कॅपिटल आय आणि स्माॅल आय.
आता मी वानप्रस्थाश्रमात प्रवेश केलाय. सत्तरी ओलांडली. माझ्यासारखे अनेकजण आहेत ज्यांनी साठी, सत्तरी ओलांडली आहे. साठीनंतरच खरं तर वानप्रस्थाश्रम सुरु होतो.
कसं वागायचं वानप्रस्थाश्रमात? प्रश्न पडतो ना? त्याची उत्तरे अनेक आहेत. पहिलं म्हणजे आपण मुलाबाळांच्या संसारात "कॅपिटल आय" न होता "स्माॅल आय" व्हायचं. अहंकार, मीपणा झटकून टाकायचा. कॅपिटल आय तरुणपणी असतो. अंगात मस्ती मुसमुसत असते. माज असतो. जोश असतो. मनगटात ताकद असते. मनात ऊर्मी , उत्साह संचारलेला असतो. मी काहीही करेन असा अहंकार असतो. "कर्तुं,अकर्तुं, अन्यथा कर्तुम्"अशी ताकद असते. जिद्द असते . क्षमता असते. कर्तबगारी असते. नवनवीन क्षितीजं पादाक्रांत करावीशी वाटतात. हे सगळं म्हणजे कॅपिटल आय!मी,मी मी आणि"मीच".
पण हे सगळं वानप्रस्थाश्रमात सोडून द्यावं लागतं आणि "स्माॅल आय" बनावं लागतं. इथंही मी असतो. पण स्माॅल. लहान. फक्त मीच असा अट्टहास नसतो. इथं मी हवा पण कसा तर फक्त आत्मसन्मान हवा. Self concept हवा. मीच नको. मीही हवा. कुणीही यावं आणि माझा अपमान करावा, असं नको. मी हवा पण अहंकार नको. बा.भ.बोरकरांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे
"मीपण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो
जीवन त्यांना कळले हो". असं आपण व्हायला हवं.
मुलांच्या संसाराकडे तटस्थपणे, अलिप्त राहून पाहाता यायला हवं. पाण्यात राहून पाण्यात नसणाऱ्या कमलपत्राप्रमाणे! स्वतःचं आयुष्य अलिप्तपणे जगता यायला हवं. मुलं बिझी असतात ती आपल्याला वेळ देऊ शकत नाहीत हे स्वीकारायला हवे. आपण नाही का त्यांच्या लहानपणी आणि आपल्या तरुणपणी त्यांना एकटं टाकून कामावर गेलो? ते आपलेच आहेत पण त्यांच्या जीवनात लुडबुड करायची नाही. त्रयस्थपणे त्यांच्याकडं आणि स्वतः कडे पाहायला शिकायचं. त्यांनी विचारलं तर मत व्यक्त करायचं. सल्ला द्यायचा, नाही तर चूप बसायचं. त्यांना स्पेस द्यायची."कुठं जाता?का जाता?सारखे कसे जाता? काय खाता? किती पैसे खर्च करता?"असले प्रश्न विचारुन त्यांच्यावर वाॅच ठेवायचा नाही. त्यांना मोकळेपणा द्यायचा.
आर्थिकदृष्ट्या आपण स्वावलंबी असायला हवंच हवं. त्याची तरतूद आपल्या तरुणपणात आणि प्रौढपणात करायचीच. काही झालं तरी मुलांवर सर्व पैसे खर्च करून आपण कफल्लक व्हायचं नाही. मुलांना सतत आर्थिक मदत करुन आपण त्यांना पांगळे करून टाकतो. त्यांनी आर्थिक स्वावलंबन शिकायलाच हवे. आचरणात आणायला हवे. आपण आपल्या आरोग्यासाठी, औषधोपचारासाठी पैसे राखून ठेवावेत. मुख्य म्हणजे राहत्या घरावर आपलाही कायदेशीर हक्क हवा. "खायचं ताट द्यावं पण बसायचा पाट कधी देऊ नये"म्हणतात ते घेण्यासारखं आहे.
आपला दृष्टिकोन या वयात सकारात्मक हवा. आपण कधी निराश झालो तर आपण आपल्या जीवनातल्या अनेक संकटांवर कशी मात केली होती ते आठवावे. आपल्यातले प्लस पॉइंट्स,मायनस पाॅइंटस् लिहून काढावेत. बघा! नक्कीच प्लस पॉइंट्स जास्त भरतील. उगीच उदास तोंड करून बसू नये. मित्रमैत्रिणीत रमावं. हास्यक्लब, ब्रीजक्लब,रिडर्स क्लब, ज्येष्ठ नागरिक क्लब, अत्रे कट्टा, महिला मंडळ अशा ठिकाणी जावं. सगळ्यांच्यात मिसळावं. नवं ऐकायला मिळतं. झूम मीटिंग मध्ये आप्तेष्ट, नातेवाईक यांच्याशी गप्पा माराव्यात. एखादा नवा कोर्स ऑनलाईन शिकावा.
आपलं जग आणि नवं . आत्ताचं जग यांत आमूलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे भांबावून जाऊ नये. नवं तंत्रज्ञान आपल्या मुलांकडून, नातवंडांकडून शिकून घ्यावे. टीव्ही बघावा.ओटीटी वरचे सिनेमे पाहावेत. किंडलवर वाचावं. कदाचित् जमणार नाही. कदाचित् अवघड वाटेल. पण लॅपटॉप शिकून घ्यावा. यू ट्यूब्जवरच्या पोस्ट्स वाचाव्यात. बघाव्यात. वेगवेगळ्या वेबसाइट्स वर जावं. आपण अगदीच फोर्थ जनरेशनचे वाटू नये इतपत माहिती करून घेतली पाहिजे. त्यासाठी आपल्या मुलांकडून नातवंडांकडून रागावून घ्यावं. आपण नाही का गमभन शिकवताना लहानपणी त्यांना धपाटे घातले!
नवे खाद्य पदार्थ पिझ्झा, बर्गर वगैरे वगैरे वगैरे आवडीने खायला शिकायचं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे "आमच्यावेळी असं होतं"हे दळण दळायचं नाही. तुलना करायची नाही. जग बदललं आहे. त्याच्याबरोबर धावायला जमलं नाही,तरी चालायला शिकायचं. आपल्या दुखण्यांची कुरकूर सतत करायची नाही. त्यामुळे दु:खी,उदास,किरकिरं व्हायचं नाही. मुलांना आपल्या दुखण्याबद्दल सांगितले पाहिजे ,पण त्रागा करून त्यांचं रोजचं जगणं मुश्कील करायचे नाही.
त्यांनी बोलावलं तर मुलांबरोबर प्रवासाला, पिकनिक ला जायचं. आपण स्वतःही आपल्या शारीरिक मर्यादा सांभाळून प्रवास करायचा. काहीजण एकटे असतात. सहचर आधी निघून गेलेला असतो. त्यांनीही उदास तोंड करून न बसता मित्रमैत्रिणी जोडून त्यांच्या सहवासात आनंदी राहायचे.
जो नव्या परिस्थितीनुसार बदलतो तो टिकतो. बदलेल तो टिकेल. जो टिकतो तो बुद्धिमान. Suvival of the fittest. हा जगाचा नियमच आहे, नाही का?
मी असं जगण्याचा प्रयत्न करते. मला खूप जिवलग मित्रमैत्रिणी नातेवाईक आहेत. माझा मुलगा माझा मित्रच आहे. सगळ्यांचं हे मैत्र पाहून, अनुभवून म्हणावंसं वाटतं,
"घेरी जव मज ढगाळ रजनी
हो तू तव मम अढळ चांदणी।।
स्मित उद्धारक तुझिया वदनी
न्याहाळित हे तडीस लागो
माझे जीर्ण जहाज।।
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अगदी.
सहमत !
अतिशय उत्तम लेख ..
हम्म!!
+१
खुप छान!
पण तो पर्यंत मिपावर वाद विवाद
म्हणजे? आत्ता नाहीयेत असा
आत्ता कमीहेत. कारण आता सासू
हम्म!
हे पटले
लेख खूपच छान आहे. पण भावे
छान लेख ! वाचून शिक्षक आणि
ऑन डिमांड
मला पण
मला पण
या वयात आपले शरीर आणि छंद हे महत्वाचे.
बरोबर.
आयुष्य खूप सुंदर आहे...
छान लूख
माझ्या या लेखाला भरपूर वाचने
मागेही एकदा प्रतिसादात लिहिलं
साठी नंतर दिनक्रम आखून घ्यायचा