आमचे गोंय - भाग १ - प्राचीन इतिहास
***
आमचे गोंय - प्रास्ताविक (१) , प्रास्ताविक - (२) , प्राचीन इतिहास , मध्ययुग व मुसलमानी सत्ता , पोर्तुगिज (राजकिय आक्रमण) , पोर्तुगिज (सांस्कृतिक आक्रमण) , शिवकाल आणि मराठेशाही , स्वातंत्र्यलढा १ , स्वातंत्र्यलढा २ , स्वातंत्र्यानंतर आणि घटकराज्य , गोव्याची सांस्कृतिक जडणघडण , गोव्याची खाद्यसंस्कृती , को़ंकणी भाषा - इतिहास आणि आज , समारोप - आजचा गोवा
***
कोकणीत गोवा म्हणजे गोंय.
ऐतिहासिक काळात गोव्याला अपरान्त, गोमंतक, गोवापुरी, गोपकपट्टण, गोवाराष्ट्र अशी नावे दिलेली आढळतात. तर अरबी व्यापारी या प्रदेशाला 'सिंदाबुर' या नावाने ओळखत असत. यापैकी अपरान्त हे नाव सर्व कोकणाला दिलेले आहे. तर 'गोमंतक' म्हणजे 'गायींनी भरलेला' असा अर्थ आहे. जरासंधाबरोबरच्या लढायांमधून जरा उसंत घ्यावी म्हणून कृष्ण आणि बलराम गोव्यात आले होते, ही कथा प्रचलित आहे. आपल्या मुलांच्या विरहाने दु:खी होऊन देवकीमाता त्यांच्यामागोमाग गोव्यात आली, आणि तिला पान्हा फुटला. तोच दूधसागर धबधबा अशी कथा गोव्यात सांगितली जाते. या आई मुलांची भेट झाली तिथे माशेलला आजही देवकी-कृष्णाचं मंदिर प्रसिद्ध आहे. 'सिंदाबुर' हे नाव 'चंद्रपूर' या कदंबांच्या राजधानीवरून आले असावे. आज ही प्राचीन राजधानी 'चांदोर' किंवा 'चांदर' म्हणून ओळखली जाते.
पण या सर्वांपेक्षाही जुने नाव म्हणजे 'गोंय'. भारतात आर्य लोक सगळीकडे पसरण्यापूर्वी प्रोटोऑस्ट्रोलॉईड / द्रविड वंशाचे लोक सर्व भारतभर पसरलेले होते. छोटा नागपूर पठारावरून कोळ, मुंड वंशाचे आदिवासी कर्नाटकमार्गे गोव्याच्या, जंगलानी भरलेल्या प्रदेशात येऊन राहिले असावेत असा काही इतिहास संशोधकांचा अंदाज आहे. त्यांच्या अतिप्राचीन मुंडारी भाषेत 'गोयंबा' म्हणजे भाताच्या लोंब्या. तर गुव्वा म्हणजे सुपारी. त्यामुळे या सुपारी आणि भाताच्या प्रदेशाला त्यानी 'गोंय' किंवा गोवा म्हटले असावे असा काही लोकांचा तर्क आहे. गोव्यातले काही स्थानिक संशोधक म्हणतात की या आदिम जमाती गोव्यातून इतरत्र गेल्या!
या आदिम लोकांच्या उगमस्थानाविषयी अनेक तर्क वितर्क असले तरी प्राचीन काळात म्हणजे अगदी मानवी संस्कृतीच्या जन्मानंतरच्या लगेचच्या काळात गोव्यात मानवी वस्ती होती हे निर्विवाद. सांगे तालुक्यात आणि सत्तरी तालुक्यात भारतीय पुरातत्त्व खात्याने केलेल्या उत्खननात अश्मयुगीन आणि अगदी प्राथमिक स्वरूपातली दगडांची ओबडधोबड हत्यारे, हातकुर्हाडी सापडल्या आहेत. तर सत्तरी तालुक्यात 'म्हाऊस' आणि सांगे तालुक्यात रिवण-कोळंबच्याजवळ 'उसगाळीमळ-पणसईमळ' आणि 'काजूर' इथे प्रस्तरचित्रे अर्थात 'पेट्रोग्लिफ्स' सापडले आहेत.
यापैकी उसगाळीमळ आणि काजूर इथली अश्मयुगीन दगडी रेखाचित्रे आम्ही पाहिली आणि डोळ्याचे पारणे फिटले. काजूर इथली प्रस्तरचित्रे एका काळ्या ग्रॅनाईट पाषाणावर कोरलेली आहेत. अनेक प्राण्यांचे आकार इथे सापडतात.
हा सगळा प्रदेश अजूनही दुर्गम आहे. सगळीकडे जंगल आहेच. कर्नाटकची सीमा जवळ आहे आणि लोहखनिजाच्या खाणींनी सगळा परिसर व्यापलेला आहे. या प्रस्तरचित्रांपासून फक्त ५०० मीटर्स अंतरावर सध्या बंद असलेली एक खाण आहे. 'ती चालू करायचं उद्या जर कोणाच्या डोक्यात आलं तर?' या विचारानेच अस्वस्थ व्हायला होतं.
या प्रस्तर चित्रांच्या जवळ, ४ ते ५ कि.मी. च्या परिसरात काजूर आणि रिवण इथे मोठ्या नैसर्गिक गुहा आहेत. इथलं नदीचं पात्र काहीसं उथळ आहे. एकूणच अश्मयुगातल्या मानवांना रहायला एकदम आदर्श परिसर आहे! ही सुंदर कोरीव चित्रं तयार करणार्या या आदिम रहिवाशांना जंगलातल्या विपुल प्रमाणात उपलब्ध असलेल्या प्राण्यांमुळे खाण्यापिण्याची ददात नसावी. खाणं जमा करून उरलेल्या वेळात आणि त्यांच्या काही धार्मिक रीतीरिवाजांसाठी ही चित्र खोदून काढली असावीत असा एक अंदाज आहे. सगळ्या जगभर अशा प्रकारची चित्रं सापडली आहेत, भारतातील भोपाळजवळचं भीमबेटका हे त्यातलं एक प्रमुख स्थळ. पण ही बरीचशी चित्रं ग्रॅनाईट किंवा वालुकाश्मावर आहेत. मात्र उसगाळीमळची ही चित्र जांभ्या दगडात आहेत, हे त्यांचं विशेष. कारण या दगडात लोखंडाचा अंश असतो, त्यामुळे कोरायला हा दगड अत्यंत कठीण!
वाचने
31162
वाचनखूण
प्रतिक्रिया
41
दणकेबाज इतिहासाचं वर्णन आवडलं.
गोव्यावर बरेच राज्यकर्ते येउन गेले.
फोटू तर मस्तच आहेत.
कितीतरी आडनावांची मूळ गावे समजली.
जांभ्या दगडात कोरलेले वर्तुळ आवडले.
In reply to दणकेबाज इतिहासाचं वर्णन by रेवती
मी पुरातत्व खात्याच्या संग्रहालयात गेले असता ह्या पेट्रोग्लिफबद्दल अजुन छान माहिती मिळाली. मी थोडफार सांगायचा प्रयत्न करते.
त्या प्रस्तर शिल्पांकडे पहाय्ची वेगळीच द्रूष्टी मला मिळाली. इंद्रा प्रभुदेसाई ही त्या क्षेत्रातली तज्ञ मला सांगते, की आपल्या वंशजांना शिकार करताना कोणत्या ठिकाणी हल्ला केला म्हणजे प्राणी लवकर जायबंदी होतो ह्याची ती माहिती असावी. प्रत्येक कोरलेल्या प्राण्यांमधे, आतील काही अवयवही कोरले आहेत. त्या जागी मारल प्राणी लगेच मरतो .हे आज संशोधक देखील सांगतात. असे बैल, सांबर, मासे, मोर हे काही आम्ही ओळखलेले प्राणी.
दुसर म्हणजे रेवती ताई म्हणाल्या ते वर्तुळ. याला स्थानिक लोक अभिमन्यूचे चक्रव्युह अस म्हणतात. हा मोराचा फ्रंट व्ह्यु देखील असु शकतो. ही आकृती आईच्या पोटातील बाळाची सुरवातीच्या काळातील अवस्थाही असु शकते. कारण ह्या काळात मातृदेवतेच्या पूजेला महत्व दिले जायचे.
अजुन व्यवस्थित माहितीसाठी पणजीतील गोवा संग्रहालयाला नक्की भेट द्या.
In reply to मी पुरातत्व खात्याच्या by प्रीत-मोहर
वर्तुळाच्या कोरीवकामाबाबत माझा अंदाज असा होता की बाजूने वहात असलेल्या नदीमध्ये एखादा भोवरा पाहून त्याची आकृती केली असावी. टीम गोवाचे अभ्यासपूर्ण लेख प्रिंट घेऊन फिरल्यास स्थानिकांची मदन न घेताही बर्याच गोष्टी समजतील.
In reply to वर्तुळाच्या कोरीवकामाबाबत by रेवती
अधिक माहिती इथे पहा
अतिशय छान भाग, आता या नंतर जेंव्हा गोव्यात येईन तो हा गोवा पाहायलाच. टिम गोवाचे किती आभार मानावेत ते कमीच आहेत.
या एका उत्तम लेखामालेला माझ्या पुन्हा एकदा शुभेच्छा.
सुंदर लेख.
वाचत आहे.
In reply to माहीतीपूर्ण by सहज
हेच म्हनते :)
छान. माहिती विस्तृत आहे, वाचतांना स्तिमित व्हायला झाले. आर्य इकडुन आले वैगेरे खटकले पण मुळ लेखमालेच्या उद्द्येश वेगळा असल्याने त्यासंबधी चर्चा इथे नको हे पटते.
पुढचा लेख येण्याची वाट पाहीन.
अतिशय सुरेख भाग, तपशिलवार वर्णन व त्याला सुरेख छायाचित्रांची जोड. गोव्याच्या वेगळ्याच अंगाची मुद्देसूद माहिती करून दिली आहे.
पोर्तुगीजांनी उद्धस्त केलेल्या सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असे वाचले आहे. त्याबद्दल अधिक माहिती तुमच्याकडून येईलच.
सुंदर लिहीत आहात...
वाचतोय... :)
चांगली माहिती. आणखी येवू द्यात.
गोव्याच्या प्रचलित प्रतिमेपेक्षा वेगळी अनवट माहीती दिल्याबद्दल आभारी आहे
चांगली माहिती! येऊ दे अजुन!
प्रत्यक्ष लेखमालेची उत्तम सुरुवात झालेली आहे असं म्हणायला पाहिजे. फारच सुंदर आणि माहितीपूर्ण लिखाण झालेले आहे. वर आनंदयात्री म्हणतात त्या प्रमाणे आर्यविषयक उल्लेख खटकतातच पण खरंच लेखमालेच्या दृष्टीने ते तेव्हढे महत्त्वाचे नाही. त्यासाठी वेगळा धागा निघू शकेल.
छायाचित्रे छान आहेत. प्रस्तरशिल्पे सुंदर. अशीच प्रस्तरशिल्पे मुंबईहून गणपतीपुळ्याला जाताना मध्ये पाहिल्याचे स्मरते.
टीम गोवा - येवू द्या पुढले लेख..... आम्ही वाचतोय!
धन्यवाद!
छान. वाचत आहे.
इ. स. ४०० च्या दरम्यान यादवकुळातल्या भोज राजांची सत्ता मध्य आणि दक्षिण गोव्यात प्रस्थापित झाली. त्यांची राजधानी चंद्रपूर अर्थात चांदोर ही होती. चांदोर इथे उत्खनन करताना अनेक पुरातन अवशेष सापडले आहेत. या राजांचा कुलदेव म्हणजे चंद्रेश्वर भूतनाथ. चांदोर इथे सापडलेल्या अवशेषांमधे मोठा नंदी, राजवाड्याचे अवशेष इत्यादि आजही पहायला मिळतात. >>
हा उल्लेख फार महत्त्वाचा आहे. हे चांदोर मडगावजवळ आहे. तेथे पूर्वी सप्तमातृका मंदिरही होते. पोर्तुगीज राजवटीत ते पाडून त्याजागी १६४५ मध्ये चर्च ऑफ अवर लेडी ऑफ बेथलहॅम बांधले गेले, असे वाचण्यात आले. सप्तकोटीश्वर तर आदिलशाही राजवटीतच पाडले गेले होते. यावरुन एक दिसते, की गोपकपट्टणात शैव आणि शाक्त पंथांचा प्रभाव खूप होता. यादवकुलीन भोज राजांचे दैवत चंद्रेश्वर भूतनाथ म्हणजे शंकर. शिव आहे तिथे शक्ती आहे म्हणून गोव्यात मंगेश, नागेश, मल्लिकार्जुन याप्रमाणेच शांतादुर्गा, म्हाळसा आणि इतर देवींची मंदिरे प्रमुख. पण देवकी-कृष्ण मंदिर आणि काही अपवाद वगळता वैष्णव पंथाचे फार प्राबल्य दिसत नाही. महालक्ष्मी आहे मग नारायण का नाही, ही आपली माझी शंका.
सप्तमातृका उपासना गोव्यात प्रभावी होती. अलिकडेच जे मातृदेवतेचे शिल्प सापडले त्यावरुन दुजोरा मिळतो. सप्तमातृका शिल्पात शंकराबरोबर ब्राह्मणी, वैष्णवी, महेश्वरी, कुमारी, वराही, इंद्राणी, चामुंडी या शक्तीदेवता आहेत. याच देवी गोव्यात विविध लोकनावांनी पूजल्या जात असतील. त्याबद्दल विवेचन येईल, अशी अपेक्षा.
पुन्हा घाटावरुन आलेल्या सात बहिणी आणि व भाऊ खेतोबा यांच्या कथेचे आणि गोव्यातील उत्सवांचे गहिरे नाते आहे. सात बहिणी गोव्यात निरनिराळ्या ठिकाणी वसल्या (केळबाई मडगावला, महामाया मयेला, महालक्ष्मी म्हापश्याला वगैरे. मये तलाव हा भाऊ खेतोबाचे प्रतिक. या सांस्कृतिक मुळांचे सुरेख विवेचन इतिहासकार डॉ. प्रतिमा कामत यांनी केले आहे.
गोवा टीम. सुरवात एकदम छान झाली आहे. तुमच्या लेखनाचा आनंद लुटतोय. कीप इट अप.
In reply to गोव्यावरील शैव आणि शाक्त पंथाची अमीट छाप.. by योगप्रभू
योगप्रभू, म्हाळसा नव्हे, महालसा. महालसा नारायणी. यद्नोपवीत धारण करणारी ही देवीची बहुधा एकमेव मूर्ती असावी.
In reply to योगप्रभू, म्हाळसा नव्हे, by यशोधरा
हो तो उच्चार महालसा नारायणी असाच आहे. महालक्ष्मीचे नाव म्हणजे महालसा. मराठीत मात्र म्हाळसा म्हटले जाते. म्हाळसापती हे नाव (महालक्ष्मीचा पती तो नारायण) त्यावरुनच रुढ झाले. मी आपल्या मराठी पद्धतीने उच्चार केला. तरी दिलगीर आहे.
यद्नोपवीत धारण करणारी ही देवीची बहुधा एकमेव मूर्ती असावी.>>
वैदिक काळात स्त्रियांचे मौजीबंधन व्हायचे, त्यांना यज्ञोपवित म्हणजे जानवे धारण करण्याचा अधिकार असे. अर्थात मुंज हा संस्कार महिला व अन्य जातींतून कधी आणि का लुप्त झाला, हे सांगता येत नाही. पण देवीने यज्ञोपवित धारण करणे, हे निरीक्षण नक्कीच नोंद करण्याजोगे आहे.
In reply to दिलगीर आहे... by योगप्रभू
नाही, म्हाळसा आणि महालसा ही वेगळी रुपे आहेत.
>>म्हाळसापती हे नाव (महालक्ष्मीचा पती तो नारायण) त्यावरुनच रुढ झाले. >> हे बरोबर, पण महालसा म्हणजे तुम्हांला अभिप्रेत असलेली म्हाळसा नव्हे, असे वाटते. महालसा हा मोहिनी अवतार आहे. माझ्याकडे एक जुने पुस्तक आहे त्यामधे महालसेबद्दल काही माहिती आहे, वेळ झाल्यास इथे लिहीन.
In reply to नाही, म्हाळसा आणि महालसा ही by यशोधरा
महालसा म्हणजे महालक्ष्मी समजण्यात माझी गल्लत झाली. त्याबद्दल क्षमस्व..
महालसा म्हणजे विष्णुचा मोहिनी अवतार हे बरोबर आहे. पण पुढे हा अवतार शक्तीचे रुप कसा झाला ते मला म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर वाचायला मिळाले. भागवत पुराण व ब्रम्हांड पुराणात महालसा म्हणजे मोहिनीरुप, हे नमूद केले आहे. एका लोककथेनुसार अमृतमंथनाच्या वेळी देव व दानव मोहिनीवर भाळले. त्यात शंकरही होता. त्याने मोहिनीशी विवाहाची इच्छा व्यक्त केली तेव्हा मोहिनीने 'तू जेव्हा मार्तंड भैरवाचा अवतार घेशील त्यावेळी मीही अवतार घेऊन तुझ्याशी विवाह करेन' असे कबूल केले. पुढे शंकराने तो अवतार धारण केला आणि मणी व मल्ल या दैत्याचा पराभव केला, म्हणून त्याचे नाव मल्लारि पडले (आमचा मल्हारी मार्तंड उर्फ जेजुरीचा खंडेराया तो हाच) मोहिनीने यावेळी तिमाशेठ याची मुलगी महालसा म्हणून जन्म घेतला होता. तिने मल्हारीशी विवाह केला.
याचा अर्थ म्हाळसापती म्हणजे विष्णू नसून शंकर आहे, असे दिसते. इथे गोंधळ कसा उडला ते बघा. एक तर महालसा नारायणी असे नाव आहे. नारायण म्हणजे विष्णू. त्याची नारायणी म्हणजे महालक्ष्मी. म्हणजे हे तिचेच रुप आहे, असे वाटते. प्रत्यक्षात पुराणे म्हणतात ते विष्णूचे मोहिनीरुप आहे. लोककथा म्हणतात, की ती शंकराची पत्नी आहे. म्हार्दोळ येथील मंदिराच्या संदर्भ पुराव्यांत ती शक्तीदेवता (शिव व ६४ योगिनी समूह) म्हणूनच उल्लेखली गेली आहे.
In reply to माझी गल्लत झाली. क्षमस्व.. by योगप्रभू
म्हार्दोळ येथील मंदिराच्या संदर्भ पुराव्यांत ती शक्तीदेवता (शिव व ६४ योगिनी समूह) म्हणूनच उल्लेखली गेली आहे.
बर्याचश्या कथा व माहितीची सरमिसळ झाल्यासारखी वाटते. ६४ योगिनींची नावे पाहता, महालसा नारायणी योगिनींपैकी नसावी असे वाटते. असो. इथे विषयांतर नको.
छान माहीति दिलित ...मलाहि या ठिकाणि जायाला आवडेन्ल क्रुपया मार्गदर्स्न करावे
अतिशय माहितीपुर्ण लेख. लिहिण्याची शैलीही ओघवती असल्याने अजुनच मजा आली वाचायला.
ही एक संस्मरणीय मालिका होणार ही काळ्या दगडावरची रेघ. :)
इथे आर्यांच्या मूळ स्थानाबद्दल किंवा ते भारतातले की बाहेरचे याबद्दल आम्ही लिहित नाही. त्या मुद्द्यांवर अधिक चर्चा कोणी घडवून आणली तर आनंदच आहे. आम्हाला एवढंच लिहायचं होतं की "उत्तर भारतातून आर्य दक्षिण भारतात आले" आम्ही जेवढं वाचलं त्यात बहुतेक ठिकाणी असाच उल्लेख सापडला. लेखात लिहिताना अनवधानाने ते लिहायचं राहिलं. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!
सर्वांच्या सूचनांची नोंद घेतो आहोत. जमेल तेवढा "गोवा" तुमच्यापुढे आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू!
पहिला भाग फार सुरेख उतरला आहे. माहितीपूर्ण आणि रोचक. लेखासाठी घेतलेल्या मेहनतीला दाद द्यावी तितकी थोडीच!
छान तपशीलवार आणि सुरेख माहिती आहे. सोबतची चित्रे सुद्धा छानच!
गोव्याच्या नेहमीच्या चर्च आणि समुद्रकिनारे याहून बरंच जास्त काही कळेल या लेखमालेतून.
पु. ले. शु.
एक अतिशय सुंदर कल्पना प्रत्यक्षात आणत आहात. आभारी आहोत.
आडनावांचा इतिहास रंजक आहे.
शिलाहारांचे जे वंशज बाटवाबाटवीच्या काळात सक्तीने ख्रिश्चन झाले, त्यानी नाव घेतले 'सिल्व्हा'!जे वाचले ते बहुदा शेलार झाले! चेदीचे चाड्डे तसेच कदम्बांचे कदम आणि चालुक्यांचे चाळके, साळुंखे झाले असे ऐकून आहे. खरे खोटे इतिहासालाच ठावे. छोटा नागपूर पठारावरचे आदिवासी समुद्रकिनार्यावरून दूर लॅण्डलॉक्ड कंट्रीसाइडकडे गेले,आणि आपल्या समुद्रकिनार्याच्या सर्व आठवणी त्यांनी पुसून टाकल्या हे जरासे पटण्यास अवघड वाटते खरे. पण आपण इतिहासतज्ञ किंवा इतिहास जाणकाराच्या भूमीकेतून लिहीत नाही आहात हे स्पष्ट आहे. त्यामुळे वादाचा प्रश्न नाही. अतिशय रंजक पद्धतीने लिहीत आहात. वाचत आहे.
In reply to सलाम! by आळश्यांचा राजा
खूप आवडला लेख. अतिशय सुरेख लेखमाला.
जे वाचले ते बहुदा शेलार झाले!
मीही असेच वाचलेले आहे.
छोटा नागपूर पठारावरचे आदिवासी समुद्रकिनार्यावरून दूर लॅण्डलॉक्ड कंट्रीसाइडकडे गेले,आणि आपल्या समुद्रकिनार्याच्या सर्व आठवणी त्यांनी पुसून टाकल्या हे जरासे पटण्यास अवघड वाटते खरे.
ह्याबद्दल विशेष माहिती नाही, पण मला या मूळस्थानांच्या कहाण्यांमध्ये हे इकडून आले, तिकडे गेले अनेकदा सांगोवांगीचे वाटते. अर्थात लोकांचे स्थलांतर झाले नाही, असे म्हणायचे नाही. आणि ह्या लेखात ह्या कथा यायलाच हव्या याबद्दल शंका नाही.
अतिशय आवडला लेख.
वाचत आहे
सुरेख फोटो, सुरेख माहीती! अतिशय स्तुत्य लेखमाला!
--असुर
ओघवता लेख आणि छान माहिती, वाचतो आहे
आवडला..वाचतो आहे.
गोव्याबद्दल नवीन नवीन माहिती मिळाल्याने भूगोलाचे ज्ञान वाढत आहे
टीम गोव्याला परत शुभेच्छा.. पुढेचे भाग पटापट टाका
अतिशय ओघवता आणि सुरेख झालांय पहिला भाग. तुम्ही लेखासाठी घेतलेल्या मेहनतीचंही कौतूक वाटतंय.
उत्तम, माहितीपूर्ण भाग आणि आढावा. चित्रांनी शोभा आणली.
आपापल्या कुलदैवताना वर्षासने द्यायचेही त्यानी सुरूच ठेवले. "गोव्यातल्या प्रत्येक ख्रिश्चन माणसाला आपले हिंदू असतानाचे आडनाव माहिती आहे"नुकताच त्रिकाल हा चित्रपट पुन्हा पाहिला. त्यात नायिका आपल्या नातीचे लग्न ओळखीतल्या एका मुलाशी करण्यास नकार देते कारण त्यांच्या जाती वेगळ्या असतात. तसेच नातीच्या साखरपुड्याची घोषणा झाल्यावर मंगेशीला नारळ पाठवायला विसरू नका असेही सांगते त्याची आठवण झाली. -- गोव्याच्या इतिहासासोबत काही भुताखेतांच्या गोष्टी आणि वदंताही येऊ द्या. एक स्पेश्शल भागच टाका त्यावर. :)
थोड्या माहितीची आनंददायी उजळणी झाली, आणि कितीतरी माहिती नवीन मिळाली.
खूप वेगळी माहिती समजली. नाहितर गोव्याच्या इतिहासात पोर्तुगीज आहेत इतकेच माहिती होते.
बरीच आडनावे कशी आली ते ही समजले.
येऊद्या अजून.
टीम गोवा..
अत्यंत स्तुत्य उप्रकर चालू केला आहे हा. माझ्यातर्फे भरपूर शुभेच्छा!
गोव्याच्या इतिहासाच्या पूर्वार्धाची (?) ओळख करून देणारा लेख आवडला.
ही लेखमाला उत्तरोत्तर अधिक रंगतदार होत जावो आणि गोव्याच्या माहितीवरील एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरो असे मनापासून वाटले.
'लॅबिरिंथ अथवा चक्रव्यूव्ह' पाहून विजयवाड्याजवळ एका पुरातन गुहा-विष्णूमंदिरात (ओंडावल्ली) हीच आकृती पाहिल्याचे स्मरले. जगातील विविध संस्कृतींनी हीच आकृती वेगवेगळ्या काळी वापरलेली आहे. म्हणजे ही आदिम मानवाच्या स्मृतींपैकी एक असावी हे नि:संशय!


मस्त !!!
देव बोरें करुं
दणकेबाज इतिहासाचं वर्णन