रामराम मंडळी!
शतशब्दकथा लिहून आणि वाचून आपणा सर्वांना भरपूर विरंगुळा मिळाला असेल.असाच काहीसा, पण शब्दमर्यादा नसलेला, मराठी साहित्यातला एक वेगळा अन जुना प्रकार म्हणजे दिवाकरांच्या नाट्यछटा. का कोणास ठाऊक, पण शतशब्दकथा आणि नाट्यछटा यांच्यात काहीतरी नातं- साम्य तरी आहे असं नेहमी वाटतं .
मागे २०१२ मधे पुण्याला सकाळ वृत्तपत्रातर्फे मुले आणि मोठ्यांसाठी एक नाट्यछटा स्पर्धा घेण्यात आली. त्यात दिवाकर यांच्या मूळ आणि काही नव्या लेखकांच्या नाट्यछटा सहभागी झाल्या होत्या. हे अन्य लेखक प्रसिद्ध नसल्याने असेल, पण मोठ्या संख्येने सहभाग असूनही त्या नाट्यछटा वाचकांपर्यंत पोहोचल्याच नाहीत.
दिवाकरांच्या नाट्यछटा हे एकपात्री नाट्यप्रसंग असून अन्य पात्रांचा संबंध येतो ते मुख्य पात्राशी होणाऱ्या संवादातून. अन्य पात्राच्या प्रश्न किंवा एखाद्या वाक्याची पुनरुक्ती करून संवादाची उणीव भरून काढलेली दिसते. इंग्रजीतल्या मोनोलॉग या प्रकाराचा प्रयोग त्यांना त्यांच्या प्रचंड इंग्रजी वाचनाच्या व्यासंगामुळे करावासा वाटला असे जालावरील संदर्भांवरून दिसते. त्यांचे सहकारी वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी याला 'नाट्यछटा' असे नांव सुचवले. व्यक्तिश: हे मोनोलॉग प्रकरण त्यातल्या जुन्या अवजड इंग्रजी भाषेमुळे मला काही भावले नाही. मात्र मराठी नाट्यछटा थेट पोहोचतात- कदाचित शाळेत बालभारतीमध्ये वाचल्याने असेल.
अन्य साहित्यप्रकारांसारखेच नाट्यछटेमध्ये तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब दिसते.म्हणजे तत्कालीन बोली भाषेची, प्रथांची जवळून ओळख होते. गेल्या दोन शतकांतल्या प्रथा, अंधश्रद्धा, माणसांमधली नाती, छोट्याशाच प्रसंगातले रंजक नाट्य आणि नर्मविनोद यांचं छान मिश्रण या सगळ्या कथांमध्ये आहे. काही कथा करुण रसात आहेत आणि अस्वस्थ करतात. अनेक कथांमधली माणसे, त्यांची प्रवृत्ती वेगळ्या संदर्भात आजही तशाच दिसतात.
नाट्यछटा वाचताना एकप्रकारे नाट्यरूपात प्रसंग डोळ्यापुढे रहातो. कुठेही तत्वज्ञ असल्याचा आव न आणता दिवाकरांनी किती साधेपणाने मार्मिक भाष्य केलेले दिसते!
या नाट्यछटा वाचताना सहजच मन बालपणात गेलं .
मी बहुधा आठवीत असताना '' बाळ, या नारळाला धक्का लावू नकोस बरे!'' ही सुंदर नाट्यछटा आम्हाला अभ्यासाला होती. या नाट्यछटेने आमचे लक्ष्य वेधून घेतले होते ते त्यातली भाषा आणि चमत्कृतीपूर्ण संवाद यांमुळे. त्याच वर्षी मराठीच्या शिक्षकांनी प्रत्येकाला तीन दीर्घ उतारे पाठ करायला सांगितले. त्याकाळी पाठांतरावर फारच भर असे. मग मी हा आवडलेला छोटासा धडा पाठांतराला निवडला आणि तो कायमचा लक्षात राहिला. वर्गात म्हणून दाखवताना तो साभिनय म्हटल्यामुळे मिळालेली शाब्बासकी आजही आठवते ! आणखी अशा छान नाट्यछटा वाचाव्याशा वाटत.
त्याकाळी पाठाच्या सुरुवातीला लेखकाचा अल्प परिचय, इतर पुस्तके आणि तो पाठ कोणत्या पुस्तकातून घेतला आहे अशी माहिती दिलेली असे.त्यावरून दिवाकरांच्या नाट्यछटा एकत्र असलेल्या पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण झाली . सगळे धडे असणारी मूळ पुस्तके कुठे मिळतील? शोध सुरु झाला. पण वाचावेसे वाटले तरी खेड्यात अशी पुस्तके कुठून वाचायला मिळणार? गावात वाचनालय नव्हते आणि शाळेच्या वाचनालयात आम्हा मुलांना प्रवेशच नसे!
एकदा १५ ऑगस्टला भाषणात हेडमास्तरांनी नेहमीप्रमाणे शाळेशी संबंधित समग्र आकडेवारी वाचून दाखवली. त्यानुसार शाळेच्या ग्रंथालयात पाच हजार पुस्तके असल्याचे समजले. त्याच आठवड्यात त्यांना भेटलो. विचारलं, ''पाच हजार पुस्तकं आहेत तर आम्हांला का वाचायला देत नाहीत?'' ते रागीट होते- पण मुद्दा दमदार असल्याने थेट भिडलो होतो. त्यांच्याकडून असं कळलं की पुस्तकं आम्हाला द्यायला त्यांची वैयक्तिक हरकत नव्हती, पण शाळेला ग्रंथपालच नसल्याने पुस्तके पडून आहेत. पुस्तकांची नोंद कोण ठेवणार? हरवली तर कोण बघणार? वगैरे..
मी माझ्या तुकडीची जबाबदारी घेऊन माझ्या वर्गापुरते ग्रंथालय चालवून दाखवतो असं सांगितल्यावरून त्यांनी ग्रंथालय वापरायला परवानगी दिली.
एक रजिस्टर घेऊन मी पुस्तक वाटप सुरु केले आणि सहा महिने वर्गापुरते हे ग्रंथालय चालविले देखील. माझ्यासाठी तर खजिनाच उघडला. खजिन्याचा राखणदार असल्यानं मला दोनतीन पुस्तके एका वेळी घरी नेता येऊ लागली. अनेक उत्तम पुस्तकांचा परिचय झाला. धडे ज्यातून आले त्या मूळ पुस्तकांचा शोध सुरु झाला. त्यातच ''दिवाकरांच्या नाट्यछटा'' हे पुस्तकदेखील मिळाले ! यात सर्व नाट्यछटा एकत्र मिळाल्या, पुनःपुन्हा वाचल्या. पण त्या वयात त्यातल्या काही काही समजल्याही नाहीत.
हल्लीच्या अभ्यासक्रमात हा प्रकार आहे का नाही माहीत नाही- असेलही.
बालभारतीच्या अभ्यास मंडळावरील सदस्य अभ्यासक्रम ठरवत असतात. सगळे साहित्य प्रकार समाविष्ट करणे कुणालाच शक्य होणार नाही. तरीही हे वेगळे प्रयोग टिकले पाहिजेत असं वाटतं. त्याकाळी डॉ. चित्रा नाईक यांचा भाषा अभ्यासक्रमावर ठसा होता. संस्कारक्षम साहित्य पाठ्यपुस्तकात ठेवण्याचा त्यांचा आग्रह होता.
त्याकाळी पुस्तकांमधे १९००-१९७० या दरम्यानच्या साहित्यकृतींवर भर होता. मुख्यतः स्वातंत्र्यलढा, १९६२ आणि १९६५ युद्धातल्या शौर्यकथा, देवलांचे नाट्यप्रवेश, चिं वि जोशींचे विनोदी लेख , संतवांग्मय, नेहरू- गांधी व अन्य सामाजिक असे काहीसे विषय असत. पण खेळ, शास्त्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी जवळजवळ नव्हत्याच.
१९९० नंतर झालेल्या राजकीय आणि सामाजिक बदलांमुळे शालेय अभ्यासक्रमाच्या आखणीत लेखक निवडीच्या प्राथमिकता बदलत गेल्या. शास्त्रज्ञ, खेळ , समाज आणि कलाविषयक लेखनाला अधिक जागा मिळाली. दलितांना आपल्या आरक्षणापलीकडील सामाजिक हक्काची जाणीव झाल्यानंतर त्या समाजातील नवलेखक उदयाला आले. त्यांना पाठ्यपुस्तकांत स्थान मिळाले, त्यामुळे एकूणच भाषेच्या पुस्तकांचा आराखडा बदलला.
सरकारी धोरणानुसार सर्व जाती - धर्मांचे आणि पंथांचे प्रतिनिधित्व पाठ्यपुस्तकात असावे, विविध विषयांचा समतोल असावा, अश्या गोष्टी जास्त महत्वाच्या झाल्या. त्यामुळे ओढूनताणून आणलेली विविधता आली . मला ही पुस्तके सरकारी ग्याझेटासारखी भासतात . कदाचित नव्या, बदलत्या सामाजिक आव्हानांसाठी मुलांची मानसिकता तयार व्हावी हा उद्देश असेल - मी काही शिक्षणतज्ञ नव्हे. पण बालभारती खूपच बदलले हे खरे.
१९६५ नंतरच्या मधल्या तीन दशकांत नव्याने निर्माण झालेल्या साहित्याचा समावेश होणे आवश्यक होतेच. त्यामुळे ऐंशीच्या दशकातले कित्येक जुने पाठ- धडे/ कविता बदलले गेले आणि त्यामुळे मधली एक पिढी जुन्या काही गोष्टींना मुकली असे वाटते.
या घटनाक्रमाकडे पहाताना काही चुकीचे झाले असे वाटत नाही.
आता इन्टरनेटवरून पुस्तके विकत घेणं सोपं झाल्यानं, जुनं वाचायचा एक मार्ग तरी मिळाला. तरीही काय वाचावे हे माहीत हवेच ना? शाळेत थोडीशी झलक पाहिली असेल तरच ते अजून मिळवून वाचण्याचं आकर्षण वाटेल असं माझं मत आहे. मात्र अवांतर वाचू पहाणाऱ्या नव्या पिढीला राहून गेलेले वाचनखाद्य मिळाले की बस्स. तर ते असो !
नाट्यछटाकार दिवाकर यांचं पूर्ण नाव शंकर काशिनाथ गर्गे असं होतं. (जन्म : १८ जानेवारी,१८८९; मृत्य् : १ ऑक्टोबर, १९३१) त्यांनी प्रथम मराठीत नाट्यछटा आणल्या. ते पुण्यात शिक्षक होते, आणि रविकिरण मंडळाचे सदस्यही होते. अजून थोडंसं आयुष्य मिळालं असतं तर दिवाकरांची अपूर्ण नाटकं प्रकाशित झाली असती. बेचाळीस हे काही जाण्याचं वय नव्हे. पण त्याकाळी साथींच्या रोगामुळे अनेकजण अल्पायुषी ठरत. अखेरच्या कांही वर्षांत प्रकृती अस्वस्थ्याबरोबरच त्यांना दिसणे कमी झाले , हळूहळू बंद झाले. त्यातून आलेली उद्विग्नता त्यांच्या लेखनातही प्रतिबिंबित झालेली दिसते.
अवघ्या ४२ वर्षांच्या आयुष्यात दोन-तीनदा नोकरी बदलण्याची वेळ आणि प्रतिकूल काळ असूनही ५१ नाट्यछटा, नाटकाची रुपांतरे, छोटी नाटके व अनेक लेख ही सुंदर निर्मिती त्यांनी करून ठेवलीय. भारतात लेखकाच्या निधनानंतर साठ वर्षांनी त्यांचं साहित्य प्रताधिकारमुक्त होतं. आता प्रताधिकारमुक्त असल्याने या सर्व ५१ नाट्यछटा जालावर मोफत उपलब्ध झाल्या आहेत. तेवढ्यावरच समाधान न मानता हा लेखनप्रकार नव्या 'समर्थ' लेखकांनी काळानुसार हाताळून जिवंत ठेवला पाहिजे.
दिवाकरांच्या नाट्यछटा या साहित्यप्रकारावर पूर्वी एकदा उपक्रमावर संजोपराव यांनी थोडक्यात परीक्षण लिहीले होते. पण त्यापलीकडे नाट्यछटेविषयी फारशी चर्चा झालेली दिसत नाही. तोच लेख वाचल्यावर नाट्यछटेविषयी अजून कांही सांगायची गरज पडू नये. त्या लेखाचा दुवा इथेच खाली देत आहे.
उद्या १ ऑक्टोबरला दिवाकरांची ८४ वी पुण्यतिथी आहे.
त्यानिमित्य त्यांच्या उत्तम नाट्यछटांचा आस्वाद घेऊया आणि त्यांना अभिवादन करूया!
संदर्भ :
दिवाकरांच्या सर्व नाट्यछटा एकत्र
उपक्रमवरील संजोपराव यांचा लेख
वाचने
20731
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! दिवाकरांच्या नाट्यछटा फार
छान लेख लिंकांसाठी विशेष धन्यवाद
त्यांचं नांव घ्यायचं म्हणजे
मला पण हा प्रकार आवडतो,
लय भारी आयड्या. प्रयत्न करून
लय भारी आयड्या. प्रयत्न करून
जुन्या स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद!
अरेव्वा!
In reply to जुन्या स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद! by बोका-ए-आझम
आठवतंय
In reply to जुन्या स्मृतींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद! by बोका-ए-आझम
मला
बोलावणं आल्याशिवाय नाही, अजून
बोलावणं आल्याशिवाय नाही, अजून
खरंच सुंदर आहेत या नाट्यछटा.
अतिशय उत्कृष्ट लेख!
माहीतीपूर्ण लेख
हलकाफुलका वाङ्मयप्रकार नाहीये तो.
In reply to माहीतीपूर्ण लेख by मित्रहो
नाट्यछटा
In reply to हलकाफुलका वाङ्मयप्रकार नाहीये तो. by बोका-ए-आझम
बोलावणं
त्यांचं नाव
In reply to बोलावणं by सिरुसेरि
हो! राम वाईरकरच..किशोर
In reply to त्यांचं नाव by बोका-ए-आझम
धन्यवाद.
In reply to त्यांचं नाव by बोका-ए-आझम
अनेक धन्यवाद. आजवर
वाल्गुदस्वामी
In reply to अनेक धन्यवाद. आजवर by बॅटमॅन
बोकाशेट
In reply to वाल्गुदस्वामी by बोका-ए-आझम
आणि ही नाट्यछटाही
In reply to बोकाशेट by बॅटमॅन
सुंदर लेख! हे परत हाताळायला
सुंदर लेख.'पंत मेले राव चढले'
चिगी वर्षाची झाली नांही तोच,
चिंगी महिन्याची
हम्म. त्या "राव गेले..."
In reply to चिंगी महिन्याची by राही
मूळ नाट्यछटेचे नाव
In reply to हम्म. त्या "राव गेले..." by आदूबाळ
ओह् उलटं झालं काय!
In reply to मूळ नाट्यछटेचे नाव by चतुरंग
अतिशय छान धागा!
एक शंका
सर्वांचे आभार .
फारच चागली माहिती दिलीत.
वैभव मांगलेच्या आवाजात काही
सुंदर लेख. नाट्यछटा आवडल्या.