Skip to main content

विश्वाचे आर्त - भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 08/12/2015 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - काळाचा आवाका http://www.misalpav.com/node/33974 भाग २ - नासदीय सूक्त http://www.misalpav.com/node/33987 भाग ३ - अस्तिस्तोत्र http://www.misalpav.com/node/34009 ---- कधी जन्मली पृथ्वी ? जमल्या निळ्या वायूच्या लगडी सलग कधी ? कधी अन् जडतेला त्या मनामनाचे आले पोत ? - बा. सी. मर्ढेकर ---- मर्ढेकरांचा हा प्रश्न कळीचा आहे. ‘काही नाही’ या अवस्थेपासून आपल्याला दिसणार्‍या या जगड्व्याळ विश्वाचा पसारा कसा निर्माण झाला? वायूच्या लगडी जमून त्यांची हवा, पाणी, जमीन तयार झाली याची एक वेळ कल्पना करता येते - साध्या भौतिक आणि रसायनशास्त्राच्या नियमांनी ते समजता येते. पण निर्जीव, अचेतन पदार्थांपासून हाडामांसाचे जीव आणि धडधडणारी हृदये कशी काय झाली? मर्ढेकरांनी ही कविता लिहून साठेकच वर्षे झाली असतील पण शतकांनुशतकांपासून मानवाला या प्रश्नाने झपाटलेले आहे. 'आपण का आहोत?' 'या सृष्टीचे कारण काय?' 'माझ्या जगण्याचे उद्दिष्ट काय?' यासारख्या असाध्य पण पाठ न सोडणाऱ्या प्रश्नांसाठी - विंदा करंदीकरांच्या शब्दांत ‘काही केल्या, काही केल्या न जाणाऱ्या निळ्या पक्ष्या’साठी - 'देव' हे एक सुबक सोपे उत्तर आहे. पण हे उत्तर म्हणजे अनुत्तराचा कळस आहे. "या सर्व रचनांचा अर्थ लावायचा असेल तर मला शरण या. मला असा जादूगार माहिती आहे जो या सर्व रचना केवळ एक कांडी फिरवून करू शकतो." म्हणजे आपल्याला पडलेले सर्व प्रश्न घाऊक पातळीवर एकाच सतरंजी खाली लपवता येतात. या सर्वाचे एकच उत्तर - विधात्याची मर्जी. भाषांतर - माहीत नाही, विचारू नका, आणि विचारही करू नका. पण एक महान अतिप्रश्न शिल्लक राहतोच - जर हे सर्व प्रश्न फेकून ज्या अत्त्युच्च शक्तीच्या भरोशावर फेकून द्यायचे, तर ती कशी निर्माण झाली? याचे उत्तर "ती आहेच". या उत्तराचा ‘फायदा’ असा की फक्त एकच प्रश्न अनुत्तरित राहतो. तेवढा एक सहन केला की बाकी सर्व प्रश्नांची उत्तरे ‘सोपी’ होतात. हे म्हणजे हजार हजारची दहा वेगवेगळी कर्जे विकून टाकून त्या बदल्यात पाच लाखाचे एकच कर्ज (वरचे पैसे न मिळवता!) कबूल करण्यासारखे आहे. पण मर्ढेकरांनी या ओळी लिहिल्या त्याच्या जवळपास शतकभर आधी या प्रश्नाचे उत्तर - निदान त्या उत्तराचा गाभा - एका शास्त्रज्ञाला सापडला होता. त्याचे नाव चार्ल्स डार्विन, आणि त्याने जे उत्तर दिले ते होते उत्क्रांतीवादाचे. एका नामवंत प्राणी शास्त्रज्ञाने म्हटले आहे "दुर्दैवाने उत्क्रांतीवादाचा प्रॉब्लेम असा आहे की तो आपल्याला कळला आहे असे सगळ्यांना वाटते." ते खरेही आहे. आपल्याला शाळेत शिकवल्यापैकी 'माकडापासून माणूस झाला' 'माणसाची शेपटी न वापरल्याने झिजून गेली' 'जिराफाची मान लांब झाली' 'सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट' 'समूहाच्या भल्यासाठी..' अशा तुकड्यापलिकडे फारसे काही लक्षात नसते. मानवाला सतावणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे त्यात आहेत हे तर कोणी सांगितलेलेही नसते. डार्विनच्या काळात प्राण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मुख्यत्वे मानवकेंद्रित होता. बायबलमधल्या विचारांचा त्या दृष्टिकोनावर मोठा पगडा होता. देवाने मानवासाठी ही सृष्टी बनवली, आणि त्याच्या सुखासाठी प्राणी, पक्षी, फुले, फळे, झाडे निर्माण केली. अर्थातच देवाने एकदा प्राणी बनवले की ते बदलतील कसे? घोडा हा घोडा राहाणार, माकड हे माकडच राहाणार. त्यांच्यात बदल होणे शक्य नाही. पण हे तितकेसे खरे नाही हे हळूहळू उघड होत होते. आता अस्तित्वात नसलेल्या पण एके काळी पृथ्वीवर वावरत असलेल्या प्राण्यांचे अवशेष सापडत होते. एकाच लांडग्यासारख्या प्रजातीपासून शेकडो प्रकारचे कुत्र्यांची माणसांनीच पैदास माणसांनी केलेली दिसत होती. डार्विन गॅलापेगोस बेटांवर गेलेला असताना 'केवळ याच बेटांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फिंच आणि इतर अनेक प्राणी निर्माण करण्यामागे देवाचा काय बरे हेतू असेल?' असा प्रश्न त्याला पडला. आणि अर्थातच या बेटांवर दिसणाऱ्या प्रजाती मुद्दामून वेगळ्या केलेल्या नसून, त्या त्या बेटावरच्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या आहेत - तेव्हा परिस्थितीप्रमाणे प्राणी बदलतात हे त्याच्यासाठी उघड झाले. पण परिस्थितीमुळे प्राण्यांचे गुणधर्म कसे ठरू शकतील? त्याचे उत्तर आहे प्राण्यांमध्ये होणाऱ्या जगण्यासाठीच्या स्पर्धेत. या स्पर्धेत टिकून राहाण्यासाठीचे गुणधर्म ज्या प्राण्याकडे अधिक असतात त्यांना अधिक संतती जोपासता येते, आणि ज्यांच्याकडे नसतात त्यांना कमी संतती होते. आईवडिलांचे गुण पुढच्या पिढीत उतरत असल्यामुळे हे गुणधर्म पुढच्या पिढीत अधिक संख्येने दिसतात, आणि ते गुणधर्म नसलेल्या प्राण्यांची संख्या कमी झालेली दिसते. हरणे पकडण्यासाठी चित्त्यांना त्यांचा पाठलाग करावा लागतो. अशा वेळी ज्या चित्त्यांचा पुरेसा वेग असतो अशांना अन्न मिळते, आणि त्यांना आपली पिलावळ जपता येते. ज्यांचा पुरेसा वेग नसतो त्यांना कमी अन्न मिळते, आणि त्यांना पुरेशी पिले जगवता येत नाहीत. दरम्यान हरणांच्या बाबतीतही हेच होते. अधिक वेगवान हरणे जगण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एखाद्या जंगलातली चित्त्यांची आणि हरणांची एक लाख वर्षांपूर्वीची पिढी आणि आजची पिढी यांच्या वेगाची तुलना केली तर आजची पिढी अधिक वेगवान असू शकते. थोडक्यात, हरणांमध्ये आणि चित्त्यांमध्ये बदल होण्यासाठी त्यांची परिस्थिती कारणीभूत ठरते. मात्र 'हे चित्ते वेगाने धावतात. आणि वेग वाढवणे चांगले आहे, तेव्हा यांना ठेवूया. आणि जे कमी वेगवान आहेत त्यांना मारून टाकूया' असे कोणी म्हणत नाही. कमी वेगवानदेखील लगेच मरून जात नाहीत. वेगवान चित्त्यांचे लोकसंख्येतले प्रमाण पुढच्या पिढीत एखाद दोन टक्क्यांनी जास्त, त्याच्या पुढच्या पिढीत अजून एखाद दोन टक्क्यांनी जास्त असे होत होत शेकडो पिढ्यांनी कमी वेगवान चित्त्यांचा मागमूसही राहात नाही. नैसर्गिक निवड ही डोळस नाही, त्यामुळे काळी-पांढरीही नाही. पण त्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे कोणा व्यक्तीने, शक्तीने करण्याची गरज पडत नाही. वरून सोडलेली वस्तू आपोआप गुरुत्वाकर्षणाने खाली यावी त्याप्रमाणे विशिष्ट परिस्थितीत उपयुक्त असणारे गुणधर्म टिकून राहातात, आणि निरुपयोगी गुणधर्म नाहीसे होतात. अन्न मिळवण्याच्या गरजेतून चित्त्यांचा सरासरी वेग पुढच्या पिढ्यांमध्ये वाढतो. म्हणजे निवड करणारा कोणी नसला तरी निसर्गात असलेल्या परिस्थितीचा परिणाम म्हणून ते होते. म्हणूनच याला 'नैसर्गिक निवड' म्हणतात. निवड हा शब्द काहीसा गोंधळात टाकणारा आहे. कारण त्यामागे 'कोणीतरी निवड करतो' असा छुपा अर्थ आहे. पण आपोआप होणाऱ्या निवडीची इतर उदाहरणंही आपल्याला दिसून येतात. पृथ्वीकडे बघितले तर सर्व जलसमुदाय एकीकडे आणि जमीन एकीकडे अशी बऱ्यापैकी रेखीव आखणी झालेली दिसते. ही आखणी कोणी ठरवून केली का? अर्थातच नाही. पृथ्वीच्या भूखंडांचा आकार विशिष्ट प्रकारे उंचसखल आहे ही नैसर्गिक परिस्थिती आणि पाणी उंचावरून वाहात खाली जाते एवढा भौतिक नियम, यामुळे अशी विभागणी आपोआप होते. ते कोणी घडवून आणावे लागत नाही. त्याचप्रमाणे पुरेश्या पिढ्या गेल्या की हरणे आणि चित्ते हे त्यांच्यातल्या भक्ष्य आणि भक्षक या नात्यामुळे आपोआप बदलताना दिसतात. कालांतराने, परिस्थितीनुरुप बदल घडत वेगवेगळ्या प्रजाती निर्माण होतात, हे ठीक आहे. पण यातून जीवसृष्टीचा उगम कसा सांगता येतो? याचे उत्तर काही शब्दांत सांगणे सोपे नाही. पण आपल्याला जर रेणूंपासून पेशी कशा तयार झाल्या हे सांगता आले, तर त्या पेशींपासून द्विपेशीय जीव, त्यांच्यापासून 'सुधारित' अनेकपेशीय जीव कसे झाले हे समजून घेता येते. चित्ते आणि हरणांचा वेग जसा एकमेकांमुळे वाढत गेला, तसा सर्वच प्राण्यांचा विकास अगदी साध्या सुरूवातीपासून ते आत्ता दिसणाऱ्या वैविध्यापर्यंत कसा झाला हे समजू शकते. याचे काही टप्पे आपण पुढच्या काही लेखांत खोलवर जाऊन तपासून पाहू. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे सजीवसृष्टी जन्मण्यासाठी कोणा उच्च शक्तीच्या नियंत्रणाची गरज नाही. पुनरुत्पादनाची प्रक्रिया असली की नैसर्गिक निवडीतून आपोआप हे चराचर फुलून येते. या सत्याच्या जाणीवेत जगाकडे, स्वतःकडे आणि मानवांमधल्या परस्परसंबंधाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात क्रांती करण्याची शक्ती आहे. माझ्या देवाने जग निर्माण केले की तुझ्या देवाने हा प्रश्नच या सत्यापुढे विरघळून जातो, आणि सर्व धर्मयुद्धे निरर्थक ठरतात. 'मी या जगात का आहे?' या प्रश्नाचे साधे सोपे उत्तर - 'माझ्या आईवडिलांनी मला जन्माला घातले म्हणून' हे स्वीकारता येते. आणि त्यांचे आईवडील, त्यांचे आईवडील असे मागे जात जात आपल्या सगळ्यांची नाळ चार अब्ज वर्षांपूर्वीच्या कुठल्यातरी एकपेशीय जीवापर्यंत पोचवता येते. मी अमुक जातीचा, आपण तमुक धर्माचे, त्या हरामखोर परधर्मीयांचा नायनाट केला पाहिजे वगैरे विचार मग पोकळ ठरतात. अवकाशाच्या गहन पोकळीत साडेचार अब्ज वर्षांपूर्वी एक ग्रह नैसर्गिकरीत्या निर्माण झाला. त्यावर नैसर्गिकरीत्या प्राणीसृष्टी तयार झाली. आपण मनुष्य म्हणून जे काही लाख वर्षे आहोत, आणि सुसंस्कृत म्हणवत जी काही हजार वर्षे जगतो आहोत, ती या काही अब्ज वर्षांच्या आवाक्याच्या नखाचे टोक आहे. आपणही इतर प्राण्यांप्रमाणेच आहोत, फक्त जास्त हुशार आहोत, कपडे घालतो आणि वेगवेगळ्या भाषा बोलतो इतकंच. आपल्याला बनवणारे कोणी नाही, आपण बनलो. हा निसर्ग, हे प्राणी, ही सृष्टी आपल्यासाठी बनवलेली नाही - ती फक्त आहे. आपल्याप्रमाणेच या नैसर्गिक निवडीतून आणि भौतिकी-रासायनीच्या नियमांनी घडलेली, उत्क्रांत झालेली. हा विचार स्वतःला अनेक पाशांपासून, पूर्वग्रहांपासून मुक्त करणारा आहे. हा विचार डार्विनने मांडला त्याला दीड शतक उलटून गेले. दुर्दैवाने अजूनही जगाच्या लोकसंख्येचा प्रचंड मोठा भाग या मुक्तीदायी सत्यापासून वंचित आहे. (मी मराठी लाइव्हमध्ये पूर्वप्रकाशित)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26890
प्रतिक्रिया 76

प्रतिक्रिया

In reply to by राजेश घासकडवी

पण देवावर विश्वास असणं आणि विज्ञानाच्या सत्यांवर विश्वास असणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यांनी "अंधश्रद्धा" शब्द वापरलाय "विश्वास" हा तुमचा शब्द आहे. हा एक शब्द बदलल्याने वाक्याच्या अर्थात जमीनस्मानाचा फरक पडतोय !!! तुम्ही विमानाने प्रवास करायचा झाला तर ते उडेल, खाली पडणार नाहीस(मिलियनमध्ये एक अपघात होतो ते सध्या बाजूला ठेवू), असा विश्वास ठेवून जाता की नाही? तो अंधविश्वास असतो का? हा विपर्यास आहे ! विमानाने केला जाणारा प्रवास हा... "लांब अंतराच्या प्रवासात विमानप्रवासामध्ये वेळ, श्रम व पैश्याची तुलनात्मक बचतच होते आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे व त्या सेवेत असलेल्या धोका टाळण्यासाठी घेतलेल्या काळजीमुळे विमानप्रवासात अपघात होण्याची शक्यता स्विकारार्ह असावी इतकी खूप खूप कमी असते"... या गृहितकांवर केला जातो. असा एखाद्या गोष्टीपासून होणार फायदा आणि तिच्यात असणारा धोका यांची तुलना करून तो धोका पत्करण्याचे अथवा न पत्करण्याचे अनेक "व्यावहारीक" ("अंधविश्वासी नव्हे") निर्णय आपल्याला रोजच्या जीवनात सतत घ्यावे लागतात. साधी उदाहरणे द्यायची झाली तर... १. "विमानप्रवासापेक्षा रस्त्यावरून केलेला प्रवास जास्त धोक्याचा आहे (उदा. दर दशलक्ष किमी प्रवासाला मृत्युचे प्रमाण, इ) हे अनेकदा सिद्ध झाले आहे. म्हणून रस्त्यानेही प्रवास करायचे टाळायचे काय की तो अंधविश्वासामुळे केला जातो ? २. शाळा-कॉलेजाची डिग्री घेतल्याने नोकरी मिळेल... इतकेच काय घोकंपट्टी पुस्तकी ज्ञानापेक्षा जास्त काही मिळेल... याचीही १००% खात्री कोणीच देत नाही. म्हणून शिक्षण घेणे अंधश्रद्धा होत नाही. दर दिवसाला आपण असे निर्णय डझनांनी घेतो. पण हातातल्या मुद्द्यासाठी इतके पुरेसे आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही उदाहरणावर अडून बसू नका. माझा मुद्दा त्या तंत्रज्ञानावर खात्री असण्याबाबत आहे. ती खात्री आहे कारण १. त्यामागची वैज्ञानिक तत्त्वं जगजाहीर आहेत, आणि वारंवार तपासली गेलेली आहेत. ती कोणालाही अभ्यासता येतात. २. विमान कसं बनवावं याचं शास्त्र अनेक संशोधनांनंतर अधिकाधिक समृद्ध झालेलं आहे. याचं कारण म्हणजे वेळोवेळी त्यांवर लोकांनी शंका घेतल्या, चुका काढून टाकण्याचा प्रयत्न केला. ३. या संशोधनाची आणि तंत्रज्ञान विकासाची पद्धत ही वैज्ञानिक पद्धत आहे. त्यातल्या पीअर रिव्ह्यू पद्धतीमुळे अनेकांकडून ते तपासलं जातं. ४. या तंंत्रज्ञानाचा धोका किती, सक्सेस रेट किती ही आकडेवारी सर्वत्र उपलब्ध आहे. या सगळ्या गोष्टींना मी डोळसपणा म्हणतो. म्हणून मी 'विज्ञानावर अंधश्रद्धा' या शब्दप्रयोगाला फक्त आक्षेप घेतलेला आहे. असो, मला श्रद्धा, अंधश्रद्धा वगैरे वादात पडायचं नाही. विज्ञानाच्या बाबतीत डोळसपणा आणि पारदर्शकता आहे इतकंच माझं मत मांडून थांबतो. विज्ञानातही अंधश्रद्धा असतात वगैरे मुद्दे इथे अवांतर होतील, त्यासाठी स्वतंत्र लेखन करावं ही विनंती.

In reply to by राजेश घासकडवी

शास्त्रिय विषयावरचे लेख व प्रतिसाद यात केवळ आणि केवळ शास्त्रियदृष्ट्या योग्य असेच लिहावे, अन्यथा शास्त्रिय विचार पसरण्याऐवजी गैरसमज पसरवले जातात, असे मला वाटते. इतकेच !

In reply to by राजेश घासकडवी

प्रतिक्रिया निट वाचेलली दिसत नाही. आपल्या लेखनमालिकेच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे. फक्त ज्या गोष्टी पुर्णपणे सिध्द झालेल्या नाहीत त्यावर ठाम भुमिका घेने हे खटकले इतकेच नमुद केले आहे. एखादी क्लिष्ट गोष्ट सोपी करून सांगताना त्यांमुळे गैरसमज पसरनार नाहीत ह्याची काळजी घेतली जावी अशी अपेक्षा आहे. अनुमान काय आणि सत्या काय हे स्पष्ट नमूद करणे विज्ञानात आवश्यक असावे अशी अपेक्षा होती.
पण देवावर विश्वास असणं आणि विज्ञानाच्या सत्यांवर विश्वास असणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
मान्य. वि़ज्ञान कशाला म्हणायचे हे एकदा स्पष्ट करा म्हणजे पुढे चर्चा करता येइल. बाकी, कोलगेटन सांगितल की विज्ञान म्हणतं की मिठ आणि कोळष्यामुळं दात खराब होतात, आम्ही वि़ज्ञानप्रेमी मिस्री सोडून पेस्ट तोंडात कोंबनार आणि पुढ २५ वर्षांनी आपके पेस्ट मे नमक और कोयला नही है अस वाकुल्या दाखवल्यावर परत त्यांची मिठ आणि कोळसा असेलेली पेस्ट वापरायला तय्यार. धन्य आहे अशा विज्ञानप्रेमींची.

In reply to by पॉइंट ब्लँक

बाकी, कोलगेटन सांगितल की विज्ञान म्हणतं की मिठ आणि कोळष्यामुळं दात खराब होतात, आम्ही वि़ज्ञानप्रेमी मिस्री सोडून पेस्ट तोंडात कोंबनार आणि पुढ २५ वर्षांनी आपके पेस्ट मे नमक और कोयला नही है अस वाकुल्या दाखवल्यावर परत त्यांची मिठ आणि कोळसा असेलेली पेस्ट वापरायला तय्यार. धन्य आहे अशा विज्ञानप्रेमींची.
मी नाय ब्वॉ थेट कोलगेटचं ऐकत. मी माझ्या डेंट्याला विचारतो. त्याला असल्या पेस्टांचा फायदा/तोटा माझ्यापेक्षा नक्कीच जास्तं समजतो. कोल्गेट जाहिरातून गंडवतं याचा आणि विज्ञानप्रेमींचा सबंध नाही समजला.

असं असेल तर काही वर्षापूर्वी कोंग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांनी स्नायुंचे दुखणे दूर करणारे 'तिरंगा' नावाचे ब्रेसलेट बाजारात आणले होते, त्यावरही विश्वास ठेवायचा का?