शटर
मध्ये सपाट्याने काही हॉरर चित्रपट बघितले होते. त्यातील 'अ टेल ऑफ टू सिस्टर्स' आणि 'अॅकेशिआ' ची ओळख ह्या आधी करून दिलीच आहे. ह्याच यादीतला आणखी एक चित्रपट म्हणजे 'शटर'. 'अ टेल ऑफ टू सिस्टर्स' आणि 'अॅकेशिआ' हे काहीसे गडद गडद अंधारात घडणारे , मानसिक आंदोलने दाखवणारे चित्रपट होते, मात्र शटर ह्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आणि सतत तुमच्या मनावर एक दडपण ठेवून असणारा चित्रपट. ह्या चित्रपटात देखील रक्तपात, हिडीस चेहरे ह्याचा समावेश नाही, मात्र चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम आपल्याला खिळवून ठेवते.
टन हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर असतो. तो आणि त्याची गर्लफ्रेंड जेन एकदा पार्टीवरून परत येत असताना, जेनच्या हातून एक अपघात घडतो. ती आपल्या गाडीने एका तरुण मुलीला उडवते. गाडीबाहेर जाऊन तिला मदत करण्याच्या विचारात असलेल्या जेनला टन थांबवतो आणि त्या तरुणीला तसेच रस्त्यात सोडून दोघे निघून जातात. इथून खर्या अर्थाने चित्रपटाला सुरुवात होते.
ह्या प्रसंगानंतर एकाएकी अनेक चमत्कारिक घटना घडू लागतात. सतत आपल्या भोवती कोणीतरी वावरत आहे असे दोघांना वाटत असते. त्यातच टनने काढलेल्या प्रत्येक फोटो मध्ये एक धुरकट आकृती दिसायला लागते. कधी धुरकट सावलीच्या रूपात, तर कधी चेहर्याचा रूपात. प्रथमतः टनला हा कॅमेर्याचा प्रॉब्लेम वाटतो, मात्र तसे काहीच निष्पन्न होत नाही. इकडे जेन मात्र आपण ज्या मुलीला उडवले त्या मुलीचा आत्माच हे सगळे करत आहे ह्या निष्कर्षावर पोहोचते. टनला मात्र हे सगळे अमान्य असते.
टनच्या मित्रांना देखील आता विचित्र अनुभव यायला लागतात. टनला देखील अचानक मानदुखीचा त्रास सुरू झालेला असतो, त्याचे वजनकाटा देखील त्याचे वजन विचित्र दाखवायला लागलेला असतो. शेवटी जेन त्या अपघातग्रस्त तरुणीचा शोध सुरू करते. तपासात जेनला त्या मुलीचे नाव नात्रे असल्याचे आणि ती आणि टन व त्याच्या मित्रांचा ग्रुप कधीकाळी एकाच कॉलेजात शिकत असल्याचे समोर येते. आता मात्र टनला सत्य सांगण्याशिवाय पर्याय उरत नाही. कधी काळी त्याचे आणि नात्रेचे प्रेमसंबंध होते, मात्र त्याने नाते तोडल्यावर ते दु:ख सहन न होऊन नात्रेने आत्महत्या केल्याचे टन कबूल करतो. इकडे टनचा एक मित्र नात्रेच्या आत्म्याच्या भितीने आत्महत्या करतो. आता पुढचा नंबर आपलाच असल्याची त्याची खात्री पटते.
ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायच्या इराद्यानेच आता जेन आणि टन दोघेही नात्रेच्या आईला जाऊन भेटता. तिथे गेल्यावर नात्रेने कशी आत्महत्या केली हे त्यांना कळते, मात्र नात्रेची आई तिचा मृत्यू मान्य करायलाच तयार नसते. तिने आपल्या मुलीचे प्रेत अर्थात सांगाडा तिच्या बेडरूम मध्ये जतन करून ठेवलेला असतो. त्याच रात्री हॉटेलात उतरलेल्या टन आणी जेनवरती नत्रेचा आत्मा हल्ला करतो, ज्यात टन जखमी होतो. अथक प्रयत्नांनी दोघेही तिच्या आईला समजवतात आणि शेवटी नात्रेची विधिपूर्वक विल्हेवाट लावली जाते.
आता सर्व काही सुरळीत होईल ह्या आशेनं परतलेल्या जेनला काही फोटो मिळतात, जे नात्रेचे टनच्या फ्लॅट मधील अस्तित्व दाखवत असतात. फोटोंचा माग घेत असतानाच एका जेनच्या हातात एका बुकशेल्फ मध्ये लपवलेल्या काही जुन्या निगेटिव्ह्ज लागतात. त्या डेव्हलप केल्यानंतर एक भयानक रहस्यच जेनच्या समोर येते आणि चित्रपटाला वेगळेच वळण लागते. हे रहस्य काय असते ? टन आणि त्याच्या मित्रांच्या जीवावर नात्रेचा आत्मा का उठलेला असतो ? हे सगळे शोधायचे तर शटर पाहण्याशिवाय पर्याय नाही. आणि हो हे सर्व सोडाच पण 'टनला नक्की मानदुखीचा त्रास कशाने होत असतो' ह्या एकमेव प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी तरी शटर पाहाच पहा.
शटरचा त्याच नावाने २००८ साली अमेरिकन रीमेक देखील आलेला आहे, तर हिंदीत तो क्लिक नावाने आला होता. मी तरी तुम्हाला 'ओरिगिनल' शटरच बघण्याचा सल्ला देईन. अर्थात जालावर त्याचे सबटायटल्स सहजपणे उपलब्ध आहेतच. एका वेगळ्या प्रकारचा हॉरर चित्रपट बघायची इच्छा असेल आणि मिनिटा मिनिटाला नवनवे धक्के बसणे आवडत असेल तर शटरला पर्याय नाही.
हा संपूर्ण चित्रपट आंतरजालावर फुकट उपलब्ध आहे.
वाचने
4366
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
प्रतिक्रिया
परीक्षण नेहमीप्रमाणेच झकास आणि चित्रपट पाहायला उद्द्युक्त करणारे.
In reply to परीक्षण नेहमीप्रमाणेच झकास by प्रचेतस
परीक्षण झकास :)
आपल्याकडुन नै पाहीला जाणार पण , हे नम्रपणे नमुद करु इच्छिते ;)
परीक्षण नेहमीप्रमाणेच झकास.
बहुतेक करुन इन्ग्लिश पाहिला आहे... हा तोच असेल तर... 'भुत मानगुटीवर बसते' ही म्हण खरी करणारा सिनेमा आहे हा.
बरोबर ना पराशेठ?
In reply to मस्त आहे .. by साबु
हेच ते मानगुटीवरचे भूत
परीक्षणामुळे चित्रपट बघण्याची उत्सुकता वाढली.
जबरा चित्रपट ओळख.
'ओरिगिनल' आणि इंग्रजी रिमेक दोन्ही पाहिले आहेत.
नि:संशय 'ओरिगिनल' बेस्ट. :)
परीक्षण आवडले..(तुम्ही नेहमीच चांगले लिहीता..) ..तुमचे परीक्षण आमच्या मानगुटीवर बसले आहे.
चित्रपटाच्या शेवटाचा (म्हणजे रहस्याचा) अंदाज आलाच...(तो अंदाज बरोबर आहे की नाही हे पहाण्यासाठी मी विकीपिडीयावर या चित्रपटाची पुर्ण कथा वाचली आणि माझा अंदाज बरोबर निघाला...)
तसे म्हणायला गेले तर कथा अशी काही धक्का बसावा अशी नाही आहे....कथेत एकदम वेगळे वाटावे असेही काही नाही आहे. कदाचित त्याचे सादरीकरण कसे केले आहे ते पहाण्यासाठी चित्रपट पहावा लागेल...
In reply to छान.. by योगी९००
तुमचे परीक्षण आमच्या मानगुटीवर बसले आहेअगदी अगदी! - (ताठ मानगुटीचा) सोकाजी
परीक्षण झकास वो पराशेठ !
पर तुमी मिपा वरच्या भोळ्या-भाबड्या (????????) जन्तेला कोरियन निस्त्या हर्रार पिक्चार्चीच का ओळख करून देऊन ऱ्हायाले
अशानं त्येंच्या मनात कोरियन पिक्चर म्हंजी फक्त हर्रार असा नाय बसनार का ?
"When i turned nine,A millionaire's first love,Who slept with her,Welcome to Dongmakol, Daisey,My sassey Girl,My wife is a Gangster,.(तिन्ही भाग) ,200 pounds beauty यांची बी ओळक करून द्या की जरा.
In reply to परीक्षण झकास वो पराशेठ ! by lakhu risbud
.
मस्त परिक्षण.
हार्ड डिस्क घेऊन येतो, एकदाच सगळे पिक्चर कॉपी करुन देणे.
अवांतर : च्यायला परिक्षणे लिहताना जरा कथा शेवटापर्यंत न्हेत जावा, मुळ वळणावर कथा आणुन बाकीचे चित्रपटात पहा हे पेप्रातल्या परिक्षणासारखे झाले. तुम्ही आपलं फुल्ल मुव्ही कव्हर करत जा :)
- छोटा डॉन
In reply to झकास ... by छोटा डॉन
आवांतराशी सहमत.
हवे तर पांढर्या अक्षरात लिहा. ज्यांना वाचायचे नाही ते वाचणार नाहीत.
हाय काय अन नाय काय?
ह्या थाई पिक्चरचा बॉलीवूडने आधीच चुराडा केलाय... श्रेयस तळपदेचा क्लिक.
नाही, मी हा सिनेमा पाहणार नाही.
अॅकेशियाचा करूण शेवट अजूनही मनात आहे.
उत्तम चित्रपट परीक्षण
इतक्यात नाही कधीतरी ( मिपावर माझा पापड मोडल्यावर)
मी वेगळे संस्थळ काढले तर परीक्षणाचं कॉलमचं कायम कंत्राट तुम्हालाच !!!!
छान परिक्षण...बघतो आज..
@ लखु शेठ :- हा चित्रपट थाई आहे हो. आणि आता सुरुवात केलीच आहे, तर देतो हळु हळु इतर चित्रपटांची ओळख सुद्धा.
@ योगी :- हो, कथा तशी थोडीच वेगळी आहे, मात्र सादरीकरण निव्वळ अप्रतिम.
@ रेवती काकु :- हा चित्रपट इतर दोन्ही चित्रपटांपेक्षा पूर्ण वेगळा आहे. करूण वैग्रे तर नक्कीच नाही. एकदा बघाच.
@ डाण्या न गणपा :- नेक्स्ट टैमला तुम्ही म्हणता तसे करून बघतो नक्की.
@ रामदास काका :- मानधनाचे काय ? ;)
हॉरर पंधरवडा/महिना चाललाय काय तुझा?
हे असले पिच्चर पाहिले की मला झोपेत असलीच स्वप्ने पडतात. म्हणून मध्यंतरी पहायचे सोडले होते, आता ही अशी परिक्षणे वाचून परत हॉरर मूवींकडे वळण्याची इच्छा झाली आहे.
परीक्षण नेहमीप्रमाणेच झकास