(अन्यत्र पूर्वप्रकाशित)
अस्वीकृती (Disclaimer) 1: या लेखातील काही भाग याअगोदर माझ्या फेसबुक भिंतीवर इंग्रजीत खरडलेला आहे.
अस्वीकृती 2: मी कायदा, मानवाधिकार, कामगार हक्क, लिंगसमानता, राज्यघटना यापैकी कोणत्याही विषयाचा अभ्यासक वा तज्ञ नाही.
अस्वीकृती 3: हा लेख केवळ एक वाचिक विचारच्छल (Loud thinking) म्हणून वाचावा. यातील सर्व मते ही माझीच आहेत, परंतु त्या दगडावरील रेघा नव्हे. सबळ तार्किक प्रतिवाद झाल्यास मी माझी मते प्रांजळपणे बदलतो.
---
शीर्षक कुणाला असंवेदनशील किंवा प्रक्षोभक वाटण्याची शक्यता, पण तसे काही नाही. उद्देश कळ लावून देणे हा नसून एक पर्यायी भूमिका मांडणे हा आहे. पर्यायी या अर्थाने की लैंगिक दुर्वर्तन या महत्वाच्या विषयाचे पदर अद्याप पूर्णतः सर्वांना स्पष्ट नसल्यामुळे मते बनविण्यात व व्यक्त करण्यात सामान्यजनांना (पटाईत कार्यकर्ते व विचारवंत वगळावेत) काही अडचणी येत आहेत असे मला दिसते. अनेकजण प्रयत्न करूनही आपल्या लिंगविशिष्ट अथवा पुरुषसत्ताकवादी विचारचौकटीपलीकडे जाऊ शकलेले नाहीत. सरसकट स्त्रीसमर्थक वा पुरुषसमर्थक ढोबळ भूमिका घेणारे तर खूप आहेत. काही तर निव्वळ व्यक्तिसापेक्ष भूमिका घेऊन ("अमका मनुष्य कधीही असे वागू शकणार नाही") आपले समाधान करीत आहेत. तसे करणे अज्ञानदर्शक असले तरी त्या त्या व्यक्तीचा तो प्रामाणिक विश्वास असू शकतो.
माझी व्यक्तिगत मतेही अजून विस्कळित आहेत हे आधीच मान्य करतो. लेखातही ती तशीच अस्ताव्यस्त रूपात येणार हे उघड आहे. पण वैचारिक सुसूत्रता व स्पष्टता येण्यासाठी ती मते आहेत त्या अनाकार शब्दांत व्यक्त करण्याची खटपट करणे व जाणकारांचे त्यावरील प्रतिसाद अभ्यासणे हा एकच मार्ग मला दिसला.
आपण सर्वप्रथम हे स्वीकार करू की मराठी भाषेत या विषयाची सांगोपांग चर्चा होण्याजोगी शब्दसंपदा अजून उपलब्ध नाही. असल्यास मला ज्ञात नाही. 'लैंगिक छळ' याच्या छटा मला पुरेशा व्यापक न वाटल्यामुळे मी 'लैंगिक दुर्वर्तन' असा शब्दसंच वापरतो. तोही पुरेसा समर्पक आहे का याची खात्री नाही, पण सध्या तरी चालवून घेऊ. यात अनुचित स्पर्श, अनुचित वर्तन-भाषा इथपासून ते पदसिद्ध सामर्थ्याचा गैरवापर, लैंगिक धमक्या आणि बलात्कार हे सर्व अभिप्रेत आहे. आदर्श पातळीवर हा प्रमाद लिंगनिरपेक्ष असणे गृहीत आहे.
या लेखापुरती मात्र 'व्यवस्थाडोलाऱ्याच्या अंतर्गत पुरुषाने स्त्रीप्रति केलेले लैंगिक दुर्वर्तन' ही मर्यादा आखून घेतलेली आहे.
दुसरी महत्वाची बाब ही की काही विशिष्ट कृत्ये हा गुन्हा ओळखला जात असला तरी व्यापक लैंगिक दुर्वर्तन हा मात्र दखलपात्र गुन्हा नाही (समजण्यात माझी चूक झाली असेल तर विधितज्ञांनी दुरुस्ती करावी). जोवर संबंधित व्यक्ती लेखी तक्रार करत नाही तोवर कायदेशीर प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. किंबहुना यात कायदेशीर कारवाई ही किचकट, मनस्तापदायक व अंतिमतः निष्फळ ठरण्याचीच जास्त शक्यता असते.
तिसरी व सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात 'संमती' हा एकमेव कळीचा मुद्दा आहे. ही संमती सज्ञान व सबल असणे हे अध्याहृत आहे. उदा. वरिष्ठाने वेळेवर पगार दिला नाही अथवा नोकरीत कायम केले नाही तर जिची मुले उपाशी राहतील अशा स्त्रीने मनावर दगड ठेवून शय्यासोबतीस दिलेला रुकार ही संमती होऊच शकत नाही. कृपया नोंद घ्यावी की 'मुले उपाशी राहतील' हे केवळ एक उदाहरण आहे. शरीरसुखास रुकार न दिल्यामुळे कनिष्ठाची दूरगावी बदली करणे, विद्यार्थी(नी)स कमी गुण देणे हे याच वर्गात मोडेल. गरजांचा वैयक्तिक अग्रक्रम हा कार्यक्षेत्र व आकांक्षा यानुसार ठरतो आणि त्यात गैर काहीच नाही. 'पण लठ्ठ पगार तर मिळेलच ना?' किंवा 'तरीही नोकरी मिळाली की!' ही विधाने येथे गैरलागू ठरतात. तसेच 'तिची इतरही बरीच प्रेमप्रकरणे आहेत' हे विधानही अस्वीकार्य ठरते.
चौथा मुद्दा असा की (इथे बहुधा मजदिशेने तलवारी उपसल्या जाणार!) स्त्रीजातिप्रति पुरुषांचे अनावर आकर्षण हे संपूर्णपणे नैसर्गिक असून पुरुषांचे स्वतःचेच त्यावरील नियंत्रण कमालीचे डळमळीत असते. तसेच कोणत्याही स्त्रीकडे कोणत्याही पुरुषाने टाकलेला पहिला दृष्टीक्षेप हा निखळ शारीर व शारीरच असतो. हे अनादी सत्य असून त्यावर कुणाचाही इलाज आजवर चाललेला नाही. निसर्गाची योजनाच तशी आहे. कुणी रूपगुणगर्विता आसपास वावरत असेल तर पुरुषाच्या (मग तो कितीही सालस असेना) मानसिकतेवर त्याचा हमखास परिणाम होतो. सरसकटीकरणाचा धोका पत्करून मी असे म्हणेन की अगदी समलिंगी पुरुषही पहिल्या नजरेत आधी स्त्रीचे वजन-मापच जोखतो. लैंगिक गैरवर्तनावर चर्चा करताना पुरुषाची आदिम लैंगिक प्रेरणा हाच जणु काही गुन्हा आहे असे मानण्याची चूक होऊ नये. (हे लैंगिक दुर्वर्तनाचे समर्थन नाही).
या आकर्षणाचा आवेग कुणा पुरुषाला किती झेपेल हे सांगता येत नाही. कुणी ते लपवील, कुणी व्यक्त करील. ते ज्याच्या त्याच्या मानसिक जडणघडणीवर अवलंबून आहे. माझे मत असे की हे आकर्षण प्रामाणिकपणे, निरलसपणे थेट त्या स्त्रीपाशी जाऊन शब्दांत कथन करणे हे लैंगिक दुर्वर्तन मानले जाऊ नये.
अर्थात मालक-नोकर, वरिष्ठ-कनिष्ठ, गुरु-शिष्य वगैरे असमतुल्य नात्यांत अशा आकर्षणास, नाहीतर मग त्या नात्यास तिलांजली देणेच योग्य हे ओघाने आले. पण तसे नेहमी होत नाही. पदसिद्ध अधिकार वापरण्याचा मोह कुणा पुरुषाला होणारच नाही अशी ग्वाही कोण देईल? पुरुषाची लैंगिक प्रेरणा कमालीची प्रबळ असते असे वर म्हटलेच आहे. ती विवेकबुद्धिचा प्रसंगी पराजय करू शकते. (येथे स्त्रीचा संमती-अधिकार कमी लेखणे हा माझा उद्देश मुळीच नाही).
'संमती' हा एक भलताच पेचात टाकणारा मुद्दा आहे. 'पिंक' हा चित्रपट पाहताना मी विचारात पडलो होतो. तो व्यावसायिक चित्रपट असल्यामुळे प्रेक्षकांच्या सोयीसाठी त्यातील खलनायक हा शुद्ध काळा दाखवलेला होता. परंतु संमती हा गुंतागुंतीचा मामला आहे. ती दिलेली होती का, असल्यास ती निखळ होती की काही छुप्या उद्देशाने दिलेली होती (ही शक्यता नाकारता येत नाही), संमती मागे कधी घेतली हे केवळ संमतीदात्रीच जाणते. लिखापढी होत नसल्यामुळे पुरावा उरत नाही. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या एकंदर गदारोळात इतरांना निश्चित भूमिका घेणे अशक्य होऊन बसते. इतकेच नव्हे तर अमुक एका घटनेवर कुणा त्रयस्थ अमक्याने-अमकीने काय भूमिका घेतली यावरून त्याचे-तिचे चारित्र्य व विचारबैठक याचा पंचायती निवाडा होऊ घालतो. यातून वातावरण गढूळ होण्यापलीकडे काही साध्य होत नाही.
लैंगिक 'संमती' ही स्पष्ट शब्दात किंवा लेखी कधीच दिली जात नाही. त्यामुळे जोपर्यंत लैंगिक मर्यादा व अपेक्षा यांची योग्य व्याख्या पुरुषाला (आणि स्त्रीलाही!) मुखोद्गत होत नाही, तोवर हा मुद्दा अनुत्तरितच राहणार.
एक विरुद्धदिशा उदाहरण घेऊ. एक पुरुष व स्त्री (दोघेही अविवाहित) यांचा परिचय होतो. ते भेटू लागतात. सोबत सिनेमा पाहतात. संवाद व स्नेह वाढतो. कदाचित शारीरिक जवळीकही वाढत असेल. एके दिवशी स्त्री विचारते, "आपण लग्न कधी करायचे?". यावर पुरुष म्हणतो, "असा माझा मुळीच विचार नाही. तुझ्याशी लग्न करीन असे मी कधी म्हटले?". शब्दशः तो सत्य बोलत असेलही. पण त्याच्या वर्तनातून स्त्रीने वाचलेले संकेत अगदी वेगळे होते.
असेच आपल्याला मीटूसंबंधी म्हणता येईल काय? आपल्यासोबत सवंग लैंगिक हास्यविनोदात भाग घेणारी, मद्यपान- धूम्रपान करणारी, आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करणारी महत्वाकांक्षी स्त्री शारीरिक जवळिकीस नकार देणार नाही असा समज जर कुणी पुरुषाने आपल्या बौद्धिक कुवतीनुसार करून घेतला तर तो अयोग्य आहे हे त्याला कसे समजवणार? (मी स्वतः असा समज कधीही करून घेणार नाही कारण माझी 'होकार' या शब्दाची व्याख्या वेगळी आहे. पण प्रत्येक पुरुष आणि स्त्री तसे नसतात.)
माझ्या काही परिचित स्त्री-सुहृदांच्या मते, जरी उघड संमती दर्शवली गेली नसली तरी स्त्रीकडून गेलाबाजार काहीतरी प्रोत्साहन मिळाले असल्याखेरीज असे प्रकार वारंवार घडूच शकत नाहीत (थेट बलात्कार वगळता). माझ्या काही वैयक्तिक अनुभवांवरून (आगाऊ खुलासा: हे सर्व विवाहपूर्व आहेत!) सांगू इच्छितो की स्त्रीने जर अशी तटबंदी आपल्याभोवती उभारली तर ती भेदणे पुरुषास केवळ अशक्य असते. 'छह दिन, लडकी इन' वगैरे बाष्कळपणा केवळ चित्रपटांतून पुरुष प्रेक्षकांना बहलवण्यासाठी अस्तित्वात आलेला असतो.
पण यावर अधिक भाष्य करण्यास मी, पुरुष असल्याकारणाने साहजिकच जरा बिचकतो. स्त्री वाचकवर्गाने ते आपल्या प्रतिसादांद्वारे करावे अशी विनंती. कारण या मुद्द्याचा सोक्षमोक्ष लावणे निकडीचे आहे.
तरीही, एकूण सामाजिक शक्ति-असमतोल पाहता, आरोप करणाऱ्या स्त्रीवर प्रथमदर्शनी विश्वास ठेवणे भाग आहे असे मी मानेन.
पण मुख्य मतभेद हे इथेच सुरू होतात. विषयाला सतराशे साठ फाटे फुटतात- फोडले जातात. परंतु यात परंपरागत पुरुषसत्ताक सामाजिक पूर्वग्रहांचा मोठा वाटा आहे असे जे समजले जाते ते खरेच तसे आहे का? हा यक्षप्रश्न मजसमोर कधीचा ठाकलेला आहे. Battle of the sexes हे अनंतकाळापासून चालत आले असून ते तसेच चालत रहाणार यात शंका नाही. लिंगविशिष्ट चौकटीबाहेर विचार करणे बहुतेक लोकांना शक्य होत नाही.
शिवाय याला दुसरी बाजूही आहे. लैंगिक आकर्षण हे स्त्रीलाही पुरुषाप्रति असते. कोण स्त्री कोणत्या पुरुषाकडे कोणत्या गुणासाठी आकर्षित होईल हे काही गणिती समीकरण नाही. पुरुष अविवाहित आहे का, निर्व्यसनी आहे का, त्याचा वयोगट, रंगरूप, आरोग्य वा सांपत्तिक स्थिती काय आहे, पूर्वेतिहास काय आहे वगैरे सांसारिक निकष प्रत्येक स्त्रीला तितकेच महत्त्वाचे वाटतील असे काही नाही. अश्मयुगीन लिंगश्रेष्ठत्वनियम पाळणारा, वर्चस्ववादी, पीळदार, हिंसक, बाहेरख्याली पुरुषही कुणा स्त्रीला आकर्षक वाटू शकतो. कुणी काय सांगावे? अगदी दारू पिऊन मारझोड करणाऱ्या नवऱ्याला मायेने सांभाळणाऱ्या अनेक बायका समाजात आढळतात. त्यामुळे सगळा प्रकार पराकोटीचा सापेक्ष होऊन बसतो. (स्त्रीचे निवडस्वातंत्र्य इथेही तितकेच लागू होते.)
खरेतर तो तसाच सापेक्ष असणे निसर्गास अपेक्षित आहे. कपट, शोषण व बळजबरी यावर आधारित नसलेले कोणतेही स्त्रीपुरुष नाते हे नैतिकच असते, इतका हा साधासोपा नियम आहे. परंतु हितसंबंध व शक्तिसमीकरणे यांच्या रक्षणासाठी मानवसमाज अनेक फुटकळ पोटनियम तयार करून ठेवतो व गुंतागुंत वाढते. आपली सामान्य सामाजिक धारणा अशी आहे की आपण लैंगिक व्यवहारांना इतर सामाजिक व्यवहारांपेक्षा वेगळे व अधिक मूल्यवान मानतो. वास्तविक पहाता हे विभाजन कृत्रिम व अनैसर्गिक आहे. लैंगिकता ही स्त्रीपुरुषसंबंधांचा अविभाज्य व महत्त्वाचा भाग असली तरी हे संबंध कालांतराने लैंगिकतेच्या पल्याड जातात, जावेच लागतात. परंतु शारीरिक संबंधांना आपला 'आधुनिक' समाज 'be all and end all' अशा दृष्टीने पहात असतो. व्यक्तींनाही तो दृष्टिकोन नाईलाजाने स्वीकारावा लागतो व यथावकाश व्यक्तिगत पातळीवरही त्याचे अंतर्गतीकरण (internalisation) होते.
लैंगिक दुर्वर्तन या समस्येचा प्रादुर्भाव नक्की किती आहे, कोणत्या समाजस्तरात आहे यावरही टोकाचे मतभेद दिसतात. एकीकडे पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेची विदारक वास्तविकता, राजरोस घडणारी अपहरणे- बलात्कार- लैंगिक दास्य, सामाजिक वैमनस्यातून होणारे भीषण लैंगिक गुन्हे आणि दुसरीकडे चित्रपटविश्वातील विरळ, झगमगाटी, ऐषोआरामी, चढाओढीच्या वातावरणात होणारे अर्धसंमत लैंगिक शोषण या दोहोंना एका तराजूत कसे तोलणार हा सवालही अगदी रास्त आहे. 'स्त्रीजातीची एकजूट' वगैरे घोषणा ऐकताना कितीही स्फूर्तीदायक भासल्या तरी जिच्या हाती माध्यमरूपी कर्णा आहे तिचाच आवाज सर्वदूर पोचणार हे उघड आहे.
मला न उलगडलेला सर्वात मोठा सवाल, या चळवळीत पुरुषांचा सहभाग किती व कोणत्या पातळीचा असावा हा आहे. ही 'समस्या' चार भिंतींआडून बाहेर काढून भरचौकात आणली गेली हे निःसंशय स्वागतार्ह आहे. हे स्त्रीवर्गाने केवळ स्वतःच्या हिंमतीवर, माध्यमक्रांतीचा सजग वापर करत साध्य केले आहे. सुजाण पुरुषांनी याला पूर्ण समर्थन द्यावे असे कुणीही (स्त्री!) म्हणेल.
परंतु प्रत्येक 'संता'ला भूतकाळ असतोच. प्रत्येकाच्या गतायुष्यात एखादी चित्तरकथा घडलेली असतेच (ज्यांची नसेल त्यांना माझा भक्तियुक्त दंडवत!). बालवयातील पुरुष, पौगंडावस्थेतील पुरुष, प्रौढ पुरुष हे कमीअधिक प्रमाणात उत्क्रांत (Evolve) होतच असतात. सामाजिक घटकांचा प्रभाव पडून त्यांची मानसघडण (conditioning) निरंतर चालू असते. शरीरात नैसर्गिक बदलही होत असतात. पुरुषाच्या हातून कधीकाळी, या विकासप्रक्रियेच्या विशिष्ट टप्प्यावर घडलेले एखादे अनुचित वर्तन (यातून कायदापरिचित अपराध वगळावे) त्याच्याविरुद्ध गणले जाईल व त्याचा जाहीर जमावनिवाडा होईल ही भीती अनेकांना भेडसावत असली तर त्यात आश्चर्य नाही.
असो. आजपर्यंत 'तोंडाला कुलूप' या तत्त्वावर टाळली जाणारी चर्चा आता प्रत्येकाच्या शक्त्यनुसार उघडपणे व निर्भीडपणे होऊ लागली असून चर्चाविषयाचा सखोल ऊहापोह करण्याचे प्रयत्न होत आहेत ही माझ्यामते सर्वात लक्षणीय गोष्ट आहे. ज्याप्रमाणे 2014मधील मोदी यांच्या देदिप्यमान विजयाने अनेक दुढ्ढाचार्यांना आपली भेकड, पोकळ धर्मनिरपेक्षता पुन्हा तपासून पाहण्यास भाग पाडले तसेच मीटू चळवळीमुळे आपण सर्व आपली गृहीतके व त्यांचे वेगळाले पैलू प्रामाणिकपणे पडताळून पाहण्यास उद्युक्त होऊ अशी आशा. मजकडून या चळवळीस सस्नेह शुभेच्छा.
वाचने
19670
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा धागा चर्चा जरा वेगळ्या
सुरेख आणि अतिशय संयत लेख. खूप
धन्यवाद
In reply to सुरेख आणि अतिशय संयत लेख. खूप by यशोधरा
लेखामधे बराचसा समतोल साधल्या
धन्यवाद
In reply to लेखामधे बराचसा समतोल साधल्या by उगा काहितरीच
लेख आवडला आणि
धन्यवाद
In reply to लेख आवडला आणि by नाखु
माफ करा
हो
In reply to माफ करा by झेन
लैंगिकतेच शमन कि दमन?
धन्यवाद
In reply to लैंगिकतेच शमन कि दमन? by प्रकाश घाटपांडे
छान लेख
लग्नाआधी शारिरीक संबंधांची
In reply to छान लेख by सूर्यपुत्र
समाजव्यवस्था
In reply to छान लेख by सूर्यपुत्र
अत्यंत संयत लेख
एकंदरीत स्त्रीने प्रौढपणे , कुठल्याही प्रकारच्या दडपणाला बळी न पडता स्वतःच्या भावनांचे प्रदर्शन योग्य व्यक्तीपुढे करणे शिकले पाहीजे आणि याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे स्त्रीच्या कुठल्याही प्रकारच्या जवळीकीला पुरूषाने त्याच नजरेने न पाहणे शिकले पाहिजे.या मताशी एकदम सहमतकाही स्मार्ट अॅप्स आहेत का ?
या वयात काय उपयोग होणार आहे
In reply to काही स्मार्ट अॅप्स आहेत का ? by माहितगार
=)) खाली फडके साहेबांच्या
In reply to या वयात काय उपयोग होणार आहे by विशुमित
:)
In reply to =)) खाली फडके साहेबांच्या by माहितगार
हो
In reply to काही स्मार्ट अॅप्स आहेत का ? by माहितगार
Better safe than sorry
तुमचे 'गृहखाते' एकदम कडक
In reply to Better safe than sorry by रविकिरण फडके
निःशब्द!
In reply to Better safe than sorry by रविकिरण फडके
भारतीय पुरुषाशी एकूणच बोलणं
लेख आवडला हे सांगायचंच राहिला
In reply to भारतीय पुरुषाशी एकूणच बोलणं by वीणा३
:-)
In reply to लेख आवडला हे सांगायचंच राहिला by वीणा३
माझे मत
In reply to भारतीय पुरुषाशी एकूणच बोलणं by वीणा३
हे दोन्ही बाजूनी आहे
In reply to भारतीय पुरुषाशी एकूणच बोलणं by वीणा३
सहमत
In reply to हे दोन्ही बाजूनी आहे by मराठी कथालेखक
बरोबर आहे, पण
In reply to भारतीय पुरुषाशी एकूणच बोलणं by वीणा३
उत्तम लेख.
फरक
In reply to उत्तम लेख. by सस्नेह
एखादा सभ्य पुरुष एखाद्या
In reply to उत्तम लेख. by सस्नेह
स्नेहांकिताजी,
In reply to उत्तम लेख. by सस्नेह
धन्यवाद,
In reply to स्नेहांकिताजी, by मराठी कथालेखक
सभ्य आणि प्रगल्भ पुरुषाला
In reply to धन्यवाद, by सस्नेह
समजले नाही.
In reply to उत्तम लेख. by सस्नेह
वेल, 'प्रतिसाद' हा शब्द
ईतर वाचकांचा गैरसमज
In reply to वेल, 'प्रतिसाद' हा शब्द by सस्नेह
:-)
In reply to ईतर वाचकांचा गैरसमज by माहितगार
@ चलत मुसाफिर
In reply to :-) by चलत मुसाफिर
+१
In reply to @ चलत मुसाफिर by माहितगार
+1
In reply to @ चलत मुसाफिर by माहितगार
पहिले दृष्टीक्षेप
जरासा फरक
In reply to पहिले दृष्टीक्षेप by गामा पैलवान
दुसरी महत्वाची बाब ही की काही
ग्रामीण भागात राहणाऱ्या
फक्त एकच
In reply to ग्रामीण भागात राहणाऱ्या by Ram ram
I love you, वा तत्सम
माझे मत
In reply to I love you, वा तत्सम by वामन देशमुख
मी २ चर्चा योग्य मिपा धागे