Skip to main content

हिरकणी (कविता)

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी रविवार, 16/10/2016 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
आसमंत तो काळोखाने पूर्ण व्यापला होता रायगडावर अडकुन पडली सैरभैर ती माता मावळतीला गेला सूर्य बंद जाहली दारे दंडक होता शिवरायांचा शिस्त पाळती सारे कष्टकरी ती नार अपूर्व नाव जाणती हिरा गडाखालती राहत होती वाळूसरेतील घरा दूध विकाया रायगडावर ती मायमाऊली जाई उरकुन जाता काम रोजचे घरास परतुन येई एके दिवशी गड सोडण्या वेळ जाहला तिला उघडण्याला बंद ती दारे त्यांनी नकार दिला घरास होते बाळ तान्हुले कंठ दाटुनी आला राहावयाचे कसे लेकरु गलका मनात झाला भिरभिर फिरली रायगडावर शोधित तिथल्या वाटा उंच कडा एक दिसला जेथे ना पहारा फौजफाटा उतरु लागली मरणकडा तो बाळासाठी जीव तुटे खरचटला तो सारा देह तिला परंतु भान कुठे? अशक्य ऐसा उतरुन गेली प्राणपणाने उंच कडा शिकवुन गेली प्रित आईची मरणालाही आज धडा ऐकताच ती तिची कहाणी अपार राजे गहिवरले वस्त्रालंकारांनी तिजला शिवरायांनी गौरविले बुरुज बांधुनी त्याच कड्यावर हिरकणी ऐसे नाव दिले अलौकिक त्या वात्सल्याला शिवरायांनी वंदियले साक्ष द्यावया मातृप्रितीची अजुनी बुरुज तो उभा तिथे अभेद्य कणखर सह्याद्रीही नतमस्तक तो होतो जिथे - शार्दुल हातोळकर
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 11201
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

वाह!

छान झालीय कविता. ट्रेनमधे लटकत, ट्रॅफिक कापत बेबीसिटरकडे धावतपळत पोहोचणाऱ्या आजच्या हिरकण्यांनाही सलाम.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार _/\_ शिवरायांच्या दैदिप्यमान इतिहासामधील हिरकणीच्या मातृप्रेमाची अजरामर कहाणी....

हिरकणीची पूर्ण कहाणी कवितेतुन उत्तम रेखाटली आहे.. आवडेश...

चांगल्या कार्यासाठी जिवडावावर लावणार्‍या कोणाही हुतात्म्याचा गौरवच करावयास हवा. अर्थात गौरवी करण करतानाही जुन्याकाळातील अंधश्रद्धा या अंधश्रद्धा होत्या हे गौरवीकरण करताना लक्षात घ्यावयास हवे. हिरकणीने जिव दिला नसतातरी बुरुजाचे काम सुरक्षीतपणे झालेच असते. हिच हिरकणी स्वराज्यात राणी ताराबाईसोबत कदाचित रणांगणात आपली तलवारही परजू शकली असती असे वाटते.

In reply to by माहितगार

सर्वप्रथम प्रतिसादांबद्दल देशप्रेमी, मुरारबाजी, रुपी आणि आपलेही मनापासुन आभार ! तुमच्या मुद्द्यामध्ये किंवा माझ्या समजण्यामध्ये काही गफलत होते आहे का? कारण हिरकणीने जीव दिला नव्हता, तर घरी असलेल्या बाळाच्या ओढीने ती डोक्यावर घोंगावत असलेल्या मरणालाही धडा शिकवुन अत्यंत खडतर असा रायगडाचा डोंगरकडा रात्रीच्या अंधारात मोठ्या हिंमतीने उतरुन गडपायथ्याला गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरात दुध घेऊन ती पुन्हा रायगडाच्या दारात हजर झाली. तिला दरवाजात पाहुन पहारेकऱ्यांना मात्र खुप आश्चर्य वाटले, कारण रात्री दरवाजे बंद असताना ती रायगडाबाहेर गेलीच कशी? म्हणुन पहारेकऱ्यांनी तिला शिवरायांपुढे हजर केले. तिची ती हकीकत ऐकुन राजे खुप गहिवरले आणि तिच्या मातृप्रेमाचा गौरव म्हणुन त्यांनी तिला वस्त्र-अलंकार देऊन तिचा सत्कार केला. ती जिथुन कडा उतरुन गेली होती, ती गडाची बाजु शत्रुपासुन सुरक्षित करण्यासाठी महाराजांनी तिथे भक्कम बुरुज बांधला. तोच हिरकणी बुरुज होय.

In reply to by शार्दुल_हातोळकर

शक्य आहे माझी कुठे गफलत होते असेल. मी काही वेगळे वाचल्याचे स्मरत होते, चुकले असेल तर क्षमस्व. आंतरजालावर व्यवस्थीत संदर्भांची उपलब्धता नसली की असे काहीसे होत राहते. ज्ञानकोशीय लेखनासाठी कुणा जाणकारांना हिरकणी बुरुज विषयक कथांचे मूळ संदर्भ माहित असतील तर ते अवश्य द्यावेत.

In reply to by प्रचेतस

माझ्या स्मरणातील दंतकथा काही वेगळी असावी किंवा स्मरणात काही चुकीचे रेकॉर्डींग झाले असावे असेही शक्य आहे. दंतकथा असली तरी साहित्याने/दस्तएवजाने दखल घेतलेला पहिले उल्लेख कोणते आहेत ? बखरी वगैरेत कुठे काही उल्लेख आहेत का ? एकच दंतकथा आहे की एका पेक्षा अधिक दंतकथा आहेत. सहज सर्चेबल आंतरजाल जरासे शोधले दंतकथा दिसते आहे पण संदर्भ दिसत नाहीत.