अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ४)

Primary tabs

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in जनातलं, मनातलं
19 Oct 2020 - 5:55 pm

यापुर्वीचे भाग आपण ईथे वाचु शकता
अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १)

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २)

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ३)

भेटीसाठी शामियाना उभारिला:-

भेटीसाठीजी जागा शिवाजी महाराजांनी निवडली ती सुध्दा अतिशय मोक्याची होती.टेहळणी बुरुजाच्या खाली सपाटी होती जीला "जनीचा टेंबा" म्हणत.हि जागा प्रतापगडावरुन व्यवस्थित दिसते तर पार गावात जिथे अफझलखानाची छावणी होती तिथून मात्र अजिबात दिसत नाही.म्हणजे पार गावातील छावणीतील सैन्याला वर काय चालले आहे ते लगेच समजणे शक्यच नव्हते.शिवरायांनी अशी जागा निवडली की सदरेत होणारी मसलत सर्वांना दिसेल, बुरुजावरील तोफ अशी ठेवली कि भेटीचा शामियाना आणि खानाचे सैन्य दोन्ही टप्यात येईल. व सहज दिसतील.

  भेटीसाठी शामियाना उभारलेले जनीचा टेंबा हे ठिकाण.हे गडावरुन स्पष्ट दिसते मात्र पायथ्यातून अजिबात समजत नाही.


 
शिवरायांनी त्या ठिकाणी सपाट जागेत उत्तम सदर तयार करण्यास अण्णाजी रंगनाथ मालकरे यांस सांगितले, येण्याची वाट झाडे तोडून दगड हटवून सोपी करून दिली,पण जिथे जिथे वाट रुंद होती तिथली वाट जाणून बुजून अरुंद केली गेली कि जेणेकरून जास्त लोक एका वेळी येऊ शकणार नाहीत.शिवाजी महाराजांनी खुद्द प्रतापगडावरही नियोजन पूर्वक बंदोबस्त आखला होता. दर बुरजास ५० मावळे, मागील व पुढील बाजूस १०० मावळे, दरवाजावर तसेच कचेरी नजीक तोफा ठेवल्या, तोफांचा आवाज होताच सर्वांनी हुशार व्हावे असा इशाराच देवून ठेवला. [ संदर्भ - शिवद्विग्विजय १६५]भेटीच्या सदरेच्या मागच्या अंगाला एका खोल दरीत, गर्तेत हिरोजी फर्जंद असे विश्वासू ४० माणूस लपविले.

सदर
- तयार केलेली सदर शाही इतमामास साजेशी होती. डेरे,बिछाने, अस्मान्गिरी गिर्द्या ,तक्के ठेवून जागा सजविली होती.डेर्यास चंद्रराई कळस सोन्याचे बसवले होते .मोत्याच्या झालरी लावल्या होत्या ,उंची मखमली पडदे होते.शामियान्यात एक चौथरा तयार करोन खाशांस बसण्याची व्यवस्था लावली होती.चौथरा ३३ फुट रुंद ,दक्षिणोत्तर ४० फुट असा होता. शामियान्यात काय चालले आहे हे जवळच्या बुरुजावरुन नीट पाहिले जाऊ शकत होते. शिवाजीं राजानी शरीररक्षकांना भेटीच्या जागेपासून काही अंतरावर आणि सैन्याच्या तुकडी आणखी दूर म्हणजेच बाण सोडण्यापेक्षा टप्प्याच्या पुढे ठेवली. शिवाजी राजांनी खानाच्या माणसांना भेटीच्या दोन दिवस आधी शामियान्याची व्यवस्था तपासण्यासाठी परवानगी दिली!

      तयारी - सैन्य चौफेर पसरेल असे ठेवले होते,"चौकशीस हवालदार ,किल्लेदार,कारकून,कारखाननिस आदिकरून जातीने राहून चौकशी करावी,राखावी,यावे-जावे. वाड्यापर्यंत दरवाजाचे आत ठायी ठायी चौकी-पहारे असावे,दरवाज्यावरी-कचेरीनजीक तोफा ठेविल्या . बार होताच हुश्शार व्हावे " अशी ताकीद राजांनी दिली .

बुरुजाच्या आतल्या बाजूस पन्नास तोंडाशी शंभर, मोकळ जमिनीस शे-पन्नास अशी किल्ल्यावर व्यवस्था.तर किल्ल्याखाली व सभोवताली व्यवस्था अशी होती. चंद्रगडावर जमाव ठेवला,हैबतराव व बालाजी शिलीमकारास बोचेघोळ घाटी ठेवले, नेतोजी पालकर घाटमाथ्यावर थांबले,जावळीच्या अंगाला बांदल सैन्य थांबले.हिरोजी फर्जंद मंडपाजवळील दरडीत पन्नास माणसानिशी लपले.

     
शिवाजी राजांनी सैन्य व्यवस्था अशीच का केली ?दूर महाबळेश्वर पठारावर नेताजी पालकर आणि मोरोपंत पिंगळे पार घाटाजवळील का? बोचेघोळ येथील बांदल देशमुख आणि कन्होजी जेधे प्रतापगड येथे हबशी सैन्याच्या तोंडी का? या प्रत्येक लहान तपशीलामध्ये एक तर्क आहे, एकही दल मनमानी पद्धतीने ठेवलेले नाही.

     मोरोपंत पिंगळे हे प्रामुख्याने पायदळ सैन्याचे नेतृत्व करीत होते. ते प्रतापगडच्या पायथ्यावरील खोल घळी आणि जंगलांसाठी योग्य होते. शिवाय, मोरोपंतनी स्वतः प्रतापगड बांधण्यात सक्रिय पुढाकार घेतला होता आणि म्हणूनच त्यांना किल्ल्याची व त्याभोवतीची सखोल माहिती होती. नेताजी पालकर यांची घोडदळ वाईच्या वेगाने प्रगती करण्यासाठी आणि तिथे ठेवलेल्या अफझलखानाच्या तळावर आणि तोफखान्यांवर हल्ला करण्यासाठी योग्य
होती. शिवाय अफजलखानच्या सैनिकांच्या जवळ असलेल्या झुडुपामध्ये घोडदळ ठेवणे आणि प्रतापगड येथे पायद्ळ ठेवणे इतकी चांगली कल्पना असू शकत नाही. बांदल देशमुख हे रोहिडा भागातील देशमुख होते आणि म्हणूनच बोचेघाली आणि पार घाट या अरुंद ठिकाणी गनिमी युद्धाला योग्य होते. शेवटी, कान्होजी जेधे यांना हब्शी सैन्याचा सामना करण्याचे सर्वात कठीण काम सोपविण्यात आले होते ज्यांच्या ताब्यात छत्रपती शिवाजी होते. शमियानात घडत असलेल्या घटनांचे आकलन करण्याची आणि त्यानंतर स्वत: च्या अनुभवावर आणि निर्णयावर आधारित संपूर्णपणे सैन्याचे संचलन करण्याची जबाबदारी कान्होजींवर होती. छत्रपती शिवाजी राजांना वाचवण्यासाठी हब्शी सैन्यावर पूर्णपणे हल्ला करायचा की गनीमी कावा करायचा, हा त्यांनी घेतलेला त्वरित निर्णय असणार होता. शिवाजी राजांकडे असलेल्या सर्व योद्धांपैकी सर्वात अनुभवी आणि सक्षम म्हणून छत्रपती शिवाजीं राजानी त्यांना हुशारीने निवडले होते.

      हि सगळी लष्करी तयारी सुरु असताना शिवाजी महाराज आणखी एक महत्वाची चाल केलेले दिसता. राजांना ठाऊक होतं लढाई जर जिंकायची असेल तर सैन्याला पराभूत मानसिकतेतून बाहेर काढणे खूप गरजेचे आहे. जोपर्यंत सैन्याचा तुमच्यावर विश्वास नसतो तोपर्यंत कोणताही राजा युद्ध जिंकू शकत नाही.

         
राजे सदरेवरती सर्वांना बोलले, “काल दुपारी आराम करत असताना आमचा अचानक डोळा लागला. अन आम्हाला अचानक आई भवानीने दर्शन दिले. भवानी आम्हाला बोलली की शिवबा मी तुझ्या तलवारीत प्रवेश करत आहे, मला त्या बत्तीस दातांच्या बोकडाचा बळी हवाय. अन आई भवानी विजेचा लोळ होऊन आमच्या तलवारीत शिरली.” राजांनी ही आवई उठवली ती फक्त एवढ्यासाठी की जेणेकरून आपल्या मावळ्यांचा दृष्टिकोन बदलेल. आणि झालेही तसेच, बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. मावळ्यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा सगळ्या मावळ्यांमध्ये मोठा जोश संचारला. साक्षात आई भवानी महाराजांसोबत आहे, आता खान वाचत नाही. आणि सैन्याच्या या सकारात्मक मानसिकतेसह सगळे युध्दासाठी सज्ज झाले.

      
इकडे पंताजी काकांनी खानाची मस्त खातीरदारी चालू केली. खानाकडून हिरे जवाहिर विकत घेऊन त्यालाच भेट दिले. खानाला वाटलं आपला दुहेरी फायदा होईल, आपले धन आपल्याला मिळेल अन सोबत पैसा सुद्धा मिळेल. ते सर्व धन घेऊन अन जवाहिराना घेऊन पंताजी काका गडावर आले. ते जवाहिर मोरोपंतांकडे पैसे
मागायला गेले, तर पंत त्यांना बोलले आता पैसे नाहीत, आम्ही सावकारांच्या नावाच्या हुंड्या लिहून देतो, त्या महिनाभरात वठतील. आणि राजे असेही शरण येणार आहेत, मग हा सर्व मुलुख खानाचच होणार, तुम्हाला त्यावेळी तुमचे पैसेही मिळतील.
भेटीचे तपशीलः-

 
प्रतापगडाजवळ छावणी केल्यावर खानाने शिवाजी राजांना आपल्या भेटीसाठी बोलावले. परंतु, शिवाजी महाराजांनी पंताजी गोपीनाथच्या मार्फत खानालाच प्रतापगडावर येण्यास भाग पाडले. तेव्हा दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या माचीवर दुपारच्या वेळी शिवाजी राजांच्या भेटीस जाण्यासाठी खान तयार झाला. त्यानुसार भेटीचे तपशील देखील आगाऊ ठरवण्यात आले. भेटीच्या प्रसंगी तंबूमध्ये दोन्ही बाजूंचे वकील आणि प्रत्येकी दोन हुद्देदार ( शस्त्रवाहक, मानकरी ) सोबत हजर असणार होते. तसेच दोघांनीही प्रत्येकी दहा अंगरक्षक सोबतीला आणायचे असून भेटीच्या जागेपासून ते बाणाच्या टप्प्याइतक्या अंतरावर ते उभे असणार होते.

     भेटीचा सर्व तपशील ठरल्यावर आणि त्यानुसार वागण्याचे खानाने मान्य केल्यावर शिवाजी महाराज पुढील तयारीस लागले. भेटीच्या वेळी सोबत दोन हुद्देदार असणार होते पण अशा प्रसंगी सामान्य मानकरी जवळ न बाळगण्याइतके शिवाजी महाराज धुर्त होते. पट्टा चालवण्यात सराईत असलेल्या जिवा महाल यास त्यांनी आपल्या सोबत घेण्याचे नक्की केले. तसेच संभाजी कावजी याची देखील आपल्या सोबत येण्यासाठी निवड केली. संभाजी कावजी हा अंगबळाच्या बाबतीत अफझलखानाच्या तोडीचा होता असे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. याशिवाय वैयक्तिक बाबतीत देखील शिवाजी राजांनी बरीच खबरदारी घेतल्याचे दिसून येते. भेटीच्या दिवशी पोशाख करताना त्यांनी मुद्दाम अंगामध्ये चिलखत चढवले होते. उजव्या हाताच्या अस्तनीमध्ये बिचवा / कट्यार लपवली होती. अर्थात, खानाचा विश्वासघातकी स्वभाव शिवाजी राजांच्या परिचयाचा असल्याने त्याने अशी खबरदारी घेतल्याचे सांगितले जाते पण ते अर्धसत्य आहे. खानाच्या छावणीभोवती शिवाजी राजांच्या सैन्याचा पडलेला विळखा लक्षात घेता आणि खुद्द खानास त्यांनी प्रतापगडाच्या माचीवर भेटीस येण्यासाठी भाग पडणे याच अर्थ उघड आहे. आरंभापासूनच खानासोबत कसे वागायचे याविषयीचे धोरण शिवरायांनी निश्चित केले होते.
     शिवाजी महाराज - खानाच्या या ज्या काही चाली चालल्या होत्या, त्या सावधगिरीच्या उपाययोजनाही म्हणता येतील परंतु त्यांचे अंतिम हेतू लक्षात घेता यांना सावधगिरीच्या उपाययोजना म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. भेटीत दगा न व्हावा अशी शिवाजी राजांची इच्छा होती असं क्षणभर जरी गृहीत धरलं तरी या भेटीअंती त्याच्या हाती नक्की काय येणार होतं ? शिवाजी महाराजांच्या सत्तेचा नाश हाच खान तसेच आदिलशाहीचा मुख्य हेतू, उद्दिष्ट असल्याने या भेटीतून निष्पन्न काहीच होणार नव्हतं. दुसरीकडे खानाने भेटीत दगा न व्हावा असं ठरवून भेटीस येण्याचं मान्य केलं असलं तरी फारतर शिवाजी राजां आदिलशाही मांडलिक बनेल यापलीकडे दुसरं काय पदरी पडणार होतं ? शिवाय या भोसले पिता - पुत्रांचे उद्देश खानास बऱ्यापैकी माहिती होते. परिस्थिती पाहून आज जरी शिवाजी राजांनी माघार घेतली तरी पुन्हा आपली पाठ वळताच ते मूळ पदावर येणार नाही याची काय शाश्वती ? शिवाय तेरदळ प्रांती शिवाजी राजांचे हल्ले, कर्नाटकातील शिवाजी राजांचा वाढता प्रभाव व पुणे व आसपासच्या भूप्रदेशावर विस्तारत जाणारी शिवाजी राजाची सत्ता, यांच्यादरम्यान विजापूरची सत्ता आकुंचित होतं कोंडली जाणार होती, हे त्यांस दिसत नव्हते काय ?

 तात्पर्य, भेटीच्या निमित्ताने प्रतिपक्षाचा संहार करण्याची मनीषा उभयपक्षी सारखीच वसत होती हेच खरे. त्यामुळेच खानाने स्वसंरक्षणार्थ म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराजांना पकडून नेण्यासाठी वा संधी साधून प्रतापगडासह शिवाजी राजांचा ताबा घेण्यासाठी बंदुकधारी पथकं सोबत घेतली असंच म्हणावं लागेल. खानाचा पूर्वलौकिक व त्यांस दाखवलेलं आमिष लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनीही प्रत्येक पावलावर त्याचे बेत हाणून पाडत त्यांस स्वतःच्या अटींवर भेट घेण्यास भाग पाडले व दि. १० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या या भेटीत खानाचा निकाल लावला.

   
उभयतांच्या मगरमिठीची वर्णनं विजापुरी व मराठी साधनांत विपुल प्रमाणात असली तरी प्रत्यक्ष भेटीत नेमकं काय झालं याची निश्चित माहिती कशातच आढळून येत नाही. खरोखर खानाने दगा केला कि शिवाजी राजांने प्रथम चाल केली, याचा निकाल करणे शक्य नाही व असा वाद उत्पन्न करणेही योग्य ठरणार नाही. उलट या दोघांची प्रत्यक्ष भेटीपूर्वीची मनोभूमिका व त्यात अंती नियोजित उद्दिष्ट पूर्तीत कोण यशस्वी झाले हे लक्षात घेऊनच या घटनेकडे बघणे योग्य ठरले. 

 भेटीचा दिवसः-

      शके १५८१ मध्ये मार्गशीष शुद्ध सप्तमी दिवशी भेटीचा संकल्प ठरला. त्या दिवशी सकाळी ब्राम्हण बोलावून द्रव्य,धर्म हस्तके,गोदाने दिली.केदारेश्वराची पूजा-प्रार्थना केली.सकाळी पूजा अर्चा करून शिवरायांनी सर्व विश्वासू सरदाराना एकत्र बोलविले, आम्हाला काही दगाफटका झाल्यास काशीस जावून उत्तर कार्य करावे, धर्म हस्तके व गोदानें सुद्धा दिधली. स्वताची तयारी करताना दाडी लांब होती ती लहान केली, अंगात चिलखत व जरीची कुडती घातली. डोक्यात बखतर टोप घातला. डाव्या हातात बिचवा लपविला तर अस्तनीत नवटाकी पट्टा घातल, पायात चोळणा घालून कास कसली. अशा मजबुतीने राजे गडाखाली येण्यास तयार झाले. राजांचे सोबती महाराजांना बरोबर घेण्यासाठी आग्रह धरु लागले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले "काही वावडे झाल्यास घाबरे न होता, गर्दी करून शत्रूस बुडवावे. राज्य रक्षावे. तुम्ही सर्व शूर पराक्रमी आहात आमची मदार तुमच्यावरच आहे….सर्वांनी आपली शर्त करावी, राज्य वृद्धीस न्यावे ते तुमचेच आहे.


  

     इकडे खानही काही कमी नव्हता. भेटीचे तपशील, स्थळ निश्चित झाल्यावर प्रत्यक्ष भेटीच्या वेळी छावणीतून बाहेर पडताना त्याने प्रत्येक अटीचा भंग करण्यास आरंभ केला होता. भेटीच्या दिवशी अफझलखानाला प्रतापगडावर आणण्यासाठी शिवाजींनी पंताजी गोपीनाथास पाठवले. पंत ज्यावेळी खानाकडे गेला तेव्हा खान तयार होऊन बसला होता. अशा राजकीय भेटींची खानाला सवय होती. अशा भेटींमध्ये दगाबाजी करण्यात आजवर तो यशस्वी झाला  असल्यामुळे अंगावर शस्त्रे लपवणे, भेटीच्या अटींची पायमल्ली करणे इ. किरकोळ बाबी त्याने त्या दिवशी देखील करण्यास आरंभ केला होता. आधी ठरल्यानुसार सोबत वकील, दोन मानकरी आणि दहा अंगरक्षक नेण्याचे अफझलखानाने मान्य केले असले तरी प्रत्यक्ष भेटीच्या वेळी दीड हजार बंदुकधारी पायदळ सोबत नेण्याची त्याने तयारी चालवली होती. परंतु, पंताजी गोपीनाथ सावध असल्यामुळे खानाचा हा बेत फसला. पंताजी पंत पुढे होऊन अर्ज केला कि, ‘ इतका जमाव घेऊन गेलियाने राजा धाशत खाईल. माघार गडावरी जाईल. भेटी होणार नाही. शिवाजी म्हणजे काय ! यास इतका सामान काय करावा, राजा दोघा माणसानिशी तिकडोन येईल. तुम्ही इकडोन दोघानिशी चालावे. दोघे बैसोन भेटावे. तेथे तजवीज करणे ते करा !’

( वास्तविक पहाता हेच गोपिनाथ पंतांना खानाला पारच्या छावणीपाशीच सांगता आले असते पण ईथे एक धुर्तपणाची चाल दिसते.अफझलखान विजापुरावरुन बरेच सैन्य घेउन आला असला तरी त्याचे बळ शिवाजी महाराजांनी युक्तीने 
चार ठिकाणी विभागलेले दिसते.खानाच्या आधीच्या मुक्कामी म्हणजे वाईला काही सैन्य जनान्याच्या रक्षणासाठी राहिले हा सैन्याचा पहिला भाग बाजुला झाला.त्यानंतर पारचा छावणीत दुसरी तुकडी बाजुला पडली, प्रतापगडाच्या खड्या उतारावर हि तिसरी तुकडी गोपिनाथ पंतांनी हुशारीने बाजुला केली.ना वर गडावर ना खाली छावणीत अशी त्रिशंकु अवस्थेत असलेली हि तुकडी आजुबाजुच्या झाडीत लपलेल्या मावळ्यांनी सहज कापली असणार.अर्थात खानाच्या सैन्याची शेवटची तुकडी म्हणजे स्वतः खान आणि त्याचे दहा अंगरक्षक )

     पुढे प्रतापगडाच्या माचीवर गेल्यावर नियोजित ठिकाणी त्याचे नऊ अंगरक्षक उभे राहिले तर दहावा बडा सय्यद उर्फ सय्यद बंडा हा मात्र खानाच्या सोबत भेट ठरलेल्या तंबूमध्ये घुसला. अर्थात, खानाच्या संमतीनेच हे सर्व घडले होते आणि खानाच्या बरोबर आधी निश्चित केलेल्या हुद्देदारांपेक्षा एकजण अधिक आहे हे पंताजी गोपीनाथच्या लक्षात आले नाही !

    अफझल सदर पाहून मनात जळाला कि, ‘ शिवाजी म्हणजे काय? शाहाजीचा लेक. वजीर यास असा जरी बिछाना नाही ! अशी मोतीलग सदर म्हणजे काय? पादशहास असा सामान नाही, येणे जातीचा त्याने सामान मेळविला ! ‘

    असे बोलताच पंताजीपंत बोलिला जे, ‘ पातशाई माल पाद्शाहाचे घरी जाईल, त्याची इतकी तजवीज काय? ‘ असे बोलून सदरेस बैसले. राजियास सिताब आणवणे म्हणून जासूद, हरकारे रवाना केले.

      अफझलखान प्रतापगडाच्या माचीवर दाखल होताच शिवाजी राजे गडावरून खाली आले, पण ते तडक भेट ठरलेल्या ठिकाणी न जाता बराचसा अलीकडेच थांबले व पंताजी गोपीनाथास त्यांनी बोलावून घेतले. किंवा असेही म्हणता येईल कि शिवाजी महाराजांना आणण्यासाठी पंताजी गोपीनाथ यावेळी तंबूतून बाहेर आले होते. यावेळी शिवाजी राजांनी अफझलखानाविषयी पंताजी गोपीनाथकडे अधिक माहिती विचारली असेल किंवा पंताजी गोपीनाथांनी त्यांना अफझलखानाच्या कारवायांची कल्पना दिली असावी.

         एकूण, अफझलखानाने भेटीसाठी ज्या काही अटी मान्य केल्या होत्या त्या मोडण्यास पद्धतशीरपणे आरंभ केल्याचे शिवाजी राजांच्या लक्षात आले व त्यामुळे ते अधिक सावध झाले. खानाच्या भेटीसाठी पुढे जाण्याआधी त्यांनी सहजपणे म्हणा किंवा अधिक चौकसपणे, पण पंताजीना विचारले कि, तंबूमध्ये खानासोबत आणखी कोण आहे ? यावेळी गोपीनाथना आठवण झाली कि, खानाने आपल्यासोबत एक मानकरी अधिक आणला आहे. तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रथम खानासोबत आलेल्या अतिरिक्त हुद्देदारास बाहेर काढण्याची कामगिरी पंताजी गोपीनाथावर सोपवली. सभासद बखरीमध्ये सय्यद बंडाचा उल्लेख येत असला तरी जेधे शकावली किंवा जेधे करीनामध्ये या सय्यद बंडाचा नामोल्लेख येत नाही. शिवाजी राजांच्या आज्ञेनुसार पंताजी गोपीनाथ पुढे गेले व खानास सांगून त्याने सय्यद बंडा उर्फ बडा सय्यद यास तंबूतून बाहेर काढून ज्या ठिकाणी खानाचे उर्वरीत ९ अंगरक्षक उभे होते तिकडे पाठवून दिले. या ठिकाणी हे देखील नमूद करणे गरजेचे आहे व ते म्हणजे खानाच्या  सोबत जो वकील होता त्याचे नाव कृष्णाजी भास्कर असल्याचा उल्लेख जेधे शकावली, जेधे करीना मध्ये येत नाही. तसेच या भेटीच्या प्रसंगी कृष्णाजी भास्करने शिवाजी राजांवर शस्त्र उचलल्याचा उल्लेख जेधे शकावली मध्ये किंवा सभासद बखरीत न येता जेधे करीन्यामध्ये येतो. पण त्यात कृष्णाजी भास्कर असे वकिलाचे नाव न येत ' हेजीब ' या शब्दाचा वापर करण्यात आला आहे. श्री. विजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार वाईच्या यादी नाम्यात शिवाजीने कृष्णाजी भास्कर यास पट्ट्याने मारल्याचा उल्लेख येतो.

    

शिवाजी महाराज - अफझलखान यांची भेट :-


सभासद बखरीमध्ये शिवाजी व अफझल यांच्या भेटीचे जे वर्णन आलेले आहे किंवा जेधे करीन्यात उभयतांच्या भेटीची जी माहिती आलेली  आहे ती  सर्वांनी  जवळपास  जशीच्या तशी गृहीत धरलेली आहे. परंतु अधिक विचार केला असता असे दिसून येते कि, जेधे करीना मध्ये किंवा सभासद आणि तत्सम बखरीत जी काही या घटनेची वर्णने आलेली आहेत ती कपोलकल्पित आणि अतिरंजित अशा स्वरूपाची आहेत. वस्तुतः जेधे करीना किंवा सभासद बखर सांगते त्यानुसार शिवाजी आणि अफझलखान यांची प्रत्यक्ष अशी गळाभेट झालीच नाही!

             शिवाजी राजे आपल्या दहा अंगरक्षकांच्या सोबत नियोजित स्थळी आले. ठरवून दिलेली जागी त्यांचे दहा अंगरक्षक उभे राहिले आणि दोन हुद्देदारांसह, म्हणजेच जिवा महाल आणि संभाजी कावजी यांच्या संगतीने शिवाजी राजे खानाच्या भेटीसाठी तंबूध्ये गेले. शिवाजी राजे तंबूमध्ये गेल्यावर तत्कालीन रिवाजानुसार खानाने आपल्या जवळ असलेली तलवार सोबतच्या हुद्देदाराच्या हाती दिली व त्यास दूर जाण्याचा इशारा केला. इकडे शिवाजी महाराजांनी देखील आपली तलवार आपल्या हुद्देदाराकडे सोपवली. शिवाजी आणि
अफझल यांच्याकडे जी छुपी शस्त्रे होती, कट्यार / बिचवा, त्यांचा मारा करण्यासाठी उभयतांना एकमेकांच्या निकट, निदान काही अंतरापर्यंत तरी, येणे अतिशय गरजेचे होते. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या जवळ आले.दोघेही समोरासमोर आले,दोघांनी तीनदा एकमेकांना डाव्या उजव्या बाजूला आलिंगन दिले. तिसऱ्या वेळी आलिंगन देताना अचानक खानाने राजांना ओढलं व राजांचा तोल गेला. खानाने राजांची मान डाव्या बगलेत दाबली व आदिलशहाने दिलेल्या रत्नजडित कट्यारीने राजांवरती वार केला. त्या वारामुळे राजांचा अंगरखा फाटला अन कट्यार चिलखताला घासल्याने खर्रर्रर्रर्र खर्रर्रर्रर्र असा कर्कश आवाज झाला. चिलखत असल्यामुळे राजे बचावले, खान दुसरा वार करणार त्याआधी राजांनी आपली मान खानाच्या बगलेतून सोडवली. खानाने राजांवर दुसरा वार केला तो डोक्यावर. तो वार जिरेटोप फाडून आतील लोखंडाची पट्टी चिरून आत गेला आणि याक्षणी अफझलपेक्षा शिवाजी राजे अधिक सावध आणि चपळ असल्यामुळे त्यांनी आपल्या उजव्या हाताच्या अस्तनीमध्ये लपवलेला बिचवा बाहेर काढून सरळ खानाच्या पोटात खुपसला. शिवाजी राजांचे हे कृत्य अफझलखानास अनपेक्षित असे होते. आश्चर्याचा धक्का आणि प्राणघातक असा हल्ला यांमुळे त्याला शिवाजी राजांवर शस्त्र उगारण्याचे भान राहिले नाही किंवा त्याला तशी संधीही प्राप्त झाली नाही. खानावर एक किंवा दोन घाव घालून शिवाजी महाराज मागे सरकले. दरम्यान बिचव्याचा पहिला वार होताच खान किंचाळला  “ दगा दगा, खून खून.” खानाच पोट फाटलं. रक्ताचा धबधबा कोसळू लागला आणि त्याबरोबर त्याचे मानकरी सावध झाले व शिवाजी राजांच्या दिशेने शस्त्रे उपसून धावले. परंतु, ते शिवाजी महाराजांच्या जवळ पोहोचण्यापूर्वीच जिवा महाल आणि संभाजी कावजी यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. तंबूमध्ये हा गोंधळ सुरु होता त्यावेळी पंताजी गोपीनाथ आणि खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हे काय करत होते ?

      
तत्कालीन प्रघातानुसार राजकीय बोलाचालींसाठी वकील म्हणून जाणारी व्यक्ती जवळ शस्त्र बाळगत असली तरी ती शस्त्र चालवण्यात कुशल असतेच असे नाही. शिवाजी व अफझलखानाच्या भेटीच्या प्रसंगी पंताजी गोपीनाथ आणि कृष्णाजी भास्कर हे दोघे, दोन दरबाराचे वकील म्हणून हजर होते. यापैकी कृष्णाजी भास्कर याने या संघर्षात सहभाग घेतल्याचा उल्लेख जेधे करीन्यामध्ये येतो पण त्यात त्याचे नाव न येत वकील या अर्थी हेजीब या शब्दाचा उल्लेख केला गेला आहे. कृष्णाजी भास्करने आपल्या जवळील कट्यार सदृश्य शस्त्राने किंवा तलवारीने शिवाजी राजांवर हल्ला केला आणि स्वसंरक्षणार्थ शिवाजी महाराजांनी त्यावर हत्यार चालवले असे उपलब्ध माहितीवरून म्हणता येते. पंताजी गोपिनाथनी देखील या संघर्षात थोडाफार सहभाग घेतला असावा. कारण तो जखमी झाल्याचा उल्लेख जेधे करीन्यामध्ये येतो पण सभासद बखर व जेधे शकावली याविषयी मौन बाळगून आहेत. यावरून निश्चित असे काही सांगणे अवघड असले तरी ज्याअर्थी कृष्णाजी भास्कर शिवाजी राजांच्या हातून मारला गेल्याचा अस्सल साधनात उल्लेख आहे त्याअर्थी पंताजी गोपीनाथने या संघर्षात थोडाफार सक्रीय सहभाग घेतला होता असे म्हणता येते.

         इकडे शिवाजी महाराजांनी खानास ठार केले आणि हि गडबड एकून त्याचे अंगरक्षक तंबूच्या दिशेने धावून गेले. त्याच वेळी शिवाजी राजांचे अंगरक्षक देखील खानाच्या अंगरक्षकांच्या रोखाने चालून गेले व तंबूच्या बाहेर त्यांची झुंज सुरु झाली. बाहेर
हातघाईची लढाई सुरु झाली असताना आतमध्ये देखील जोरदार धुमश्चक्री चालू होती. खानाचा वकील शिवाजी राजांवर चालून आला तेव्हा पंताजी गोपीनाथ त्याच्या मदतीस गेला. दरम्यान जिवा महाल व संभाजी कावजीने खानाच्या हुद्देदारांचा पुरता निकाल लावला होता. दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांना वाचवण्याच्या प्रयत्नात पंताजी गोपीनाथ जखमी झाले. तेव्हा शिवाजी राजांनी हाती असलेल्या कट्यारीच्या सहाय्याने किंवा जिवा महालकडून पट्टा घेऊन कृष्णाजी भास्करला कापून काढले. खानाचे सर्व साथीदार मारले गेल्यावर शिवाजी राजे,पंताजी गोपीनाथ, जिवा महाल व संभाजी कावजी यांच्यासह तंबूतून बाहेर पडले आणि गडाच्या दिशेने निघून गेले. दरम्यानच्या काळात खानाचे दहा अंगरक्षक शिवाजी राजांच्या सैनिकांकडून मारले गेले किंवा जखमी अवस्थेत पळून गेले. मेलेल्या खानाचे प्रेत भोई पालखीत बसून छावणीकडे नेत होते. परंतु, संभाजी कावजीने पालखीच्या भोयांवर हल्ला चढवल्यामुळे  ते मारले गेले. अफझलखान मृत अवस्थेत तिथेच पडून राहिला. अफझलखानाचे मस्तक संभाजी कावजीने कापल्याचा उल्लेख जेधे शकावली किंवा करीन्या मध्ये येत नाही. पुढे शिवाजी महाराज गडावर पोहोचल्यावर तोफांची इशारत झाली आणि पाठोपाठ खानच्या कोयनेकाठच्या बेसावध छावणीवर मराठी फौज चारी बाजूंनी तुटून पडली. 

     गडावर तोफेचे तीन बार काढण्यात आले. तोफेचा आवाज विरायच्या आतच अचेतन असलेले जावळीचे रान मराठ्यांच्या किल्कारीने पेटून उठले,कान्होजी जेधे,बांदल यांनी पारघाटाच्या सैन्यावर हल्ला केला,मोरोपंत कोकणच्या बाजूने घुसले.अशी सगळी रण-धुमाळी माजली,तोफेला बत्ती कुणी आणि का दिली हे खानाच्या सैन्याला समजलेच नाही. सावध झाल्यावर खानाच्या सैन्यानेही नेटाने प्रतिहल्ला केला. शामराज पद्मनाभी व त्र्यंबक भास्कर हे मोठे सरदार कामी आले. "कोणी हत्यार धरू असेल त्यास जीवे मारावे प्राणानिशी ठेऊ नये" असे आदेशच मिळाले होते.

    'अलिशान अफझलखान महमदशाही' ची पार दुर्दश करून टाकली,महादिन पठाण,उज्दिन पठाण,रोहिले ,अरबी मुसलमान दुलीस मिळवले. झुंझारराव घाटगे,सुलतानजी जगदाळे हे मातब्बर आदिलशाही सरदार पाडाव झाले,तसेच मंबाजी भोसले आणि जगताप हि पाडाव झाले. अफझलचा पोरगा फाझल जीव वाचवायला कृष्णाकाठाने कऱ्हाडच्या दिशेने पळत सुटला. कापड ,हत्यारे, वाईला असलेला तोफखाना, बाराशे उंट,४-५ हजार घोडे, ४ लाखाहून जास्त जवाहीर, ७-८ लाख रोकड असा बराच मुद्दे माल सरकारात जमा झाला.

     राजांनी सर्वात आधी युद्धात जायबंदी झालेल्यांची पूस केली,कोणाला २००,१००,५०,२५ होन अशी जखम पाहून दिले, कामी आलेल्यांच्या मुलास चाकरीस घेतले.पुत्र नाही त्यांच्या बायकांस अर्धे वेतन चालू ठेवले.त्यांचे कार्य करून दिले.सांत्वन केले,रण गाजवलेले मोठे धारकरी होते त्यांस कोणाला हत्ती,घोडे ,सोन्याचे कडे,माळा,तुरे चौकडे असे नावाजले.पंताजी गोपिनाथांना सासवडजवळचा हिवरे गाव वंश परंपरेने इनाम करू दिले तसेच १ लक्ष होन बक्षीस दिला.

 राजगडाच्या बालेकिल्ल्याचा दरवाजा

 

     खानाचे मुंडके राजगडावर पाठवून दिले व राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या महद्वाराच्या बुरुजात त्याला स्थान दिले, यावेळी राजगडाचे बांधकाम सुरु होते. 

 मुळ कबरीचे चित्र

 नंतर बांधकाम केलेली कबर

 

शरीर पडले तेथे कबर बांधली त्याच्या दिवा बत्तीची सोय भवानी मंदिरातर्फे करण्यात येते.कबरी पुढे उरुसात नारळ फोडण्याचा मन देवी संस्थानाला असतो,दसर्याला पालखी इथे सदरेजवळ थांबते पूजा अर्चा होऊन पुन्हा गडावर जाते.

(उत्तरेतील बर्याच इतिहास करांचे म्हणणे पडले कि
शिवरायांनी दगा करोन खानाचा खून केला,कहर म्हणजे मुसलमान इतिहासकारांनी तर असे लिहिले कि राजांनी खानास एकट्यास जेवायला गडावर बोलाविले, खान आल्यावर गडाचे दरवाजे लाऊन घेऊन राजांच्या माणसांनी खानाला मारिले. :

    सर जदुनाथ सरकारांनी सुद्द्धा अप्रत्यक्षपणे असेच सुचविले आहे.महम्मद खाफीखान ,साकी मुस्तैद खान,अडोल्फ बेंडसर,भीमसेन सक्सेना या मोगलांच्या तर्फेच्या लोकांनी सुद्धा शिवरायांनाच या प्रकरणी दोषी ठरवत ठपका ठेवला. परंतु खानाकडे राजांना मारायचे फर्मान होते हे माहित असताना शिवरायांनी जे केले ते योग्यच होते.वरील लोकांचा मराठी साधनाचा अभ्यास कमी असल्याने स्थानिक राजकीय स्थितीचा आणि खानाच्या पूर्वीच्या दगाबाजीच्या इतिहासाचा विचार या लोकांनी केला नाही.
क्रमशः

माझे सर्व लिखाण तुम्ही एकत्रित येथे वाचु शकता
भटकंती सह्याद्रीची

इतिहासलेखमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

आता पुढचा मुलुखगीरीचा लेख दसऱ्याच्या सुमुहुर्तावर येऊद्या. हा भाग सुद्धा उत्तम माहिती युक्त होता.

ही सर्व मालिका निवांत वाचणार आहे. तोवर ही पोच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Oct 2020 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सलग भाग वाचून काढला, इतिहास वाचून जोश भरावा असे लेखन. अतिशय दर्जेदार लेखन. लिहिते राहा मालक.

-दिलीप बिरुटे

सोत्रि's picture

23 Oct 2020 - 4:48 pm | सोत्रि

डिट्टो!

- (शिवइतिहासप्रेमी) सोकाजी

बेकार तरुण's picture

20 Oct 2020 - 12:25 pm | बेकार तरुण

खरोखर चित्र डोळ्यासमोर उभे करायची ताकद आहे तुमच्या लिखाणात....
धन्यवाद...

श्वेता२४'s picture

20 Oct 2020 - 4:37 pm | श्वेता२४

अत्यंत माहितीपूर्ण लेखमाला

बाप्पू's picture

21 Oct 2020 - 12:16 am | बाप्पू

तुमच्या अफाट वाचनाला आणि इतिहासाच्या आवडीला सलाम.
लेखन आवडले. अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.
एकदम मस्त. पुढील लेखनास शुभेच्छा. !!

अर्धवटराव's picture

21 Oct 2020 - 4:16 am | अर्धवटराव

तुमची शिवसेवा अशीच अखंड तेवत राहो _/\_

अवांतरः
शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांना उत्साहीत करायला, प्रेरणा द्यायल म्हणुन केवळ भवानी साक्षात्काराची हुल उठवली असं वाटत नाहि. महाराजांचं सश्रद्ध मन, 'हे राज्य व्हावे हि श्रींची इच्छा' अशी खात्री, खानाला भिडायचा आणि संपवायचा संकल्प... अशा मानसीक अवस्थेचा तो एकत्रीत परिणाम असावा.

मस्त आणि अभ्यासपूर्ण लेखमाला.
शिवरायांनी दगा करोन खानाचा खून केला>>

हो ना, आणि अफजलखान अगदी निरागसपणे प्रेमाने गेला होता भेटायला. मुघल, आदिलशहा इ सगळे स्वतःच्या वडिलांना भावाला मारून राज्यकर्ते झालेत, त्यांच्याकडून नक्की काय अपेक्षा होती भेटीत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Oct 2020 - 9:30 am | ज्ञानोबाचे पैजार

स्वराज्याला कडकडून दंश करायला आलेल्या खानाला ठेचायचा नाही तर काय दुध पाजायचे होते का?

शेवटी क्रमश: पाहून बरे वाटले

पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

22 Oct 2020 - 5:34 pm | तुषार काळभोर

शेवट वाचून संताप आला.

सतीश विष्णू जाधव's picture

22 Oct 2020 - 8:02 pm | सतीश विष्णू जाधव

छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती, अफझलखानाचा वध तसेच त्याच्या सैन्याची केलेली धुळदाण प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी राहिली.
खूप खूप धनयवाद !!!

गडावर तोफेचे तीन बार काढण्यात आले. तोफेचा आवाज विरायच्या आतच अचेतन असलेले जावळीचे रान मराठ्यांच्या किल्कारीने पेटून उठले,
डोळ्यात पाणी आणी अंगावर काटा.