सिंहलव्दीपाची सहल : १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================संध्याछाया पसरू लागल्यावर उद्यानाच्या नियमांचे पालन करून तेथून बाहेर पडून कातारागामाच्या दिशेने निघणे भाग पडले.
कातारागामातला एक रात्र मुक्काम संपवून सहलीचा सहावा दिवस उजाडला. आजचा कार्यक्रम असा होता...
सिंहलव्दीपाची सहल : सहावा दिवस : कातारागामा --> कातारागामा मंदिरसंकुल --> गालं --> कोलंबो (वस्ती)
(मूळ नकाशा जालावरून साभार)
*********************************
कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल
कातारागामा नावाच्या गावात सिंहलीमध्ये कतारागामाम किंवा तमीळमध्ये कतिरकामन (कार्तिकेयम) याचे मंदिर आहे. सिंहला बौद्ध, श्रीलंकन हिंदू तमीळ, श्रीलंकन मूर (मुस्लिम) आणि श्रीलंकन वेद्दा (आदिवासी) असे विविध धर्म-पंथांचे लोक ज्याना पवित्र स्थान समजतात अश्या श्रीलंकेतल्या मोजक्या देवस्थानात या मंदिरसंकुलाचा समावेश होतो. या संकुलात स्कंद (उर्फ मुरुगन उर्फ कातिरकामन उर्फ कादिरकामन उर्फ सुब्रमण्य उर्फ कंदासामी उर्फ कादिरदेवा उर्फ कातिरदेवा उर्फ कातिरावेल उर्फ कार्तिकेय उर्फ कुमारदेव उर्फ तारकाजित) मंदिर; तेव्यानै (देवयानी उर्फ देवसेना, इंद्राची मुलगी व कार्तिकेयाची पत्नी) मंदिर, शिवमंदिर, कीर्ती विहार नावाचा बौद्ध स्तुप; आणि मस्जिद आहे. इ स १९४० पर्यंत हे स्थान घनदाट जंगलात होते आणि येथे खडतर पदयात्रा करीत येणारे बहुतांश भाविक श्रीलंकन आणि दक्षिण भारतिय तमीळ होते. त्यानंतर रस्ताची सोय झाल्यावर "कातारागामा देवियो" ला भेट देणार्या भाविकांत सिंहला बौद्धधर्मिय बहुसंख्य झाले आहेत. त्यानंतर या जागेच्या दंतकथांत आणि पुजा-उपासनांत बौद्धधर्माचे वर्चस्व येऊ लागले आहे. अर्थातच तेथे मालकी आणि उपासना यांच्या कारणावरून धर्मसंघर्ष होऊ लागला आहे. १९५० मध्ये श्रीलंकन सरकारने याला अधिकृत देवस्थानाचा दर्जा दिला आहे व सरकारी मदतीने याची देखभाल केली जाते. या मंदिराचे पुजारी "कपुराला" या नावाने ओळखले जातात व ते वेद्दा समाजाचे वंशज असल्याचे मानले जाते. या जागेवर मुरुगन आणि त्याची पत्नी वल्ली किंवा वल्लीमलै यांची भेट झाली असे समजतात. स्कंद पुराणात या जागेचा उल्लेख आहे असे म्हणतात. उत्तर श्रीलंकेतील जाफनापासून दक्षिणटोकाला असलेल्या कातारागामापर्यंतच्या पदयात्रामार्गावर अनेक मुरुगनमंदिरांची साखळी आहे. १५ व्या शतकात प्रसिद्ध तमीळ कवी आणि मुरुगनभक्त अरुणागिरीनाथर याने ही पदयात्रा केल्यावर कातारागामाची पवित्र तिर्थस्थान म्हणून प्रसिद्धी अधिकच वाढली. हे स्थान श्रीलंकेतल्या १६ पवित्र बौद्धस्थानांपैकी (सोलोस्मास्थान) एक समजले जाते. राजा दातुगामिनी (इ स १६१ - १३७) च्या काळापासून श्रीलंकेच्या इतिहासात याचा उल्लेख येतो. २३०० वर्षांपूर्वीपूर्वी अनुराधापुरा येथे आणलेल्या बोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात इथल्या क्षत्रियवंशाच्या लोकांनी हातभार लावल्याचा उल्लेख महावंश या ग्रंथात आहे. या मंदिराच्या परिसरात अनुराधापुराच्या बोधीवृक्षाच्या फांदीपासून वाढवलेला बोधीवृक्ष आहे. एका बौद्ध दंतकथेप्रमाणे कार्तिकेय श्रीलंकेत आल्यावर त्याने तेथिल तमीळांकडे आश्रय मागितला. तमीळांनी त्याला नकार दिल्याने तो कातारगामातिल सिंहालांकडे राहण्यास आला. यावरून रागावून कार्तिकेयाने तमीळ लोकांना अंगाला टोचून घेणे व निखार्यांवरून चालणे या शिक्षा दिल्या, ज्या आजही इथल्या देवस्थानाच्या वार्षिक समारंभात प्रथेच्या रुपाने पाळल्या जातात. कार्तिकेय श्रीलंकेच्या चार संरक्षक कुलदेवतांपैकी एक मानला जातो. मंदिरसंकुलात काढलेले काही फोटो... भाविक कार्तिकेयाला अनेक फळांचा व सुकलेक्या फुलांची भेट देताना दिसले. त्यांची अनेक दुकाने देवस्थानाच्या परिसराच्या सुरुवातीलाच आहेत...
कातारागामा मंदिरसंकुल ०१ : फळांचे दुकान
.
कातारागामा मंदिरसंकुल ०२ : सुकी फुले विकणारी फुलवाली
.
फळांच्या दुकानाशेजारच्या गाडीतळावर फळे विकत घेतल्यासच गाडी उभी करता येईल अशी त्या दुकानदारांची अट होती. त्यामुळे आम्हाला अर्धापाऊण किलोमीटर दूर असलेल्या संकुलाच्या दुसर्या टोकावरच्या गाडीतळावर आमची गाडी उभी करावी लागली. मात्र त्यामुळे आम्हाला अनायासे संकुलाच्या सर्व परिसराचा फेरफटका मारायला मिळाला !...
कातारागामा मंदिरसंकुल ०३ : कार्तिकेयमंदिराचे (डावीकडे) व कीर्तीविहाराचे (समोर) प्रवेश्व्दार
कातारागामा मंदिरसंकुल ०४ : कार्तिकेय मंदिर
कातारागामा मंदिरसंकुल ०५ : गणेशाचा फोटो
कातारागामा मंदिरसंकुल ०६ : कीर्तीविहाराकडे जाणारा मार्ग
कातारागामा मंदिरसंकुल ०७ : बुद्धमूर्ती
कातारागामा मंदिरसंकुल ०८: बोधीवृक्ष
कातारागामा मंदिरसंकुल ०९ : कीर्तीविहाराच्या आवारातील कारंजे व त्याच्यामागे दिसणारे काही इमारतींचे कलश
वाचतिये. सुकी फुले पाहून पाईन
ती सुकलेली फुले मस्त आहेत!
हा भागही आवडला. गर्दी
हिंदू देवतांना सायडिंगला
In reply to हिंदू देवतांना सायडिंगला by अजया
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
:)
मस्तं झालाय हा भागही.
श्रीलंका
श्रीलंका
In reply to श्रीलंका by मी कोण
धन्यवाद !