मूठभर खजूर [पूर्वार्ध]
http://www.misalpav.com/node/33374
मूठभर खजूर [उत्तरार्ध]
मी आजोबांना विचारले, “मसूदने त्याची जमीन का विकली?”
“बायका!” हा शब्द आजोबांनी असा काही उच्चारला कि, बाई म्हणजे काहीतरी भयानक प्रकार आहे, असे वाटू लागले!
“मसूदने अनेक निकाह लावले! प्रत्येकवेळी त्याने दोनतीन एक्कर जमीन मला विकून टाकली!”
मी मनातल्या मनात चटकन हिशोब घातला. त्या हिशोबाने त्याने सुमारे नव्वदेक बायकांशी निकाह लावायला हवा होता. पण मला तर त्याच्या तीनच बेगमा दिसायच्या. मग मला त्याचा गरीबगबाळा अवतार, त्याचा लंगडा गाढव, त्यावर खोगीर म्हणून टाकलेल्या चादरीचे तुकडे, त्याच्या फाटक्यातुटक्या वादी, त्याचा फाटक्या बाह्यांचा लांब जलेबिया* सगळे एकदम आठवले.
तितक्यात, दुरून मसूद येताना दिसला आणि माझ्या विचारांची साखळी तुटली. आजोबांची आणि माझी नजरानजर झाली.
“आज खजुराची छाटणी आहे, या तुम्ही!” मसूदने आजोबांना सांगितले. त्याने सांगितले तर खरे, पण मनोमन मात्र आजोबांनी तिकडे फिरकू देखील नये, असेच त्याला वाटत असणार! आजोबा मात्र ऐकताक्षणी तात्काळ उठले. त्यांच्या डोळ्यात एक तीव्र चमक दिसली. त्यांनी माझे बखोट पकडले आणि जिथे खजुराची छाटणी चालली होती, तिकडे घेऊन निघाले.
कुणीतरी आजोबांना गडबडीने एक स्टूल आणून दिला. मी उभाच राहिलो. बरेच गावकरीही आले होते. तसा मी सगळ्यांना ओळखत होतो; पण माझे लक्ष मात्र फक्त मसूदकडे होते. खरंतर त्याच्याच शेतातील खजुराच्या राशी पडत होत्या, तो मात्र त्या सगळ्याकडे परक्या नजरेने मुकाट्याने पहात होता.उंचावरून खजुराचा घोस जमिनीवर पडे, त्याच्या आवाजाने मात्र तो दचके, विचलित होई. उंच झाडावर बसून, खजुराच्या घोसावर धारदार कोयत्याने वार करणाऱ्या पोरावर तो ओरडला, “पोराहो..... संभाळून! फळ म्हणजे झाडाचं काळीज! जरा जपून!!!”
पण त्याच्या ओरडण्याकडे कोण लक्ष देणार? झाडावरच्या पोराला तर ते ऐकायलाही गेले नाही. तो भराभर एका मागोमाग एक खजुरांच्या घोसांवर कोयते चालवीत राहिला....... आणि स्वर्गातून धरतीवर यावेत तसे मौल्यवान खजूर खाली पडत राहिले.
‘फळ म्हणजे झाडाचं काळीज!’ हे मसूदचे शब्द माझ्या मनात रेंगाळत राहिले.
पूर्वी एकदा मला मसूदने झाडाच्या फांद्यांना लोंबकळताना पाहिले, तेव्हा माझ्यावर असाच जीव खाऊन ओरडला होता, “ ए पोरट्या ....... फांद्या का ओढतोस? ते आपल्यासारखेच!!! त्यांनाही दुखतंखुपतं रे!”
ते ऐकून, मला काहीतरी उमजले. मी फांदी सोडली आणि एकदम गप्प गप्प झालो.
आता माझे मित्र खजुराच्या बुंध्याला मुंग्यांसारखे चिकटले होते! पडलेले सुट्टे खजूर पटापट गोळा करून तोंडात टाकीत होते. थोड्याच वेळात, बघता बघता खजुराच्या मोठाल्या राशी लागल्या. वीसपंचवीस लोकांनी शेराचिपट्याच्या मापाने आपल्या पिशव्या भरून घेतल्या. हळूहळू लोक पांगले.
आता, हुसेन नावाचा एक व्यापारी, शेजारचा जमीनमालक मुसा, आणखी दोन अनोळखी इसम आणि आजोबा एवढेच लोक तिथे थांबले. मसूद मात्र जसाच्या तस्सा उभा होता. तोही खजूर चघळत होता, पण त्यात काही अर्थ नव्हता.
हुसेन, मुसा, ते दोन अनोळखी इसम आणि आजोबा यांनी उरलेल्या खजुराच्या राशी भोवती कोंडाळे केले. सगळेजण मूठमूठ खजूर हातात घेऊन पारखून पाहू लागले. आजोबांनी माझ्याही हातावर मूठभर खजूर ठेवले.मी चघळू लागलो. हळूहळू पोती भरली जाऊ लागली. हुसेनने दहा पोती उचलली. दोन अनोळखी इसमांनी प्रत्येकी पाचपाच पोती उचलली, मुसाने पाच आणि माझ्या आजोबांनी पाच पोती घेतली.
मी बावरलो. मला काहीच कळेना. मी मसूदकडे पहिले. त्याचा चेहरा बारीक झाला होता. वाट चुकलेले चिमुकले पक्षी सैरभैर उडावेत, तसे मसूदचे डोळे त्या पोत्यांभोवती भिरभिरत होते.
“तुझ्यावर आणखी पन्नास पौंडांची बाकी आहे रे! बाकी नंतर बोलू. पण ध्यानात ठेव.” आजोबांनी मसूदला दमात घेतल्यासारखे सांगितले.
सगळ्यांनी उंटागाढवांवर आपापली पोती टाकली. पाठीवर ओझी पडताच, जनावरं खिंकाळली. जणू लादलेल्या ओझ्याला विरोध दर्शवित होती. सगळे निघाले.
पण मी माझ्याही नकळत, मसूदकडे ओढला गेलो. माझा हात पुढे झाला. का कोण जाणे, पण त्याची फाटकी बाही हातात धरावीशी वाटली. कोकरू कापण्याआधी क्षणभर त्याच्या अंगाचा थरकाप होतो आणि घशातून बारीक करुण आवाज निघतो...... तसाच मसूदचा आवाज आला..... मी शहारलो. माझ्या छातीत बारीक पण तीव्र कळ उमटली. मला तेव्हा त्याचे कारण कळत नव्हते.
मी तिथून सुसाट धावत सुटलो. आजोबांनी मारलेल्या हाकाही मला ऐकू आल्या नाहीत. मी तसाच आवेगाने पळत राहिलो. मला आजोबांचा रागराग आलेला, त्यांच्याविषयी तिरस्कार वाटू लागला. नदीकिनाऱ्याने मी आणखी वेगाने पळत पळत बाभळीच्या बेटांपाशी पोहचलो.
काय कारण माहित नाही, पण घशात बोटं घालघालून मसूदचे खाल्लेले मूठभर खजूर मी बाहेर काढले....भराभर उलट्या केल्या.
[जलेबिया - अरब पद्धतीचा लांब पायघोळ पुरुषांचा पोशाख]
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
20610
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
फारच सुरेख भावनुवाद. दोन्हीही
सुंदर!!! अप्रतिम!!!
अप्रतिम !! क्या बात हे !
वा
सुंदर भावानुवाद !
फारच छान! झाडांनाही जीव असतो
मस्त
छान भावानुवाद!
+१ अगदी अगदी!
In reply to छान भावानुवाद! by बहुगुणी
+११११ कथा आवडली .
In reply to +१ अगदी अगदी! by चतुरंग
+१११
In reply to +१ अगदी अगदी! by चतुरंग
..... तरच अनुवाद वाचनीय होतात
In reply to +१ अगदी अगदी! by चतुरंग
सुरेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जान ओ बेबी... ;)छान
वा! अतिशय सुंदर!
जिवाला चटका लावुन गेली कथा
+१
In reply to जिवाला चटका लावुन गेली कथा by पियुशा
अतिशय सुंदर अनुवाद. वा!
कथाविषय आणि अनुवाद...
ताणलं कि तुटतं :) :)
In reply to कथाविषय आणि अनुवाद... by माधुरी विनायक
अप्रतिम. सुंदर अनुवाद झालाय.
जमलाय अनुवाद. कथाही सशक्त आहे
+१
खूप सुरेख!
अप्रतिम अनुवाद!
मनात अपोआप रुपांतर होतेच.
In reply to अप्रतिम अनुवाद! by बोका-ए-आझम
कथा आवडली.
सुरेख!
उत्तम अनुवाद, कथा फार आवडली.
सुंदर!!
सुंदर कथा आवडली.
अप्रतीम
अप्रतीम अनुवाद!
पुर्वार्ध वाचल्यावर कथेचा
वा!
कथा
मला खरोखर कथा कळली नाहीळ्कोणी
.
In reply to मला खरोखर कथा कळली नाहीळ्कोणी by द-बाहुबली
पूर्वार्ध आणि उत्तरार्ध
सुंदर कथा आणि अनुवाद'सारे
भावानुवाद छान केला आहे.
छान झाला हाही भाग
"मी आजोबांना विचारले, “मसूदने
अचूक....
In reply to "मी आजोबांना विचारले, “मसूदने by Pain6
खूपच छान
दोन्ही भाग आज वाचले
सुरेख जमला आहे भावानुवाद.
सुंदर ....