आतले आणि बाहेरचे... (२)
लेखनप्रकार
ह्या लेखाचा आधीचा भाग येथे वाचावा...
आतले आणि बाहेरचे... (१)
----------------------------------------------------------------------
आपण शाळेत शिकतो की इंग्रज भारतात व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. आपला इतिहास आपल्याला सांगतो की इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले आणि आपल्या गुलामगिरीची वागणूक दिली. मग काही थोर मंडळी पुढे आली त्यांनी देशाला नेतृत्व दिल , देशात स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला आम्ही स्वतंत्र झालो. वय वर्षे १० ते १६ ला हे एवढं पुरेसं असेलही आणि त्याचमुळे की काय आपल्या शालेय इतिहासात असं रंगतादार इतिहास सांगितलेला असतो. पण जेव्हा आपण मोठं होतो तेव्हा लक्षात येतं की जगात असं १००% कृष्ण-धवल (ब्लॅक ऍण्ड व्हाईट) काहीच नसतं. खूप सारे आयाम आपल्या नजरेसमोरच आलेले नसतात. मोठं होणं आणि जाणतं होणं म्हणजे हेच की, खरं काय आहे आणि योग्य काय आहे त्याचा शोध घेणं. आपली नजर अशी बहुआयामी होणं.
पण आपण हे असं मोठं होतच नाही. त्या आधीच आपण कुठल्यातरी विचारसरणीची झूल आपल्यावर ओढतो आणि सुरू होतो आपला प्रवास आपल्या गटातील विचारांचा,विचारवंतांचा प्रभाव वाढवण्याचा सोबतच, त्यांचे जे विरोधक होते किंवा आहेत त्यांना विरोध करण्याचा. आपण काय करतोय हे खरं तर आपल्याला माहितीच नसतं. पण आपण जेथे उभे असतो तेथून मात्र आपण योग्य आणि १००% बरोबर असल्याचं दिसतं - आपल्यालाच भासतं. मग आपला जोष अधिकच वाढतो. यापुढे आपलं सगळं वाचन, मनन एक दिशा ठरवून होतं. येथे एक लक्षात घ्या वाचन किंवा मनन दिशा ठरवत नाहीये तर दिशा ठरवून वाचन आणि मनन होतं. नेमकं चुकतं येथेच... सारा घोळ येथेच.
काही लोक मात्र ही अशी झूल पांघरायला नकार देतात, आपला नवा, स्वतंत्र विचार मांडतात. त्यामुळे आधीच्या संथ पसरलेल्या समाज सागरात वादळ उठतं, लोकांच्या विचारांना धक्का बसतो, त्यांच्या स्वप्रतिमेला तडे जाऊ लागतात. मग त्यांचा विरोध होऊ लागतो. ह्या लोकांना हा विरोध त्यांनी मांडलेले विचार चुकीचे आहेत यामुळे कमी आणि त्या विचारांमुळे आपल्या हितसंबंधांना बाधा येते म्हणून जास्त असतो.
अश्याच झूल पांघरायला नकार देणार्यांची परंपरा भारतात खूप आहे. मात्र आपल्या सुदैवाने महाराष्ट्राने यात नेहमीच वरचा क्रमांक पटकावला आहे. या झूल पांघरायला नकार देणारे न्या. रानडे,महात्मा फुले, गो.ग. आगरकर, ताराबाई शिंदे, छ. शाहू महाराज, वि.रा. शिंदे, पंडिता रमाबाई, विष्णूबुवा ब्रह्मचारी, बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, धो.के. कर्वे, र.धो.कर्वे, भाऊराव पाटील असे अनेक नामवंत आहेत. यातील प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात वेगळा विचार देऊन गेलेला आहे. किंवा कित्येकदा नव्या विचारांचे प्रवर्तन सुद्धा यांनी केलं आहे. जेव्हा जेव्हा यांनी कुठलाही नवा विचार मांडला तेव्हा तेव्हा प्रस्थापित व्यवस्थेने त्या नव्या विचाराला विरोध केला. हा विरोध तो विचार वाईट आहे किंवा चुकीचा आहे या साठी नव्हता तर तो विचार आताचे जे प्रस्थापित आहेत त्यांचे हितसंबंध धोक्यात आणतो म्हणून होता.
विरोध कशाला झाला?..
मानसाला माणूस मानण्याला झाला. स्त्रियांना बरोबरीने वागणूक देण्याला झाला, विधवांना पुनर्विवाह करण्यासाठी झाला, त्यांच्या शिक्षणासाठी झाला, विरोध अस्पृश्यांच्या उथ्थानासाठी मिशन स्थापण्यासाठी झाला, संतती नियमना बद्दल जनजागृती बद्दल झाला, सामाजिक व धार्मिक सुधारणांचा आग्रह 'सुधारक' मधून करण्याला झाला. समाजाचा एक घटक अर्थशास्त्राच्या दृष्टीने पूर्णतः अनुत्पादक आहे असं म्हणण्याला झाला, नैसर्गिक तळ्यावर पाणी पिण्याला झाला, गाईला उपयोगी पशू मानण्याला झाला. हिंदू कोड बिलाला झाला, धर्मांतराला झाला, नामांतराला, मागे राहिलेल्यांना विकासाची संधी मिळावी असं म्हणण्याला सुद्धा झाला.
स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्य मिळाल्यावरचा काळ फार धकाधकीचा होता असं मानतात. भारताला नवीन असलेल्या अनेक गोष्टी या काळात भारताच्या मातीत रुजल्या, उमलल्या आणि भरभरून वाढल्या सुद्धा, फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या नव्या मूल्यांची ओळख भारतीय समाजाला झाली. बुल्शेवीक क्रांतीची धग भारतापर्यंत पोहोचली. आमचे मानवेंद्रनाथ रॉय, पंडित नेहरू, स्वा. सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंह आदी लोक या नव्यामुल्यांनी भारावले. यातील प्रत्येकाने परकीय भूमीवर झालेल्या स्वातंत्र्य लढ्यापासून वाढीव प्रेरणा घेतली. विचार घेतले.
त्यांनी घेतलेले विचार आपल्यासाठी नवे होते म्हणून कदाचित आपल्याला त्याचं आकलन झालं नसावं म्हणून आपल्या समाजाने त्याला विरोध केला, असा बचाव आपण थोडा मान्यही करू, मात्र आज स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे झाली तरीही आपण तटस्थ होऊन आपल्या पूर्वजांकडे पाहण्याची हिंमत करू शकत नाहि याला काय म्हणावं?
मानसिक अपरिपक्वता, की अपंगत्व?
जरा विस्ताराने सांगतो... त्याकाळी ह्या लोकांना किंवा यांच्या विचारांना किंवा यांच्या वादाला म्हणा हवं तर, विरोध करणार्या लोकांचे काही हितसंबंध धोक्यात आले होते म्हणून त्यांनी विरोध केला असं मान्य करू पण त्याकाळात ह्या नेत्यांनी दाखवलेली वाट योग्य होती, आपल्या समाजाचा एक भाग असा अधू ठेवून आपल्याला प्रगती करता येणार नाही हे खरं होतं आणि आहे, असं मान्य करायला आम्ही आजही तयार नाही.
आज का नाही? कारण आमच्या पूर्वजांना यांनी शिव्या घातल्याहेत. 'हे' लोक यांची लायकी काय? आणि कुठे जाऊन बसलेत हे' असं आणि अधिक खूप काही. पण हे सगळं आज किती योग्य याची दखल कोण घेतंय? इसवी सन. १९२७ ला यांनी असं लिहिलं... असं म्हटलं आदींचे दाखले देत आता वाद घालायचा कारण काय? तर....
अरेरे... चुकलंच ... एकदा झूल पांघरली की असे कारणं विचारायचे नसतात. मग फक्त आपले आणि परके , आतले आणि बाहेरचे...
हे एवढं कमी होतं म्हणून की काय... ह्या लोकांनी ज्यांनी बुद्धिप्रामाण्यवादाला, विवेकवादाला प्राधान्य द्या असा संदेश दिलाय त्याचे सुद्धा असेच गट आम्ही बनवलेत. ज्यांनी ग्रंथ किंवा शब्द प्रमाण मानू नका तर त्या मागचा संदर्भ पाहा असे सांगितले त्यांचे अनुयायी (?) सुद्धा आता त्यांचा ग्रंथ प्रमाण माना आणि त्यांनी लिहिलं तेच प्रमाण अशी आग्रहाची भूमिका घ्यायला लागलेत.
मुळात ह्या नवीन विचाराच्या लोकांनी आपला मेंदू कुणाकडेही गहाण टाकायला विरोध केला आहे. आज आम्ही मात्र त्यांच्याच पायाशी आमचा मेंदू गहाण टाकतोय.
पुन्हा शाळेतील धडा आडवतोय, त्याचं नाव होतं 'महापुरुषांचा पराभव' ह्यात जनार्दन वाघमारे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात.
एक छान उदाहरण आठवतंय. अमरावतीला संत गाडगेमहाराजांची समाधी आहे. त्यांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त तेथे मोठा कार्यक्रम होतो. मोठी शोभायात्रा निघते. जन्मभर 'देव दगडात नाही, दरिद्री नारायणाच्या रूपाने तुमच्या समोर उभा आहे, त्याची सेवा करा असे सांगणारे गाडगे बाबा. लोक त्या दिवशी त्यांनी वापरलेल्या गाडीची पुजा करतांनी मी पाहिलेत.
कुणाचा विचार काय होता याचेशी आम्हाला काही सोयरसुतक नाही. आम्हाला तर बस आपले आणि परके कोण हे पाहून; विरोध किंवा जयजयकार करण्यात जास्त रस दिसतो.
इतरांचं सोडा मात्र आपण ज्यांना आदर्श मानतो किमान त्यांचं तरी चरित्र किंवा त्यांचं लिखाण आपण वाचतो का? ह्या बद्दल धक्कादायक माहिती मला मिळाली तेव्हा, जेव्हा महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नावानं रान उठवल्या जात होतं. त्यावेळी भर रस्त्यावर अर्वाच्य शिव्या देणार्या कार्यकर्त्याला जेव्हा शिवाजी महाराजांबद्दल ५ प्रश्न विचारले तरी सुद्धा बरोबर उत्तरे देता आली नाहीत.
सावरकरांना मानणार्या लोकांना मी 'एवढं' सोडून सावरकर मान्य असं म्हणताना निदान ऐकलं तरी आहे. बाकी सामान्यतः सर्वत्र आनंदच असतो.
एवढं सांगून नेमकं पोहोचायचं कुठं आहे? तर आज आपण स्वतंत्र भारतात राहतो. तुम्ही सांस्कृतिक भारताचा अभिमान बाळगणारे असा किंवा नव्याने अस्तित्वात आलेल्या भारताचे नागरिक असा, या दोन्ही विचारसरणीत आपल्या विरोधी मताबद्दल आदर बाळगण्याची परंपरा आहे नव्यासाठी हे आधुनिक मूल्य आहे असं म्हणूया. तर या आपल्या विरोधी मताचं नेमकं म्हणणं तरी काय आहे किमान तेवढं ऐकातरी !
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत.
जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित.
नीलकांत
वाचने
15959
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
दोन्ही भाग उत्तम!
लाखाची गोष्ट
दुसरा भागही फार आवडला
नतमस्तक!
In reply to नतमस्तक! by प्रमोद देव
अगदि हेच म्हणतो...
In reply to अगदि हेच म्हणतो... by अभिज्ञ
हेच म्हणतो
In reply to अगदि हेच म्हणतो... by अभिज्ञ
नीलकांता!
महापुरुषांचा पराभव
अभिनंदन
मॅट्रिक्स, आतले -बाहेरचे
ही
सुरेख..!
अगदी आत्ता आत्ताचं उदाहरण,
इरावती कर्वे
अप्रतीम
पुन्हा एकदा अभिनंदन नीलकांता!
शाबास नीलकांता...
छान लेख-
प्रगल्भ
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to प्रगल्भ by नंदन
असेच म्हणतो
मैलिक लेख
गतानुगतिकता