मलमूत्र व संस्कृती
लेखनप्रकार
चौगुले साहेबांच्या विनोदांना उडवण्यावरून मोठी धुळवड झाली आणि वातावरण तंग झाले. अनेकांनी तर त्यांना मलमूत्र ही गलिच्छ वस्तू आहे हे समजू लागल्यापासून मलमूत्र विसर्जनच कायमचे बंद करून टाकले आहे की काय अशी शंकाही माझ्या मनाला चाटून गेली. कित्येकांनी व्यक्तिगत निरोपाद्वारे चौकशी करून चौगुल्यांचे तथाकथित ओंगळ लेखन तुम्हाला कसे आवडते हा प्रश्न केला? मी जबाबदारीने वागावे व उगाच ट ला ट जोडू नये अशीही आगंतुक सूचना झाली.
पण हा प्रसंग व काही दिवसांपूर्वी वाचलेले लेख यांच्या घुसळणीतूनच मनात काही विचार आले.
फार दिवसांपूर्वी वाचलेल्या एका कथेतील काही भाग आठवतो.
आफ्रिकेतील एका विशिष्ट आदिवासी जमातीच्या तावडीत एक तथाकथित, सुसंस्कृत शहरी तरूण सापडतो. दुर्दैवाने त्याच दिवशी त्या जमातीतील एक व्यक्ती मृत झालेली असते. सहज कुतूहल म्हणून एक आदिवासी तरूण त्या शहरी तरूणाला सुसंस्कृत समाजातील अंत्यसंस्कारांबद्दल विचारतो. शहरी तरूण मोठ्या अभिमानाने दहनविधी, दशक्रिया, दशक्रियेची बुंदी, वरण भात व श्राद्ध, पितृपंधरवडा वगैरे सांगतो. मात्र दहनविधीबद्दल ऐकल्यावर आदिवासी तरूण संतापून म्हणतो, मोठेच कृतघ्न लोक आहात तुम्ही. संपूर्ण आयुष्यभर तुम्हाला साथसंगत करणार्या व्यक्तीला तुम्ही निर्दयपणे जाळून टाकता. आम्ही पहा, मृत झालेल्या व्यक्तीचे मांस आम्ही पुरवून पुरवून खातो. जेणे करून त्याच्या शरीरातील सर्व मूलद्रव्ये आमच्याच शरीरात सामावून जातील. शहरी तरूणाला ढवळूनच आले.
पुढची कथा आठवत नाही पण कथेचा एकंदर आशय संस्कृतींमधील, विचारांमधील फरकांबाबत होता.
आता एक वैयक्तिक अनुभव. गोष्ट बर्याच दिवसांपूर्वीची आहे. काही सुटीनिमित्त मी गावाकडून माझ्या एका नातेवाईकाकडे पुण्यात आलो होतो. "ज्युरासिक पार्क" चित्रपट बघण्याचे ठरले. चित्रपटाला गेलो तर गोर्या, घार्या मुली बघून खूप बुजून गेलो. गावाकडून आलो असल्याने उच्चारांची, स्वत:च्या गबाळेपणाची लाज वाटत होती. थेटरात गार गार बसल्यावर अंधार झाला तेव्हा बरे वाटले. चित्रपटात एक दृश्य आहे, एका आजारी डायनासोरच्या रोगाचे निदान करण्यासाठी आलेली चित्रपट नायिका विष्ठेच्या एका ढिगार्यात सरळ हात खुपसते. ते दृश्य सुरु असतानाच थेटरातून शी... ई... वगैरे तीव्र किचाळ्या सुरू झाल्या. मला मात्र फारसे वाईट वाटले नाही. तरीही लाजेकाजेस्तव मी देखील तोंड वाकडे केले.
मला वाईट वाटले नाही याचे कारण खरे तर वेगळेच होते. लहानपणी माझे घर कुंभारवाड्याच्या जवळ होते. घराच्या परिसरात गाढवे, कुत्री मुक्तपणाने तथाकथित घाण करत फिरत असत. आम्ही तेथेच खेळत असू. बर्याच मित्रांची शेतीवाडी होती. त्यांच्या घरातली बायामाणसे शेणाच्या गोवर्या थापत असत. त्यामुळे मलमूत्राविषयी शहरी लोकांना वाटणारी घृणा मनातून मला तितकीशी वाटत नसली तरी स्वत:ची मते ठाम व्यक्त करण्याइतके धैर्य व आत्मविश्वास तेव्हा नव्हता. मात्र माझे थोडेसे वाचन झाले. आयुष्यात काही चांगली पुस्तके वाचनात आली नसती तर मीदेखील अशी घृणा व्यक्त केली असती कदाचित.
अभय बंगांचे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, "माझा साक्षात्कारी हृदयरोग". बहुतेकांनी ते वाचले असेलच. वाचले नसेल तर अवश्य वाचा हा एक अनाहूत सल्ला. पुस्तकात आहाराविषयी माहिती देताना, "फायबर" ऊर्फ तंतूमय पदार्थांविषयी त्यांनी विस्ताराने लिहिले आहे. मानवी जीवनशैलीतील बदल, सभ्यतांमधील फरक, अन्नपदार्थांमध्ये झालेली क्रांती आणि मानवावर या सर्वांचा झालेला परिणाम याचा सर्वात मोठा आरसा म्हणजे विष्ठा. विनोबांनी तर उत्तम आरोग्यासाठी एक महत्त्वाचा मंत्र दिला आहे. "प्रभाते मलदर्शनम". सकाळी उठून शौचाला जावं आणि आपल्या मलाचे नीट निरीक्षण करावं. तुमचे आरोग्य कसे आहे हे तुमचे तुम्हालाच समजेल.
अनिल अवचटांच्या घरात नवीन जन्म झाल्यानंतर बाळाची शी कुणी धुवायची असा प्रश्न आला तर अवचटांनी चुटकीसरशी तो प्रश्न सोडून टाकला. शी म्हणजे काय, तर तो एक पदार्थ आहे, त्याला रंग आहे, वास आहे. पण हात धुवून टाकले की आपण पुन्हा स्वच्छ होतो.
इतके कशाला इथल्या सर्वांच्या प्रात:स्मरणीय भाईकाकांनीही "संडास" आणि संस्कार यांचे संबंध स्पष्ट करण्यासाठी वेगळा लेखच लिहिला आहे.
अगदी संस्कृती संस्कृती म्हणून आपण जो गळा काढतो त्यातही सडासंमार्जन करताना घर-अंगण शेणाने सारवण्याची पद्धत आहे. तुम्ही म्हणाल गोमूत्र, गोमय या तर पवित्र गोष्टी. पण कुंभारवाड्याजवळच्या माझ्या वास्तव्यातून आठवलं. माठातलं गार पाणी, मडक्यातलं घट्ट दही म्हणून जे आपण गदगदून भावशिंकरतो, ते मडके भाजताना त्याला योग्य छिद्रे पडावीत म्हणून मातीमध्ये गाढवाची लीद मिसळणे आवश्यक असते. गाव सोडून दहा वर्षे होत आली पण कधी ट्रेकला वगैरे गेलो की भिंतींसकट जमीन सारवलेली एखादी झोपडी किंवा मंदिर मिळाले की खूप छान झोप लागते याचे कारण कदाचित माझे बालपणच असावे.
एक प्रश्न असाही मनात येतो की आपल्याला एखादी गोष्ट ओंगळ वाटते म्हणजे नक्की काय? जगभरात सर्वत्र मलमूत्र, रक्तमांस, मृतदेह यांच्याशी व्यवसायानिमित्त संबंध येणार्या समाजाच्या उतरंडीतील खालच्या श्रेणीच्या लोकांनाही ओंगळ समजण्याची प्रथा या स्वच्छतेच्या कल्पनांनीच झाली असावी का?. सध्या एक पुस्तक वाचत आहे. त्यात जपानमधील दलितांविषयी लिहिले आहे. जपानमधील समाजव्यवस्था आणि भारतीय समाजव्यवस्था यातील साम्य अगदीच धक्कादायक नाही कारण भारतात जन्मलेला बौद्ध धर्मच जपानमध्ये लोकप्रिय आहे. मात्र याच बौद्धधर्माने जिथे भारतात दलितांना ताठ कण्याने उभे राहण्याची संधी दिली तिथे जपानमध्ये जातींना एका व्यवस्थेचे स्वरूप मिळवून दिले हे मात्र अचंबित करणारे आहे.
पण एकदा मलमूत्र ओंगळ ठरवले की कामे करताना त्याच्याशी संबंध येणारे भंगीही ओंगळ असा हा सगळा प्रकार तिथेही आहे. मग अशा लोकांनी मंदिरात प्रवेश केला की त्याचा विटाळ होतो आणि ते पवित्र करण्यासाठी गोमूत्र व शेण वापरले जाते!
आपल्याच शरीरातून बाहेर पडणारा एक पदार्थ ओंगळ वाटून त्यावर संस्कृतीच्या, सभ्यतेच्या, सार्वजनिक लेखनाच्या कल्पना ठरवणार्यांनी आपली विचारसरणी खरेच खुली आहे का हे तपासणे आवश्यक आहे. एकदा आरशात पहा आपल्या टकलावरही एखादी अदृष्य शेंडी दिसेल.
वाचने
9551
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
:)
In reply to :) by विसोबा खेचर
हम्म
In reply to हम्म by आजानुकर्ण
तेच तर!
मलमूत्र हे ओंगळ नव्हे,पण तो विनोद नव्हता
In reply to मलमूत्र हे ओंगळ नव्हे,पण तो विनोद नव्हता by धनंजय
मान्य आहे
In reply to मान्य आहे by आजानुकर्ण
अवांतर
In reply to मान्य आहे by आजानुकर्ण
दुर्गंधाबाबत एक विचार
In reply to मान्य आहे by आजानुकर्ण
विचार करावा
In reply to मलमूत्र हे ओंगळ नव्हे,पण तो विनोद नव्हता by धनंजय
पटणारा प्रतिसाद
In reply to पटणारा प्रतिसाद by विकास
मॅच्युरिटी
In reply to मॅच्युरिटी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
+१
In reply to पटणारा प्रतिसाद by विकास
सहमत आहे
हो.बरोबर
गोमुत्र आणि शेण
रोचक लेख
सोनखत
एकदा मलमूत्र ओंगळ ठरवले की