माझं कोकणातलं गांव :- भाग-६ माझा एन्रॉनमध्ये प्रवेश
या आधीचे भाग भाग-१. भाग-२ . भाग-३. भाग-४. भाग-५
या लेखामालेतील पाचवा भाग प्रसिध्द झाल्यानंतर टंकनाचा कंटाळा आल्याने मध्येच ७ महिने निघुन गेले. त्यामुळे क्षमा असावी.
मागिल लेखापर्यंत मी माझ्या कोकणातल्या गावाचे वर्णन केले होते. पण आम्ही फक्त मे महिन्यातच जात असु त्यामुळे कोकणातील पावसाळा आणि हिवाळा हे ऋतु अनुभवले नव्हते. ते मला एन्रॉनच्या निमित्ताने अनुभवायला मिळाले.
मी काकांच्या मुलीच्या लग्नाला १९९९ साली गावी गेलो होतो. तेव्हा काका म्हणाले की सध्या इकडे एन्रॉनमध्ये भरती चालु आहे तेव्हा तुही प्रयत्न करुन बघ काही काम मिळतय का ते. कळव्याहुन निघताना काकांनी सांगितले होते म्हणुन मी आयटीआयच्या प्रमाणपत्राच्या झेरोक्स प्रती माझ्या बरोबर घेतलेल्याच होत्या.
तसेही मुंबईची नोकरी काय म्हणावे तशी चांगली नव्हतीच. मग जरा विरंगुळा आणि माझ्या फिटर क्षेत्रातला जॉब कुठे मिळतोय का ते पहायला काय हरकत आहे असं वाटलं म्हणुन मग मी दुसरे दिवशी काकांबरोबर एन्रॉन कंपनीत मुलाखात देण्यासाठी निघालो.
आता पर्यंत मी एवढे वेळा गावी आलो होतो पण चिपळुण-गुहागर रोडवरिल आमच्या गावाकडे जाणार्या फाट्याच्या पलिकडे गुहागरच्या दिशेने कधी गेलोच नव्हतो तो आज प्रथमच जात होतो. आमच्या गावाला जाणार्या फाट्यापासुन ते गुहागर हे १६ कि.मि. अंतर आहे. मध्येच फाट्यापासुन १ कि. मी. अंतरावर श्रुंगारतळी नावाचे एक मध्यवर्ती मुख्य ठिकाण आहे. तो मुख्य बाजार आहे. गाडी तिथे दोन मि. थांबुन मगच पुढे गुहागरकडे जाते. तर काकांबरोबर पहिल्यांदाच या बाजुला आलो. गुहागर डेपो मस्त प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे मी आतापर्यंत पाहिलेल्या इतर डेपोपेक्षा कितीतरी स्वच्छ आहे. स्टँडच्या बाहेरच श्री व्याडेश्वराचे देवस्थान आहे. समुद्र किनारा अतिशय जवळ आहे.
आम्ही वेलदुर या गावाला जाणारी दुसरी गाडी पकडुन एन्रॉन कंपनीत निघालो. ह्या कंपनीकरता सरकारने वेलदुर, अंजनवेल, आणि रानवी या तीन गावांच्या घाटमाथ्यावरची जमीन संपादन केलेली होती. अंजनवेल, वेलदुर ही गावे दाभोळ खाडीच्या मुखाशी वसली आहेत. अंजनवेल हे खाडी समुदाला मिळते तिथे वसले आहे या गावाच्या समुद्रकिनारी गोपाळगड हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या पुढे एक टेकडीवर लाईटाहाऊस आहे. तिथुन अथांग पसरलेला समुद्र, दाभोळ खाडिचे मुख आणि समोर पलिकडे दापोली तालुक्यातील वसलेली गावे असा सुंदर नजारा दिसतो. तर वेलदुर गाव हे खाडीच्या मुखाशीच पण दाभोळ बंदराच्या बरोबर समोर आहे. दोन्ही गावाच्या दरम्यान दिवसातुन ३ वेळा लाँचने अथवा खाजगी होड्यांतुन वाहतुक होते.
गाडीने घाट चढुन जाताच मला दोन्ही बाजुला एन्रॉन कंपनीच्या गोर्या लोकांच्या वसाहती दिसायला लागल्या. त्यांनी बोटीतल्या कंटेनरला वातानुकुलीत यंत्र बसवुन त्यातच आपला मुक्काम ठोकला होता. नंतर मुख्य कंपनीच्या गेटवर आम्हाला ए.स्टी.ने आणुन सोडलं व ती पुढे वेलदुरला घाट उतरत निघुन गेली. मुख्य कंपनीचे गेट व गोर्या लोकांची वसाहत या मध्ये अंदाजे २.५ किमी. अंतर होते.
मेन गेटवर तात्पुरती प्लास्टीकची शेड उभी केली होती. तिथे अठरापगड जातीचे लोक उभे होते. कोणी मुलाखतीला आले होते तर कोणी अगोदरच नोकरीला होते पण आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश पत्र मिळवण्याकरता. थांबले होते. सगळे सोपस्कार पार पाडुन यथावकाश आम्हीही गळ्यात व्हिजिटरचा गेटपास लावुन रांगेत आत मधे गेलो. आतमध्ये एक मिनी बस उभी होती ती सर्व व्हिजिटर लोकांना त्यांच्या इच्छित स्थळी नेवुन सोडत होती. या गेटच्या डाव्या बाजुला सुमारे २५/३० आडव्या चाळी बांधलेल्या होत्या. त्या सर्व कामगार वसाहती होत्या. नुकतीच कामाची वेळ झालेली असल्याने त्या चाळीतुन राहणारे कामागार लोक हेल्मेट, सुरक्षा चष्मा लावुन आमच्या बस बरोबरच चालत रांगेने उजव्या बाजुला असलेल्या उघड्या माळरानाकडे जाताना दिसत होते. बस संथ गतीने चालली होती. कारण रस्ता असा नव्हाताच सगळीकडे खडी पसलेली होती.
उजव्या बाजुच्या माळरानावर मुख्य मशिनरी उभी करण्याच्या जागेवर नुकतेच किमान ५००० sqft चा सिमेंटचा चौथरा निर्माण केलेला होता व पावसामुळे तो भिजु नये म्हणुन एका मोठ्या बलुनने झाकला होता. आमचं गाव तर इथुन २६ कि.मी अंतरावर असुन सुध्दा गावच्या सड्यावरुन हा बलुन दिसायचा असे माझा चुलत भावु सांगत होता ते खरंच होतं. मीही इतका मोठा बलुन पहिल्यांदाच पहात होतो.
बाकी इतर ठिकाणी नजर पोहचेल तिथपर्यंत मुख्य मशिनरी उभी करण्यासाठी लागणार्या सामानाचे कंटेनर विखरुन पडले होते. दुर एका बाजुला अजुन एक मोठी आडवी पत्र्याची शेड असलेली चाळ दिसली. तीच नंतर माझी कर्मभुमी झाली कारण ते होते मेंटनंन्स आणि इंनस्ट्रुमेंन्ट डिपा. चे स्टोअर.
आधीच्या कंपनीत पाहिलेल्या फोर्क लिफ्ट, जेसीबी, मोठ्या मोठ्या अवजड क्रेन्स या व्यतिरिक्त अनेक अत्याधुनिक उपकरणं तिथं काम करत होती. सगळीकडे पिवळी हेल्मेट घातलेली माणसे पुंजक्या पुंजक्याने दिसत होती.
थोड्याच वेळात एका चाळवजा पक्क्या बैठ्या इमारतीपाशी मिनी बस थांबली. सर्व मुलाखतीला आलेल्यांना इथे उतरवण्यात आले. साधारणपणे कोण कोण कुठल्या पोस्टकरिता आलंय याची ढोबळपणे वर्गवारी झाली.
आतमध्ये जाताच दिसलं की ते खुप मोठं वातानुकुलीत ऑफिस होतं. दोन्ही बाजुंनी चौकोनी क्युब्सने पार्टीशन केले होते व प्रत्येक ठिकाणी मुलाखती चालल्या होत्या. माझीही मुलाखत झाली. मला एका गोर्या अधिकार्याने काही प्रश्न विचारले त्याची मी व्यवस्थित उत्तरे दिली. अनुभव तर नव्हताच.
कारण आयटी मधुन पास होवुन फीटर या क्षेत्रात मुंबई, ठाण्यात, डोंबिवलीत सगळ्या केमिकल फॅक्टरी कंपन्यांना खेटे घालुन झाले होते. केमिकल अशासाठी कारण माझा ट्रेड एमएमसीपी होता.
ठाणे एमआयडीसीत तर सायकलवरुन फिरुन तिथल्या सुरक्षा रक्षकांकडे बायोडेटा दिले होते. आशा होती की कुठे तरी फिटरचा जॉब लागेल. पण नाही मला वाटतं सगळीकडे एकच उत्तर मिळत होतं "अहो आधीच कामगार कपात होते आहे. त्यात कुठला आलाय नवीन जॉब". हे खरं होतं की ठाणे एमआयडीसीतली नोसील बंद पडली आणि तिथल्या सगळ्या कंपन्या हळुहळु बंद पडत होत्या. असो.
पण त्या गोर्याने बाजुला असलेल्या काँन्ट्राक्टरला सांगितले की यांना आपण फिटरच्या जॉबसाठी घेवुया. आता हे काँन्ट्राक्टर लोक कोण तर ज्यांच्या ज्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी गेल्यात त्या स्थानिक लोकांना काँन्ट्राक्टर केले गेले. त्यांना मजुर भरती , कंपनीला ट्रक, साहेबांसाठी ट्रॅक्स, टाटा सुमो, अशा गाड्या, मिनीबस पुरविणे , मेस चालवणे अशी जमतील तशी कामे एन्रॉनशी करार करुन दिली गेली.
मग त्या बिल्डींगमधुन बाहेर आलो. मला ज्या काँन्ट्राक्टरने साईन केले होते त्याचे नाव होते साईराज काँन्ट्राक्टर त्यांच्या कॅबीनकडे निघालो. तिथे सगळे रितसर नाव, गांव, पत्ता नोंदणी झाली आणि पुढिल आठवड्या पासुन कामाला या असे सांगण्यात आले.
या एवढ्या मोठ्या जागेत प्रथमच काम करायला मिळणार त्यात बरोबर गोरे लोक, आणि नविन कधीही न पाहिलेल्या मशिनरीज पाहुन एक वेगळाच हुरुप निर्माण झाला होता. त्यातुन फिटरचे प्रशिक्षण हे कंपनीमध्ये अगोदरच स्थापन झालेल्या प्लँन्टमध्ये झाले होते. पण आता मात्र आपण सहकार्याने मिळुन हळुहळु प्रत्येक दिवसामागे इथे एक कंपनी उभी करणार आहोत, जिच्या मध्ये भारतीयच नव्हे तर जागतिक प्रसिध्द्दिच्या कंपन्यांचे इतर लोकही सहभागी होणार आहेत हा अनुभव रोंमांचकारी ठरणार होता.
सरकारचा करार झाला होता एन्रॉनशी , कंपनी उभारणी करता बेक्टेल ही जगप्रसिध्द कंपनी आली होती. जिच्या मध्ये नऊ लाखाच्या आसपास कामगार होते. तेव्हा इकडे कामला येणारा भारतीय इंजिनियर बेक्टेलमध्ये शिरायचा प्रयत्न करायचा.
कंपनीला लागणारे सगळे इलेक्ट्रीकल सामान पुरविणाचे काम "जनरल इलेक्ट्रीकल" कंपनीला मिळाले होते.
मोठाले जनरेटरच्या टर्बाईंन्स जोडणी करता जपानहुन कामगार मंडळी आली होती. तर एक छोटा पाणी शुध्दिकरण प्रकल्प जोडणी करता एका फिलीफिनो माणसाला काम मिळालं होतं. त्याची आणि माझी पुढं खुप चांगली गट्टी जमली.
तर अशा या सगळ्यांबरोबर मी पुढल्या आठवड्या पासुन कामाला सुरुवात करणार होतो.
दुसरे दिवशी गावावरुन कळव्याला आल्या नंतर मी इकडे जुन्या कंपनीत पुढिल आठवड्या पासुन कामावर येणार नसल्याचे सांगितले आणि एन्रॉन कंपनीत रुजु होण्याकरता पुन्हा गावाला जाण्याच्या तयारीला लागलो.....
क्रमश:
वाचने
4515
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
मध्येच फाट्यापासुन १ कि. मी. अंतरावर श्रुंगारतळी नावाचे एक मध्यवर्ती मुख्य ठिकाण आहे.कॉलिंग मु.वि. ;)
In reply to मध्येच फाट्यापासुन १ कि. मी. by टवाळ कार्टा
ह्या जगांत इतर पण मध्यवर्ती ठिकाणे आहेत.
किंबहूना, प्रत्येक मिपाकर आपापले गांव मध्यवर्ती ठिकाण करायचा प्रयत्न करतो.
त्या हिशोबाने, सध्या आमचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे यानबू (आपल्या मिपाच्या भाषेत "यानबिवली")
छान लिहिलंय देर्देकर.
छान लिहिला आहे हा भाग. आधीचे भाग आत्ता वाचून काढले. सगळेच मस्त आणि रिफ्रेशिंग! छान वाटले वाचून.
एन्रॉनविषयी अधिक वाचायला आवडेल. विशेषतः त्यातले गैरव्यवहार, फसलेले प्रयोग, वगैरे...
आपण तंत्रकुशल आहात हे वाचून आपल्याविषयीचा आदर दुणावला आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहेच...
आमच गुहागर! पूर्वीचे दिवस आठवले. शांत गाव एन्रोन मुळे गजबजायला लागलेले.
एन्रॉन प्रकल्पांत मला वाटतं २००१ किंवा २००२ मध्ये योग प्रशिक्षण वर्ग राबवला होता त्यावेळ्च्या आठवणी जाग्या झाल्या. आपल्या कर्मचा-यांची फारच काळजी घेणारी कंपनी असा समज त्यावेळी झाला होता; खरे खोटे तुमच्या सारख्या तेथे काम कर णा-यांनाच ठाऊक.
वाचतोय...
माझ्यामते एन्रॉनमध्ये ऑपरेशनल लेव्हलला काही गैर नसावं (किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या जितक्या गैर असतात त्याच्यापेक्षा वेगळं काही नसावं.) राडा होता तो सर्वोच्च व्यवस्थापनात...
खूप छान पम्या !!
पु.भा.प्र.
@ समीरसूर धन्यवाद -
एन्रॉनविषयी अधिक वाचायला आवडेल. >>> होय माझ्याकडे लोकसत्तेच्या विषेश या सदराचे काही जुने लेख आहेत ते पीडीएफ मध्ये रुपांतर करुन ठेवलेत. तुम्हाला व्य.नि. तुन पाठवतो.
के.पी. -आमच गुहागर! पूर्वीचे दिवस आठवले. शांत गाव एन्रोन मुळे गजबजायला लागलेले.>>> तुम्ही गुहागरात कुठे रहाता? आणि एन्रॉन आता बंद झाली आहे अस ऐकतो आहे. तेव्हा परत पुर्वीची शांतता नांदेल तिकडे.
@ आदूबाळ :-
माझ्यामते एन्रॉनमध्ये ऑपरेशनल लेव्हलला काही गैर नसावं (किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या जितक्या गैर असतात त्याच्यापेक्षा वेगळं काही नसावं.) राडा होता तो सर्वोच्च व्यवस्थापनात...>>>
अगदी अगदी या वरच्या लेव्हललाच काही ना काही तरी मानपानावरुन खुसपटं निघतात, नाहीतर कंपनीला हे दिवस आले नसते.
@ खटपट्या / वल्लीशेठ :- धन्यवाद.
In reply to @ समीरसूर धन्यवाद - by प्रमोद देर्देकर
अगदी अगदी या वरच्या लेव्हललाच काही ना काही तरी मानपानावरुन खुसपटं निघतात, नाहीतर कंपनीला हे दिवस आले नसते. ते एक कारण जमेस धरले तरी केवळ भारतातल्या वरच्या लेव्हलच्या मानपानामुळे एन्रॉनची भारतिय उपकंपनी बुडाली असे नाही तर तिच्या अमेरिकेतल्या वरच्या स्तरातल्या (साधारण "सत्यम"च्या धर्तिवरच्या) आर्थिक (हिशेब) लेखन घोटाळ्यामुळे सर्व कंपनीच बुडीत खात्यात गेली... आणि त्याबरोबरच ते हिशेब लिहिणारी जागतिक किर्तीची आर्थर अंडरसन ही ऑडिट कंपनीही बुडाली.In reply to @ समीरसूर धन्यवाद - by प्रमोद देर्देकर
आणी मग "रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड" (आरजीपीपीएल) चा उदय झाला पण पुर्वीची शांतता पुन्हा कधीच अनुभवायला मिळाली नाही.
जुन्या आठवणी ताज्या केल्यात ,त्याबद्दल आभार.
मी स्वतः दाभोळ पॉवर प्रोजेक्ट फेज १ & २ मध्ये १९९७ आणि २००० साली काम केलेले आहे. मीदेखील साईराज कॉन्ट्रॅक्टर्स कडूनच होतो. पॉवर-ब्लॉक मध्ये इलेक्ट्रिकल चे काम होते ,तसेच आर.जी.पी.पी.एल. मध्ये देखील नन्तर २००८ मध्ये ऑपरेशन डिपार्ट्मेन्ट ला होतो.
सध्या या प्रकल्पाची अवस्था अतिशय दयनीय अन चिंताजनक आहे. पुरेसा गॅस रिलायन्स कडून सप्लाय न झाल्याने गेल ने हात वर केले आहेत. त्यामुळे एन टी पी सी हा प्लॅन्ट सोडून देण्याच्या मनस्थितीत आहे. एकुणात सर्वच पातळीवर प्रचंड औदासीन्य असल्याने प्लॅन्ट अन महत्त्वाचे म्हणजे प्रचंद मोठी जमीन स्वस्तात रिलायन्स च्या घशात जाणार अशी चिन्हे आहेत !
अवान्तर - माझी एक कथा या प्रक्ल्पाला केन्द्रबिन्दू बनवुन लिहिलेली आहे ,पण ती बरेच टीकेचा अन चेश्टेचा विषय ठरली !असो...
http://www.misalpav.com/node/23045
In reply to धन्यवाद प्रमोद जी by मंदार कात्रे
प्रचंद मोठी जमीन स्वस्तात रिलायन्स च्या घशात जाणार अशी चिन्हे
वाईट वाटलं वाचून! काय हे!
http://nptel.ac.in/courses/IIT-MADRAS/Infrastructure_Planning_Management/pdf/Class%2017%20-%20Dabhol%20Case%20Study.pdf
चांगलं लिहिलयत. वाचतिये.
जरा लवकर लवकर लिहा पुढचे भाग!
मध्येच फाट्यापासुन १ कि. मी.