कडकलक्ष्मी
काव्यरस
ढोलकी गळ्यात नि डोक्यावर देव्हारा
आधार नसुनही सावरते डोलारा
विटलेले हिरवे लुगडे, मळवट भाळी,
अंगात खणाची ठिगळांची काचोळी
काखेत पिरपिरे एक, एक धरि हाती,
अन् अंश आणखी एक उपाशी पोटी
सावळ्या मुखावर गर्भतेज सुकलेले,
ओढीत चालते माय पाय थकलेले
पदपथी सावली हेरुन बसली खाली,
टेकले देव, पोरांना खाऊ घाली
तो तिचा सोबती, राकट, कभिन्न काळा
हळदीचा मळवट, टिळा तांबडा भाळा
कमरेस झोळणा चिंध्यांचा कसलेला,
केसांचा बुचडा मानेवर रुळलेला
चाबूक वाजवी, गळा कवडिची माळ,
अनवाणी पायी छमछमणारे चाळ
दगडांचा मांडुन खेळ चिमुरडी रमली,
लक्ष्मीच्या हाती तशी ढोलकी घुमली
हातीचा चाबुक पुजुन सज्ज तो झाला,
घातले साकडे, कौल लावि देवाला
हातात उतरली कडकलक्षुमी नियती,
आसूड ओढते उघड्या पाठीवरती
क्षण एक गर्दिचे काळिज लक्कन हलले
जणु फटक्यांचे वळ मनामनावर उठले
संपता खेळ त्याचा, गर्दी हळहळली,
पसरता हात त्याने, माघारी वळली!
वाचने
2486
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
.......!
अतिशय चित्रदर्शी काव्य
In reply to अतिशय चित्रदर्शी काव्य by चतुरंग
+१ हेच
In reply to +१ हेच by प्राजु
+२
सुंदर
अशा प्रथा