हिरकणी (कविता)
लेखनविषय:
काव्यरस
आसमंत तो काळोखाने
पूर्ण व्यापला होता
रायगडावर अडकुन पडली
सैरभैर ती माता
मावळतीला गेला सूर्य
बंद जाहली दारे
दंडक होता शिवरायांचा
शिस्त पाळती सारे
कष्टकरी ती नार अपूर्व
नाव जाणती हिरा
गडाखालती राहत होती
वाळूसरेतील घरा
दूध विकाया रायगडावर
ती मायमाऊली जाई
उरकुन जाता काम रोजचे
घरास परतुन येई
एके दिवशी गड सोडण्या
वेळ जाहला तिला
उघडण्याला बंद ती दारे
त्यांनी नकार दिला
घरास होते बाळ तान्हुले
कंठ दाटुनी आला
राहावयाचे कसे लेकरु
गलका मनात झाला
भिरभिर फिरली रायगडावर
शोधित तिथल्या वाटा
उंच कडा एक दिसला जेथे
ना पहारा फौजफाटा
उतरु लागली मरणकडा तो
बाळासाठी जीव तुटे
खरचटला तो सारा देह
तिला परंतु भान कुठे?
अशक्य ऐसा उतरुन गेली
प्राणपणाने उंच कडा
शिकवुन गेली प्रित आईची
मरणालाही आज धडा
ऐकताच ती तिची कहाणी
अपार राजे गहिवरले
वस्त्रालंकारांनी तिजला
शिवरायांनी गौरविले
बुरुज बांधुनी त्याच कड्यावर
हिरकणी ऐसे नाव दिले
अलौकिक त्या वात्सल्याला
शिवरायांनी वंदियले
साक्ष द्यावया मातृप्रितीची
अजुनी बुरुज तो उभा तिथे
अभेद्य कणखर सह्याद्रीही
नतमस्तक तो होतो जिथे
- शार्दुल हातोळकर
वाचने
11157
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
वाह!
सुरेख!
अप्रतिम ! धन्य ती माता जिची काळ आजही गातो गाथा !!
खूप सुंदर.
छान झालीय कविता.
छान कविता.
उत्तम
मस्त, कविता आवडली
व्वा
धन्यवाद
अतिशय छान! बाजींच्या
धन्यवाद !
क्या बात है।
जोरदार ऐतिहासिक कविता !!
सुंदर!
गौरवीकरण
In reply to गौरवीकरण by माहितगार
माहितगारजी, पण हिरकणीने जीव दिला नव्हता.
In reply to माहितगारजी, पण हिरकणीने जीव दिला नव्हता. by शार्दुल_हातोळकर
क्षमस्व
In reply to क्षमस्व by माहितगार
हिरकणीची कथा ही दंतकथा आहे.
In reply to हिरकणीची कथा ही दंतकथा आहे. by प्रचेतस
माझ्या स्मरणातील दंतकथा काही
सुरेख! पुन्हा पुन्हा वाचावीशी
सुंदर कविता !
धन्यवाद पद्मावतीजी आणि