मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य

सुज्ञ माणुस · · जनातलं, मनातलं
ST ची लाल जनिका : जगातील १० वे आश्चर्य bus ( हे छायाचित्र स्पष्ट दिसत नसेल तर ह्या दुव्यावर टिचकी मारा.: http://sagarshivade07.blogspot.in/2013/01/st.html ) हीच ती वेळ ...आणि हीच ती जागा ...( जेव्हा मी हे छायाचित्र टिपले आणि ) जेव्हा माझ्या मनात आले कि ST चा लाल डबा म्हणजे खरच जगातले १० वे आश्चर्य असावयास हवे. वास्तविक, छायाचित्रात टिपलेली ST पकडण्यासाठीच आम्ही किल्ल्यावरून जवळ जवळ पळतच उतरत होतो. आणि आमचा अंदाज जरा ( जास्तच) चुकला आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी असतानाच ती आम्हाला वाकुल्या दाखवत निघून जात होती. साल्हेरवाडी या गावात येणारी आणि तोच शेवटचा थांबा असल्याने तिथूनच परत जाणारी हि सकाळची एकच गाडी होती. पूर्ण दिवसात फक्त २ वेळा येणारी गाडी पकडण्यासाठी आम्ही किल्ला उतरताना फोटो काढायचे नाहीत असे ठरवले आणि त्यामुळेच पूर्ण ट्रेक चे फोटो १४०० पर्यतच मर्यादित राहिले.. ( इथे मला गहिवरून आलेले आहे ). तर मुद्दा हा कि हि साधी सुधी जनिका आश्चर्याचा विषय अशी असू शकते ? मग मला आठवले माझ्या याच भ्रमंतीच्या जोडीदाराने प्रत्येक वेळी त्याची कर्तव्ये नियमित आणि वेळेत पार पाडली आहेत. हा ( जोडीदार म्हणून हा ) कधी पूर्ण लाल सदरा घालून येतो तर कधी पांढरा सदरा आणि हिरवी टोपी ....कधी लाल टोपी घालून येउन माझे "परीवर्तन" झालेय म्हणतो. कधी हा स्वतः नाही आला तर "ऐरवता" सारख्या त्याच्या मोठ्या भावास पाठवून देतो. हा कुठे आणि कधी भेटेल याचा नेम नसतो पण आपण मात्र कायम याच्याच आगमनाकडे डोळे लाऊन असतो.कधी त्याच्या क्षमते पेक्षा जास्त समान आणि लोक घेऊन जातो तर कधी एकटाच रमत गमत जातो. कधी किल्ल्याच्या पायथ्या पर्यत आम्हाला पोहोचून तिथेच तळ ठोकतो, तर कधी आज मला बिलकुल वेळ नाहीये, "I'm god damn busy today" अश्या "माजात" परत निघून जातो. हरिश्चंद्रा ची चढाई करायला निघालो कि खिरेश्वर पर्यत सोडायला हा संध्याकाळ ४:३० पासूनच तयार असतो. तिथे पायथ्याशीच राहतो आणि सकाळी आम्ही चढाई सुरु केली कि मग आपला परत निघून जातो. माहुली ला गेलो कि मात्र याचे काय बिनसते काय माहित .. येतच नाही हा पठ्या. याला न कोणाची स्पर्धा न कोणाची भीती. याचे १६००० भाऊबंद दररोज महाराष्टभर हिंडत फिरत असतात. हिंडताना ते कधी लोकांची पार्सल घेऊन येतात कधी काहींचा संपूर्ण संसार ...तर कधी लग्नाचे पूर्ण व्हराड .. रोज जवळ जवळ ७० लक्ष प्रवासी प्रवास करतात ते याच्या संगतीनेच .... १७००० पेक्षा जास्त रस्ते माहित आहेत याला आणि संपूर्ण महाराष्ट पिंजून काढलाय याने.. छोट्या आणि चिंचोळ्या रस्त्यावरून सलग ९-१० तास प्रवास करतो ..असे एकाही गाव नाही जिथे हा दिवसातून एकदातरी "फ्लायिंग व्हिजीट " देत नाही. शहराच्या ठिकाणी जरी हा वेळेला महत्व देत असला तरी दुर्गम ठिकाणी गेल्यावर माणुसकीला आणि स्वतच्या उपयुक्ततेला जास्त महत्व देतो. जेष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना कमी खर्चात तर नेतोच पण नोकरदारांना मासिक पास देऊन सवलत हि देतो.सुट्टीच्या काळात तर याची गरज इतकी भासते कि आगाऊ आरक्षण करूनही नेत नाही मग तो आपल्याला. रोजच्या बा-चा-बा-ची चा याला काहीही फरक पडत नाही आणि अगदी पु.ल.नी वर्णन केल्याप्रमाणे "बा" च्या विभक्तीचे प्रत्यय लाऊन भांडणे सुरु झाली कि मात्र इंजिन बंद करून रस्त्याच्या कडेचा आश्रय घेतो. अशोक सराफांनी म्हणल्याप्रमाणे .."हमारा बस है ना .. वो सर्वसामान्य के बस मे है." काही गोष्टी न पटणारया करतो ..पण "आडला हरी गाढवाचे पाय धरी" या उक्तीप्रमाणे सहन करून घेतो आम्ही. जास्तीत जास्त निकृष्ट आणि गचाळ अश्या खानावळीत जाऊन थांबतो. थुंकसंप्रदायी लोकांनी पान/तंबाखू खाऊन उडवलेले ते "मंगलाचे सडे" पुसायची त्याची आजीबात इच्छा नसते. उलटीचा सुकाणू "सुगंध" कायम दरवळत राहावा अशी काही त्याची अपेक्षा असते.त्याच्यामधील बसण्यासाठी व्यवस्था केलेले बाकडे हे निव्वळ बाकडे याच अर्थाने तो घेतो आणि त्यात कापूस, स्पंज याचा ठावठिकाणा लागून देत नाही. संतोष मानेसारखा रंक ( सभ्य शब्दात वर्णन) जेव्हा मात्र याचा ताबा घेतो तेव्हा क्षणार्धात या वाल्मिकी चा परत वाल्या कोळी होतो. अजून एक प्रश्न तुम्हाला पडला असेल तो म्हणजे दहावेच आश्चर्य का? नववे का नाही ?? कारण मी तरी आजतागायत आठच आश्चर्य ऐकली आहेत आणि एक जागा ठेऊन हे दहावे. मधली जागा इतरांनी शोधलेल्या आश्चर्यासाठी अथवा एवढा निरर्थक लेखनप्रपंच केल्यामुळे माझ्यासाठी असेल बहुतेक.

वाचने 3436 वाचनखूण प्रतिक्रिया 16

प्यारे१ 05/03/2013 - 18:45
मस्त आहे हो तुमचा ब्लॉग! नक्की वाचत जाईन! :)

अशोक पतिल 05/03/2013 - 18:59
छान ! पण एक समजले नाही .. १६००० भाउबंद .. रोज जवळ जवळ ७० लक्ष प्रवासी प्रवास करतात .

In reply to by अशोक पतिल

सुज्ञ माणुस 06/03/2013 - 09:57
अशोकजी, 16000 भाऊबंद म्हणजे दररोज सुमारे 16000 ST धावत असतात महाराष्ट्राभर, त्यातून रोज जवळ जवळ ७० लक्ष प्रवासी प्रवास करतात.

In reply to by वेल्लाभट

सुज्ञ माणुस 06/03/2013 - 09:57
वेल्लभटजी, नक्कीच अजून लेख टाकेन. २ लेख प्रकाशनाच्या तयारीत आहेत. मुल्हेर मोरागड , आणि खांडस मार्गे भीमाशंकर चा. लवकरच टाकेन इथे.

पैसा 05/03/2013 - 20:22
मिपावर स्वागत! पण एकदम २/३ धागे टाकण्यापेक्षा लोकांना जरा वाचायला आणि ते पचवायला वेळ द्या.

स्पंदना 06/03/2013 - 05:32
हे अस इंग्लीश मध्ये ST लिहिल्याबद्दल निषेध! आम्ही कसं यष्टी म्हणतो अन कस ग्वाड वाटत. अन ती ती आहे, तो नव्हे. म्हणजे यस्टी आली, गेली, चुकली. मी आजवर कधीही येस्टी गेला म्हंटलेल ऐकल नाही. बाकी लेखन फार म्हणजे फार आवडल भावा.

In reply to by स्पंदना

सुज्ञ माणुस 06/03/2013 - 09:53
अपर्णा, अक्षय : इथे मुद्दामून "हा" म्हणाले आहे आणि त्याचे कारणही लेखात लिहिले आहे. "माझ्या याच भ्रमंतीच्या जोडीदाराने प्रत्येक वेळी त्याची कर्तव्ये नियमित आणि वेळेत पार पाडली आहेत. हा ( जोडीदार म्हणून हा )". पुढचा लेखनाचा साचा बघितलात तर "हा" हा शब्द जास्त सामर्पक वाटतो. "शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे" माझ्या लेखात तेच ओझे… जरा वेगळ्या तर्हेने ! बाकी आपण मला जेष्ठ आहात मिपा वर… आपणच सुचवावे आम्ही ऐकावे :)

राजेश घासकडवी 06/03/2013 - 06:16
लेख वाचून झाल्यावर, 'राव, थोडं अजून लिहायचं होतंत की' असं वाटत रहाणं हे चांगल्या लेखनाचं चिह्न आहे. हा छोटेखानी लेख वाचून माझं तसंच झालं. तुम्ही सुरूवातीला ज्या लाल डब्याच्या मागे लागला होतात तो मिळाला की नाही ही गोष्ट अर्धवटच राहिली. असो. तब्येतीत लिहा.

In reply to by राजेश घासकडवी

सुज्ञ माणुस 06/03/2013 - 10:19
राजेश जी, मनापासून धन्यवाद. ज्या ST साठी पळत होतो ती तर नाहीच मिळाली अन तीच सेवाताची असल्याने वडाप ने जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तब्येतीत लिहा :) हे नाही कळले हो.

अमोल केळकर 06/03/2013 - 10:07
लाल डब्याचा फोटो आवडला :) अमोल केळकर

परिकथेतील राजकुमार 06/03/2013 - 12:01
छान ओघवते लिखाण. एसटी-पुराण हा पाषाणभेद ह्यांचा अप्रतिम लेख ह्या निमित्ताने आठवला.

परिकथेतील राजकुमार 06/03/2013 - 12:02
एक विचारायचेच राहिले, मिपावरती सध्या 'शोध' हा मदतप्रकार कुठेच का दिसत नाहीये ?

चौकटराजा 06/03/2013 - 13:22
महाराष्ट्र रा प म ही संस्था ही आश्चर्यच आहे.जगातील सार्वजनिक वहातुक क्षेत्रातील हे एक मोठे प्रस्थ आहे.सर्वीस मोटार या नावाने पहिल्यांदा ही सोय चालू झाली. आजच्या प्रमाणे डबा " लाल" नव्हता. तर निळा होता. " डॉज" मेकच्या गाड्या होत्या. मागे दार नसे व पाटी गाडीच्या बाहेर टपासमोर लावण्याची पद्धत होती. नंतर फक्त प्रतिष्ठेच्या सेवांसाठी लाल रंगाचा वापर सुरू झाला. पुणे-बेतीम ही गाडी बहुदा पहिली लाल गाडी असावी. त्या गाडीत प्रवाशाना शिरवळ आले की गोल्ड स्पॉट किंवा रोजर्स ब्रॅन्ड नेम असलेले पेयाची वाटली देत. नंतर देशावर मर्सीडीस व कोकणात लेलॅन्ड बसेसचा वापर सुरू झाला. गाडीच्या फायरिंग वरून " लेलॅन्ड" ची गाडी ओळखता येत असे. तीस एक सीटची निळी बस ते व्होल्वो असा येष्टीचा प्रवास आहे.