पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ७
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आधीच्या भागांची लिंक
भाग १ https://www.misalpav.com/node/43088
भाग २ https://www.misalpav.com/node/43118
भाग ३ https://www.misalpav.com/node/43144
भाग ४ https://www.misalpav.com/node/43170
भाग ५ https://www.misalpav.com/node/43224
भाग ६ https://www.misalpav.com/node/43298
मागील प्रकरणात आपण म्हटल्याप्रमाणे आता ह्या पहिल्या प्रकरणाच्या शेवटच्या भागात आपण कोण कोणत्या राष्ट्रांनी कसा अन कधी भाग घेतला, बऱ्याच लांबलेल्या ह्या राजकीय नाट्याच्या सुत्राधारांचे अन कलाकारांचे पुढे काय झाले ह्याचा थोडक्यात आढावा घेऊ आणि समारोप करू
पहिले महायुद्ध!
प्रकरण १ भाग ७
अशाप्रकारे ४ ऑगस्टला रात्री १२ वाजता इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारल्यावर हा जुलैचा पेच संपला, जग अनाहूतपणे एका महाभयंकर युद्धात ओढेले गेले. त्यावेळी काही मोजके द्रष्टे सोडले तर पुढे काय वाढून ठेवले आहे ह्याची कल्पना देखील कुणाला आलेली नसणार. पहिले महायुद्ध सुरु झाले होते.
दिवाळीत लवंगीची माळ लावताना असे होते कि बऱ्याचदा आधी वात नुसतीच धुमसत राहते आणि मग अगदी आता विझली कि काय असे वाटत असताना अचानक पहिला फटाका फुटतो त्यानंतर धडधड फटाक्यांची माळच सुरु होते, एवढेच नाहीतर माळ संपल्या नंतरही एखाद दुसरा फटाका अधून मधून फुटतो तसेच काहीसे इथे झाले.
५ ऑगस्ट रोजी मॉन्टेनेग्रो ह्या सर्बियाच्या शेजारील चिमुकल्या बाल्कन देशाने ऑस्ट्रिया विरुद्ध युद्ध पुकारले. दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ ऑगस्टला सर्बियाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले त्याच दिवशी ऑस्ट्रियाने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.९ ऑगस्टला मॉन्टेनेग्रोने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.११ ऑगस्टला फ्रांसने तर १२ ऑगस्टला इंग्लंडने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले.२२ ऑगस्ट रोजी ऑस्ट्रियाने बेल्जीयम विरुद्ध युद्ध पुकारले. खरेतर ऑस्ट्रिया आणि बेल्जियमचा काही तंटाच नव्हता आणि युद्ध पुकारल्यावरही पुढची साडेचार वर्षे ऑस्ट्रियाचा एकही सैनिक बेल्जियम विरुद्ध लढला नाही कि एक गोळीही बेल्जीयमने ऑस्ट्रियाविरुद्ध झाडली नाही. ऑस्ट्रियाने युद्ध पुकारणे ही फक्त एक औपचारीकता होती आणि युतीचा धर्म. २३ ऑगस्टला मात्र एक उल्लेखनीय भिडू ह्या युद्धात उतरला तो म्हणजे जपान. जपानने ह्यायुद्धात फ्रांस इंग्लंड रशिया म्हणजे Triple Entanteच्या बाजूने उडी घेतली.जपानचा आणि इंग्लंडचा संरक्षणात्मक करार जरी असला तरी त्या कराराप्रमाणे जर्मनी विरुद्ध युद्धात उतरावे असे जपानवर बंधन नव्हते, तशी अपेक्षाही इंग्लंडने केली नव्हती पण ह्या निमित्ताने चीन आणि आग्नेय आशियातल्या जर्मन वसाहतीवर आपण डल्ला मारू शकू ह्या लालसेने जपानेने युद्धात उडी घेतली.त्यानी चीन मधील चिंग ताओ, शान्ग्तून हे जर्मन अखत्यारीतले प्रदेश हस्तगत केले. शिवाय प्रशांत महासागरातली काही बेटे (मारियाना, कॅरोलिना आणि मार्शल आयलंड्स) हस्तगत केली.ह्यापलीकडे प्रत्यक्ष युरोपातल्या युद्धावर जपानने युद्धात भाग घेतल्याने फार काही फरक पडला नाही. फार तर असे म्हणू कि प्रथमच युरोपातल्या भांडणात कुणी युरोप बाहेरची शक्ती सामील झाली.
१ नोव्हेंबर १९१४रोजी रशियाने ओट्टोमान साम्राज्यावर युद्ध पुकारले. कारण झाले होते २८ ऑक्टोबर १९१४ रोजी काळ्या समुद्रातली रशियन बंदरं थिओडोसिया आणि सेवास्टोपोलवर तुर्की आरमाराने केलेला हल्ला.तुर्कस्थान ह्या युद्धात सामील कसे झाले ह्याची हकीकत मोठी रंजक आहे. रशिया आणि तुर्कस्तान मध्ये काळासमुद्र, भूमध्य समुद्र इथल्या सामुद्री संचारावरून संघर्ष होता हे मागे आलेलेच आहे. पण इतर युरोपीय राष्ट्रांच्या पुढे तुर्कस्तानचे आरमार तुटपुंजे आणि मागास होते. आपले आरमार स्वत: अद्ययावत करायची तुर्कस्तानची पात्रताही नव्हती पण रशियाशी मुकाबला करायला तसेच ग्रीक इटली बल्गेरिया अशा युरोपीय /बाल्कन देशावर वचक राहावा म्हणून त्यानी इंग्लंडकडे अत्याधुनिक (तत्कालीन) अशा ड्रेडनॉटप्रकारच्या दोन युद्ध नौका बनवून द्यायची ऑर्डर दिली होती.त्यांची नावे ही ठरवली होती ‘सुलतान ओमार’ आणि ‘रशीद’. ह्या युद्ध नौका जवळपास तयार होत्या अगदी तुर्की खलाशांचे पथक त्या वापरायचे प्रशिक्षण आणि त्यांचा प्रत्यक्ष ताबा घ्यायला इंग्लंड मध्ये आलेही होते पण इंग्लंडच्या नाविक दल मंत्री असलेल्या विन्स्टन चर्चिलनी ३१ जुलै रोजी तुर्कस्तानच्या निषेधाला/विरोधाला न जुमानता, अचानक ह्या युद्ध नौका तुर्कस्तानला सुपूर्द न करता, ब्रिटीश आरमारात सामील केल्या. वर आणि जर तुर्कस्तान तटस्थ राहणार असेल किंवा त्यांच्या बाजूने युद्धात उतरणार असेल तर युद्ध सुरू असे पर्यंत दर दिवशी एक हजार पौंड एवढी क्षुल्लक रक्कम भरपाई दाखल द्यायची तयारी दर्शवली.ह्या दोन युद्ध नौकांकरता तुर्कस्तानने ६० लाख पौड एवढी प्रचंड रक्कम मोजली होती. आणि हा सगळा किंवा ह्यातला काही पैसा जनतेकडून वर्गणी तसेच रोख्याच्या स्वरूपात उभा केला होता.खरे सांगायचेतर ही इंग्लंडने केलेली तुर्कास्तानाची शुद्ध फसवणूक आणि ब्लॅकमेलचाच प्रकार होता कारण अशाच युद्ध नौका बनवायची ऑर्डर ग्रीसनेही त्याना दिलेली होती पण त्या नौका मात्र इंग्रजांनी आपल्या आरमारात सामील करून घेतल्या नाहीत उलट वेळेवर त्याना सुपूर्द केल्या.पण तेव्हा तरी तुर्कस्तान चरफडत स्वस्थ बसंण्या व्यातिरिक्त काहीही करू शकला नाही.
पुढे ४ ऑगस्ट रोजी युद्ध घोषित झाले तेव्हा जर्मनीच्या गोबेन आणि ब्रेस्लाव्ह ह्या दोन युद्ध नौका भूमध्य समुद्रात तैनात होत्या. युद्ध सुरु झाल्या झाल्या लगेच टूलोन आणि माल्टा येथील आपापल्या नाविक तळावरून फ्रेच आणि ब्रिटीश आरमार त्यांच्या मागे लागले. कसेबसे त्याना चुकवत ह्या युद्ध नौका इस्तंबूलच्या बंदरात पोहोचल्या आणि त्यानी तुर्कस्तानकडे आश्रय मागितला. तुर्कस्तानने तो दिला आणि तटस्थ असल्याने ब्रिटीश आणि फ्रेच आरमार हात चोळत बसले.आंतरराष्ट्रीय कायद्याने एखादा देश तटस्थ असल्याने २४ तास त्यांच्या बंदरात कुठलीही युद्ध नौका अश्रय घेऊ शकते. पण २४ तास उलटल्यावर मात्र त्यांना ते बंदर सोडून बाहेर पडावे लागतेच.त्यामुळे २४ तासानंतर काय करायचे हा प्रश्न होताच? मग जर्मन सरकारने तुर्कस्तान पुढे प्रस्ताव ठवला. त्याना नुकतीच इंग्लंडने केलेली तुर्कस्तानची फसवणूक माहिती होती. त्यानी तुर्कस्तानने त्याच्या बाजूने युद्धात उतरण्याच्या बदल्यात ह्या दोन अत्याधुनिक आणि सामर्थ्यवान नव्या कोऱ्या जर्मन युद्ध नौका फुकट त्याना द्यायची तयारी दाखवली. तुर्कस्तान लगेच तयार झाला. त्याप्रमाणे मग तुर्की झेंडे आणि गणवेश चढवून जर्मन नौसैनिकानीच थिओडोसियावर गोळाबारी केली.ह्याबरोबरच युद्ध मध्य पुर्वेतही पसरले आणि कॉकेशस पर्वत, अरेबिया, इजिप्त, आणि आजचे सिरीया, इराक हे प्रदेश पहिल्यामहायुद्धाचे रणक्षेत्र बनले. पुढे जे घडले ते पाहता ह्या दोन नौकांचा सौदा तुर्कस्तानला चांगलाच महागात पडला आणि त्यांचे साम्राज्य विखंडीत झाले.त्यातून सौदी अरेबिया, लेबनन, सिरीया, जोर्डन, इराक, आणि इझ्रायाल असे नवे देश निर्माण झाले.
मे १९१५ मध्ये बराच वेळ कुम्पणावर बसलेल्या इटलीने शेवटी जर्मनी आणि ऑस्ट्रिया विरुद्ध युद्धात उडी घेतली.पण इटली लष्करी दृष्ट्या इतका कमकुवत होता कि इंग्लंड आणि फ्रांसने मदत केली नसती तर १९१७ साली तो अक्खा जर्मनीने पादाक्रांतच केला असता. इटली एका प्रकारे त्रिसदस्यीय देशांच्या पायातले लोढणेच बनला म्हणाना.ह्या युद्धामुळे इटलीत क्रांती होऊन लोकसत्ता नाहीशी झाली आणि तिथे बेनिटो मुसोलिनीची हुकुमशाही अवतरली अर्थात हे नंतर म्हणजे १९२२ साली झाले.
दोन अजून बाल्कन देश नंतर युद्धात सामील झाले. रुमानियाचा डोळा आधी पासून हंगेरीच्या ताब्यातल्या ट्रान्ससिल्वेनिया ह्या प्रांतावर होता, त्याचा लचका तोडता यावा म्हणून त्यानी ऑगस्ट १९१५ मध्ये ऑस्ट्रिया विरुद्ध युद्धात उडी घेतली तर मागे बाल्कन युद्धावेळी नाराज झालेल्या बल्गेरियाने ऑक्टोबर १९१५ साली जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतली.रुमानिया लगेचच जर्मनीने पादाक्रांत केला आणि बल्गेरियाने ऑस्ट्रियन आक्रमणाखाली पिचलेल्या सर्बियाच्या भूभागाचे लचके तीडले, अर्थात युद्ध संपल्यावर हे चित्र पालटले.
एप्रिल १९१७ साली सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा भिडू इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरला. तो म्हणजे अमेरिका.अमेरिका ह्या युद्धात उतरल्याने काय फरक पडला ह्या बद्दल पुढे सविस्तर चर्चा करू.
इतर जी काही पुस्तक मी वाचली त्यात पहिल्या मह्युद्धाचीची सुरुवात कशी व का झाली, युरोपातली परिस्थिती कशी होती आणि कशी बनत / बिघडत गेली हा भाग त्रोटक आणि जुजबी प्रमाणत संगीताला जातो. विशेषत: आपणा भारतीयाना युरोपातल्या तत्कालीन परिस्थिती बद्दल फारच कमी माहिती असते त्यामुळे मुद्दाम हा भाग विस्ताराने थोडा पाल्हाळ लावून संगीतला आहे. तरीही शक्यतो ज्या घटना महायुद्धाशी प्रत्यक्षरित्या संबंधीत आहेत त्यांचाच परामर्श ह्यात घेतला. साम्यवाद, समाजवाद ,कामगार चळवळी,औद्योगिक क्रांती, त्यातून उदयाला आलेली भांडवलशाही आणि तिचे आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध, वसाहतवाद ह्याना होता होईल तो दूरच ठेवले पण त्यांचा पहिल्या महायुद्धाशी अप्रत्यक्ष संबंध आहेच. ह्या इतिहासाचा परामर्श घेताना अनेक व्यक्तिमत्वांची आपली ओळख झाली ह्यातले काही पुढेही आपल्याला भेटत राहतील पण काहींचा पुढे उल्लेख येत नाही. हे लोक पहिल्या महायुद्धाचा भडका उडायला कारणीभूत झाले, ह्या राजकीय नाट्याचे ते रंगमंचावरचे सक्रीय कलाकार होते म्हणून पुढे त्यांचे काय झाले हे थोडक्यात सांगून पहिले प्रकरण आपण आटोपते घेऊ.
गाव्रीलो प्रिन्सिप बद्दल मागे आलेलेच आहे.ज्या तेरेत्सीन तुरुंगात तो मेला तेथे पुढे दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा ज्यू कॉन्संत्रेशन कॅम्प( छळ छावणी ) होता. हजारो ज्यू वंशीय आणि युद्ध कैदी तेथे मारले गेले.आता हा भाग झेक प्रजासत्ताकात येतो.
फ्रांझ फर्डिनांड च्या हत्येमागचा सूत्रधार आणि The Black Hand संघटनेचा संस्थापक द्रगुतीन दिमित्रीवीच उर्फ एपिस ह्याच्यावर त्यांच्या सर्बियन शासनाने लष्करी कारवाई केली (Court Marshal) आणि २४ जून १९१७ साली त्याला गोळ्या घालून मारले गेले. आरोप होता १९०३ साली त्याने केलेला राजा अलेक्झांडर आणि राणी ड्रेगाचा निर्घृण खून.
एपिसचा प्रतिस्पर्धी आणि महान मुत्सद्दी सर्बियन पंतप्रधान निकोला पॅसेज हा युद्धकाळात सर्बियाचा पंतप्रधान राहिला. त्याने आपल्या देशाची वाताहत पहिली . पुढे युद्ध संपल्यावर व्हर्साय इथे झालेल्या वाटाघाटीत सर्बियाच्या वतीने भाग घेतला आणि त्याने सर्बियाचे आणि सर्व स्लाव लोकांचे स्वप्न असलेले (प्रीन्सिपचे सुद्धा) सर्व “स्लाव संघराज्य” म्हणजे युगोस्लाविया बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली.१९२६ साली तो वारला
ऑस्ट्रो हंगेरियाचा सम्राट फ्रांझ जोसेफ नोव्हे.१९१६ साली वारला आणि तो हप्स्बार्ग राजघराण्याचा शेवटचा शासक ठरला.त्याचा पुतण्या कार्ल ह्याने अल्प काळ शासन केले पण १९१८ साली त्याला पदच्युत केले गेले.
जुलै पेचातला महत्वाचा व्यक्ति असलेला ऑस्ट्रियाचा परराष्ट्र मंत्री काउंट लिओपोल्ड बर्खटोल्ड ह्याला १९१५ साली बडतर्फ केले गेले. त्यानंतर त्याने राजकारणातून निवृत्ती स्वीकारली. १९४२ साली तो हंगेरीतच वारला.
ऑस्ट्रियाच्या सर्बियावरील लष्करी कारवाईत खोडा घालणारा हंगेरियन प्रधान मंत्री इस्पहान तिशा हंगेरियन प्रधानमंत्री म्हणून युद्ध जवळ जवळ संपे पर्यंत कार्यरत राहिला. युद्धाच्या शेवटी शेवटी हंगेरीत साम्यवादी (बोल्शेविक) क्रांती झाली.आणि क्रांतीकारकानी ३१ ऑक्टोबरला त्याच्या घरात घुसून बायकोसामोरच त्याला गोळ्या घालून मारले गेले
ऑस्ट्रियन सेनापती कोनराड फॉन हॉटझेनडोर्फ हा युद्धात ऑस्ट्रियाचा सेनाध्यक्ष होता. त्याचे लष्करी कर्तृत्व आणि ऑस्ट्रियन सैन्याची कामगिरी इतकी लज्जास्पद होती कि शेवटी त्याला सेवेतून बडतर्फ केले गेले.पुढे तो एक निराश, हरलेला माणूस म्हणून जगला आणि १९२५ साली तशाच शोचनीय परिस्थितीत वारला.
जर्मन चान्सेलर बेथमान होल्वेग जर्मनीचा चान्सेलर म्हणून १९१७ साला पर्यंत होता पण उत्तरोत्तर त्याचा राजकारणातला प्रभाव कमी होत गेला आणि सत्ता हळूहळू जर्मन सैन्याच्या हातात गेली. १९१७ साली त्याला बडतर्फ केले गेले. १९२१ साली तो विमनस्क अवस्थेत वारला.
जर्मनीचा शहेनशहा कैसर विल्हेल्म दुसरा हा सर्व युद्धभर जर्मनीचा सम्राटच राहिला. शेवटी युद्ध हरल्यावर युद्ध बंदीच्या २ दिवस आधी त्याला गादी सोडून परागन्दा व्हावे लागले. त्याने नेदरलंडस मध्ये राजाश्रय घेतला. त्याला पकडून आणून त्याच्यावर खटला चालवून शिक्षा करायचा जेत्यांचा मनोदय होता पण त्याला नेदरलंडच्या विल्हेल्मिना राणीने स्पष्ट नकार दिला. तो नेदरलंड मध्येच मृत्युपर्यंत म्हणजे ४ जून १९४१ पर्यंत राहिला.१९२० साली त्याची पहिली पत्नी वारल्यावर दोनच वर्षानी त्याने हर्मैनी रुस ह्या जर्मन विधवा राजकन्येशी लग्न केले. तो इतरही काही बाबतीत थोडा सुदैवी होता असे म्हणता येते. त्याला शत्रू फ्रान्सला दुसर्या मह्युद्धात जर्मनीने खडे चारल्याचे आणि बेचिराख करत पूर्णपणे जिंकलेले पाहण्याचे भाग्य लाभले. त्याने त्यावेळी हिटलरला पत्र लिहून त्याचे अभिनंदनही केले होते त्यात त्याने परत एकदा जर्मनीत राजेशाही स्थापन करावी व त्याला गादिवर बसवावे असे सुचवले होते अर्थात हिटलरने दुर्लक्ष केल. (असे म्हणतात कि ते पत्र हिटलर ने मोठ्याने वाचून दाखवले आणि मग इतर जनरल्स कडे पाहून उद्गारला “काय मूर्ख माणूस आहे!”)त्याचा भाऊ आणि रशियाचा सम्राट झार निकोलस पेक्षा मात्र तो खरेच सुदैवी होता असे म्हणावे लागते.
रोमोनाव्ह घराण्याचा शेवटचा शासक झार निकोलस ह्याला १९१७ साली साम्यवादी क्रांतिकारकांनी पदच्युत केले आणि कैदेत टाकले.१७ जुलै १९१८ साली त्याला त्याच्या बायको आणि ५ मुलांसमवेत गोळ्या घालून मारले गेले. सगळ्यात धाकटा मुलगा अलेक्सी तेव्हा १४ वर्षांचा होता. दिसायला अत्यंत सुंदर असलेली त्याची मुलगी राजकुमारी अनास्ताशिया हि त्या हत्याकांडातून वाचली असावी आणि युरोपात कुठे कुठे राहत असावी अशा वावड्या नेहमी उठत. ह्या विषयी काही पुस्तकंलिहिली गेली, कोन्स्पिरसी थेअरीज लिहिल्या गेल्या. चित्रपट ही निघाले पण त्या फक्त अफवाच होत्या.
झारचा परराष्ट्र मंत्री सर्गी सात्सोनाव्ह ह्याला पुढे १९१६ साली झार च्या बायकोने, झारीनाने बडतर्फ केले. रशियात जेव्हा बोल्शेविक क्रांती झाली तेव्हा त्या क्रांतीचा विरोध करणाऱ्या गटात तो सामील झाला. त्यांच्या पराभवानंतर त्याने फ्रांस मध्ये आश्रय घेतला. तेथेच तो १९२७ साली वारला.
फ्रेच राष्ट्राध्यक्ष प्वान्कारे १९२० पर्यंत फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष राहिला. पुढे तो दोनदा फ्रान्सचा पंतप्रधानही झाला..१९३४ साली तो वारला तेव्हा तो फ्रांस मधला विजयाचा शिल्पकार म्हणून लोकप्रिय आणि आदरणीय नेता होता.
फ्रेच पंतप्रधान रेने विवियानी हा मात्र इतका सुदैवी नव्हता. सुरुवातीच्या फ्रेंच सैन्याच्या पराभवाला त्याला जबाबदार धरत त्याला ऑक्टो१९१५ साली पदावरून हटवले गेले. त्यापुढे तो राजकारणातून निवृत्त झाला आणि निवृत्तीतच १९२५ साली तो वारला.
ब्रिटीश परराष्ट्र मंत्री सर एडवर्ड ग्रे १९१६ सालपर्यंत उदारमतवादी मजूर सरकारचा परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत होते. पुढे ते सरकारच कोसळले. युद्धानंतर १९२०साली तो अमेरिकेत इंग्लंडचा राजदूत म्हणून गेला. पण अधू डोळे आणि प्रकृती साथ देईनाशी झाल्याने त्यानी निवृत्ती स्वीकारली. १९२८ साली ते वारले.
इंग्लंडचे नाविकदल मंत्री( First Sea Lord Of Admiralty- काय खतरनाक बिरूद आहे, मस्त! हे इंग्लिश लोक नाव भारीच ठेवतात आपण अर्थमंत्री किंवा finance Minister म्हणतो ते मात्र Chancellor Of Exchequer म्हणतात. )... असलेल्या , स्वत:च्या अखत्यारीत नौसेनेला युद्ध तयारी करण्यासाठी आदेश देणार्या, तुर्कस्तानला जहाजांच्या सौद्यात तोंडघशी पडणाऱ्या विन्स्टन चर्चिल ह्यांनी महायुद्धाच्या सुरुवातीला जवळ जवळ वर्षभर नाविक्दल मंत्री म्हणून काम पहिले. पुढे दार्दानेल्स आणि गालीपोलीच्या तुर्की मोहिमेत आलेले प्रचंड अपयश आणि हानी करता जबाबदार धरून त्याना नोव्हे१९१५ मध्ये पदावरून हटवले गेले. ते सरकारमध्ये काही काळ राहिले पण मग त्यानीच राजीनामा दिला अन प्रत्यक्ष युद्धात सहभागी झाले. ते चक्क खंदकात जाऊन लढले, चांगले ४ महिने.पुढे त्याना परत सरकार मध्ये बोलावले गेले. त्यानी हवाईदल मंत्री आणि दारुगोळा निर्मितीचे कामही पहिले. युद्धानंतर ते इंग्लंडचे अर्थमंत्री होते पण दार्दानेल्स मोहिमेचा कलंक फार मोठा होता. त्यामुळे नंतर ते अनेक वेळा ह्या कारणावरून टीकेचे धनी होत त्यांना अनेक चौकशी आयोगाना सामोरे जावे लागले.
१९२९ नंतर जवळ जवळ १० वर्षे ते राजकीय विजनवासातच गेले होते. त्यानी कायम नाझी पक्ष आणि हिटलरच्या जर्मनीतल्या उदयावरून इंग्लंडला सावध करायचा प्रयत्न केला पण सरकार आणि लोकमत त्यांच्या विरोधात होते. लोकांनी त्यांची युद्धखोर, प्रसिद्धीलोलुप म्हणून हेटाळणी केली. अखेर दुसर्या महायुद्धाचे ढग जसजसे क्षितिजावर जमू लागले तसतसे त्यांचे म्हणणे लोकांना पटले आणि त्यांचे भाग्य ही पुन्हा उजळले. दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर सप्टे १९३९ साली परत एकदा ते ब्रिटनचे नाविकदल मंत्री झाले.मे१९४० साली ते पंतप्रधान झाले. नाझी झंझावातापुढे एकट्या पडलेल्या ब्रिटनमध्ये ते खंबीरपणे पाय रोवून उभे राहिले आणि जवळपास निश्चित झालेल्या पराभवातुन इंग्लंडला बाहेर काढून विजयाप्रत घेऊन गेले. पुढे नंतर ही ते इंग्लंडचे पंतप्रधान झाले.१९५५ साली वयाच्या ८०व्य वर्षी त्यानी राजकारणातून निवृत्ती घेतली आणि १९६५ साली ते वयाच्या ९० व्या वर्षी वारले. आपल्या दोन्ही युद्धांच्या तसेच आधी भाग घेतलेल्या बोअर युद्धाच्या हकिगती त्यानी लिहिल्या इतर ही विपुल साहित्य लिहिले जे बरेच लोकप्रिय झाले. साहित्यसेवे बद्दल त्यांना १९५३ साली नोबेल पुरस्कार मिळाला.ते चित्र ही उत्तम काढत असत.ते वारले तेव्हा ते फक्त ब्रिटन मधीलच नाही तर जगातील सगळ्यात जास्त प्रसिद्ध आणि सन्माननीय व्यक्ती होते.
एका अर्थी त्यांच्या गुंतागुंतीच्या आणि विरोधाभासाने भरलेल्या व्यक्तिमत्वाकडे पाहता ते १९व्या आणि २०व्या शतकाच्या संधीकालात युरोपात प्रचलित असलेल्या सनातनी आणि आधुनिक, उदार आणि पुराणमतवादी, लोकशाहीवादी आणि साम्राज्यवादी अशा परस्पर विरोधी विचारधारेचे विचित्र मिश्रण होते. तत्कालीन ब्रिटीश समाजपुरुषच त्यांच्या रूपाने इतिहासाचे ओझे खांद्यावर घेऊन उभा राहिला आहे असे त्यांच्या चरित्राकडे पाहून नेहमी वाटते.
----X----X----X----X----
असो तर अशा प्रकारे पहिले प्रकरण इथे समाप्त होते आता पुढच्या प्रकरणात आपण जर्मनीची दोन आघाड्यावर लाढण्यासाठीची योजना आणि सुरुवातीच्या घटना ह्याबद्दल पाहणार आहोत पण त्या कडे जाण्या आधी म्हणजे पहिल्या महायुद्धाची कहाणी आता खऱ्या अर्थाने सुरु करताना वर दिलेल्या युरोपचा एक थोडक्यात आढावा
१९व्या शतकातल्या युरोपकडे बघताना जाणवते कि बऱ्याच घडामोडी, उलथापालथी तेथे घडत होत्या पण त्याची दखल मात्र सर्वच पातळ्यांवर घेतली जात नव्हती. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात कामगार वर्ग - मध्यम वर्ग उदयाला आला आणि झपाट्याने फोफावला. विशेष म्हणजे हा वर्ग चरीतार्थाच्या गरजे करता म्हणून का होईना, पण शिकलेला आणि मुख्य म्हणजे इतर शेतकरी, शेतमजूर वर्गाप्रमाणे जमिनीशी बांधलेला न राहता कामाच्या शोधात देशांतर करणारा होता.त्याकाळी जगताला कमीतकमी युरोपातला कुठलाही माणूस कुठेही जाऊन राहू शकत असे नोकरी धंदा करू शकत असे शिक्षण घेऊ शकत असे. पासपोर्ट व्हिसा असल्या भानगडी नव्हत्या राष्ट्र राष्ट्रांच्या सीमा भिंती इतक्या उंच झालेल्या नव्हत्या. शिक्षणाचा आणखी एक परिणाम (साईड इफ्फेक्ट म्हणा हवंतर) म्हणजे ह्या वर्गात वैचारिक चळवळी मूळ धरू लागल्या. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जनता ही आता पर्यंतच्या इतिहासाप्रमाणे फक्त निष्क्रिय पार्श्वभूमी/ मूकदर्शक न राहता सक्रीय घटक बनू लागली. राजेशाह्या, सामंतवाद ह्याना ह्या नवीनच सक्रीय झालेल्या घटकाशी जुळवून घेत पुढचे डावपेच आखावे लागणार होते. मग आतापर्यंत राजा देव धर्म ह्यांच्या साठी बलिदान करण्याच्या भावनाप्रधान आव्हानाला देश देशप्रेम देशभक्ती राष्ट्र भक्ती ह्यांची फोडणी दिली गेली. राष्ट्रवादाचा उगम आणि त्याची १९व्या( आणि विसाव्याही) शतकातली उत्क्रांती ह्याची साक्ष देतात.वरकरणी राजाला नामधारी केलेलं आहे आणि राज्यशकट हाकण्यात जनतेला काही अधिकार दिले गेले आहेत असे दाखवून काही काळ तरी ह्या नव्या घटकाला काबूत ठेवण्याचे प्रयत्न केले गेले त्याला मर्यादित प्रमाणात यश ही मिळाले.पण सर्वसामान्य जनतेतून वर आलेल्या अनेक विचारवंताना ह्यातला फोलपणा काळात होता मार्क्स- एंगल्स, रोझा लग्झेम्बर्ग, लेनिन असे अनेक लोक राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्य फोल आणि भ्रामक संकल्पना असून त्या एकजूट होऊ पाहणाऱ्या शेतकरी-कामगार वर्गात फुट पडून त्यांचे शोषण करण्यासाठी, त्याना गुलाम बनवण्यासाठी वापरल्या जातात अशा प्रकारची मते मांडू लागले होते.
ह्या नव मध्यमवर्गाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो सद्य राजकारण, अर्थव्यवस्था , शासनाची धोरणे ह्या बाबत कमालीचा जागरूक होता. शिवाय नव्याने उदयाला आलेल्या शहरांमध्ये. औद्योगिक वसाहत्यांमध्ये एकत्र झालेला होता शिक्षण,पुस्तक, पत्र, प्रवास, निरनिराळी संमेलने आणि मंडळे , बातम्या अशा निरनिराळ्या मार्गाने तो सांधला गेलेला होता. ही परिस्थिती विचार मंथन आणि वैचारिक प्रबोधनाला अत्यंत पोषक ठरत होती. हा वर्ग मोठ्या प्रमाणात ग्राहकही असल्याने नवअर्थव्यवस्थेचा कणा बनत चालला होता. १७व्या -१८व्या शतकात साम्राज्यवादी सत्ता वसाहतीतून मसाले, कापड-चोपड, चहा, जड-जवाहीर, रेशीम असल्या वस्तू ज्या आणत त्या प्रामुख्याने अल्पसंख्य असलेल्या श्रीमंत धनिक जमीनदार सरंजामदार राजे उमराव ह्यांच्या साठी.म्हणजे आंतरारष्ट्रीय व्यापार कितीही फायद्याचा असला तरी त्याचा मुख्य घटक जो ग्राहक तो ह्या संभ्रांत वर्गातून येत असल्याने त्यांच्या इच्छ मर्जी ह्याचीच कदर व्हायची. पण औद्योगिक क्रांतीनंतर ह्या व्यापाराचे किंवा व्यवहाराचे स्वरूप अमुलाग्र बदलले. कच्चा माल वसाहतीतून आणून त्यावर प्रक्रिया करून तो विकणे अधिक किफायतशीर होते पण त्याकरता मध्यमवर्गाची, त्यांच्या क्रयशक्तीची गरज होती.त्यामुळे नव्याने उदयाला आलेल्या भांडवलदार वर्गाला त्यांची दखल घेणे भाग होते.
औद्योगिक क्रांतीनंतर धर्माची सर्वसामान्य लोकांवरची त्यांच्या जीवनावरची पकड जसजशी ढिली होऊ लागली, तसतसे प्रबोधनाचे एक पर्व युरोपात सुरु झाले. १९व्या शतकाचा इतिहास पाहिल्यास हे आपल्याला सहज जाणवते . नवनवे वाद (isms) क्रांत्या चळवळी सामाजिक प्रयोग ह्यांनी १९व्य शतकाचा युरोप ढवळून निघालेला दिसतो ह्यातला सगळ्यात प्रभावी वाद म्हणजे राष्ट्रवाद. औद्योगिक क्रांतीनंतर झालेल्या प्रगतीचे एक फलित म्हणजे तिने वसाहतवादाला साम्राज्यवादाला,सरंजामशाहीला दिलेले बळ. युरोप बाहेरच्या उर्वरीत जगाला(म्हणजे अमेरिका सोडून- आशिया आणि आफ्रिका प्रामुख्याने) आपल्या दावणीला बांधून, गुलाम बनवून त्यापासून मिळणाऱ्या उर्जेवर युरोपची उच्च मानवी संस्कृती बहरत होती. कला साहित्य समाजकारण राजकारण संशोधन अशा निरनिराळ्या विषयात नेत्रदीपक प्रगती होत होती. उच्चतर अशा मानवी संस्कृतीने युरोपात चांगलेच बाळसे धरले होते पण अर्थात तिथे ही दैन्य, उपासमारी, बेकारी,बकाली होतीच. शेतकरी – शेतमजूर ह्यांच्या बरोबर नव्यानेच उदयाला आलेल्या कामगार वर्गाचे जीवन हलाखीचे होते. त्याना रोजी १६-१६ तास काम करावे लागत होते आणि तरी पगार तुटपुंजा मिळत असे... कामगारांचे हक्क वगैरे गोष्टी प्रत्यक्षात यायला अजून बराच काल जायचा होता. कामगार स्त्रिया आणि मजुरी करणाऱ्या लहान मुलांचा प्रश्न अजूनच जटील होता.कामगार चळवळी हळू हळू का होईना पण निश्चित आकार घेऊ लागल्या होत्या.त्यांच्या मागण्याना हळूहळू धोरणात्मक स्वरूप येत चालले होते. भांडवलदार मालक-कारखानदाराना अर्थातच हा फार तापदायक प्रकार वाटत होता आणि ते कोणत्या मार्गाने कामगार लढा दाबून टाकता येईल ह्याच्या विचारात होते. जॉन जॉरेस हा त्यासुमारास फ्रांस मधला मोठ्या वकुबाचा कामगार नेता.(इथे हे स्पष्ट केले पाहिजे कि हे फ्रेंच किंवा जर्मन उच्च्चार इंग्लिश प्रमाणे नसल्याने जसे आपण त्यांचे स्पेलिंग वाचतो तसे ते उच्चारात नाहीत उदा हा वरचा जॉन जॉरेस शब्द किंवा नाव , फ्रेंच लोक त्याचा उच्चार ज्यां जॉरे असा करतात.)तो गेले काही दिवस मोठ्या काळजीत होता. युरोपातले बडे कारखानदार आणि अनेक राजकारणी कामगारांचा लढा दाबून टाकण्याचा एक सोपा आणि प्रभावी उपाय म्हणून आता उघड उघड युद्ध सुरु केले पाहिजे असे बोलू लागले होते. राष्ट्र राष्ट्रातली स्पर्धा आणि परस्पराना शह काट शह देण्यासाठीचे गुप्त उघड करार मदार ह्याने अभावितपणे सर्व युरोपियन राष्ट्र शस्त्र साठा करू लागली. पण मागे सांगितल्याप्रमाणे १८७० नंतर म्हणजे जवळपास ४४ वर्षे युरोपच्या मुख्य भूमीवर युध्द असे झालेच नव्हते. युरोपातल्या बहुतांश राष्ट्राच्या सेनानीना (फ्रांस आणि ब्रिटनचा अपवाद वगळता- पण त्याना देखील आफ्रिका भारत अफगानिस्तान सुदान चीन अशा ठिकाणी युद्धाचा अनुभव होता.) प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव असा नव्हताच शिवाय मधल्या जवळपास अर्ध्या शतकाच्या कालखंडात झालेली औद्योगिक प्रगती युद्धावर, युद्धतन्त्रावर कोणते इष्ट-अनिष्ट परिणाम करणार आहे ह्याचा स्पष्ट अंदाज तर कुणालाच येणे शक्य नव्हते.
ह्या प्रबोधनाच्या काळात आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे स्त्रियांचे राजकीय स्थान आणि मताधिकार ह्यानिमित्ताने झालेली चळवळ. त्याला सफ्राजेट चळवळ म्हणून ओळखले जाते.( सफ्रेज म्हणजे मताधिकार किंवा नागरी हक्क) त्याबद्दल पुढे आपण स्वतंत्र प्रकरण घेणार असल्याने आता फक्त उल्लेखच केलेला पुरेसा आहे.
प्रबोधनाचे आणखी एक फलित म्हणजे भारता सारख्या युरोपीय राष्ट्रांची वसाहत असलेल्या राष्ट्रात सुरु झालेल्या स्वातंत्र्य चळवळी आणि स्वातंत्र्य लढे. २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत ह्यातील बहुतांश देशाना स्वातंत्र्य ही मिळाले. पण भारतासारखे एखाद दोन अपवाद सोडता ह्या नवस्वतंत्र राष्ट्रांत लोकशाही अभावानेच आलेली दिसते हे ही एक आश्चर्यच.
विल्हेल्म सारख्या कैसर,राजा, महाराजा, सम्राट अशी बिरुदावली मिरवणार्या लोकाना तर आपण कोणत्याही पेचप्रसंगावर आपले नाते संबंध , दोस्ती ओळख वगैरे वापरून तोडगा काढू शकतो असे वाटत होते. युरोपातली फ्रांस वगळता सगळी राष्ट्र ही राजेशाही, नाममात्र का होईना, असलेली होती आणि त्यावर सगळे एकमेकांचे चुलत मावस आते मामे भाऊच राज्य करत होते. पण ही एक अंधश्रद्धाच होती. बाकी युद्ध वगैरे मोठ्या घटना सोडूनच द्या पण ते एकमेकांच्या आयुष्यात येणार्या अपत्तीपासुनाही एकमेकाना वाचवू शकले नाहीत. फ्रांस आणि इंग्लंडच्या बरोबरीने युद्धात उतरलेल्या रशियात क्रांती झाली तेव्हा झार निकोलसला त्याचा भाऊ असून जॉर्ज वाचवू शकला नाही. त्याला इच्छा झाली नसेल का? कि ज्या भयानक पद्धतीने त्याचा आणि त्याचा कुटुंबियांचा अंत झाला हे पाहून त्याचे आतडे पिळवटून निघाले नसेल का? पण हे राजे असून खरेच खूप दुबळे होते. फार थोड्या गोष्टीवर त्यांचे नियंत्रण होते.
(खाली दिलेले दोन फोटो पहा, युरोपातले जवळपास सगळे राजे हे एकमेकांचे भाऊ बंद होते.
उभे असलेले डावीकडून, १.राजा हाकोन सहावा नॉर्वेचा राजा, २.बल्गेरियाचा राजा झार फर्डीनंड,३.पोर्तुगाल चा राजा मन्युएल दुसरा, ४.जर्मनीचा कैसर विल्हेल्म दुसरा, ५.हेलेणीस चा राजा जॉर्ज पहिला, आणि ६.उंचच उंच राजा अल्बर्ट पहिला, बेल्जीयमचा राजा.
बसलेले उजवीकडून ७.स्पेनचा राजा आल्फोन्सो तेरावा, ८.इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा (आपल्याकडचा प्रसिद्ध पंचम जॉर्ज- “भो पंचम जॉर्ज भूप धन्य, विबुधामान्य भूवरा, पाळी ही वसुंधरा...” हे गाणे मराठी शाळातून तेव्हा घोकायला लावायचे ते ह्याच्या नावाचेच) आणि ९.डेन्मार्कचा राजा फ्रेडरिक सातवा.हा फोटो २० मे १९१० रोजी इंग्लंडचा राजा एडवर्ड सातवा ह्याच्या अन्त्येष्टीसाठी एकत्र आले तेव्हा काढलेला आहे.
हे सगळे राजे एकमेकांचे भाऊबंद होते
तर ह्या दुसर्या फोटोत रशियाचा झार निकोलस डावीकडे ( सगळ्यांचा लाडका निक्की ) आणि इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा एकत्र आहेत, दोघांच्या चेहऱ्यातले साम्य बरेच काही सांगून जाते.त्यांच्या आया एकमेकींच्या सख्ख्या बहिणी तर निकोलस्ची बायको अलीक्स हि जॉर्जची मावस बहिण होती.
भारताकडून पहिल्या महायुद्धात साधारण १५ लाख सैनिक सामील झाले त्यापैकी १ लाख १० हजार सैनिक युद्धात मारले गेले किंवा जखमी झाले.ही आकडे वारी भयंकर आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पाचही मोठ्या युद्धात मिळून साधारण २२ हजार ५०० भारतीय सैनिक मारले गेले आहेत,म्हणजे बघा. १९१४पुर्वी कुणीही भारतीय सैनिक भारतीय उपखंडाबाहेर जाऊन लढला नव्हता. आधुनिक भारतीय सैन्याची जडण घडण आणि एकूणच तिचा पाया ह्या युद्धाने घातला असे म्हटले तर वावगे ठरू नये.
१९३९साली जेव्हा दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा कुणालाही आश्चर्याचा धक्का बसला नाही अनेकाना असे युद्ध सुरु होणार ह्याची जाणीव झालेली होतीच शिवाय ते पहिल्या महायुद्धाप्रमाणेच प्रचंड विनाशकारी आणि दीर्घ काळ चालणारे असणार आहे ह्याचा ही अंदाज होता.चर्चिल ने लिहून ठेवल्याप्रमाणे दुसर्या महायुद्धाचे काळे ढग १९३५ पासूनच क्षितिजावर जमाव्हायाला सुरुवात झाली होती. हे दुसरे युद्ध टाळण्याचा नेव्हिल चेम्बरलेन सारख्या लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नाला यश आले नाही हा भाग अलाहिदा पण हे युद्ध सुरु होण्याला कारणीभूत असे हिटलर मुसोलिनी सारखे हुकुमशहा त्यांच्या हुकुमशाही राजवटी त्यांचे भ्रामक राष्ट्रवाद आणि मागील युद्धात झालेल्या अपमानाचा सूड घेण्याचे इरादे त्या मागे होते ह्याबद्दल फार कुणाला शंका नव्हती. पहिल्या महायुद्धाबाबत मात्र असे म्हणता येत नाही. एकतर मोरोक्कन पेच किंवा बोस्नियाचा पेच प्रसंग ह्यावेळी शांततेने सामोपचाराने मार्ग निघाला होता बाल्कन युद्ध पेटले तरी ते युरोपच्या एका कोपर्यात फक्त खेळले गेले त्याने जागतिक युद्धाचे स्वरूप धारण केले नाही त्यामुळे राजकारणी मुत्सद्दी लोक ह्यातून तोडगा काढतील, कुणीतरी नमते घेईल शांतता टिकून राहील असे सर्व म्हणजे जर्मनी , ऑस्ट्रिया सकट सगळ्यांनाच वाटत राहिले. ते सगळे चूक होते. ह्या पहिल्या युद्धात प्रथमच एक देश कम्युनिस्ट राजवटी खाली आला. एखादा वाद किंवा विचारधारा विजयी होऊन एका खंडप्राय देशात सत्ताधारी बनली हे ह्या आधी कधीही झाले नव्हते. ह्या काम्युनिझम किंवा साम्यवादी राजवटीमुळे पुढे २०व्य शतकाच्या उत्तरार्धात शीत युद्ध हा वेगळाच युद्धप्रकार जगाला पाहायला मिळाला. असे असूनही पहिले महायुद्ध सुरु करण्याला नक्की कोणा एकाला जबाबदार धरत येत नाही. १९२० नंतर विजेत्या राष्ट्रांनी कैसरला खलपुरुष ठरवून त्याला आणि जर्मनीला ह्या उत्पाताकरता जबाबदार ठरवले खरे पण ते पूर्ण सत्य नव्हते. त्याकरताच आपण हा पहिल्या महायुद्धाचा आरंभाचा इतिहास अगदी शंभर वर्षे मागे जाऊन पहिला.
प्रकरण पहिले समाप्त.
--आदित्य
उभे असलेले डावीकडून, १.राजा हाकोन सहावा नॉर्वेचा राजा, २.बल्गेरियाचा राजा झार फर्डीनंड,३.पोर्तुगाल चा राजा मन्युएल दुसरा, ४.जर्मनीचा कैसर विल्हेल्म दुसरा, ५.हेलेणीस चा राजा जॉर्ज पहिला, आणि ६.उंचच उंच राजा अल्बर्ट पहिला, बेल्जीयमचा राजा.
बसलेले उजवीकडून ७.स्पेनचा राजा आल्फोन्सो तेरावा, ८.इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा (आपल्याकडचा प्रसिद्ध पंचम जॉर्ज- “भो पंचम जॉर्ज भूप धन्य, विबुधामान्य भूवरा, पाळी ही वसुंधरा...” हे गाणे मराठी शाळातून तेव्हा घोकायला लावायचे ते ह्याच्या नावाचेच) आणि ९.डेन्मार्कचा राजा फ्रेडरिक सातवा.हा फोटो २० मे १९१० रोजी इंग्लंडचा राजा एडवर्ड सातवा ह्याच्या अन्त्येष्टीसाठी एकत्र आले तेव्हा काढलेला आहे.
हे सगळे राजे एकमेकांचे भाऊबंद होते
तर ह्या दुसर्या फोटोत रशियाचा झार निकोलस डावीकडे ( सगळ्यांचा लाडका निक्की ) आणि इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा एकत्र आहेत, दोघांच्या चेहऱ्यातले साम्य बरेच काही सांगून जाते.त्यांच्या आया एकमेकींच्या सख्ख्या बहिणी तर निकोलस्ची बायको अलीक्स हि जॉर्जची मावस बहिण होती.
भारताकडून पहिल्या महायुद्धात साधारण १५ लाख सैनिक सामील झाले त्यापैकी १ लाख १० हजार सैनिक युद्धात मारले गेले किंवा जखमी झाले.ही आकडे वारी भयंकर आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पाचही मोठ्या युद्धात मिळून साधारण २२ हजार ५०० भारतीय सैनिक मारले गेले आहेत,म्हणजे बघा. १९१४पुर्वी कुणीही भारतीय सैनिक भारतीय उपखंडाबाहेर जाऊन लढला नव्हता. आधुनिक भारतीय सैन्याची जडण घडण आणि एकूणच तिचा पाया ह्या युद्धाने घातला असे म्हटले तर वावगे ठरू नये.
१९३९साली जेव्हा दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा कुणालाही आश्चर्याचा धक्का बसला नाही अनेकाना असे युद्ध सुरु होणार ह्याची जाणीव झालेली होतीच शिवाय ते पहिल्या महायुद्धाप्रमाणेच प्रचंड विनाशकारी आणि दीर्घ काळ चालणारे असणार आहे ह्याचा ही अंदाज होता.चर्चिल ने लिहून ठेवल्याप्रमाणे दुसर्या महायुद्धाचे काळे ढग १९३५ पासूनच क्षितिजावर जमाव्हायाला सुरुवात झाली होती. हे दुसरे युद्ध टाळण्याचा नेव्हिल चेम्बरलेन सारख्या लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नाला यश आले नाही हा भाग अलाहिदा पण हे युद्ध सुरु होण्याला कारणीभूत असे हिटलर मुसोलिनी सारखे हुकुमशहा त्यांच्या हुकुमशाही राजवटी त्यांचे भ्रामक राष्ट्रवाद आणि मागील युद्धात झालेल्या अपमानाचा सूड घेण्याचे इरादे त्या मागे होते ह्याबद्दल फार कुणाला शंका नव्हती. पहिल्या महायुद्धाबाबत मात्र असे म्हणता येत नाही. एकतर मोरोक्कन पेच किंवा बोस्नियाचा पेच प्रसंग ह्यावेळी शांततेने सामोपचाराने मार्ग निघाला होता बाल्कन युद्ध पेटले तरी ते युरोपच्या एका कोपर्यात फक्त खेळले गेले त्याने जागतिक युद्धाचे स्वरूप धारण केले नाही त्यामुळे राजकारणी मुत्सद्दी लोक ह्यातून तोडगा काढतील, कुणीतरी नमते घेईल शांतता टिकून राहील असे सर्व म्हणजे जर्मनी , ऑस्ट्रिया सकट सगळ्यांनाच वाटत राहिले. ते सगळे चूक होते. ह्या पहिल्या युद्धात प्रथमच एक देश कम्युनिस्ट राजवटी खाली आला. एखादा वाद किंवा विचारधारा विजयी होऊन एका खंडप्राय देशात सत्ताधारी बनली हे ह्या आधी कधीही झाले नव्हते. ह्या काम्युनिझम किंवा साम्यवादी राजवटीमुळे पुढे २०व्य शतकाच्या उत्तरार्धात शीत युद्ध हा वेगळाच युद्धप्रकार जगाला पाहायला मिळाला. असे असूनही पहिले महायुद्ध सुरु करण्याला नक्की कोणा एकाला जबाबदार धरत येत नाही. १९२० नंतर विजेत्या राष्ट्रांनी कैसरला खलपुरुष ठरवून त्याला आणि जर्मनीला ह्या उत्पाताकरता जबाबदार ठरवले खरे पण ते पूर्ण सत्य नव्हते. त्याकरताच आपण हा पहिल्या महायुद्धाचा आरंभाचा इतिहास अगदी शंभर वर्षे मागे जाऊन पहिला.
प्रकरण पहिले समाप्त.
--आदित्य
प्रतिक्रिया
अतिशय ओघवती लिखाणशैली.
वा! झकास!! ....
खूप छान!!
शाळेत शिकवलेल्या इतिहासात
रोचक आणि माहितीपूर्ण लेखमाला.
+१००००
तुमचे लेख म्हणजे मेजवानीच!
जबरदस्त माहिती पूर्ण लेखन
पी. एच.डी. प्रबंध