✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हिंदुस्थानी संगीत व मियाँ तानसेन ( भाग ४)

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Sat, 12/24/2011 - 15:03  ·  लेख
लेख
भाग - १ भाग - २ भाग - ३ वाराणसी.. वाराणसी हे हिंदुस्थानातील अनेक पवित्र शहरांपैकी एक मानले जात होते आणि अजूनही मानले जाते. ते पवित्र आहे की नाही हा वादाचा प्रश्न आहे. पण ते शंकराचे वसतीस्थान म्हणून भाविकांमधे प्रसिद्ध आहे. शंकराला जगत्‌गुरू म्हणूनही मान दिला जातो. सर्व ज्ञानाचा स्त्रोत हा शंकर आहे असेही पुराणात सांगितलेले आहे. सर्व देवदेवतांना आणि ऋषींना शंकरानेच गांधर्वविद्या शिकवल्या असाही प्रवाद आहे. हे सांगायचे कारण म्हणजे शंकराचेच वसतीस्थान असल्यामुळे वाराणसी ही संगीताचेही वसतीस्थान म्हणून ओळखले जात होती. भारतीय तत्वज्ञान आणि संगीत या दोन्हीचे हे एक महत्वाचे केंद्र होते. तानसेन ज्याचे नाव पूर्वी रामतनू होते, त्याचा जन्म हा वाराणसीचाच. त्याच्या वडिलांचे नाव होते मकरंद पांडे. मकरंद पांडे हे उत्तम किर्तन करीत. वाराणसीमधेच स्वामी हरिदास यांनी तानसेनला संगीताची दीक्षा दिली. नंतर त्याची नेमणूक दिल्ली दरबारी झाल्यावर अकबराने त्याला तानसेन ही पदवी दिली पण तानसेनापासून त्याच्या वंशजापर्यंत सर्वांनीच वाराणसी हेच आपले घर मानले व ते सर्व तेथे नियमितपणे जात येत असत. अठराव्या शतकाच्या अंती मोगल सत्तेचे तुकडे होऊ लागले त्याच काळात तानसेनच्या घराण्याचेही वेगवेगळ्या घराण्यात वर्गीकरण होऊ लागले. त्याचा थोरला मुलगा सुरत याने जयपूरला प्रस्थान ठेवले व तो तेथेच स्थायिक झाला. या जयपूर घराण्याचे कलाकार ध्रुपद आणि सतार वाजवत. त्याच्या धाकट्या मुलाने म्हणजे बिलासखान यांनी शुद्धबानी ध्रुपद आणि रबाब यांची परंपरा पुढे चालवली. त्याचा जावई मिस्रीसिंग यांचे व बिलासखान यांचे संबंध बरेच जवळचे होते. मिस्रिसिंग यांच्या घराण्याने वीणा, डागोरबानी आणि खंडरबानी याची परंपरा सांभाळली. बिलासखान यांच्याच घराण्यात १८व्या शतकानंतर तीन भावांनी हे घराणे प्रसिद्ध केले त्यांची नावे होती जाफर खान, प्यार खान व बसत खान. ते रबाब आणि ध्रुपदाचे बादशहा होते तर मिस्रिसिंग यांच्या घराण्यात निर्मल शहा नावाचा एक थोर वीणावादक होऊन गेला. गंमत म्हणजे या दोन्ही घराण्यांनी वाराणसीला आपले घर मानले आणि ती घराणी तेथेच स्थायिक झाली. त्यांचा वाडा/हवेली कबीर चौक मोहल्ल्यात होते. हे सगळे कलाकार त्या काळात लखनौच्या दरबारात आपली कला पेश करायचे. पण जेव्हा ते दरबारात नसायचे तेव्हा ते वाराणसीत असायचे, विशेषत: सणावारी. काशीच्या राजाच्या दरबारीही यांचा राबता असे व काशीच्या राजाने त्यांना काही जमीन देऊन खर्चाची सोय लावून दिली होती. जाफरखान स्वत: एक चांगले रबाबी होते. त्या काळात रबाबाच्या तारा जनावरांच्या आतड्यापासून बनवत असत. ’जोड’मधे रबाब ऐकत रहावेसे वाटे पण विलंबीतमधे वीणेला स्पर्धा नव्हती. जाफर खान आणि निर्मल शहा यांच्या रबाब व वीणा यांच्या जुगलबंदीच्या कहाण्या त्या भागात अजूनही चवीने चघळल्या जातात. याच जाफर खानने सुरसिंगार हे वाद्य तयार केले. या वाद्याने तो वीणेशी टक्कर घेऊ इच्छित होता. या वाद्याचे पहिले वादन त्याने काशीराजाच्या दरबारात केले. त्या वाद्याची वीणावादक निर्मल आणि राजा उदित नारायण सिंग या दोघांनीही प्रशंसा केली. मी जे हे वर म्हटलेले आहे ते खाली दिलेल्या संगीताने स्पष्ट होईल असा माझा दावा नाही पण आपल्या कानावर पडलेले बरे. वीणा : वादक : मोहम्मद खाँसाहेब. रबाब : वादक :खालिद अरमाँ. सुरसिंगार : वादक : अर्नब चक्रवर्ती सुरबहार : कलाकार : श्रीमती अन्नपूर्णादेवी. सतार : कलाकार : रईसखासाहेब. सुरसिंगार तयार झाल्यावर जाफरखान यांचा भाऊ प्यारेखान यांनी या वाद्यात प्राविण्य मिळवले आणि ते आकर्षक दिसावे म्हणून त्यात अनेक बदल केले. नुसतेच दिसण्यात नाही तर त्यांनी त्याच्यावर अशा काही सुरावटी वाजवल्या की ते वाद्य जनतेत बरेच प्रसिद्ध झाले. इकडे निर्मलशहा यांच्या मृत्युनंतर त्यांचे पुतणे उमरावखान यांनी त्यांची जागा घेतली आणि तेही वीणा वादनात प्रसिद्ध झाले. वीणेच्या धीरगंभीर स्वभावात बदल करण्यासाठी त्यांनी सुरबहार नावाच्या वाद्याला जन्म दिला. त्यांनी स्वत: वीणाच वाजवली पण हे वाद्य त्यांनी गुलाम महंम्मद यांना शिकवले. वाराणसीमधे त्या काळात संगीताची मेजवानी म्हणजे प्यारेखान आणि उमराव खान यांच्यातील सुरसिंगार आणि वीणा यांच्यातील जुगलबंदी असेच समीकरण रूढ झाले होते. माझ्या डोळ्यासमोर ते चित्र उभे रहाताच टाईम मशीन तयार झाले नाही याचा मला फार विषाद होतो. ते असते तर मी पहिल्यांदा तेथेच गेलो असतो हे निश्चित. प्यारेखान यांचा धाकटा भाऊ बसत खान हेही एक थोर ध्रुपदिये आणि रबाबी होते. त्यांना संस्कृतमधे फार रुची होती. वाराणसीमधील संस्कृत पंडितांकडून ते संस्कृत शिकत असत. त्यांनी कलकत्याचे राजे टागोर यांच्या दरबारात नोकरी पत्करली आणि त्यांना राजा हेराकुमार टागोर यांनी संगीतनायक या पदवीने सन्मानित केले. १८५७ सालामधे स्वातंत्र्ययुद्धानंतर लखनौ दरबार खालसा करण्यात आला आणि बसत खान व त्यांची मुले अली मोहम्मद (सुरसिंगार) आणि अली खान (रबाबी, ध्रुपदिये) हे गयेला स्थायीक झाले. जाफर खान यांचा मुलगा सादिक अली व मिसार अली हे मात्र वाराणसीलाच राहिले. हे जे सादिक खान होते हे नुसते गायक वादक नसून संगीत तज्ञही होते. ते संस्कृत पंडीत होते, फार्सी भाषा त्यांना चांगली अवगत होती. ते वीणाही उत्तम वाजवायचे. राजालाही त्यांच्याबद्दल आदर वाटायचा. असे म्हणतात सादिक अली यांचा लाडी-जोड मधे हात धरणारा अजून या पृथ्वीतलावर यायचा आहे. परण म्हणजे संस्कृतमधे पर्ण म्हणजे पान. पानांवर जशा शिरा असतात त्या प्रमाणे यातील बोलाची रचना असतात. (म्हणजे काय हे मला अजून कळायचे आह. माझे आजोबा जे उत्तम पखवाज वाजवायचे त्यांनी याचा उल्लेख एकदा माझ्याशी बोलताना केला होता असे आठवते. माझ्या आयुष्यात ज्या अनेक चुका माझ्या हातून घडल्या त्यातील एकाची कबूली आत्ता द्यायला हरकत नाही. ती म्हणजे माझ्या आजोबांनी मला पखवाज शीक हे सांगून सुद्धा मी त्यांचे ऐकले नाही.) हे वाजवतात पखवाजावर. हेच बोल तारेवर म्हणजे तंतूवाद्यांवर वाजवत असत त्याला म्हणत तारपरन. यात ते कुठल्याही पखवाज वाजवणार्‍याला हरवत असत. ते वाराणसीमधे एखाद्या संताप्रमाणे आपले आयुष्य व्यतीत करत आणि त्यांना संगीतात थिल्लरपणा आजिबात खपत नसे (त्या काळातील थिल्लरपणा). त्यांच्या शिष्यगणातही नावाजलेले कलाकार होऊन गेले. उदा. सतार वादक बाजपेयी, महेशचंद्र सरकार, मेथाईलाल हे सर्व वीणा वादक झाले. असे सांगतात की रामकॄष्ण परमाहंस जेव्हा वाराणसीच्या यात्रेला गेले होते तेव्हा महेशचंद्र सरकारांची वीणा ऐकता ऐकता ते समाधीत गेले. हे सगळे लिहिताना संगितात त्या काळात कसे संशोधन होत होते, आणि कलाकारांनी आपले आयुष्य कसे पणाला लावले होते हे कळते. धन्य ते गायक आणि धन्य ते वादक. या सगळ्यांच्या पुढे मी नतमस्तक आहे. यांच्यामुळेच आपले संगीत आज जिवंत आहे. सादिक अलींच्या मृत्यूनंतर बसत खान यांच्या थोरल्या मुलाची वाराणसीच्या दरबारात नेमणूक झाली. त्यांचे नाव होते अली मोहम्मद खान आणि ते गयेहून वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे वाराणसीत आले होते. हे एक उदारमतवादी संगीतज्ञ होते आणि उदारहस्ते आपली विद्या वाटत असत. ते आपल्या विद्यार्थ्यांपासून काहीही लपवून ठवत नसत. त्यांचा रागांचा अभ्यास दांडगा होता आणि असे म्हणतात की ते एखादा राग एकाही तानेची पुनरावृत्ती न करता तासभर सहज गाऊ शकत असत. त्यांनी आपली विद्या खालील कलाकरांना दिली. हे कलाकार नशिबवानच म्हटले पाहिजेत कारण त्या काळात कला देतांना हातचे काहीतरी राखून द्यायची अशी पद्धत असायची किंवा संपूर्ण विद्या ही मुलांनाच देण्याची पद्धत होते. कारण अर्थात सांगायला नकोच. ज्या कलाकारांना यांच्याकडून विद्या मिळाली ती पूर्ण स्वरुपात. यांची नावे होती पन्नालाल जैन, अर्जूनदास वैद्य, गयाप्रसाद मिश्रा (सुरसिंगार). त्यांचे सगळ्यात आवडते शिष्य होते जालंदरचे सय्यद मीर नासीर खान. त्यांनी काही काळ रामपूरचे वज़ीर खांसाहेब जे वाराणसीला अली मोहम्मद यांना भेटायला नियमीत जायचे, यांनाही तालीम दिली होती. लक्षात घ्या यांच्याकडून किंवा यांच्या शिष्यांकडून ज्यांनी संगीत शिकले त्यांना ती विद्या संपूर्ण स्वरूपात मिळाली. त्यामुळे ते संगीत शुद्ध स्वरूपात खाली चालत आले. अली मोहम्मद यांनी बंगाली गायक हरी नारायण मुखर्जी यांनाही ध्रुपदाची अनेक पदे शिकवली. ताराप्रसाद घोष जे सर्व कलाकारांचे आधारस्तंभ होते त्यांनीही यांच्याकडे विद्या ग्रहण केली. अली मोहम्मद यांच्या मृत्यूनंतर मात्र वाराणसीच्या संगीताला उतरती कळा लागली आणि त्या थोर संगीतज्ञाची जागा कोणीही भरून काढली नाही, ते आजपर्यंत. उरलेल्या कलाकारांनी नाइलाजाने रामपूर व जयपूरची वाट धरली. सध्या आपण बघतो की सगळे गायक वादक आपण कुठल्याना कुठल्यातरी घाराण्याचे आहोत असे सांगतात. संगीताचे घराणे याचा अर्थ मी सांगायची गरज नाही पण सुरवातीला, म्हणजे खिलजींच्या वेळेस, फक्त दोनच घराणी होती एक होते कलावंत आणि दुसरे कव्वाल. कलावन्त याचे संस्थापक होते बैजू बावरा आणि कव्वाल घराणे स्थापन केले होते अमीर खुस्रो यांनी. कलावन्त घराण्यात ध्रुपदाची साथ वीणेवर करायची पद्धत होती तर कव्वाल घराण्यात कव्वाली आणि तराणा यांची साथ सतार करत असे. कलावन्त घराणे हे गोपाल नायकाने पुढे चालू ठेवले तर कव्वाल हे जौनपूरचा सुलतान हुसेन सर्की याने. नंतर केव्हातरी एका तिसर्‍या घराण्याची स्थापना झाली आणि त्याचे कारण होते शहनाई आणि तबला वादक. नंतरच्या काळात जशा नर्तकी आणि गायिका दरबारात आपल्या कला सादर करू लागल्या तसे त्यांच्या साथीला जे कलाकार वाद्ये वाजवत असत त्यांचे अजून एक घराणे तयार झाले त्यांना म्हणत मिरासी आणि धाडी...........यांच्या वादनात, गायनात नैसर्गिकरीत्या करमणूकीला सर्वोच्च प्राधान्य असे....... या भागाचा शेवट आपण एका अतिउत्कृष्ट अशा ध्रुपद गायनाने (भैरवी) करणार आहोत. गायक आहेत डागर बंधू ( थोरले). हे ध्वनिमुद्रण कोणाकडे असण्याची शक्यता फार कमी आहे. तेव्हा जरूर ऐका. एक विनंती आहे, जरी कोणाला शास्त्रीय संगीत विशेष आवडत नसेल तरीही त्यांनी वर दिलेले सर्व ऐकावे. थोडा धीर धरून ऐकलेत तर हे सहज शक्य आहे..... पण एकदा हे ऐकलेत की मला खात्री आहे तुम्ही नेट अधिक ट्रॅक्ससाठी पालथे घालाल. जयंत कुलकर्णी. क्रमश: पुढच्या भागात स्वामी हरिदास.... मी संगीततज्ञ नाही हे मला मान्य आहे.. आपल्याला काही शंका असतील तर त्या आपल्या भागातील तज्ञांना विचाराव्यात किंवा मला कळवल्यात तर त्याची उत्तरे मी कोणालातरी विचारून देईन. पण त्याला वेळ लागेल.....

Book traversal links for हिंदुस्थानी संगीत व मियाँ तानसेन ( भाग ४)

  • ‹ हिंदुस्थानी संगीत व मियाँ तानसेन ( भाग ३)
  • Up
  • हिंदुस्थानी संगीत व मियाँ तानसेन ( भाग ५ शेवटचा) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
संगीत
धर्म
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
लेख
माहिती
संदर्भ

प्रतिक्रिया द्या
5079 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

जयंतराव,

प्रास
Sat, 12/24/2011 - 20:22 नवीन
लेखमाला उत्तम सुरू आहे. बरीच नवीन माहिती मिळत आहे. तुम्ही इथे दिलेल्या ध्वनिफिती खरोखर मस्त आहेत. आता स्वामी हरिदास यांच्या माहितीच्या प्रतिक्षेत. धन्यवाद! :-)
  • Log in or register to post comments

विनोद१८

विनोद१८
Sat, 12/24/2011 - 20:22 नवीन
..जयन्तराव नमस्कार, तुमचे लेखन एकदम अप्रतिम ... अभ्यासपुर्ण.. नवीन पिढिसाठी , सन्गीताच्या अभ्यासकासाठी तर मार्गदर्शक .. त्या जुन्या महान सन्गीतकाराना त्यान्च्या योगदानाबद्दल दन्डवतच... ही दुर्मीळ ध्वनीमुद्रणे मला मिळू शकतिल का ??? ती सग्रही असावीत अशीच आहेत. धन्यवाद..!! विनोद१८
  • Log in or register to post comments

उत्तम लेख. इतिहास चांगल्या

अन्या दातार
Sun, 12/25/2011 - 09:53 नवीन
उत्तम लेख. इतिहास चांगल्या प्रकारे उलगडतोय. दिलेले ध्वनिमुद्रण लेखास आकर्षक बनवीत आहे. :)
  • Log in or register to post comments

+१

पैसा
Sun, 12/25/2011 - 11:24 नवीन
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

संग्राह्य लेखमाला. गाणं

यकु
Sun, 12/25/2011 - 22:47 नवीन
संग्राह्य लेखमाला. गाणं कळायला मूळचाच कान असावा लागतो असं वाटतंय. तुम्ही दिलेल्या सगळ्या लिंका वाजवून ऐकल्या. पालथ्‍या घड्‍यावर पाणी. .. :(
  • Log in or register to post comments

काही हरकत नाही ! आपल्याला

जयंत कुलकर्णी
Sun, 12/25/2011 - 22:52 नवीन
काही हरकत नाही ! आपल्याला रागांवर आधारीत हिंदी गाणी आवडत असतीलच. उदा, कूहू कूहू बोले कोयलिया आणि या सारखी अनेक. मी दुसर्‍या धाग्यावर एक यादी देतो असल्या गाण्याची आणि ती कुठल्या रागावर आहेत हे ही सांगतो. ती आपण ऐका आणि मग राग ओळखायला आणि त्यातल्ञ मजा कदाचित आपल्याला कळेल. हे ही नाही जमले तर आपल्याकडे अजूनही काही मार्ग आहेत ते बघू. पण ऐकायची मात्र तयारी पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

गाणं कळायला मूळचाच कान असावा

अन्या दातार
Sun, 12/25/2011 - 22:54 नवीन
गाणं कळायला मूळचाच कान असावा लागतो असं वाटतंय.
कान ऐकून ऐकून सुद्धा तयार होतो. प्रयत्न करत रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

तानसेन यांचा संगीतातील वारसा

वाहीदा
Sun, 12/25/2011 - 23:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

__/\__

अर्धवटराव
Mon, 12/26/2011 - 05:31 नवीन
जयंतराव, माझ्याकडे शब्द नाहित तुम्हाला धन्यवाद द्यायला किंवा या लेखमालेची तारीफ करायला... __/\__ (नतमस्तक) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा