आपण शिकत असताना बरीच वर्षं गणित हा विषय शिकतो. शिकत शिकताना आणि आता शिक्षण पूर्ण झाल्यावरही आपल्याला प्रश्न पडतो की sin, cos, tan तसंच (a + b)^२ हे का शिकायचं? फक्त मार्क मिळवणे किंवा हवं ते शिक्षण घेता येणे एवढाच आहे का? काय उपयोग ह्या सगळ्या गोष्टींचा?
खरंच काही नाहीये का?
आपण वापरात असलेल्या अनेक गोष्टींमध्ये - मग भले त्या फक्त मनोरंजनासाठी असतील किंवा आपलं आयुष्य सुकर करण्यासाठी असतील, गणिताचा वापर केलेला असतो. म्हणजे थिएटरमधला मंत्रमुग्ध करणारा, त्या सिनेमाच्या विश्वात नेऊन सोडणार अनुभव किंवा अरबी समुद्रात भक्कमपणे उभं राहून दिवसाला हजारो वाहने वाहून नेणारा बांद्रा-वरळी सी लिंक ही ठळकपणे लक्षात येणारी उदाहरणे आहेत. ही तर दैनंदिन आयुष्यात पाहायला मिळतील अशी उदाहरणे आहेत. फायनान्स आणि इन्शुरन्स हे उद्योग किंवा विमानाच्या तिकिटांची मागणीनुसार ठरणारी किंमत ह्यासर्वांचा कणा गणितीय मॉडेल आहेत.
बापरे, आमचा बाब्या कसा चांगला ह्या चालीत मी गणिताचं वकीलपत्र घेऊन बोलल्यासारखं झालं आहे.
आता काय करणार? शाळेत असल्यापासून गणितावर जडलेलं प्रेम आहे, ते असं अधूनमधून उफाळून येणारच. पण आजचा विषय माझ्या गणितप्रेमाच्या गोष्टी सांगायचा नाही. तर गणिताचा वापर करून एक भाकीत केलं आहे. त्याबद्दल वाचून मला गंमतही वाटली आणि भारी पण वाटलं. त्यामुळे सगळ्यांना सांगावंसं वाटलं की बघा, बघा, गणित हा विषय कुठकुठल्या गोष्टींसाठी वापरला जाऊ शकतो.

तर झालंय असं की योहाकिम क्लेमेंट या जर्मन अर्थशास्त्रज्ञाने त्याचं अर्थशास्त्राचे मॉडेल - अर्थातच ज्यात भरपूर गणिताचा वापर केलेला आहे ते वापरून २०२६ च्या फुटबॉलच्या विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड हा देश विजयी ठरेल असं भाकीत केलं आहे. आणि हे भाकीत फक्त ह्या स्पर्धेचे केलंय असं नाही. तर ह्या आधी झालेल्या फ़ुटबॉलच्या तब्बल तीन विश्वचषक स्पर्धांच्या विजेत्यांबद्दल म्हणजेच जर्मनी (२०१४), फ्रान्स (२०१८) आणि अर्जेंटिना (२०२२) यांच्याबद्दल अचूक भाकीत वर्तवले होते.
अंदाज वर्तवण्यासाठी ह्या अर्थशास्त्रीय मॉडेलमध्ये वापरलेली परिमाणं म्हणजे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशाची लोकसंख्या, तेथील वातावरण - म्हणजेच वर्षभरातील किती कालावधी सरावासाठी उपलब्ध असतो, देशाची आर्थिक स्थिती - खेळासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी किती पैसे देशाकडे आहे आणि त्याचबरोबरीने त्या देशाचे FIFA रँकिंग. पण मग ही माहिती वापरून १००% अंदाज वर्तवता येतो का? तर अर्थातच नाही. क्लेमेंट ह्यांच्या म्हणण्यानुसार हे मॉडेल वापरून आपण फक्त ५०% इतकाच अचूक अंदाज वर्तवू शकतो. आणि उरलेले ५०%? उरलेले ५०% हे नशिबाच्या जोरावर ठरतात असं स्वतः क्लेमेंट म्हणतात.
ह्यात नशीब म्हणजे काय? तर खेळाच्या दिवशी त्या टीमचा फॉर्म कसा आहे, बाह्यपरिस्थिती टीमसाठी पोषक आहे का असे घटक. त्यामुळे योहाकिम क्लेमेंट यांनी नशीब हे परिमाण म्हणून त्यांच्या मॉडेलमध्ये समाविष्ट केले आहे.
एक गमतीचा भाग म्हणजे माहितीचा एवढा काथ्याकूट करून, वेगवेगळी सूत्र वापरून मॉडेल तयार केल्यावर, क्लेमेंट म्हणतात की मी नशीबवान आहे म्हणून सलग तीन वेळा अचूक भाकीत वर्तवू शकलो. असो.
क्लेमेंट हे पुन्हा नशीबवान ठरतात की नाही हे आपल्याला २० जुलैला कळेलच!
जाताजाता...
क्लेमेंट ह्यांनी उपउपांत्य फेरीपासून अंदाज वर्तवले आहेत. ते पाहता स्पर्धेत हॅटट्रिक नोंदवून जोरदार सुरुवात केलेल्या मेस्सीची टीम उपउपांत्य फेरीतच गळपटणार आहे. तेच रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे स्पर्धेची डगमगती सुरुवात करणारा पोर्तुगाल अंतिम फेरीत धडक मारणार आहे.
तर गणिताचा वापर करून निकालाचा अंदाज वर्तवलेल्या ह्या स्पर्धेची आता नक्कीच खबर ठेवायला पाहिजे!
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रयत्नांती परमेश्वर
तसं प्रयत्नांती Image upload करता आली आहे.
नशीब....
In reply to प्रयत्नांती परमेश्वर by मनस्विता
अरे वा, खरंच उमटलं की चित्रं मिपावर. नशीब. तुमचं बरंका ! ;-)
बाकी, नशीब हा घटक गणितात समाविष्ट केला तर तो नशिबाचा भाग म्हणावा का ? काय घोर तात्त्विक प्रश्न आहे, नाहीका ?
-गा.पै.
अगदी... अगदी...
In reply to नशीब.... by गामा पैलवान
अगदी... अगदी...
गणित का शिकावे तो कार्यकारण भाव
कायम प्रश्नांकित असतो कारण मुळात जगाला शून्य, लीलावती, क्वाड्रेटिक समीकरणे देणाऱ्या आपल्या देशात हायस्कूल पासून हा विषय शिकवण्याचा वर्क फ्लो गंडलेला आहे. कारण सुरुवातीला कचीबच्ची जेव्हा रंगीबेरंगी पुस्तके घेऊन इवल्या बेंच वर बसतात तेव्हा "सचिनकडे ३ आंबे आणि सुमित कडे तीन आंबे तर एकूण किती आंबे" असे रसाळ वर्णन असते "पकडून ठेवणार" विषय असतात. तेच आम्ही ११-१२ मध्ये आलो की मॅट्रिक्स ते कॅल्क्युलस अक्षरशः आंधळ्या पोथीनिष्ठेने वाचत असतो ! हे डिफरेन्शियल / डेरीवेटीव वापरून प्रचंड मोठ्या इंडस्ट्रीयल बॉयलर्सची क्षमता कागदावरच अचूक मांडली जाऊ शकते, किंवा एखाद मोठा इंजिन ब्लॉक अमुक एक्सिडेंट नंतर किती कार्यक्षमता लूज करू शकतो हे कोष्टक कॅल्क्युलस वापरून बसवले जाऊ शकते, हे शिकायला अभियांत्रिकीच्या गंगेत घोडे न्हावे लागत असेल तर काहीच अर्थ नाही, अतिशय संवेदनशील, बंडखोरीला जीवनोपयोगी मानणाऱ्या उतार पौगंडावस्थेत पोरांना आपण गप "लिमिट झीरो टू वन" गणित पाठ कर "बोर्डात" येईल म्हणले का विषय गंभीर होतो अन् गणित नकोसे. बाकी प्रोफेश्वर साहेब आणि नेदरलँड टीम दोघांना शुभेच्छा.
अगदी खरंय!
In reply to गणित का शिकावे तो कार्यकारण भाव by वृषभ खोंडे
आता काही बदल येत आहेत. With NEP they are trying to put more focus on the Application based learning. पण कित्येकदा मनात असलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरताना गडबड होऊ शकते. असं काही झालं तर पुन्हा विद्यार्थ्यांवरचा ताण वाढू शकतो.
गणीतातले सौंदर्य समजायला…
गणीतातले सौंदर्य समजायला मोढेरा चे सूर्य मंदिर आणि तिथला तलाव पहायला हवा.
पण हे असलं काही असते हेच आपल्याला माहीत नसते.
साईन कॉस टैन, लिमिट डेरीवेटिव्ह, इन्टेग्रेशन यानी अकरावी बारावी चे वर्ष पार नासून टाकले.
नशीब बलवत्तर होते म्हणून पुढच्या काळात यांच्या शिवाय जगू शकलो.
जसं वर लिहिले आहे तसं आपलं…
In reply to गणीतातले सौंदर्य समजायला… by विजुभाऊ
जसं वर लिहिले आहे तसं आपलं आयुष्य त्यांच्याशिवाय सुकर नाही. फक्त आपल्या नकळत आपण त्यांची applications वापरत असतो.
रोचक आहेच. पण बायनरी…
रोचक आहेच. पण बायनरी प्रेडिक्शन असेल तर ५०% अचूकता ही शून्य असते हे ठाऊक असेलच. म्हणजे नेदरलँड किंवा कोणताही क्ष देश विजेता ठरेल किंवा नाही.. याचा अंदाज पन्नास टक्के अचूकतेने वर्तवणे हा एक मोठा विनोद आहे. कोणतेही मॉडेल हे नाणेफेक पद्धतीने भाकीत करण्यापेक्षा अधिक अचूक असणे किमान आवश्यक असते. नाणेफेक भाकीत अचूकता ५०% असते.
आणि जर बायनरी प्रेडिक्शन नसेल आणि एकूण क्ष देशांपैकी कोणता देश विजेता ठरेल असे प्रेडिक्शन असेल तर त्याची अचूकता टक्केवारीत मोजणे योग्य आहे का? आणि मग पन्नास टक्के अचूक म्हणजे नेमके काय ? बाकी गणिताची महती निर्विवाद..
खरं तर मी ते मॉडेल नक्की काय…
In reply to रोचक आहेच. पण बायनरी… by गवि
खरं तर मी ते मॉडेल नक्की काय आहे त्याचा अभ्यास करण्याच्या फंदात पडले नाही.
हे लिखाण करण्यामागे बराचसा गमतीचा भाग आणि गणित इतकं पण useless नसतं हे मांडण्याचा प्रयत्न आहे.
गमतीचा भाग अर्थातच रंजक आहे…
In reply to खरं तर मी ते मॉडेल नक्की काय… by मनस्विता
गमतीचा भाग अर्थातच रंजक आहे. गणित अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त आहे हे सांगण्याचा तुमचा उद्देश अत्यंत उमदा आहे. आणि गणिताचे महत्व हे सत्यच आहे.
पण खूपच क्षमस्व, की ते मांडण्यासाठी हे उदाहरण हे अतिशय काउंटर प्रॉडक्टिव म्हणा किंवा उलट दान पाडणारे आहे. पन्नास टक्के शक्यता ही दोन शक्यतांपैकी (जिंकणार किंवा नाही) एक शक्यता वर्तवण्याच्या मॉडेलच्या बाबतीत "शून्य" अचूकता आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो.
हो किंवा नाही हे नाणे उडवून वर्तवले तरी ५०% अचूक उत्तर येते. याखेरीज कोणतेही गणिती शास्त्रीय मॉडेल असेल तर त्याची अचूकता ५०% या शून्य पातळीच्या वर असली तरच त्यात काहीतरी अर्थ असतो.
एखादे क्लिष्ट गणिती मॉडेल बनवून त्यात अनेक व्हेरिएबल्स घोळवून शेवटी मॉडेलकर्ता म्हणत असेल की जिंकण्याची शक्यता मी ५०% अचूकतेने सांगतो आणि उरलेले पन्नास टक्के लक ऊर्फ नशिबाचा भाग (unknown variables) आहेत.. तर ही गणिताची गंमत नसून थट्टा आहे. इतकेच म्हणायचे आहे. लेख चांगला आहेच.
लेख आवडला. अल्फा बीटा गामा…
लेख आवडला. अल्फा बीटा गामा डेल्टा झेटा ETA इत्यादी नावे ग्रेटर नोएडा सेक्टरचे आहे. ज्यावेळी नावे ठेवली असेल त्यावेळी सीईओ किंवा मंत्री गणिताचा व्यसनी निश्चित असेल.
धन्यवाद!अगदी असंच असेल.
In reply to लेख आवडला. अल्फा बीटा गामा… by विवेकपटाईत
धन्यवाद!
अगदी असंच असेल.
सामान्य विद्यार्थ्यांना गरज नसलेली धोंड आहे.
बेरीज वजाबाकी... टक्केवारी एवढंच गरजेचं आहे.
असं वाटणं स्वाभाविक आहे…
In reply to सामान्य विद्यार्थ्यांना गरज नसलेली धोंड आहे. by कंजूस
असं वाटणं स्वाभाविक आहे.
प्रत्यकाला प्रत्येक गोष्ट आवडावी आणि जमावी हे शक्य नाही.
एखादी गोष्ट एकासाठी मौल्यवान हिरा असू शकतो तर दुसऱ्यासाठी गरज नसलेली धोंड.
जिंकू (५०%) किंवा हरू (५०%)
गणिताचा डोंगर पोखरून ५०% चा उंदीर बाहेर काढणार ? चान! चान!
धन्यवाद!
In reply to जिंकू (५०%) किंवा हरू (५०%) by अनन्त्_यात्री
धन्यवाद!
गणीत किंवा इतर कुठलेही विषय...
नशीब बलवत्तर होते का नाही माहित नाही पण गणितातली चिन्हे, अधीक, उणे, गुणाकार, भागाकार मात्र योग्य ठिकाणी वापरल्या मुळे आयुष्य सुफळ संपूर्ण झाले. गोळाबेरीज शंभर आली.
गणितापेक्षा मोजणी कोणत्या मापात करायची हे सोपे पडते.
इंच, फूट, सेंमीटर, मीटर, किलोमिटर, माईलस, ग्यालन , लिटर वगैरे.