✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शत्रुघ्न

म
मृत्युन्जय यांनी
Tue, 02/05/2013 - 13:08  ·  लेख
लेख
इतिहास मोठा क्रूर आहे. काही लोकांना त्याने देव पदी पोचवले तर काही जणांना उपेक्षेने मारले. ज्याव्यक्तिरेखांची इतिहासाने उपेक्षा केली त्यांत शत्रुघ्नाचे नाव फार वरती आहे. किंबहुना सर्वात वरती तेच आहे. वटवृक्षांच्या सावलीत एखादे रोप कोमेजुन जावे तशी शत्रुघ्नाची व्यक्तिरेखा कोमेजुन गेल्यागत भासते. राम तर देवपदी पोचला. लक्ष्मण अजरामर झाला. भरत भ्रातृप्रेमावर आणि निस्पृहतेवर गाजला. शत्रुघ्नाच्या वाट्याला मात्र ते मोमेंट्स ऑफ फेम आलेच नाहीत. नाही म्हणायला तसे महाभारतातले नकुल सहदेव देखील उपेक्षित. पण त्यांच्याबद्दल निदान काही कौतुकास्पद शब्द लिहिले गेले. नकुलाची अश्वपरीक्षा आणि सहदेवाची भविष्यपरीक्षा यांवर काही मिथके तरी वाचायला मिळाली आहेत. नकुल / सहदेव म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर महाभारतातले नकुल सहदेवच येतात. शत्रुघ्न म्हटल्यावर मात्र आपल्या डोळ्यासमोर "खामोश" "जली को आग कहते है बुझी को राख कहते है" वगैरे म्हणणारा शत्रुघ्न सिन्हा येतो. (तोच तो सोनाक्षी सिन्हा चा बाप. काही वर्षांनी तो केवळ दगडीचा बाप म्हणुनच देखील ओळखला जाउ शकतो. द्गडी म्हणजे सोनाक्षी. अंदर की खबर आहे की तिचे मूळ नाव सोनाक्षी नसुन 'स्टोना'क्षी आह'. तिच्या डो़ळ्यात आणि दगडात एकच भाव असतात. कधीकधी दगडही सुंदर दिसतो तशी स्टोनाक्षीही सुंदर दिसते. साम्यस्थळे एवढ्यात संपतात. बाकी दगडाचा अपमान करण्याचा काही हेतू नाही. असो. विषय बदलला. त्या शत्रुघ्नाचे दुर्दैव. लेखाचा विषय आहे शत्रुघ्न आणि लिहितो आहे सिन्हांच्या दगडीवर.) पण आज शत्रुघ्नाबद्दल विचारले तर आपल्यापैकी कितीजण धाडधाड १० ओळी म्हणुन दाखवु शकतील. राम बोला लक्ष्मण बोला, अर्जुन म्हणा कर्ण म्हणा लोक अधिकारवाणीने थोडेफार बोलतील. महाभारतातल्या खलनायकांबद्दलही लोकांना माहिती आहे पण रामायणातल्या बंधुनिष्ठ शत्रुघ्नाबद्दल नाही. कारण मुळात त्याचे आख्खे जीवनच अळणी आहेत. त्यात काही माल मसाला नाही, मेलोड्रामा नाही. तो रामासारखा वलयांकित नाही, लक्ष्मणासारखा पराक्रमी आणि सेवाव्रती नाही. भरतासारखा उदार आणि त्यागी नाही कारण मुळात त्याला कधी तो चान्सच मिळाला नाही. भरतासारखे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेउन त्याने कधी राज्य केले नाही कारण मुळात त्या राजपदाचे मापच त्याच्या पदरी पडले नाही. शत्रुघ्नाचे आख्खे आयुष्यच आपल्यासाठी केवळ भरताचा धाकला भाऊ इतपतच सिमीत आहे. आणि हीच मुळी प्रचंड मोठी शोकांतिका आहे कारण तो भरताचा सख्खा धाकटा भाऊ नसुन लक्ष्मणाचा जुळा भाऊ आहे. शत्रुघ्न मुळात कोण होता हेच जर माहिती नसेल तर त्याचे कार्य काय माहिती असणार? शत्रुघ्न म्हणजे शत्रुंचा नाश करणारा. दशरथ आणि सुमित्रेचा मुलगा. लक्ष्मणाचा जुळा भाऊ, राम आणी भरताचा सावत्रभाऊ आणि चार भावंडांमधला सर्वात धाकटा (जुळा असुनही). पण शत्रुघ्नाची खरी ओळख याहुनही खुप मोठी आहे. त्याच्या आयुष्यातला प्रसिद्धीचा एकमेव क्षण लवणासुराच्या वधात आला. लवणासुर म्हणजे मधु राक्षसाचा मुलगा. या मधुच्या नावावरुनच मथुरा हे नाव आले. या मधुने देव दानव मनुष्य या सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. प्रजाहितदा होता. त्यावर खुष होउन साक्षात शिवाने त्याला स्वतःचा त्रिशूळ दिला. जो मधुच्या मृत्युन्ंतर लवणासुराकडे आला. लवणासुर स्वत: पराक्रमी आणि अस्त्रनिपुण होता. मात्र ऋषीमुनींना आणि मनुष्यांना त्रास देणारा होता. प्रजानन त्रासले आणि रामाकडे आले आणि रामाने याकामी भरताला लावुन दिले. पराक्रम गाजवण्याचा हा एक क्षणही वाट्याला येत नाही हे बघुन अखेर शत्रुघ्नाने रामाकडे या कामगिरीची मागणी केली आणि मिळवली. रामाने खास विष्णुने दिलेले अस्त्र शत्रुघ्नाकडे देउन त्याला लवणासुराकडे धाडले. आख्यायिका अशी आहे की लवणासुराच्या महालात अनेक दैवी अस्त्रे होती जी जवळ असेतो तो अजेय होता. त्यामुळे शत्रुघ्नाने भक्ष्याचे आमिष दाखवुन त्याला महालापासु दूर नेले आणि मग युध्दाचे आव्हाने दिले. याबाबत त्याने त्याच्या जुळ्या भावाचा कित्ता गिरवला. त्यानेही इंद्रजिताला असेच अजेय अस्त्रांपासुन दूर ठेवले होते. अखेर लवणासूर मेला. मथुरेचे राज्य त्यानंतर शत्रुघ्नाकडे आणि मग त्याच्या मुलांकडे गेले. लवणासुर वधाने आणि अश्वमेध दिग्विजयाने त्याने मिळवलेले किर्ती अखेरच्या क्षणी त्याच्या पुतण्यांनी त्याला हरवुन त्याच्यापासुन हिरावुन नेली. पण शत्रुघ्नाचा मोठेपणा लवणासुर वधात किंवा अश्वमेधाच्या दिग्विजयात नाहिच मुळी. त्याचा मोठेपणा इतिहासाने कधी अधोरेखितच केला नाही. त्याचा मोठेपणा आहे राम - लक्ष्मण वनवासात गेलेले असताना आणि भरत रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवुन अयोध्येबाहेर कुटीत राहत असताना निरपेक्ष, नि:स्पृह वृत्तीने अयोध्येच रक्षण करण्यात आहे. १४ वर्षाच्या काळात अयोध्या कधी नव्हे इतकी सजली, नटली, बहरली, समृद्ध झाली. याचे श्रेय सर्वांच्या अनुपस्थितीत राज्य योग्यप्रकारे सांभाळणार्‍या शत्रुघ्नाकडेच जाते. याबदल्यात त्याच्या पदरात कुठलेच कीर्तीचे माप पडले नाही. १४वर्षांनी राम परतल्यावर लोक म्हणाले भरताने रामाला राज्य परत केले. पण ते राज्य भरताने तरी कुठे केले होते. ते शत्रुघ्नानेच तर केले. वास्तविक पाहता लक्ष्मणाने जी सेवा रामाची केली तशीच शत्रुघ्नाने भरताची केली. लक्ष्मण रामाची सावली बनुन राहिला तर शत्रुघ्न भरताचे प्रतिरुप बनुन. दोन्ही जुळ्या भावंडांनी निरपेक्षपणे आपल्या सावत्र भावांची सेवा करण्यात धन्यता मानली. परंतु इंद्रजित वधामुळे असेल कदाचित किंवा वनवास भोगल्यानेही असेल पण लक्ष्मणाची प्रतिमा एका वटवृक्षा एवढी मोठी झाली तर शत्रुघ्न त्या वटवृक्षाची केवळ एक सावली बनुन राहिला. लक्ष्मणाच्या मृत्युनंतर रामापाठोपाठ भरतानेही जलसमाधी घेतली तसे कायम त्या दोघांबरोबर सावली सारखा राहिलेला शत्रुघ्नही सरयूत विलीन झाला. बंधुप्रेमाचे याहुन उदात्त उदाहरण इतिहासात नाही. राम उदात्ततेचे प्रतीक आहे तर लक्ष्मण बंधुप्रेमाचे, भरत त्यागाचे आणि उदारपणाचे प्रतीक आहे तर शत्रुघ्न निरपेक्ष आणि नि:स्पृह व्रुत्तीचे. त्याच्या या नीरक्षीरसमान वृतीला सलाम करण्यासाठी हा लेखनप्रपंच.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
नाट्य
धर्म
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
लेख
मत

प्रतिक्रिया द्या
21108 वाचन

💬 प्रतिसाद (130)

प्रतिक्रिया

>>>राम उदात्ततेचे प्रतीक आहे

नाना चेंगट
Tue, 02/05/2013 - 13:16 नवीन
>>>राम उदात्ततेचे प्रतीक आहे तर लक्ष्मण बंधुप्रेमाचे, भरत त्यागाचे आणि उदारपणाचे प्रतीक आहे तर शत्रुघ्न निरपेक्ष आणि नि:स्पृह व्रुत्तीचे अगदी सहमत. लेख आवडला. रामायण हे काव्य असल्याने त्यात कुणाला किती जागा (तेच हो एक्स्पोजर) द्यायचा हे कवी वाल्मीकिंनी जे ठरवले ते आपण मान्य केले पाहिजे. उगाच अरेरे त्याच्यावर अन्याय झाला असे म्हणण्यात काही अर्थ नाही असे आमचे मत आहे. बाकी रामाला उदात्त वगैरे म्हटले आहे तेव्हा संभाळून... रामाचे नाव घेतले की पूर्वी भुते पळून जात हल्ली गोळा होतात ;)
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Tue, 02/05/2013 - 13:41 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

+१

छोटा डॉन
Tue, 02/05/2013 - 17:26 नवीन
नान्याशी सहमत आहे. लेख आधी सोनाक्षीच्या (आम्हाला आवडते, चालायचेच) पप्पांबद्दल आहे असे वाटले होते, अपेक्षाभंगाचे सुख सुख वाटले, छान लेख. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

रामायण हे काव्य असल्याने

धन्या
Tue, 02/05/2013 - 21:04 नवीन
रामायण हे काव्य असल्याने त्यात कुणाला किती जागा (तेच हो एक्स्पोजर) द्यायचा हे कवी वाल्मीकिंनी जे ठरवले ते आपण मान्य केले पाहिजे. उगाच अरेरे त्याच्यावर अन्याय झाला असे म्हणण्यात काही अर्थ नाही असे आमचे मत आहे.
सहमत. रच्याकने, नाना जर कुणी असं म्हटलं की "रामायण हे इतिहासावर आधारीत काव्य असल्याने..." तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

तर इतिहास म्हणजे काय त्यांचे

नाना चेंगट
Wed, 02/06/2013 - 11:02 नवीन
तर इतिहास म्हणजे काय त्यांचे काय म्हणणे आहे आपल्याला काय अपेक्षित आहे हे आधी तपासावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हशा आणि टाळ्या !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 02/05/2013 - 21:36 नवीन
...रामाचे नाव घेतले की पूर्वी भुते पळून जात हल्ली गोळा होतात हशा :)) आणि टाळ्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

तरीही

श्रावण मोडक
गुरुवार, 02/21/2013 - 12:01 नवीन
रामायण हे काव्य असल्याने त्यात कुणाला किती जागा (तेच हो एक्स्पोजर) द्यायचा हे कवी वाल्मीकिंनी जे ठरवले ते आपण मान्य केले पाहिजे.
ते मान्य केल्यानंतरही, जो शत्रुघ्न इथे चितारला आहे त्याचा आधार जर वाल्मिकी रामायण हाच असेल तर वाल्मिकींनी शत्रुघ्नासंदर्भात पुरेशी माहिती दिली आहे, असे म्हणावे लागेल. आणि मग, त्या काव्यातील (आपल्या सोयीचाच) विशिष्ट भाग जनतेने उचलला असे ठरेल. आणि वाल्मिकी रामायणाव्यतिरिक्त शत्रुघ्नाची काही माहिती या लेखात आली असेल तर ते संदर्भ आणि पुरावे लागतील. मग ते वाल्मिकी-इतर असल्याने त्याबाबत त्यांच्या काव्यस्वातंत्र्याचा उल्लेख करावा लागेल... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

मुद्द्याशी तत्वतः सहमत आहे.

नाना चेंगट
गुरुवार, 02/21/2013 - 22:39 नवीन
मुद्द्याशी तत्वतः सहमत आहे. वाल्मीकिंनी चितारलेल्या रामायणाच्या विपरीत अनेक कल्पना नंतर अनेक लेखक नाटककारांनी वापरुन त्या मुळच्याच असाव्यात की काय असा पगडा लोकांवर आहे. (प्रमुख उदाहरण म्हणजे लक्ष्मणरेषा :) ) राम सर्वांचाच आहे घ्या वापरुन हवा तसा.. दगड तरतो त्याच्या नावाने तर सामान्य माणसाची काय कथा ! रघुपती राघव राजाराम ! पतितपावन सीताराम !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

शत्रुघ्न उपेक्षित राहिला हे

उपटसुंभ
Tue, 02/05/2013 - 13:16 नवीन
शत्रुघ्न उपेक्षित राहिला हे खरंच.. सुमित्रेचं तसंच आहे. कौसल्या रामाची आई म्हणून ओळखली गेली. कैकेयी दशरथाला युद्धात मदत करणारी आणि रामाला वनवासात पाठवणारी म्हणून परिचीत. त्यामानाने सुमित्रेची फारशी ओळख होत नाही. बाकी माहिती छान दिलीत..!
  • Log in or register to post comments

रंजक व्यक्तिचित्र.

मन१
Tue, 02/05/2013 - 13:23 नवीन
रंजक व्यक्तिचित्र. रामायणातील अशीच एक उपेक्षित व्यक्तिरेखा म्हणजे लक्ष्मणाची पत्नी उर्मिला. नवर्‍यापासून दूर सतत चौदा वर्षे ती अयोध्येत रहात होती.
  • Log in or register to post comments

शत्रुघ्नाबद्दल नविन माहिती

किसन शिंदे
Tue, 02/05/2013 - 13:39 नवीन
शत्रुघ्नाबद्दल नविन माहिती कळाली.
  • Log in or register to post comments

उत्तम लेख.

प्रचेतस
Tue, 02/05/2013 - 13:46 नवीन
उत्तम लेख. शत्रुघ्नाबद्दल खुद्द रामायण बरेचसे मुग्धच आहे. लवणासुर वधाची कामगिरी भरत घ्यायला तयार होता पण शत्रुघ्न तेव्हा स्वतःहून पुढे येऊन रामास म्हणाला की भरताने नंदिग्रामास राहून फळमूळांवर गुजराण करून बहुत कष्ट उपभोगिले आहेत तस्मात मी विद्यमान असता त्यांना अधिक कष्ट न द्यावेत. तेव्हा रामाने शत्रुघ्नावर ही कामगिरी सोपवून यमुनातटाकी नवीन नगर वसवण्याचे आदेश दिले. नगरं यमुनाजुष्टं तथा जनपदान् शुभान् । यो हि शत्रुं समुत्पाट्य पार्थिवस्य निवेशने || न विधत्ते नृपं तत्र नरकं स हि गच्छति । स त्वं हत्वा मधुसुतं लवणं पापनिश्चयम् ॥ बाकी उत्तरकांड हे प्रक्षिप्त आहे असे काहीजण समजतात.
मथुरेचे राज्य त्यानंतर शत्रुघ्नाकडे आणि मग त्याच्या मुलांकडे गेले. लवणासुर वधाने आणि अश्वमेध दिग्विजयाने त्याने मिळवलेले किर्ती अखेरच्या क्षणी त्याच्या पुतण्यांनी त्याला हरवुन त्याच्यापासुन हिरावुन नेली.
हा संदर्भ समजला नाही. नंतर लव कुशांनी शत्रुघ्नाचा पराभव केला होता काय? आणि असल्यास तो कधी?
  • Log in or register to post comments

नाही नाही. दिग्विजयात लव

मृत्युन्जय
Tue, 02/05/2013 - 14:28 नवीन
नाही नाही. दिग्विजयात लव कुशांनी शत्रुघ्नाचा पराभव केला त्याचा संदर्भ आहे हा. राम - लक्ष्मणाने खुप थोर पराक्रम केले त्यामुळे त्यांचे एखादे अपयशही झाकले जाते. शत्रुघ्नाच्या वाट्याला ते क्षण कमीच आले आणि जेव्हा संधी मिळाली त्यातल्या एकात पराभव पत्करावा लागला म्हणुन तसे लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

असे तर प्रत्येक कथे मधल्या

अनुराधा१९८०
Tue, 02/05/2013 - 18:52 नवीन
असे तर प्रत्येक कथे मधल्या side role करणार्‍या पात्रांबद्दल लिहिता येइल. रामायणात सुद्धा अशी १०० पात्र सापडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

छ्या !

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/06/2013 - 10:25 नवीन
येवढे लांब कशाला जायचे? मिपावर देखील अशी खंडीभर पात्रे सापडतील. बाकी लेखन अतिशय सुरेख ! एकदम आवडेश. सोनाक्षीची टर उडवल्याबद्दल निषेध !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुराधा१९८०

मान्य आहे. पण प्रत्येक

मृत्युन्जय
Wed, 02/06/2013 - 10:33 नवीन
मान्य आहे. पण प्रत्येक उपेक्षित पात्र महत्वाचे असते का? महाभारतातले १०० कौरवही उपेक्षित आहेत पण ते महत्वाचे आहेत का? आणि महत्वाचे आहेत असे वाटत असेल, त्यांच्याबद्दल लिहिता येते असे वाटत असेल तर जरुर लिहा की. थोडी चांगली माहितीच मिळेल लोकांना. बादवे मला अजुनही ते खाजवुन खरुज आणण्याचा संदर्भ कळालेला नाही. चुकुन लिहिले असेल तर सोडुन द्या. अन्यथा तपशीलात समजुन घ्यायला आवडेल तुम्ही असे का लिहिलेत ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुराधा१९८०

काय हे ?

परिकथेतील राजकुमार
Wed, 02/06/2013 - 10:36 नवीन
मृत्यंजया तुला येवढे साधे कळू नये ?
बादवे मला अजुनही ते खाजवुन खरुज आणण्याचा संदर्भ कळालेला नाही.
ते त्यांनी स्वतःच्या प्रतिसाद लेखनाचे केलेले मुल्यमापन आहे लेका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अर्रे असे आहे होय, मग आय माय

मृत्युन्जय
Wed, 02/06/2013 - 10:44 नवीन
अर्रे असे आहे होय, मग आय माय स्वारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

रामायणात महाभारत शोधू पाहणार्

प्यारे१
Tue, 02/05/2013 - 14:12 नवीन
रामायणात महाभारत शोधू पाहणार्‍या सगळ्यांनाच सलाम! वाचता वाचता 'शोले' चित्रपटात सांभा ला केवळ एकच ड्वायलॉक दिलाय त्यामुळं सांभाची फार मोठी उपेक्षा झाली असं आठवलं गेलं नि ड्वाळे पाणावले...!
  • Log in or register to post comments

मस्त रे

स्पा
Tue, 02/05/2013 - 14:28 नवीन
वास्तविक पाहता लक्ष्मणाने जी सेवा रामाची केली तशीच शत्रुघ्नाने भरताची केली. लक्ष्मण रामाची सावली बनुन राहिला तर शत्रुघ्न भरताचे प्रतिरुप बनुन. दोन्ही जुळ्या भावंडांनी निरपेक्षपणे आपल्या सावत्र भावांची सेवा करण्यात धन्यता मानली. परंतु इंद्रजित वधामुळे असेल कदाचित किंवा वनवास भोगल्यानेही असेल पण लक्ष्मणाची प्रतिमा एका वटवृक्षा एवढी मोठी झाली तर शत्रुघ्न त्या वटवृक्षाची केवळ एक सावली बनुन राहिला. लक्ष्मणाच्या मृत्युनंतर रामापाठोपाठ भरतानेही जलसमाधी घेतली तसे कायम त्या दोघांबरोबर सावली सारखा राहिलेला शत्रुघ्नही सरयूत विलीन झाला. बंधुप्रेमाचे याहुन उदात्त उदाहरण इतिहासात नाही. राम उदात्ततेचे प्रतीक आहे तर लक्ष्मण बंधुप्रेमाचे, भरत त्यागाचे आणि उदारपणाचे प्रतीक आहे तर शत्रुघ्न निरपेक्ष आणि नि:स्पृह व्रुत्तीचे. त्याच्या या नीरक्षीरसमान वृतीला सलाम करण्यासाठी हा लेखनप्रपंच.
क्या बात हे मान गये उस्ताद
  • Log in or register to post comments

ही तर खाजवून खरूज

अनुराधा१९८०
Tue, 02/05/2013 - 14:39 नवीन
इतिहास मोठा क्रूर आहे. काही लोकांना त्याने देव पदी पोचवले तर काही जणांना उपेक्षेने मारले. ज्याव्यक्तिरेखांची इतिहासाने उपेक्षा केली त्यांत शत्रुघ्नाचे नाव फार वरती आहे. >>> अहो हा काही इतिहास नाही, कवि कल्पना आहेत, त्यामुळे हीरो हिरोईन आणि व्हीलन ला च फूटेज मिळणार.
  • Log in or register to post comments

खाजवुन खरुज हे काही कळाले

मृत्युन्जय
Tue, 02/05/2013 - 15:13 नवीन
खाजवुन खरुज हे काही कळाले नाही. रामायण आणि महाभारत तुम्हाला इतिहास न वाटता कवि कल्पना वाटत असेल तर तो तुमचा प्रश्न पण त्यामुळे मी खाजवुन खरुज कसे आणतो आहे हे कळाले तर बरे होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुराधा१९८०

तुम्ही एक शत्रुघ्नायण लिहा आणि त्यात रामा

अनुराधा१९८०
Wed, 02/06/2013 - 13:40 नवीन
कुठल्यातरी गोष्टी मधे कुठल्या तरी साईडी पात्रा वर कसा अन्याय झाला आहे ह्याच्या वर काथ्या कुट करणे म्हणजे खाजवुन खरुज काढणे नाही का? प्रत्येक कथे मध्ये २-३ lead characters असणार, आणि बाकिच्या पात्रांचे त्या २-३ lead characters शी जेव्हडा संबध आहे तेव्हडेच फूटेज त्यांना त्या कथेत मिळणार. ह्याला का फूटेज दिले नाही, त्याच्या वर का अन्याय केला ह्याला काय अर्थ आहे. तुम्ही एक शत्रुघ्नायण लिहा आणि त्यात रामा ला ignore करा. १०० कॉरवांचा तुमचा पॉईंट बरोबर आहे. तुमच्याच लॉजिक प्रमाणे त्या ९८ कॉरवांवर पण असे ९८ धागे चालु केले पाहिजेत तुम्ही. त्यांची नावे पण आहेत महाभारतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

साधारणपणे खाजवुन खरुज आणणे

मृत्युन्जय
Wed, 02/06/2013 - 14:38 नवीन
साधारणपणे खाजवुन खरुज आणणे हा वाक्य्प्रयोग कुठल्यातरी वादग्रस्त विधानाला गरज नसताना आमंत्रण देण्याच्या कृतीसाठी वापरला जातो. आपण तो अस्थायी आणि अपात्री वापरलात. मी कुठलेही वादग्रस्त विधान केलेले नाही. दूसरी गोष्ट आपण कदाचित लेख नीट वाचला नसावा कारण शत्रुघ्नाचे रामायणातील योगदान काय याबद्द्ल तो लेख लिहिला आहे. वाल्मिकींनी शत्रुघ्नावर कश्याप्रकारे अन्याय केला यावर लिहिलेला नाही. राहुल द्रविडच्या कारकीर्दीचे य्प्ग्य मुल्यमापन होत नाही किंवा सचिन / सौरव यांच्यासमोर तो झाकोळला जातो असे जेव्हा आप्ण लिहितो तेव्हा त्याची कारकीर्द ठळकपणे मांडण्यासाठी तसे लिहिले जाते. तसेच शत्रुघ्नाबद्दल. हा काथ्याकूट नाही हे देखील तुम्हाला समजले नसेल तर दुर्दैव आहे. माझे, लेखाचे, तुमचे आणि मिपाचे देखील. हा काकू नाही. हा एक लेख आहे. तुम्हाला शत्रुघ्नावर अन्याय झाला असे वाटत नाही काय? तुमचे मत द्यावे? अश्या आशयाचा असला असता तर तो काकू. असाही मी तो जम मध्ये टाकला आहे.. काकू मध्ये नाही. मी शत्रुग्नायण लिहुन रामाला इग्नोअर करायचा माझा काहिही विचार नाही. शत्रुघ्न रामायणात कसा आहे हे फक्त मी लोकांसमोर मांडले. एकुण सर्व प्रकार पाहता खाजवुन खरुज आणण्याचे उपद्व्याप तुम्हीच करता आहात असे दिसते. धाग्याचा खाक्या, त्याचा आशय आणि त्यातील संदर्भ पाहुन यापुढे प्रतिसाद दिलेत तर फार बरे होइल. झुरळ्याच्या अंड्याप्रमाणे काथ्याकूट टाकुन गंमत बघत बसण्याची माझी सवय नाही, इच्छा नाही आणि माझ्याकडे तेवढा वेळही नाही. त्यामुळे या असल्या धाग्यांच्या आणी धागाकर्त्यांच्या मांदियाळीत मला बसवु नये अशी कळकळीची विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुराधा१९८०

अरे बाबा कशाला स्वतःला

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 02/07/2013 - 03:15 नवीन
अरे बाबा कशाला स्वतःला जस्टीफाय करत बसला आहेस ??? इतकी वर्षे आहेस मिपावर, फाट्यावर मारता येत नाहीत का आक्षेप ? अनुल्लेखाने मार ना, कशाला मोलाचे शब्द खर्च करतो आहेस ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ऑ?

स्पा
Tue, 02/05/2013 - 14:43 नवीन
अहो हा काही इतिहास नाही, कवि कल्पना आहेत, त्यामुळे हीरो हिरोईन आणि व्हीलन ला च फूटेज मिळणार.
माश्री . वल्ली या बाबतीत खुलासा करतीलच
  • Log in or register to post comments

हम्म..

चिगो
Tue, 02/05/2013 - 15:03 नवीन
शत्रुघ्न म्हटल्यावर मात्र आपल्या डोळ्यासमोर "खामोश" "जली को आग कहते है बुझी को राख कहते है" वगैरे म्हणणारा शत्रुघ्न सिन्हा येतो. (तोच तो सोनाक्षी सिन्हा चा बाप. काही वर्षांनी तो केवळ दगडीचा बाप म्हणुनच देखील ओळखला जाउ शकतो. द्गडी म्हणजे सोनाक्षी. अंदर की खबर आहे की तिचे मूळ नाव सोनाक्षी नसुन 'स्टोना'क्षी आह'. तिच्या डो़ळ्यात आणि दगडात एकच भाव असतात. कधीकधी दगडही सुंदर दिसतो तशी स्टोनाक्षीही सुंदर दिसते. साम्यस्थळे एवढ्यात संपतात. बाकी दगडाचा अपमान करण्याचा काही हेतू नाही. असो. विषय बदलला. त्या शत्रुघ्नाचे दुर्दैव. लेखाचा विषय आहे शत्रुघ्न आणि लिहितो आहे सिन्हांच्या दगडीवर.)
हे मात्र पटलं.. सुंदर, नेटका लेख..
  • Log in or register to post comments

लेखन अवडले

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/05/2013 - 15:27 नवीन
लेखन अवडले
  • Log in or register to post comments

लेखन अतिशय आवडले.

तर्री
Tue, 02/05/2013 - 17:17 नवीन
शत्रुघ्न हया उपेक्षित व्यातीरेखेवर समर्पक लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

उपेक्षितांच्या समस्या सा-या

५० फक्त
Tue, 02/05/2013 - 17:22 नवीन
उपेक्षितांच्या समस्या सा-या बाकी काय?
  • Log in or register to post comments

मस्त लिहिले आहे.

यशोधरा
Tue, 02/05/2013 - 17:41 नवीन
मस्त लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

सहीच...!!

सुहास झेले
Tue, 02/05/2013 - 18:07 नवीन
राम उदात्ततेचे प्रतीक आहे तर लक्ष्मण बंधुप्रेमाचे, भरत त्यागाचे आणि उदारपणाचे प्रतीक आहे तर शत्रुघ्न निरपेक्ष आणि नि:स्पृह व्रुत्तीचे.... शत्रुघ्न ह्या व्यक्तिरेखेबद्दल आजवर कुठेच कधी लिखाण झाल्याचे स्मरणात नाही...अजून काही माहिती किंवा संदर्भ असतील, तर वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

आजच्या आधुनिक काळात अशीच एक

निनाद मुक्काम …
Tue, 02/05/2013 - 19:07 नवीन
आजच्या आधुनिक काळात अशीच एक भावंडाची जोडी भारतात प्रसिद्ध आहे , प्रियांकाने मोठ्या मनाने स्वतःकडे चालून आलेले राज्य नाकारून आपल्या भावास संधी दिली तिच्यात अनेकांना तिच्या आजीचे प्रतिबिंब दिसते. जेव्हा जेव्हा तिचा भाऊ उत्तरेत किंवा दक्षिणेत दिग्विजय करायला निघतो , तेव्हा त्याच्या पाठीशी ती सावली सारखी उभी असते ,
  • Log in or register to post comments

छान लेख

पैसा
Tue, 02/05/2013 - 19:38 नवीन
नेहमीप्रमाणेच मृत्युंजयाकडून आणखी एक छान लेख!
  • Log in or register to post comments

+१

सस्नेह
Tue, 02/05/2013 - 21:22 नवीन
या उपेक्षित व्यक्तिरेखेबद्दल आणखी तपशील वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

"स्टोनाक्षी " मार्मिक!

स्पंदना
Wed, 02/06/2013 - 06:00 नवीन
"स्टोनाक्षी " मार्मिक! आणि लेखाबद्दल म्ह्णाल तर सिर्फ् "मृत्युंजय ये नाम ही काफी" असं म्ह्णाव लागेल. सुंदर माहिती.
  • Log in or register to post comments

लेख आवडला. भलताच रंजक झालाय.

रेवती
Wed, 02/06/2013 - 06:23 नवीन
लेख आवडला. भलताच रंजक झालाय. काही ठिकाणी आजची स्टोनाक्षी आणि कालचा शत्रुघ्न यांचे संदर्भ आलेत तसेच मलाही काही आठवले. रामायण आणि महाभारतातल्या फारच मुख्य समजल्या जाणार्‍या गोष्टी माहित आहेत. त्यापलिकडे नाही. पूर्वी रामायण, महाभारत वाचले किंवा घरात ठेवले की तसेच आपल्या घरातही घडते असे मानायची पद्धत होती वाटतं. आम्हाला कधी हे प्रकार फारसे वाचायला मिळाले नाहीत. सगळे आपले ऐकीव.
  • Log in or register to post comments

>>>पूर्वी रामायण, महाभारत

नाना चेंगट
Wed, 02/06/2013 - 11:11 नवीन
>>>पूर्वी रामायण, महाभारत वाचले किंवा घरात ठेवले की तसेच आपल्या घरातही घडते असे मानायची पद्धत होती वाटतं. बहुधा मुळ कथानक वाचले की त्याआधारावर हे असेच व्हायला हवं अशी मनमानी करता येत नसावी म्हणून सोईस्कररित्या घरात कथानक ठेवायचेच नाही आणि त्याकाळी असे होते त्याकाळी तसे होते असे दाखवत आपल्याला हवे तसे वागायचे आणि वागायला लावायचे ही पद्धत विशेषतः गेल्या दोनशे वर्षांत रुढ झाली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

सर्व प्रतिसादकर्त्यांना

मृत्युन्जय
Wed, 02/06/2013 - 12:09 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांना मनःपुर्वक धन्यवाद. प्रत्येक प्रतिक्रियेमागे एक धन्यवाद द्यायचा विचार होता (तेवढाच ट्यार्पी वाढतो) पण नेहमीप्रमाणे आळशीपणा आड येतो. तरी हे जाहीर आभारप्रदर्शनच वैयक्तिक मानावे. कळावे लोभ असावा :)
  • Log in or register to post comments

छान लेख.

मनराव
Wed, 02/06/2013 - 16:24 नवीन
छान लेख.
  • Log in or register to post comments

निषेध

आदिजोशी
Wed, 02/06/2013 - 18:32 नवीन
आमच्या बिचार्‍या सोनाक्षीला उगाच नसत्या वादात खेचल्याबद्दल निषेध. लेख चांगला झाला आहे.
  • Log in or register to post comments

तुम्हाला पैलवान सोनाक्षि

सुहास..
गुरुवार, 02/14/2013 - 13:58 नवीन
तुम्हाला पैलवान सोनाक्षि सिन्हा म्हणायचे आहे काय ? निरागस वाश्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

एक माणुस म्हणुन शत्रुघ्न रॉकिंग वाटतोय!

अग्निकोल्हा
गुरुवार, 02/07/2013 - 02:21 नवीन
पण बहुदा त्याने सर्व सुखांचा उपभोग येथेच्छ घेतल्याने "जाणकारांना" ते खुपले नसावे म्हणुनच त्याला... तो बिचारा दुर्लक्षित वगैरे वगैरे अजिबात ठरत नाही...म्हटलं तर ते सतयुग होतं.. रामाच्या काळचं मग.. सर्व सोयिसुविधा, पत्नि, वडीलधारे, सत्ता, पद, संपत्ति हाति असताना त्याचं ताळतंत्र सुटलं नाही म्हणु कौतक करायचं म्हटलं तरी त्यासाठी तो कलियुगात हवा होता.. पण ते पण नाही मग त्याच कर्तुत्व कलियुगात प्रेरणादायी वाटणे कितीही चुक नसले तरी असं करणे म्हणजे सिंहाने चक्क शिकार केल्याबद्दल अप्रुप वाटुन घेणे न्हवे काय ?
  • Log in or register to post comments

चला आता या बाजुने विचार करणे

५० फक्त
गुरुवार, 02/07/2013 - 08:09 नवीन
चला आता या बाजुने विचार करणे आले... आधीच याच विषयावर विचार करुन करुन डोके भंजाळुन जाते त्यात अजुन थोडी भर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

उगा कशाला विचार करताय,

प्रचेतस
गुरुवार, 02/07/2013 - 09:05 नवीन
उगा कशाला विचार करताय, रामाच्या काळी सत्ययुग नसून त्रेतायुग होतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

:) :) :)

अग्निकोल्हा
गुरुवार, 02/07/2013 - 19:45 नवीन
मंग मात्र थोडासा इचार करायला लागनार...? त्रेता म्हंजे ३/४ लोक्स पापी अनं १/४ लोक्स पुन्यवान ना ? हम्म असं असुनबी क्षत्रु सुस्वभावी निपजला, ह्यो एक चमत्कारच है असच म्हनल पैजे. रामाची क्रिपा असनार तेच्यावर... @५० फक्त उगा कशाला इचार कर्ताय, इचार न करता क्षत्रु म्हान वाटला तरच नमस्कार नैतर तो फकस्त सोपस्कार ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

असो!

अग्निकोल्हा
गुरुवार, 02/07/2013 - 20:07 नवीन
इतकच म्हणायच होतं की , इतिहास मोठा क्रूर आहे. काही लोकांना त्याने देव पदी पोचवले तर काही जणांना उपेक्षेने मारले वगैरे शत्रुघ्नच्या बाबतीत घडलेले नाही. त्यानं त्याचं आयुष्य मस्त आनंदाने सुखोपभोगाने, न्यायाने वेंजाय माडी म्हणत संपुर्ण जगले आहे, त्याच्या वाट्याला राम-सिता-लक्ष्मण-उर्मिला-भरता प्रमाणे कश्टप्रदता आली नाही/ स्विकारली नाही, सबब तो विशेष स्मरावा असे मह्त्व त्याला "जाणकारांनी" दिले नाही याला शोकांतिका वगैरे मानणे अतिशय मेलोड्रामॅटिक वाटतयं. हां आता तो लहानपणीच महाकुंभमेळाव्यात वगैरे हरवला असता, तो कुछ और बात होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

ग्लिफूकाका ती अजुन एक काडी

मृत्युन्जय
गुरुवार, 02/07/2013 - 20:26 नवीन
ग्लिफूकाका ती अजुन एक काडी टाकुन धाग्याची पन्नाशी करुन टाका की. जीव कसा आसुसलाय बघा प्रतिक्रियांचे अर्धशतक बघायला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

ओ.के.

अग्निकोल्हा
गुरुवार, 02/07/2013 - 21:30 नवीन
एक काय दहा काड्या टाकतो... पण तरीही शत्रुघ्न हा शोकांतिका वगैरे अजिबात न्हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

पण तरीही शत्रुघ्न हा

५० फक्त
गुरुवार, 02/07/2013 - 22:26 नवीन
पण तरीही शत्रुघ्न हा शोकांतिका वगैरे अजिबात न्हवे.- तुम्हाला 'भोपळ्यात बी सुरक्षित' असं म्हणायचं आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा