मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अगं अगं बशी..! - (अंतिम)

प्राजु · · जनातलं, मनातलं
मैत्रीणींचं नशिब चांगलं .. त्यांच्यामुळे मला बस मिळायची. मी एकटी मैत्रीणींशिवाय उभी असले स्टॉपवर तर आजूबाजूच्या लोकांना माझ्यामुळे बस मिळायची नाही. आमचं वाकडंच ना!! म्हणजेच काय.. तर आम्हा दोन समांतर रेषांना जोडणारी तिसरी रेषा कंपल्सरी हवीच!! *** *** *** *** *** *** एकदा कोणीतरी सांगत होतं की, एका मुजोर कंडेक्टरने कुठल्यातरी स्टॉपवर बस खूप वेळ थांबवून ठेवली . लवकर घंटी मारेना.. त्यामुळे इंजिनियरिंगच्या मुलांनी, ती घंटीची दोरी हळूच सोडवून, पुढे पुढे सरकवत ती ओवलेली घंटी बसच्या बाहेर फेकून दिली. .. हे ऐकून तेव्हा खूप हसले होते. आता त्यावर इतकं हसू नाही येत. एका माणसाने कंडेक्टरला ५० पैश्याच्या नाण्यांच्या स्वरूपात १० रूपये दिले आणि ४ तिकिटे मागितली....ते ही गच्च भरलेल्या, ओसंडून वाहणार्‍या बस मध्ये. ते सुट्टे पैसे पाहून कंडेक्टर खवळला ... तर "तुम्हीच नेहमी म्हणता ना सुट्टे द्या सुट्टे द्या..आता घ्या हे सुट्टे" असं उत्तर दिलं.. हा किस्सा ऐकला आणि पुन्हा जोरदार हसू आलं. आणखी एक, आईकडून ऐकलेला किस्सा .. इचलकरंजीत कोरोचीच्या बस मध्ये एक म्हातारी बाई कसलीशी बुट्टी घेऊन धडपडत धडपडत चढली. कंडेक्टर जवळ आल्यावर तिने त्याच्या हातावर २० पैशाची २ आणि ५ पैशाचं एक असे ४५ पैसे ठेवले आणि म्हणाली, "एक शुगर फॅक्टरी." तो म्हणाला ," आजी हे ४५ चं पैसे हाईत". "व्हय मग ..४५ चं पैसे हाईत!" इति आजी. "अहो आजी, ४५ पैसे हाईत ह्ये.." इति कंडेक्टर. "आरं व्हय..पोरा!! ४५चं पैशे हाईत ते.." इति आजी. "आजी तिकिट ५० पैशे हाय.. ५ पैशे कमी हाईत ह्यात.." इति कंडेक्टर. "माझ्या जवळ त्यवडंचं पैसं हाईत रं.. ! ल्येकरा... पाच पावलं अलिकड थांबिव जरा.. चालल की." इति आजी. बिचारा कंडेक्टर आईकडे बघून म्हणाला, "काय करायचं सांगा आता? घालतो पाच पैशे माझ्या खिशातले.." मला हा किस्सा ऐकल्यानंतर मात्र त्या कंडेक्टर बद्दल आपुलकी वाटली. आणखी एक असाच ऐकलेला किस्सा..इचलकरंजी मध्ये तेव्हा बसचे दोन मार्ग होते. एक होती कोरोची- शिरदवाड आणि दुसरी होति कबनूर-यड्राव सूतगिरणी. राजवाड्यापासून एस्टी स्ट्ण्ड पर्यंत दोन्ही बस एकाच मार्गाने येत मात्र पुढे कबनूरची बस सरळ निघून जाई तर कोरोचीची शिवाजी पुतळ्याला वळसा घालून उजवीकडे वळत असे. एक बाई अशीच जनता बँकेपाशी चढली. आणि बस शिवाजी पुतळ्यापासून कोरोची रस्त्याला लगताच ती जोरजोरात ओरडायला लागली. हात कबनूरच्या दिशेन दाखवत ,"आवं आवं बस थांबवा... मला ह्या रस्त्याला जायचं हाय." कंडेक्टर बसच्या पुढच्या बाजूला होता.. तो तसाच म्हणाला "बस तिकडं जात न्हाय"... असे म्हणून त्याने घंटी मारली .. त्या बाईला उतरता यावे म्हणून. पण ड्रायव्हरने बस रस्त्याच्या कडेला घेईपर्यंत बाईने चालत्या बसमधून खाली उडी टाकली होती आणि रस्त्यावर पडली होती. ड्रायव्हर -कंडेक्टर घाबरले. ते इतर प्रवाश्यांना गयावया करू लागले .." आमची काही चूक नाही.. तुम्ही पाहिलंत सगळ्यांनी . चौकशी झाली तर तुम्ही सगळे सांगाल ना तसं.." अशाप्रकारे ते विनवणी करू लागले. ते विनवणी करत असतनाच ती बाई मात्र कसलंही सोयर-सूतक नसल्याप्रमाणे आपली पिशवी उचलून भराभर मागच्या दिशेने चालू लागली. हे बघून बस मधली इतर लोकं मात्र जोरदार हसू लागली. हे आणि असे किस्से भरपूर ऐकले मात्र असले किस्से कधी माझ्या बाबतीत नाही घडले याची हुरहुर नेहमीच लागून राहिली. लग्न होऊन पुण्यात आले.. वाटलं इचलकरंजी नाही, कोल्हापूर नाही .. निदान पुण्यात तरी बस आपल्या नशिबात असेल. छे!! कुठचं काय!! एकदा नवरा म्हणाला, "दुपारच्या बसने तू मंडईत ये..(मंडई जवळ त्याचा मामा राहतो) मामाकडे थांब, मी येतो तिथेच ५ वाजे पर्यंत ..मग जाऊ लक्ष्मी रोडवर भटकायला." माझी अवस्था आज प्रीतीला पंख हे लाभले रे.. अशी झाली. अगदी नीट आवरून बस स्टॉपवर आले. संध्याकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत जाणारी प्रत्येक बस माणसांनी उतूच का जात असते.. याचं मला तेव्हा फार आश्चर्य वाटलं. बस येताना दिसली की, थोडासा पावलांना आलेला वेग.. त्या बसमधली हीऽऽऽऽऽ गर्दी पाहीली की आपोआप मंद होत असे. त्यात माझा भरलेल्या बसमध्ये चढण्याचा आणि उरण्याचा असलेला दिर्घ अनुभव!!!!!!!! सगळा आनंदी आनंद्च होता. नवरा वाट बघून घरी आला.. आणि मी मात्र बसची गर्दी बघून दमून गेले होते. लक्ष्मी रोडवर बसने जाण्याचं स्वप्न , स्वप्नंच राहिलं. एकदा, पुन्हा प्रयत्न करावा म्हणून काहीही ठरलेले नसताना बस स्टॉपवर आले. माझ्या सुदैवाने १७४की १७६(आठवत नाही नीट) नंबरची बस आली.. आणि दुर्दैवाने नेमकं त्याच दिवशी त्याच बस वर "पुणे स्टेशन" अशी पाटी लिहिली नव्हती. मी चढले . बस मिळाली.. केव्हढा आनंद!! पण तो ताबडतोब मावळा! .. बसने अलका टॉकीजच्या चौकात न जाता सरळ एफ सी रोडच्या दिशेन रस्ता घेतला आणि धाबं दणाणलं ... आणि खरंच अगं अगं बशी.. मला कुठे नेशी असं म्हणावं वाटलं . पुण्यात नवी होते तेव्हा. कंडक्टर अजून तिकिटासाठी आला नव्हता जवळ. तशीच गर्दीतून वाट काढत त्याच्यापाशी गेले, "ओ, ही बस स्टेशनला जात नाहीये.." निर्विकारपणे तो म्हणाला , "तुम्हाला कोणी सांगितलं जाती म्हणून??".. "पण मला स्टेशनची बस हवीये.."इति मी. तर तो म्हणाला, "ही चिंचवडची आहे.. मनपाला उतरा.. तिथून स्टेशनची बस पकडा.." झालं!! मी उतरले. आता काय करावे?? मामाकडून नवर्‍याला फोन करायचा आणि इथे मी बसने आले.. तू ये इकडे असं सांगून सरप्राईज द्यायचं होतं.. झालं भलतंच काहीतरी. निमूटपणे रिक्षा पकडली आणि घरी आले. नवरा घरी आल्यावर त्याला वृत्तांत कथन केला.. ताबडतोब त्याने त्या आठवड्यात स्कूटी घेऊन दिली.. म्हणाला तुझं बसचं नाटक पुरे आता. अमेरिकेत आले तेव्हा चकाचक आटो डोर च्या बसमधून फिरताना खूप मजा यायची. नवरा सोबत असला की.. बस नक्की मिळायची. आणि बस टाईम टू टाईम असल्यामुळे इतरांची बस माझ्यामुळे चुकायची भितीही नव्हती. बोस्टनला होतो तोपर्यंत बसने एकटीने फिरायची वेळ आलीच नाही.. त्यामुळे ती बस मिस्स झालीच नाही. पण ज्या कारणासाठी बसने जायचं ते बसमधले किस्सेच इथल्या बशींमधून घडेनात.. हुज्जत घालायला कोणीच नाही. तिकिट तिकिट म्हणत सीटला टेकून उभा राहून, पंच करून तिकिट देणारा, सुट्ट्या पैशाची बॅग खुळ्खुळवणारा, अखंडपणे "चला पुढं चला... चला पुढ चला" असं म्हणणारा.. आणि घंटी मारायला न विसरणार कंडेक्टर.. कुठेच नाही. बस आली की, खटाक्कन उघडणारे दरवाजे, काळा चष्मा घालून निर्विकारपणे बसलेली ड्रायव्हर आणि समोरच्या मशिनमध्ये पास स्वाईप करा अथवा पैसे टाका.. यात कसलं आलंय थ्रील?? गुळमुळीत प्रकार सगळा.. !! बॉस्टनहून मँचेस्टरला आले. हे तसं लहान गाव. बस फ्रिक्वेंसी तासाला २ बस अशी. बसची वेळ बघून १-२ वेळा निघाले.. मात्र इथेही चुकलीच बस. माझीही आणि माझ्या सोबत असणार्‍या काही फिरंग्यांचीही. मला उगाचच अपराधी वाटलं. मी स्टॉपवर उभी असल्यावर बसने उशिरा येणं समजू शकते मात्र येऊच नये???? ते ही अमेरिकेत?? माझा माझ्यावर आणि त्या बसवर विश्वासच बसेना. माझी बस हिस्ट्री माहित असल्यामुळे इतर लोकांची काळजी वाटून नवर्‍याने इथेही गाडी घेऊन दिली.. बसची भानगड नकोच.. त्यामुळे आता बस दिसली की मी तोंड फिरवते. उगाच नाही ती स्वप्नं कशाला बघा.. आणि अगं अगं बशी असं म्हणत कशाला कुढत बसा?? नाही का? - प्राजु

वाचने 6275 वाचनखूण प्रतिक्रिया 28

अवलिया 16/06/2009 - 18:52
वा! मस्त लेखन!! छान किस्से आणि सुंदर मांडणी :) येवु द्या अजुन असेच सुंदर लेखन !!! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

In reply to by अवलिया

टारझन 16/06/2009 - 20:27
वाआआआआआआआआआआआआआआआआआव !! अगदी सैफच्या आवाजात .. दोण्ही भाग संगच वाचेश ... लेखण दाद घेउन गेले आहे :) साधा प्रसंग पण प्रभावी लेकणाने कसा फुलवता येउ शकतो, ह्याचं परफेक्ट उदाहरण (प्राजुच्या फ्लॉलेस लिखाणाचा फैण) ट्राजु

धन्य आहात आपण ;) किस्से एकसे बढकर एकच. सगळ्यात कौतुक वाटले ते तु अजुन येव्हडे सगळे, अगदी बसच्या रुट सकट लक्षात ठेवले आहेस ह्याचे. मी कायम एका विठ्ठलवाडीच्या मित्राला बस स्टॉपवर सोडायला जायचो पण तो नक्की कोण कोणत्या नंबरच्या बसनी जायचा हे मला तेंव्हाही आठवायचे नाही. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 16/06/2009 - 19:09
मी कायम एका विठ्ठलवाडीच्या मित्राला बस स्टॉपवर सोडायला जायचो पण तो नक्की कोण कोणत्या नंबरच्या बसनी जायचा हे मला तेंव्हाही आठवायचे नाही. बरोबर आहे. आता सांगायला तु मित्र असे सांगत आहेस पण ती मैत्रिण असणार !!! बस नंबर वगैरे क्षुल्लक गोष्टी कशा लक्षात रहाणार ? :? --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

रेवती 16/06/2009 - 19:02
छान अनुभव! तुझं बसबसोबरच नातं समजलय आता......तुझ्याबरोबर कधी बसमधून जाणार नाही.;) अर्थात तशी वेळ तू येउ देणार नाहीस.;) बॉस्टनच्या बसमधून जाताना माझी फजिती झाली होती. मी आपली कंडक्टरची वाट बघत बसले. नंतर ड्रायव्हरबाईंना विचारल्यावर त्यांनी ठरावीक रकमेची नाणी मशीनमध्ये टाकायला सांगितली. माझ्याकडे इतकी नाणी नव्हती मग आहेत तेव्हढी टाक म्हणाल्या. रेवती

मराठमोळा 16/06/2009 - 19:31
वा! छान!! शैली एकदम आवड्ली, वाचताना बोर झालं नाही कुठेच. एका दमात वाचुन काढला. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

क्रान्ति 16/06/2009 - 20:00
लिहिलंय बसपुराण! :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

16/06/2009 - 20:03
कोरोची ते शिरदवाड आणि कबनूर ते सूतगिरणी असा भयंकर मार्ग आखणारा महाभाग कोण असा प्रश्न नेहमी पडायचा. राजवाड्याजवळ बसची वाट पाहताना एका कापडदुकानाच्या कट्ट्यावर बसून भेळ बर्‍याचदा चापली आहे. प्राजूताई एकदम इचलकरंजीची आठवण करुन दिलीत आपण. आभार!

In reply to by

प्राजु 16/06/2009 - 20:08
एका कापडदुकानाच्या कट्ट्यावर बसून भेळ बर्‍याचदा चापली आहे. ते जवाहर क्लॉथ सेंटर. मी पण खाल्ली आहे भेळ त्या कट्ट्यावर बसून. :) तिथेच शाळा होती माझी नववी पर्यंतची "गंगामाई गर्ल्स.." :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

समिधा 17/06/2009 - 03:11
मी पण खुपदा खाल्ली आहे तिथली भेळ...:) बहुदा दत्तभेळ नाव आहे त्या भेळेच्या गाडीच. बाकी तुझ बस पुराण खुपच मस्त.. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

प्राजुतैचा अजून एक ढिंगच्याक लेख. मस्त लिहिलंयस गं!!! तुझे एक एक पराक्रम जबरीच आहेत. एकंदरीत पहिल्यापासूनच उद्योगी आहेस असं दिसतंय. :D मी मात्र अंमळ घरबशा असल्याने बशीचा फारसा संबंध नाही आला. लोकलचा संबंधच जास्त आला. पण एक न विसरणारी बस म्हणजे बेस्टची २५३ (उच्चारी टूफिफ्टीथ्री!!!). गोरेगाव बस डेपोतून सुटणारी आणि थेट जुहू डेपोला बीचवर नेणारी. स्टार्टिंग पॉइंटला बसायचे आणि एकदम लाष्टापला उतरायचे. या बसच्या असंख्य आठवणी मनात आहेत. जुहूच्या सगळ्या वार्‍या या बसमधून झाल्या आहेत. आणि ही बस डबल डेकर असायची. बहुधा आम्ही सगळी भावंडं मिळून जायचो त्यामुळे ८-१० जण असायचो. वरच्या मजल्यावर अगदी समोरच्या सीट्स मिळवण्यासाठी १-२ बस सोडायला लागल्या तरी चालायचं, पण तिथेच बसायचं. सगळी नुसती धमाल चालायची. त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सुबक ठेंगणी 17/06/2009 - 19:45
३१२ च्या तिकिटावरच्या नंबरांची बेरीज करून "आपली आठवण कोण काढतंय" असा एक खेळही खेळायचो...महा टाईमपास व्हायचा... तसंच त्या बसच्या कंडक्टरना आम्ही "एक पार्ले कॉलेज, एक पार्लेश्वर सोसायटी आणि एक पार्लेश्वर मंदीर द्या" असं सांगून कन्फ्यूज करायचो तेही आठवलं... मस्त मजा आणलीस...

त्यादिवशी तुझ्या घरून येताना मी आधी एकतर दोनच्याऐवजी, तीन, चार आणि मग शेवटी पाच वाजताची बस पकडली. त्यात पुन्हा न्यू यॉर्कमधे आल्यावर त्या बसला छोटा अपघात झाल्याने दुसरी बस पकडून घरी यायला लागलं. आता टोटल लागली हे सगळं का झालं असावं त्याची :)

In reply to by संदीप चित्रे

रेवती 17/06/2009 - 23:33
अर्रे संदीप, खरच की! मलापण आत्ता टोटल लागली. बापरे, प्राजुचं आणि बसच अज्याबात म्हणजे अज्याबात जमत नाही. रेवती

चतुरंग 17/06/2009 - 09:20
पुण्यात असताना ४, १३ अशा बशी वापरलेल्या आठवतात. इं.कॉलेजात असताना मिरज-कौलापूर बस पकडायला झुंबड असायची कारण थेट कॉलेजपाशी जाता यायचे नाहीतर सांगलीहून फेरा पडायचा. आठवणी जागल्या. (वाहक)चतुरंग

In reply to by चतुरंग

विद्याधर३१ 19/06/2009 - 09:23
तुम्ही पीव्हीपीआयटी बुधगावचे विद्यार्थी का? कोणत्या साली ? मी पण ९४-९७ असा मिरज ते बुधगाव प्रवास केला आहे. विद्याधर

प्राजु 17/06/2009 - 19:03
बशीने प्रवास करणार्‍या आणि लेख आवडल्याचे कळवणार्‍या आपणा सर्वांचे मनापासून आभार! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लिखाळ 17/06/2009 - 20:52
वा ... दोन्ही भाग मस्त :) मी शाळेची बरीच वर्षे पिएमटीने प्रवास केला असल्याने अनेक आठवणी जाग्या झाल्या. अनेक वर्षांच्या त्या नकळत झालेल्या तपश्चर्येमुळे आता प्रवासात अपेक्षाभंग होणे, गाडी चुकणे, त्रास होणे, अपमान होणे या बद्दल काही वाटत नाही. प्रवास पार पडला की देवाचे आभार मानून पुढे चालू लागणे अशी वृत्ती अंगी बाणली आहे. पिमटीच्या डायवर-कंडक्टर आणि बसस्टॉपवरच्या कंट्रोलरांचा ऋणी आहे. समोरच्याची गैरसोय होईल अश्या वागण्याच्या त्यांच्या अव्याहत व्रतामुळेच आम्ही असे सहनशील बनू शकलो असे कृतज्ञतापुर्वक नमुद करतो. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

ऋषिकेश 18/06/2009 - 00:07
पण ज्या कारणासाठी बसने जायचं ते बसमधले किस्सेच इथल्या बशींमधून घडेनात.. हुज्जत घालायला कोणीच नाही. तिकिट तिकिट म्हणत सीटला टेकून उभा राहून, पंच करून तिकिट देणारा, सुट्ट्या पैशाची बॅग खुळ्खुळवणारा, अखंडपणे "चला पुढं चला... चला पुढ चला" असं म्हणणारा.. आणि घंटी मारायला न विसरणार कंडेक्टर.. कुठेच नाही. बस आली की, खटाक्कन उघडणारे दरवाजे, काळा चष्मा घालून निर्विकारपणे बसलेली ड्रायव्हर आणि समोरच्या मशिनमध्ये पास स्वाईप करा अथवा पैसे टाका.. यात कसलं आलंय थ्रील?? गुळमुळीत प्रकार सगळा.. !!
अगदी खरंय.. तिथल्या "बसेस"मधे बसल्यावर मला नेहेमी आपल्या जिवंत"बशीं"ची खूप आठवण यायची.. आपल्य बशींना आपापले स्वभाव आहेत.. बसमधील रागरंगच आपण कोणत्याबसमधे चढलोय हे सांगून जातो.. कोळीणींच्या टोपल्यांऐवजी गुजराती साड्या खसखसल्या की नंबर न बघता कळतं की मालाडला जाणारी बस आहे.. भायंदर नव्हे :) खूप छान लेख!.. ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

शितल 18/06/2009 - 09:15
प्राजु, बसची आणि तुझी नाळ जुळलीच नाही तर.. असेच म्हणेन. :) मस्त लेखन. :)