मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जोरदार, शानदार, मिरासदार!

जेम्स वांड · · दिवाळी अंक

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


जोरदार, शानदार, मिरासदार!



तर मंडळी, गरिबाचा रामराम घ्या. विषय सल्ला थोर. सण आलाय दिवाळीचा, वेळ आली आहे आनंदाची. आनंद म्हणजे काय? 'ह्या टोकासनी त्या टोका सुदीक दातकड़ काडायची मज्जा.' वाचनवेड्या मराठी समाजाला बेकार व्यसन असतं ते दिवाळी अंकांचं. मिपा सभासद झाल्यापासून विशेषांक आले-गेले, पण आपण इमानदारीत वाचते राहिलो, कारण मिपाची लेव्हल पाहूनच आपली छाती दडपल्याली हुती. ह्या वेळी मात्र मनाचा हिय्या करून काही मिपाकर मित्रांच्या प्रेमापोटी अन काही वरिष्ठ सभासदांच्या आदेशापोटी, अंकाच्या विषय बरहुकूम 'रसग्रहण' करावं म्हणतो. Photo-Collage-20191013-190743081 "तुमच्या कथा वाचून मिरासदार आठवतात!" खुद्द गुरुदेव टागोरांस नोबेल मिळाल्यावर जितका आनंद झाला नसेल, त्याच्या तिपटीने आमचं (खकानं) छाताड ह्या कॉमेंटनं फुलून जातं. मिरासदारांचं वेड मला कधी लागलं हे नेमकं आठवणं कठीण आहे. पण 'व्यंकूनं बाई ठेवली' म्हणजे एखादी बाई उचलून कुठेतरी नेऊनश्यानी ठिवली इतपत समजायचं ते वय होतं, इतकं मात्र नक्की. मला वाटतं मिरासदारीची दीक्षा घेतलेल्या सगळ्यांचा 'बाप्तिस्मा' करणारं पहिलं चोपडं म्हणजे 'माझ्या बापाची पेंड' हेच असावं. एरवी रसग्रहण फक्त दाढेला दाबलेल्या तंबाखू चुना डबल गोळीचंच करायचं असतं अशी आमच्या गावाकडे निस्सीम श्रद्धा असताना मी मात्र असं आमचं गाव केवळ लेखणीने चितारणाऱ्या मिरासदाराच्या लेखनाचं रसग्रहण करावं म्हणतोय. तर मंडळी, नमनाला घडाभर तेल ओतून पुढे सरकतो. मला वाटतं अधिकारिक कार्यक्रम असल्यागत 'अमुक साली अमुक ठिकाणी अमुक ह्यांच्या पोटी द मा जन्माला आले' वगैरे खुलासेवार करण्यात काही खास अर्थ नसावा. अधीरतेने उडी मारतो ती सरळ द मांच्या कथांवरच. Photo-Collage-20191013-190317177 कथेचा प्राण? भाषा.... जो आसमंत आपण वर्णन करतोय त्याचं चित्र लोकांसमोर उभं करायची खास कला साधते फक्त भाषेने. मिरासदारांची पात्रं भाषा कुठली बोलतात? तर माणदेशी सातारीत बोलतात. सातारा-पंढरपूर रस्त्यावरच्या जवळपास सगळ्या गावांत बोलली जाणारी बोली. भाषेला रसवंती म्हणणाऱ्या शब्दकाराला कदाचित आमचा हा माणदेश ठाऊक नसावा. नाहीतर इतकं मधुर अन रसिक नाव भाषेला देण्याऐवजी 'कट' नाव दिलं असतं! कारण ही भाषाच तसली आहे. स्वभावाने अतिशय भोळसट पण तितकीच तिरसट माणसं 'रसवंती' बोलतील ह्या विचारानेच अजीर्ण होतं. तर असा हास्याचा मसाला घोटायला लागल्यावर आमचे द मासुद्धा असाच फर्मास कट काढतात. बरं, ग्रामीण असली तरी ह्या भाषेला प्रवाह आहे भरपूरच एकंदरीत, कारण 'पाइण्ट' 'आयड्या', 'शील', 'हाल्ट' वगैरे इंग्लिश शब्द ह्या भाषेने आत्मसात केले आहेत. 'कधीही कुठल्या प्रश्नाला सरळ उत्तर न देणं' आणि 'सतत दुष्काळी वातावरणात जगत आलेलं एक ठसकेबाज स्वरूप' ह्या दोनखांबी तंबूवर ही मस्ती तोललेली आहे. आता इतकी रग्गड भाषा विनोदी लेखनाला वापरणं म्हणजे लिंबू चिरायला दांडपट्टा परजणं झालं, पण द मा ते लीलया करतात. ग्रामीण पश्चिम महाराष्ट्रीय बोली म्हटली की स्त्री पात्राच्या तोंडी "आता ग बया" बळेच कोंबण्याइतका हा विषय सोपा खचित नाही. गावात काय नवीन पेव फुटलं/गटाळ्या घातल्या/चमत्कारिक माणसं आली की त्याची वर्दी द्यायला बाबू पैलवानाच्या उंबऱ्यावर धडकलेल्या नाना चेंगटला बाबूची बायको "आलं दोड मेलं, आता काय चिपटभर श्यांगांना मरण न्हाई, गप बसून रहा उंबऱ्याला तू मेल्या बातमी घिऊन आलास का सरळ कोणीतरी गचकल्याचीच बातमी आणतुयस." असं म्हणत उद्गारते. दुसरं म्हणजे पात्रं - पात्रवैविध्य प्रचंड जास्त असलेलं लेखन म्हणजे द मा. ग्रामीण सातारी परिवेशात असलेल्या अठरापगड जाती, त्यांच्या लकबी, सवयी, एकमेकांना हाळ्या घालायची पद्धत, एकंदरीत अंगकाठी ह्याचं प्रचंड सूक्ष्म पण कुठेच रटाळ न वाटणारं चित्रण द मा सहजी करतात. दुकानात सोनं गाळायला बसलेल्या सोनाराचे वर्णन पण करताना द मा 'पायात बंकनळी धरून चांदीची तार ओढताना काम जोरदार सुरू होते' असं काहीसं करतात. Photo-Collage-20191013-190141004 द मांच्या कथांत मध्यवर्ती पात्रं पाच - पहिला बाबू पैलवान, दुसरा नाना चेंगट, तिसरा गणामास्तर, चौथा रामा खरात अन पाचवा शिवा जमदाडे. प्रत्येकाची एक एक लकब अन सवय आहे. रस्त्यावरून चालताना सरळ नाकासमोर न पाहता आजूबाजूची मौज पाहत चालणं, अर्धवट काहीतरी ऐकून मंडळींना काहीतरी करायला लावणं ही नाना चेंगट उर्फ चेंगट्या उर्फ चेंगटूची लकब. खुशीत असो वा रागात, शेजारी (मुद्दामच) बसवून घेतलेल्या चेंगटला धबेलदिशी दणका ठेवून देत भावना व्यक्त करणारा बाबू पैलवान, विडीची पूर्ण मजा यावी म्हणून तिच्या जळत्या टोकाकडूनच धूर ओढणाऱ्या रामाची तऱ्हा तिसरीच अन नानाच्या नादाला लागून कायतरी करत बसणारा शिवा एकीकडे, ह्या सगळ्यात जरा सुशिक्षित म्हणजे बुआ रोजचा पेपर तालुक्याला असलेल्या सिनेमाच्या जाहिराती अन सरकारी लिलाव नोटिशीचंसुद्धा वाचन करणारा गणामास्तर. पात्रांचं वर्णन करताना द मा हमखास वापरतात ते प्राणिजगतातील रूपकं, त्यातही गाढव हे सगळ्यात जास्त वापरलेलं रूपक. "अरेच्या, हा माणूस असा का करतोय, गाढवच दिसतोय की लेकाचा" पासून ते 'बाबू पैलवानानं खुशीत मारलेला रट्टा खाऊन कळवळत चेंगट बेदम मार खाल्लेल्या गाढवासारखे तोंड करत गणामास्तर मागं सरकला' किंवा 'शिवानं एकदम हसऱ्या गाढवसारखं तोंड केलं' ह्या सगळ्यात पात्रं काय करतायत हे मजेशीररित्या दर्शवून द्यायला गाढवंच वापरलेली दिसतात. द मांच्या पात्रांची ताकद आहे त्यांनी केलेलं व्यक्तिचित्रण. पूर्ण पुस्तकात एकही चित्र नसताना इतकं नळ फुटेस्तोवर हसवणाऱ्या कथा लिहिणं मला वाटतं मिरासदारांच्या लेखनाचं बलस्थान असावं. त्याला दुसरं कारण म्हणजे कथानक खुलवत न्यायची विलक्षण हातोटी. मिरासदारांची कथा खुलवण्याचे काही काही सेक्शन पाडता येतील - १. गावातील भौगोलिक परिस्थिती - उन्हाने मी म्हणून मरगळलेली दुपार होती, संध्याकाळचे गार वारे अन पानांची सळसळ होती, अवशेची रात होती, ओलीगच्च पावसाळी रात्र होती वगैरे वगैरे. २. वरील वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जे काही 'मिसमॅच असेल ते' म्हणजे 'अशा ह्या सर्द राती एक मुडदा आपला मजेत तिठ्यावर आडवा पडला होता', किंवा साधीशी गोष्ट मजेशीर पद्धतीने मांडणं, उदाहरणार्थ 'शिवाच्या रानात इतर चार लोकांच्या असतात तसलीच एक विहीर होती' किंवा 'देवळाच्या गाभाऱ्यात एकदम पाकोळी फडफडल्यामुळे मंडळी सज्जड दचकली' वगैरे वर्णनं. ३. तिसऱ्या भागात अशा सगळ्या आसमंतात आपली पात्रं काय करत होती त्याचं वर्णन - उदाहरणार्थ, 'त्या आवशेच्या रात्री रानाकडून घरी जायला निघालेला नाना चेंगट झपझप पावले उचलत होता' किंवा 'करायला काय नसल्यामुळं बाबूनं उगाच कानातून माती काढायचा उद्योग चालवला होता' किंवा 'गणामास्तर काय सांगतोय त्यापेक्षा जास्त रामाला उलट्या विडीचा झुरका मजेशीर ठसका देऊन गेला.' ही सहसा सुरुवात करून गावात मुडदे सापडणं, अमक्याची बाई तमक्याबरोबर पळून गेली, अमक्या तमक्याचा कज्जा होणार, तमक्याच्या विहिरीत राकेल सापडलं, वगैरे विषयांवर तुफान विनोदी बार उडवण्यात द मांचा हातखंडा आहे. कधीकधी एखादं भोळसट पात्र खंगरी कायतरी करून जातं - उदाहरणार्थ, 'चल नाना चल' ही कथा. मुद्दल असं की एक बाई रोज मळवट भरून केस मोकळे सोडून नानाच्या स्वप्नात येई आणि "माझ्याबरुबर चल नाना" म्हणत त्याला घाबरवून सोडी. आता ह्या विचित्र आजाराचा इलाज काय? तर मंडळी पत्ते कुटत गप्पांचा फड रंगवत नानाच्या सोबतीला रात्री येऊन बसू लागली. गडी झोपलाच नाही, तर कसली येतेय टवळी स्वप्नात वगैरे उपाय. ते फसल्यावर देवऋषी आणून गंडेदोरे. शेवटी ठरतं की नानाला अडमाप दारू पाजून लास करायचं, म्हणजे नाना उताणा झोपला की स्वप्न नाही का काही नाही. अशी बिलंदर आयडिया डोसक्यात आणून कंपनीतली मंडळी नानाला चांगले सात-आठ ग्लास दारू पाजतात, पण त्यानंतर झोपायच्याऐवजी 'नानानं घरीच आरडाओरडा करीत दंगा चालवला, कधी नाही ते थोरल्या भावालाच शिव्या घातल्या, बायकोला शिस्तीत चोपून काढलं, अन रात्रभर आळी डोसक्यावर घेतली' असा विनोदी प्रकार घडतो. इतकंच काय, तर बाबू पैलवानालासुद्धा नाना "काय रे बाब्या, फार मस्ती आलीय का तुला फोकलीच्या??" करत आव्हान देतो. तसं नाना हे पात्र जसं कायम पिचकं, पोचट, बाबूचे दणके खाणारं वगैरे असतं, ते एकदम असा विचित्र हलकल्लोळ उडवतं, तो मासला होतो परिस्थितिजन्य विनोदाचा. ह्याशिवाय द मांच्या लेखनात मध्येच एखादी गंभीर अन प्रसंगी हेलावून सोडणारी गोष्ट सापडते. कधी ती दुःखान्ती असते. 'रानमाणूस'मधल्या पोटच्या पोराच्या अंतिम संस्काराच्या सामानावरून मर्तिकाचं सामान विकणाऱ्या दुकानदाराला तिरडीच्या किमतीचा जाब विचारणाऱ्या बापूदेवासारखी, कधी पावसाने ओढ दिल्यामुळे आबा देशपांड्याकडे कर्जाऊ पैसे घ्यायला गेलेल्या विठोबाला नेमकं तेव्हाच बदाबदा कोसळणाऱ्या पावसाने दिलेले बळ, त्यापोटी त्याने आबाला म्हटलेलं "नग मालक तुमचं पैसं आता, ठेवा तुमच्यापाशीच" असा सुखान्तसुद्धा असतो. द मांच्या पुस्तकांत चित्रं नसतातच, पण मुखपृष्ठावर मात्र पुस्तकाच्या अग्रभागी असणाऱ्या मुख्य कथेबद्दल मजेशीर काहीतरी दर्शवणारं एकच सशक्त चित्र असतं. चित्र सशक्त असणारच, कारण ती कला मनसोक्त साकारणारे कलाकारही आपले लाडके शि.द. फडणीस उर्फ 'एस फडणीस' हे आहेत. ते ज्या प्रकारे मुख्य कथा पकडून मुखपृष्ठ चितरतात, तसं न आजवर बघितलं, न पुढे बघायला मिळेल असं वाटतं. Photo-Collage-20191013-191952645 एकंदरीतच, दमांच्या लेखणीने मंडित कुठलंही पुस्तक हा माझ्यासाठी तरी एकाच बैठकीत फडशा पाडायचा मेवा असतो. दमांच्या लेखनाचं रसग्रहण करणं म्हणजे खरं तर झणझणीत अशा रश्याचा किंवा उडदाच्या घुट्याचा भुरका मारण्यासारखं आहे. तिखट भाषा पण हसवून हसवून डोळ्यांंतून पाणी येणं फिक्स असणं हे ह्याचं व्यवच्छेदक लक्षण. मध्येच संवेदना हादरवून सोडणाऱ्या एखाद्या कथेची पेरणी कदाचित वाचकांना हास्याची किंमत कळून यावी म्हणून केलेली योजना वाटते. गावात (तत्कालीन) असलेली संसाधनांची तूट दमांच्या लेखनात जाणवते. कुठे ढणढणत्या चिमण्या असतात, कुठे घरातल्या बाया संध्याकाळ झाली की कंदिलाच्या काचा पुसत असतात. पण अशातही रोजची कामं करणारी माणसं असतात, त्यांचं ज्ञान-अज्ञान, समज-गैरसमज, धारणा-अवधारणा असतात, त्यातून उत्पन्न होणारा विनोदरस असतो, करुणरस असतो, प्रचंड विचारवैविध्य असतं अन मुख्य म्हणजे गावातली माणसं नेहमी गोडगोड, मेहनती, सालस वगैरे असतात ह्या कविकल्पनांना उभा-आडवा दिलेला छेद असतो. दमांची पुस्तकं वाचून पंधरा मिनिटं डोळे मिटून स्वस्थ पडा कधी, मनातल्या मनात नाही 'भोकरवाडीला' पोहोचलात तर बघा. बैठकी सुरू असताना बाबू, नाना, गणामस्तर, रामा, शिवा ह्यांच्यात कंदील धरून स्वतःला बसलेलं पाहणं एक अनुभव असतो. एकदा नक्की बुडून पहा. असं म्हणतात रसग्रहण थांबवायची खरं तर एक वेळ असते, मधुरता. भरपूर ग्रहण होतंय जाणवलं की सहसा रसग्रहण थांबवलं जातं. पण मला आता तसं करणं जड जातं आहे. मिरासदारांचं काम प्रचंड आहे. एकदोन जिल्ह्यातल्या चारपाच तालुक्यांत विखुरलेल्या गावातील एक गाव बारा भानगडी अन त्यातले मजेशीर, तर प्रसंगी हादरवून सोडणारे प्रसंग ह्यांची मेजवानी म्हणजे आमची मिरासदारी. मी इतक्या मोठ्या लेखकाला न्याय देऊ शकलो असा माझा दावा अजिबातच नसेल अन एका लेखात तर ते शक्य नाहीच, तरीही मी माझ्या अल्पमतीने केलेलं हे रसग्रहण तुम्ही मायबाप वाचक गोड मानून घ्याल ही विनंती. सगळ्यांना शुभ दीपावली.

श्रेयनिर्देश: चित्रे आंतरजालावरून साभार.


20191016-122815
अनुक्रमणिका

वाचन 31851 प्रतिक्रिया 0