वाचणार्‍याची रोजनिशी

नंदन's picture
नंदन in जनातलं, मनातलं
1 Sep 2011 - 12:54 pm

सॉमरसेट मॉमच्या 'द बुक बॅग' ह्या कथेत वाचनाबद्दल सुरेख भाष्य आहे - 'Some people read for instruction, which is praiseworthy and some for pleasure, which is innocent; but not a few read from habit, and I suppose that this is neither innocent or praiseworthy. Of that lamentable company am I.' वाचनाच्या छंदाचं हळूहळू सवयीत - किंवा खरं तर व्यसनात - रूपांतर कसं होत जातं आणि ज्ञानवर्धन किंवा रंजन हे हेतू कसे मागे पडत जातात यावर भाष्य करणारे हे उद्गार. अशा काही मोजक्या, भाग्यवान वाचकांचे पुस्तकांबद्दलचे किंवा एकंदरीतच साहित्यव्यवहाराविषयीचे अनुभव वाचणं, ही देखील एक पर्वणी असते. एलकुंचवारांनी लिहिलेलं 'पश्चिमप्रभा' किंवा विद्याधर पुंडलिकांचं 'शाश्वताचे रंग' ही लगेच आठवणारी काही उदाहरणं.

'वाचणार्‍याची रोजनिशी' हे सतीश काळसेकरांनी लिहिलेलं पुस्तक हाच वारसा समर्थपणे पुढे नेतं. 'इंद्रियोपनिषद', 'साक्षात', 'विलंबित' हे कवितासंग्रह लिहिणारे काळसेकर सिद्धहस्त कवी आहेतच, मात्र त्याशिवाय साठच्या दशकात उदयास आलेल्या 'लिटल मॅगझिन' चळवळीत एक कवी आणि संपादक म्हणून सक्रिय सहभागी असणारा साक्षीदार, म्हणूनही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. स्वातंत्र्योत्तर काळातला भ्रमनिरास तीव्रतेने जाणवू लागलेल्या; चाकोरीतल्या रूढ साहित्यापेक्षा अधिक सच्चे, वेगळे काही लिहिले जावे अशी आच लागलेल्या; 'असो', 'फक्त', 'अबकडइ' सारखी वैशिष्ट्यपूर्ण अनियतकालिकं सुरू करणार्‍या चित्रे, नेमाडे, कोलटकर, भाऊ पाध्ये, राजा ढाले, तुलसी परब, चंद्रकांत खोत, अशोक शहाणे, अर्जुन डांगळे ह्या ताज्या दमाच्या साहित्यिकांच्या फळीचे काळसेकर हे प्रतिनिधी म्हणता येतील. आपल्या मध्यमवर्गीय अनुभवांची जाणवणारी मर्यादा, नैतिक कोतेपण आणि दांभिकता ह्यांच्या पलीकडे जाऊन बाहेरचे जग समजून घेण्याची तीव्र इच्छा, प्रयोगशीलता, मार्क्सवादाचा केवळ एक विचारसरणीच म्हणून नव्हे तर जगण्याच्या अनेक स्तरांवर केलेला स्वीकार ही या पिढीची व्यवच्छेदक म्हणता येतील अशी लक्षणं 'वाचणार्‍याची रोजनिशी'मध्येही लख्ख उमटतात.

लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित होणार्‍या 'वाङ्मयवृत्त' ह्या मासिकात डिसेंबर २००३ पासून जानेवारी २००९ पर्यंत काळसेकरांनी 'रोजनिशी' नावाचा स्तंभ लिहिला. त्या साठ लेखांचं संकलन ह्या पुस्तकात आहे. अरुण खोपकरांची अतिशय नेटकी प्रतिक्रिया ह्या पुस्तकाला लाभली आहे. अगदी पहिल्या लेखापासून ह्या लेखात जो सहज संवादाचा सूर लागतो तो संपूर्ण पुस्तकात टिकून आहे. 'जे जे आपणासि ठावे' ते इतरांना सांगण्याच्या प्रेरणेतून हे सारे लेख लिहिलेले असले तरी कुठेही शिकवण्याचा किंवा शहाणे करून सोडण्याचा अभिनिवेश त्यांत जाणवत नाही. सतत जाणवत राहतं ते कुतूहल आणि ऋग्वेदात म्हटल्याप्रमाणे 'आ नो भद्रा क्रतवो यन्तु विश्वतः' (चांगले विचार चहूबाजूंनी आमच्यापर्यंत येवोत) ह्या वृत्तीने वेगळ्या विचारांचंही केलेलं स्वागत. बहुश्रुतता आणि व्यासंग यांच्यासोबतच जोपासलेली सामाजिक बांधीलकी आणि साहित्याची प्रवाही जाणीव.

काळसेकरांनी वाचलेल्या, सुचवलेल्या पुस्तकांची यादी देणं अशक्यप्राय आहे - लीळाचरित्र, तुकारामाच्या गाथा ते 'नाते' हे छोटेखानी कथा, रिपोर्ट, टिपणे व प्रवासनोंदी अशा मिश्र ललित लेखनाचे अमर हबीब ह्यांचे पुस्तक; मराठी साहित्याच्या विस्तारणार्‍या भूगोलाचा - पर्यायाने सदानंद देशमुख, रमेश इंगळे-उत्रादकर ह्या नव्याने लिहू लागलेल्या लेखकांच्या लेखनाचा मागोवा इथपासून ते इ. एच. कार ह्या इतिहासकाराच्या 'व्हॉट इज हिस्टरी?' ह्या मूलगामी ग्रंथाच्या अनुवादाचा वेध - हैदराबादहून प्रसिद्ध होणार्‍या 'पंचधारा' ह्या त्रैमासिकापासून ते अर्नेस्तो कार्देनाल ह्या निकाराग्वा देशातल्या 'मार्क्सवादी धर्मोपदेशक' कवीच्या भेदक कवितेपर्यंत 'जे जे उत्तम' काळसेकरांच्या दृष्टीला पडलं, ते त्यांनी वाचकापर्यंत आणलं आहे.

ज्या काळात आजच्यासारखी संवादाची साधने उपलब्ध नव्हती, अशा वेळी बाहेरच्या जगाबद्दल असणारं कुतूहल शमवण्याचं काम प्रामुख्याने पुस्तकं करत असत; त्यामुळे 'वाचणार्‍याच्या रोजनिशी'मध्ये पुस्तकांबद्दलची मतं आणि अनुभव बहुसंख्येने येतात, पण त्याचबरोबर संगीत, चित्रपट आणि नृत्याबद्दलही चर्चा होते. अर्थशास्त्राबद्दलच्या एका माहितीपूर्ण, पण सुबोध नियतकालिकाची माहिती येते. लोकभाषांच्या शब्दसंपदेबद्दल आणि जागतिकीकरणाच्या अपरिहार्य परिणामांबद्दल ते लिहितात. मार्खेझच्या कादंबर्‍यांच्याच जोडीने सुधीर पटवर्धनांच्या चित्रांची चर्चा होते आणि हिंदीभाषक कवी मंगेश डबरालबद्दल सांगत असताना संगीत हेही पूरक वाचन कसं ठरू शकतं, ह्याबद्दलही काळसेकर लिहून जातात.

इतका विस्तृत आवाका मांडण्याचा प्रयत्न करणारं हे पुस्तक मला दोन दृष्टींनी महत्त्वाचं वाटतं. एक म्हणजे, मराठीत वर्षाला सुमारे तीन हजार पुस्तकं प्रसिद्ध होतात. सगळीच दर्जेदार नसली तरी विषयांतलं वैविध्य, वेगळे प्रयोग करून पाहण्याची वृत्ती आणि आतापर्यंत अनेक वर्षं साहित्याच्या मुख्य प्रवाहाबाहेर असलेला, मात्र नव्याने लिहू-वाचू लागलेला लेखकांचा आणि वाचकांचा वर्ग ह्या कारणांमुळे अनेक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकं मराठीत आली आहेत. अनेक अनुवाद उपलब्ध होत आहेत. हिंदी आणि इंग्रजी भाषांतलं नवीन साहित्य आहेच, पण ह्या तिन्ही भाषांत यापूर्वी प्रकाशित झालेल्या पण वाचायच्या राहून गेलेल्या पुस्तकांचा डोंगरही 'अजून किती वाचायचं बाकी आहे' ह्या भावनेने छाती दडपून टाकणारा आहे. दुर्दैवाने यातली काही पुस्तकं वाचकांपर्यंत म्हणावी तशी पोहोचू शकत नाहीत. मर्यादित वेळेत जी वाचणं शक्य होतं, त्यातली काही वाचून पदरी निराशा येते. चांगलं लेखन म्हणजे काय, हे समजण्यासाठी जरी अधूनमधून असले धक्के सोसणं गरजेचं असलं तरी एखादा खंदा मार्गदर्शक असला तर बराच फरक पडू शकतो. अगदी अरुण टिकेकरांसारख्या साक्षेपी वाचकानेही 'हाती जे आलं ते चाळून, वाचून, वाङ्मयीन खाचखळग्यांतून स्वतःची स्वतः सुटका करून घेत मार्गक्रमण करावं लागलं. बरंच आयुष्य त्यामुळे वाया गेलं, अस मला आज वाटतं. एखादा वाचनगुरू मिळाला असता तर ते अधिक सत्कारणी लागलं असतं' अशी खंत व्यक्त केली आहे. 'योजकस्तत्र दुर्लभ:' ह्या न्यायाने असा योग्य वाचनगुरू लाभणं विरळाच. हे पुस्तक ती भूमिका पूर्णपणे पार पाडतं, हे म्हणणं धार्ष्ट्याचं होईल. मात्र ती वाट कशी असावी, ह्याची जाण मात्र करून देतं.

हे सारे लेखन स्तंभलेखांच्या स्वरूपात असल्यामुळे त्याला काही अंगभूत मर्यादा आहेत. 'शाश्वताचे रंग' सारख्या दीर्घलेखांच्या पुस्तकात जसं विस्ताराने एखाद्या पुस्तकाबद्दल लिहिता येतं, परभाषेतलं असेल तर त्यातली सांस्कृतिक पार्श्वभूमी स्पष्ट करता येते आणि आपल्या आवडीनिवडींच्या तपशिलांचा हवा तसा विस्तृत पट रेखाटता येतो, तसं लेखन 'वाचणार्‍याच्या रोजनिशी'मध्ये शक्य नाही. असं असलं, तरी नेमक्या शब्दांत त्यांचं मर्म वाचकापर्यंत पोचवण्याचं कसब काळसेकरांकडे आहे. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी एखादं जर वाचलेलं असेल, त्याची वैशिष्ट्यं मनात पुन्हा जागी होतात आणि जी वाचायची राहिली आहेत, ती अर्थातच वाचावीशी वाटतात.

निव्वळ वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकांच्या यादीपेक्षाही ह्या लेखांतून सतत जागं असणारं त्यांचं कुतूहल आणि उदार, प्रवाही वाङ्मयीन दृष्टीचं येणारं प्रत्यंतर मला अधिक मोलाचं वाटतं. काळसेकर ज्या कालखंडात वाढले, तेव्हा इंटरनेट सोडाच पण दूरध्वनीही दुर्मीळ होते. माहिती मिळवण्याची साधनं मोजकी होती. आता नेमकी उलटी परिस्थिती आहे. हवी ती माहिती चुटकीसरशी उपलब्ध आहे. तरीही (किंवा त्यामुळेच) ज्याला 'कन्फर्मेशन बायस' म्हणतात, ती केवळ आपल्याच मताला पुष्टी देणारं वाचन करावं (किंवा संगीत ऐकावं/ राजकीय बातम्या देणार्‍या वाहिन्या पहाव्यात/ वृत्तपत्रं वाचावीत) ही वृत्ती वाढत चालली आहे. शिवाय हे केवळ वैयक्तिक पातळीवर अवलंबून नाही. अमेझॉन.कॉम सारखे संकेतस्थळ जर तुम्ही एखाद्या विशिष्ट लेखकाची वा साहित्यप्रकारातली काही पुस्तकं घेतलीत, तर त्याच धाटणीची वा लेखकाची पुस्तकं तुम्हाला आवडतील म्हणून सुचवतं. न्यू यॉर्क टाईम्ससारख्या वृत्तपत्रातही तुमच्या वाचनाच्या पूर्वेतिहासावरून तुम्हाला रोचक वाटतील अशा लेखांच्या वा बातम्यांच्या सुचवण्या येतात. वरवर पाहता हे कदाचित तितके गंभीर वाटणार नाही. मात्र हळूहळू यातून विरोधी दृष्टिकोन समजूनच न घेण्याचा हटवादीपणा उद्भवू शकतो.

अभिजन, उच्चभ्रू वर्गाला जे आवडतं तेच चांगलं; इतर सारं थिल्लर हे एक टोक झालं. 'जे जे लोकप्रिय, ते ते सवंग' ही धारणा त्यातूनच उद्भवते. मात्र मला जे आवडतं, त्यापलीकडे इतर काही चांगलं असूच शकत नाही असं मानणं आणि एकेकाळी अतिशय आवडणार्‍या, परिपूर्ण वाटणार्‍या लेखकाच्या लेखनातल्या किंवा एखाद्या कलाकृतीतल्या त्रुटी काही काळ लोटला की जाणवू शकतात, ही शक्यताच नाकारणं हे दुसरं टोक. आपल्या मनात साहित्याबद्दल म्हणा वा चित्रपट, संगीत, चित्रकला ह्यांच्या दर्जाबद्दल म्हणा - जे काही विशिष्ट ठोकताळे असतात, ते प्रसंगी तपासून पाहणं; त्यांच्यात अडकून न पडता काही सर्वस्वी भिन्न जर समोर आलं, तर त्याकडे खुल्या मनाने पाहणं आणि तो अनुभव जर बावनकशी असेल तर त्याचं मोकळ्या मनानं स्वागत करणं ही प्रक्रिया तितकीशी सोपी नाही. ती संपूर्णपणे आपण अंगी बाणवली आहे, असा दावाही कुणी करू नये. मात्र निव्वळ साहित्याचाच नव्हे तर कुठल्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना, तिची जाणीव जागी असणं महत्त्वाचं आहे. सतीश काळसेकरांची 'वाचणार्‍याची रोजनिशी' वाचत असताना पदोपदी हे जाणवत राहतं. बोरकरांची उपमा उसनी घेऊन सांगायचं तर 'मुळी तटस्थ राहून शाखापर्णीं कंप भोगणार्‍या, भुजाबाहूंनी स्वैर वारे कवळणार्‍या झाडासारखी' ही जागृत जाणीव हा एक श्रीमंत करणारा अनुभव आहे.

भाषावाङ्मयसाहित्यिकआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Sep 2011 - 1:20 pm | बिपिन कार्यकर्ते

लेखकाचे नाव वाचूनच ड्वाले पाणावले आहेत! कोरडे झाले की लेख वाचतो. सवडीने वाचायचा आहे हा लेख.

चित्रा's picture

1 Sep 2011 - 4:35 pm | चित्रा

+१.
डोळे कोरडे झाले की लेख वाचते. +१ !

चित्रा's picture

2 Sep 2011 - 6:29 pm | चित्रा

ओळख आवडलीच.

'जे जे लोकप्रिय, ते ते सवंग' ही धारणा त्यातूनच उद्भवते. मात्र मला जे आवडतं, त्यापलीकडे इतर काही चांगलं असूच शकत नाही असं मानणं आणि एकेकाळी अतिशय आवडणार्‍या, परिपूर्ण वाटणार्‍या लेखकाच्या लेखनातल्या किंवा एखाद्या कलाकृतीतल्या त्रुटी काही काळ लोटला की जाणवू शकतात, ही शक्यताच नाकारणं हे दुसरं टोक.

शेवटच्या परिच्छेदातला हा मुद्दा वेगळा आणि महत्त्वाचा वाटला.

श्रावण मोडक's picture

1 Sep 2011 - 2:06 pm | श्रावण मोडक

पाणावलेल्या डोळ्यांनीच लेख वाचला.
उत्तम परिचय. पण काही गोष्टी आणखी हव्या होत्या. लोकवाङ्मयच्या प्रकाशनातील हे स्तंभलेखन आहे. त्यामुळं, त्यात राजकीय विचारधारा किती डोकावते? पुस्तकांच्या पल्ल्याचा विचार करताना तशा काही गोष्टी दिसतात का काळसेकरांच्या लेखनात? उजव्या विचारधारेशी बांधिलकी मानणारी पुस्तकं किती येतात? त्यांची नोंद कशी घेतली जाते? या गोष्टी इथं तू नमूद केलेला पल्ला वाढवणाऱ्या असतील किंवा त्याची मर्यादा व्यक्त करणाऱ्या. पुस्तक वाचनाविषयीचे लेखन असल्याने हे प्रश्न येतात. एरवी, आपापल्या राजकीय विचारधारेप्रमाणे वाचन-लेखन करण्यास प्रत्येकजण मुखत्यार असतोच.
एकूण, नंदनविषयी असणारे ठोकताळे तपासून पहायला लावणारे लेखन ही या लेखाची बोनस उपलब्धी. ;)

नंदन, किती वर्षांनी लिहिलंस? :)
नेमकं आणि सुरेख. शेवटचा परिच्छेद एकदम आवडला.
जरा अधिक लिहीत जा रे..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Sep 2011 - 2:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेमकं आणि सुरेख. शेवटचा परिच्छेद एकदम आवडला.
सहमत.

नंदन, किती वर्षांनी लिहिलंस?
सहमत. :)

-दिलीप बिरुटे

योगप्रभू's picture

1 Sep 2011 - 2:34 pm | योगप्रभू

नंदन,
अरे अगदी हेच विचार मनात घोळत होते बघ. तू फार सुंदरपणे मांडलयस..

वाचनाचा प्रथम नाद लागतो, मग त्याचे व्यसन होते आणि सवय पडली की वाचन ही एक साधना बनून जाते. म्हणूनच समर्थ रामदासांनी म्हटलं आहे, की 'दिसामाजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे.'

काळसेकरांचे पुस्तक जरुर वाचेन. माझ्याकडे अरुण टिकेकरांचे 'अक्षरांची मांदियाळी' पुस्तक आहे. मला ते आवडले. गेल्या आठवड्यात श्री. बा. जोशी यांचे 'उत्तम मध्यम' हे पुस्तक खरेदी केले. (प्रकाशक - पद्मगंधा प्रकाशन). छानच आहे. ही दोन्ही पुस्तके 'बुक्स ऑन बुक्स' श्रेणीत मोडणारी आहेत.

वाचनाच्या बाबतीत सिलेक्टिव्हिटी येत चालली आहे, हे खरेच. तीच बाब संवेदनशीलतेबाबतही आहे. 'मी मला वाटेल ते बोलणार. पटलं तर तुम्ही माझ्या गटातले. नाही पटलं तर तुम्ही माझे शत्रू' ही वृत्ती वाढत चालली आहे. समाजाची विचारशक्ती बोथट होत चालल्याचे हे एक लक्षण.

लेखन दोन-तीनदा सावकाशपणे वाचावे, असे झाले आहे. असेच विचारप्रवर्तक लिहा, ही विनंती..

रमताराम's picture

1 Sep 2011 - 8:07 pm | रमताराम

वाचनाच्या बाबतीत सिलेक्टिव्हिटी येत चालली आहे, हे खरेच. तीच बाब संवेदनशीलतेबाबतही आहे. 'मी मला वाटेल ते बोलणार. पटलं तर तुम्ही माझ्या गटातले. नाही पटलं तर तुम्ही माझे शत्रू' ही वृत्ती वाढत चालली आहे. समाजाची विचारशक्ती बोथट होत चालल्याचे हे एक लक्षण.
एकदम सहमत.

अधिक एक!

वाचनाच्या बाबतीत सिलेक्टिव्हिटी येत चालली आहे, हे खरेच. तीच बाब संवेदनशीलतेबाबतही आहे. 'मी मला वाटेल ते बोलणार. पटलं तर तुम्ही माझ्या गटातले. नाही पटलं तर तुम्ही माझे शत्रू' ही वृत्ती वाढत चालली आहे. समाजाची विचारशक्ती बोथट होत चालल्याचे हे एक लक्षण.

पटलं.

शुचि's picture

1 Sep 2011 - 10:28 pm | शुचि

विचारशक्ती बोथट = आक्रस्ताळेपणा जास्त. :(

स्मिता.'s picture

2 Sep 2011 - 12:46 am | स्मिता.

विचारशक्ती बोथट = आक्रस्ताळेपणा जास्त

अगदी चपखल!

विजुभाऊ's picture

2 Sep 2011 - 2:12 pm | विजुभाऊ

विचारशक्ती बोथट = आक्रस्ताळेपणा जास्त
हा हा हा एकदम योग्य अवलोकन. असे नमुने जालोजाली दिसतात. त्यांच्या खरडवह्या देखील ओरडून हेच सांगत असतात

उत्तम पुस्तकपरिचय.. लेख आवडला

सहज's picture

1 Sep 2011 - 3:40 pm | सहज

जरी बघताक्षणीच सर्वांसारखेच ड्वोळे पाणावले असले तरी...

मार्क्सवादाचा केवळ एक विचारसरणीच म्हणून नव्हे तर जगण्याच्या अनेक स्तरांवर केलेला स्वीकार ...लख्ख लक्षणे असुनही

आता कम्युनिष्ठ मंडळी व लोकशाहीवादी यांचे काही फारसे सख्य नाही असा आजवर एक गैरसमज होता की काय? नंदनभावजी म्हणजे काय खुलासा कराच? नंदन डाव्यांना जाउन मिसळला की काय? बिग ब्रदरला काय वाटेल नंदन? :-(

शेवटचा परिच्छेद मस्तच पण जे लिहले आहे त्याचा नक्की कसा 'अर्थ' लावून श्रीमंत व्हायचे हे ठरवत आहे. तोवर 'तटस्थ मार्क्सवादी' शब्द सुचला आहे.

एकूण, नंदनविषयी असणारे ठोकताळे तपासून पहायला लावणारे लेखन ही या लेखाची बोनस उपलब्धी.

श्रामोंशी सहमत. :-)

'अजून किती वाचायचं बाकी आहे' ह्या भावनेने छाती दडपून टाकणारा आहे.

सो स्टॉप ट्राईंग. हा रोचक लेख

परिकथेतील राजकुमार's picture

1 Sep 2011 - 3:43 pm | परिकथेतील राजकुमार

काय प्रतिक्रिया दिली म्हणजे ती हा लेख न वाचता दिली आहे ते जाणवणार नाही ?

सन्जोप राव's picture

1 Sep 2011 - 4:25 pm | सन्जोप राव

लेख फारच आवडला. मनाजोगते, मनमुराद वाचता येत नाही याची खंत अधिक धारदार झाली.

चिंतातुर जंतू's picture

1 Sep 2011 - 4:41 pm | चिंतातुर जंतू

'वाङ्मय वृत्त'मध्ये काळसेकरांची लेखमाला क्रमशः प्रकाशित होत होती तेव्हाच ती वाचली होती आणि आवडलीही होती. मला आवडलं ते इतरांबरोबर वाटून घेतलं अशी साधी आणि गोड भूमिका त्या लेखमालेमागे होती. त्याशिवाय पुस्तकांशी त्यांचं असलेलं भावनिक नातंही त्यातून दिसत रहायचं. लेखमाला प्रकाशित होत असताना लोकवाङ्मय गृहाच्या मुंबईतल्या 'पीपल्स बुक हाऊस' मध्ये ही पुस्तकं काही काळाकरता आवर्जून उपलब्ध केलेली असायची आणि त्यामुळे इच्छा असली तर ती वाचणं शक्य होतं.

श्रावण यांच्या 'त्यात राजकीय विचारधारा किती डोकावते?' या प्रश्नाचं उत्तरः काही पुस्तकांची निवड ही डाव्या विचारसरणीला अनुसरून होती हे खरं, पण मला तरी तो त्यातला प्रमुख भाग वाटला नाही. मला वाटतं की कोणत्याही एका तर्ककर्कश विचारसरणीपेक्षा साध्या पण सर्वव्यापी मानवतावादी भूमिकेला अनुसरून आपसूक झालेली ती निवड होती. मग त्यात समाजातल्या दुर्लक्षित घटकांविषयीची सहानुभूती असेल किंवा शेतकर्‍यांच्या आत्महत्येसारख्या ताज्या घटनांचं प्रतिबिंब असेल.

अवांतरः 'वाङ्मयवृत्त'मध्ये याच काळात 'मालधक्क्यावरून' हे कवी वसंत आबाजी डहाके यांचं स्फुट-सदरसुद्धा प्रकाशित व्हायचं. त्याचंही नंतर पुस्तक प्रकाशित झालं. तेदेखील आवर्जून वाचावं अशी मी शिफारस करेन.

एकंदरीत पुस्तक-परिचयाबद्दल नंदनचे आभार! त्याच त्याच विषयांवरच्या कंटाळवाण्या धाग्यांमध्ये एक सुखद झुळूक आल्यासारखं झालं. हा धागा काही दिवस वर राहील आणि पुष्कळ लोक तो वाचतील अशी आशा आहे.

मुक्तसुनीत's picture

1 Sep 2011 - 7:45 pm | मुक्तसुनीत

"रसग्रहण" आवडले :)

शुचि's picture

1 Sep 2011 - 7:08 pm | शुचि

अतिशय मुद्देसूद आणि अनेक पदरी लेख खूपच आवडला.

नंदन यांचा लेख म्हणजे उंबराचे फूल असतो पण त्याचा सुगंध मनात अनंत काळ दरवळत राहतो. हा लेखदेखील बुकमार्क केला आहे. पुनर्वाचनाय ची मोहीनी च अजून उतरायची आहे ..

श्रावण मोडक's picture

1 Sep 2011 - 7:17 pm | श्रावण मोडक

नंदन यांचा लेख म्हणजे उंबराचे फूल असतो पण त्याचा सुगंध मनात अनंत काळ दरवळत राहतो.

नंदन, करशील पुन्हा दवण्यांची थट्टा? करशील? करशील? काव्यगत न्याय का काय म्हणतात तो हाच...

हाहा :) अहो पण अशीच भाषा आमच्या मनात येते त्याला आम्ही पामर काय करणार?

श्रावण मोडक's picture

1 Sep 2011 - 7:31 pm | श्रावण मोडक

पामर? नाही. नाही. तुझं नामकरण करू आपण - शुचि दवणे. ;)

लेख आवडला. शेवटचा परिच्छेद तर जास्तच आवडला.
तू लिहिता झालास म्हणून गणेशचतुर्थीला तुझं अभिनंदन करते.:)

चतुरंग's picture

1 Sep 2011 - 7:34 pm | चतुरंग

साक्षात नंदनचा लेख म्हटल्यावर आनंदाला उधाण आले. डोळे फार पाणावायच्या आतच वाचून काढला!
अत्यंत संपृक्त भाषेत, मुद्देसूद लिखाण कसे करावे याचा वस्तुपाठ आहे. लेख अतिशय आवडला. वाचनाच्या बाबतीत मी किती कोता आहे ही जाणीव ठळक झाली आणि दडपण वाढलं!
लेख पुन्हा वाचून अधिक समजून घ्यावा लागेल.

-रंगा

नंद्या लिहिता झाला हे एक बरं झालं..आरामात वाचीन लेख घरी गेल्यावर.. :)

रमताराम's picture

1 Sep 2011 - 8:00 pm | रमताराम

गणरायाच्या कृपेने नंदूशेट लिहिते झाले. 'आज फारा दिवसांनी कोंभ मुसळाला आले' असे म्हणून परतफेड करून का? :)

शाश्वताचे रंग' ने खरेच एक परंपरा कशी निर्माण केली नाही याचे मला नेहमी आश्चर्य वाटत आले आहे. अनेक वाचकांना हे पुस्तक ठाऊकही नाही असे निरीक्षण आहे माझे. टिकेकरांचे एक पुस्तक (नाव आठवत नाही बहुधा 'सारांश'), शांताबाईंची (अंमळ बाळबोध शैलीतली) एक दोन लहान पुस्तके वगळली तर फारसे काही हाती लागलेले नाही. अलिकडेच आलेले विश्वास पाटील यांचे 'नॉट गॉन विथ द विंड' निव्वळ पुस्तकांबद्दल नसले तरी याच परंपरेतले म्हणता येईल. कुरूंदकरांनीही काही पुस्तकांबद्दल साक्षेपाने लिहिले आहे, पण त्यांचे असे एक संकलन केले गेलेले नाही.

अगदी अरुण टिकेकरांसारख्या साक्षेपी वाचकानेही 'हाती जे आलं ते चाळून, वाचून, वाङ्मयीन खाचखळग्यांतून स्वतःची स्वतः सुटका करून घेत मार्गक्रमण करावं लागलं. बरंच आयुष्य त्यामुळे वाया गेलं, अस मला आज वाटतं. एखादा वाचनगुरू मिळाला असता तर ते अधिक सत्कारणी लागलं असतं' अशी खंत व्यक्त केली आहे. 'योजकस्तत्र दुर्लभ:' ह्या न्यायाने असा योग्य वाचनगुरू लाभणं विरळाच

अगदी अगदी. यातून अनेक बेक्कार पुस्तके वाचण्यात गेलेला वेळ सत्कारणी लागू शकला असता. पण म्हणून संस्थळावर समानशीले मंडळीशी आदानप्रदान करून ही कमतरता काही अंशी भरून काढावी लागते.

ज्याला 'कन्फर्मेशन बायस' म्हणतात, ती केवळ आपल्याच मताला पुष्टी देणारं वाचन करावं (किंवा संगीत ऐकावं/ राजकीय बातम्या देणार्‍या वाहिन्या पहाव्यात/ वृत्तपत्रं वाचावीत) ही वृत्ती वाढत चालली आहे. शिवाय हे केवळ वैयक्तिक पातळीवर अवलंबून नाही. अमेझॉन.कॉम सारखे संकेतस्थळ जर तुम्ही एखाद्या विशिष्ट लेखकाची वा साहित्यप्रकारातली काही पुस्तकं घेतलीत, तर त्याच धाटणीची वा लेखकाची पुस्तकं तुम्हाला आवडतील म्हणून सुचवतं. न्यू यॉर्क टाईम्ससारख्या वृत्तपत्रातही तुमच्या वाचनाच्या पूर्वेतिहासावरून तुम्हाला रोचक वाटतील अशा लेखांच्या वा बातम्यांच्या सुचवण्या येतात. वरवर पाहता हे कदाचित तितके गंभीर वाटणार नाही. मात्र हळूहळू यातून विरोधी दृष्टिकोन समजूनच न घेण्याचा हटवादीपणा उद्भवू शकतो.

टोपी काढली आहे.
दोनशे टक्के सहमत. आणि तथाकथित स्पर्धेच्या युगात टाईम्स टॉप टेन पुस्तकांपलिकडे काहीही वाचायला 'मेला वेळ असतोच कुठे हल्ली'. ते ही अंमळ वरवर चाळावे, दोन शब्दांची देवघेव करून अहो रूपम् अहो ध्वनिम् म्हणत समाधानी रहावे अशा जीवनपद्धतीमधे आवर्जून विरोधी मताची पुस्तके वाचणे ही अपेक्षाच अनाठायी आहे.

लिहिते रहा मालक. अजून येऊ द्या तुमच्या पोतडीतून नवे काही.

मनिष's picture

2 Sep 2011 - 1:01 am | मनिष

सहमत!!!
नंदन जरा रेग्युलर लिहीत जा रे!

गणपा's picture

1 Sep 2011 - 8:26 pm | गणपा

नंदुशेट अतिशय ओघवत्या शब्दांत करुन दिलेली पुस्तकाची ओळख आवडली.

आजच्या शुभ मुहुर्तावर ही जी लेखणी हाती घेतली आहेस ती आता इतक्यातच परत खाली ठेवुन नकोस. :)

धनंजय's picture

1 Sep 2011 - 10:00 pm | धनंजय

ओळख अतिशय आवडली.

हे पुस्तकच नव्हे, तर यात उल्लेखलेली पुस्तके वाचण्याचे कुतूहल होत आहे.

पैसा's picture

4 Sep 2011 - 9:39 pm | पैसा

याशिवाय गणपा आणि ऋषिकेशही सहमत.

राजेश घासकडवी's picture

1 Sep 2011 - 10:13 pm | राजेश घासकडवी

नंदनचं लेखन वाचणं म्हणजे पर्वणीच असते याचा पुनर्पत्यय आला.

गणेशचतुर्थीच्या निमित्ताने हा नवीन लेखमालेचा श्रीगणेशा केला असावा अशी आशा बाळगतो. आणि नंदननेदेखील एक रोजनिशी लिहावी ही विनंती करतो.

क्रेमर's picture

1 Sep 2011 - 11:02 pm | क्रेमर

काळसेकरांच्या पुस्तकाचा परिचय आवडला. पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहे.

टिकेकरांच्या मतापेक्षा माझे मत वेगळे आहे. वाचनगुरू नसावाच असे माझे मत आहे. इकडे-तिकडे तोंड मारून वाचायला मला आवडते. वेगवेगळ्या जाणीवा, समाज-संस्कृतीविषयी कळते. चांगले लेखक सगळीकडेच असतात. मला डेबोनेरमधले काही लेखही (अर्थात उद्देश चित्रं पाहणे एवढाच होता नी डेबोनेरचा अंक किती वीर्यांना शिवून आलेला असायचा याची कल्पनाही करवत नाही.) कॉलेजात वाचतांना आवडल्याचे आठवते. काहीही वाचावे असे माझे वैयक्तिक मत आहे.

शेवटच्या परिच्छेदातील व्यथा समजण्याजोगी आहे. आजकाल ब्लॉग्ज वगैरे वाचतांना विरोधी मतांचे दुवे दिलेले असतात त्यामुळे विरोधी मते मूळापासून जाणून घेता येतात, काही वेळा पटतातही. पण काही एक बायस निर्माण होण्याची शक्यता आजकाल अधिक आहे, या मताशी सहमत आहे.

धनंजय's picture

1 Sep 2011 - 11:49 pm | धनंजय

दिसला छापील मजकूर तर तो वाचून काढायचा... असा माझा लहानपणचा अनुभव आहे. त्यामुळे किराणा सामानाच्या पुड्यांना बांधलेले कागदही वाचल्याचे आठवते.

आणि होय; कॉलेजात चकचकीतची-कडकडीत-झालेली पानेही मजकुरासाठी वाचलेली आठवतात :-)

पण आता माहितीच्या महापुरामुळे ते जमत नाही. (पूर्वी "बफे" प्रकारच्या खानावळीत गेलो, की प्रत्येक पदार्थ चाखून बघतच असे. पण ४०-४० पदार्थ असले, तर त्यांचा एक-एक चमचा घेतला तरी फार होते. पोटही युवावस्थेसारखे भरतंभरती करण्यासारखे लवचिक राहिलेले नाही.)

क्रेमर's picture

2 Sep 2011 - 2:14 am | क्रेमर

कुठले प्रकार आवडतात/ आवडत नाहीत हे थोडे थोडे स्पष्ट होऊ लागते. उदा. मी चायनीज बफे टाळतो वगैरे. काहीही वाचल्यास आवड हळूहळू उत्क्रांत होतेच. निवड करण्याचे स्वातंत्र्य हवे, गुरू असल्यास ते स्वातंत्र्य मिळेलच असे नाही. पुस्तकच वाचकाचा गुरू आहे, असे थोडेसे धाडसी विधान मनात येत आहे. गुरूपेक्षा पुस्तकांची उपलब्धता असणे जास्त गरजेचे आहे असे वाटते. आजकाल हा प्रश्न फारसा मोठा नाही पण माझ्या लहानपणी हा एक मोठाच प्रश्न होता.

धनंजय's picture

2 Sep 2011 - 2:19 am | धनंजय

खूप पुस्तकांची उपलब्धता हवीच.

पण पाठ्यपुस्तक निर्मिती करणार्‍यांची जबाबदारी फारच मोठी असते, हेही मानावे लागते. (माझ्या अनेक मित्रांना वाचनाची आवड नव्हती. पण ते पाठ्यपुस्तक वाचत. न वाचून रट्टे/लालभोपळे पडले असते.)

क्रेमर's picture

2 Sep 2011 - 2:31 am | क्रेमर

पाठ्यपुस्तक निर्मिती करणार्‍यांची जबाबदारी मोठी आहे हे झालेच. त्यातून 'वाचनासाठी काहीतरी मार्गदर्शन लागतेच' असे मत नोंदवायचे असल्यास ते मान्यच आहे. पाठ्यपुस्तक संकलक सगळ्या प्रकारच्या साहित्याची ओळख मुलांना व्हावी म्हणून प्रयत्न करतात. हे काम एक प्रकारे वाचनाची व्याप्ती वाढवण्यासारखेच आहे. टिकेकरांच्या विधानातील वाचनगुरू नेमका कसा असावा याबद्दल माहिती नसल्याने फापटपसारा न वाचता नेमके काय वाचावे व वेळ कसा वाचवावा हे सांगणारा असावा असा अर्थ मी लावून घेतला. त्या अर्थाने मला ते विधान पटलेले नाही.

पुष्करिणी's picture

2 Sep 2011 - 1:08 am | पुष्करिणी

लेख खूप आवडला, पुस्तक वाचेन आता.

पिवळा डांबिस's picture

2 Sep 2011 - 2:29 am | पिवळा डांबिस

पुस्तक परिचय आवडला.
श्री सतीश काळसेकरांचं साहित्य यापूर्वी कधी वाचल्याचं स्मरत नाही.
यापुढे नांव विशेष लक्षात ठेऊन वाचीन.

शुचि's picture

2 Sep 2011 - 3:01 am | शुचि

अवांतर - वाचना बाबत अजून एक गोष्ट मला वाटते ती म्हणजे - आपण जे काही वाचतो त्याची रोजनिशी ठेवणे. कारण "गवतात तोंड घालून चरत जाणार्‍या उंडग्या जनावराप्रमाणे वाचत" * जरी गेले तरी जर का तुम्ही नोंद करुन ठेवत नसाल तर त्याने ज्ञानवृद्धी आणि क्षणीक आनंदापलिकडे जाऊन काही मिळेलच असे नाही . पुस्तकाची भाषावैशिष्ठ्ये, शब्दसंपत्ती, सौंदर्यस्थळे पुढेपुढे विसरली जातात आणि आठवणीत रहाते फक्त त्याने मनावर सोडलेली अमीट छाप.

* सौजन्य - सन्जोप राव (येथून)

अभिजीत राजवाडे's picture

2 Sep 2011 - 5:53 am | अभिजीत राजवाडे

नंदन,
आपण खरच एका छान पुस्तकाची ओळख करुन दिलीत. मी लगेचच आंतरजालावर शोधले व मला याच पुस्तकाचे अजुन एक रसग्रहण मिळाले.

रसग्रहण १ - ते येथे वाचावे.
रसग्रहण १ - ते येथे वाचावे
पुस्तकाची काही पाने बुक गंगा या संकेत स्थळानी वाचण्यास उपलब्ध करुन दिली आहेत. ती वाचण्यासाठी येथे टिचकी द्यावी.

विसुनाना's picture

2 Sep 2011 - 12:55 pm | विसुनाना

'वाचणार्‍याची रोजनिशी' या सतीश काळसेकरांनी लिहिलेल्या रसग्राहक पुस्तकाच्या रसग्रहणाच्या निमित्ताने नंदन यांनी समग्र वाचन प्रक्रियेवरच लक्ष्यवेधी भाष्य केलेले आहे.

ज्ञानवर्धन किंवा रंजन यांपैकी रंजनावरच भर देणारी माझी भूमिका आहे. त्याचा एक तोटा म्हणजे पुढेपुढे आपण काय आणि किती वाचले याचाही विसर पडतो.जे-जे वाचले त्याचा एक सबगोलंकार अनुभव तेवढा गाठीशी उरला आहे. फारफारतर व्यक्तिमत्त्वावर थोडा आपसुक परिणाम झाला असेल पण ज्ञानवर्धन का काय ते फारसे झाले नाही. कदाचित एक 'वाचणार्‍याची रोजनिशी' मीही बाळगली असती तर बरे झाले असते असे वाटते. :(

आपल्या मनात साहित्याबद्दल म्हणा वा चित्रपट, संगीत, चित्रकला ह्यांच्या दर्जाबद्दल म्हणा - जे काही विशिष्ट ठोकताळे असतात, ते प्रसंगी तपासून पाहणं; त्यांच्यात अडकून न पडता काही सर्वस्वी भिन्न जर समोर आलं, तर त्याकडे खुल्या मनाने पाहणं आणि तो अनुभव जर बावनकशी असेल तर त्याचं मोकळ्या मनानं स्वागत करणं ही प्रक्रिया तितकीशी सोपी नाही.

- खुल्या दिलाने स्वागत करण्यासाठी एक अनघड,लवचिक विचारशैली गरजेची असते आणि ती कदाचित एका विशिष्ट मानसिक वयात जिवंत असते. ते मानसिक वय उलटून गेले की आपण ताठर होतो , आपल्या जीवनपद्धतीप्रमाणे आपली मते बनवतो किंवा आपल्या मतांप्रमाणे आपली जीवनपद्धती बनवण्याचा प्रयत्न करतो. ती एक चाकोरी ठरली की झापड बांधल्याप्रमाणे त्याच चाकोरीत फिरत राहतो. याला घाण्याच्या बैलाचीही उपमा देता येईल. आपण केलेले वाचन,मनन,चिंतन आणि त्यातून ठरवलेली विचारसरणी हे कष्ट वाया जातील; आपण स्वतःच निर्माण केलेला हस्तिदंती मनोरा ढळेल अशी भीती याला कारणीभूत असावी.
हेच या चर्चेचे मर्म असावे.

"कोणतीही विचारसरणी किंवा इझम हा परीपूर्ण नाही. त्यामुळे त्याच्या बाजूने अथवा विरुद्ध उघड अथवा छुपी मते मांडणारे कोणतेही वैचारीक अथवा ललित लेखन आपल्याला जीवनादर्श मानण्याचे कारण नाही" अशी स्वच्छ जाणीव असेल तर कोणत्याही लेखनाकडे आपण निर्व्याज बुद्धीने पाहू शकू असे वाटते. त्यासाठी चर्चित पुस्तक आणि त्यावरील नंदन यांचा लेख दोन्हीही अभिनंदनीय आहेत.

विकास's picture

2 Sep 2011 - 4:47 pm | विकास

पुस्तक परीचय फारच आवडला!

वर अनेकांनी म्हणल्याप्रमाणे, शेवटचा परीच्छेद खूप बोलका आहे, भावला. वाचनात सर्वार्थाने वैविध्य हवे. जर एखाद्या लेखकाचा/कवीचा/ग्रंथकाराचा वगैरे जर "कल्ट" झाला तर त्याचा उद्देश सफल होण्यात त्याचा वाचकवर्ग कमी पडला असे वाटते. कधीकाळी (अजूनही असेल कदाचीत) मराठी प्रकाशक संघटना पुस्तकवाचनाच्या प्रसारासाठी "वाचल तर वाचाल" असे घोष वाक्य वापरीत, त्याची या निमित्ताने आठवण झाली.

नंदनला परत लिहीते झालेले पाहून आनंद झाला. तो आनंद एकाच लेखापुरता मर्यादीत राहणार नाही अशी आशा! :-)

ऋषिकेश's picture

2 Sep 2011 - 8:21 pm | ऋषिकेश

काय लिहिलंयस! मस्त! पुस्तक/काळसेकरांचे लेखन दुर्दैवाने वाचलेले नाही. त्यामुळे पुस्तकाबद्दल/लेखनाबद्दल आम्ही पामर काय बोलणार. परिचय वाचुन पुस्तक नक्कि वाचेन इतकंच सांगतो.
बाकी नंदन लिहिता झाला ही मात्र गणरायाची कृपाचीच म्हणायची :)
आता कीबोर्डबरची धुळ झटकलीच आहेस तर येत रहुदे असंच सकस !

लेखन पुविवरही टाकावस अशी विनंती (पुस्तकानुसार वर्गीकृत असल्याने लेखन शोधायला सोपं जातं)

नंदन-जी,
सॉमरसेट मॉमची वाक्ये वाचून मी १९५९-६० सालच्या फर्ग्युसन कॉलेजच्या ग. प्र. प्रधान सरांच्या वर्गात जाऊन पोचलो. ते आम्हाला इंग्रजी शिकवायचे व मॉमचे कांहीं लेख त्यावेळी वाचायला मिळाले होते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2011 - 9:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदनसेठ, मनःपूर्वक अभिनंदन. पार्टी द्या ....!

बाकी, विजेत्यांचेही अभिनंदन...! :)

-दिलीप बिरुटे

घाटावरचे भट's picture

28 Sep 2011 - 1:19 am | घाटावरचे भट

अतिशय उत्तम लेख. खूप दिवसांनी नंदनराव टंकते झाले हे पाहून आनंद झाला.

- भट

जुने मिपामौक्तिक वर काढते. असेही धागे येत असत मिपावर कधीकाळी.

मिसळपाव's picture

10 Feb 2019 - 2:37 am | मिसळपाव

यशोधरा,
काय कमाल आहे बघ - बर्‍याच दिवसानी डोक्यात आलं की सर्वात जुन्या लेखांपासून सुरूवात करू. हा हाती लागला. लेख तर उत्तम आहेच, पण प्रतिक्रियापण वाचनीय असायच्या ("आमच्या वेळेला..." वगैरे वगैरे!) म्हणून वाचत होतो आणि शेवटची ही तुझी प्रतिक्रीया वाचून उडालोच !!

गेल्या तीन - चार वर्षात जे कोणी ईथे आले असतील त्याना एक टिप - मिपाच्या पहिल्या वर्ष-दोन वर्षातले लेख वाचले नसाल तर जरूर वाचा. अशी आणखी अनेssssक मिपामौक्तिकं वाचायला मिळतील.

यशोधरा's picture

10 Feb 2019 - 9:59 am | यशोधरा

त्या वेळेचं मिपा, लेख, प्रतिसाद, गंमती जमती मी फार मिस करते कधी कधी.