Skip to main content

डोळ्यांनी फळे खावित का?

लेखक स्वधर्म यांनी गुरुवार, 30/09/2021 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या डाळिंबांच्या बागेत आलेली ही फळे: फळे ही फळे ‘भगवा’ या वाणाची असून गेल्या दोन वर्षात, कसलेही रासायनिक खत न घातलेल्या आणि कोणतेही किटकनाशक न फवारलेल्या झाडांना आलेली आहेत. आमच्या सेंद्रीय शेती अभ्यास गटातील मित्र - मार्गदर्शकास जेव्हा चार फळे खाऊन बघण्यासाठी पाठवली, तेंव्हा त्यांना ती छान वाटली. खरे सांगायचे तर आतले दाणे चांगले डाळिंबी असले, तरी ती दिसायला अजिबात सुंदर नाहीत, आणि खूप खूप गोड नाहीत. मी जेव्हा मित्राला असे विचारले, तेंव्हा त्यांचे म्हणणे होते, की फळाची नैसर्गिक चव तशीच असते. ज्यांना गोडच गोड फळ खायचे आहे, त्यांनी सरळ साखर खावी ना! तसेच छाटणी घेतली असली तरी शक्यतो नैसर्गिक पध्दतीने वाढवल्यामुळे, झाडावर एकदमच सगळी फळे न येता, वेगवेगळ्या अवस्थेतील फळे एकाच वेळी दिसत आहेत. त्यामुळे बाग एकदम व्यापार्याला देणे शक्य नाही कारण त्यांना एकदम टेंम्पोभरून मालाचा सौदा करायचा असतो. त्या ऐवजी ती आठवड्यातून दोनदा तोडून महिना दोन महिने विकत रहावे लागेल. ते तसे कटकटीचे आहे आणि त्यासाठी त्या पध्दतीने काम करणारा माणूस/ तोडून नेणारा विक्रेता मिळाला पाहिजे. पण सर्वात महत्वाचे म्हणजे, आजूबाजूच्या शेतकर्यांनी जेव्हा ही फळे पाहिली, तेव्हा ‘हॅSSS! ही डाळिंबं कोण घेणार?’ अशी उस्फूर्त प्रतिक्रिया आली. एक दोघांना तोडण्यासाठी विचारले, तर त्यांनीही काही उत्साह दाखवला नाही. तसेच इतरही काही लॉजिस्टिक समस्या आहेत. परिणामी या वर्षी आंम्ही बाग काढण्याचा निर्णय घेत आहोत. डाळिंबांचा प्रयोग फारसा यशस्वी झाला नसला, तरी आमचा दुसरा प्रयोग बर्यापैकी यशस्वी झाला आहे. लवकरच त्याविषयी लिहिण्याचा विचार आहे. **** अशाच एका शहरातील भाजी बाजार, वेळ संध्याकाळची, गर्दीची. एक सुशिक्षित, मध्यमवर्गीय बाई भाजी घेत घेत एका भाजीवालीजवळ आल्या. तिच्याकडे फुलकोबी (फ्लॉवर) होता, आणि बाईंना तो घ्यायचा होता. पण भाजीवालीकडे दोन वेगवेगळे ढीग होते. एकात मोठ्ठे पांढरेशुभ्र फुलकोबीचे टवटवीत गड्डे होते ८० रु. किलो. तर दुसऱ्या ढिगात थोडे लहान गड्डे होते ६० रु. किलो. बाईंनी दोन्ही ढिगातील भाजी नीट निरखून पाहिली. लहान गड्ड्यांच्या ढिगात त्यांना काही ठिकाणी एखाद् दुसरी अळीसुध्दा फिरताना दिसली. बाईंनी निवडून पण ६० रु. किलोच्या लहान गड्डे  असलेल्या ढिगातील भाजी अर्धा किलो घेतली. हे पाहून भाजीवालीला आश्र्चर्य वाटले. न रहावून तिने विचारले, "ताई, तुंम्ही तर थोडा जास्त दर परवडणार्या व चांगल्या शिकलेल्या वाटता. मग फक्त १० रुपयांसाठी तुंम्ही अळ्या असलेली भाजी का घेतली?" बाई म्हणाल्या, "या ६० रुपये किलोवाल्या फुलकोबीवर अळी आहे, याचाच अर्थ ही भाजी खाऊन ती जगली आहे. दुसऱ्या मोठ्या, टवटवीत फुलकोबी वर तर एकही जीवजंतू दिसत नाही. नक्कीच त्यावर कीटकनाशक फवारले असावे. मग ज्यावर जीवजंतू जगलेच नाहीत, ती भाजी खाऊन माणूस तरी कसा निरोगी जगेल?" **** झळझळीत रंग असलेली, मोठ्ठी फळे डोळ्यांना आकर्षक वाटतात. खासकरून रासायनिक खते घातल्यावर पिकाला भरपूर पाणीही द्यावे लागते. फळे उत्तम पोसल्यासारखी दिसतात. फळांमध्ये पाण्याचा अंशही जास्ती राहतो. त्यामुळे अशी भाजी व फळे दिसायला टवटवीत, चमकदार दिसतात. पण ती फोपशी असतात. जोडीला किटकनाशके फवारली असतील तर त्यावर कीटक, माशा, अळ्या दिसत नाहीत. पण विचार करा, जे इतर जीवजंतूंसाठी घातक आहे, ते मानवी पचनसंस्थेसाठी देखिल घातकच असणार नाही का? आत्ता लगेच नाही, तरी दिर्घकाळ सेवनाने तरी त्याचा परिणाम भोगावाच लागणार. मी स्वत: पुण्याच्या फुले मंडईत पालेभाजीच्या ढिगावर हिरव्या शेडचे आणि गाजराच्या ढिगावर तांबड्या शेडचे दिवे लावून बसलेले विक्रेते पाहिले आहेत. म्हणून भाजी व फळे आपण डोळ्यांनी खात असू तर लवकरात लवकर ती सवय बदलली पाहिजे. काय भुललासि वरलिया रंगा | ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा || असे संत चोखामेळा उगीच नाही म्हणून गेले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 33268
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

In reply to by Rajesh188

सर्रास रासायनिक खत विनाकारण दिल्या मुळे,जास्त प्रमाणात दिल्या मुळे त्याचे विपरीत परिणाम होतात. हा दोष रासायनिक खतांचा नसून शेतकऱ्यांचा आहे. पण कोणी शेतकऱ्यांना काही बोलायचे नाही कारण तो "बळीराजा" आहे आणि स्वतःला "अन्नदाता" म्हणवतो. SOIL HEALTH CARD किंवा मृदा आरोग्य आलेख काय आहे जमीन आणि पाणी चाचणी प्रयोगशाळा Soil & Water Testing Laboratoryकाय आहे हे एकदा वाचून पहा. आपल्या जमिनीत आणि पाण्यात कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे आणि कोणती अन्नद्रव्ये अतिरिक्त आहेत याचे विश्लेषण करून कोणत्या प्रकारचे पीक घ्यायचे आणि कोणत्या तर्हेची खते द्यायची याचा शास्त्रीय अभ्यास आहे. पण शेती तज्ज्ञांना शेतीत काय कळते? त्यांनी कधी हात काळे केले आहेत? असा सूर लावणारे बहुसंख्य शेतकरी सर्वत्र आढळतात ( अगदी मिपावर सुद्धा). बाकी चालू द्या.

In reply to by सुबोध खरे

माती चे परीक्षण करणे,लोकांस मार्ग दर्शन करणे ह्या साठी शेती खाते असते जुन्या सरकार नी काम उत्तम केले आहे आणि करत होते. शेती अधिकारी त्या साठी नेमला जायचं.आता शेती अधिकारी कुठे दिसत नाही. जेव्हा रासायनिक खत आली तेव्हा ती कशी द्यायचे ह्याचे मार्गदर्शन सरकार नी केले होते. काही खत ही झाडाच्या मुळाशी च चिमुटभर दिली जायची तीच पद्धत होती. हरित क्रांती च्या वेळी सरकार नी उत्तम यंत्रणा राबवल्या होत्या. खरे साहेबाना शेतकऱ्या विषयी प्रचंड तिरस्कार आहे असे त्यांच्या अनेक कॉमेंट मधून दिसून येतो. सर्वसामान्य व्यक्ती आहे हो शेतकरी त्याचा तिरस्कार करू नका.. पाण्या मुळे शेतजमिनीत क्षार वाढतात ती नापीक होते असे मला तरी वाटत नाही. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात किंवा नदी किनारी पावसाळी काळात तीन तीन महिने जमीन पाण्याखाली असते पण ती नापीक झालेली मी तरी अजुन पहिली नाही. लावणीचे भात किती शतके जमिनीत घेतले जाते . लावणीच्या भातच्या शेती मध्ये जमीन पाण्याखाली असते ती नापीक झालेली मी तरी बघितली नाही. उसाला जास्त पाणी लागते त्याची बचत करण्यासाठी ठीपक सिंचन वापरावे ही सूचना योग्य आहे लोक वापरू पण लागली आहेत. खतांचा योग्य वापर,कीटक नाशकांचा योग्य वापर ह्या विषयी सरकारी पातळीवर प्रचार करावा माहिती द्यावी..

In reply to by Rajesh188

आपण डोकं वापरायचाच नाही आणि बेफाट काही तरी बडबड करायची असा पणच घेतलाय का आपण? मी शेतकऱ्यांचा तिरस्कार करतो असे आपले पूर्वग्रहदूषित मत आहे त्याला माझा नाईलाज आहे. शेतकरी हा

अन्नदाता नसून तो अन्न उत्पादक

आहे असे मी अनेक वेळेस सप्रमाण लिहिलेले आहे.

( अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांबद्दल लिहिल्यास या न्यायाने शिंपी सुद्धा वस्त्रदाता असायला हवा आणि बिल्डर सुद्धा निवारा दाता )

पाण्या मुळे शेतजमिनीत क्षार वाढतात ती नापीक होते असे मी कुठेही लिहिलेले नाही उगाच नको ते आरोप करण्यापूर्वी किमान थोडा तरी विचार करत जा.

In reply to by Rajesh188

माती चे परीक्षण करणे,लोकांस मार्ग दर्शन करणे ह्या साठी शेती खाते असते जुन्या सरकार नी काम उत्तम केले आहे आणि करत होते. शेती अधिकारी त्या साठी नेमला जायचं.आता शेती अधिकारी कुठे दिसत नाही.

कोणताही धागा असेल तरी त्यात राजकारण आणून विचकाच करायचा विडाच उचलला आहे का आपण?


जमीन सजीव असते. जमिनीच्या एक घनफूट मातीत कोट्यवधी जीवाणू, बुरशी आणि बॅक्टेरिया असतात. त्यामुळेच जमीन सजीव आणि सुपीक बनते. रासायनिक खतांनी जमीन सुपीक बनत नाही तर सुपीक जमिनीतील अन्नद्रव्ये उचलायला मदत करतात. अशा प्रकारे जम‌िनीतून अधिकची अन्नद्रव्ये उचलली जातात तेव्हा जमीन निकस आणि निर्जीव बनत जाते. आजची शेतीची समस्याही निर्जीव किंवा मृत जमिनीने उद््भवलेली समस्या आहे. डिटेल मध्ये सांगायचे झाले तर खूप मोठी पोस्ट होईल.

In reply to by Rajesh188

मला अजूनही कळलं नाही. जमिनीतले NPK सततच्या वापराने नष्ट होतात म्हणून ते बाहेरून (उदाहरणार्थ युरिया) दिले जातात. रासायनिक खते जमिनीला सुपीक बनवतात आणि म्हणून तर पिके भरघोस येतात. "रासायनिक खतांनी जमीन सुपीक बनत नाही तर सुपीक जमिनीतील अन्नद्रव्ये उचलायला मदत करतात" म्हणजे?

दाळिंबाचे काही बायप्रॉडक्ट वाले मिळू शकतील का? अनारज्यूस वगैरे वाले. त्यांना दाळिंब कसे दिसते पेक्षा कसे लागते हे महत्त्वाचे असते. काही वर्षापूर्वी माझ्या नात्यातल्या एका मुलीने दाळिंबाची वाईन तिच्या कॉलेज प्रकल्पाअंतर्गत तयार केलेलि होती. पोमोग्रॅनेटा नावाने. त्याचे खूप कौतुक झालेले होते. एका यशस्वी व धनाढ्य दाळींब उत्पादकाने तो प्रोजेक्ट अभ्यासायला मागितला होता पण पुढे काही प्रगती झाली नाही त्याची. त्याची पैसे द्यायची तयारी नव्हती आणि मुलीला फुकट प्रोजेक्ट द्यायचा नव्हता. तसे कूणी उत्पादन करणारे आहेत का बघू शकता.

In reply to by सुरिया

धन्यवाद. आता आंम्ही नाईलाजाने डाळिंबाची बाग काढली आहे. बरेच निर्णय चुकीचे झालेत पण ती शिकण्याची किंमत आहे. सध्या तरी खर्च निघून कुटुंबाला खायला विषमुक्त अन्न मिळावे इतकाच उद्देश आहे. सर्व अन्न नव्हे, तर मुख्य धान्ये, कडधान्ये व तेलबीया, इतकेच आळीपाळीने करायचा विचार आहे. शेती हा धंदा म्हणून फार अवघड गोष्ट आहे, हे समजलेले आहे. मात्र जे पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहेत, त्यांची अवस्था बिकट आहे.

छोटेखानी लेख आवडला 👍 मी पण गेली तीन-चार वर्षे आवड म्हणून सैन्द्रीय पद्धतीने फळझाडे वाढवण्याचा प्रयत्न करत आहे पण १६ पैकी ४ नारळ (प्रताप), एक पेरू (लखनौ) आणि एक पपई (तैवान) सोडली तर आवळा, जांभूळ, बोर, जाम (लाल आणि सफेद), लिंबू आणि डाळिंब ह्यांची) वाढ फार काही समाधान कारक वाटत नाहीये. अर्थात हौस म्हणून वेळ मिळेल तसे तिकडे लक्ष देता येते. पण असमाधानकारक वाढ बघून आता त्यांना रासायनिक खत देण्याचे विचार डोक्यात यायला लागलेत, जे खरतर मला पटत नाहीये.

In reply to by टर्मीनेटर

आवळा आणि जांभूळ तर असेच चांगले फुलते आणि फळते पण .तुम्ही कोणत्या जाती निवडल्या आहेत त्याची एकदा समीक्षा करा. माझ्या दारात लिंबाचे झाड आहे खत ,कीटक नाशक ह्यांचा कधीच वापर केला नाही. मदत झाड जोमाने डुलत असते आणि वर्ष भर लिंब असतात. जांभळी ची मोठ मोठी झाड आमच्या गावात आहेत. बाह्य सपोर्ट ची त्यांना बिलकुल गरज नाही. चिंच खूप मोठमोठी झाड आहेत दर वर्षी फुलतात आणि फळतात पण.

In reply to by Rajesh188

थोडे दिवस वाट बघा
ठीक आहे. मार्च पर्यत वाट बघतो, नाही काही प्रगती दिसली तर मात्र नाईलाजाने रासायनिक खाते वापरावी लागतील. धन्यवाद.