✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फ़्यंड्री...!

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Wed, 02/26/2014 - 21:32  ·  लेख
लेख
राम राम मंडळी. मंडळी, मिपावर फ्यंड्रीबद्दल उत्तम लिहून आल्यानंतर आणि इतरही ठिकाणी फ़्यांड्रीवर येता जाता चर्चा व्हायला लागल्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सूकता लागली होती. मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे. पारंपरिक चित्रपटापेक्षा काही तरी वेगळे मराठी चित्रपटातून यायला लागले आहे. वास्तवतेवर आधारित सकस कथा, ध्वनी, छायाचित्रण,कलाकार, या आणि विविध अशा बदलांनी मराठी चित्रपट जरा हटके यायला लागले आहेत. मराठी चित्रपटांना विषय फुलवता यायला लागले थेटरात शांतपणे चित्रपट बघायला जावे, इथपर्यंत मराठी चित्रपटांनी भरारी घेतली आहे, असे वाटायला लागले आहे. असाच एक चित्रपट म्हणजे फ्यंड्री. सामाजिक, धार्मिक, व सांस्कृतिक परंपरेच्या अशा अंधार कोठडीत गुदमरलेले दलित जीवन वर्षानुवर्ष बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. माणूस म्हणून जगण्याचे सर्व हक्क असतांनाही सामाजिक रुढी परंपरेत गुरफटून गेलेल्या कचरु माने (किशोर कदम) आणि त्याचा मुलगा जाबुवंतराव कचरु माने (सोमनाथ अवघडे) यांची आयुष्यातील स्वप्न, व्यवस्था आणि संघर्षाची चित्तर कथा म्हणजे फ़्यांड्री. परंपरा म्हणजे कचरु माने तर बंड म्हणजे जाबुवंतराव माने. गावकुसाबाहेरच्या समाजालाही माणूस म्हणू काही भावना असतात आणि त्याचं इतरांना काही घेणं देणं नसतं. असं एक उत्तम चित्रण फ़्यांड्रीत आपल्याला बघायला मिळते.
कैकाडी समाजातील कुटुंबाची ही कथा. माणसाच्या मनातील न्यूनगंड आणि स्वप्न यांचा हा संघर्ष. प्रेमकथा तशी ती नाहीच. कैकाडी समाजाचे टोपले विणणे हे काम परंतु गावाबाहेर वावरणारा आणि गावातील सर्व हलकी कामं करणारा अशा कुटुंबाचे चित्रण नागराज मंजुळे यांनी केले आहे. शाळेची, अभ्यासाची आवड असलेला, शाळेतल्या 'शालू’ (राजेश्वरी खरात) नामक पोरीवर एकतर्फी प्रेम करणारा. गावातल्या अशा हलक्या पोरांना उच्चवर्णीय शालू कडे पाहूही नये म्हणून समाजाने घेतलेली काळजी. आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला मोहवून टाकायचे असेल तर काळीचिमणी जाळून त्याची राख डोक्यावर टाकली तर व्यक्ती मोहात पडते अशा श्रद्धेने या गायरानातून त्या गायरानात काळीचिमणीच्या शोधात फिरणारा ’जब्या’ ताकदीनिशी आला आहे. आपण हलके आहोत आणि आपण आपल्या पायरीने राहीलं पाहिजे हे कचरू मानेला (किशोर कदम) कळते पण पोराला नाही. गावातील डूकरे गावाबाहेर काढण्याचं काम करावं लागणा-या या कुटूंबाला भेदाभेद याचा सामना कसा करावा लागतो ते लहान सहान प्रसंगात उत्तम उतरले आहे. कचरु मानेची एक मुलगी लग्न होऊनही घरात पडून आहे तर दुसरीचा विवाह ऐपत नसतांनाही हुंडा देऊन करायचा आहे. आपण जे समाजाच्या दृष्टीने हलके काम करतो ते आपल्याला आवड्णा-या अल्लड प्रेमातल्या प्रेयसीला कळू नये म्हणून काम न करणा-या जब्या गावासमोर आणि ’शालू’ समोर डुकरं पकडायला लावण्याचा प्रसंग. हागणदारीचं चित्रण, हागणदारीत डुकरं पकडण्याचा फोटो काढून फ़ेसबूकवर अपलोड करणे, एका व्यवस्थेला दुस-या व्यवस्थेशी अजिबात घेणं देणं नसणे, डुक्कर शिवलं म्हणून स्नान करणारे कुटुंब. अघोरी कृत्याने यश मिळवायचा प्रयत्न करणारा गावकरी. असे सर्वच चित्रण उत्तम झाले आहे. देवाच्या जत्रेत कानठळ्या बसवणा-या वाद्याच्या मिरवणूकीत उच्च वर्णीयांचा जब-या आणि त्याच्या मित्राला होणारा धुसमुसळेपणा अतिशय सुरेख चित्रपटातून आला आहे. दलित जीवन किंवा गावकुसाबाहेरचे जीवन म्हणून जगणा-या कचरु मानेला अनेक कटू जीवघेणे अनुभव घ्यावे लागतात.
पराकोटीचा सहनशील,सोशीक, शांत व कष्टाळू आणि पिचलेले मन आपल्याला समजू लागते. अनुभवांना सामोरे जायचे परंतु संघर्ष करायचा नाही. जातीच्या दु:खाला कारण असलेल्या सामाजिक परिस्थितीविरुद्ध तो विद्रोह करुन उठत नाही. व्यवस्थेने त्याच्या माणसापेक्षा त्याच्या जातीला प्रतिष्ठा दिल्याचे दिसते. सतत टोमने, अन्याय, सतत पडतील कामे करणे, परंतु लादलेल्या जीवनाबद्दल चिडून आगपाखड नाही. जब-याला शालू मिळते का ? वाटेल ते बोलणा-या आणि वागविणा-या समाजव्यवस्थेविरुद्ध जब्या उभा राहतो का हे पाहण्यासाठी चित्रपट नक्की बघायला हवा यात काही वाद नाही. आता चित्रपटात सर्वच उत्तम आहे असं नाही. चित्रपटाची सुरुवात संथ अशी आहे, एखादी डॉक्युमेंट्री भासावी असे स्वरुप सुरुवातीपासून वाटत राहते. आणि चित्रपटाच्या शेवटी ’वळू ’ या चित्रपटाची आठवण व्हावी इतका तो ‘पकडा पकडीसाठी’ वेळ गेलाय असे वाटते. किशोर कदमाचा अभिनय का कुणास ठाऊक फ़ारसा पोहचत नाही. कदाचित सौमित्र म्हणून की एकसुरी अभिनयामुळे ते समजत नाही. चित्रपट योग्य ठिकाणी संपलाय का ? असा प्रश्न निश्चित आपल्या मनासमोर उभा राहतो. प्रेक्षकांच्या अभिरुचीच्या उंचीने चित्रपटाचा आस्वाद घ्यावा, असे म्हणून निर्मात्याने शेवट प्रेक्षकांवर सोडला आहे. व्यक्तिगत हा चित्रपट मला फारसा का आवडत नाहीहे कोणास ठाऊक. दलित साहित्यात सतत अशा आशयाचं लेखन चाळल्यामुळे म्हणा किंवा उचल्या, उपरा वाचल्यामुळे म्हणा. चित्रपट मला थेट भिडत नाही. किशोर कदम, छाया कदम, सोमनाथ अवघडे, राजेश्वरी खरात, सुरज पवार, आणि इतर अभिनेत्यांनी एक चांगला अभिनयही केला आहे यात काही वाद नाही. आपल्याला हा चित्रपट का आवडतोय किंवा काही उणिवा जरा तपशिलवार चर्चा व्हावी म्हणून हा पुन्हा प्रपंच....! (छायाचित्र आंतरजालावरुन साभार)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
22658 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

मी वर दिलेल्या

राजेश घासकडवी
Mon, 05/12/2014 - 11:07 नवीन
मी वर दिलेल्या प्रतिसादापेक्षा अधिक स्पष्ट लिहिणं कठीण आहे. पण प्रयत्न करतो. साहित्यिक संकेतांचा आदर्श किंवा सत्याशी संबंध असतोच असं नाही. 'पुंगीचे स्वर ऐकून नाग डोलतो' हे वैैज्ञानिक सत्य नाही, तरी साहित्यात, लोककथांमध्ये ते जणू काही सत्य आहे अशा प्रकारे वापरलं जातं. चेटकीण ही खरी नसते, तरी कथांच्या विश्वात चेटकीण या संकल्पनेबरोबर आपण काही चित्र डोळ्यासमोर आणू शकतो. हे संकेत कलात्मक रचना करण्यासाठी वापरले जातात. ते सत्य असण्याची गरज नसते. ते समजून घेतले की आपल्याला लेखकाला काय सांगायचं आहे हे अधिक चांगलं समजून घेता येतं. एखाद्या कथेत चेटकीण आहे म्हणजे लेखकाचा चेटकिणीच्या असण्यावर विश्वास आहे, किंवा लेखक चेटकिणींना जस्टिफाय करतो असं नाही. संकेत बदलले जाऊ शकतात. भाषा हळूहळू बदलते तसंच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

जब्या = दलितसमाज, शालू =

थॉर माणूस
Mon, 05/12/2014 - 11:42 नवीन
जब्या = दलितसमाज, शालू = उन्नती, पक्षी = ते साध्य मिळवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी (शिक्षण, पैसा, समाजात पत...) पक्षी मिळाला तर शालू मिळण्याची शक्यता आहे. शालूच्या पावलाने पक्षी येणार नाहीये. आणि शेवटच्या चार-पाच ओळींचा तर या चित्रपटाच्या गाभ्याशी काहीच संबंध नाही, उगाच बॉलिवूड वड्याचं तेल इकडे काढलंय. वरच्या प्रतिसादांमधे आल्याप्रमाणे ही रुपके आहेत. आणि ती वापरताना एका समीकरणाच्या हिशोबाने वापरतात. लोकांनी गोष्ट वाचावी/पहावी म्हणूनसुद्धा एक साचा ठरवून त्यात तुमचा संदेश पोचवावा लागतो. मी मला वाट्टेल तशी गोष्ट सांगणार आणि सगळ्यांनी ती उचलून धरायलाच हवी अशी जबरदस्ती तर नाही ना करता येत. आर्थिक समिकरणे असतात ती वेगळीच. बाकी तद्दन गल्लाभरू मनोरंजन देणार्‍या चित्रपटांकडून (कुठलेही **वुड) काही अपेक्षा ठेवत असाल तर अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

उलट ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 05/14/2014 - 21:54 नवीन
उलट उन्नती=स्त्री असाही छुपा सामाजिक समानतेचा संदेश या रूपकामधून वाचता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

या पिक्चरने नवा विचार काय

खटपट्या
Fri, 02/28/2014 - 08:37 नवीन
या पिक्चरने नवा विचार काय दिला आहे समाजाला ? की फक्त स्वप्न बघायला प्रवृत्त केले गेले आहे?
यासाठी तरी हा चित्रपट बघावा लागेल साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित

पंकज भोसलेंच्या ब्लॉग ची लिंक

lakhu risbud
Fri, 02/28/2014 - 00:05 नवीन
पंकज भोसलेंच्या ब्लॉग ची लिंक
  • Log in or register to post comments

ब्लॉग आवडला

सुधीर
Fri, 02/28/2014 - 20:28 नवीन
ब्लॉग आवडला, पण लेखकाचं नाव गणेश मतकरी असं लिहीलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

प्रत्येक अ , ब क ड दर्जाच्या

निनाद मुक्काम …
Tue, 03/25/2014 - 13:45 नवीन
प्रत्येक अ , ब क ड दर्जाच्या शिनेमा आपल्याला समीक्षक ह्या नात्याने पाहायला हवा अशी ह्यांची भाबडी समजूत आहे. शिनेमा एक कलाकृती म्हणून पाहणे समीक्षक गटांना मान्यच नसते , त्यांची चिरफाड करणे व त्यावर अवास्तव स्तुती किंवा टीका करणे एवढ्चे त्यांना जमते व त्यासाठी तय्न्च्या दिमतीला असते ती गटणे मराठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud

तेच तेच विषय, तेच तेच सामजिक

प्रसाद१९७१
Fri, 02/28/2014 - 16:46 नवीन
तेच तेच विषय, तेच तेच सामजिक भाष्य, तोच तोच उकरुन काढलेला जातीचा वाद, हागंदारी वगैरे चा खरातर आता जाम कंटाळा आला आहे. ४०-५० वर्ष झाली, अति झालय
  • Log in or register to post comments

४०-५० वर्षे हे आपण थांबवू

खटपट्या
Sat, 03/01/2014 - 00:04 नवीन
४०-५० वर्षे हे आपण थांबवू शकलो नाही हे सुद्धा दु:ख आहेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

एकदा

केदार-मिसळपाव
Sat, 03/22/2014 - 16:18 नवीन
त्या बाजुला जाउन जगुन आलात कि मग नक्की मत बदलेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

नितळ.....

सुधीर मुतालीक
Fri, 02/28/2014 - 18:03 नवीन
डॉ, आपण सविस्तर परीक्षण लिहिले हे छान केले. परीक्षण चांगले लिहिले आहे. माझ्या मते या चित्रपटाचे कथानक USP नाही. कथानकाची मांडणी भन्नाट आहे. मांडणी अतिशय स्वच्छ आहे तिला कसलाच मुलामा नाही. चित्रपटाचा म्हणून असा काही भंपकपणा नाही. चित्रपटाचा दिग्दर्शक सराईत नाही. त्याची विषय पोहोचविण्याची तळमळ प्रत्येक फ्रेम मध्ये दिसते. सादरीकरण अफाट आहे असे माझे मत आहे . ( बाकी सॉक्सचा वास आपणाला आला असता तर कदाचित आपल्याला सिनेमा आवडला असता )
  • Log in or register to post comments

प्रचंड आवडला.

वैदेही बेलवलकर
Fri, 02/28/2014 - 18:54 नवीन
मलातरी हा चित्रपट प्रचंड आवडला. प्रिमियरमध्ये नागराज 'मला जास्त बोलता येत नाही, माझा सिनेमा काय बोलतो तेच पाहा' एवढं एकच वाक्य बोलला. 'फँड्री'ची कथा ही त्याने स्वतः अनुभवलेली / बघितलेली- असंही एका मुलाखतीत वाचलं. नागराजनी साकारलेला चंक्या, सोमनाथचा जब्या, त्याचा मित्र पिऱ्या या सर्वांनी या भूमिका अक्षरशः जगल्या आहेत असं मला वाटतं. सौमित्रच्या कचरूच्या भूमिकेतून एका बापाची लाचारी आणि अगतिकता मनात रुतत राहते कुठेतरी. तितक्याच ताकदीने जब्याच्या आईचाही अभिनय छाया कदम यांनी केला आहे. पाटलाच्या पोराने शालूकडे न पाहण्यासाठी रागावणे, जत्रेच्या वेळी शालूसमोर नाचताना अचानकच डोक्यावर कंदील घेऊन उभे राहावे लागणे, डुक्कर पकडण्याच्या वेळी शाळेतल्या कोणी विशेषतः शालूने बघू नये म्हणून लपणे आणि शेवटी बापाकडून मार खाऊन गावकऱ्यांच्या आणि शाळेतल्या सर्वांसमोर डुक्कर पकडण्याच्या वेळी सोमनाथच्या डोळ्यातली अगतिकता आपल्या मनात कुठेतरी ठसठसत राहते. शेवटी घेऊन शाळेच्या भिंतीवर रंगवलेल्या महापुरुषांच्या चित्रांसमोरून डुक्कर खांद्यावर घेऊन जब्या निघतो ती फ्रेम तर निव्वळ अप्रतिम. या अन्यायाच्या विरोधात जब्याने 'आपल्या' वरच भिरकावलेल्या दगडाने समाजातील रूढी-परंपरा, वर्ण-व्यवस्था, जातीभेद या सर्वांचा पुन्हा एकदा नव्याने विचार होण्याची गरज मात्र जाणवून दिली आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments

+१

सूड
Fri, 02/28/2014 - 22:16 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैदेही बेलवलकर

प्रतिसाद आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/28/2014 - 22:54 नवीन
वैदेही प्रतिसाद आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैदेही बेलवलकर

प्रतिसाद अत्यंत आवडला.

नगरीनिरंजन
Mon, 05/12/2014 - 07:57 नवीन
प्रतिसाद अत्यंत आवडला. फॅन्ड्री पाहण्याची संधी उशीराने का होईना मिळाली. तुमच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणेच वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैदेही बेलवलकर

आभार. काही दिल से गप्पा,,,,, काही असं आणि काही तसं....! :

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/28/2014 - 22:53 नवीन
मंडळी आपल्या सर्वांच्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार. फँड्री चित्रपट पाहण्यासाठी मी आणि माझी मैत्रीण जाणार होतो. (बायकोला नेलं की ती अहो, पोरांचे होमवर्क राहीले होते. नळाला पाणी नसेल ना आलं. तुमच्या कपड्यांची इस्त्री बाकी आहे, असे विषय थेट्रात काढते. आणि मा़झा चित्रपट पाहण्याचा सर्व मूड घालवते.) पण ऐन वेळी संडे ला जाऊया असा मैत्रीणीचा निरोप आला मी संडेला चित्रपट पाहू शकत नव्हतो कारण या चित्रपटाच्या निर्मात्याची नागराज मंजुळेची औरंगाबादला एमजीएमला मुलाखत आहे तेव्हा तो कार्यक्रम अटेंड करावा असा विचार माझा होता आणि मग चित्रपट पाहतांना मैत्रीणीचे सारखे एसेमेस. चित्रपट कसा आहे, विषय काय, अभिनय कसा आहे, फ्यँड्री म्हणजे काय, मध्यंतरात खायला काय घेतलं. इ.इ. असे किती तरी विषय. मीही जेव्हा तिच्या सोबत चित्रपट बघायला नसतो तेव्हा मीही असेच करतो म्हणा तिला. असो. :) ''आणि मी माणूस, माणूस शोधता शोधता माणसाच्या सावलीचा, माणसाच्या स्पर्शाचा माणसाच्या शब्दाचा, माणसाच्या नजरेचा केवळ गुलाम होवून राहीलो, यापुढे---- मी तसा मरणार नाही माणसातलं ढोर मारुन खाल्ल्याशिवाय'' जब्या चा शेवटचा दगडाचा फटकारा आपल्याला बसतो तो असा. उपेक्षितांचे, तळागाळातल्या लोकांच्या जीवनाचा ज्यांना अनुभवच नाही, ज्यांनी असं जीवन पाहिलंच नाही त्यांना हा चित्रपट भिडलाच पाहिजे यात काही वाद नाही. वास्तव जीवनात माझ्या आजूबाजूला हे सर्व घडत असते, मी ते प्रत्यक्ष पाहिलेले आहे, तेव्हा चित्रपटातील या सर्व गोष्टी मला नाटकी वाटू लागतात. तो चित्रपट आहे हे मी विसरुन जातो. मराठी साहित्यात जे नाही ते दलित साहित्यात आहे, असे जे म्हटल्या जायचे तसे मला जे पारंपरिक चित्रपटात नाही ते फँड्रीत आहे असे वाटलेच आहे. शे दिडशे वर्षापासून एखाद्या विशिष्ट जातीकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात अजून कोणतेच बदल झाले नाहीत. समाजातील एखादी विशिष्ट जमात म्हणजे गुन्हेगार, किंवा अमूक म्हणजे अमूक पद्धतीनेच वागले पाहिजे अशा गोष्टींचे चित्रण वास्तवपणे चित्रपटात आले आहे. 'जब्या'अगदी 'कैकाडी' 'वडारी' शोभतो. माणसाच्या चेहरापट्टीवरुन माणसाच्या जातीचा अंदाज यावा इतका हुबेहुब पात्र म्हणून 'जब्या' उतरलाच आहे. कैकाड्याचं काम खरं तर पल्हाट्याच्या (कापसाच्या झाडाची सरळ वाढणारी काडी) काड्यापासून टोपल्या बनविने. कैकाडी जमातीचं खरं काम 'बुरुडकामाचं ' मयतीच्या वेळेला लागणा-या कामट्या बांबु इ.इ. असे काम करणारा हा समाज. चित्रपट पाहतांना जब्याची घुसमट जशी पोहचते तशा काही गोष्टी पोहचत नाही. अति आक्रस्ताळपणे काही गोष्टी चित्रपटात आल्या आहेत असे वाटते. वास्तव चित्रण करायचं आहे म्हणून हागणदारीत बसलेल्या माणसाचा पादण्याचा आवाज आलाच पाहिजे इतके वास्तव (विनोदी) करण्याच्या प्रयत्नात चित्रपट घसरु लागतो असे वाटते. डुक्कर पकडण्याचा प्रसंगात नेमकं शाळेत राष्ट्र्गीत सुरु होते आणि हातात आलेले डुक्कर निसटून जाते हा प्रसंग मला तर कैच्या कै वाटला. राष्ट्रपेम किंवा काही संकेत गावातले सर्वच पाळतात हे कै च्याकैच वाटले. चित्रपटाचं प्रयोजन काय असते असं विचारलं तर आपण म्हणू की मनोरंजन, कोणी म्हणेल प्रबोधन, कोणी म्हणेल पैसे कमविणे हा उद्देश असतो, कोणी म्हणेल अभिनेत्यांना आपला अभिनय लोकापर्यम्त पोहचवायचा असतो अशी आणि विविध प्रयोजने चित्रपटाबद्दल सांगता येतील. 'फँड्री' यातले काय करतो तर मला वाटतं वास्तव जिवनाचं रेखाटन करण्याचा प्रयत्न करतो. शे दिडशे वर्षाच्या सुधारणे नंतरही समाज आहे तिथेच आहे. आधुनिक जगातही भटका समाज आपले पारंपरिक जीवनच जगत आहे आणि या समाजाच्या माणसांना प्रेम आणि तत्सम गोष्टींचे स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही, हाच संदेश चित्रपट देतो. व्यक्तिगत मला हा चित्रपट भिडत नाही त्याचं कारण उपेक्षितांच्या जीवनाबद्दल थोडं फार वाचन आणि वास्तवातील तशाच मित्रांचे अनुभव. माझ्या आजूबाजूला मी हे उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे. माझ्या तालुक्याच्या गावी डुकरे पकडण्याची ही पळापळी आणि हा समाज मी पाहिला आहे, आजही पाहतो. जब्या जसा चिडून आणि अपमान झाल्यांमुळे डुकरांवर आणि व्यवस्थेतील शोषण करणा-यांवर दगडांचा मारा करतो ते मी प्रत्यक्ष माझ्या मित्रांबरोबर माझ्या गावतालुक्याच्या पातळीवर अनुभवले आहे. मला यात काही नवीन वाटलं नाही. माझा बी.ए.एम.ए. पर्यंतच्या एका 'वडारी' मित्राचा अनुभव हा मला वाटायला लागतो. त्यालाही आपल्या बापाच्या डुकरं पकडण्याच्या कामाची लाज वाटायची. आपले मित्र काय म्हणतील असे सतत त्याला वाटत राह्यचे. त्याचा बाप सतत आमच्या गल्लीत डुकरं गाठायचा. फास आवळायचा. डुकरांचा तो आवाज आताही ताजा वाटतो. हा मात्र त्या कामापासून दूर असायचा. यालाही अशीच सुंदर पोरगी आवडायची. तू माझा मित्र असशील तर तिला माझ्याबद्दल बोलून ये म्हटल्यावर त्याचं प्रेम हिच्या कोणत्या गावीही नव्हतं. मग मीच तुम्हाला मी माझा मित्र समजते माझ्या मनात तसं काही नव्हतं. अशी मारलेली थाप मला आठवते. मित्रहो, चित्रपट न भिडण्याची ही मा़झी काही कारणे आहेत. निर्मात्याला असाच अनुभव असल्याने या अनुभवांपासून दूर गेलेल्या लोकांना हा चित्रपत आवडतो आहे, याचा मला मात्र आनंद वाटला आहे. प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार. चुभुदेघे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आवडला.

प्रचेतस
Fri, 02/28/2014 - 22:57 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद खूप आवडला.

बॅटमॅन
Sat, 03/01/2014 - 02:33 नवीन
प्रतिसाद खूप आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्याच जातकुळीतील अनुभव मला

निनाद मुक्काम …
Sun, 03/02/2014 - 00:44 नवीन
ह्याच जातकुळीतील अनुभव मला माझ्या बायकोसंधर्भात आला ,पहिल्यांदा भारतात ती जेव्हा माझ्याबरोबर आमच्या लग्नाकरिता आली तेव्हा प्रत्येक ट्रेफिक सिग्नल वर अनवाणी लहान मुले गाडीच्या काचातून भिका मागायचे हा अनुभव सर्वसि नवा असल्याने तिला गलबलून आले , मी ह्या गोष्टींकडे एवढ्या तटस्थ भूमिकेतून कसा पाहू शकतो ह्याचे तिला सखेद आशर्य वाटले. पुढच्या खेपेस तिने ह्या मुलांकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला. तरीही तिची जीवाची तगमग होतच होती. तिसर्या खेपेच्या वेळी तिला भारतात हे असेच होते व ह्याला ती स्वतः काहीही केल्या बदलू शकत नाही हे वास्तव उमजले. तिने निर्विकार पणे त्यांना आगे जाव असे सुनावले , माणसाचे मन सरावाने सरावते , त्याला इलाज नाही. भारत स्वतंत्र झाला म्हणजे नक्की काय झाले , आजचे श्रींमत व मध्यमवर्गाचे साहेबांच्या काळात सुद्धा बरे चालले होते , टिळक व आगरकर ह्यांच्या वादात अश्यावेळी आगरकर महत्वाचे व काळाच्या पुढचे वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटी

केदार-मिसळपाव
Sat, 03/22/2014 - 16:24 नवीन
शिक्षण महत्वाचे. एकदा ते मिळाले की स्वातंत्र मिळवता येते आणि राखताही येते. त्यामुळे आगरकर पटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

शिक्षण महत्वाचे

आयुर्हित
Tue, 03/25/2014 - 00:43 नवीन
शिक्षण महत्वाचे. एकदा ते मिळाले की स्वातंत्र मिळवता येते आणि राखताही येते. १००% सहमत. कृपया आपल्याया पटलेले आगरकर यांवर एक छान लेख येवू द्यावा हि विनंती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केदार-मिसळपाव

सर,

किसन शिंदे
Sun, 03/02/2014 - 11:08 नवीन
जाम आवडला प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त प्रतिसाद.

स्पंदना
Sun, 03/02/2014 - 13:09 नवीन
मस्त प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडलाच.

प्यारे१
Sat, 03/08/2014 - 14:29 नवीन
प्रतिसाद आवडलाच. गावात लहानाचं मोठं झालेल्या, गावाशी सातत्यानं संबंध आलेल्या आम्हाला देखील चित्रपटात वेगळं/ नैसर्गिक काही वाटत नाही. बर्‍याचदा तकलादूपणं उभ्या राहीलेल्या/केलेल्या समस्या नि त्यांचा ठराविक लोकांनी, वाहिन्यांनी केलेला उदोउदो एवढंच विशेष असतं. चित्रपट पाहिला नसल्यानं काही भाष्य केलं नव्हतं. गावाकडचे लोक त्याच त्या वर्तुळात राहणं जास्त पसंत करतात, त्यांना स्वतःला बदलण्याची फार इच्छा नसते, दुसर्‍यानं प्रयत्न केल्यास त्याला हसणं, टिंगल करणं नि नंतर वेळेला त्याच्याचकडं सरळ अथवा त्याला चु* बनवून पैसे लाटणं, जमिनी नावावर करुन घेणं असले उद्योग करत असल्यानं गावाकडच्या 'भोळ्याभाबड्या' जनते बद्दल अनाठायी आस्था, आपुलकी, करुणा इ.इ. वाटणं बंद झालेलं आहे. गावाकडं अजूनही जातीव्यवस्था अत्यंत स्पष्टपणं नि नागडेपणानं आपलं काम करत आहे हे वास्तव आहे. देशमुख, इनामदार इ.इ. लोक त्यांच्या तोर्‍यात, महार, मांग, रामोशी, फासेपारधी, वडार, खाटीक, चांभार, न्हावी, शिंपी इ.इ. सगळे आपापल्या जाती जमातींच्या उल्लेखात काहीही वाईट वाटून घेत नाहीत. बामणाचा वाडा असतो, वरच्या आळीला देशमुख राहतात, महारवाड्या, मांगवाड्यापलिकडं 'वडा' (ओढा)असतो. पुलाखाली हागणदारी असते, वाण्याच्या दुकानातनं चा साखर येते, न्हावी सगळ्यांच्या घरी आमंत्रणं सांगायला जातो, वडराच्या मंगीचं लगीन झालेलं असतं, गुरवाची पोरगी पळून जाते, धनगराचा म्हाद्या, तेल्याची मामी इ.इ.इ. सगळं सुरुच असतं...! महार नि मांगांमध्ये, नि इतर मागास जातींमध्ये देखील रोटी (आता असेल कदाचित) बेटी व्यवहार होत नाहीत... कवतुक 'शेरा'तल्यांना. गावातलं जिणं असंच सुरु असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जातिय वर्तुळे.

प्रभाकर पेठकर
Fri, 03/21/2014 - 13:03 नवीन
गावाकडचे लोक त्याच त्या वर्तुळात राहणं जास्त पसंत करतात, त्यांना स्वतःला बदलण्याची फार इच्छा नसते,
जाती व्यवस्थेचं समर्थन नाही पण वरील विधानातली सत्यता अनुभवली आहे. आपल्या वर्तुळातून बाहेर पडण्याची, 'स्वतःमध्ये' वैचारिक बदल घडवून आणण्याची गरज किती जणांना भासते? किती जणं प्रयत्न करतात? आणि असे चांगले विचार पसरविण्याचे काम करणार्‍या किती जणांना सक्रिय पाठींबा मिळतो? हे सर्वच विचार करण्यासारखे आहे. जर एखादा अशा बेड्या मोडून माणूस म्हणून जगू इच्छित असेल तर इतर समाज त्याला नाकारतो का? लग्नाचं जाऊद्या. लग्न करताना तर ब्राह्मण-ब्राह्मण उपजातीतही नाकं मुरडली जातात. ९६ कुळी आणि इतर मराठ्यांमध्येही भेदभाव आहेत. एवढेच काय पण कोकणातले मराठा आणि देशावरचे मराठा असा भेदभावही आहे. पण लग्ना व्यतिरिक्त इतर क्षेत्रात जसे कि शिक्षण, व्यवसाय आदी क्षेत्रात 'तेवढा' विरोध राहिलेला नाही. निदान शहारात तरी दिसून येत नाही. कदाचित त्यामुळे अस्वस्थ होऊन राजकिय नेते आरक्षणाचे फॅड लादून उच्चवर्णिय आणि 'इतर' असा सामाजिक भेदभाव रुजवतात. फँड्री पाहावयास मिळाल्यास जरूर पाहिला जाईल. बिरुटे सरांचे परिक्षण आणि त्या समर्थनातील त्यांचे प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

प्रतिसाद खूप आवडला..

स्मिता चौगुले
Wed, 03/26/2014 - 12:51 नवीन
असेच म्हणते..मी ही हे सगळे लहानपणापासून खूप जवळून पाहिलयं त्यामूळे चित्रपट पाहताना रडवेले होणे,तो चित्रपट भिड्णे असं काही झाले नाही. हे वास्तव आहे, आपण बदलू शकत नाही आणि जर कोण प्रयत्न करत असेल तर हे या समाजाला (अन्याय सहण करणार्‍या) देखिल फारसे रुचत नाही कारण त्यात त्यांना आपल्यावर आन्याय होतोय याचीच जाणिव नसते. जे आहे ते आपलं काम आहे,वडिलोपार्जीत हेच चालत आले आहे आणि आपण ते केलेच पाहिजे ही एक त्यामागची भावना असते. किबंहूना खेड्यापड्यात ही अशी कामेच त्यांच्या अर्थार्जनाचे साधन असते. हे असे वास्तव कधी न पाहीलेल्या लोकांना हा चित्रपट भिडणे, वाईट वाटणे इ. साह्जीक आहे. पण हा चित्रपट पाहताना एक न समजलेली गोष्ट - हा जब्या आणि त्याचे कुटूंब कैकाडी समाजाचे दाखवले आहे. मला माहीत आहे त्याप्रमाणे (आणि वर बिरुटे सर ही म्ह्णतात) कैकाड्याचं काम खरं तर पल्हाट्याच्या (कापसाच्या झाडाची सरळ वाढणारी काडी) काड्यापासून टोपल्या बनविने मग या चित्रपटात डुक्कर पकडायचे कामपण या कुटूंबाला का करावे लागते? कारण डुक्कर पकडण्याचे काम हे खेड्यापड्यात जातिव्यस्थेप्रमाणे आणि रुढीप्रमाणे वडाराचे असते आणि माझ्या माहितीप्रमाणे हे दोन्ही समाज वेगळे आहेत. डिस्क्लेमर्-- हे फक्त माझे विचार आहेत , या प्रतिसादाने कुठ्ल्याही जातिच्या- समाजाच्या बांधवाला दुखावण्याचा प्रयत्न नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा!

पैसा
Fri, 02/28/2014 - 23:02 नवीन
उत्तम परीक्षण आणि आभाराच्या निमित्ताने लिहिलेलं मनोगत! आवडलं. पण आजकाल डोक्याला ताप देणारे काही वाचावे, चित्रपटातून पहावे असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments

++१ पैसा ताई.

दिव्यश्री
Fri, 02/28/2014 - 23:46 नवीन
++१ पैसा ताई. आपल्या आयुष्यात समस्या काही कमी आहेत का म्हणून अगदी स्वतःच्या खिशातले पैसे घालवून मन उदास होईल असे पाहायचे , वाचायचे ? उलट विनोदी पाहून क्षणभर करमणूक करवून घ्यावी .मन प्रसन्न होते कधीकधी निखळ विनोदाने . प्रत्येक वेळी गंभीर लिहून ,पाहून नक्की काय होत असेल ? मी अजून हा सिनेमा पहिला नाही . टाईमपास पहिला , काही प्रमाणात पटला. खर्या आयुष्यात खूप गंभीर किस्से ऐकून आहे म्हणून शेवट आवडला . अवांतर : माझी आई चित्रपट पाहताना खूप भावूक व्हायची .एकीकडे ती नायिका रडायची आणि एकीकडे आमच्या मातोश्री. तेंव्हा कधी कधी हसू यायचे , बर्याच वेळा समजावून पण झाले पण फारसा फरक पडला नाही . एकीकडे ती नायिका रडायची आणि एकीकडे आमच्या मातोश्री. तेंव्हा कधी कधी हसू यायचे , बर्याच वेळा समजावून पण झाले पण फारसा फरक पडला नाही . नंतर मग रागच यायला लागला रडक्या गोष्टींचा . तिने फारसे चित्रपट पहिले नाही . टीव्ही वर लागतील तेच कधीतरी पाहणार . चित्रपटात / मालिकांमध्ये रडायचे , सोज्वळ वागायचे ते लोक पैसे घेतात. आणि आपण आपले पैसे खर्च करून मनस्ताप विकत घेतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चित्रपट एक कलाकृती म्हणून

साळसकर
Fri, 02/28/2014 - 23:09 नवीन
चित्रपट एक कलाकृती म्हणून आवडलाच. राहिला प्रश्न घसापीटाच विषय आहे..... तर हे दुर्दैव नाही का आपलेच, आपल्या समाजाचे, जे चित्र आजही थोड्याफार फरकाने तेच तसेच आहे.. जेव्हा हे चित्र बदलेल, प्रश्न बदलतीत तसे त्याला अनुसरून चित्रपटांचे विषयही आपसूकच बदलतील.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

वैदेही बेलवलकर
Sat, 03/01/2014 - 16:08 नवीन
धन्यवाद बिरुटे सर!
  • Log in or register to post comments

प्राध्यापक होऊ शकलो नाही म्हणून डायरेक्टर झालो....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/06/2014 - 21:53 नवीन
रविवारी आमच्या औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेस च्या युवा पुरस्कारच्या वतीने समाजासाठी काही उल्लेखनीय काम करणा-यां युवक युवतींचा काही रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला याच कार्यक्रमानंतर फँड्रीचा निर्माता नागराज मंजूळे (चित्रपटातील चंक्या) आणि सौमित्र उर्फ किशोर कदम (चित्रपटातील कचरु माने) यांची या कार्यक्रमाला खास उपस्थिती होती. नाट्यलेखक अजित दळवी आणि निवेदक दत्ता बाळसराफ यांनी ही मुलाखत घेतली मुलाखत अतिशय रंगतदार अशी झाली. (माझी नोटींग) - चित्रपटाचं लहानपणापासून वेड होतं. शाळेतही चित्रपटाचेच संस्कार राहीले. शाळेत दहावीला दोनदा नापास झालो. Image removed.डावीकडून सौमित्र,निवेदक दत्ता बाळसराफ, अजीत दळवी आणि नागराज मंजुळे शाळेत मास्तर माझी जात विचारायचे तेव्हा मला वाईट वाटायचं. माझ्या मित्रांमुळे माझं शिक्षण मार्गी लावलं. शिक्षणाच्या बाबतीत मला दहावीच्या गणिताचा अजूनही मोठा धाक आहे. दहावीच्या अभ्यासक्रमाइतकं भयानक गणित कुठेच नसतं. कसं तरी गावात बी.ए. आणि विद्यापीठात एम.ए. मराठी झालो. मराठीतील 'वाङ्मयीन कार्य' मला कधीच सांगता आले नाही. बारा वेळेस नेट-सेट परिक्षा नापास झालो आणि माझं प्राध्यापक होण्याचं स्वप्न भंगलं. माझ्या आयुष्यात मी अनेक लहान सहान कामे केली. आयुष्यात अनेकदा निराश झालो. माणूस फस्ट्रेशनमधे असला की काही तरी करतो. मी टेलीफोनबूथ वर कामे केली. कपड्याला इस्त्रीचे काम केले. मिथून आणि असिफ या मित्रांचे माझ्यावर खूप उपकार आहेत त्यांच्यामुळे मी जगलो. हिंदी चित्रपटाचे नायक कसे भारी असतात पण ते वास्तव जीवनातले कधी वाटले नाही. माझ्या आजूबाजूचे लोक मला चित्रपटात कधी फारसे दिसले नाहीत. खूप सुरेख नायकांपेक्षा सामान्यांचे प्रतिनिधी करणारे चित्रपटातून मला मांडता आले पाहिजे म्हणून मी मित्रांच्या आग्रहामुळे मी 'मास कम्युनिकेशन' मधे आलो. डायरेक्टरचं आकर्षणही होतं. आणि तिथेच मी 'पिस्तुल्या' शॉर्टफिल्म मधे उभा केला. आणि मग मला माझ्या आजूबाजूच्या कथा चित्रपटातून मांडता येईल असा आत्मविश्वास निर्माण झाला. दलित जीवनाच्या बाबतीत अगोदर संघर्ष, मग संघटन आणि नंतर शिक्षण असा प्रवास सुरु होतो. म.फुले.डॉ. आंबेडकर आपण कधी शिकणार असे मला वाटायचे. आताशी कुठे फँड्री पोहचला. अजून माझी कथा यायची आहे. पण मी चित्रपटातूनच ते मांडेल का हे मला माहिती नाही. पण कोणत्या तरी माध्यमातून समाजासमोर ते येईलच. सौमित्र. माझं बालपण कोळीवाड्यात गेलं. समुद्राची गाज सतत कानावर यायची. वडीलांनी लहानपणीच हॉटेलवर कामावर ठेवले पण सतत शिकावं वाटलं. शिकण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षकांनी माझ्या पाठांतराचा गुण ओळखला. पुढे वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला बक्षीस मिळालं आणि दैनिकात नाव छापून आलं तेव्हा कितीतरी दिवस ती बातमी पाहात असायचो. एकपात्री नाटकाच्या स्पर्धेपासून रंगमंचावर उभा आहे तो आजपर्यंत. फँड्रीत मी जेव्हा अभिनय करायला लागेन तेव्हा मला थांबव असे मी नागराजला म्हणालो. चित्रपटातला अनुभव माझ्यासाठी वेगळा होता पुन्हा कधी असे जमेल का माहिती नाही. खरं तर हा गप्पांचा कार्यक्रम झकास झाला. काही मिपाकर आणि मिपा खडानखडा वाचणारे पण सदस्यत्व न घेतलेले पिव्वर वाचक मिपाकर कार्यक्रमाला उपस्थित होते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Sat, 03/08/2014 - 12:47 नवीन
निर्मात्याची खरी ओळख आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आढावा आवडला.

यशोधरा
Sat, 03/08/2014 - 12:50 नवीन
आढावा आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पैसे भरून जालावर "फँड्री

निनाद मुक्काम …
Sat, 03/08/2014 - 08:27 नवीन
पैसे भरून जालावर "फँड्री पहा आपली मराठी ची खास योजना
  • Log in or register to post comments

प्रामाणिक परीक्षण

सखी
Tue, 03/18/2014 - 20:04 नवीन
प्रामाणिक परीक्षण आणि नंतरची मुलाखतीची पुरवणी दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

तुमचं परीक्षण छान वाटतंय खरं

kurlekaar
Wed, 03/19/2014 - 11:00 नवीन
तुमचं परीक्षण छान वाटतंय खरं पण ते बहुधा तुमच्या आकर्षक भाषाशैली मुळे सुद्धा असू शकेल, कारण मी हा चित्रपट अजूनतरी पाह्यला नाहीय. पण किशोर कदमांनी तुमची निराशा केली हे वाचून वाईट वाटलं कारण मला त्याचं जोगवा व नटरंग मधील काम खूप आवडलं होतं. मी हा चित्रपट या आठवड्यात पाहेन बहुधा व लिहीन पुन्हा एकदा.
  • Log in or register to post comments

चित्रपटाचा वेग पटकथेला

मृगजळाचे बांधकाम
Wed, 03/19/2014 - 18:29 नवीन
चित्रपटाचा वेग पटकथेला अनुसरुनच संयत असा आहे.मला तर मध्यंतर केव्हा झाले तेच कळले नाही. हा संयत वेगच आपल्याला खोलवर घेउन जातो.चित्रपटाचे संगीत फार सुंदर आहे,प्रसंगानुरूप अगदी चपखल बसते.खूप छान चित्रपट REALLY.
  • Log in or register to post comments

छान परीक्षण आणि चर्चा

drsunilahirrao
Sat, 03/22/2014 - 10:07 नवीन
छान परीक्षण आणि चर्चा फँन्ड्रीविषयीची उत्सुकता वाढली. लवकरच पाहणार आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा