✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पराभवाचे श्राद्ध !

ज
जयंत कुलकर्णी यांनी
गुरुवार, 10/06/2011 - 13:17  ·  लेख
लेख
हे याच महिन्यात लिहीले पाहिजे. हे युद्ध संपल्यानंतर मी आमच्या शाळेत आलेल्या एका सैन्याधिकार्‍याला विचारले होते की हा पराभव पं नेहरूंमुळे झाला का आपल्या सैन्यामुळे(ज. कौल.) झाला ? त्यांनी विचारले की तुला यातील काय माहीती आहे. मी सांगितले की मी हिमालयन ब्लंडर वाचलेले आहे. अर्थातच मला तेव्हा गप्प बसवण्यात आले. ते योग्यच होते. पण मित्रांनो जेव्हा असा प्रसंग तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हीमात्र गप्प बसू नका. पराभवाचे श्राद्ध ! भारताच्या सैनिकी इतिहासातील सगळ्यात मोठ्या आणि अपमानास्पद पराभवाला या महिन्यात ५० वर्षे पूर्ण होतील. हा पराभव कसा साजरा करायचा हे मला समजत नव्हते. आज अखेरीस ठरवले की आजच्या पिढीला हा पराभव सांगणे हे माझ्या पिढीचे काम आहे. भविष्यात असे होऊ नये यासाठी आता आपली तयारी झाली आहे पण तरूणांच्या हातात जेव्हा या देशाची सूत्रे जातील तेव्हा या घटनेपासून शिकून त्यांनी योग्य माणसांना निवडुन द्यावे हीच विनंती आहे. एवढेच नव्हे तर ही राज्यपद्धती जर योग्य वाटत नसेल तर त्यांनी तीही बदलायला हरकत नाही असे माझे स्पष्ट मत आहे. पण असे परत होता कामा नये..... या घटनेची आठवण म्हणून ब्रिगेडियर जॉन दळवी यांच्या “हिमालयन ब्लंडर” या पुस्तकातील काही पानांचे स्वैर भाषांतर आपल्यासमोर ठेवत आहे... ते “कडू” मानून घ्यावे. ( लेखाचीभाषा माझी आहे ) पहाटे ५ वाजता नेफामधील शांत नामका चू खोर्‍याला तोफांच्या आवाजाने जाग आली. काय होत आहे हे कोणालाच कळेना. चिनी तोफखाना धडाडला आणि मागोमाग चिनी पायदळाने आक्रमण केले. तीन तासातच त्या खोर्‍यातील लढाई संपली. संपणारच होती ती, कारण ती लढाई होती दोन अतुल्यबळ सैन्यामधली. आसामला जाणारे सर्व रस्ते आता त्यांना मोकळेच होते. या पहिल्या दणक्याचा फायदा चिन्यांनी उठवला नसता तर नवलच. त्यांनी सरळ १६० मैल भारताच्या भूमीवर मुसंडी मारली आणि २० नोव्हेंबरला ब्रह्म्पूत्रेच्या खोर्‍यांत आक्रमण केले. सेला आणि बोमडिलाच्या संरक्षण व्यवस्थेच्या चिंधड्या उडवत त्यांनी काहीही विरोध न होता तवांगवर कब्जा केला. भारताचे याला उत्तर फारच केविलवाणे होते. त्या उंचीवर युद्धाचे प्रशिक्षण नसलेले, त्या उंचीवर लागणारी युद्धसामग्री नसलेले, त्या हवामानाची सवय नसलेले आणि दूर १६०० मैलावर असलेले पंजाबमधील सैन्य घाइघाईने जमा करण्यात आले आणि त्यांना राजकारण्यांनी मोठ्या आवेशाने चिन्यांना सिमेबाहेर फेकून द्या असे आदेश दिले. खरे तर आपल्या राजकारण्यांनी हे सगळे सैन्य चिनी सैन्याच्या नरड्यात अलगद सोडून दिले असे म्हणायला हरकत नाही. कारण या सर्व हालचालीत ना ठाम योजना होती ना खोलवर संरक्षणाची तयारी होती. या चिन्यांच्या विजयाचा सगळ्यात मोठा धक्का बसला तो आपल्या राजकारण्यांना नाही तर चिन्यांना. त्यांनी मारे मोठ्या युद्धाची तयारी ठवली होती. ३०,००० ते ५०,००० सैनिक या युद्धासाठी त्यांनी सिमेलगत तयार ठेवले होते. पूर्वचाचणी म्हणून चिन्यांनी ८ स्प्टेंबरला थागला भागात घुसखोरी करून आपल्या इच्छाशक्तीची परीक्षा घेतली होती. अर्थातच नेहमीप्रमाणे आपल्या राजकारण्यांनी सिमेवरच्या नेहमीच्या किरकोळ चकमकी म्हणुन त्याकडे दुर्लक्ष केले होते. या नेफामधील पराभवाने भारतातील जनता खडबडून जागी झाली. सत्ताधार्‍याना आणि संरक्षणदलाला हादरे बसले पण सगळ्यात नुकसान झाले ते भारतीय जनतेचे. जनता पराभूत मनोवृत्तीच्या गर्गेत कोसळली. त्यांचा त्यांच्या पुढार्‍यांवरचा विश्वास उडाला. यातून बाहेर पडायला पूढे दोन युद्धे जावी लागली. या चिनी आक्रमणाच्या अगोदर आपल्या सत्ताधार्‍यांची ठाम कल्पना होती की चीनबरोबर युद्ध होणारच नाही. ( अपवाद फक्त सरदार पटेलांचा. त्यांनी पं. नेहरूंना १९५० मधे पत्र लिहून याची स्पष्ट कल्पना दिली होती व चीनला युनोमधे सिक्युरीटी कौन्सीलमधे प्रवेश देण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहोत ते योग्य आहेत का याचा फेरविचार करायला सुचवले होते. हे पत्र आपल्याला आजही उपलब्ध आहे आणि ब्रि. दळवींच्या पुस्तकातही दिले आहे.) हिंदी-चीनी भाई भाई चा नारा जगप्रसिद्ध होता आणि जे काही किरकोळ मतभेद होते ते टिबेटच्या निर्जन भागाच्या ताब्याबद्दल होते. (ज्या ठिकाणी गवताचे पातेही उगवत नाही त्याबद्दल फार विचार करायची आपली तयारी नव्हती) या किरकोळ मतभेदांमुळे सिमेवर काही चकमकी उडतील पण सर्वंकश युद्ध ? छे ! ते शक्यच नव्हते. या आक्रमणाने भारताला धक्का बसला आणि त्यातून ते कधीच बाहेर आले नाहीत. हा धक्का राजकीय पातळीवर, युद्धनितीच्या पातळीवर, आंतरराष्टीय राजकारणाच्या पतळीवरही तेवढाच जबरी होता. हिमालयाच्या या दुर्गम भागात, त्या थंडीत, आणि उंचिवर युद्धाची ना आमची मानसीक तयारी होती ना शारिरीक. गाफीलपणाची ही हद्द होती. आमची हिमालयात युद्ध लढण्याची तयारीच नव्हती. या आक्रमणाला आमचे उत्तर गोंधळाचे व भावनीक होते. तेव्हाचे आपले राष्ट्रपती श्री. राधाकृष्णन म्हणाले “ आम्ही (आपले पंतप्रधान, राजदूत, मंत्री इ.) दुधखूळे आहोत आणि निष्काळजी राहीलो हेच खरे”........ भारताच्या सर्वोच्चस्थानावर बसलेल्या या माणसाची ही कबूली सगळे काही सांगून जाते. आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान पं नेहरू यांनी या आक्रमणाचे विश्लेषण “चीनने आमच्या पाठीत सुरा खूपसला” असे केले. पण शत्रूच्या समोर आपली पाठ करायची नसते हे ते सोयीस्कररित्या विसरले होते. आपल्या आकाशवाणीवरच्या भाषणात ते म्हणाले “ मला सांगायला दु:ख होते आहे की आमच्या सैन्याला सिमेवर माघार घ्यावी लागली आहे. चीनी सैन्याची प्रचंड संख्या, तोफखाना, आणि चिनी सैन्याने बरोबर आणलेली अवजड युद्ध सामग्री याच्यापुढे त्यांनी टिकाव धरला नाही.” ही धाडसी पण खेदजनक कबूली आपल्या देशाच्या सर्वोच्च अधिकारावर असलेल्या व्यक्तीला द्यावी लागली यासारखी दु:खद घटना ती काय....... त्या वेळचे संरक्षणमंत्री त्यांच्या भाषणात म्हणाले “ चीनी सैन्य हे आपल्या सैन्यापेक्षा सर्वच बाबतीत वरचढ होते. संख्याबल आणि दारूगोळा यात आपल्यापेक्षा ते फारच सरस होते. आमच्या जुनाट शस्त्रे व कमी संख्या असलेल्या सैन्यदलाला त्यांनी सहज हरवले”. आपल्या देशाचे संरक्षण व संरक्षणदल ही या माणसाची जबाबदारी होती. या पराभवाचे खरे कारण हे होते की सत्ताधार्‍यांना चीनशी युद्ध करावे लागेल असे स्वप्नातही आले नव्हते. या स्वप्नरंजनातच या पराभवाची कारणे दडलेली आहेत....................... क्रमश:..... जयंत कुलकर्णी.
  • पराभवाचे श्राद्ध ! ..भाग-२
  • पराभवाचे श्राद्ध........भाग-३
  • पराभवाचे श्राद्ध... भाग -४
  • पराभवाचे श्राद्ध............भाग-५
  • पराभवाचे श्राद्ध..... भाग-६

Book traversal links for पराभवाचे श्राद्ध !

  • पराभवाचे श्राद्ध ! ..भाग-२ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
लेख
अनुभव
माहिती
संदर्भ
वाद
भाषांतर

प्रतिक्रिया द्या
22415 वाचन

💬 प्रतिसाद (51)

प्रतिक्रिया

सध्या अनेक वृत्त पत्रात १९६२

निनाद मुक्काम …
Mon, 10/10/2011 - 02:46 नवीन
सध्या अनेक वृत्त पत्रात १९६२ च्या सैन्यामधील अधिकाऱ्यांचे लेख येत आहेत .त्यांनी सर्वांनी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले आहे . नेहरूंचे सो कोल्ड परराष्ट्र धोरण आपल्या देशाला अपरिमित हानीकारक ठरले . १९६२ चा मानहानीकारक पराभव हा त्याचा परिपाक आहे . मुळात नेहरू ह्यांचे प्रसिद्धीचा ( आंतराष्ट्रीय राजकारणात ) हव्यास. चमकोगिरी करण्याची प्रवृत्ती मुळे त्यांनी शीत युद्धात नुसते तटस्थ न राहता एक तिसरी आघाडी उघडून दोन महासत्ता व त्यांच्या कंपूला बोधांमृत पाजायला सुरवात केली . हे म्हणजे गल्लीतील दोन दादा ( भाई ) भांडत असतांना नुकत्याच हाफ चड्डीतून फुल चड्डीत आलेल्या मुलाने त्यांना भानू नका असा उपदेश करणे होय . अश्यावेळी ते दोघेही भाई आपली भांडणे एक मिनिट बाजूला ठेवून त्या मुलाला म्हणतील ;; तुझे वय काय ,तू बोलतो काय ? १९६२ च्या वेळी बध्याची भूमिका घेऊन ह्या महासत्तांनी जणू नेहरू ह्यांना हेच दाखवून दिले .( जमले तर आमरण उपोषण करा नाही तर सत्याग्रह. ) नी सोडवा हा पेचप्रसंग .तिसर्या आघाडीचे पुढे पानिपत झाले . अर्थात चीन व भारताच्या ह्याच्यात सीमा तंट्याची सुरवात झाली ती स्वातंत्र्यपूर्वी . ब्रिटीश साम्राज्याने भारत गिळकृत केला तेव्हा चीन च्या लगत असलेला आपल्या प्रदेशात स्वतःच्या मर्जीने सीमा आखून घेतली .( त्यांच्या विरुद्ध काय चीन बोलणार ?) मात्र भारत स्वतंत्र झाला .व त्याने त्याच सीमेला आधार मानले . खुद्द ब्रिटन आता स्वतःच्या पुनर्वसनात मग्न होता .अश्यावेळी चीनी महत्वाकांक्षेला पंख फुटले . स्वातंत्र्य नंतर आपल्या सैन्याचे आधुनुकीकरण झाले नाही .सगळ्यात कहर म्हणजे पाकिस्ताने जेव्हा काश्मीर वरून राडा घातला. तेव्हा त्यांनी १९४८ साली आय एस आय ची स्थापना केली जिचे त्यावेळचे लक्ष्य भारत होते .( ह्या आधी ब्रिटीश काळातील आयबी ही देशांतर्गत हेर संघटना ही भारत पाक मध्ये विभागल्या गेली होती .) मात्र आय एस आय ही परकीय भूमीवर कारवाया करण्यासाठी सी आय ए च्या धर्तीवर निर्माण केल्या गेली .आमचे शांततेची पुंगी वाजणाऱ्या ह्या नेत्याने भारतात अश्या बाबतील काहीच केले नाही .( इंदिराजी ह्यांनी १९६८ साली रॉ ची निर्मिती केली .व १९७१ ला रॉ ने आपले पहिले मिशन पूर्ण केले .) शत्रू हा अकस्मात हल्ला करतो .आमची सरकारी यंत्रणा गाफील होती ,स्वतःच्या स्वप्न रंजनात मश्गुल होती पण चीनशी संबंध चांगले ठेवताना काही चुका माझ्या मते नेहरू ह्यांनी केल्या .१) दलाई लामा ह्यांना संरक्षण देणे आपल्या दृष्टीने लामा कितीही थोर असले तरी चीनची त्यांचा संघर्ष होता अश्यावेळी चीनला राग येणे स्वाभाविक आहे .( एक उदाहरण देतो ही तुलना नाही आहे . दाउद आज पाकिस्तान मध्ये आहे तो आय एस आय व अलकायदा ह्यांना निधी पुरवतो म्हणून त्यांचे तेथे कौतुक होते .) मात्र आपल्या दृष्टीने हे पाकचे महा पातक आहे . २) नेहरू एकीकडे जागतिक शांततेसाठी आघाडी करून बसले होते .पण खुद भारतात हैद्राबाद व गोवा प्रसंगी भूभाग कब्जात घेण्यासाठी सफल सैन्य कारवाई केली .( ह्यावेळी काश्मीर सारखा हा प्रश्न युएन मध्ये नेला नाही ) अर्थात पोलादी पुरुषाच्या मुळे हे शक्य झाले व आपल्या दृष्टीने योग्य झाले .. पण हा विरोधाभास चीन ला खटकला . तेव्हा त्यांनी आपल्या कुमकुवत सैन्याच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन नियोजन पद्धतीने आपल्यावर हल्ला चढवला . ह्या प्रसंगी आपली भूमिका ज्यात , लष्कराचा वापर योग्य व आवश्यक होता चीनला व जगाला पटवून देणे .गरजेचे होते .( जे आपण केले नाही .कदाचीत पटेल, नेहरू ह्यांच्यातील सुप्त संघर्ष ह्याला कारणीभूत असेल ) अजून महत्वाची घोड चूक म्हणजे अमेरीकेला चीन अणुचाचणी करणार ही कुणकुण लागली होती ( चीन ने १९६४ साली ती केली ) नेहरुकडे अमेरिकेने चीन वर हेरगिरी करण्यासाठी मदत मागितली .मात्र पु ल म्हणतात तसे ''आपले पराराष्ट्र धोरण ह्या संबंधी कधी हो ,कधी नाही असे होते .( खरे तर अण्वस्त्र सज्ज चीन आपल्यासाठी त्रासदायक होता ) ह्या युध्धा नंतर मेनन ह्यांना संरक्षण मंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले . धर्मावर आधारीत राष्ट्रे मान्य नाही म्हणून ज्यू राष्ट्राला मान्यता न देणे हा गांधीजींचा विचार आपल्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग झाला ( ह्या राष्ट्राची स्थापना वेस्ट च्या बड्या राष्ट्रांनी केली होती .त्यांना विरोधात जाऊन स्वताचा अकलेचे तारे तोडणे म्हणजे ....) नरसिंह राव ह्यांनी ही चूक सुधारली लुक वेस्ट हा नारा दीला . व ज्यू राष्ट्राशी अधिकृत रीत्या संबंध जोडले ज्यावर वाजपेयी सरकार व नुकतेच गडकरी ह्यांनी कळस चढवला . १९६४ साली चीन अण्वस्त्र सज्ज होणे ही आपल्या दृष्टीने गंभीर बाब होती .किंबहुना त्यांच्या अण्वस्त्र सज्ज होण्याच्या प्रक्रियेत वेस्टन देश अडथळे आणत होते .भारतातवर कारवाई करून चीन ने जगाला अप्रत्यक्ष संदेश दिला '' नाद करायचा नाही '' अर्थात आपले राजकर्ते युद्ध करण्याच्या मनस्थितीत नाही ह्यांची त्यांना पुरेपूर कल्पना होती . दसर्याला शस्त्र पूजा करणाऱ्या भारतीय जनतेच्या हातात बळजबरीने चरखा देऊ पाहणाऱ्या ह्या राज्यकर्त्याने भारतीय इतिहासाची चांगलीच डिस्कवरी केली होती ,व तो समजून घेतला होता .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा