मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन

डॉ सुहास म्हात्रे · · भटकंती
================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुध्दमूर्ती...     ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...     ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...     ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...     ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...     ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...     १३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...     १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...     १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त) ==================================================================

डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...

==================================================================

पार्श्वभूमी

सौदी अरेबियात असताना अशीच एक ईदची सुट्टी. पाच दिवस मुख्य सुट्टी आणि तिच्या पुढचे मागचे आठवडी सुट्टीचे चार दिवस असे मिळून नऊ दिवस मोकळे होते. या सुट्टीत काय करायचे हे मात्र नक्की होत नव्हते. कामाच्या जागच्या आणि वैयक्तिक कारणांनी सगळे बेत फिसकटत गेले आणि हा हा म्हणता सुट्टी पाच दिवसांवर येऊन ठेपली. मग इतक्या कमी वेळेत "व्हिसा न लागणार्‍या ठिकाणालाच भेट देणे शक्य आहे" हे नक्की झाले. करायच्या सफरींच्या यादीत श्रीलंका होतीच. अर्थातच तिचे नाव सर्वात वर आले. आंतरजालावर शोध करून, जालसंदेश व फोन वापरून सहलीचा हवा तो आराखडा तीन दिवसांत मान्य करून घेतला. विमानाचे तिकीट काढले. सुट्टी सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर श्रीलंकेवर स्वारी करण्याची सर्व तयारी पूर्ण झालीसुध्दा ! श्रीलंका म्हटले म्हणजे कोणाही भारतीयाच्या मनात सर्वप्रथम रावणाची लंका येते ! पण बहुतेक तिथेच श्रीलंकेची ओळख सुरू होते आणि संपतेही ! भारतात इतकी माहीत असलेली आणि तिच्याबाबतीत इतके अज्ञान असलेली क्वचितच दुसरी जागा असेल. तमिळ एलमच्या लढ्याच्या बातम्या, भारतीय तमिळ मच्छीमारांना बंदी केल्याच्या बातम्या, क्वचित प्रसंगी श्रीलंकन चहा आणि अर्थातच क्रिकेट यापलीकडे नेहमीच्या बातम्यांत श्रीलंका क्वचितच येते. असे असले तरी भारताच्या दक्षिणेला खेटून असलेल्या या बेटाबाबत नेहमीच एक कुतूहल मनात होतं. कर्मधर्म संयोगाने या विषववृत्तीय प्रदेशातल्या हिरव्यागार झाडीने समृद्ध पाचूच्या बेटाला भेट देण्याचा योग अचानक जमून आला. चला तर मग निघूया श्रीलंका म्हणजेच सिंहलव्दिपाच्या सफरीला !

*********************************

श्रीलंकेचा त्रोटक इतिहास

श्रीलंकेत सापडलेल्या आदिमानवाच्या अवशेषांचे वय १२५,००० (काहींच्या मते ५००,०००) वर्षे मागे जाते, तर आधुनिक मानवांच्या अवशेषांचे (बालांगोदा मानव, Balangoda Man) वय ३७,००० वर्षे मागे जाते. हा मानव शेती करत असे आणि तो शिकारीसाठी कुत्र्यांचा वापर करत असे पुरावे आहेत. जेम्स एमर्सन टेनेटच्या एका सिद्धान्ताप्रमाणे श्रीलंकेच्या तार्शिश (आताचे गाले) नावाच्या बंदरातून प्राचीन इझ्रेलचा राजा सॉलोमन हस्तिदंत, मोर, मोरपिसे आणि इतर किंमती वस्तू आयात करत असे. श्रीलंका आणि भारत शेजारी असल्याचे त्यांचे संबंध प्राचीन काळापासून आहेत. साहजिकच त्यांचे उल्लेख दोन्ही देशांतील अनेक कथा, कविता, पुराणे व दंतकथांत आहेत. पाली भाषेत लिहिलेल्या महावंश या ग्रंथाप्रमाणे श्रीलंकेचे मूलवासी यक्ष व नाग या नावांनी ओळखले जात होते. भारतातील आताच्या बंगालमधील रार प्रदेशातून विजय (सिंह) नावाचा एक राजपुत्र इ स पूर्व ५४३ मध्ये तेथे आठ जहाजांतून ७०० जणांना घेऊन पोहोचला आणि तेथे आपले राज्य (इ स पूर्व ५४३ ते ५०५) स्थापन करून त्याने श्रीलंकेत सिंहला राजांची परंपरा सुरू केली. तेथील तांब्याच्या रंगाची नारळाची झाडे पाहून त्याने या बेटाला (आणि आपल्या राज्याला) थांबापन्नी (Thambapanni, ताम्रपर्णी) असे नाव दिले. साधारणपणे १८९ श्रीलंकन राजांची ही वंशपरंपरा इ स १८१५ मध्ये तेथे ब्रिटिश अंमल सुरू झाल्यावर खंडीत झाली. इ स पूर्व सहाव्या शतकात सुरू झालेला सिंहला राजवंशाची राज्यरेखा, मधून मधून तमीळ एलाराने (राजवंश) व चोल वंशाच्या राजांनी खंडीत केली. सम्राट अशोकाचा मुलगा अरहन्त महिंदा (महिंद्र) याने श्रीलंकेत बौद्ध धर्म आणला. त्यामुळे, प्रथम हिंदू असणारी ही राज्ये इ स पूर्व तिसर्‍या शतकापासून बौद्ध प्रभावाखाली आली. या राजवंशांची माहिती दीपवंश, महावंश, कुलवंश, लंकावतारासुत्र आणि राजवालिया अश्या अनेक ग्रंथांत लिखित स्वरूपात आहे. विजयसिंह आणि त्याच्या पूर्वीपासून भारतात हे बेट लंका या नावाने ओळखले जात होते. प्राचीन ग्रीक नकाश्यांत त्याचा उल्लेख ताप्रोबना (Ταπροβανᾶ, Taprobanā) असा आढळतो. अरब प्रवासी त्याचा उल्लेख सरंदीब (इंग्लिश serendipity या शब्दाचा उगम या शब्दामध्ये आहे) असा करत. इ स १५०५ मध्ये पोर्तुगीजांचे भारतीय उपखंडात आगमन झाल्यावर त्यांनी या बेटाला सायलाव (Ceilão) असे नाव दिले. याच नावाच्या आधारावर इंग्रजांनी या बेटाला सिलोन (Ceylon) असे म्हणायला सुरुवात केली. १९४८ साली स्वतंत्र झाल्यावरही सिलोन हेच नाव चालू राहिले. नंतर १९७२ साली ते "Free, Sovereign and Independent Republic of Sri Lanka" असे व नंतर १९७८ साली "Democratic Socialist Republic of Sri Lanka" असे बदलले गेले. तिथपासून हा देश श्रीलंका या संक्षिप्त नावाने ओळखला जातो. ६५,६१० चौरस किमी क्षेत्रफळाच्या या बेटरुपी देशात आठ युनेस्को मान्यताप्राप्त जागतिक वारसा स्थळे (UNESCO World Heritage Sites); वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध असलेली १५ राष्ट्रीय उद्याने; ५००,००० एकरांवर पसरलेल्या गर्द हिरव्या चहाच्या बागा; २५० एकराच्या वनस्पतिशास्त्राला वाहिलेल्या बागा (botanical gardens); ३५० धबधबे आणि २५,००० तलाव आहेत. हे बेट विषववृत्तीय प्रदेशात वसलेले आहे. अर्थातच तेथे वर्षभर पर्जन्यवृष्टी होते. त्यामुळे ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच हा देश त्याच्या निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. बेट असलेल्या या देशाला असलेला १,५८५ किमी लांब समुद्रकिनाराही परदेशी पर्यटकांना आकर्षक वाटतो. इतक्या लहान जागेत इतके वैविद्ध्य इतर फार थोड्या ठिकाणी पाहायला मिळते. श्रीलंकेच्या जादुई सौंदर्यामुळे ती भारतीय महासागरातला मोती (Pearl of the Indian Ocean) या नावानेही ओळखली जाते. श्रीलंकेची इतकी तोंडओळख पुरे. फिरताना वाटेतल्या प्रत्येक ठिकाणावर तिथल्या इतिहासाची आणि वैशिष्ट्याची ओळख करून घेत सहलीचा आनंद वाढवत पुढे पुढे जाऊया.

*********************************

संपूर्ण प्रवासाचा आराखडा

पहिला दिवस : दम्माम --> बंदरानायके आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोलंबो --> औकानाचे बुध्दमंदिर --> अनुराधापुरा --> मिहिन्ताले --> पोलोन्नारुवा (वस्ती). दुसरा दिवस : पोलोन्नारुवा --> गल विहारा --> कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान --> पोलोन्नारुवा (वस्ती). तिसरा दिवस : पोलोन्नारुवा --> सिगिरिया --> माताले येथील मसाल्यांच्या झाडांची बाग --> कँडी (भगवान बुध्दांचा दात असलेले मंदिर, सांस्कृतिक कार्यक्रम) (वस्ती). चवथा दिवस : कँडी --> पिन्नावाला येथील हत्तींचे अनाथालय --> मध्य श्रीलंकेच्या पहाडांतल्या चहाच्या बागांच्या रमणीय प्रदेशातून प्रवास --> नुवारा एलिया (Little England) (वस्ती). पाचवा दिवस : नुवारा एलिया --> एल्ला गॅप --> याला राष्ट्रीय उद्यान --> याला (वस्ती). सहावा दिवस : याला --> कातारागामा मंदिरसंकुल --> श्रीलंकेच्या निसर्गरम्य दक्षिण व दक्षिण-पूर्व किनार्‍याने गाले मार्गे प्रवास --> कोलंबो (वस्ती). सातवा दिवस : पहाटे पहाटे परतीचा प्रवास सुरू; कोलंबो --> दम्माम. .

 सिंहलव्दीपाची सहल : संपूर्ण प्रवासाचा आराखडा (मूळ नकाशा जालावरून साभार)

*********************************

आगमन

कोलंबोच्या बंदरानायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे सुमारे चार वाजता आमचे विमान उतरले. आप्रवास सोपस्कार आटपून बाहेर पडलो. थोडेफार शोधल्यावर आमचा मार्गदर्शक-कम-ड्रायव्हर हातात नावाची पाटी घेऊन उभा दिसला. नमस्कार-चमत्कार होऊन गाडी औकानाच्या दिशेने धावू लागली आणि "चला, गडबडीने ठरवलेल्या सहलीला सुरुवात झाली", असे जाणवून मन प्रफुल्लित झाले. मार्गदर्शकाने वाटेत एका निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या रेस्तराँपाशी गाडी थांबवली आणि न्याहारी करून घ्या असे सांगितले. भल्या सकाळी त्या रेस्तराँचे मीच पहिले गिर्‍हाईक होतो असे दिसले. पण जागा एकदम मस्त होती... वस्तीबाहेर, एका मोठ्या निरव तळ्याकाठी, एक जुन्या शैलीतली इमारत आणि आजूबाजूच्या भरगच्च झाडीने भरलेल्या प्रशस्त परिसरात काही झावळ्यांनी शाकारलेल्या बसायच्या जागा. तळ्यापलीकडच्या एका टेकडीवर पद्मासन घालून बसलेल्या भल्या मोठ्या बुद्धमूर्तीने त्या सकाळच्या धूसर शांत वातावरणाला धीरगंभीर पावित्र्याने भारून टाकले होते. श्रीलंकेच्या या पहिल्या दर्शनाने मन जिंकून घेतले. तिथे काढलेली काही प्रकाशचित्रे त्या रेस्तराँच्या सुंदर परिसराची थोडी कल्पना देऊ शकतील...

 कोलंबो-औकाना रस्त्यावरचे रेस्तराँ ०१

.

 कोलंबो-औकाना रस्त्यावरचे रेस्तराँ ०२

.

 कोलंबो-औकाना रस्त्यावरचे रेस्तराँ ०३

.

 कोलंबो-औकाना रस्त्यावरचे रेस्तराँ ०४

. सहलीचा मूड एकदम जमून आला. मी झाडीमधल्या एका शाकारलेल्या जागेची निवड करून निसर्गसौंदर्य न्याहाळत न्याहारीचा समाचार घेतला. श्रीलंकेचा विशेष म्हणजे, तो विषववृत्तीय प्रदेश असल्याने, तेथे विविध प्रकारच्या फळांची रेलेचेल असते, मग ती न्याहारी असो की दुपार-संध्याकाळचे जेवण. गाडीचा टँक अगोदरच फुल्ल होता, पोटाचा टँकही फुल्ल करून दिवसभराच्या धावपळीला गाडी आणि आमचे पाय तयार झाले ! वेगाने चाललेल्या गाडीतून एक मिनी-राजवाडा दिसेल अश्या इमारतीसमोरून जाताना आकर्षक जरीकाम आणि भरतकाम केलेले पोषाख घातलेले लोक दिसले. मार्गदर्शकाला पुढे गेलेली गाडी मागे घ्यायला भाग पाडल्याशिवाय राहवले नाही ! खाली उतरून चौकशी केली तर कळले की त्या घरात लग्नसमारंभ चालू होता. त्यानिमित्ताने घरातल्या लोकांनी पारंपरिक उच्चभ्रू पोषाख घातलेले होते. प्रवेशव्दारापाशी त्यापैकी काही सिंहली मावळ्यांचा खास फोटो-सेशन चालला होता ! या अचानक समोर आलेल्या संधीचा फायदा घेऊन, त्यांची परवानगी घेऊन, मीही माझ्या कॅमेर्‍याची हौस पुरी करून घेतली...

 औकानाच्या रस्त्यावर भेटलेले सिंहली मावळे ०१

.

 औकानाच्या रस्त्यावर भेटलेले सिंहली मावळे ०२

प्रवासात अनपेक्षितपणे असे काही अनवट घडले की त्याची मजा अजूनच वाढते ! आज तर पहिल्या दिवसाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेची खास ओळख पुढे आल्याने पहिले आकर्षण डोळ्यापुढे येण्याअगोदरच सहलीचा उत्साह व्दिगुणित झाला ! . गाडी हिरव्यागार झाडीतून पळू लागली... या बेटाला पाचूचे बेट का म्हणतात याची प्रचिती पुढचे सहा दिवस येणार होती !

 पाचूच्या बेटातून प्रवास (कोलंबो-औकाना रस्ता) ०१

.

 पाचूच्या बेटातून प्रवास (कोलंबो-औकाना रस्ता) ०२

. श्रीलंकेतले रस्ते जरी अरुंद, म्हणजे जायला एक व यायला एक अश्या दोनच लेनचे, असले तरी त्यांची देखभाल चांगल्या रितीने केली जाते आहे असेच दिसले. संपूर्ण देशभर रस्त्यांवर खड्डे अजिबात दिसले नाहीत. तसेच कोलंबो शहर सोडून इतर कोठेही वाहनांची फार गर्दी अथवा वाहतुकीची कोंडी नव्हती. त्यामुळे एकंदरीत सर्व प्रवास वेगाने व सुखकारक झाला. डोळ्यांना थंडाई देणार्‍या हिरव्यागार महिरपीतून प्रवास चालू असताना आता औकानातली श्रीलंकेतली सर्वात उंच असलेली बुद्धमूर्ती पाहण्याचे वेध लागले होते. (क्रमश : ) ================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुध्दमूर्ती...     ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...     ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...     ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...     ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...     ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...     १३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...     १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...     १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त) ==================================================================

डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...

==================================================================

वाचने 28700 वाचनखूण प्रतिक्रिया 42

चाणक्य Sun, 11/22/2015 - 15:03
वाचतोय. नवीन सफर सुरू झाल्यामुळे आनंद वाटला. बाकी श्रीलंकेत म्हणे चारचाकी बनत नाहीत. बहुतेक कार्स या जपान किंवा ईतर देशांतून आयात होतात. आणि सेकंड हँड कार्स खूप वापरतात. मी गेलो होतो तेव्हा सगळ्या मोठ्या आणि आलिशान गाड्या बघून चक्रावलोच होतो की कसंकाय परवडतंय लोकांना. पण मग नंतर चाैकशी केल्यावर समजले.

स्वाती दिनेश Sun, 11/22/2015 - 15:38
सुरुवात आवडली, लंकेत जायचं आहे एकदा. बघू केव्हा जमते ते. पुभाप्र. स्वाती

Madhavi_Bhave Sun, 11/22/2015 - 19:21
डॉ सुहास, कर्मधर्मसंयोगाने मी आता कोलोम्बो मधेच आहे. हि माझी तिसरी भेट आहे पण आज पर्यंत मला कुठेही फिरायला जायला मिळाले नाही आहे. आता पण मी ऑफिस मध्येच आहे. बघूया ह्या वेळी तरी योग जुळून येतो का? बाकी श्रीलंका खूप छान आहेच आणि माणसे पण खूप छान व हसतमुख आहेत. अगदी ऑटो वाले सुध्धा . रस्ता cross करायचा असेल तर गाड्या पण चक्क थांबतात . बाकी खाण्याचे थोडे हाल आहेत. कोलोम्बो skyline मात्र फार वेगाने बदलत आहे आणि गेले काही काळापासून अगदी जाणीवपूर्वक सुधारणा घडत आहेत. अजून १० वर्षानंतरची श्रीलंका अगदी वेगळी असणार आहे ह्यात शंका नाहि. खूप शांत मानसे. भारतीयांबद्दल राग एवढा दिसून येत नाही अर्थात माझ्या south Indian colleague चा अनुभव जर वेगळा आहे असे तो म्हणतो . बाकी तुमचे प्रवास वर्णन वाचाताना खूप आनंद मिळणार हे मात्र नक्की.

अजया Sun, 11/22/2015 - 20:07
नविन प्रवासवर्णनाची मेजवानी. माझ्या लिस्टमध्ये भर घालून जातात तुमची प्रव! किती खर्चात पाडता!!

मदनबाण Sun, 11/22/2015 - 20:40
आहाहा... एक्का काकांची सहल पुन्हा सुरु झाली ! आता पुढच्या प्रत्येक भागाची आतुरतेने वाट पाहणे आले. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Is the bubble bursting for India's online start-ups?

रेवती Sun, 11/22/2015 - 21:22
एकदम भारी! ही सहल वाचणार कारण मलाही श्रीलंकेबद्दल कुतुहल आहे. सुरुवात छान झालीये. पारंपारिक वेषातले लोक छान दिसतायत. उपहारगृहाला कौलं घातलियेत म्हणून कोकणातील घरांची आठवण आली.

In reply to by रेवती

उपहारगृहाला कौलं घातलियेत म्हणून कोकणातील घरांची आठवण आली. अगदी ! ती जागा पाहून कोकणाचीच आठवण आली होती. पण लिहिताना राहून गेले :(

इडली डोसा Sun, 11/22/2015 - 22:49
श्रीलंकेविषयी खूप ऐकले आहे. तिथली टापटीप , स्वच्छ्ता आणि एकुणच टुरिजमच्या बाबतीत भारतापेक्षा जास्त जागरुक देश आहे असे ऐकुन आहे. लेखमालेची सुरुवात छानच झालीये. प्रवासवर्णन कसे असावे याचा एक सुंदर नमुना म्हणुन तुमच्या या मालिकेकडे लक्ष राहिलं. या भागातले फोटो आणि वर्णन छान उतरले आहे. पुभाप्र.

अभ्या.. Sun, 11/22/2015 - 22:52
मस्त मस्त. लंकेच्या मावळ्यांचे फुग्याच्या बाह्याचे ट्युनिक भारीत. नीलकमलच्या खुर्च्या लंकेत जातेत दिसतय. ;)

विलासराव Sun, 11/22/2015 - 23:12
मस्त मेजवानी आता पुढचे काही दिवस. पण मग तूम्हाला कसे कळले मला २०१६ ला जायचेय श्रीलंकेला. आत्ता जो कोर्स चालु आहे इगतपुरीला त्यात १ गृहस्थ आणि २ भिक्षु आहेत श्रीलंकेचे. त्या गृहस्थांनी आमंत्रण दिले आहे श्रीलंकेचे. ते कोलंबोमधे रहातात. त्यांचे तिथे हॉटेल आहे. तुमच्या टुरप्रमाणे फिरून मग तिन्ही विपश्यना सेन्टरला भेट द्यायची आहे. जमल्यास तिथुनच सिंगापुर आणि म्यानमार असाही विचार आहे.

In reply to by विलासराव

अरे वा ! मस्त संधी आहे. जरूर जा. सुंदर देश आहे आणि तेवढाच प्राचीन संस्कृतीच्या खाणाखुणांनी भरलेला आहे ! तेच म्यानमार बद्दल ! सिंगापूर बद्दल काय बोलावे ? एकदा तरी बघावा असाच देश !

राही Mon, 11/23/2015 - 09:12
सुंदर, स्वच्छ, शिस्तशीर देश. रस्त्यांवर बससाठी पिवळे चौकोन आखलेले होते आणि सार्वजनिक बसेस तिथेच थांबत होत्या. हॉटेल्स परदेशी प्रवाश्यांनी ओसंडत होती. हवामान दमट, किंचित उष्ण होते तरी मोकळ्या हवेमुळे आल्हाददायक होते. भारतीय पर्यटक जेथे जेथे दिसले तेथे तेथे आपली पूर्वकीर्ती सार्थ करीत होते. रत्ने आणि प्रेशिअस स्टोन्स बघण्यासारखे आणि खरीदण्यासारखेही वाटले. या लेखमालेच्या प्रतीक्षेत कारण एक तर पुनःप्रत्ययाचा आनंद आणि वेगळ्या चष्म्यातून दर्शन. उत्कंठित.

सौंदाळा Mon, 11/23/2015 - 10:49
मस्त फोटो एक्का काकांना फिरण्याच्या बाबातीत मिपावरचे मोदी म्हणावे का? ;) पुभाप्र

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

नाखु Mon, 11/23/2015 - 10:59
अगदी त्यांचे देशाकडे लक्ष्य प्रेम असते. काकांचे मिपाकडे आणि मिपाकरांकडे.. पुभाप्र.

भानिम Fri, 11/27/2015 - 17:15
माहितीपूर्ण व उत्कंठावर्धक लेख, डॉ. साहेब. सिंहल द्वीप, (श्रीलंका) 'बकेट लिस्ट' वर आहेच, पण अजून योग आला नाही. आपले लेख वाचून श्रीलंकेचे नाव खचितच बकेट लिस्ट मध्ये वर आले!