Skip to main content

फ़्यंड्री...!

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 26/02/2014 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. मंडळी, मिपावर फ्यंड्रीबद्दल उत्तम लिहून आल्यानंतर आणि इतरही ठिकाणी फ़्यांड्रीवर येता जाता चर्चा व्हायला लागल्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सूकता लागली होती. मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे. पारंपरिक चित्रपटापेक्षा काही तरी वेगळे मराठी चित्रपटातून यायला लागले आहे. वास्तवतेवर आधारित सकस कथा, ध्वनी, छायाचित्रण,कलाकार, या आणि विविध अशा बदलांनी मराठी चित्रपट जरा हटके यायला लागले आहेत. मराठी चित्रपटांना विषय फुलवता यायला लागले थेटरात शांतपणे चित्रपट बघायला जावे, इथपर्यंत मराठी चित्रपटांनी भरारी घेतली आहे, असे वाटायला लागले आहे. असाच एक चित्रपट म्हणजे फ्यंड्री. सामाजिक, धार्मिक, व सांस्कृतिक परंपरेच्या अशा अंधार कोठडीत गुदमरलेले दलित जीवन वर्षानुवर्ष बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. माणूस म्हणून जगण्याचे सर्व हक्क असतांनाही सामाजिक रुढी परंपरेत गुरफटून गेलेल्या कचरु माने (किशोर कदम) आणि त्याचा मुलगा जाबुवंतराव कचरु माने (सोमनाथ अवघडे) यांची आयुष्यातील स्वप्न, व्यवस्था आणि संघर्षाची चित्तर कथा म्हणजे फ़्यांड्री. परंपरा म्हणजे कचरु माने तर बंड म्हणजे जाबुवंतराव माने. गावकुसाबाहेरच्या समाजालाही माणूस म्हणू काही भावना असतात आणि त्याचं इतरांना काही घेणं देणं नसतं. असं एक उत्तम चित्रण फ़्यांड्रीत आपल्याला बघायला मिळते.
कैकाडी समाजातील कुटुंबाची ही कथा. माणसाच्या मनातील न्यूनगंड आणि स्वप्न यांचा हा संघर्ष. प्रेमकथा तशी ती नाहीच. कैकाडी समाजाचे टोपले विणणे हे काम परंतु गावाबाहेर वावरणारा आणि गावातील सर्व हलकी कामं करणारा अशा कुटुंबाचे चित्रण नागराज मंजुळे यांनी केले आहे. शाळेची, अभ्यासाची आवड असलेला, शाळेतल्या 'शालू’ (राजेश्वरी खरात) नामक पोरीवर एकतर्फी प्रेम करणारा. गावातल्या अशा हलक्या पोरांना उच्चवर्णीय शालू कडे पाहूही नये म्हणून समाजाने घेतलेली काळजी. आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला मोहवून टाकायचे असेल तर काळीचिमणी जाळून त्याची राख डोक्यावर टाकली तर व्यक्ती मोहात पडते अशा श्रद्धेने या गायरानातून त्या गायरानात काळीचिमणीच्या शोधात फिरणारा ’जब्या’ ताकदीनिशी आला आहे. आपण हलके आहोत आणि आपण आपल्या पायरीने राहीलं पाहिजे हे कचरू मानेला (किशोर कदम) कळते पण पोराला नाही. गावातील डूकरे गावाबाहेर काढण्याचं काम करावं लागणा-या या कुटूंबाला भेदाभेद याचा सामना कसा करावा लागतो ते लहान सहान प्रसंगात उत्तम उतरले आहे. कचरु मानेची एक मुलगी लग्न होऊनही घरात पडून आहे तर दुसरीचा विवाह ऐपत नसतांनाही हुंडा देऊन करायचा आहे. आपण जे समाजाच्या दृष्टीने हलके काम करतो ते आपल्याला आवड्णा-या अल्लड प्रेमातल्या प्रेयसीला कळू नये म्हणून काम न करणा-या जब्या गावासमोर आणि ’शालू’ समोर डुकरं पकडायला लावण्याचा प्रसंग. हागणदारीचं चित्रण, हागणदारीत डुकरं पकडण्याचा फोटो काढून फ़ेसबूकवर अपलोड करणे, एका व्यवस्थेला दुस-या व्यवस्थेशी अजिबात घेणं देणं नसणे, डुक्कर शिवलं म्हणून स्नान करणारे कुटुंब. अघोरी कृत्याने यश मिळवायचा प्रयत्न करणारा गावकरी. असे सर्वच चित्रण उत्तम झाले आहे. देवाच्या जत्रेत कानठळ्या बसवणा-या वाद्याच्या मिरवणूकीत उच्च वर्णीयांचा जब-या आणि त्याच्या मित्राला होणारा धुसमुसळेपणा अतिशय सुरेख चित्रपटातून आला आहे. दलित जीवन किंवा गावकुसाबाहेरचे जीवन म्हणून जगणा-या कचरु मानेला अनेक कटू जीवघेणे अनुभव घ्यावे लागतात.
पराकोटीचा सहनशील,सोशीक, शांत व कष्टाळू आणि पिचलेले मन आपल्याला समजू लागते. अनुभवांना सामोरे जायचे परंतु संघर्ष करायचा नाही. जातीच्या दु:खाला कारण असलेल्या सामाजिक परिस्थितीविरुद्ध तो विद्रोह करुन उठत नाही. व्यवस्थेने त्याच्या माणसापेक्षा त्याच्या जातीला प्रतिष्ठा दिल्याचे दिसते. सतत टोमने, अन्याय, सतत पडतील कामे करणे, परंतु लादलेल्या जीवनाबद्दल चिडून आगपाखड नाही. जब-याला शालू मिळते का ? वाटेल ते बोलणा-या आणि वागविणा-या समाजव्यवस्थेविरुद्ध जब्या उभा राहतो का हे पाहण्यासाठी चित्रपट नक्की बघायला हवा यात काही वाद नाही. आता चित्रपटात सर्वच उत्तम आहे असं नाही. चित्रपटाची सुरुवात संथ अशी आहे, एखादी डॉक्युमेंट्री भासावी असे स्वरुप सुरुवातीपासून वाटत राहते. आणि चित्रपटाच्या शेवटी ’वळू ’ या चित्रपटाची आठवण व्हावी इतका तो ‘पकडा पकडीसाठी’ वेळ गेलाय असे वाटते. किशोर कदमाचा अभिनय का कुणास ठाऊक फ़ारसा पोहचत नाही. कदाचित सौमित्र म्हणून की एकसुरी अभिनयामुळे ते समजत नाही. चित्रपट योग्य ठिकाणी संपलाय का ? असा प्रश्न निश्चित आपल्या मनासमोर उभा राहतो. प्रेक्षकांच्या अभिरुचीच्या उंचीने चित्रपटाचा आस्वाद घ्यावा, असे म्हणून निर्मात्याने शेवट प्रेक्षकांवर सोडला आहे. व्यक्तिगत हा चित्रपट मला फारसा का आवडत नाहीहे कोणास ठाऊक. दलित साहित्यात सतत अशा आशयाचं लेखन चाळल्यामुळे म्हणा किंवा उचल्या, उपरा वाचल्यामुळे म्हणा. चित्रपट मला थेट भिडत नाही. किशोर कदम, छाया कदम, सोमनाथ अवघडे, राजेश्वरी खरात, सुरज पवार, आणि इतर अभिनेत्यांनी एक चांगला अभिनयही केला आहे यात काही वाद नाही. आपल्याला हा चित्रपट का आवडतोय किंवा काही उणिवा जरा तपशिलवार चर्चा व्हावी म्हणून हा पुन्हा प्रपंच....! (छायाचित्र आंतरजालावरुन साभार)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22762
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by केदार-मिसळपाव

शिक्षण महत्वाचे. एकदा ते मिळाले की स्वातंत्र मिळवता येते आणि राखताही येते. १००% सहमत. कृपया आपल्याया पटलेले आगरकर यांवर एक छान लेख येवू द्यावा हि विनंती. धन्यवाद.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडलाच. गावात लहानाचं मोठं झालेल्या, गावाशी सातत्यानं संबंध आलेल्या आम्हाला देखील चित्रपटात वेगळं/ नैसर्गिक काही वाटत नाही. बर्‍याचदा तकलादूपणं उभ्या राहीलेल्या/केलेल्या समस्या नि त्यांचा ठराविक लोकांनी, वाहिन्यांनी केलेला उदोउदो एवढंच विशेष असतं. चित्रपट पाहिला नसल्यानं काही भाष्य केलं नव्हतं. गावाकडचे लोक त्याच त्या वर्तुळात राहणं जास्त पसंत करतात, त्यांना स्वतःला बदलण्याची फार इच्छा नसते, दुसर्‍यानं प्रयत्न केल्यास त्याला हसणं, टिंगल करणं नि नंतर वेळेला त्याच्याचकडं सरळ अथवा त्याला चु* बनवून पैसे लाटणं, जमिनी नावावर करुन घेणं असले उद्योग करत असल्यानं गावाकडच्या 'भोळ्याभाबड्या' जनते बद्दल अनाठायी आस्था, आपुलकी, करुणा इ.इ. वाटणं बंद झालेलं आहे. गावाकडं अजूनही जातीव्यवस्था अत्यंत स्पष्टपणं नि नागडेपणानं आपलं काम करत आहे हे वास्तव आहे. देशमुख, इनामदार इ.इ. लोक त्यांच्या तोर्‍यात, महार, मांग, रामोशी, फासेपारधी, वडार, खाटीक, चांभार, न्हावी, शिंपी इ.इ. सगळे आपापल्या जाती जमातींच्या उल्लेखात काहीही वाईट वाटून घेत नाहीत. बामणाचा वाडा असतो, वरच्या आळीला देशमुख राहतात, महारवाड्या, मांगवाड्यापलिकडं 'वडा' (ओढा)असतो. पुलाखाली हागणदारी असते, वाण्याच्या दुकानातनं चा साखर येते, न्हावी सगळ्यांच्या घरी आमंत्रणं सांगायला जातो, वडराच्या मंगीचं लगीन झालेलं असतं, गुरवाची पोरगी पळून जाते, धनगराचा म्हाद्या, तेल्याची मामी इ.इ.इ. सगळं सुरुच असतं...! महार नि मांगांमध्ये, नि इतर मागास जातींमध्ये देखील रोटी (आता असेल कदाचित) बेटी व्यवहार होत नाहीत... कवतुक 'शेरा'तल्यांना. गावातलं जिणं असंच सुरु असतं.

In reply to by प्यारे१

गावाकडचे लोक त्याच त्या वर्तुळात राहणं जास्त पसंत करतात, त्यांना स्वतःला बदलण्याची फार इच्छा नसते,
जाती व्यवस्थेचं समर्थन नाही पण वरील विधानातली सत्यता अनुभवली आहे. आपल्या वर्तुळातून बाहेर पडण्याची, 'स्वतःमध्ये' वैचारिक बदल घडवून आणण्याची गरज किती जणांना भासते? किती जणं प्रयत्न करतात? आणि असे चांगले विचार पसरविण्याचे काम करणार्‍या किती जणांना सक्रिय पाठींबा मिळतो? हे सर्वच विचार करण्यासारखे आहे. जर एखादा अशा बेड्या मोडून माणूस म्हणून जगू इच्छित असेल तर इतर समाज त्याला नाकारतो का? लग्नाचं जाऊद्या. लग्न करताना तर ब्राह्मण-ब्राह्मण उपजातीतही नाकं मुरडली जातात. ९६ कुळी आणि इतर मराठ्यांमध्येही भेदभाव आहेत. एवढेच काय पण कोकणातले मराठा आणि देशावरचे मराठा असा भेदभावही आहे. पण लग्ना व्यतिरिक्त इतर क्षेत्रात जसे कि शिक्षण, व्यवसाय आदी क्षेत्रात 'तेवढा' विरोध राहिलेला नाही. निदान शहारात तरी दिसून येत नाही. कदाचित त्यामुळे अस्वस्थ होऊन राजकिय नेते आरक्षणाचे फॅड लादून उच्चवर्णिय आणि 'इतर' असा सामाजिक भेदभाव रुजवतात. फँड्री पाहावयास मिळाल्यास जरूर पाहिला जाईल. बिरुटे सरांचे परिक्षण आणि त्या समर्थनातील त्यांचे प्रतिसाद आवडले.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणते..मी ही हे सगळे लहानपणापासून खूप जवळून पाहिलयं त्यामूळे चित्रपट पाहताना रडवेले होणे,तो चित्रपट भिड्णे असं काही झाले नाही. हे वास्तव आहे, आपण बदलू शकत नाही आणि जर कोण प्रयत्न करत असेल तर हे या समाजाला (अन्याय सहण करणार्‍या) देखिल फारसे रुचत नाही कारण त्यात त्यांना आपल्यावर आन्याय होतोय याचीच जाणिव नसते. जे आहे ते आपलं काम आहे,वडिलोपार्जीत हेच चालत आले आहे आणि आपण ते केलेच पाहिजे ही एक त्यामागची भावना असते. किबंहूना खेड्यापड्यात ही अशी कामेच त्यांच्या अर्थार्जनाचे साधन असते. हे असे वास्तव कधी न पाहीलेल्या लोकांना हा चित्रपट भिडणे, वाईट वाटणे इ. साह्जीक आहे. पण हा चित्रपट पाहताना एक न समजलेली गोष्ट - हा जब्या आणि त्याचे कुटूंब कैकाडी समाजाचे दाखवले आहे. मला माहीत आहे त्याप्रमाणे (आणि वर बिरुटे सर ही म्ह्णतात) कैकाड्याचं काम खरं तर पल्हाट्याच्या (कापसाच्या झाडाची सरळ वाढणारी काडी) काड्यापासून टोपल्या बनविने मग या चित्रपटात डुक्कर पकडायचे कामपण या कुटूंबाला का करावे लागते? कारण डुक्कर पकडण्याचे काम हे खेड्यापड्यात जातिव्यस्थेप्रमाणे आणि रुढीप्रमाणे वडाराचे असते आणि माझ्या माहितीप्रमाणे हे दोन्ही समाज वेगळे आहेत. डिस्क्लेमर्-- हे फक्त माझे विचार आहेत , या प्रतिसादाने कुठ्ल्याही जातिच्या- समाजाच्या बांधवाला दुखावण्याचा प्रयत्न नाही.

उत्तम परीक्षण आणि आभाराच्या निमित्ताने लिहिलेलं मनोगत! आवडलं. पण आजकाल डोक्याला ताप देणारे काही वाचावे, चित्रपटातून पहावे असं वाटत नाही.

In reply to by पैसा

++१ पैसा ताई. आपल्या आयुष्यात समस्या काही कमी आहेत का म्हणून अगदी स्वतःच्या खिशातले पैसे घालवून मन उदास होईल असे पाहायचे , वाचायचे ? उलट विनोदी पाहून क्षणभर करमणूक करवून घ्यावी .मन प्रसन्न होते कधीकधी निखळ विनोदाने . प्रत्येक वेळी गंभीर लिहून ,पाहून नक्की काय होत असेल ? मी अजून हा सिनेमा पहिला नाही . टाईमपास पहिला , काही प्रमाणात पटला. खर्या आयुष्यात खूप गंभीर किस्से ऐकून आहे म्हणून शेवट आवडला . अवांतर : माझी आई चित्रपट पाहताना खूप भावूक व्हायची .एकीकडे ती नायिका रडायची आणि एकीकडे आमच्या मातोश्री. तेंव्हा कधी कधी हसू यायचे , बर्याच वेळा समजावून पण झाले पण फारसा फरक पडला नाही . एकीकडे ती नायिका रडायची आणि एकीकडे आमच्या मातोश्री. तेंव्हा कधी कधी हसू यायचे , बर्याच वेळा समजावून पण झाले पण फारसा फरक पडला नाही . नंतर मग रागच यायला लागला रडक्या गोष्टींचा . तिने फारसे चित्रपट पहिले नाही . टीव्ही वर लागतील तेच कधीतरी पाहणार . चित्रपटात / मालिकांमध्ये रडायचे , सोज्वळ वागायचे ते लोक पैसे घेतात. आणि आपण आपले पैसे खर्च करून मनस्ताप विकत घेतो .

चित्रपट एक कलाकृती म्हणून आवडलाच. राहिला प्रश्न घसापीटाच विषय आहे..... तर हे दुर्दैव नाही का आपलेच, आपल्या समाजाचे, जे चित्र आजही थोड्याफार फरकाने तेच तसेच आहे.. जेव्हा हे चित्र बदलेल, प्रश्न बदलतीत तसे त्याला अनुसरून चित्रपटांचे विषयही आपसूकच बदलतील.

धन्यवाद बिरुटे सर!

रविवारी आमच्या औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेस च्या युवा पुरस्कारच्या वतीने समाजासाठी काही उल्लेखनीय काम करणा-यां युवक युवतींचा काही रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला याच कार्यक्रमानंतर फँड्रीचा निर्माता नागराज मंजूळे (चित्रपटातील चंक्या) आणि सौमित्र उर्फ किशोर कदम (चित्रपटातील कचरु माने) यांची या कार्यक्रमाला खास उपस्थिती होती. नाट्यलेखक अजित दळवी आणि निवेदक दत्ता बाळसराफ यांनी ही मुलाखत घेतली मुलाखत अतिशय रंगतदार अशी झाली. (माझी नोटींग) - चित्रपटाचं लहानपणापासून वेड होतं. शाळेतही चित्रपटाचेच संस्कार राहीले. शाळेत दहावीला दोनदा नापास झालो.
डावीकडून सौमित्र,निवेदक दत्ता बाळसराफ, अजीत दळवी आणि नागराज मंजुळे
शाळेत मास्तर माझी जात विचारायचे तेव्हा मला वाईट वाटायचं. माझ्या मित्रांमुळे माझं शिक्षण मार्गी लावलं. शिक्षणाच्या बाबतीत मला दहावीच्या गणिताचा अजूनही मोठा धाक आहे. दहावीच्या अभ्यासक्रमाइतकं भयानक गणित कुठेच नसतं. कसं तरी गावात बी.ए. आणि विद्यापीठात एम.ए. मराठी झालो. मराठीतील 'वाङ्मयीन कार्य' मला कधीच सांगता आले नाही. बारा वेळेस नेट-सेट परिक्षा नापास झालो आणि माझं प्राध्यापक होण्याचं स्वप्न भंगलं. माझ्या आयुष्यात मी अनेक लहान सहान कामे केली. आयुष्यात अनेकदा निराश झालो. माणूस फस्ट्रेशनमधे असला की काही तरी करतो. मी टेलीफोनबूथ वर कामे केली. कपड्याला इस्त्रीचे काम केले. मिथून आणि असिफ या मित्रांचे माझ्यावर खूप उपकार आहेत त्यांच्यामुळे मी जगलो. हिंदी चित्रपटाचे नायक कसे भारी असतात पण ते वास्तव जीवनातले कधी वाटले नाही. माझ्या आजूबाजूचे लोक मला चित्रपटात कधी फारसे दिसले नाहीत. खूप सुरेख नायकांपेक्षा सामान्यांचे प्रतिनिधी करणारे चित्रपटातून मला मांडता आले पाहिजे म्हणून मी मित्रांच्या आग्रहामुळे मी 'मास कम्युनिकेशन' मधे आलो. डायरेक्टरचं आकर्षणही होतं. आणि तिथेच मी 'पिस्तुल्या' शॉर्टफिल्म मधे उभा केला. आणि मग मला माझ्या आजूबाजूच्या कथा चित्रपटातून मांडता येईल असा आत्मविश्वास निर्माण झाला. दलित जीवनाच्या बाबतीत अगोदर संघर्ष, मग संघटन आणि नंतर शिक्षण असा प्रवास सुरु होतो. म.फुले.डॉ. आंबेडकर आपण कधी शिकणार असे मला वाटायचे. आताशी कुठे फँड्री पोहचला. अजून माझी कथा यायची आहे. पण मी चित्रपटातूनच ते मांडेल का हे मला माहिती नाही. पण कोणत्या तरी माध्यमातून समाजासमोर ते येईलच. सौमित्र. माझं बालपण कोळीवाड्यात गेलं. समुद्राची गाज सतत कानावर यायची. वडीलांनी लहानपणीच हॉटेलवर कामावर ठेवले पण सतत शिकावं वाटलं. शिकण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षकांनी माझ्या पाठांतराचा गुण ओळखला. पुढे वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला बक्षीस मिळालं आणि दैनिकात नाव छापून आलं तेव्हा कितीतरी दिवस ती बातमी पाहात असायचो. एकपात्री नाटकाच्या स्पर्धेपासून रंगमंचावर उभा आहे तो आजपर्यंत. फँड्रीत मी जेव्हा अभिनय करायला लागेन तेव्हा मला थांबव असे मी नागराजला म्हणालो. चित्रपटातला अनुभव माझ्यासाठी वेगळा होता पुन्हा कधी असे जमेल का माहिती नाही. खरं तर हा गप्पांचा कार्यक्रम झकास झाला. काही मिपाकर आणि मिपा खडानखडा वाचणारे पण सदस्यत्व न घेतलेले पिव्वर वाचक मिपाकर कार्यक्रमाला उपस्थित होते. -दिलीप बिरुटे

तुमचं परीक्षण छान वाटतंय खरं पण ते बहुधा तुमच्या आकर्षक भाषाशैली मुळे सुद्धा असू शकेल, कारण मी हा चित्रपट अजूनतरी पाह्यला नाहीय. पण किशोर कदमांनी तुमची निराशा केली हे वाचून वाईट वाटलं कारण मला त्याचं जोगवा व नटरंग मधील काम खूप आवडलं होतं. मी हा चित्रपट या आठवड्यात पाहेन बहुधा व लिहीन पुन्हा एकदा.

चित्रपटाचा वेग पटकथेला अनुसरुनच संयत असा आहे.मला तर मध्यंतर केव्हा झाले तेच कळले नाही. हा संयत वेगच आपल्याला खोलवर घेउन जातो.चित्रपटाचे संगीत फार सुंदर आहे,प्रसंगानुरूप अगदी चपखल बसते.खूप छान चित्रपट REALLY.