गाण्यांच्या शोधात
कधी कधी बर्याच गाण्यांचा विचार डोक्यात घोळत असतो. विचार घोळवावा लागतो. गाणी एकरूपच असतात, ती घोळवावी लागत नाहीत. एखाद्या गाण्याचे शब्द, लय, ताल, राग, सुरावट लक्षात राहण्यामागे कारण काय असेल? जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं.
उदाहरणं अनेक आहेत . असा बेभान हा वारा हे गाणं ऐकताना मी नेहमी मला एका चित्राचा कोपरा समजत आलो आहे. ते चित्र इतकं सजीव आहे की मला ते अगदी तसंच शब्दात बांधणं जमत नाही.
असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ ?
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ ?
ह्या दोन ओळींआधी जी सुरावट आहे ती मला अगदी वास्तवातल्या बेभान वार्याचा अनुभव देते. ती सुरावट आणि ह्या दोन ओळी ऐकताना मी स्वतःच ती स्त्री आहे असं वाटू लागतं. वार्यावर सैरभैर झालेला पदर आणि केस. हिंदकळणारी नाव. हातातं असहाय पडलेलं वल्हं. प्रत्येक क्षण नाव उलटवेल की काय असं भासवणारा.... अनं मनात एकच प्रश्न, कशी येऊ....
जटा पिंजून या लाटा विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जिवाचे पूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू ?
हे प्रत्ययकारी वर्णन एकतर अनुभवावे किंवा त्या गाण्याशी एकरूप व्हावे. अनुभवणे सगळ्यांनाच शक्य नाही. म्हणूनच हे शब्द, सूर ताल एकत्र येतात आणि मग तंद्री लागते. ती तंद्रीदेखील त्या अनुभवाजवळ घेऊन जाते. भिडे काळोख प्राणांना मधला लांबवलेला 'प्राणांना' डोळे बंद करून ऐकताना आपले प्राण एकाद्या काळेख्या पोकळीत तर नाहीत ना असं वाटतं. दिशांचे भोवरे अनेकवेळा होतात. त्यांना शब्दांत इतक्या सहजतेने पकडता येईल असं वाटलं होतं? इतक्या प्रलयकारी वर्णनानंतर अखेरच्या ओळीतला समर्पित भाव आपोआप येतो. आपोआप शब्दांत येतो. आपोआप स्वरांत येतो. हा भाव लिहिणार्या, संगीत देणार्या आणि गाणार्यांना गवसला आणि तो तितक्याच उत्कटतेने त्यांनी आपल्यासमोर मांडला आहे. आपल्या रसिकतेबाबत गाणं चोखंदळ असतं. अशी गाणी असतील तर आपण गाण्याबाबतील चोखंदळ असण्याची गरज उरत नाही.
कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडिले धागे
बुडाले गाव ते आता, बुडाले नावही मागे
दिले, हे दान दैवाने करी माझ्या कशी घेऊ ?
ह्या कडव्यातला स्वरांचा बदल ऐका. तोडिले धागे ऐकेपर्यंत स्वरांची चढती कमान लागते. अन बुडाले नावही मागे म्हणे पर्यंत तेच स्वर पुन्हा शब्दांना मिंधे होऊन पायाशी येतात. दैवाचे दान शब्द आणि स्वरांच्या अगतिकतेतून येते. दान आणि दैवाने हे शब्द ऐकताना तर गातानाही आवंढा गिळावा इतकं दु:ख झाल्याचं भासतं. ह्याक्षणी मी परत स्वतःला त्या स्त्रीच्या रूपात पाहतो. मला तिची ओळख नाही. अन मी तिच्यात एकरूप झाल्याने मी स्वतःलाही ओळखू शकत नाही. कूळ, इभ्रत, गाव, नाव काहीच आठवत नाही. मूळ कवीचा अनुभव वेगळा असावा. त्याला समाजातील, रूढींच्या बंधनावर टीका करायची असावी. असेलही. पण ती भावना महत्त्वाची. तो अनुभव देण्याची ताकद हे शब्द आणि स्वर पेलतात.
जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया हे तुझी होऊन मी आले
तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ ?
ह्या कडव्याचा मी अजून पत्ता शोधतो आहे. गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. पण तोवर जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्ह्या परत हे चित्रं आणखी ताकदीनं समोर उभं राहतं. त्या दुमडलेल्या कोपर्यासहित!
वाचने
9439
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
अत्यंत सुरेख !
सुंदर!
सुरेख...
एकदम - मस्त.....
सुंदर
ॐकार,
उत्तम रसग्रहण!
असा
अप्रतिम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to अप्रतिम by नंदन
असेच..
उत्तम...
उत्तम रसग्रहण....
फारच सुंदर रसग्रहण ॐकार!
सुंदर रसग्रहण
अतिशय उतम !