प्रिय मायमराठी

Primary tabs

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
27 Feb 2018 - 7:03 am

प्रिय मायमराठी,

तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी.

तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात.

लहानपणी, कुठल्याही परप्रांतातून घरी परतताना, तुझ्या साजिऱ्या रूपातला फलक वाचला कि डेरेदार सावलीत परतल्यासारखे वाटायचे. चित्रविचित्र लिपींचा न कळणारा प्रांत सोडून तुझ्या कळणाऱ्या रूपाशी आले, कि सुखरूप वाटायचे. आज परदेशातून विमानतळावर पाऊल पडताच, ‘छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले सहर्ष स्वागत,’ हे वाचले कि डोळे निवतात. तू फलकावर जन्मांतरीची ओळख घेऊन उभी असतेस. त्या ओळखीवर मी कधीच घर गाठलेले असते.

प्रत्यक्ष सहवास नसतो, तेव्हा आठवण जास्त तीव्र होते. युरोपातील छोटे छोटे देश, आपापल्या भाषेत सगळे व्यवहार स्वतंत्रपणे करताना पहायची, तेव्हा तुझे स्वतःच्या अस्तित्त्वासाठी झगडणारे रूप आठवून, कसनुसे व्हायचे.

स्वभाषेच्या उंबरठ्यात राहून, परक्या भाषेचे यथास्थित आदरातिथ्य करून, घरची मानमर्यादा सांभाळणाऱ्या अरबांना पाहते, तेव्हा तुझ्या घरात उर्मट घुसखोरी करणाऱ्यांकडे कौतुकाने पहात, त्यालाच प्रगतीचे लक्षण मानणाऱ्या बुद्धिवंतांसमोर, मी क्षणभर हतबल होते.

इंग्रजी भाषा उत्तम येत असूनही, केवळ स्वतःच्या भाषेवरील उत्कट प्रेमापोटी आपल्याच भाषेत आजन्म उत्तमोत्तम लिहिणारे साहित्यिक पाहते, तेव्हा तुझी आठवण येते.

तुम्ही जगातल्या कुठल्याही देशातून या, पण इथे आलात कि तुमच्या मुलांनी आमच्या शाळेत, आमची भाषा शिकली पाहिजे, असा नियम पाहते, तेव्हा तुझ्या माध्यमात चालणाऱ्या शाळा धडाधड बंद करणाऱ्यांचा संताप येतो. तुझी आठवण आणखी तीव्र होते.

.....आज तर, तुझी बाजू घेणे म्हणजे पाप ठरवले जातेय. म्हणजे मग तुम्ही प्रांतवादी, झापडबंद मागास, स्वतः चीच लाल म्हणवून घेणारे! तुम्हाला इंग्रजी येत नाही, म्हणून तुम्ही मराठीचे गोडवे गाता, बाकीच्या भाषेत गोते खाता, तुम्ही कद्रू.... एक काय दहा आरोप. तुझ्यावरील प्रेमापोटी हे सगळे आरोप क्षणभर मान्य, पण आरोप करणारे तरी कुठल्या इतर भाषेची चांगली धन करतात? तुझ्याशी सवतासुभा करायचा, आणि परक्या भाषेत ‘आमचा मान राखा’ म्हणत हिंडायचे! केवळ इंग्रजी येणे म्हणजे विद्वत्तेचे झेंडे गाडणे, या पांगळ्या मानसिकतेतून लोक बाहेर येवोत, ही आजच्या दिवशी सदिच्छा. माय मरो, मावशी जगो, ही म्हण मला तुझ्याबाबतीत तर्कदुष्ट वाटते. मायशिवाय मावशीचे नाते तयारच होत नाही. आधी माय, मग मावशी.

जन्मापासूनचा ‘आईsssssss’, ते मरे पर्यंतचा ‘आई गं’ तुझ्याशिवाय शक्य नाही, तिथे तुझे उपकार कसे आणि किती मानायचे! तू ‘राजभाषा’आहेस, “अभिजात”ही आहेसच, तुला तो दर्जा सरकार दरबारी मिळायचा तेव्हा मिळो!

बाकी तू ज्ञानभाषा व्हावीस, म्हणून जगातल्या कुठल्या कुठल्या कोपऱ्यात शांतपणे काम करत राहणाऱ्या माझ्या सहोदरांना आजच्या दिवशी अभिवादन. तुझ्याविषयी प्रेम, कौतुक, अहंकाराचा वारा न लागलेला अभिमान, परकीय भाषांची मुलुखगिरी करून, परत तुझ्याच उबदार, मायाळू कुशीत विसावण्याचे आमचे शहाणपण अबाधित राहो. तू आमची ओळख आहेस, हे खरेच, पण आमच्यामुळे तुझी ओळख समृद्ध होईल, असा आमचा जगाशी आणि स्वतःशी व्यवहार राहील, ही खात्री देते. हे सगळे लिहिणे तुझ्यामुळे, तुझ्यासाठी आणि शेवटी तुलाच अर्पण.

तुझी,

शिवकन्या.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीकलावाङ्मयभाषासाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिभा

प्रतिक्रिया

मनापासून लिहिलंय. आवडलं.

manguu@mail.com's picture

27 Feb 2018 - 8:50 am | manguu@mail.com

छान

अभ्या..'s picture

27 Feb 2018 - 9:09 am | अभ्या..

मस्तच एकदम.
म मायेचा
म मातीचा
म मानाचा
म मराठीचा
म मनापासूनचा

शिव कन्या's picture

27 Feb 2018 - 7:56 pm | शिव कन्या

म मिसळपावचा
म मनापासून आवडला फलक.

श्याम वामने's picture

27 Feb 2018 - 10:24 am | श्याम वामने

खूप छान..

नूतन's picture

27 Feb 2018 - 10:35 am | नूतन

सुंदर
सहमत

श्याम वामने's picture

27 Feb 2018 - 10:54 am | श्याम वामने

खूपच छान

अनिंद्य's picture

27 Feb 2018 - 10:58 am | अनिंद्य

@ शिव कन्या,
लेख आवडला.

नेटका तरीही अनेक मुद्द्यांना स्पर्श करणारा हा प्रामाणिक लेख फार आवडला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2018 - 3:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मनोगत ! खूप आवडले !

अभिजीत अवलिया's picture

27 Feb 2018 - 3:14 pm | अभिजीत अवलिया

लेख आवडला.

सस्नेह's picture

27 Feb 2018 - 3:36 pm | सस्नेह

सुबक लेख !

प्राची अश्विनी's picture

27 Feb 2018 - 5:39 pm | प्राची अश्विनी

+11

शिव कन्या's picture

27 Feb 2018 - 7:57 pm | शिव कन्या

रसिक भाषाप्रेमींचे मनापासून आभार.

पैसा's picture

27 Feb 2018 - 10:45 pm | पैसा

लेख आवडला

पद्मावति's picture

27 Feb 2018 - 10:56 pm | पद्मावति

लेख सुरेखच. छान लिहिलंय, अगदी मनापासून.

आणि याला पण म मिसळपावचा
म मनापासून आवडला फलक.
+१. खरच सुरेख फलक.

निशाचर's picture

28 Feb 2018 - 7:25 am | निशाचर

लेख आवडला.