १३ वेगवेळ्या इमारतींचा समूह झाला आहे. बदलली नाही ती रायटर्सची 'सरकारी मुख्यालय' म्हणून असलेली वट आणि इमारतीचा लाल रंग ! आज २४० वर्षांनंतर रायटर्स बिल्डिंग मध्ये पश्चिम बंगाल सरकारचे मुख्यालय आहे. सत्तेचे प्रमुख केंद्र म्हणून रायटर्सचे स्थान आजही अबाधित आहे.  सुप्रसिद्ध 'रायटर्स बिल्डिंग' कोलकाता. कंपनीची सत्ता जसजशी मजबूत होत होती तसे तसे ब्रिटन आणि युरोपच्या अन्य भागातून अधिक लोक नशीब काढण्यासाठी कोलकात्यात दाखल होऊ लागले. त्यात व्यापारी होते, शिक्षक होते, धर्मप्रचारक, कलाकार, सैनिक, हौशी प्रवासी - पर्यटक सगळेच होते. त्यातलाच एक विल्यम करे (William Carey). १७९३ मध्ये तो ख्रिती धर्मप्रसारक म्हणून कोलकात्याला आला आणि इथलाच झाला. त्याने बायबलचा पहिला बंगाली अनुवाद केला आहे. (त्याला बायबलच्या प्रथम मराठी अनुवादासाठीसुद्धा ओळखले जाते.) विल्यमने उडिया, असामी आणि संस्कृतमध्ये प्राविण्य मिळवले आणि इंग्रजी आणि बंगालीसोबत ह्या अन्य भाषा शिकवणासाठी सेरामपूर कॉलेज स्थापून तेथे अनेक वर्षे अध्यापन केले. बहुभाषाकोविद विल्यमने बंगाली लिपीचे प्रमाणीकरण, बंगाली व्याकरणाची आधिकारिक नियमावली आणि बंगाली-इंग्रजी शब्दकोश सिद्ध करण्यात पुढाकार तर घेतलाच पण स्थानिक दर्जेदार साहित्याचा सखोल अभ्यास करून इंग्रजीत अनुवादही केला. रामायणासारख्या महाकाव्याचा इंग्रजीत आणि बायबलचा अनेक भारतीय भाषा आणि बोलीभाषांमधे अचूक अनुवाद करण्याच्या कामांमध्ये मोठे योगदान दिले. विल्यमने कोलकात्यात स्थापन केलेले सेरामपूर कॉलेज 'लेखी पदवी' देणारी आशियातील पहिलीवहिली शिक्षणसंस्था म्हणून प्रसिद्ध झाले. शिक्षक आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक म्हणून त्याने मोठा लौकिक मिळवला. कोलकात्यात पहिला छापखाना सुरु करून रोमन, देवनागरी आणि बंगाली लिपीत साहित्य प्रकाशित करण्याची मुहूर्तमेढ रोवली. विल्यमची कर्मभूमी असलेला कोलकात्याच्या भाग आज सेरामपूर युनिव्हर्सिटी नावाने ओळखला जातो.  सेरामपूर युनिव्हर्सिटीची सुमारे दोनशे वर्षे जुनी इमारत, कोलकाता. पाश्चात्य पद्धतीचे शिक्षण आणि देशविदेशातील विद्वान शिक्षकांचा संपर्क ह्यामुळे कोलकात्यातील समाजजीवन आमूलाग्र बदलले. पारंपरिक विद्याभ्यास करणारे शेकडो भारतीय लोक ब्रिटिश शासनप्रणीत संस्थांशी जोडले गेले. इंग्रजी भाषा आत्मसात करून अधिक ज्ञान मिळवण्यासाठी अनेकजण विलायतेत शिकायला गेले. तत्कालीन ब्रिटिश / युरोपीय विचारसरणीचा आणि जीवनपद्धतीचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. तेथून कोलकात्यात परत आल्यावर अनेकांनी अध्ययन-अध्यापन-संशोधनाचे काम हाती घेतले. ह्या संवादामुळे कोलकात्याच्या अभिजनांना नवीन संकल्पनांची तोंडओळख जलद गतीने झाली. राज्यकर्त्यांची भाषा असल्यामुळे इंग्रजीला अधिकच मान मिळाला तरी बंगाली भाषेचे महत्व काही कमी झाले नाही. संवादाची भाषा म्हणून समाजात इंग्रजीसोबत बंगाली भाषेलाही प्रतिष्ठा मिळत राहिली. बंगाली-इंग्रजी शब्दकोश आणि बंगालीत भाषांतर झालेल्या उत्तमोत्तम पुस्तकांनी बंगाली भाषकांना मातृभाषेतून नवीन विषय शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली. १८१३ पासून कोलकाता आणि जवळपासच्या भागात अर्मेनियन, डच आणि ब्रिटिश ख्रिस्ती धर्मगुरूंचा ओघ वाढला. त्यांनीही स्थानिकांशी संबंध वाढवण्यावर जोर दिला. बायबलचे बंगाली भाषेत भाषांतर झाले आणि चर्चमधल्या प्रार्थना बंगालीत करायला सुरुवात झाली. मागील भागात सांगितल्याप्रमाणे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणाऱ्या मिशनरी शाळांची मोठी मालिका कोलकाता शहरात स्थापन झाली. ह्या मिशनरी शाळांमध्ये होणारे ख्रिस्ती धर्माचे गुणगान पसंत नसलेल्या काही स्थानिक धनपतींनी हिंदू विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या इंग्रजी आणि बंगाली शिक्षण संस्थांची स्थापना केली. पारंपरिक भारतीय ज्ञानवारसा न सोडता आधुनिक पद्धतीचे शिक्षण देणे असा त्यांचा प्रयत्न. ओरिएंटल सेमिनरी ही अशीच एक विख्यात संस्था. सरकारी किंवा चर्चचा हस्तक्षेप अजिबात न होऊ देता दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ही संस्था अल्पावधीतच लोकप्रिय झाली.  ओरियंटल सेमिनरीची इमारत, कोलकाता. ह्याचवेळी ब्रिटन-युरोपमध्ये पहिल्या उद्योगक्रांतीला (१७६०-१८४०) लागणाऱ्या कच्च्या मालाचा प्रचंड पुरवठा करणाऱ्या भारतीय भूभागातील प्रमुख बंदर म्हणून कोलकात्याने एक आगळीवेगळी औद्योगिक-व्यापारी क्रांती अनुभवली. सहभाग फक्त कच्च्या मालाच्या पुरवठ्यापर्यंतच सीमित असला तरी विदेशी व्यापाऱ्यांबरोबरच देशी जमीनदार आणि व्यापारीसुद्धा त्यात उतरले. एकमेकांशी स्पर्धा करत, भांडत, जुळवून घेत एकमेकांचा वापर करून श्रीमंत झाले. राज्यकर्ते आणि धनको-सावकार-व्यापारी यांच्या परस्पर गरजेतून १८०६ साली 'बँक ऑफ कलकत्ता' शहरात स्थापन झाली. शहरात १७५७ सालीच नाणी पाडण्यासाठी ब्रिटिश टाकसाळ 'मिंट ऑफ कलकत्ता' उभारण्यात आली होती, पुढे ३३ वर्षांनी इंग्लंडमधून मागवण्यात आलेल्या नवीन यंत्रांनी मोठ्या प्रमाणात नाणी पाडण्याचे काम सुरु झाले. १८२९ सालापासून नवीन भव्य इमारतीतून दररोज ६ लाख नाणी पडणारी व्यवस्था क्रियान्वित झाली. (ही देखणी इमारत मात्र बेल्जियममधल्या जुन्या कापड बझाराची हुबेहूब नक्कल आहे.) कोलकात्यात ये-जा करणाऱ्या व्यापारी जहाजांना आणि त्यांच्या मालकांना विम्याची हमी देण्यासाठी भारतातील पहिलीवहिली विमा कंपनी 'ओरियंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी' स्थापन झाली (१८१८). मालाची साठवणूक आणि खरेदी-विक्री यासाठी 'कमोडिटी एक्सचेंज' आणि लिलावाच्या खास सोई-सुविधा शहरात निर्माण करण्यात आल्या. या सर्व व्यापात स्थानिकांच्या हातातही पैसा आला. कोलकाता शहराची ब्रिटिश 'व्हाईट टाऊन' आणि उरलेले 'नेटिव्ह ब्लॅक टाऊन' अशी सुरवातीला झालेली विभागणी जाऊन हळूहळू स्थानिक जमीनदार आणि धनिकांचे महाल आणि व्हाईट टाऊनच्या राजेशाही इमारती यांची सरमिसळ झाली. ह्या भव्य महालांनी कोलकात्याला 'सिटी ऑफ पॅलेसेस' अशी ओळख मिळवून दिली. अनेकविध देशातून, वेगवेगळ्या समाजातून आलेल्या लोकांच्या आणि त्यांच्या संस्कृतींच्या अभिसरणातून कोलकात्याच्या स्वतःचे असे व्यक्तिमत्व तयार झाले. आपसात चर्चा-संवाद आणि प्रसंगी वादविवाद करणे कोलकात्याच्या संस्कृतीत रुजले. चर्चा - संवाद -वादविवाद करणे हा शहराचा गुण जुनाच. यथावकाश ब्रिटिश विचारांचा पगडा असणारा, त्यांच्याच पद्धतीचे जीवन जगू इच्छिणारा, स्थानिक भाषा आणि संस्कृती समजणारा, नोकरी-व्यापारउदीम करून श्रीमंत झालेला असा इंग्रजी भाषक अभिजनांचा एक वेगळा वर्ग कोलकात्यात निर्माण झाला. काहींच्या मते असा 'ब्राऊन साहेब' वर्ग आजही शहरात आहे. एक मात्र खरे. कोलकात्याच्या ह्या इंग्रजाळलेल्या बंगाली भद्राजनांनी खऱ्या अर्थाने 'बंगालेर नबोजागरण' म्हणजे सर्व क्षेत्रात बंगालच्या नवजागरणाचा सूत्रपात केला - त्याबद्दल पुढच्या भागात. क्रमशः (अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. काही चित्रे जालावरून साभार.)

वाचने 26555 वाचनखूण प्रतिक्रिया 36

हेमंतकुमार गुरुवार, 10/03/2019 - 11:28
१७९० साली एकट्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये फक्त भाषाविषयक शिक्षकांची पटलसंख्या १०३ होती !
>>>>> क्या बात है ! फोटोही मस्त.

In reply to by हेमंतकुमार

अनिंद्य Fri, 10/04/2019 - 16:02
@कुमार, लेखातला पहिला फोटो (दक्षिणेश्वर) काढला तो दिवस खूप आनंदाचा गेला होता, आजही आठवतो. अभिप्रायाबद्दल आभार.

In reply to by वीणा३

जेम्स वांड Fri, 10/04/2019 - 12:49
कॅसेट थोडी रिवाईंड करता हरप्पा, मोहेंजोदारो, तक्षशीला, पाटलीपुत्र वगैरे उत्तम वसवलेली शहरे नजरेस पडतात, त्यामुळे एकदम भारतीयांच्या डीएनएला हात घालणे काही तितकेसे पटलेले नाही, सध्याचा भारत एका वेगळ्या परिस्थितीतून जात असून भविष्यात उत्तम नियोजन असलेली शहरे किंवा अस्तित्वात असलेल्या शहरांचे उत्तम नियोजन होणार नाहीच हे मी तरी ठामपणे म्हणून धजणार नाही.

सुधीर कांदळकर Fri, 10/04/2019 - 06:59
इमारतींचा इतिहास छान, योग्य तेवढ्याच शब्दात, त्यांचे देखणेपण, सौंदर्य प्रकाशचित्रात आणि ओघवत्या भाषेतली राजकीय, सास्कृतिक पार्श्वभूमी, सार्‍याची मस्त मांडणी. तुमच्या नजरेतले कोलकाता आवडले. रसायन मस्त जमले साहेव! धन्यवाद.

In reply to by प्रचेतस

अनिंद्य Fri, 10/04/2019 - 16:51
@ प्रचेतस, तुमच्यासारख्या स्थापत्यात रमणाऱ्या वाचकांसाठी शहरातल्या ऐतिहासिक इमारतींबद्दल लिहायचे झाल्यास २० -३० भाग सहज होतील. :-) लेखमालेच्या पहिल्याच भागात लिहिल्याप्रमाणे - 'विकास' करण्याच्या मागे कोलकाता फार उशिरा लागलं म्हणून असेल, आजही इतिहासातल्या वैभवाच्या खुणा सरसकट पुसल्या गेल्या नाहीत. एखाद्या जुन्या संस्थानिकाच्या पडक्या महालात आरसे-झुंबर, सांबराची शिंगे, पेंढा भरलेले वाघ-चित्ते ठेवले असावेत तसे ह्या शहराच्या विविध भागात गतवैभवाच्या इतिहासखुणा विखुरल्या आहेत.

जेम्स वांड Fri, 10/04/2019 - 12:54
तुमची एकंदरीत लेखनशैलीच "अनिंद्य" आहे पट उलगडला तसा मांडला आहेत, त्यात स्वतःचे हेवेदावे, मतमतांतरे आणि विचारसरणी न चिकटवता लिहायची ही तुम्ही कला स्तुत्य अन शिकण्यासारखी आहे. मी तरी पुष्कळ काहीसे शिकतोय तुमच्या लेखनातून, वाचनवेड्या स्वभावामुळे कलकत्ता कॉलेज स्ट्रीट वर मनसोक्त खरेदी करून कातडी बाईंडिंगच्या जडशीळ पुस्तकांनी वजनदार झालेली पिशवी सांभाळत गरियाहाट बाजारात एका हाती अस्सल सरसो तेलात बनवलेला डबल चिकन डबल एग रोल खात खात भटकंती करणे हा आमच्या फेवरेट स्वप्नातला नेहमीचा भाग आहे. पुढील भागांची आतुरतेने वाट पाहतोय. येउद्या नवनवीन पैलू ह्या शहरगाथेचे एकामागे एक पटापट.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य Fri, 10/04/2019 - 16:40
@ जेम्स वांड, लेखनाबद्दलचे तुमचे मत वाचून आनंद वाटला, स्तुती कोणाला आवडत नाही ? :-) लिहितांना 'फोकस' फक्त लेखविषयावर ठेवण्याचा प्रयत्न असतो, मी-माझे टाळतो. तुमच्या लक्षात आले हा तुमचा मोठेपणा _/\_ शहरगाथेचा पुढील भाग लवकरच.

अनिंद्य Fri, 10/04/2019 - 21:21
जालिम लोशन जॉनविक्क मुक्त विहारि स्वलिखित वीणा३ कोमल उपेक्षित आपण सर्वांनी लेखमाला आवडत असल्याचे आवर्जून सांगितलेत, अनेक आभार !

बबन ताम्बे Sat, 10/05/2019 - 19:43
ब्रिटिशांनी कसे नियोजनबद्धरित्या पूर्ण भारतावर राज्य केले हे कोलकता आणि बंगालच्या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते. आपण खूप माहिती दिली आहे. फोटो पण छानच. ब्रिटिशकालीन इमारती मला बघायला खूप आवडतात. त्यांची भव्यता आणि स्थापत्यकला मोहवून टाकतात. जाता जाता- 1892 की 93 सालचे एका मराठी इतिहासकाराने लिहिलेले हिंदुस्थानचा इतिहास हे पुस्तक एका प्रदर्शनात मिळाले. त्यात 1857 च्या युद्धाने भारतीयांस काय दिले हा त्या इतिहासकारांच्या नजरेतून लिहिलेला एक लेख आहे. त्यावेळच्या बहुसंख्य सुशिक्षित जनांमध्ये इंग्रजी राज्य ही भारताला मिळालेली ईश्वरी देणगी आहे अशी धारणा होती. लेखकाने असा शेवटी असा निष्कर्ष काढलाय की 1857 ला ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारून भारतीयांनी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला.

In reply to by अनिंद्य

बबन ताम्बे Mon, 10/07/2019 - 18:45
पुस्तकाचे नाव आहे, "हिंदुस्थान कथारस" आणि लेखक आहेत विनायक कोंडदेव ओक . शिपायांच्या बंडाचा परिणाम या लेखात शेवटी ते लिहितात- 1857 सालच्या बंडाने हिंदुस्तानचे काहीतरी बरे केले काय? नाही, काडी इतके देखील नाही. उलटे फार नुकसान केले. एक तर, हजारो लोकांची कत्तल उडवली, दुसरे, शेकडो थोर कुळे धुळीस मिळवली, तिसरे, आम्हा सर्व रयतेस निःशस्त्र केले, चवथे, हिंदुस्तानच्या लोकांच्या शक्तीचा व शहाणपणाचा जो भ्रमाचा भोपळा होता, तो फोडला, पाचवे, इंग्लिश लोकांच्या मनात आम्हांविषयी अप्रिती उत्पन्न केली, सहावे, आमच्या डोक्यावर करायचे ओझे लादले, अशी आमची अनेक नुकसाने झाली...

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य Mon, 10/07/2019 - 19:09
वा, झटपट केलेत. थँक्यू ! ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे. एका मराठी लेखकाचा हा अँगल असणे रोचक आहे. असेच काहिसे मत काही तत्कालीन बंगाली विचारकांचेही होते. बंगाल आणि महाराष्ट्र ह्या दोनच प्रांतातले लोक ईंग्रजी भाषा इतरांच्या आधी शिकले हे एक साम्य आहेच. आभार.

In reply to by यशोधरा

बबन ताम्बे Mon, 10/07/2019 - 20:57
टिळक स्मारक समोर श्रीनाथ आर्ट ग्यालरी येथे जुन्या पुस्तकांचे प्रदर्शन असते. कुठलेही जुने पुस्तक 50 रुपये. मला तेथेच हे पुस्तक मिळाले. तुम्ही तिथे चौकशी करू शकता.