Skip to main content

दुष्काळ

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 11/03/2013 08:35 या दिवशी प्रकाशित केले.

पाऊस अडतो, माती काळी

कातर वेळी, रिक्त झोळी 

 

थोडीशी जमीन, थोडेसे आभाळ

मोठ्या चेहर्‍यावर, छोटे कपाळ

 

वितभर पोटास, पेरभर अन्न

मुठभर काळीज, सुन्न सुन्न

 

झकपक विज, शहरी वेग

गाव आंधळे, भुईला भेग

 

राऊळाशी रांग, लांबच लांब

विठू न राखे, त्याचाच आब

 

कां रे असे, जगणे विटाळ?

रात्र काळ, दिवस दुष्काळ! 

 

|- मिसळलेला काव्यप्रेमी -| 

(०५/०३/२०१३) 

टिपः माननीय स्पाराज टाकरे यांनी व्यक्त केलेल्या जाहीर अपेक्षाभंगाला उत्तर म्हणून हि रचना देण्यात येत आहे. कवावे.माननीय स्पाराज टाकर्‍यांनी यावर आपले मत कळवावे, अशी मी विनंती करत आहे.

काव्यरस

वाचने 7022
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

काय बोलू सुचत नाहीये भावना थेट पोचल्या .
झकपक विज, शहरी वेग गाव आंधळे, भुईला भेग राऊळाशी रांग, लांबच लांब विठू न राखे, त्याचाच आब कां रे असे, जगणे विटाळ? रात्र काळ, दिवस दुष्काळ!
अंगावर आली कविता रोज दुष्काळी बातम्या पाहून .. जाम जीव जळतोय. स्वतः २४ तास पाणी वापरताना सारखा 'त्यांचा' विचार मनात येतो. जमेल तसे पाणी जपून वापरायला शिकलोय, भांड्यातले उरलेले पाणी झाडांना घातले जाते. दुष्काळ ग्रस्त लोकांसाठी सरकारने जी रोजदारी वर काम सुरु केली आहेत, त्याची रोज्दारीही त्यांना मिळत नाही . हंडाभर पाण्यासाठी शाळेतली मुलं सर्व सोडून दिवस दिवस वणवण भटकतात . तर दुसर्या बाजूला अजून एक बातमी :- तहान भागवायला मुंबईकरांसाठी अजून एक धरण. काय बोलायचे ... शब्दच खुंटले. पाण्याची सर्वात जास्त नासाडी मुंबईत होते . तरी मुंबईला २४ तास पाणी .

खरच विचार करायला लावणारी कविता आहे मिका दादा ! :( आवडली म्हणायलाहि कससच होतय .... खोलवर पोहोचली म्हणेन .

हं! मिका कोष फुटतोय, पंखांची चाहुल आहे या कवितेत. कुठंस वाचल होतं, कोष फुटताना फुलपांखरांची पंख मऊ असतात. पण त्याच पंखांनी तो कोष फोडायचा असतो. जर बाहेरच्याने मदत करुन कोष फोडुन दिला तर त्या पंखांना बळ येत नाही. अन त्या फुलपाखराच जीवन छोट होत म्हणे.

एक नम्र विनंती, तुम्ही लोकक्षोभाला बळी पडुन वगैरे कविता करु नयेत. हल्ली कुणाचे कुठं कसे कधी अपेक्षाभंग होतील ह्याची खात्री नाही. तुम्ही आपलं प्रेमाबद्दल लिहित रहा, छान छान, दुष्काळ अन दुख जगभर आहेच की आम्हाला, तुम्हीपण त्याच वाटेवर घेउन चाललात तर कसं व्हायचं आमचं ?

In reply to by ५० फक्त

ह्म्म्म खरय दाद्या .. तु असल्या कविता नको करत जाऊस :( ५० कधी कधी(च) मनातलं बोलुन जातात ..

In reply to by ५० फक्त

तुम्ही आपलं प्रेमाबद्दल लिहित रहा, छान छान, दुष्काळ अन दुख जगभर आहेच की आम्हाला, तुम्हीपण त्याच वाटेवर घेउन चाललात तर कसं व्हायचं आमचं ?
अरेरे अपेक्षाभंग झाला वाटत.
तुम्ही लोकक्षोभाला बळी पडुन वगैरे कविता करु नयेत. हल्ली कुणाचे कुठं कसे कधी अपेक्षाभंग होतील ह्याची खात्री नाही
खरय अगदी =))

In reply to by ५० फक्त

दोन वेळा उत्तर द्यायचा प्रयत्न केला, दोन्ही वेळेस मिपा गंडले. तर झाले असे कि, मी स्टार माझा वर एक स्पेशल रेपोर्ट पाहीला मराठवाडा, विदर्भातील दुष्काळावर. त्यातली काही दृश्य अगदी हादरवून गेली. त्यातून हि कविता उमटली. नंतर आठवले स्पारावांनी अशी काहीतरी सूचना केली होती, म्हणून सहज गंमत म्हणून ती टिप टाकली. असो. सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार.

खुप वास्तववादी आहे कविता...भीषण आहे परिस्थिती :(

मिटरमधे थोडी गंडली आहे. पण, आशय छान. (आमचा धोंडोपंत मित्र यांनी देवद्वार छंदाबद्दल घेतलेला तास इथे) -दिलीप बिरुटे

मिसळलेला काव्यप्रेमी साहेब, अतिशय जबरदस्त आशय असलेली कविता. तुमच्या कवितेत दुसर्‍यालाही विचार करायला लावणार बळ आहे. अतिशय सुन्न व्हायला लावणारी कविता. सशक्त आशय मोजक्या पण काळजाला थेट भिडणार्‍या ओळीत तुम्ही व्यक्त केला आहे. दुष्काळावर अतिशय बोलक भाष्य करणारी कविता.