स्त्री पुरूष मिश्र व्यवहार व पडदा पध्दतीचे परिणाम

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
14 Aug 2017 - 9:57 pm

महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे कर्ते, श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी जवळपास १०० वर्षापुर्वी An Essay on Indian Economics, and Hindu Law and the Methods and Principles of the Historical Study Thereof. या विषयांवर लेखन केले The History of Caste in India या विषयावर Phd केली.

स्त्री सहभागाचा समाज व्यवहारात अभाव आणि जाती व्यवस्थेचा पगडा यांचा आर्थीक विकासावर होणार्‍या परिणामांकडे त्यांनी त्यांच्या ज्ञानकोशातील लेखातून दिशा निर्देश केलेला दिसून येतो. त्यांच्या खालील मतांबद्दल मिपा वाचक-लेखकांना नेमके काय वाटते ?


विवाह पध्दतीचे आर्थिक परिणाम. -

हिंदुस्थानची आर्थिक सुधारणा होण्याच्या मार्गांत आणखी एक अडचण आहे ती पडदापध्दती व प्रचलित विवाहपध्दति याची. निरनिराळ्या प्रांतांतील स्त्रीपुरूषप्रमाणाविषयीचें आकडे पाहिल्यास असें दिसून येतें कीं, कांहीं प्रातांत स्त्रियांची संख्या अधिक, तर इतरांत पुरूषाची अधिक. कांहीं जातींत विधवांची व वृध्द-तरूणी जोडप्याचीं संख्या पुष्कळ तर दुसर्‍या कांहीं बळकट, तरूण पण अविवाहित पुरूषांची अशा संख्या अधिक. अशा प्रकारची स्थिति लोकसंख्येच्या वाढीला हितावह नाहीं. तसेंच विवाहसंबंध जुळवून आणण्यांत आईबाप व इतर नातलग यांचें अंग जितकें अधिक व प्रत्यक्ष वरवधूंचा संबंध जितका कमी तितक्या मानानें त्या समाजाच्या गरजा कमीच राहावयाच्या. उलट जेथें प्रीतिविवाहाची चाल प्रचलित आहे तेथें उच्च दर्जाची राहणी प्रचारांत येण्यास फार मदत होते. याचें कारण उघडच आहे. ज्या समाजांत विवाहसंबंध जुळविण्यांत स्वत: तरूणतरूणी भाग घेतात. तेथें उभयपक्षीं पोशाख व नीटनेटकेपणा याबद्दल फारच काळजी घेतली जाते. स्त्रीजनाला संतुष्ट करण्याकरतां पुरूषवर्ग बराचसा खर्च करण्यास उत्सुक असतो. चांगलीचांगलीं पुस्तकें व चित्रें खरेदी करून ती वधूला समर्पण करावी लागतात. उलटपक्षीं पुरूषांच्या आवडीच्या होण्याकरतां स्त्रियांनाहि स्वत:मध्यें अधिकाधिक गुण आणावे लागतात. यामुळें शिक्षण वाढून सुधारणा होते, राहणी उच्च दर्जाची होत जाते. व त्याबरोबर पुरूष व स्त्री दोन्ही वर्गांचीं अर्थोंत्पादक शक्ति वाढणें जरूरीचें होतें.

स्त्री पुरूष मिश्र व्यवहार व पडदा पध्दतीचे परिणाम

...तंसेंच समाजांत स्त्रीपुरूषांचा मिश्र व्यवहार चालू असण्यानेहि समाजाच्या आर्थिक उन्नतीस फार मदत होतें. उदाहरणार्थ, उपहारगृहांत स्त्रीपुरूषांनीं बरोबर जाण्याची पध्दत असल्यास, रस्त्यावरील उघड्या जागेंतल्या अस्ताव्यस्त गृहांत लोक केव्हांहि शिरणार नाहींत, बरोबर असलेल्या स्त्रीस बसण्यास योग्य अशा व्यवस्थित उपहारगृहांतच पुरूष जाईल. पुण्यामुंबईंतल्या व लंडनमधल्या हॉटेलांची तुलना केंल्यास वरील विवेचनांतलें मर्म लक्षांत यईल. इतकेंच नव्हें तर समाजांत स्त्रिया सार्वजनिकपणें वावरूं लागल्यानें समाजाच्या चालीरीतींना चांगलें, शिष्टसंमत असें वळण आपोआप लागतें. पुरूषांच्या वागणुकींतील अश्लील, बीभत्स प्रकार बंद होतात, निदान त्यांना पुष्कळ आळा पडतो. परंतु अशा प्रकारच्या स्त्रीपुरूषमिश्र व्यवहाराला पडदापध्दतीची व प्रचलित विवाहपध्दतीची मोठी अडचण आहे. शिवाय ज्या प्रांतांत पडदापध्दति आहे तेथील स्त्रियांनां इतर प्रांतांतील स्त्रियांप्रमाणें साध्या, सोप्या धंद्यांतहि भाग घ्यावयास सांपडत नाहीं. त्यामुळें पुण्यामुंबईतल्याप्रमाणें कलकत्ता वगैर उत्तर हिंदुस्थानातल्या शहरांत स्त्रियांच्या ऐवजीं पुरूषांचा भरणा अधिक दृष्टीस पडतो. कलकत्त्यास लोकसंख्येंत १०० पुरूषांस ३२ स्त्रिया असें प्रमाण पडतें. आणि एकंदर हिंदुस्थानांतील शहरांत घरगुती कामासारखे सामान्यत:सोपे धंदेहि पुरूषांनीं करण्याचीच पध्दति असल्यामुळें सर्व शहरांत पुरूषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षां बरेंच अधिक असतें. उलटपक्षीं इंग्लंडांतील शहरांत पुरूषांपेक्षा स्त्रियांची संख्या बरीच अधिक असलेली आढळते.

शिवाय हिंदुस्थानांतील शहरांत उद्योगधंद्याकरतां जाणारे तरूण लोक विवाहित असूनहि मुंबईकलकत्तादि शहरांत बिर्‍हाडानें राहण्याच्या इमारती इतक्या महाग व गैरसोयीच्या असतात कीं, त्यांत सहकुंटुंब जाऊन राहणें त्यांनां पत्करत नाहीं. न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस येथील गरीबगुरीबांच्या राहण्याच्या सोयी इकडच्या मानानें स्वर्गतुल्य आहेतं. येथील शहरांतल्या उपरिनिर्दिष्ट पुरूषसंख्याधिक्यामुळें नैतिक दृष्ट्या परिणाम भयंकर होतात. एकट्या कलकत्त्यांत वेश्यांची संख्या पन्नास ते शंभर हजारांपर्यंत आहे. शिवाय पानपट्टी, विडी, सिगारेट वगैरे विकणार्‍या स्त्रियाहि अप्रसिध्द शरीरविक्रयाचा धंदा करीत
असतातच. तात्पर्य, नुसत्या पडदापद्धतीमळें लहान सोपे धंदे करण्यासहि स्त्रियांस अडचण, हलकी व राहणी, व व्यसनांत पैशाची उधळपट्टी वगैरे तोटे होत आहेत. जातिभेदामुळें मोठ्या प्रमाणावर पदार्थांची निपज होण्यास अडथळा येतो; हलक्या जातींतल्या श्रीमंत लोकांची राहणी उच्च होऊं शकत नाहीं, व त्यामुळें दारूबाजीसारख्या व्यसनांत त्यांची द्रव्यहानि व शरीरहानि होते. शिवाय जातींचे धंदे ठरलेलें असल्यामुळें परजातीच्या माणसास धंदेशिक्षण मिळूं शकत नाहीं. धंद्यामध्यें आपआपल्या जातीच्या इसमासच मदत करण्याची प्रवृत्ति असते. येणेंप्रमाणें हिंदुसमाजाच्या विशिष्ट सामाजिक बाबींचा येथील आर्थिक स्थितीवर फार घातक परिणाम होत असल्यामुळें सदरहू बाबी लक्षांत घेउनच आर्थिक उन्नतीचे उपाय सुचविले पाहिजेत.

जातिभेद व अस्पृश्यता याचे आर्थिक परिणाम

जातिभेदामुळें हिंदुसमाजात पडलेली फूट व स्पृश्यास्पृश्यतेच्या कल्पना याचा हिंदुस्थानच्या आर्थिक स्थितीवर भयंकर परिणाम झालेला आहे. जातीजातींमध्यें विवाहसंबंध होत नाहींत, इतकेंच नव्हे तर आपसात अन्नोदकव्यवहार किंवा साध्या बसण्याउठण्याचाहि फारसा संबंध येत नाहीं. याचे तीन मोठे परिणाम होतात, ते असे कीं, ( १ ) सर्व समाजाच्या राहणीला समान स्वरूप येत नाहीं; ( २ ) हलक्या जातींची रहाणी सुधारून ती उच्च होऊं शकत नाहीं; आणि ( ३ ) पदार्थांची निपज करतांना श्रमविभागाच्या तत्त्वानुसार जरूर असणारे सहकार्य निरनिराळ्या जातींत होऊं शकत नाहीं. निरनिराळ्या जातींचीं व वर्णांची राहणी निरनिराळी असल्यामुळें त्यांच्या गरजा निरनिराळ्या असतात. त्यामुळें प्रत्येक जातीच्या लहान लोकसंख्येच्या मानानें पदार्थांची निपज अर्थांत् थोडक्या प्रमाणांत करावी लागते. उदाहरणार्थ, प्रत्येक जातीचा पोशाख निरनिराळ्या तर्‍हेचा असल्यामुळें प्रत्येकीचा शिंपी निराळा असतो. हिंदूंचा पोशाख निराळा, मुसलमानांचा निराळ;इतकेंच नव्हे तर, गुजरातीयांचा निराळा. दक्षिण्यांचा निराळा; यामुळें एकाच मुंबई शहरांत निरनिराळ्या समाजांचे स्वतंत्र शिंपी आहते. तसेंच गुजराथी व दक्षिणी यांच्या रूचिभिन्नत्वामुळें दोघाकरतां खाण्याचे पदार्थ बनविणारे स्वयंपाकीहि निरनिराळे लागतात. खाण्याचे पदार्थ भिन्न असतात. इतकेच नव्हे तर, पदार्थ एकच असला तरी तो तयार करण्याच्या पध्दती भिन्न असतात, म्हणूनहि भिन्न आचारी लागतात. यामुळें खाद्येंपुरवणार्‍या धंद्यास लहानपणा व वैशिष्ट्य हीं उत्पन्न होतात.

याप्रमाणें एकाच समाजांत भिन्नभिन्न वर्ग व त्यांच्या भिन्नभिन्न गरजा यामुळें एकंदर समाजाची आर्थिक उन्नति होण्याच्या मार्गांत भयंकर अडचणी येतात. समाजाची राहणी उच्च उच्च होत जाऊन पदार्थांची निपज मोठ्या प्रमाणावर होणें व प्रत्येक धंद्यात कामाची वाटणी होऊन प्रत्येक अंगात प्राविण्य संपादन करणें, या गोष्टी जातिभेदामुळें फूट पडून विस्कळित झालेल्या हिंदुसमाजात मुळींच संभवत नाहींत स्थानिक गरजा भागविण्यापुरती पदार्थांची अल्प प्रमाणात निपज करणें हाच नियम सर्वत्र दृष्टीस पडतो. हा नियमहि पूर्वीच्या काळीं जगापासून अलग असलेल्या हिंदुस्थानाला मोठासा घातक झाला नाहीं. पण अलीकडे सर्व परिस्थिति बदलून जगातील अनेक, पदार्थांची निपज मोठ्या प्रमाणावर करणार्‍या व धंद्याच्या प्रत्येक अंगात अत्यंत वाकबगार बनलेल्या राष्ट्राच्या व्यापारी स्पर्धेत हिंदुस्थान देश सापडला आहे. या नूतन परिस्थितीला तोंड देण्यास समर्थ होण्याकरिता हिंदी समाजाची सामाजिक व आर्थिक पुनर्घटना करणें जरूर आहे. या पुनर्घटनेचें स्वरूप नीट लक्षात येण्याकरिता हल्लींच्या सामाजिक व्यवस्थेत असलेल्या काहीं व्यंगाचीं येथें अधिक फोड करूं.

कोणत्याहि पदार्थाची निपज मोठ्या प्रमाणांत किंवा कोणताहि व्यापार मोठ्या प्रमाणावर हातीं घेण्याकरितां बुध्दि, शारीरिक श्रम व भांडवल हीं तिन्हीं एकत्र होणें जरूर असतें. पण हाच योग जमून येणें प्रस्तुत हिंदु समाजस्थितींत कसें कठीण असतें तें पहा. वरील तीन साधनें पृथकपणें भिन्न जातींच्या हातीं आहेत, म्हणजे महाराष्ट्रीय ब्राह्मणांजवळ बुध्दि, तर मारवाड्याजवळ भांडवल तर शूद्राजवळ शरीरबल; आणि हिंदु समाजीरचनाच अशी आहे कीं, या तीन वर्णांचा परस्पराशीं फारसा संबंध येऊं शकत नाहीं. आजहि पाश्चाच्य शिक्षण मिळविलेला वर्ग भांडवलवाल्याहून अगदीं भिन्न आहे. उदाहरणार्थ, आज एखादा महाराष्ट्री किंवा बंगाली सुशिक्षित ब्राह्मण एखाद्या श्रीमंत मारवाड्याकडे जाऊन काहीं एखादा मोठा उद्योगधंदा काढण्याची योजना त्याला सांगू लागला तर त्यावर त्या मारवाडी भांडवलवाल्यांचा विश्वास बसणार नाहीं; पण तोच एखादा शिकलेला मारवाडी आपल्या जातभाईकडे भांडवल मागण्यास गेल्यास त्याचें परस्परसहकार्य होऊं शकेल. पण दुर्दैवाची गोष्ट ही कीं, आमच्या गुजराथी बनिया किंवा मारवाडी समाजापैकीं परदेशांत जाऊन उच्च शिक्षण मिळविणारे इस मच नाहींत. यामुळें बुध्दि व भांडवल याचें सहकार्य दुरापास्त झालें आहे.

वरील तीन साधनें एकत्र येण्यास दुसरी अडचण म्हणजे स्पृश्य, अस्पृश्य या कल्पनांची. उदाहरणार्थ, कातडीं कमावून त्यांचे जिन्नस करण्याचा धंदा आमच्यांतील अस्पृश्य मानलेल्या चांभार जातीकडे आहे. पण या वर्गाजवळ बुध्दि नाहीं व भांडवलहि नाहीं. पूर्वी लहान प्रमाणांत धंदे करण्यानें फारसें बिघडत नव्हतें; पण आतां परदेशी मालाबरोबर टक्कर देण्याकरितां मोठ्या प्रमाणांत, मोठें भांडवल व त्या धंद्यांतलें चांगलें शिक्षण मिळवून धंदा करण्यावाचून गत्यंतर नाहीं. पण चांभार, ब्राह्मण व मारवाडी यांचें सहकार्य होण्यास जातिभेद व अस्पृश्यता आडवी येते. त्यामुळें हा धंदा आतां मुसलमान किंवा पारशी या समाजाच्या किंवा अगदीं परकी लोकांच्या हातीं जाऊं पहात आहे.

तिसरा धंदा हॉटेलें व खाणावळी हा घ्या. हिंदु लोकामध्यें ब्राह्मणाखेरीज इतर जातींच्या हातचे पदार्थ दुसर्‍या जातीचे लोक खात नसल्यामुळें ब्राह्मणाव्यतिरिक्त इतर जातींच्या हातीं हा धंदा फारसा जाणें शक्य नाहीं; किंवा प्रत्येक जातीचीं निरनिराळीं हॉटेलें व खाणावळी निघाल्या पाहिजेत, म्हणजे तात्पर्य हें कीं, हाहि धंदा मोठ्या प्रमाणावर चालूं शकत नाहीं. शिवाय जातीजातींचें व प्रांतोप्रांतीचे खाण्यापिण्याचे पदार्थ वेगवेगळे असल्यामुळेंहि मोठ्या प्रमाणावरील धंद्यास अडचण येते. यामुळें भारीभारी जकाती किंवा कर बसवूनहि जो घातक परिणाम होऊं शकत नाहीं तो वरील कारणांमुळें होत असतो.

आता व्ययाच्या दृष्टीनें पाहिलें तर हिंदुस्थानांतील बहुतेक लोकांची राहणी इतर सुधारलेल्या देशाच्या मानानें खास हलक्या दर्जाची आहे. अमेरिकेतला साधा मजूर सुध्दां आपल्या देशांतील मध्यम स्थितींतल्या माणसापेक्षा चांगलें अन्न खाचो व अधिक कपडे वापरतो. लोकांमध्ये पोशाख, राहणी व घरांतील सामानसुमान व सुखसोयी वगैरे बाबतींत स्पर्धा व अनुकरण चालूं असतें. यूरोप व अमेरिकेंत मोठमोंठीं व उत्तम बाइंडिंगचीं पुस्तकें खरेंदी करण्यामध्यें सुध्दा चढाओढ दृष्टीस पडते. संस्कृतीच्या व रसिकरतेच्या दृष्टीनें स्वत:स इतरांनीं मागासलेले म्हणूं नये, एवढ्याच केवळ हेतूनें मोठमोठे ग्रंथ खरेदी करून घरांत सुशोभित लायब्ररि ठेवणारे लोक तिकडे पुष्कळ असतात. आपल्या देशांत उच्च राहणीचे व वरील विचारसरणीचे लोक नाहींत, असें नाहीं. पण मुख्य अडचण अशी आहे कीं, अशा लोकांचा वर्ग अल्पसंख्याक असून त्याच्याशीं स्पर्धा व अनुकरण करण्याची बुध्दि जागृत होण्याकरितां इतरांचें त्या वर्गाशीं दळणवळण व संबंध जितका यावयास पाहिजे तितका जातिभेद व अस्पृश्यता या दोन भयंकर अडचयणीमुळें येऊं शकत नाहीं. वरील प्रकारची चढाओढ विशेषत: परस्परांच्या घरीं बायकाबायकांच्या जाण्यायेण्यानें वाढत असते. पण आमच्या हिंदु समाजांत बायकांमध्यें तर सोवळ्याओवळ्याच्या व विटाळचंडाळाच्या कल्पना फारच पसरलेल्या त्यामुळें घरगुती राहणी वरील प्रकारच्या चढाओढीनें सुधारण्याची शक्यता आजपर्यंत तरी मुळींच नव्हती.

- संदर्भ १ संदर्भ २

संस्कृतीइतिहाससमाजजीवनमानअर्थकारण

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

15 Aug 2017 - 8:03 am | ज्योति अळवणी

ही विवेचने आणि मते आज 2017 मध्ये कालबाह्य झाली आहेत असे मला वाटते. अगदी लहान गावांमध्ये स्त्रिया देखील घराबाहेर पडत आहेत. अर्थात स्त्री पुरुष भेद आणि पुरुषसत्ताक विचारधारणा अजूनही भारतात सर्वत्र दिसून येते हे दुर्दैव

उर्वरित लेखक रोचक आणि विचार करण्यालायक आहे. पण काही मते फारच काहींच्या काही वाटतात.

उलट जेथें प्रीतिविवाहाची चाल प्रचलित आहे तेथें उच्च दर्जाची राहणी प्रचारांत येण्यास फार मदत होते. याचें कारण उघडच आहे. ज्या समाजांत विवाहसंबंध जुळविण्यांत स्वत: तरूणतरूणी भाग घेतात. तेथें उभयपक्षीं पोशाख व नीटनेटकेपणा याबद्दल फारच काळजी घेतली जाते. स्त्रीजनाला संतुष्ट करण्याकरतां पुरूषवर्ग बराचसा खर्च करण्यास उत्सुक असतो. चांगलीचांगलीं पुस्तकें व चित्रें खरेदी करून ती वधूला समर्पण करावी लागतात.

१. यात "जेथे" चा अर्थ काय? भारतात त्याकाळी कोणत्या प्रांतात प्रीतिविवाह चालत होते? का वेस्टर्न लोकांबद्दल लिहिले आहे?

२. चांगली पुस्तके आणि चित्रे? - आज जेथे प्रेमविवाह होतात तेथे बहुसंख्य जनता हॉटेल आणि थेटरावर पैसे खर्च करताना दिसते. त्या काही लोक एकमेकांना पुस्तके देत असत का? मूळ लेखकाने मत कुठला रिसर्च करून बनवले आहे?

तिसरा धंदा हॉटेलें व खाणावळी हा घ्या. हिंदु लोकामध्यें ब्राह्मणाखेरीज इतर जातींच्या हातचे पदार्थ दुसर्‍या जातीचे लोक खात नसल्यामुळें ब्राह्मणाव्यतिरिक्त इतर जातींच्या हातीं हा धंदा फारसा जाणें शक्य नाहीं;

वाचून आश्चर्य वाटले. वरती ते म्हणतात ब्राह्मण व्यवसाय करत नाहीत आणि खाली म्हणतात ब्राम्हणाचीच हॉटेल चालतात. हॉटेल चालवणं हा धंदा नाही तर काय आहे?

साहना's picture

15 Aug 2017 - 11:04 am | साहना

> हिंदु लोकामध्यें ब्राह्मणाखेरीज इतर जातींच्या हातचे पदार्थ दुसर्‍या जातीचे लोक खात नसल्यामुळें ब्राह्मणाव्यतिरिक्त इतर जातींच्या हातीं हा धंदा फारसा जाणें शक्य नाहीं;

फर्नांडो च्या हातची चिकन कढी खाल्ली नाही का कधी ? सर्वच लोक चितळ्यांची भाकरवाडीच खातात असे नाही.

याप्रमाणें एकाच समाजांत भिन्नभिन्न वर्ग व त्यांच्या भिन्नभिन्न गरजा यामुळें एकंदर समाजाची आर्थिक उन्नति होण्याच्या मार्गांत भयंकर अडचणी येतात.

उलट मी म्हणेन की यामुळे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय निर्माण होतात.

पैसा's picture

15 Aug 2017 - 11:09 am | पैसा

हे लिखाण शंभर सवाशे वर्षापूर्वीचे आहे हा डिस्क्लेमर हेडिंग च्या फाँटमधे लिहून ठेवा हो! तेव्हा काय होते हे माहीत करून घ्यायचे असेल तर खांडेकर, फडके किंवा त्याही आधीचे वाचून भरपूर होमवर्क करून यावे लागेल!

केतकर समजून घ्यायचे म्हणजे अगदी फुले, राजवाडे, राजारामशास्त्री भागवतांपासून ते रॉय-किणीकर, कॉ. रणदिवे यांच्यापर्यंतचा एक विस्तीर्ण पट समजावून घ्यावा लागतो. त्यांच्या कोणत्या एका लेखाचे मूल्यमापन केवळ तो लेख वाचून होण्यासारखे नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभिसरणात एकमेकांच्या विरोधी पण एकमेकांना पूरक असेही प्रवाह वाहत राहिले. त्यातला एक प्रवाह म्हणजे केतकरांचा.

केतकर समजून घ्यायचे म्हणजे अगदी फुले, राजवाडे, राजारामशास्त्री भागवतांपासून ते रॉय-किणीकर, कॉ. रणदिवे यांच्यापर्यंतचा एक विस्तीर्ण पट समजावून घ्यावा लागतो. त्यांच्या कोणत्या एका लेखाचे मूल्यमापन केवळ तो लेख वाचून होण्यासारखे नाही. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभिसरणात एकमेकांच्या विरोधी पण एकमेकांना पूरक असेही प्रवाह वाहत राहिले. त्यातला एक प्रवाह म्हणजे केतकरांचा.

एमी's picture

17 Aug 2017 - 9:28 am | एमी

रोचक माहिती!

वरील प्रकारची चढाओढ विशेषत: परस्परांच्या घरीं बायकाबायकांच्या जाण्यायेण्यानें वाढत असते. >> हे भारीय =))