कै. मुरलीधर शिंगोटे आणि नाडी ग्रंथ भविष्य
कै. मुरलीधर शिंगोटे आणि नाडी ग्रंथ भविष्य
आज श्री मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनाची बातमी वाचली आणि काही स्मृती जाग्रृत झाल्या. तो १९९६च्या मे महिना असावा. मला तांबरमहूनश्रीनगरच्या हवाईतळावर कामाला रुजु होऊन २ महिने झाले असावेत. त्या काळातील रजेच्या दरम्यान मी मुंबईच्या फोर्ट विभागातून फिरत होतो. दुपारची वेळ. घामाच्या धारा लागल्या म्हणून व्हीटीच्या स्टेशन बाहेरील थंडगार पेय विक्रेत्याला खट्टामीठा बनवायला सांगून फुटपाथवर विकायला आलेल्या काही सांज दैनिकांकडे माझे लक्ष दिले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कुठल्याशा पत्रकांतील लेखनावरून दिलेल्या ८ रकान्याच्या बातमीकडे माझे लक्ष गेले. तो होता आपला वार्ताहरचा अंक. काहीतरी भडक लिहून विक्री वाढवायच्या लंगोटीपत्रकारितेच्या अशा तंत्रांमुळे मी प्रथम दर्शनी दुर्लक्ष केले. थंडपेयाचा आस्वाद घेता घेता तो अंक चाळला. संपादकीयातील लेखावर धावती नजर टाकून त्यातील शब्द कोड्याच्या पानावर जावे म्हणून लेख वाचायला लागलो. अंनिसला खरपुस भाषेत फैलावर घेणारा तो एक अग्रलेख होता. तेंव्हा त्यातील तडाखेबंद भाषेत, दाभोळकरांच्या कुठल्याशा वक्तव्यावर अग्रलेखातून केलेल्या चिरफाडीने त्यांना अक्षरशः उघडे पाडले होते. युक्तिवाद बिनतोड होता. प्रा. अद्वयानंद गळतगे सरांच्या शिवाय नाडी ग्रंथांच्या अदभूततेच्या बाजूने व अंनिसच्या खोट्या व कांगावखोर लेखनाविरुद्ध लिहिणारे त्याकाळात कोणी नव्हते. त्यांच्या लेखनाच्या तोडीचे या संपादकीयातील लेखन वाचून मला मुरलीधर शिंगोटे यांचा संपादक म्हणून एकदम आदर वाटला. या व्यक्तीला भेटायची इच्छा जागृत झाली. निदान त्यांना नाडी भविष्यावरील लेखनातून अंनिसने नाडी ग्रंथांचा अनुभव न घेता केलेला विपर्यास त्यांच्या कानावर घालावा असे वाटून मी लालबागमधील त्या पत्यावर पोहोचलो. एका गच्चीवजा भागात अस्ताव्यस्त पडलेल्या दैनंदिन पेपर्सचे गठ्ठे, बराचसा रद्दीचा कचरा यावरून मी योग्य ठिकाणी पोचल्याचे लक्षात आले. एका काम करणाऱ्याला ‘मुरलीधर शिंगोटेंना भेटायचे आहे’. म्हटल्यावर, ‘ते काय’ म्हणून एका शिडशिडीत उंच व्यक्ती कडे बोट दाखवले. डोक्यावर पांढरी गांधी टोपी, झब्बा, चुरगाळलेली विजार असा वेशातील व्यक्तीने मला विचारले, ‘मीच शिंगोटे, काय काम आहे?’ मनात मला निराशा वाटली. असा माणूस संपादकीयातील पल्लेदार लेखन करेल का? असा उगीचच विचार डोकावला. मी ओळखपत्र हातात देत म्हटले की आपल्या आजच्या अंकातील संपादकीय वाचून आपण कोण? म्हणून पहायला आलोय. ‘अस्स होय!’ म्हणून त्यांनी एका खोलीकडे बोट दाखवून म्हटले, ‘ते आमच्या भाऊने लिहिलेय. मी नाही!’ आणि आपल्या कामात ते गढले. मी खोलीत गेलो. एक घामट चेहऱ्याचे, चष्मेवाले ग्रहस्थ म्हणाले, ‘हो, तो लेख मीच लिहिला आहे’. ते होते भाऊ तोरसेकर!... त्यांचे अभिनंदन करायला, माझ्यासारख्या हवाईदलातील व्यक्तीने दुरून कुतुहलाने मुद्दाम भेटायला आलेल्या जागृत वाचकाला त्यांचे ते लेखन आवडल्याचे बोल ऐकून फारसा आनंदी चेहरा न करता म्हणाले, ‘अंनिसचे विचार मला पटत नाहीत तेंव्हा मी त्यावर लिहितो’. मी नाडी भविष्य नावाचे पुस्तक लिहिल्यावर त्यातील ‘चमत्कार’ शब्दाने आकृष्ठ होऊन माझ्यावर टीका करायचे सत्र *दाभोळकरांच्या चेल्यांनी सुरू केले आहे. याची माहिती आपल्याला नसेल तर ती द्यावी म्हणून आपल्याला भेटायला आलो आहे. म्हटल्यावर ‘बर’ म्हणून उरलेला गार चहा संपवत म्हणाले, ‘मी लेखन करत आहे. त्यात व्यत्यय आलेला मला आवडत नाही. माफ करा’. म्हणून पेन सरसावून ते लिहायला गढले! ‘काय म्हणतात आमचे भाऊ? असे विचारत मुरलीधर शिंगोटे मला आपले काम करत विचारते झाले. ते पानाचा ले आऊट आपल्या पद्धतीने लावत असताना माझ्याकडे न बघता बोलत होते. दुपारचा सार्वजनिक चहा आल्यावर, ‘घ्या’ म्हणून त्यांनी सवड काढून मला बोलते केले. ‘अस्सं’? , ‘मला माहित नाही!’, ‘ते काय असत?’ म्हणून नाडी भविष्याच्या विषयात कुतुहल दाखवले. ‘अरे तिच्या!’, ‘बर, ते का म्हणतात नाही म्हणून?” उत्सुकता दाखवून पुढे म्हणाले, ‘पुस्तक आहे तुमचे?’ मी हातात एक प्रत ठेवली. त्यांनी त्याची पाने किती, प्रकाशक कोण वगैर पाहून म्हटले हे पुस्तक छापून काढू का ? मला समजावत ते म्हणाले, ‘यातला मजकूर रोज थोडा थोडा करून छापू का मी?’ मी थोडा चक्रावून गेलो! कारण अशी छापून काढायची शक्कल असू शकते यावर मी कधी विचार देखील केला नव्हता! ‘बघा, ठरवा मग कळवा’. म्हणून ती प्रत त्यांनी माझ्या हातात परत देत म्हटले. पटकन ठरवून मी म्हटले, ‘हो चालेल छापा’. ‘तुमच्या पेपरचे सर्क्यूलेशन किती?’ ते म्हणाले, ‘दोन्ही रेल्वेच्या बुकस्टॉलवर आणि उपनगरातले किरकोळ विकणाऱ्यांकडून ते वाचले जाते. मीच वितरक आहे’. चहा संपला. ‘अरे ती बातमी खाली घे. एक मोठी जागा सोड बर का, त्यांनी माझे पुस्तक पुन्हा हातात घेत अंदाजाने जागापण ठरवली होती! ती माझी त्यांची भेट! नंतर मला श्रीनगरला मुंबईच्या विविध भागातून लोकांची पत्रे यायला लागली. ‘तुमचे लेख वाचून उत्सुकता लागली आहे’. काहींनी ‘सगळी थापेबाजी वाटते बुवा’, ‘असे अंगठ्याच्या ठशावरून कोणी भविष्य सांगणे शक्य नाही!’. अशी उलट सुलट मते व्यक्त करणारी पोस्ट कार्डे, आंतरदेशीय अधूनमधून येत राहिली. ते धारावाहिक प्रकाशन केंव्हा छापून संपले ते कळले नाही. मानधनाबद्दल प्रश्नच नव्हता. पण माझ्या अंदाजाने विरार ते चर्चगेट, कसारा, कल्याण, कर्जत ते व्हीटी संपूर्ण लोकलच्या पट्ट्यात ‘नाडी भविष्य’ म्हणून काही असते याची तोंड ओळख जरूर झाली असावी. मधे बरीच वर्षे लोटली. तोवर मी पुण्यात पोस्टींगला आलो होतो. एकदा अप्पा बळवंत चौकातील खरेंच्या पेपर एजन्सी दुकानात बोलत असताना त्यांच्या नोकरांपैकी कोणी माझे नाव ऐकून खऱ्यांना म्हणाले, ‘अहो ते नाडी भविष्याच्या पुस्तकाचे काही गठ्ठे माळ्यावर आहेत ते त्यांना परत करा’. मला आश्चर्य वाटले. सप्टेंबर १९९४ मधे या पुस्तकाच्या ५००० कॉपीज पैकी ४५०० कॉपीज खऱ्यांनी आपल्या टेंपोतून विकायला नेल्या होत्या. त्याचे विक्रीचे पैसे ड्राफ्टने रीतसर पाठवले होते. आता या प्रती कुठल्या? व किती? ते पाहून कळवतो दोन दिवसात म्हणून ते म्हणाले. मला थोडा धक्का बसला होता. आता इतक्या प्रती मी नेणार कशा? व ठेवणार कुठे? तिथून बाहेर पडलो, पायी चालता चालता प्रभात टॉकीज जवळ थबकलो. तिथे शिंगोटे यांचे एक ऑफिस होते. कोणी नातेवाईक ते चालवत होता. त्याला विचारले की मुरलीधरजी सध्या कुठे असतात वगैरे त्यावेळी मनांत या उरलेल्या प्रतींबद्दल काही नव्हते. ते फोनवरून बोलले. इतक्या वर्षांनी देखील ते म्हणाले, ‘हो आठवतेय, तुम्ही मला भेटला होतात वगैरे, आता नविन काही लिहिलेय का?’ वगैरे. मी सहज बोलून गेलो, ‘ हो आता नाडी भविष्यावर इंग्रजी, हिंदी, गुजराथीत पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. वगैरे….’ मी सहज त्यांना म्हटले की अशा काही जुन्या आवृत्तीच्या प्रती आहेत त्यांचे वितरण कसे करावे याची काळजी आहे. ‘हो का? मग द्या की पाठवून जितक्या जातील तेवढ्या विकू.’ असे म्हणून त्यांनी त्यांच्या मॅनेजर नातलगाला सांगून त्या जवळजवळ ७ शे प्रती दिल्या, ज्या मी नंतर खरेंकडून रिक्षात घालून त्यांच्याकडे पाठवल्या. नंतर त्या त्यांच्या पद्धतीने विकल्या गेल्या. मी कधी किती पैसे झाले वगैरे विचाराच्या फंदात पडलो नाही. माझ्यासाठी त्या कोणाच्या तरी हाती वाचायला मिळाल्या याचे समाधान जास्त होते. पुढे जंगली महाराज रस्त्यावर पुण्यानगरीचे ऑफिसात मी त्यांना भेटले होतो. आता ते सफारी पोषाखात भेटले. मी त्यांना त्यांच्या तमिळ पेपरातील डीटीपीचे काम करणाऱ्या टायपिस्ट लोकांकडून नाडी ग्रंथांवर आम्ही तयार केलेल्या डेटा बँक प्रोग्राममधील डेटा टाईप करून हवा आहे. त्यासाठी मदत मागितली. ते म्हणाले, ‘आमच्या तमिळवाल्या संपादकांशी बोला. मी सांगितले आहे काम करायला म्हणून सांगा’. अर्थात मी तसे केले पण त्यातले तमिळ टायपिंग साध्या टायपिंग प्रमाणे नसल्याने अनेकांनी जसा नकार दिला तसेच झाले. असो. नंतर एकदा सहज फोनवरून बोललो होतो. तेंव्हा ते जुन्नरकडे गावात जास्त वेळ असतात असे कळले. मग पुन्हा भेट झाली नाही... ------प्रतिपक्ष वरून भाऊ तोरसेकरांनी अक्षरशत्रू संपादक या शीर्षकाने त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला म्हणून मला ही स्मृती श्रद्धांजली लिहायला प्रेरणा मिळाली.
*तेंव्हा डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी नाडी भविष्यावरून मला लक्ष्य करून काही लेख प्रकाशित केले होते.
वाचने
5326
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
सुरेख शब्द चित्र.
In reply to सुरेख शब्द चित्र. by Jayant Naik
शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा
In reply to शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा by शाम भागवत
नशा असावी तर अशी!
In reply to सुरेख शब्द चित्र. by Jayant Naik
आणखी हे थोडेसे.
कै. मुरलीधर शिंगोटे यांना श्रद्धांजली !!
अक्षरशत्रू संपादक ची लिंक भलतीच निघाली!