Skip to main content

कडकलक्ष्मी

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 13/02/2010 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
ढोलकी गळ्यात नि डोक्यावर देव्हारा आधार नसुनही सावरते डोलारा विटलेले हिरवे लुगडे, मळवट भाळी, अंगात खणाची ठिगळांची काचोळी काखेत पिरपिरे एक, एक धरि हाती, अन् अंश आणखी एक उपाशी पोटी सावळ्या मुखावर गर्भतेज सुकलेले, ओढीत चालते माय पाय थकलेले पदपथी सावली हेरुन बसली खाली, टेकले देव, पोरांना खाऊ घाली तो तिचा सोबती, राकट, कभिन्न काळा हळदीचा मळवट, टिळा तांबडा भाळा कमरेस झोळणा चिंध्यांचा कसलेला, केसांचा बुचडा मानेवर रुळलेला चाबूक वाजवी, गळा कवडिची माळ, अनवाणी पायी छमछमणारे चाळ दगडांचा मांडुन खेळ चिमुरडी रमली, लक्ष्मीच्या हाती तशी ढोलकी घुमली हातीचा चाबुक पुजुन सज्ज तो झाला, घातले साकडे, कौल लावि देवाला हातात उतरली कडकलक्षुमी नियती, आसूड ओढते उघड्या पाठीवरती क्षण एक गर्दिचे काळिज लक्कन हलले जणु फटक्यांचे वळ मनामनावर उठले संपता खेळ त्याचा, गर्दी हळहळली, पसरता हात त्याने, माघारी वळली!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2501
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by चतुरंग

+१ हेच म्हणते. चित्रदर्शी तर आहेच. पण काळजात कालवाकालव ही झाली कविता वाचून. - प्राजक्ता http://www.praaju.com/

क्रांती सुंदर अ‍ॅज युज्वल :) पसरता हात त्याने, माघारी वळली! खिन्न ! केलं या ओळीनी. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)