किवी आणि कांगारूंच्या देशांत ११ : अॅलिस स्प्रिंग्ज १ - हवाई वैद्यकीय सेवा आणि आउटबॅक डिनर
===================================================================
किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)
===================================================================
क्वांटासच्या विमानाने आम्हाला पोटात घेऊन १,८८८ किमी वरील अॅलिस स्प्रिंग्ज् पर्यंतचे उड्डाण २ तास २५ मिनिटात पुरे केले.
हे २५-३०,००० वस्तीचे गाव ऑस्ट्रेलियाच्या बरोबर मध्यभागी आहे. या भागातील अरेंटे नावाचे मूळ ऑस्ट्रेलियन निवासी येथे ३०,००० पेक्षा जास्त वर्षे राहत आहेत. ऑस्ट्रेलियन मूळ निवासी, ज्यांना "अॅबओरिजिनल" म्हणतात, सुमारे ४०,००० वर्षांअगोदर पासून ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर वस्ती करणारे पहिले मानव. त्यामुळे खरं तर त्यांना "ओरिजिनल" म्हणायला पाहिजे आणि नंतर येथे आलेल्या बाकी लोकांना (यांच्यातले कोणीच सन १६०६ पूर्वी येथे आलेले नाहीत) "स्थलांतरित" म्हणायला पाहिजे. पण आता अशी अवस्था आहे की स्थलांतरित मालक बनले आहेत आणि मूळ निवासी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेत नगण्य झाले आहेत. असो.
विशाल सुपीक किनारपट्टी आणि अत्यंत विरळ लोकसंख्या असूनसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या सर्वात खडतर मध्यभागात अॅलिस स्प्रिंग्ज हे गाव वसले आहे त्यामागे एक कहाणी आहे. ऑस्ट्रेलियाच्या लोकरीच्या व्यवसायाचे इंग्लंडमधली बाजारपेठ हे मुख्य गिऱ्हाईक होते. पण १९ व्या शतकाच्या काळात तिथले बाजारभाव ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनार्यावर समजायला अनेक आठवडे जायचे आणि त्यामुळे बरेचदा व्यापार्यांचे नुकसान व्हायचे किंवा कमीतकमी खूप फायदा करून घेण्याच्या संधी हातातून निसटून जात असत. कारण त्या वेळेस टेलेग्राफने होणारे संदेशवहन फक्त इंडोनेशियापर्यंतच पोहोचले होते. ही संदेशवहन साखळी ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत वाढवण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न झाले. या प्रयत्नांत न्यू साऊथ वेल्स, व्हिक्टोरिया आणि साऊथ ऑस्ट्रेलिया या त्या काळी वेगवेगळ्या असलेल्या ब्रिटिश कॉलनींमधे चढाओढ होती, कारण यशस्वी कॉलनीचा लोकरीच्या बाजारावर वरचष्मा राहणार होता. सरतेशेवटी १८६१-६२ मध्ये जॉन स्टुअर्ट नावाच्या शोधकाने (explorer) दक्षिण किनार्यावरचे अॅडलेड ते उत्तर किनार्यावरचे डार्वीन असा सरळ रेषेतल्या मार्गाचा नकाशा बनवला. पुढच्या १० वर्षांत या मार्गावर टेलेग्राफ लाइन टाकण्यात यश आले आणि अॅडलेड-ब्रिटन असे संदेशवहन सुरू झाले. या मार्गावर असलेल्या अनेक टेलेग्राफ रिपीटर स्टेशन्सपैकी असलेले अॅलिस स्प्रिंग्ज या मध्यवर्ती आणि पाण्याची सोय असलेल्या ठिकाणावर प्रथम छोटी वस्ती झाली. नंतर ते नावारूपाला येण्यासाठी तेथून १०० किमी वर असलेल्या अर्लतूंगा या जागी सापडलेल्या अलुव्हियल सोन्याच्या गोल्ड रशने मदत झाली. नंतर त्याच्या मोक्याच्या जागेमुळे (स्ट्रॅटेजीक लोकेशन) दुसर्या महायुद्धाच्या काळात आणि नंतर आलेल्या रेल्वेमुळे त्याचे महत्त्व वाढतच राहिले. सध्या ते नॉर्दर्न टेरिटरीचे तिसर्या क्रमांकाच्या लोकवस्तीचे गाव आहे. अर्थात नॉर्दर्न टेरिटरी या १३,५०,००० चौ किमी (अमेरिकेच्या टेक्सास राज्याच्या दुप्पट) आकाराच्या भूभागाची एकूण लोकसंख्या जेमतेम अडीच लाख आहे आणि त्यातले साधारण २५,००० लोक येथे राहतात !
अॅलिस स्प्रिंग्ज ला उतरताच मध्य ऑस्ट्रेलियाच्या रखरखाटी भूभागाची ओळख सुरू झाली...
.
ही अॅलिस स्प्रिंग्जची टॉड नदी. हिचे वैशिष्ट्य असे की ही वर्षाचे कमीतकमी ३६४ दिवस कोरडी असते. त्यामुळे तिच्या पात्रात मोठी मोठी नीलगिरीची झाडे आहेत !...
मुख्य गावाच्या भागात असलेल्या पाण्यामुळे तेथे हिरवाई आहे आणि तिचा उपयोग गाव जाणीवपूर्वक सुंदर बनवण्यासाठी केलेला आहे. वाटेत थोडा वेळ ANZAC टेकडीवर थांबा होता. येथे युद्धांत धारातीर्थी पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या सैनिकांच्या स्मरणार्थ एक स्मृतीस्तंभ उभारलेला आहे. येथून सर्व गावाचे दर्शन होते...
.
अॅलिस स्प्रिंगमध्ये एका खास नावीन्यपूर्ण वैद्यकीय सेवेची सुरुवात झाली... रॉयल फ्लाइंग डॉक्टर सर्विस...
ही जगातील सर्वात मोठी वैमानिकी वैद्यकीय सेवा आहे. मध्य ऑस्ट्रेलियातील दूरदराज ग्रामीण भागांतील जनतेसाठी काम करणारी ही विना फायदा सेवा जॉन फ्लीन् नावाच्या ख्रिस्चन मिनशनर्याने १९२६ साली सुरू केली ती आजतागायत सुरू आहे. आता तिची व्याप्ती इतकी वाढली आहे की २०११-१२ मध्ये १,१५० कर्मचार्यांनी २१ केंद्रे चालवून ६१ विमानांच्या मदतीने "दररोज" केलेल्या कामाची सरासरी पुढील प्रमाणे आहे:
* २०३ उड्डाणे;
* ७२,८७० किमी चा प्रवास;
* ७५० रुग्णांची सेवा आणि
* ११२ रुग्णांची वाहतूक.
* शिवाय ही संस्था हल्ली रेडिओ-इंटरनेट वापरून दूरवैद्यकीय (टेलेमेडिसिन) मदतही पुरवते.
या संस्थेच्या पसार्याची थोडीशी कल्पना खालील नकाश्यावरून येऊ शकेल...
आम्ही या असाधारण संस्थेच्या अॅलिस स्प्रिंग येथील संग्रहालयाला भेट देण्यास गेलो...
.
.
.
नंतर जरा गावात फेरफटका मारला आणि एका मॉलमध्ये दुपारचे जेवण घेतले...
इतके लोक इकडे तिकडे फिरत असतानाही एका ठिकाणी शांतपणे हिरवळीवर आराम करत बसलेल्या मूळ रहिवाशांबरोबर दिमाखाने सायरन वाजवत एका पोलिसाने केलेले वर्तन बरे वाटले नाही...
मूळ रहिवाशांच्या कलेचे काही नमुने...
...
.
एक मूळ रहिवासी...
दुपारी तीनच्या सुमाराला हॉटेलमध्ये चेकइन केले. हॉटेल जरा गावाबाहेरच पण छान होते...
त्याच्या आवारातल्या झाडांवर वेगळ्याच रंगाच्या पोपटासारख्या दिसणार्या पक्षांची शाळा भरली होती...
.
दोन तास आराम केला. साडेपाचला उठून तयार होऊन लॉबीत आलो आणि "आउटबॅक बार-ब-क्यू डिनर पार्टी" ला जाण्यासाठी जमलेल्या सहप्रवाशांमधे सामील झालो. आम्हाला घेऊन बस गावाबाहेर पडली आणि पार्टीच्या ठिकाणाकडे निघाली...
.
वाटेत मधे मधे गवतात लपलेले कांगारू दिसत होते...
पार्टीचे ठिकाण आता बंद झालेल्या एका दगडाच्या खाणीत होते...
पहिल्यांदा स्वागत, पेयपान, वगैरे झाल्यावर ऑस्ट्रेलियाची खासियत असलेल्या वेगवेगळ्या बूमरँगांचे प्रात्यक्षिक झाले. आपण नेहमी चित्रात बघतो ते फेकल्यावर परतणारे बूमरँग शिकारीसाठी निरुपयोगी असते हा शोध लागला ! ते फक्त झुडुपातले किंवा पाणवठ्यावरले पक्षी उडवायच्या कामाला येते. शिकारीसाठी वापरायचे बूमरँग जरा वेगळ्या आकाराचे, जड आणि प्राण्याला जायबंदी करू शकेल अशी धार असलेले असते... ते खालील चित्रात दिसते आहे...
बूमरँगच्या अनेक प्रकारांची प्रात्यक्षिके बघून बरेच ज्ञान झाले आणि गैरसमजही दूर झाले ! मग 'खरे' पेयपान सुरू झाले आणि पार्टीला रंग भरू लागला...
सगळे जेवण जुन्या ऑस्ट्रेलियन आउटबॅक (लोकवस्तीपासून दूर असलेला वाळवंटी भाग) ची पद्धत वापरून आमच्यासमोरच तयार होत होते...
गोल्ड रश काळातील कामगारांच्या पद्धतीने ब्रेड बनवला गेला... अगदी पीठ मळण्यापासून ते बेक करेपर्यंतची सगळी पाककृती त्या काळच्या खुसखुशीत गोष्टी ऐकत पाहिली...
त्यानंतर एका तज्ज्ञाने आउटबॅकमधे राहणार्या मूळ रहिवाश्यांचे समाजजीवन आणि प्रथांची रोचक माहिती दिली...
तोपर्यंत जेवण तयार झाले होते. चांगला अंधारही पडला होता. जेवण सुरू झाले... स्टेक (माझ्याकरता चिकन होते), रशियन सलाद, बेक्ड पोटॅटो, फ्रेश ब्रेड विथ मेल्टेड बटर, अजून एकदोन साइड डिशेस (नावं विसरलो, स्वाsssरी) आणि सगळ्यात शेवटी ब्राऊनी !...
जेवण झाल्यावर आउटबॅकचे खास विनोद आणि संगीत यांचा मस्त कार्यक्रम झाला...
काही प्रवाशांनाही आउटबॅक वाद्यवृंदात सामील करून घेऊन गायकाने धमाल उडवून दिली...
त्यानंतर एका स्थानिक खगोलशास्त्रज्ञाने आकाशात त्या वेळेस दिसणार्या ग्रहतार्यांची मजेशीर प्रकाराने ओळख करून दिली...
तोपर्यंत साडेदहा अकरा वाजत आले होते. ऑस्टेलियाच्या मध्यभागी अनुभवलेल्या आउटबॅक पार्टीच्या सुखद स्मृती घेऊन आम्ही हॉटेलवर परतलो.
(क्रमशः )
===================================================================
किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)
===================================================================
...आजचे रात्रीचे जेवण भारतीय रेस्तरॉमध्ये घ्यायचे ठरवले होते. पण आता जेवणासाठी भटकायचा उत्साह उरला नव्हता. हॉटेलजवळच्या चिनी रेस्तरॉमध्ये झटपट मिळणारा प्रॉन फ्राईड राईस आपलासा केला आणि खोलीवर परतलो. बिछान्याला पाठ टेकताच निद्रादेवीने कुशीत घेतले.
आज मेलबर्नला टाटा करून अॅलिस स्प्रिंग्ज् ला जायचे होते. विमान सकाळी ८:४५ ला होते. त्यामुळे भल्या पहाटे उठून सर्व आवरून बॅगा ५:३० लाच खोलीबाहेर ठेवायच्या होत्या आणि बस ६:३० ला निघणार होती. बहुतेक हॉटेल्समध्ये न्याहारी ६:३० ला सुरू होते. पण या हॉटेलमध्ये न्याहारी ६:०० सुरू होत असल्याची खुशखबर गाइडकडून मिळाली होती, ही एक जमेची बाजू. सर्वसाधारणपणे सकाळी फार काही खाण्याचा मला कंटाळा आहे. पण प्रवासाचे दिवस याला अपवाद आहेत. प्रवासात सज्जड न्याहारी केली की मी दिवसभर आख्ख्या जगाशी लढाईला तयार असतो... मग दुपारचे जेवण थातूरमातूर झाले तरी काही हरकत नसते... फिरण्यात भुकेने व्यत्यय आलेला मला अजिबात आवडत नाही !
बसमधून जाताना मेलबर्नचे पहाटेचे हवाई दर्शन करवणारे अनेक रंगीबेरंगी हॉट एअर बलून आकाशात दिसत होते...
वाचन
11656
प्रतिक्रिया
32