Skip to main content

आमी तर ब्वा sin, cos, tan असलं काय वापरत नाय!

लेखक मनस्विता यांनी शुक्रवार, 26/06/2026 21:18 या दिवशी प्रकाशित केले.

आपण शिकत असताना बरीच वर्षं गणित हा विषय शिकतो. शिकत  शिकताना आणि आता शिक्षण पूर्ण झाल्यावरही आपल्याला प्रश्न पडतो की sin, cos, tan तसंच (a + b)^२ हे का शिकायचं? फक्त मार्क मिळवणे किंवा हवं ते शिक्षण घेता येणे एवढाच आहे का? काय उपयोग ह्या सगळ्या गोष्टींचा?

 

खरंच काही नाहीये का?        

 

आपण वापरात असलेल्या अनेक गोष्टींमध्ये - मग भले त्या फक्त मनोरंजनासाठी असतील किंवा आपलं आयुष्य सुकर करण्यासाठी असतील, गणिताचा वापर केलेला असतो. म्हणजे थिएटरमधला मंत्रमुग्ध करणारा, त्या सिनेमाच्या विश्वात नेऊन सोडणार अनुभव किंवा अरबी समुद्रात भक्कमपणे उभं राहून दिवसाला हजारो वाहने वाहून नेणारा बांद्रा-वरळी सी लिंक ही ठळकपणे लक्षात येणारी उदाहरणे आहेत. ही तर दैनंदिन आयुष्यात पाहायला मिळतील अशी उदाहरणे आहेत. फायनान्स आणि इन्शुरन्स हे उद्योग किंवा विमानाच्या तिकिटांची मागणीनुसार ठरणारी किंमत ह्यासर्वांचा कणा गणितीय मॉडेल आहेत.

 

बापरे, आमचा बाब्या कसा चांगला ह्या चालीत मी गणिताचं वकीलपत्र घेऊन बोलल्यासारखं झालं आहे.

 

आता काय करणार? शाळेत असल्यापासून गणितावर जडलेलं प्रेम आहे, ते असं अधूनमधून उफाळून येणारच. पण आजचा विषय माझ्या गणितप्रेमाच्या गोष्टी सांगायचा नाही. तर गणिताचा वापर करून एक भाकीत केलं आहे. त्याबद्दल वाचून मला गंमतही वाटली आणि भारी पण वाटलं. त्यामुळे सगळ्यांना सांगावंसं वाटलं की बघा, बघा, गणित हा विषय कुठकुठल्या गोष्टींसाठी वापरला जाऊ शकतो.  

 

 

 

 

तर झालंय असं की योहाकिम क्लेमेंट या जर्मन अर्थशास्त्रज्ञाने त्याचं अर्थशास्त्राचे मॉडेल - अर्थातच ज्यात भरपूर गणिताचा वापर केलेला आहे ते वापरून २०२६ च्या फुटबॉलच्या विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड हा देश विजयी ठरेल असं भाकीत केलं आहे. आणि हे भाकीत फक्त ह्या स्पर्धेचे केलंय असं नाही. तर ह्या आधी झालेल्या फ़ुटबॉलच्या तब्बल तीन विश्वचषक स्पर्धांच्या विजेत्यांबद्दल म्हणजेच जर्मनी (२०१४), फ्रान्स (२०१८) आणि अर्जेंटिना (२०२२) यांच्याबद्दल अचूक भाकीत वर्तवले होते.

 

अंदाज वर्तवण्यासाठी ह्या अर्थशास्त्रीय मॉडेलमध्ये वापरलेली परिमाणं म्हणजे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशाची लोकसंख्या, तेथील वातावरण - म्हणजेच वर्षभरातील किती कालावधी सरावासाठी उपलब्ध असतो, देशाची आर्थिक स्थिती - खेळासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी किती पैसे देशाकडे आहे आणि त्याचबरोबरीने त्या देशाचे FIFA रँकिंग. पण मग ही माहिती वापरून १००% अंदाज वर्तवता येतो का? तर अर्थातच नाही. क्लेमेंट ह्यांच्या म्हणण्यानुसार हे मॉडेल वापरून आपण फक्त ५०% इतकाच अचूक अंदाज वर्तवू शकतो. आणि उरलेले ५०%? उरलेले ५०% हे नशिबाच्या जोरावर ठरतात असं स्वतः क्लेमेंट म्हणतात.

 

ह्यात नशीब म्हणजे काय? तर खेळाच्या दिवशी त्या टीमचा फॉर्म कसा आहे, बाह्यपरिस्थिती टीमसाठी पोषक आहे का असे घटक. त्यामुळे योहाकिम क्लेमेंट यांनी नशीब हे परिमाण म्हणून त्यांच्या मॉडेलमध्ये समाविष्ट केले आहे.

 

एक गमतीचा भाग म्हणजे माहितीचा एवढा काथ्याकूट करून, वेगवेगळी सूत्र वापरून मॉडेल तयार केल्यावर, क्लेमेंट म्हणतात की मी नशीबवान आहे म्हणून सलग तीन वेळा अचूक भाकीत वर्तवू शकलो. असो.

 

क्लेमेंट हे पुन्हा नशीबवान ठरतात की नाही हे आपल्याला २० जुलैला कळेलच!

 

जाताजाता... 
क्लेमेंट ह्यांनी उपउपांत्य फेरीपासून अंदाज वर्तवले आहेत. ते पाहता स्पर्धेत हॅटट्रिक नोंदवून जोरदार सुरुवात केलेल्या मेस्सीची टीम उपउपांत्य फेरीतच गळपटणार आहे. तेच रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे स्पर्धेची डगमगती सुरुवात करणारा पोर्तुगाल अंतिम फेरीत धडक मारणार आहे.

 

तर गणिताचा वापर करून निकालाचा अंदाज वर्तवलेल्या ह्या स्पर्धेची आता नक्कीच खबर ठेवायला पाहिजे!

लेखनविषय:

वाचने 600
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

In reply to by मनस्विता

अरे वा, खरंच उमटलं की चित्रं मिपावर. नशीब. तुमचं बरंका ! ;-)

 

बाकी, नशीब हा घटक गणितात समाविष्ट केला तर तो नशिबाचा भाग म्हणावा का ? काय घोर तात्त्विक प्रश्न आहे, नाहीका ?

 

-गा.पै.


कायम प्रश्नांकित असतो कारण मुळात जगाला शून्य, लीलावती, क्वाड्रेटिक समीकरणे देणाऱ्या आपल्या देशात हायस्कूल पासून हा विषय शिकवण्याचा वर्क फ्लो गंडलेला आहे. कारण सुरुवातीला कचीबच्ची जेव्हा रंगीबेरंगी पुस्तके घेऊन इवल्या बेंच वर बसतात तेव्हा "सचिनकडे ३ आंबे आणि सुमित कडे तीन आंबे तर एकूण किती आंबे" असे रसाळ वर्णन असते "पकडून ठेवणार" विषय असतात. तेच आम्ही ११-१२ मध्ये आलो की मॅट्रिक्स ते कॅल्क्युलस अक्षरशः आंधळ्या पोथीनिष्ठेने वाचत असतो ! हे डिफरेन्शियल / डेरीवेटीव वापरून प्रचंड मोठ्या इंडस्ट्रीयल बॉयलर्सची क्षमता कागदावरच अचूक मांडली जाऊ शकते, किंवा एखाद मोठा इंजिन ब्लॉक अमुक एक्सिडेंट नंतर किती कार्यक्षमता लूज करू शकतो हे कोष्टक कॅल्क्युलस वापरून बसवले जाऊ शकते, हे शिकायला अभियांत्रिकीच्या गंगेत घोडे न्हावे लागत असेल तर काहीच अर्थ नाही, अतिशय संवेदनशील, बंडखोरीला जीवनोपयोगी मानणाऱ्या उतार पौगंडावस्थेत पोरांना आपण गप "लिमिट झीरो टू वन" गणित पाठ कर "बोर्डात" येईल म्हणले का विषय गंभीर होतो अन् गणित नकोसे. बाकी प्रोफेश्वर साहेब आणि नेदरलँड टीम दोघांना शुभेच्छा.


In reply to by वृषभ खोंडे

आता काही बदल येत आहेत. With NEP they are trying to put more focus on the Application based learning. पण कित्येकदा मनात असलेल्या कल्पना प्रत्यक्षात उतरताना गडबड होऊ शकते. असं काही झालं तर पुन्हा विद्यार्थ्यांवरचा ताण वाढू शकतो.


गणीतातले सौंदर्य समजायला मोढेरा चे सूर्य मंदिर आणि तिथला तलाव पहायला हवा.

पण हे असलं काही असते हेच आपल्याला माहीत नसते.

साईन कॉस टैन, लिमिट डेरीवेटिव्ह, इन्टेग्रेशन यानी अकरावी बारावी चे वर्ष पार  नासून टाकले.

नशीब बलवत्तर होते म्हणून  पुढच्या काळात यांच्या शिवाय जगू शकलो.


In reply to by विजुभाऊ

जसं वर लिहिले आहे तसं आपलं आयुष्य त्यांच्याशिवाय सुकर नाही. फक्त आपल्या नकळत आपण त्यांची applications वापरत असतो. 


रोचक आहेच. पण बायनरी प्रेडिक्शन असेल तर ५०% अचूकता ही शून्य असते हे ठाऊक असेलच. म्हणजे नेदरलँड किंवा कोणताही क्ष देश विजेता ठरेल किंवा नाही.. याचा अंदाज पन्नास टक्के अचूकतेने वर्तवणे हा एक मोठा विनोद आहे.  कोणतेही मॉडेल हे नाणेफेक पद्धतीने भाकीत करण्यापेक्षा अधिक अचूक असणे किमान आवश्यक असते. नाणेफेक भाकीत अचूकता ५०% असते.

 

आणि जर बायनरी प्रेडिक्शन नसेल आणि एकूण क्ष देशांपैकी कोणता देश विजेता ठरेल असे प्रेडिक्शन असेल तर त्याची अचूकता टक्केवारीत मोजणे योग्य आहे का? आणि मग पन्नास टक्के अचूक म्हणजे नेमके काय ? बाकी गणिताची महती निर्विवाद..


In reply to by गवि

खरं तर मी ते मॉडेल नक्की काय आहे त्याचा अभ्यास करण्याच्या फंदात पडले नाही. 
हे लिखाण करण्यामागे बराचसा गमतीचा भाग आणि गणित इतकं पण useless नसतं हे मांडण्याचा प्रयत्न आहे.


In reply to by मनस्विता

गमतीचा भाग अर्थातच रंजक आहे. गणित अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त आहे हे सांगण्याचा तुमचा उद्देश अत्यंत उमदा आहे. आणि गणिताचे महत्व हे सत्यच आहे. 

पण खूपच क्षमस्व, की ते मांडण्यासाठी हे उदाहरण हे अतिशय काउंटर प्रॉडक्टिव म्हणा किंवा उलट दान पाडणारे आहे. पन्नास टक्के शक्यता ही दोन शक्यतांपैकी (जिंकणार किंवा नाही) एक शक्यता वर्तवण्याच्या मॉडेलच्या बाबतीत "शून्य" अचूकता आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो. 

हो किंवा नाही हे नाणे उडवून वर्तवले तरी ५०% अचूक उत्तर येते. याखेरीज कोणतेही गणिती शास्त्रीय मॉडेल असेल तर त्याची अचूकता ५०% या शून्य पातळीच्या वर असली तरच त्यात काहीतरी अर्थ असतो. 

 

एखादे क्लिष्ट गणिती मॉडेल बनवून त्यात अनेक व्हेरिएबल्स घोळवून शेवटी मॉडेलकर्ता म्हणत असेल की जिंकण्याची शक्यता मी ५०% अचूकतेने सांगतो आणि उरलेले पन्नास टक्के लक ऊर्फ नशिबाचा भाग (unknown variables) आहेत.. तर ही गणिताची गंमत नसून थट्टा आहे. इतकेच म्हणायचे आहे. लेख चांगला आहेच.


In reply to by गवि

जर ईतकी डोकेफोड /आकडेमोड करुन शक्यता पातळी ५०% च्या वर जातच नसेल तर छापा/काटा करणेच उत्तम.

 

रच्याकने

डेरिव्हेटिव आणि ईंटीग्रेशन आणि ऐप्लिकेशन ऑफ डे. व ऐप्लिकेशन ऑफ ईं. शिकवायला १२ वीत एक मास्तर होते बहुतेक सुब्रमण्यम की कायतरी. ते कोणालाच आवडायचे नाहीत कारण शिकवायला एकदम कडक. आल्याआल्या फळा २ भाग करणार आणि एक एक गणित मांडुन सोडवुन दाखवणार. फळ्याचा एक भाग संपला की लगेच पुसुन दुसरे गणित चालु, पोरे कितीही बोंबलुदेत वहीत लिहिता आले नाही म्हणुन. त्यांचा मला आवडलेला एक अजुन गुण म्हणजे ते म्हणत "फार्म्युला मत रटो, ज्यादा प्राब्लम साल्व किया तो फार्म्युला अपनेआप ध्यान मे रहेगा"

शेवटच्या दिवशी मात्र ईमोशनल होऊन म्हणाले "मी कोणालाच आवडत नाही हे मला ठाउकेय, पण मी दिलेली गणिते नीट पाठ करा म्हण्जे बोर्डात तुम्हाला मरण नाही" आणि मी जेव्हा बारावीच्या शेवटी ती गणिते धडाधड सोडवु लागलो तेव्हा ते काय म्हणाले होते ते खरेच निघाले. बारावीत गणितात चांगलेच मार्क्स मिळाले. बाकी प्रोबैबलिटि, लिमिट्स, मैट्रायसेस ने तारले. हायपरबोला,पैरैबोल एलिप्स ने मात्र मारले.


In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गणिताचे सर नेहमीच कडक असतात. क्रूर भासतात. पण आयुष्यात शेवटपर्यंत वेळोवेळी हळवी आठवण येते ती गणिताच्या सरांचीच सर्वाधिक.


लेख आवडला. अल्फा बीटा गामा डेल्टा झेटा ETA इत्यादी नावे ग्रेटर  नोएडा सेक्टरचे आहे. ज्यावेळी नावे ठेवली असेल त्यावेळी  सीईओ किंवा मंत्री गणिताचा व्यसनी निश्चित असेल.

 


In reply to by कंजूस

असं वाटणं स्वाभाविक आहे. 

प्रत्यकाला प्रत्येक गोष्ट आवडावी आणि जमावी हे शक्य नाही. 

एखादी गोष्ट एकासाठी मौल्यवान हिरा असू शकतो तर दुसऱ्यासाठी गरज नसलेली धोंड. 


नशीब बलवत्तर होते का नाही माहित  नाही पण गणितातली चिन्हे, अधीक, उणे, गुणाकार, भागाकार  मात्र योग्य ठिकाणी वापरल्या मुळे आयुष्य सुफळ  संपूर्ण झाले.   गोळाबेरीज  शंभर आली. 


गणित कायम आवडता विषय होता आणि राहील, प्रोबॅबिलिटीने ५० % च अचूकता का काढली असेल याची उत्सुकता आहे.


गणित हा माझा अतिशय आवडता विषय आहे. तरीही प्रत्येक ठिकाणी गणिताचा वापर करायला गेल्यास फसगत होऊ शकते. कारण गणित हे एका रूक्ष वाटणाऱ्या सूत्रावर अवलंबून असते. मानवी भावभावना किंवा कामगिरीमध्ये होणारे चढउतार यांचा अंतर्भाव त्या सूत्रात करता येऊ शकत नाही. त्यामुळे अनेकदा अशी सूत्रे गंडतात. 

क्रिकेट विश्वचषकात १९८३ साली भारत, १९८७ साली ऑस्ट्रेलिया, १९९२ साली पाकिस्तान आणि १९९६ साली श्रीलंका जिंकेल असे कोणत्या गणिती सूत्राने बऱ्यापैकी विश्वासार्हतेनी भाकित केले होते असे वाटत नाही. १९८३ मध्ये तर वेस्ट इंडिजचा संघ अती आत्मविश्वासात जाऊन गाफिल राहिला होता. इतका की अंतिम सामन्यापूर्वी दोन दिवस माल्कम मार्शल लंडनमध्ये गाडीच्या शोरूममध्ये गाडी बुक करायला गेला होता आणि अंतिम सामना जिंकल्यानंतर गाडी घ्यायला येतो असे म्हणाला होता. अशा अति आत्मविश्वासात जाऊन चुका होतात त्यांचा अंतर्भाव गणिती सूत्र करू शकत नाही.  १९८७ मध्ये मुंबईतील उपांत्य सामन्यात चंद्रकांत पंडीतला पंचांनी खोटे बाद ठरविले नसते तर कदाचित अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरूध्द इंग्लंड असा होण्याऐवजी ऑस्ट्रेलिया विरूध्द भारत असा झाला असता. अशा मानवी चुका कोणते गणिती सूत्र पकडेल? अंतिम सामन्यातही आयत्या वेळेस अवदसा आठवून माईक गॅटींग रिव्हर्स स्वीप करायला गेला नसता तर... कदाचित ऑस्ट्रेलिया ऐवजी इंग्लंड जिंकला असता. 

इतकेच काय तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये एन.डी.ए ला ४०० नाही तरी २०१९ मध्ये मिळाल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागा मिळायची शक्यता किती तर बहुतेक गणिती मॉडेल्सने उत्तर एकच्या जवळपास दिले असते. पण आपण आरामात जिंकतोय मग कशाला ४२-४४ डिग्री तळपत्या उन्हात मत द्यायला जा किंवा महाराष्ट्रात अजित पवारांना बरोबर घेतलेले आवडलेले नाही ना मग मतच देऊ नका किंवा विरोधी मत द्या- तसेही ४०० जागा येणारच आहेत मग माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे हा विचार अनेक भाजपच्या मतदारांनी केला आणि तिथे घात झाला. अशा अनेक गोष्टी लिहिता येऊ शकतील.

तेव्हा सांगायचा मुद्दा हा की गणित हा विषय कितीही उपयुक्त असला, कितीही प्रभावी असला तरी हार्डकोअर विज्ञान सोडून इतर ठिकाणी त्या विषयाच्या वापराला मर्यादा आहेत त्या लक्षात घेतल्याच पाहिजेत. नाहीतर पूर्ण गंडायची शक्यता जास्त असते.   


विज्ञानाच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे गणिताच्या साहाय्याने सोडवता येतात.  

पण केवळ गणिताच्याच साहाय्याने सोडवायला गेलात तर हातात भोपळा मिळतो.


 


छापा काटा करुन पोपटाच्या पोटावर पाय का द्यायचा ?

आमच्या इथला पोपटवाला यापेक्षा अचूक भविष्य सांगेल. त्याची उत्तर बरोबर यायची शक्यता नक्कीच ५१% पेक्षा जास्त आहे.

बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि टक्केवारी काढता आली तरी जगातील ९९% लोकांचे काम चालण्यासारखे आहे. यातील टक्केवारी फार महत्वाची आहे. राजकीय नेत्यांना बेरीज, वजाबाकी आणी गुणाकार, भागाकार नाही आला तरी चालेल पण टक्केवारी काढता आलीच पाहिजे.

आणी महत्त्वाचे म्हणजे दुध आणि आटा लिटर मधे मोजायचे की किलो मधे ते माहिती पाहिजे.

 

इंग्लंड, स्पेन, फ्रान्स, मोरोक्को आणि उरुग्वे यापैकी कोणताही एक संघ जिंकेल असे आमचा पोपट म्हणतो.

 


In reply to by धर्मराजमुटके

छापा काटा करुन पोपटाच्या पोटावर पाय का द्यायचा ?

छापा काटा करून एका सामन्यात दोनपैकी कोणता एक संघ जिंकेल हे आपण ५०% शक्यतेने सांगू शकतो. पण संबंधित उदाहरणात नेदरलॅंडचा संघ एखादा सामना नाही तर विश्वचषक जिंकेल असे भाकित आहे. म्हणजे ३२/३६/४८ जितके कितके संघ असतील त्यापैकी नेदरलॅंडच जिंकेल याची शक्यता ५०% आहे असे म्हटले आहे. त्या अर्थी त्या भाकिताची छापा-काट्याशी तुलना करणे अयोग्य आहे असे वाटते. त्या अर्थाचे बरेच प्रतिसाद आले आहेत.

 

मला स्वत:ला फुटबॉलच्या विश्वचषकाविषयी जितके माहित आहे त्यापेक्षा झुलू भाषेतील असामान्य साहित्यकृतींविषयी अधिक माहित आहे असे म्हटले तरी अयोग्य ठरू नये. तरी समजा अंतिम फेरीत जाणारा संघ पूर्ण विश्वचषकात १० सामने खेळत असेल तर त्यातील काही निर्णायक सामने- (उदाहरणार्थ उपांत्य फेरी) त्याने जिंकायलाच लागतील. ते सोडून समजा ७ सामने असतील तर त्या ७ सामन्यांच्या निकालाचे भाकित छापा-काट्याने केल्यास ते योग्य यायची शक्यता १/१२८ इतकी म्हणजे १% हून कमी असेल. त्यापेक्षा जर ५०% शक्यता या मॉडेलमुळे येत असेल तर ते मॉडेल नक्कीच टाकाऊ नाही. पण वर म्हटल्याप्रमाणे मुख्य मुद्दा हा की भौतिकशास्त्रासारख्या हार्डकोअर विज्ञानात गणित जितक्या खात्रीने लावता येईल तशा खात्रीने या विषयातही लावता येईल का.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

म्हणजे ३२/३६/४८ जितके कितके संघ असतील त्यापैकी नेदरलॅंडच जिंकेल याची शक्यता ५०% आहे असे म्हटले आहे. त्या अर्थी त्या भाकिताची छापा-काट्याशी तुलना करणे अयोग्य आहे असे वाटते. त्या अर्थाचे बरेच प्रतिसाद आले आहेत.

  बायनरी ऐवजी या प्रकारचे भाकीत असेल हेही मी माझ्या प्रतिसादात गृहीत धरले आहे. पण नेदरलँड जिंकेल की नाही.. आणि ३२/३६ च काय पण २५० देशांपैकी नेदरलँडच जिंकेल ही शक्यता पन्नास टक्के याचा अर्थ काय ? अशा प्रकारची शक्यता टक्के या मेट्रिकने कशी व्यक्त होईल? शेवटी कितीही देश असोत. त्यातून नेदरलँडच जिंकेल याची शक्यता ही खालील प्रकारे बायनरीच असते. 

 

शक्यता १: नेदरलँड जिंकेल..

 

शक्यता २: नेदरलँड सोडून कोणीतरी अन्य जिंकेल..

 

 

आता उडवा नाणे.