"आहो, आज चार दिवस झाले, निदान आजतरी गाडी बाहेर काढाल की नाही?" एव्हाना चैत्राचा पारा थर्मामीटर फोडायच्या प्रयत्नात होता.
हा असा त्रागा गेले पंधरा दिवस माझ्या मागे चालू होता. म्हणजे गाडी घेतली त्या दिवसापासून. तो कुठला अशुभदिन होता कुणास ठाऊक हिच्या आग्रहाला बळी पडून मी नवीकोरी इंडीका घरी आणली.
गाडी घरी आणली खरी पण इथे ड्रायव्हिंग येत कुणाला होतं!
ड्रायव्हर ठेवणं हे माझ्या आवाक्याबाहेरचं आणि एकदा गाडी घरी सोडायला म्हणून आलेल्या मित्राला रोज रोज कसला हैराण करणार? मग गाडी तशीच पार्किंग मध्ये पडून होती.